कुमार गंधर्व : एक सृजनात्मक तत्त्व - मुकुल शिवपुत्र

गुरु शिष्य कुमार गंधर्व मुकुल शिवपुत्र

कुमार गंधर्व : एक सृजनात्मक तत्त्व

लेखक - मुकुल शिवपुत्र

कुमारजी माझे वडील, तसेच गुरू, तसेच तेच माझे हिरो - मी त्यांचा फॅन! परंतु आज अधिक स्पष्टपणे लक्षात येतं की मी त्यांना एक सृजनात्मक तत्त्व या दृष्टीनंच पाहिलं आणि थोड्या फार प्रमाणात आत्मसातही केलं. आज ते देहातीत झालंय, म्हणून भय वाटतं की ते दुसऱ्या कुठल्या गॅलेक्सीत निघून न जावो. केवळ माझ्यातच नव्हे तर आमच्याच घोळक्यात राहो.

थोडक्यात :
'तुका म्हणे आता होऊनि परिमित
माझे काही हित विचारावे.'

एकदा मी बाबांना विचारलं, की 'तुम्हीही आत्मचरित्र का लिहीत नाही' म्हणून. ते म्हणाले, "त्याचं असं आहे की, एकतर आत्मचरित्र ते लिहितात, ज्यांना वाटतं आपल्या जीवनात आपण जे करायचं ते करून झालंय. मग ते मागे वळून पाहतात, लिहितात वगैरे. तसं एकतर मला वाटत नाही. दुसरं म्हणजे आपल्या जीवनात लोकांना सांगावं असं फार कमी झालेलं असतं. ज्या ज्या म्हणून महत्त्वाच्या घटना आपल्याला वाटत असतात, तशाच महत्त्वाच्या घटना इतरांच्याही जीवनात घडलेल्या असतात. मग लोकांना देण्यासारखं असं किती उरतं?" आज माझ्या मते कुमारजींचं तेच उजळ आत्मचरित्र ठरेल ज्यातून त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचं दर्शन स्पष्ट होईल. जे जे म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू होते ते सर्वच वाखणण्यासारखे होते आणि म्हणूनच ते बहुतेक सर्वांचेच आवडते होते. जरी कुणाला एक-दोनच पैलू दिसत असले तरी तो त्यातूनच भरपूर आनंद घेत असे. पण असा कोणता महत्त्वाचा पैलू त्यांच्यात होता, जो त्यांच्या कुठल्याही (सर्वच) पैलूंमधून बाह्यजगात किरणं फेकत होता? तो स्पार्कलिंग एलिमेंट म्हणजे त्यांचा क्रिएटिव्ह फोर्स! एक तर त्यांच्यातली जी सृजनशक्ती होती ती भूतकाळाचा फापटपसारा वगळून आणि अनुभवाचं सार घेऊन वर्तमानातल्या परिस्थितीत स्फटिकासारखी स्वच्छ बुद्धी घेऊन बसायची. सतत बदलणाऱ्या परिस्थितीतील जी सृजनाची धारा आहे तिच्या ठिकाणी असलेल्या आतल्या सांगीतिक रचनेला स्वरूप द्यायची. रचना ही निसर्गात सतत होत असते आणि आपण भूतकाळातल्या फापटपसाऱ्यात डोकं घालून बसतो म्हणून त्यातल्या रचनात्मकतेला नोटडाऊन करत नाही. तसं त्यांचं होत नसे. ते स्फटिकासारखं स्वच्छ असायचं. जे जे म्हणून क्रिएटिव्ह लोक आहेत आणि याआधी झाले आहेत ते आपल्या स्वभावधर्मानुसार निसर्गात सतत घडत असलेल्या रचनेला रूप देत आहेत. ज्यांचा स्वभावधर्म वैज्ञानिकांचा आहे, ते जसे इन्व्हेन्शन्सकर्ते झाले, तसेच कलाधर्मी कला'कार' झाले!

