Skip to main content

"प्रत्येक व्यक्तीची गरज सौंदर्यानुभवाची असेल असं नाही..."

मुलाखत

"प्रत्येक व्यक्तीची गरज सौंदर्यानुभवाची असेल असं नाही..."

- कविता महाजन

प्रश्न : जेव्हा तुम्ही तुमच्या साहित्यात कामविषयक तपशिलांचा स्पष्ट अंतर्भाव करता, तेव्हा त्यामागची विचारप्रक्रिया काय असते? उदाहरणार्थ: 'भिन्न'मधली लेनिना जेव्हा म्हणते, "नागडी आहे, बिछान्यात आहे, मास्टरबेट करतेय...", तेव्हा हे लिहिणं सर्वसाधारण वाचकाला धक्कादायक वाटेल का, याचा विचार होतो का? की हे लिहिल्याशिवाय हे पात्र पूर्ण होणे नाही, इतकंच डोक्यात असतं?

कविता महाजन : मी आजवर रंगवलेली बहुतेक सर्व पात्रं कुणा एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर बेतलेली नाहीयेत. ती अनेक व्यक्तींच्या मिश्रणातून घडत जातात. त्यात स्त्री-पुरुष असाही भेद राहत नाही. उदा. 'ब्र'मधलं डॉ. दयाळचं पात्र सात व्यक्तींचं एकत्रीकरण करून लिहिलं गेलं होतं आणि त्यात दोन स्त्रियादेखील होत्या. (पैकी एक होत्या महाश्वेता देवी.) त्यातून मला एक वृत्ती दर्शवायची असते. कुणाचं उदात्तीकरण वा कुणाचं चारित्र्यहनन यांत मला रस नाही. ही वृत्ती दर्शवताना, आपल्या व्यक्तिगत आयुष्यात माणसं सामाजिक आयुष्याहून निराळी वागतात का हे तपासून पाहिलं, तर नाट्य निर्माण होण्यास मदत होते. मग व्यक्तिगत असतात त्या मूलभूत प्रेरणा. माणसाचं खाणं-पिणं, स्वच्छता, झोप, स्वप्नं, आजार - विकार, लैंगिक तऱ्हा इत्यादी गोष्टींमधल्या दैनंदिन सवयी, त्याबाबतचे विचार, कृती असं सगळं पाहिलं जातं. आजूबाजूला असे अनेक नमुने दिसत असतात. उदा. नवरा मेल्यावर मरणाची भूक लागून अतिआहार घेणारी विधवा. वासना अन्नावर आहे असं वरपांगी दिसलं, तरी ती मुळात लैंगिक आहे हे कळत असतं. तर अशी लहानमोठी निरीक्षणं ते पात्र जिवंत करताना वापरली जातात. प्रश्नात जे उद्धृत दिलं आहे, ते बोलणारी लेनिना मुळात सखोल जगण्यापासून पळ काढणारी आहे. ती वरच्या लेअरमध्येच जगते, कामं करते, वर्तन करते. त्यात ती रमत नाही; पण व्यक्तिगत अनुभवांमुळे राग, भीती, सूडाची भावना यांचं मिश्रण तिच्यात झालेलं आहे. सनसनाटी बोलून-वागून, आसपासच्या लोकांना दचकवून, ती हवं तिथं अंतर राखते आणि हवं तेव्हा लैंगिक गरज भागवायला पुरुषवेश्या वापरते. ही अशी वाक्यं सुरुवातीलाच तिचा स्वभाव प्रस्थापित करतात.

