पॉर्नोग्राफीला विरोध : अमेरिकन इतिहासाची एक झलक : भाग २

अमेरिकन स्त्रीवाद

पॉर्नोग्राफीला विरोध : अमेरिकन इतिहासाची एक झलक : भाग २

- ३_१४ विक्षिप्त अदिती

भाग १

लेस्बियन, गे, पॉर्नोग्राफी, इरॉटिका, बाँडेज, डिसिप्लिन, मासोकीझम, सेडीझम, बीडीएसएम (BDSM), या प्रकारांना मराठीत प्रतिशब्द नाहीत. ते तयार करून, प्रचलित होणं महत्त्वाचं आहे. विस्तारभयास्तव लैंगिकतेसंदर्भातल्या अनेक इंग्लिश शब्दांचा अर्थ लेखात दिलेला नाही. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी गूगल शोध, विकीपीडिया असे स्रोत (आपापल्या जबाबदारीवर) वापरावेत अशी विनंती.

---

हिंसेला विरोधाकडून पॉर्नला विरोधाकडे

१९७०-८०च्या सुमारास असणारी अमेरिकन सामाजिक पार्श्वभूमी आणि १९७६-७९ या काळात स्त्रीवादी संघटना 'वाव्हॉ' (WAVAW - Women Against Violence Against Women) यांनी केलेलं सामाजिक जागरण, वॉर्नर टेलिकॉमने वापरलेल्या हिंस्र स्त्रीद्वेष्ट्या चित्रणाविरोधात दिलेला अहिंसक लढा यांच्याबद्दल आपण गेल्या भागात वाचलं.

ऑगस्ट १९७७मध्ये 'मॅक्स फॅक्टर' या कंपनीने चेहऱ्यावर लावण्याच्या 'सेल्फ डिफेन्स' नावाच्या क्रीमची जाहिरात बाजारात आणली. "Warning! A pretty face isn't safe in the city. Fight back with Self Defense." (सावधान! सुंदर चेहरा या शहरात सुरक्षित नाही. 'सेल्फ डिफेन्स' (हे मॉइश्चरायजर) वापरून प्रतिकार करा.) अशी त्या जाहिरातीची मुख्य ओळ होती. या जाहिरातीचा निषेध हे 'वाव्हपम' (WAVPM - Women Against Violence in Pornography and Media) या संस्थेचं पहिलं मोठं काम होतं. 'वाव्हॉ'ची बहीणसंस्था म्हणवणाऱ्या 'वाव्हपम'ची सुरुवात उत्तर कॅलिफोर्नियात, सॅन फ्रान्सिस्कोमध्ये झाली. लॉरा लेडरर, लिन कँपबेल, डायाना रसल, कॅथी बेरी या 'वाव्हपम'च्या संस्थापक सदस्यांपैकी प्रसिद्ध स्त्रीवादी.

सेल्फ रिस्पेक्ट
मॅक्स फॅक्टरच्या बिलबोर्डाचं 'बिलबोर्ड लिबरेशन फ्रंट'ने केलेलं सुडंबन