या सर्व रचनात्मकतेच एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की कुमारजी क्रिएटिव्ह होते पण त्यांचं माध्यम आणि स्वभावधर्म भारतीय पारंपरिक संगीत हा होता. आपल्या पारंपरिक संगीतात कुणा एकाला काही करायचं म्हणाल, तर त्याच्या हातांत दहा-बारा स्वर, चार-सहा मात्रा आणि काही अक्षरव्यंजनांचं गाठोडं असं नसतं, तर त्यांचं भांडवल म्हणजे काव्याची, संगीताची आणि तालशास्त्राची वेगवेगळी आणि मिळून एकरूप झालेली परंपरा असते. अशा परंपरेच्या बऱ्याच धारा आहेत आणि त्या सर्वच अर्थपूर्ण म्हणून बरोबर आणि शास्त्रशुद्ध आहेत. चांगली चांगली क्रिएटिव्ह मंडळी अशा भव्य परंपरेच्या शर्टाच्या खिशात फाऊंटन पेनसारखी अडकलेली दिसतात आणि समजदार असतील, तर त्यातच सार्थक मानतात. हुसेन आणि राजा रविवर्मा हे एकसारखे चित्रकार नव्हते. किंवा पिकासोला लिओनार्दो दा विंची काही आड आला नाही, कारण त्यांच्या हातात फक्त रंग होते. अमुक एकच रंगवायचं असं नव्हतं.

हुसेन स्त्री चित्र रविवर्मा स्त्री चित्र
शैलींमधला फरक : एम. एफ. हुसेन (डावीकडे) आणि र‌ाजा रविवर्मा (उजवीकडे) यांनी काढलेली स्त्रियांची व्यक्तीचित्रं

पण असं संगीतात नाहीये. मी नुसते स्वर गात नाही. मी 'तोडी' गातो आणि तीच 'तोडी' मिया तानसेन गात होते. तोडी तीच, तीनताल तोच मग त्यामध्ये जे नावीन्य दिसतं ते कसं वठतं? ते कुमारजींच्या गाण्यातून, रचनाधर्मातून प्रतीत होतं.

कुमार गंधर्वांनी गायलेला राग तोडी

भारतीय संगीताची परंपरा प्रगल्भ आहे. जसं मी संस्कृत शिकायला लागलो त्यानंतर बऱ्याच वर्षांनंतर प्रा. बापटांनी मला बाराखडी शिकवली. शिकवली म्हणजे पाठ नाही करून घेतली, तर त्याचा अर्थ समजावून सांगितला. जिची बाराखडीसुद्धा शुद्ध आहे अशी आपली भाषा आहे. नवकवितेलाही आधार (माध्यम) त्याच भाषेचा आहे. परंतु गायकांच्या हातात केवळ अक्षरं नसतात. म्हणून भारतीय संगीतात नवनिर्मिती सोपी नाही. मग ती निर्मिती कुमारजींनी कशी कशी आणि कुठं कुठं साधली, हे थोडंसं बघू.

पारंपरिक संगीताचं जे स्वरूप आपल्यासमोर आहे त्यात सृजन कुठं कुठं होत असतं? एकतर राग जन्माला येतात, ताल बनतात, मग जन्माला आलेल्या कवितेला ते आपला पेहराव घालतात. हा सृजनाचा पहिला टप्पा. हा कुमारजींनी साधला. पण ते तेच करत बसले नाहीत. झालेल्या रचनेची प्रस्तुती पण तेच करत होते. आपल्या संगीतात प्रस्तुतीदेखील रचना आहे. त्यातूनच गायकी आणि घराणी जन्माला आली. हा दुसरा टप्पा आहे सृजनाचा. प्रस्तुतीतलं सृजन कसं वठतं? कुमारजींनी मांडलेल्या सिद्धांतानुसारतर ताल कधी एकसारखं गाऊच देत नाही. ताल आपल्या विविध आघातांनी स्वरावलींना आंदोलित करून विविध रूपं देत असतो. पुनःपुन्हा तेच घडूच देत नाही. तरी त्यात विरोधाभास असा, की त्याच छंदात नेहमीसाठी मोनोटोनसली बांधून ठेवतो. (हे कुमारजींचेच विचार आहेत.)