हे सगळं मी नंतर विचार करून सांगतेय. प्रत्यक्ष लिहिताना हे बहुतेक वेळा नेणिवेच्या पातळीवर होत असतं. पात्रं स्वत:च्या मर्जीने वागतात, लेखकाचं ऐकतातच असं नाही. 'भिन्न'मधल्या प्रतीक्षाने आत्महत्या करू नये, म्हणून मी सहा महिने लेखन थांबवून ठेवलं होतं; पण दुसरा पर्यायच राहिला नाही, तेव्हा लिहिलं. प्रतीक्षा जास्त भावनिक आहे, तर तिला शरीर फारसं महत्त्वाचं वाटत नाही. गरज भासली, तर व्हायब्रेटरसारखी साधनं वापरता येतात, इतकं म्हणून ती स्वत:पुरता विषय झटकते. तिसरी रचिता, एड्सची रुग्ण आहे. आजारानंतरदेखील तिच्या सर्वच वासना तीव्र आहेत. तिला 'जगावं वाटतं' हे सूचित करण्यासाठी तिच्या लैंगिक भावनादेखील मदतीला येतात. 'ठकी'मधली पद्मजा आसुसून व तीव्रपणे आयुष्य उपभोगणारी आहे, तिचे राग-लोभ-मोह सारेच तीव्र टोकाचे आहेत. सुंदर, क्लासिक, भरभरून जगताना नैतिकता हा शब्ददेखील तिला आठवत नाही. ती 'तत्त्वज्ञान' अभ्यासलेली आहे; अनेक विचार 'कोट' करते, पण ते फेसबुकवर सुविचार पोस्ट करणाऱ्या लोकांइतकंच उथळ आहे... एकही विचार तिच्या अंत:करणाला भिडलेला नाहीये. सखोल विचार वहीत ठेवून उथळ जगणारी ही स्त्री दुभंग व्यक्तिमत्त्वाची आहे. पुरुष पात्रांचंही असंच आहे. क्षणभर मोह वाटला, तरी 'भिन्न'मधला जे.डी. सावधपणे प्रतीक्षाला अंतरावर ठेवतो. त्याला कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे, त्यात त्याला व्यक्तिगत गुंते नको आहेत. तर आपल्या प्रेमात पडलेल्या अनुजाशी 'ब्र'मधला सुमेध बेदिक्कत लैंगिक संबंध ठेवतो. त्यात तिचं लग्न मोडतं व त्याची बायको आत्महत्येची वाट स्वीकारते; तरी त्याला फरक पडत नाही. प्रत्येकाची व्यक्तिगत नीतिमूल्यं, मर्यादा, क्षमता अशा अनेक गोष्टी अशा लैंगिक तपशिलांमधून दिसतात, त्यामुळे ते लिहिले जातात.

लिहिताना वाचक डोक्यात नसतोच. जेव्हा मी पहिला खर्डा स्वत: वाचायला घेते, तेव्हा वाचकाची एन्ट्री होते. मग संपादन सुरू होतं.

ब्र ग्राफिटी वॉल भिन्न ठकी

प्रश्न : कलाकृती गाजावी म्हणूनही असे भाग कलाकृतीत मुद्दाम-मागाहून घातले जाताहेत, असं घडताना (काही इतर लेखकांकडून वा प्रकाशकांकडून) आजूबाजूला दिसतं का? तसं होत असल्यास, आपल्याही साहित्यावर असा आरोप होऊ नये यासाठी, लेखनाच्या भाषेत/शैलीत तुम्ही काही खास बदल करता का?

पूर्वी, म्हणजे माझ्या आधीच्या लेखकांच्या पिढीत, असं घडायचं. पण माझ्या पिढीत आणि माझ्या नंतरच्या पिढीत असं दिसत नाही. 'लोकप्रिय' साहित्यात आणि ब दर्जाच्या साहित्यातदेखील असे मागाहून पेरलेले तुकडे असत. माझ्या पिढीत लैंगिक कुतूहलं भागवणाऱ्या दृश्य गोष्टींचं प्रमाण वाढलं आणि टीव्ही, संगणक इत्यादींवर चांगलं आणि वाईट सर्वच पाहणं सहजसोपं बनलं. त्यात काही विशेष कौतुकाचा वा टीकेचादेखील भाग राहिला नाही. तरी काही वयाने वा वृत्तीने जुनाट असलेले समीक्षक तक्रार करतात, पण ती वांझ तक्रार असते.

मी, माझ्या दोन मैत्रिणी, कादंबरीचं संपादन आधी करतो. मग माझे प्रकाशक दिलीप माजगावकर आणि त्यांच्याकडचे संपादक त्यांच्या सूचना कळवतात. त्या विचारात घेऊन अंतिम काम केलं जातं. त्यामुळे कुठे अनावश्यक प्रसंग असतील, वा उपरे वाटत असतील, तर ते गाळले जातात. 'ठकी'मध्ये काही लैंगिक संदर्भांचा भाग संपादकांची सूचना योग्य वाटल्याने गाळला होता. 'भिन्न'च्या वेळी एका संपादक बाईंनी 'हे वादग्रस्त ठरेल म्हणून वगळावे' अशी सूचना काही पानांवर लिहिली होती, ते मी ऐकलं नाही. "जे अनावश्यक असतं तेच फक्त अश्लील असतं", असं मला एकदा विजय तेंडुलकरांनी सांगितलं होतं. त्यामुळे वादग्रस्ततेच्या मुद्द्याला मी भाव दिला नाही.

