Skip to main content

पिवळ्या दिव्याला संग्रालयात पाठवा

काळ कुणासाठी थांबत नाही. त्याला एडिसनचा बल्ब कसा अपवाद असणार ? भारनियमनाच्या आजच्या युगात त्याची रवानगी संग्रालयात व्हायला हवी. आजच्या सीएफएलच्या जमान्यात भरमसाठ वीज खाणार्‍या पिवळ्या बल्बची आवश्यकता नाही. या पिवळ्या बल्बवर सरकारने रितसर बंदी आणायला हवी. काळानुरुप बदलेल्या तंत्रज्ञानाने कमी वीज जास्त प्रकाशचा अवलंब करायला भाग पाडले आहे. भारनियमनाच्या जमान्यात वीज बचतीचा संदेश सर्वदूर पोहचवण्यासाठी नवे तंत्रज्ञान विकसित होत आहे. पण अजूनही स्वस्तात उपलब्ध होणारा पिवळा बल्ब वापरला जातो. हा बल्ब ७५ टक्के वीज वापरून उष्णता निर्माण करतो आणि ५ टक्के प्रकाश देतो. सीएफएल बल्ब ६० ते ७० टक्के वीज वाचवतात. अर्थात हा थोडा महागात बसतो. पण त्याने फारसा फरक पडत नाही. ग्रामीण भागात घरा-दारात आणि ग्रामपंचायतीच्या खांबावर अजूनही हा पिवळा बल्ब मिरवतो आहे. त्यामुळे आजच्या वीज बचतीच्या आणि भारनियमनाच्या काळात पिवळ्या बल्बची रवानगी संग्रालयात जायला हवा. यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे. आमच्या संगणकप्रिय बंधू- भगिनींनीसुद्धा थोडं समाजकार्य करावं अशी अपेक्षा आहे.

चेतन सुभाष गुगळे Thu, 27/10/2011 - 12:41

सी एफ एल अर्थात कॉम्पॅक्ट फ्लोरोसंट लॅंप मूळे डोळ्यांना त्रास होतो. तरीही हे वापरायचे असल्यास छताखाली पुन्हा एक छद्म छत (फॉल्स सीलिंग) करून त्यात रिफ्लेक्टर बसवून त्यात हे दिवे बसवावे. अनेक व्यापारी आस्थापनांमध्ये असे करतात. काही निवास स्थानांमध्येही असे करतात पण सर्वांनाच परवडते असे नाही. इतरांनी फ्लोरोसंट लॅंप अर्थात ट्यूब लाईट वापरायला हरकत नाही. डोळ्यांना फारसा त्रास होत नाही. तसेच बसवायचा सुरूवातीचा खर्च (पट्टी + चोक + स्टार्टर + नळी) जास्त असला तरी नंतर फारसा खर्च होत नाही कारण एकाच वेळी सर्वच्या सर्व कधीच खराब होत नाही. स्टार्टर खराब झाल्यास ५ रुपयांत नवा मिळतो. नळी खराब झाल्यास (पण सहसा होत नाही. हिचे जीवनमान ७ ते ८ हजार तास असते) ५० रुपयांत मिळते. चोक फारच क्वचित खराब होतो तर पट्टी कधीच खराब होत नाही. शिवाय आता इलेक्ट्रोनिक बलास्ट (चोक) बसविला तर अजुन वीज बचत होते शिवाय ट्यूब फडफड न करता लगेच सुरू होते.

नवीन तंत्रज्ञान - एलईडी दिवे हा देखील एक चांगला पर्याय आहे. यात वीज देखील वाचते व डोळेही दिपत नाहीत. अर्थात याची अजून मोठ्या प्रमाणावर उपलब्धता नाही व यात अजून सुधारणा होत आहेत.

इनकॅन्डेसंट लॅम्प अर्थात पारंपारिक दिवे वीजेचे उष्णतेत रूपांतर करतात व त्यामुळे त्यांचा वापर बंद करावा असे जे सुचविले आहे ते योग्यच आहे परंतू ते कमालीच्या स्वस्त किंमतीत मिळतात व कमी वीजदाबावर ही चालतात (भले कमी प्रकाश देत असतील पण चाळीस चा वापरायचा तिथे शंभरचा वापरता येतो) यामुळे ग्रामीण भागात व गरीब जनतेत सध्या तरी त्यांना चांगला पर्याय दिसत नाही.