बऱ्याच वेळा त्रास असा होतो, की मी माझ्यातला 'कुमार गंधर्व' वेगळा असा काढूच शकत नाही. याचं कारण मी त्यांना आत्मसात करण्याच्याच प्रयत्नात राहिलोय. तिऱ्हाइताच्या दृष्टीनं पाहण्यात नाही. तालाबद्दलचे उपरोक्त विचार त्यांचेच आहेत आणि तसंच रागाचंही होतं. राग, ताल आपण सोडू शकत नाही आणि त्यांना सोडावं असंही विचारांती वाटत नाही, कारण ते अर्थपूर्ण आहेत. बेसिक बीट्सचे ताल झाले, स्वरावलीचे राग झाले, स्वतःहून होत आले, ते अर्थहीन कसे होतील? तीनतालात सोळाच्या ऐवजी पावणेसोळा मात्रा कशा सिग्निफिकंट होतील? ते सोळाला कुणीही अर्थहीन ठरवू शकत नाही. मग या साच्यात निर्मिती कशी साधायची?

रागाच्या व्यक्तित्वालाही (रागत्वाला) कुमारजींनी वेगवेगळ्या दिशेनं पाहिलं. जशी एकाच व्यक्तीची वेगवेगळ्या दिशेनं घेतलेली छायाचित्रं असावीत. हेही सृजनच आहे. द्रुत गतीत गायली जाणारी रचना मध्य लयीत वेगळ्या गायकीच्या अंदाजानं गाणं हेही सृजनच आहे. आडा चौतालातली रचना तीनतालात गाणं इथंही ते एलिमेंट आहे. पारंपरिक संगीतात जेव्हा तुम्ही क्रिएटिव्ह होण्याचा 'प्रयत्न' करता, त्या वेळी दुसऱ्या परंपरेचा अभ्यासामुळे ऑर्थोडॉक्सही होत जाता. परंपरेला दिलेली मान्यता आणि निर्मितीचा स्रोत हे दोन्ही एकाच वेळी घडत असतं. असं आपलं संगीत आहे आणि असेच कुमार गंधर्व होते. त्यांनी बडे ख्यालपण फार उत्तम बांधले. इतके सर्वांगदर्शी ख्याल प्रमुख रागांत नाहीत. त्यांनी टप्प्याचं आणि टप्प्याच्या तानांचं नोटेशन पलुस्कर पद्धतीतून भातखंडे पद्धतीत केलं, स्वतः अभ्यासलं आणि शिकवण्याचाही प्रयत्न केला. कुमारजी मैफली जितके अप्रतिम गायचे, त्याहून अधिक चांगले शिकवायचे. लोकधून आणि राग यांचं मर्म समजून त्याचा जो गाभा त्यांना गवसला आणि रचनांमधून तो त्यांनी स्वतः ज्याप्रकारे प्रस्तुत केला, ते त्यांचं खरं श्रेष्ठत्व होय. त्यांना कुमार गंधर्वादी अनेक सन्माननीय उपाध्या मिळाल्या. सत्कारादी झाले. परंतु देहातीत झाल्यानंतर 'आचार्य' ही उपाधी देण्यात आली, हे आज मी जाहीर करतो.

संगीत सगळ्या जगभर आहे, पण रागसंगीत भारतातच आहे. त्याच्या तळाशी जाऊन ते वर आलं याची मोठी कलात्मक-शास्त्रीय वस्तुस्थिती म्हणजे 'राग संजारी'. पंधरा दिवसांसाठी संजा (सायंसंध्या) आपल्या माहेरी येते. तिच्या सख्या, म्हणजे गावातल्या मुली पंधरा दिवस तिची वेगवेगळी चित्रं काढतात, तिची आरती करतात, सश्रद्धवृत्तीनं तिची गीतं गातात. त्यातल्याच एका धुनेचं परिष्करण म्हणजे 'संजारी'! त्या गीतांना अनुसरून त्यातल्या बड्या आणि छोट्या ख्यालाची शब्दरचना केली आहे. याला म्हणतात क्लासिक आणि हाच कुमारजींचा क्रायटेरियन!