जे लिहायचं असेल, ते मी सुचेल तसं लिहून काढते. लिहिताना अवांतर विचार न करता लेखनविषयावरच लक्ष केंद्रित केलेलं असतं. त्यामुळे वेगळी शैली वगैरे जाणीवपूर्वक केलं जात नाही. सुरुवातीला बिचकण्याचा काळ होता, तेव्हा काव्यात्म भाषा वापरून गोष्टी सूचित केल्या जात. पण सर्वच पात्रं अशी काव्यात्म भाषा वापरणारी वा त्या वृत्तीची नसतात. तिथं थेट लिहिणं भाग असतं हे ध्यानात आल्यावर संकोच मोडले.

लोक काय आरोप करतात आणि कशाची कौतुकं करतात, याचा विचार करण्याच्या पलीकडे आता मी गेले आहे. माझी जवळची दोन-तीन माणसं आहेत, त्यांची मतं तेवढी मला महत्त्वाची वाटतात आणि त्यांच्या प्रतिक्रियांचा मी विचार करते; बाकीच्यांच्या फक्त ऐकून घेते वा वाचून टाकते, मनावर घेत नाही.

प्रश्न : एक पात्र म्हणून, अपरिहार्यता म्हणून, शरीरधर्माचा सहजसुंदर आविष्कार करणारं असं तुम्हांला आवडलेलं पुस्तक/नाटक/चित्रपट कोणता? त्याबद्दल सांगाल का?

'द रीडर' आठवतो. पुस्तक विशेष आवडलं नव्हतं, पण सिनेमातल्या फ्रेम्स अत्यंत देखण्या आहेत. शरीरावरचा अंधार - उजेड आणि शरीराच्या रेषा फार सुंदर खेळवल्या आहेत त्यात.

प्रश्न : स्त्री म्हणून या प्रकारच्या अभिव्यक्तीवर थेट वा आडून बंधनं येतात असा तुमचा अनुभव/निरीक्षण आहे का? की कलाकार सच्चा असेल तर ही बंधनं ओलांडतोच?

माझ्या लेखनाची सुरुवात कवितेपासून झाली. कुमारवयात हे लेखन सुरू झालं. तेव्हा सर्वच विषयातली कुतूहलं जास्त असतात आणि त्यानुसार वाचन, लेखन होत असतं. शारीर आकर्षणाचा भाग कवितेत धूसर डोकावत असे. मात्र थेट असं काही तेव्हा लिहिल्याचं स्मरत नाही. काही लेख वृत्तपत्रासाठी अनुवादित करत होते. स्त्रीमुक्ती चळवळीची मासिकं निघत, त्यातलं हे लेखन होतं. तेव्हा अनुवाद करतानादेखील किंचित बिचकले होते. दिवसभर घरीदारी राबल्यानंतर रात्रीही सुखाने झोपता येत नाही, तेव्हा 'बिछान्यातले काम' उरकायचे असतेच; असा काहीसा उल्लेख होता. त्या नकारात्मक भावनेवरदेखील जरासं अडखळायला झालं होतं. वयाच्या अंदाजे २७-२८व्या वर्षी ज्या प्रेमकविता लिहिल्या, त्यांत प्रथम हे 'धाडस' केलं गेलं. म्हणजे लिहिताना तर सहज उत्स्फूर्तपणे लिहिलं जातंच, मात्र लिहून झाल्यावर वाचताना संकोच वाटणे आणि 'हा मजकूर छापायला द्यावा की देऊ नये?' असा विचार मनात येतो. त्यानंतर ते छापायला देण्याचा निर्णय घेणं हे धाडसच होतं तेव्हा. असभ्यतेचे शिक्के बसतात. चवचाल म्हणून संशयाने पाहिलं जातं. घरातले लोक तिरस्कारच नव्हे, तर चक्क घृणा करतात. बाहेरच्या/परिचयातल्या/अपरिचित पुरुषांना 'ही बाई आपल्याला उपलब्ध होऊ शकते' असं वाटू लागून ते जाळी फेकायला सुरुवात करतात. सारं लेखन हे लेखकाचं आत्मचरित्रच असतं, अशा समजातून कैक गमतीजमती होतात.