'सेल्फ डिफेन्स'ची जाहिरात आली तेव्हा बऱ्याच स्त्रियांना ती आक्षेपार्ह वाटली. न्यू यॉर्क शहरात तेव्हा 'सन ऑफ सॅम' नावाचा गुन्हेगार मोकाट फिरत होता. तोपर्यंत त्याने सहा स्त्रियांचे खून केले होते. अनेक शहरांतील स्त्रियांना तेव्हा छेडछाडीपासून ते थेट बलात्कार वा खुनापर्यंत अनेक प्रकारे होणाऱ्या आक्रमणांची भीती वाटत असे. अनेक स्त्रीवादी संघटनांनी स्त्रियांना ज्यूदो, कराटे यांचं प्रशिक्षण देण्याची सोय केली होती. स्त्रियांना प्रत्यक्ष हिंसेची वाटणारी भीती, मनात बसलेली भीती आणि त्यामुळे स्वसंरक्षणासाठी चालवलेले प्रयत्न या पार्श्वभूमीवर 'सेल्फ डिफेन्स' या क्रीमच्या जाहिराती हा स्त्रियांना त्या भीतीबद्दल केलेला क्रूर विनोद वाटला. 'वाव्हपम'ने या बाबतीत 'वाव्हॉ'ची पद्धत वापरून जनजागरण करण्याचा आणि पत्रं लिहिण्याचा कार्यक्रम हातात घेतला. 'वाव्हॉ' त्या काळात वॉर्नरविरोधासाठी जो स्लाईडशो वापरत होतं, त्यात थोडे बदल करून त्यांनीही वेगवेगळ्या गृहसंकुलांमध्ये, कार्यालयांमध्ये स्लाईडशोचे कार्यक्रम सुरू केले. स्लाईडशो झाल्यानंतर लगेच लोकांना पत्रं लिहिण्याचं आवाहन करण्यात येत असे. 'सेल्फ डिफेन्स' विकणाऱ्या दुकानांसमोर निदर्शनं हा त्यांचा निषेधाचा दुसरा मार्ग होता. 'मॅक्स फॅक्टर' कंपनीने ही जाहिरात काही महिन्यांतच मागे घेतली. कंपनीला पुढच्याच वर्षी तोटा सहन करावा लागला. त्याची परिणती कंपनीच्या अध्यक्षाने राजीनामा देण्यात झाली. या तोट्यामागचं मोठं कारण 'वाव्हपम' आणि त्यांनी केलेलं जनजागरण हे होतं.

मुख्य धारेतल्या जाहिरातींमधल्या हिंसेचा विरोध करण्यासाठी स्लाईडशो, पत्रलेखन, निदर्शनं यांचा वापर हे 'वाव्हॉ' आणि 'वाव्हपम' यांच्यातलं साम्य होतं. दोन्ही संघटनांनी अशा प्रकारच्या जाहिरातींचा लावलेला अर्थही समान होता - अशा प्रकारच्या प्रतिमांमधून स्त्रीद्वेष्टी संस्कृती तयार होते, यात स्त्रियांना दुय्यम व्यक्ती ठरवलं जातं, असा त्यांचा आक्षेप होता. या संस्कृतीमधून दिसणारी पुरुषप्रधानता आणि कृत्रिमरित्या ठसवले जाणारे लिंगभाव यांना असलेला विरोध हे या दोन्ही संघटनांमधलं साधर्म्य होतं. पण 'वाव्हॉ'ने पॉर्नला विरोध केला नाही. त्या काळात अत्यावश्यक असणारी एलजीबीटी चळवळ, (एलजीबीटी लोकांना भारतात आज हीन समजतात, तशीच काहीशी परिस्थिती तेव्हा अमेरिकेत होती.) आरोग्यपूर्ण आणि हिंसारहित लैंगिक संबंध यांना 'वाव्हॉ'चा आक्षेप नव्हता. मुख्य धारेतल्या, सगळ्यांपर्यंत पोचणाऱ्या माध्यमांचा समाजावर पॉर्नपेक्षा अधिक आणि खोल परिणाम होतो असा 'वाव्हॉ'चा दावा होता. माध्यमांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या हिंस्र प्रतिमांना स्त्रियाच नाही, तर पुरुषही बळी पडतात; भंपक सरसकटीकरणामुळे पुरुषांवरही 'मर्दा'ची भूमिका लादली जाते अशी 'वाव्हॉ'ची मांडणी होती. या बाबतीत 'वाव्हपम' सांस्कृतिक स्त्रीवादाच्या बाजूला झुकणारी संघटना होती. हिंसेला स्त्रिया बळी पडतात आणि पुरुष अन्यायकर्तेच असतात अशी त्यांची काळी-पांढरी मांडणी होती. कोणत्याही परिस्थितीत 'वाव्हॉ'ने सेन्सॉरशिपला विरोधच केला, 'वाव्हपम'चा असा आग्रह नव्हता.