कुमार गंधर्वांचा राज संजारी

व्यक्तिशः माझ्या जीवनात चमत्कार असे घडलेच नाहीत. जी झाली ती उत्क्रांती होती. पण कुमारजींच्या जीवनात क्रांतीपण झाली. चमत्कार झाले. क्रांतिकारी माणूस अजाणतेपणीच आध्यात्मिक असतो, परम तत्त्वानं युक्त असतो असं मला वाटतं. कुमारजी न शिकताच गाऊ लागले. त्या वेळच्या त्यांच्या रेकॉर्ड्समध्ये लागलेली त्यांची स्वरस्थानं, त्यांनी लावलेला भैरवीचा ऋषभ हा एकाच तोलामोलाचा होता. आम्हांला वाटायचं, बाबा आता चुकतील, मग चुकतील आणि नेमकं ते बरोबरच यायचं.

एकदा ते म्हणाले, "अमुक व्यक्ती गेल्यानंतर मी काहीच नवीन केलं नाही. नुसतं व्याजावर खात बसलोय." असं म्हणणं निव्वळ भावनिक आहे. तेव्हा या नात्याचा आपल्याला अनर्थ करून चालणार नाही. कारण बहुतेक भावनात्मक संवादांचेच अनर्थ होतात. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्या भावना आणि संवेदना आटल्या असतील; परंतु त्यांच्या ठिकाणी असलेला क्रिएटिव्ह फोर्स धगधगतच होता. कलाकार कधीच एकटा नसतो. गाणारा एकटा बसून गायला तरीही कुणाला तरी उद्देशूनच गात असतो. तो ज्याला ऐकवतो त्या श्रोत्याचा पण मोठा महिमा आहे. जसे ऐकणारे तसे गाणारे, एवढंच त्यांना म्हणायचं होतं.

ललितकलेत म्हणजे फाईन आर्ट्समध्ये काय आहे, की लोकांना निकष कळत नाहीत. उदाहरणार्थ, तुमच्यासमोर मी हिरा आणि पांढरा पुष्कराज ठेवला, तर तुम्हांला त्यातला फरक ओळखता येणार नाही. तो फरक ओळखण्यासाठी सोनाराची दृष्टी पाहिजे. त्या दृष्टीनं तो काय ओळखतो? त्याला म्हणतात सूक्ष्म दृष्टी. बऱ्याच वेळा कलाकारांच्या जीवनात असं होतं, की ते चण्याफुटाण्याच्या ढिगाशेजारी मोती घेऊन विकायला बसलेले असतात. म्हणून ते मग त्या मोलानंच विकले जातात. मोत्यांनाही लोक फुटाणेच समजतात.

माझ्या आणि हुसेनच्या लाइनीतला जो फरक आहे, तो सूक्ष्म आणि मोठा आहे. बटबटीत सौंदर्यदृष्टी असलेल्या डोळ्यांना तो दिसणारा नाही. ती लाइन जे काही बोलते तशीच कुमारजींची एक लाइनसुद्धा मोठी अर्थपूर्ण असायची. तो कलेतला गर्भित अर्थ कलेरूनच समजायचा.