याकडे आज तटस्थपणे बघता येतं. पण जेव्हा या अनुभवातून जात असतो; तेव्हाची घालमेल, त्रास फार वेळ-काळ-बुद्धी व्यापणारा असतो. कविता धूसर असल्याने आणि कवितेचे वाचक मोजकेच असल्याने त्या बाबतीत मात्र तुलनेत कमी त्रास झाला.

'भिन्न'च्या वेळी काही समकालीन व सिनियर लेखक मंडळींनी अपप्रचार केला की, सनसनाटी लिहिलं म्हणजे वाचक पुस्तकांकडे वळतील या हेतूनं हे लिहिलं आहे.

पण काहीही सनसनाटी नसताना 'ब्र' चर्चेत राहिली, पुष्कळ खपली. हा अनुभव असताना आणि त्या काळात वाचक माझ्या नव्या कादंबरीची वाट पाहत होते हे माहीत असताना मी असा वाचकानुनय करण्याची काही गरज नव्हती - हा एक मुद्दा माझ्याकडे होता. दुसरा मुद्दा म्हणजे; हाच हेतू असता तर पहिलीच कादंबरी मी या युक्त्या वापरून लिहिली असती! तसं तेव्हा केलं नाही, तर आता का करेन?

'भिन्न'ची दुसरी आवृत्ती लगेच आली, तेव्हा एका वाङ्‌मयीन मासिकाने माझ्याविषयी व्यक्तिगत मत्सर व्यक्त करत (की पुस्तकांच्या लागोपाठ आवृत्त्या येताहेत) अश्लील मजकूर छापला. नंतर त्यांनी जाहीर माफी मागितली, हे निराळं. (त्या घटनेबची ब्लॉग नोंद)

पण त्या वादातून तरुण समीक्षकांच्या एका गटाने माझ्यावर बहिष्कार टाकला आणि अनुल्लेखाने मारणे पसंत केले. अर्थात त्यामुळे माझं काहीच नुकसान झालं नाही. समीक्षा वाचून पुस्तकांकडे वळणारे फारच मोजके वाचक असतात.

प्रश्न : अश्या प्रकारच्या वर्णनांमुळे/वर्णनांवर वाचकांच्या प्रतिक्रिया कशा येतात? तुम्ही स्त्री आहात म्हणून वाचकांच्या प्रतिक्रियांत फरक पडतो, असं तुम्हांला वाटतं का?

'ब्र'मध्ये तीन प्रसंग आहेत. त्यातला एक धूसर व काव्यात्म भाषेत असल्याने क्वचित कुणा रसिक वाचकाच्या ध्यानात येतो. आंघोळ करताना प्रियकराची आठवण आल्याने प्रफुल्ला बाथरूमच्या आरशावर साठलेल्या वाफेवर त्याचं नाव लिहून, त्या आकारांमध्ये स्वत:चं नग्न शरीर न्याहाळते आणि बाथरूममधून बाहेर आल्यावर पलंगावर धपापत पडून राहते…, असा तो प्रसंग होता. दुसऱ्या प्रसंगात एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीकडे नवऱ्याची तक्रार करताना 'आपण नाही म्हटलं तर ऐकून घ्यावं लागतं, पण आपली इच्छा असताना त्याचं उठलं नाही तर आपण काही बोलायची चोरी असते... आता तुला सांगतेय तर तुझ्या चेहऱ्यावर कसे भाव आलेत बघ.' असं काहीतरी मैत्रिणीला सांगते. तिसरा प्रसंग एक रेप केस नोंदवून घेण्याचा होता. अत्यंत सपाट भाषेत एक कार्यकर्ता कृतीचं वर्णन लिहितो 'एकाने चड्डी काढली, आपले लिंग योनीत खुपसले, कंबर हलवली, मग तो बाजूला झाला, दुसऱ्यानेही तसेच केले.'

नंतरच्या या दोन्ही प्रसंगांचा उल्लेख केवळ एकेका वाचकाने केल्याचं आठवतं. पहिला पुरुष, दुसरी बाई. एका समीक्षक म्हणवणाऱ्या परीक्षणकर्त्याने 'प्रफुल्लाच्या सेक्सलाईफविषयी कविता महाजन काहीच सांगत नाहीत', अशी टीकाही केली होती. यांनीच नंतर 'भिन्न'विषयी आक्षेप घेतले. टीकेला काहीच हरकत नसते, पण हे आक्षेप तर्काच्या कसोटीवर टिकत नव्हते. हास्यास्पद ठरले.