वॉर्नर कम्युनिकेशन्सने 'वाव्हॉ'च्या मागण्या मान्य केल्यानंतर त्यांची नेती ज्युलिया लंडन हिने प्रचंड कार्यभार, व्यक्तिगत आयुष्याकडे होणारं दुर्लक्ष अशा कारणांमुळे आपलं पद सोडलं. तरुण आणि अननुभवी स्त्रियांनी तिची जागा घेतली. वॉर्नर या एका कंपनीमागे संघटनेला जवळजवळ तीन वर्षं घालवावी लागली, संस्थेकडे पैशाची चणचण होती. त्यातून 'वाव्हॉ'च्या शाखांनी आणि मुख्यालयाने स्थानिक समस्यांवर भर द्यावा असं ठरलं. परिणामी 'मॅक्स फॅक्टर'च्या आंदोलनानंतर हिंसा आणि पॉर्नविरोधातल्या लढ्यातलं अग्रस्थान आपोआप 'वाव्हपम'कडे आलं. या बदलानंतर जनजागरणाची, स्त्री-पुरुषांच्या सौहार्दपूर्ण संबंधांची भूमिका घसरायला सुरूवात झाली.

'वाव्हपम'ने 'Write back, fight back' (पत्रं लिहा आणि लढा) ही भूमिका कायम ठेवली. १९७८च्या जानेवारीत फिन-एयरची जाहिरात, १९८०मधली ह्यूबलिन स्पिरिट्सने काढलेली क्लब कॉकटेलची जाहिरात यांवर 'वाव्हपम'ने स्त्रीविरोधात असणाऱ्या हिंसेला विरोध केला. स्लाईडशो, पत्रलेखन, मोर्चे यांचं आयोजन करून या जाहिराती मागे घ्यायला लावण्यात यश मिळवलं. पण त्याच्या जोडीला त्यांनी साडोमासोकीस्ट (S/M) लैंगिकतेलाही विरोध सुरू केला. (S/M म्हणजे जोडीतल्या एका व्यक्तीला शारीरिक वेदना सहन करून लैंगिक आनंद मिळतो - मासोकीझम, दुसऱ्या व्यक्तीला अशा वेदना देण्यात आनंद मिळतो - सेडीझम.)

'वाव्हपम'ने मार्च १९७७मध्ये सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एसेम (S/M) बूथसमोर निदर्शनं केली. या बूथमध्ये दहा डॉलर्स देऊन लेस्बियन एसेम संभोगाचा व्हिडिओ बघता येत असे. प्रत्यक्षात यात कोणत्याही स्त्रीला तिच्या मर्जीविरोधात वेदना सहन करावी लागत नसली नाही तरी, वेदनेतून लैंगिक आनंद मिळतो या गृहीतकालाच 'वाव्हपम'चा आक्षेप होता. "स्त्रियांना टॉर्चर आवडत नाही.", "कोण म्हणतं हिंसेमुळे लैंगिक उद्दीपना होते?" अशा प्रकारचे फलक निदर्शकांच्या हातात होते. एसेमला विरोध करण्यामागे 'वाव्हपम'ची भूमिका स्पष्ट होती : स्त्रियांवर बंधनं, बलात्कार, त्यांचा छळ, खून, आणि त्यांना मिळणारं समाजातलं दुय्यम स्थान या सगळ्यांचा लैंगिक उद्दीपनासाठी वापर करण्याला त्यांचा विरोध होता. या निदर्शनांना स्थानिक, प्रस्थापित आणि प्रवाहाबाहेरच्या वृत्तपत्रांनी मोठी प्रसिद्धी दिली.

या निदर्शनांवर 'सॅम्वॉ' (Samois) या संघटनेने आक्षेप घेतला. बीडीएसएम (BDSM) संबंधांमध्ये रुची बाळगणाऱ्या लेस्बियन स्त्रीवाद्यांनी 'सॅम्वॉ' ही संघटना सुरू केली होती. लेस्बियनांनी एसेम प्रकारांचा वापर करण्याला 'वाव्हपम'ने आक्षेप घेणं अर्थातच 'सॅम्वॉ'ला मान्य नव्हतं. त्यांच्या मते 'वाव्हपम'ची लैंगिकतेबद्दल असणारी भूमिका सनातनी आणि पारंपरिक होती. दुसऱ्या पिढीतल्या काही स्त्रीवाद्यांची पॉर्नविरोधी भूमिका आणि इतरांची लैंगिकतेच्या बाजूची भूमिका (pro sex) यांच्यात लढा (feminist sex wars) झाला; ही त्याची पहिली ठिणगी होती.