तबलजी वसंतराव आचरेकर गेल्यानंतर ते खचले. माझ्या डोळ्यांना ते स्पष्ट दिसलं. मी एकदा त्यांना म्हणालो, "आता यापुढे एका तबलजीऐवजी विविध तबलजींबरोबर तुम्हांला गावं लागेल. त्यातून नावीन्य आणि निर्मिती..." ते मला मध्येच अडवून म्हणाले, "ते, ते काही खरं नाही. तू गप्प राहा." आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी प्रस्तुतीकरणात जे विविध प्रयोग केले ते याच सांगात्याचा हात धरून. हा सांगाती गेल्यानंतर ते आश्वस्त होऊन मोकळेपणाने गाऊ शकले नाहीत. त्यांच्यावर दडपण आलं. ते एकटे कधीच नव्हते. संगतीनं फुलायचं, संगतीनं कोमेजायचं, संगानंच प्रेमळ व्हायचे आणि संगतीनंच रागे भरायचे. असा हा संवेदनक्षम परिवर्तनशील माणूस कुणाबद्दल गैरसमज मात्र उराशी घट्ट बाळगून ठेवायचा. ते दूर व्हायला बराच वेळ लागायचा. पण आपलं ज्याच्यावर प्रेम असतं त्याचा एखाद दुसरा दोषही आपल्याला आवडू लागतो. तसंच माझंही झालंय.

तबलजी वसंतराव आचरेकरांच्या साथीने गाताना कुमार गंधर्व

'कालजयी कुमार गंधर्व' ह्या पुस्तकातून. पुस्तकाच्या संपादिका - कलापिनी कोमकली, रेखा इनामदार-साने. लेख छापण्याची परवानगी देण्याबद्दल मुकुल शिवपुत्र, कलापिनी कोमकली, 'कुमार गंधर्व प्रतिष्ठान' देवास आणि राजहंस प्रकाशन यांचे आभार.

कुमार गंधर्व आणि मुकुल शिवपुत्र यांची काही रेकॉर्डिंग्ज

कुमार गंधर्व आणि मुकुल शिवपुत्र मागे तंबोऱ्यावर

मुकुल शिवपुत्र यांची भैरवी

दिवाळीसाठी कुमार गंधर्वांनी रचलेली बंदीश

मुकुल शिवपुत्र यांनी गायलेलं निर्गुणी भजन

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

अप्रतिम लेख. सगळं समजल असं नाही पण

चांगली चांगली क्रिएटिव्ह मंडळी अशा भव्य परंपरेच्या शर्टाच्या खिशात फाऊंटन पेनसारखी अडकलेली दिसतात

ही उपमा खूप आवडली. लेखाची भाषा एका लेखकाने लिहिली आहे असं वाटावं अशी आहे.

अंकाच्या थीमसाठी एकदम चपखल लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

चिंतन फार आवडले. लेखाची भाषा अतिशय संवेदनशील व्यक्तीची आहे.

एक तर त्यांच्यातली जी सृजनशक्ती होती ती भूतकाळाचा फापटपसारा वगळून आणि अनुभवाचं सार घेऊन वर्तमानातल्या परिस्थितीत स्फटिकासारखी स्वच्छ बुद्धी घेऊन बसायची. सतत बदलणाऱ्या परिस्थितीतील जी सृजनाची धारा आहे तिच्या ठिकाणी असलेल्या आतल्या सांगीतिक रचनेला स्वरूप द्यायची.

ही इनसाईट, हे समजणं आणि शब्दात मांडणं हा कळस आहे.
.

ललितकलेत म्हणजे फाईन आर्ट्समध्ये काय आहे, की लोकांना निकष कळत नाहीत. उदाहरणार्थ, तुमच्यासमोर मी हिरा आणि पांढरा पुष्कराज ठेवला, तर तुम्हांला त्यातला फरक ओळखता येणार नाही. तो फरक ओळखण्यासाठी सोनाराची दृष्टी पाहिजे. त्या दृष्टीनं तो काय ओळखतो? त्याला म्हणतात सूक्ष्म दृष्टी. बऱ्याच वेळा कलाकारांच्या जीवनात असं होतं, की ते चण्याफुटाण्याच्या ढिगाशेजारी मोती घेऊन विकायला बसलेले असतात. म्हणून ते मग त्या मोलानंच विकले जातात. मोत्यांनाही लोक फुटाणेच समजतात.

वा!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0