लेनिनाने लहानपणी घरातल्या बायकांवर सामूहिक बलात्कार झालेला पाहिला आहे. त्यातून तिची मानसिकता घडली आहे. पुरुष दिसला की त्याला विंचवासारखा ठेचून काढावा असं तिला वाटतं. नागड्या निजलेल्या पुरुषाच्या लिंगावर पाय देऊन आपण त्याचा बोळा करून टाकतो आहोत, अशी स्वप्नं तिला पडतात.

तर या समीक्षकाच्या मते, "तिच्यावर कुठे बलात्कार झाला होता? तिने तर फक्त पाहिलं होतं. नुसतं पाहिल्याचे परिणाम इतके कसे होतील? तुम्हांला मुद्दाम पुरुषांविषयी वाईटसाईट लिहायचं असतं. आम्ही पुरुष तुम्हां बायकांवर इतकं प्रेम करतो, पण तुम्ही बायका साल्या हरामखोर असता. तुम्हाला लिंग पायाने चिरडल्याची स्वप्नं पडतात!" इत्यादी.

एड्स हा परीघ असल्याने 'भिन्न' तर सेक्स-बेस्ड म्हणावी अशीच होती. त्यात पहिल्यांदा कंडोम हा शब्द लिहिला, तेव्हा 'आता आपल्याला हे सगळं लिहायचं आहे' या विचाराने घाम फुटला होता. काही पानं लिहिल्यावर ताण वाढला, तेव्हा प्रकाशक दिलीप माजगावकर यांना लिहिलेल्या पत्रात भाषेविषयी चर्चा केल्याचं स्मरतंय. चार वर्षं ही कादंबरी लिहीत होते आणि समांतर सामाजिक कामंदेखील सुरू होती; त्यामुळे सारे संकोच इतके फिटले, की भाषणं देतानादेखील या शारीर - लैंगिक - शब्दांचं काही वाटेनासं झालं. शेवटाकडे एक रोमान्स लिहायचा होता. तिथे अडखळल्यावर ध्यानात आलं की नकारात्मक लैंगिक अनुभव मी थेट लिहिले आहेत. संतापच इतका तीव्र होतो की तिथे विचार करण्याची गरज भासत नाही; पण याउलट सकारात्मक लैंगिक अनुभव लिहिताना मात्र अजूनदेखील संकोच वाटतो आहेच, हे तेव्हा ध्यानात आलं होतं. पुढे लिहिलेल्या 'ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम'मध्ये नकारात्मक प्रसंगांसह काही सकारात्मक प्रसंगही आलेत.

'भिन्न'चे अक्षरश: शेकडो किस्से आहेत. त्यातला लहान मुलीवरच्या बलात्काराचा प्रसंग आजही अनेक वाचकांना सहन होत नाही. 'आदर्श कार्यकर्ती' अशी माझी जी प्रतिमा 'ब्र'मुळे तयार झाली होती, ती 'भिन्न'मुळे पूर्णत: भंगली. पहिल्या नजरेत वाटू लागणारं प्रेम असतं, तसाच पहिल्या नजरेत वाटू लागणारा द्वेषदेखील असतो. तसे अनेक लोक द्वेषकर्त्यांच्या यादीत गेले. अनाहूतांचा फापटपसारा कमी झाला, हे बरंच झालं.

'कुहू'चा विषयच निराळा होता. तिथं सेक्स हा मुद्दाच उद्भवत नव्हता. 'ग्राफिटी वॉल' हे पुस्तक लेखकाची डायरी असावी तसं आहे. ते लेख आधी 'लोकप्रभा'मध्ये सदर म्हणून प्रसिद्ध झाले. 'पुरुषवेश्या आणि गिऱ्हाईक बायका' हा 'भिन्न'च्या संशोधनावेळी आलेल्या अनुभवावरचा त्यातला लेख मोठ्याच वादाचा विषय ठरला. अनेक साप-विंचूवाली पत्रंं व फोन मला - आणि संपादकांनादेखील - आली. त्यात "तुम्ही पुरुषांविषयी मुद्दाम खोटंनाटं लिहिता, पुरुषांना अर्थार्जनासाठी अशा गोष्टी करायची गरज नसते. तुम्ही पुरुषांना अजिबात आवडत नसाव्यात किंवा पुरुष तुम्हांला अजिबात आवडत नसावेत", असं म्हणत "तुम्ही लेस्बियन आहात, कारण लेखासोबतच्या (पोस्टाच्या तिकिटाएवढ्या) फोटोत तुमच्या केसांचा बॉयकट केलेला दिसतो आहे." असे खतरा निष्कर्षदेखील काढले होते. त्या वेळी 'लोकप्रभा'चे संपादक - आणि पुस्तकांच्या वेळी प्रकाशक - खंबीरपणे पाठीशी उभे असल्याने ताप करून घेतला नाही. हसून सोडून दिलं.