एसेमविरोधातल्या प्रसिद्धीमुळे 'वाव्हपम'ने पुढचं पाऊल उचललं. १ मे १९७७ला त्यांनी 'मे डे रॅली' आयोजित केली. सॅन फ्रान्सिस्कोचा नॉर्थ बे हा भाग पॉर्नोग्राफी, वेश्याव्यवसाय यांसाठी प्रसिद्ध होता. लैंगिक तृप्तीचे वेगवेगळे मार्ग तिथे उपलब्ध होते, उदा : एसेम बूथ, संभोगानंदासाठी वस्तू, लेखन विकणारी दुकानं, स्ट्रिप क्लब्ज, XXX रेटेड चित्रपट दाखवणारी चित्रपटगृहं इत्यादी. त्याच भागात 'वाव्हपम'ने मोर्चाचं आयोजन केलं. या मोर्चात त्यांनी पॉर्नविरोधात घोषणा दिल्या. 'पॉर्न हे स्त्रियांविरोधात पसरवलेलं मिथक आहे', 'हा स्त्रियांविरोधातला गुन्हा आहे' अशा घोषणांचे फलक त्यांच्या हातात होते. तिथे जमलेल्या स्त्रियांना त्यांनी प्रश्नावली दिली. बहुतेक स्त्रियांनी पॉर्नोग्राफीला आपला विरोध आहे अशी उत्तरं त्यात दिली. त्यातून 'ब्रॉडवेवर फेरफटका' असा नवा कार्यक्रम सुरू झाला. पॉर्न, वेश्याव्यवसाय असणाऱ्या भागात सभ्य स्त्रिया जाऊ शकत नाहीत. एकेकट्या बाईने तिथे जाण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून या भागात फेरफटका मारावा, त्या भागाचं निरीक्षण करावं, त्यातून आकलन वाढेल असा उद्देश त्यामागे होता. शिवाय तिथल्या लोकांमध्ये स्त्रीवादी विचार मांडणारी पत्रकं वाटण्याचं कामही या फेरफटक्यातून साध्य होत होतं. पुढच्या काळात न्यू यॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्कोमध्ये स्त्रीवाद्यांनी सुरू केलेल्या 'पॉर्न सहली'ची मुळं या फेरफटक्यामध्ये आहेत.

१९७७मध्ये 'न्यू यॉर्क टाईम्स'चे प्रकाशक, आर्थर सुल्झबर्गर यांनी जाहीर केलं की फक्त लैंगिक उपभोगासाठी तयार केलेल्या चित्रपटांच्या जाहिरातींच्या आकारावर ते आपल्या प्रकाशनांमध्ये मर्यादा आणणार. यासाठी साडेसात लाख डॉलर्सचा वार्षिक फटका सहन करण्याची त्यांची तयारी होती. 'न्यू यॉर्क टाईम्स'ची री ओढत देशातल्या इतर काही महत्त्वाच्या वृत्तपत्रांनीही आपापली पॉर्नविरोधातली, स्वयंघोषित सेन्सॉर धोरणं जाहीर केली. यात मुख्य प्रश्न असा होता, की कला म्हणून संभोग दाखवला आहे का संभोगासाठी संभोग - पॉर्न - दाखवला आहे हे कसं ठरवावं? सुल्झबर्गर यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला : आलेल्या जाहिरातीतला मजकूर आणि संपादकांची सदसद्‌विवेकबुद्धी या दोन्ही घटकांनुसार निर्णय होतील असं त्यांनी जाहीर केलं. पॉर्नच्या ग्राहकवर्गाला काय हवं असतं ते चित्रपटनिर्म्यांना बरोबर माहीत असतं. हे जाहिरातींमधून स्वयंस्पष्ट होईल, असं त्यांच्या संपादकीयामध्ये छापलं होतं. या निर्णयापासून महिन्याभरातच जपानी चित्रपट In the realm of the senses याची जाहिरात छापायची का नाही, हा निर्णय घेण्याची वेळ आली. अमेरिकन कस्टमने हा चित्रपट आधी लैंगिकेतच्या कचाट्यात अडकवला होता, पण 'न्यू यॉर्क टाईम्स'च्या बर्नर्ड स्टाईन यांच्या मतानुसार त्या चित्रपटाला काही कलात्मक मूल्य होतं. 'न्यू यॉर्क टाईम्स'चे काही वाचक मात्र स्वयंसेन्सॉरच्या निर्णयामुळे दुखावले गेले. स्वयंघोषित सेन्सॉरचा त्यांनी पत्रं पाठवून निषेध केला.