आडकित्ता Thu, 27/10/2011 - 14:19

dive ghya
चेतन सुभाष गुगळे यांनी सांगितलेले अगदी बरोबर आहे.
सीएफएल बल्ब म्हणजे काँपॅक्ट फ्लुरोसंट लाईट ऐवजी साधी ट्यूबनळी वापरली तरी चालते. तीही फ्लुरोसंट लाईटसोर्सच आहे.
सीएफएल दिव्याचा अगदी १ वर्षाची फुकट रिप्लेसमेंट ग्यारंटी असली तरी किंमत प्रचंड (तुलनेने) आहे. अगदी साधा बल्ब वापरला तरी त्या सीएफएलच्या जीवनकालात त्याने केलेली विजेची बचत (पैशात) अन सीएफएलची किंमत यांचा अजिबात मेळ बसत नाही. सीएफएल फार महाग पडतो असा माझा अनुभव आहे.
लोडशेडींगच्या (भारनियमन) जमान्यात दुसरी अडचण म्हणजे सीएफएल बल्ब इन्व्हर्टरवर वापरल्यास त्यांचे आयुष्यमान कमी होते असे एका 'जाणकारा'ने सांगितले.
सीएफएल बल्ब 'उडतो' तेव्हा त्याच्या 'चोक' मधे काहीतरी गडबड होते, अन तो स्वस्तात रिसायकल: पक्षी पुनः वापरण्याजोगा होऊ शकतो असेही ऐकले आहे. या गोष्टींवर कुणी प्रकाश पाडील काय?

मुक्ता_आत्ता Thu, 09/01/2014 - 12:42

थोडसं प्रस्तुत विषयाला सोडून: संगणकप्रिय बंधू- भगिनी पर्यावरणसंवर्धनाच्या दृष्टीने करू शकतील अशी सुयोग्य मदत म्हणजे इ-साहित्य, इ-वाचनाच्या संकल्पनेची लोकप्रियता आहे त्यापेक्षा वाढवण्याचे प्रयत्न करणे. पुस्तकांचा स्पर्श आणि वास कितीही मोहवणारा असला तरी झाडं तोडूनच त्यांची निर्मिती होते. ज्यांना २४ तास इंटरनेट वापरणे शक्य आहे असे लोक देखील हार्ड कॉपीज(छापील प्रतींचा)चा दुराग्रह धरून बसतात हे पाहून वाईट वाटतं. पुस्तकप्रेमाला माझा विरोध नाही, पण झाडांचा जीव घेऊन ती तयार होतात हे कळूनही आपण वाचनाची माध्यमं बदलायला तयार नसू तर त्या प्रेमाला विध्वंसक आणि आंधळं प्रेम का म्हणू नये?

मन Thu, 09/01/2014 - 12:46

In reply to by मुक्ता_आत्ता

+१
पण झाडं मरणं... पर्यावरण हे भल्तं गुंतागुंतीचं आहे हो.
तुम्ही नेट्-वीज्-संगणक वापरता त्यातही अप्रत्यक्ष वाट लागतेच की पर्यावरणाची.
गुंता ब्येक्कार आहे.
मला स्वतःला वाचन करणे फारसे जमत नाही. जे काही अल्प स्वल्प आहे, ते प्रामुख्याने नेटवरच आहे; सोयीचे पडते म्हणून.

मेघना भुस्कुटे Thu, 09/01/2014 - 13:04

In reply to by मुक्ता_आत्ता

संगणक कशापासून तयार करतात नि त्याची विल्हेवाट लावताना पर्यावरणाचं काय होतं हो?

ऋषिकेश Thu, 09/01/2014 - 14:13

In reply to by मुक्ता_आत्ता

संगणकासारखी यंत्रे वीजेवर चालतात, वीजेची निर्मिती करणे हे काही फार पर्यावरणपूरक कार्य नव्हे!
दुसरे असे, संणणकांची/मोबाईलची व्हिलेवाट हा पर्यावरणाच्या प्रदुषणाचाच नव्हे तर मानवी आरोग्याशी निगडित प्रश्न आहे.

बाकी, अरूणराव आता म्हणतीलच की पूर्वीसारखे पठण करून मौखिक ज्ञानार्जन करावे. आपल्या पुर्वजांना काय संगणक शोधता आला नसता का कागद वापरता आला नसता? केवळ पर्यावरणासाठीच त्यांनी हे टाळलं! होय की नाही? ;)

अजो१२३ Thu, 09/01/2014 - 14:37

बाकी, अरूणराव आता म्हणतीलच की पूर्वीसारखे पठण करून मौखिक ज्ञानार्जन करावे. आपल्या पुर्वजांना काय संगणक शोधता आला नसता का कागद वापरता आला नसता? केवळ पर्यावरणासाठीच त्यांनी हे टाळलं! होय की नाही?

चराचरातील अणूरेणूंची खडानखडा माहिती आपल्या भारत सरकारच्या सर्वरवर असावी. :D