आता पुढच्या कादंबरीत छप्पन्न प्रियकर असलेली नायिका रंगवतेय. ते व्यक्तिगत चारित्र्यहननाच्या वैतागातूनच सुचलं.

प्रश्न : लोकांच्या वर्तनातल्या विसंगती, किंवा गंमती या उत्तरांमधून दिसत आहेत (विशेषतः वरील प्रश्नाच्या बाबतीत). आपल्या वर्तनात विसंगती आहेत, हे या लोकांना समजत असेलसं वाटत नाही. तुम्हांला वाटतं का? या लोकांच्या मनोभूमिकेत एक लेखिका म्हणून शिरून बघावंसं वाटतं का? दुकानात खरेदीला गेल्यावर, कधीतरी गंमत म्हणून आपण, एरवी अंगाला लावणार नाही असे कपडे ट्राय करून पाहतो, तसं काही?

विसंगती असणं हे माणसाचं वैशिष्ट्यच आहे. त्यामुळे अनेक तऱ्हांची भलीबुरी पात्रं निर्माण करून लेखक ती रंगवत असतातच. असे काही नमुने मीही रंगवलेले आहेत. इतर पसाऱ्यात त्यांच्याकडे विशेष लक्ष गेलं नसावं. उदा. 'ब्र'मध्ये एक जण (“आपली 'संतांची भूमी'” असं म्हणत प्रादेशिक ओळख सांगणारा गृहस्थ) गेस्टहाऊसमध्ये थांबलेल्या प्रफुल्लाच्या खोलीचं दार रात्री बराच वेळ वाजवत राहतो. 'भिन्न'मध्ये तर अशा दुटप्पी लोकांचे वाभाडे काढलेले आहेतच. ही जाता-येता टिपलेली माणसं आहेत. त्याहून अधिक महत्त्व मी त्यांना देऊ इच्छित नाही. क्षुद्र वृत्ती अनेक पद्धतींच्या असतात. दुसऱ्या व्यक्तीला नको असताना लैंगिक संबंधांची अपेक्षा लादण्याचा प्रयत्न करणे, ही एक पद्धत झाली. 'ठकी'मध्ये असे ठक आहेत. खास करून विवाहित पुरुषांची विवाहबाह्य संबंध ठेवतानाची केविलवाणी कसरत काही पात्रांद्वारे रंगवली आहे. ओळखीचे आणि विवाहित पुरुष व्यभिचारात जास्त रस दर्शवणारे असतात; एकटे (विधुर, घटस्फोटित, अविवाहित वा तात्पुरता एकटेपणा असलेले) शक्यतो कायमस्वरूपी नातं शोधतात. दुसऱ्या बाजूने स्त्रियांबाबतदेखील असंच काहीसं म्हणता येईल. विवाहाची सुरक्षा बहुतेक वेळा व्यभिचारानुकूल असते.

लैंगिकता आणि शारीरिकता, कंडोम या प्रतिमा वापरून लिहिलेली कविता प्रकाशित करण्याबाबत आलेले नकारात्मक अनुभव; शरीर - स्त्रीचे असो वा पुरुषाचे - त्याचे वस्तुकरण कसे घातक ठरते, याबाबत पुरुषवेश्यांशी बोलून केलेले लेखन; अशा काही संदर्भांत मी माझ्या 'ग्राफिटी वॉल' या डायरीवजा पुस्तकात लिहिले आहे. हा एका चर्चासत्रात वाचलेला पेपर आहे. अधिक तपशिलांसाठी त्या पेपरचा दुवा.

प्रश्न : जरा वेगळा, पण समांतर प्रश्न असा - पोर्नोग्राफिक साहित्याबद्दल (थेट शृंगार, संभोग इ्त्यादी. वाङ्मय नव्हे) तुमचं एक लेखिका म्हणून, एक स्त्रीवादी व्यक्ती म्हणून काय मत आहे? ते असावं, नसावं?

अनेक प्रकारची पुस्तकं असतात, त्यांतला हा एक प्रकार. पॉर्न साहित्य असावं की नाही, समाजात व्यभिचार व्हावा की होऊ नये, लग्नापूर्वी सेक्स करावा की करू नये असल्या माळेतले प्रश्न मला एकसारखेच निरर्थक वाटतात. आपण असावं वा नसावं म्हणून, हे असणार वा नसणार आहे का? ते होतं, आहे आणि असेल, ही वस्तुस्थिती आहे. त्याला समांतर 'सुंदर व चांगल्या' गोष्टी असाव्यात; ज्यांत किडकेपणा, अतिशयोक्ती, बटबटीत असं काही नसेल - असं मात्र आपण म्हणू शकतो. कुतूहलं भागवण्यासाठी लैंगिक शिक्षण दिलं जावं हेही म्हणता येतं.

शरीराचं वस्तुकरण फक्त पॉर्नमध्येच होतं असं नाही, अनेक जागी होतं. बाजारकाळात ते होणं अपरिहार्य आहे. जसे जाहिरातींमध्ये बदल होताहेत, तसेच पॉर्नमध्येही होताहेत आणि व्यक्तींना शेकडो तऱ्हा उपलब्ध असल्याने हवं ते पाहण्याची व नको ते टाळण्याची मुभा पर्यायांनी दिलेली आहे. त्यांत जे काही अतिशयोक्त चित्रण असतं वा काही वेळा बीभत्स चित्रण असतं, ते केवळ स्त्रियांचंच असतं असं नाही; तर पुरुषांनाही तशीच वागणूक दिलेली असते. पुरुषांच्या तुलनेत कमी स्त्रिया पॉर्न पाहत असतील, पण त्या पाहतच नाहीत वा त्यांना ते आवडत नाही, असं म्हणणं फार भाबडेपणाचं ठरेल. बाजारात मागणी असेल तर उपलब्धता वाढतेच. त्यानुसार स्त्रियांना आवडणारं पॉर्न वाढत जाण्याची शक्यता मोठी आहे. एक व्यक्ती म्हणून विचार करायचा झाला; तर 'लहान मुलांचा वापर' करणार्‍या पॉर्नवर बंदी असावी, असं मला वाटतं; इतर नव्हे. पिवळ्या साहित्यात कंटाळवाणी पुनरावृत्ती असते. त्याहून इतर कथा-कादंबर्‍यांमध्ये येणारी लैंगिक वर्णनं तुलनेत अधिक वैविध्यपूर्ण आणि शैलीदार असतात. पॉर्नमध्ये केवळ चेहरे आणि स्थळं बदलतात, बाकी साचेबद्धतेमुळे कंटाळवाणेपण येतंच; त्यामुळे चित्रपटासारख्या माध्यमात जेव्हा काही उत्कृष्ट प्रसंग दिसतात, तेव्हा लैंगिक भावना चाळवणे यापलीकडचा सौंदर्यानुभव मिळतो. मात्र प्रत्येक व्यक्तीची गरज सौंदर्यानुभवाची असेल असं अजिबात नाही, किंबहुना ती फारच मोजक्या लोकांची असते.

***

विशेषांक प्रकार

.शुचि. Fri, 03/06/2016 - 23:48

सुंदर आहे मुलाखत.

विसंगती असणं हे माणसाचं वैशिष्ट्यच आहे.

वा!
_____

मात्र प्रत्येक व्यक्तीची गरज सौंदर्यानुभवाची असेल असं अजिबात नाही, किंबहुना ती फारच मोजक्या लोकांची असते.

आणि त्या मोजक्या लोकांनाही मोजक्यावेळी सौंदर्यानुभव तर अन्य वेळी baser किंवा sinful अनुभव हवे असतीलच की.

ऋषिकेश Sat, 04/06/2016 - 00:39

मुलाखतीतील उत्तरे खूप आवडली. मात्र त्यातही बाकी मुलाखत एकीकडे आणि पुढिल परिच्छेद एकीकडे वाटावा इतका पुढिल परिच्छेद आवडला:

शरीराचं वस्तुकरण फक्त पॉर्नमध्येच होतं असं नाही, अनेक जागी होतं. बाजारकाळात ते होणं अपरिहार्य आहे. जसे जाहिरातींमध्ये बदल होताहेत, तसेच पॉर्नमध्येही होताहेत आणि व्यक्तींना शेकडो तऱ्हा उपलब्ध असल्याने हवं ते पाहण्याची व नको ते टाळण्याची मुभा पर्यायांनी दिलेली आहे. त्यांत जे काही अतिशयोक्त चित्रण असतं वा काही वेळा बीभत्स चित्रण असतं, ते केवळ स्त्रियांचंच असतं असं नाही; तर पुरुषांनाही तशीच वागणूक दिलेली असते. पुरुषांच्या तुलनेत कमी स्त्रिया पॉर्न पाहत असतील, पण त्या पाहतच नाहीत वा त्यांना ते आवडत नाही, असं म्हणणं फार भाबडेपणाचं ठरेल. बाजारात मागणी असेल तर उपलब्धता वाढतेच. त्यानुसार स्त्रियांना आवडणारं पॉर्न वाढत जाण्याची शक्यता मोठी आहे. एक व्यक्ती म्हणून विचार करायचा झाला; तर 'लहान मुलांचा वापर' करणार्‍या पॉर्नवर बंदी असावी, असं मला वाटतं; इतर नव्हे. पिवळ्या साहित्यात कंटाळवाणी पुनरावृत्ती असते. त्याहून इतर कथा-कादंबर्‍यांमध्ये येणारी लैंगिक वर्णनं तुलनेत अधिक वैविध्यपूर्ण आणि शैलीदार असतात. पॉर्नमध्ये केवळ चेहरे आणि स्थळं बदलतात, बाकी साचेबद्धतेमुळे कंटाळवाणेपण येतंच; त्यामुळे चित्रपटासारख्या माध्यमात जेव्हा काही उत्कृष्ट प्रसंग दिसतात, तेव्हा लैंगिक भावना चाळवणे यापलीकडचा सौंदर्यानुभव मिळतो. मात्र प्रत्येक व्यक्तीची गरज सौंदर्यानुभवाची असेल असं अजिबात नाही, किंबहुना ती फारच मोजक्या लोकांची असते.

मारवा Sat, 04/06/2016 - 10:59

In reply to by ऋषिकेश

त्यांत जे काही अतिशयोक्त चित्रण असतं वा काही वेळा बीभत्स चित्रण असतं, ते केवळ स्त्रियांचंच असतं असं नाही; तर पुरुषांनाही तशीच वागणूक दिलेली असते. पुरुषांच्या तुलनेत कमी स्त्रिया पॉर्न पाहत असतील, पण त्या पाहतच नाहीत वा त्यांना ते आवडत नाही, असं म्हणणं फार भाबडेपणाचं ठरेल. बाजारात मागणी असेल तर उपलब्धता वाढतेच. त्यानुसार स्त्रियांना आवडणारं पॉर्न वाढत जाण्याची शक्यता मोठी आहे. एक व्यक्ती म्हणून विचार करायचा झाला; तर 'लहान मुलांचा वापर' करणार्‍या पॉर्नवर बंदी असावी, असं मला वाटतं;

पुरुषदेहाचही वस्तुकरण होतच असत. पुरुषदेह स्त्रीदेहा सारखाच "वापरला" जात असतो. आपल्याकडेही सावरीया चित्रपटातील गाण्यात "रणबीर कपुर " वर केलेलं चित्रीकरण बघा, सलमान इ.नेहमीचेच यशस्वी आहेतच
मात्र "स्त्रीदेहवस्तुकरणविरोध" ज्या प्रमाणात व तीव्रतेने होतो तितका "पुरुषदेहवस्तुकरणविरोध" होत नाही हे वास्तव आहे.
याच पटकन सुचणार पहील कारण "स्त्रीदेहवस्तुकरण" चे प्रमाण संख्येने आणि तीव्रतेने फारच जास्त आहे.
तरी काय झाल आपण एरवी अल्पसंख्यांसाठी भांडतोच ना.

अनु राव Sat, 04/06/2016 - 13:23

कलाकृती गाजावी म्हणूनही असे भाग कलाकृतीत मुद्दाम-मागाहून घातले जाताहेत,.....
पूर्वी, म्हणजे माझ्या आधीच्या लेखकांच्या पिढीत, असं घडायचं. पण माझ्या पिढीत आणि माझ्या नंतरच्या पिढीत असं दिसत नाही. 'लोकप्रिय' साहित्यात आणि ब दर्जाच्या साहित्यातदेखील असे मागाहून पेरलेले तुकडे असत.

हल्लीचे लेखक हुशार आहेत, आधीपासुनच तुकडे वगैरे घालुनच पहिला खर्डा तयार करतात इतकेच म्हणीन.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 28/09/2018 - 04:29

.

सामो Fri, 28/09/2018 - 04:48

ब्लॉगवरती जाउन एकेक कविता वाचली. प्रतिभावान कवयत्रि होतात ताई.