'वाव्हपम'ने देशातल्या वृत्तपत्रांचं सर्वेक्षण केलं. 'न्यू यॉर्क टाईम्स' आणि 'लॉस एंजेलिस टाईम्स'ने XXX जाहिरातींवर बंदी घातली होती. पण 'सॅन फ्रान्सिस्को क्रॉनिकल' आणि 'सॅन फ्रान्सिस्को एक्झामिनर' ही सॅन फ्रान्सिकोमधली दैनिकं पॉर्न चित्रपटांच्या जाहिराती छापत होती. 'वाव्हपम'ने याचा निषेध करण्यासाठी मोर्चे काढले, पत्रकं प्रकाशित केली. पण वृत्तपत्रांना या जाहिरातीमधून बराच नफा मिळत होता. शिवाय या वृत्तपत्रांच्या वाचकवर्गात, शहरात सक्रिय असणारा पुरुष समलैंगिकांचा मोठा वर्ग होता. त्यातून हे कँपेन फसलं. पण 'हसलर'विरोधात 'वाव्हपम'ला मोठं यश मिळालं.

'हसलर', 'प्लेबॉय', 'पेंटहाऊस' यांसारख्या नियतकालिकांमधून स्त्री शरीराचं होणारं वस्तूकरण, त्याचा सामान्य स्त्रियांवर होणारा नकारात्मक परिणाम याबद्दल पॉर्नविरोधी आणि लैंगिकतेच्या बाजूची भूमिका घेणाऱ्या अनेक स्त्रीवाद्यांमध्ये एकमत होतं. 'पिंक शॉट्स' (योनीमार्गाचे जवळून काढलेले फोटो), बलात्काराबद्दल विनोद, लहान मुलांशी केलेला संभोग चितारणारी कार्टून्स, गोत्रगमन (incest) आणि हिंसा असे प्रकार 'हसलर'मध्ये सर्रास असत. १९७७मध्ये सगळ्या नियतकालिकांच्या खपात 'हसलर' आठव्या क्रमांकावर होतं. तेव्हाच त्यांनी 'All Meat' अंक काढला. जून १९७८मध्ये त्याविरोधात 'वाव्हपम'ने निदर्शनं केली, 'हसलर स्त्रियांच्या शरीराबद्दल मिथकं पसरवतं', 'नियतकालिकांमधली आमच्या शरीराची विटंबना थांबवा', 'हसलर स्त्रीद्वेष्टी मतं पसरवतं' अशा अर्थाचे फलक त्यांनी झळकवले. अनेक शहरांमधल्या दारूच्या दुकानांसमोर, जिथे हे नियतकालिक विक्रीसाठी उपलब्ध होतं, त्यांनी मोर्चे नेले.

हसलरचा ऑल मीट अंक

ज्या 'All Meat' अंकामुळे 'वाव्हपम' डिवचली गेली त्यामागचा इतिहास मात्र रोचक होता. नोव्हेंबर १९७७मध्ये 'हसलर'चा मालक लॅरी फ्लिंट याने नियतकालिकात बदल घडवून आणण्याचं आश्वासन इव्हँजेलिकल ख्रिश्चन धर्मगुरू रूथ कार्टर स्टेपलटन (अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांची बहीण) हिला दिलं होतं. त्यात सगळ्यांना मानवेल अशा, 'हेल्दी संभोगा'चं दर्शन घडेल अशी ग्वाही त्याने दिली होती. त्याच्या मते, स्त्रीचं वरचं शरीर भरडलं जाण्याचं चित्र विनोदी होतं, पण स्त्रियांचा उद्रेक पाहता 'वाव्हपम'च्या निदर्शनांनंतर फ्लिंटने प्रत्येक अमेरिकी स्त्रीची माफी मागितली.

सैद्धांतिक मांडणीचा प्रयत्न -

'वाव्हपम'चं पॉर्नविरोधातलं काम वाढलं, तसतशी या संदर्भातलं स्त्रीवादी विश्लेषण, सैंद्धांतिक मांडणी करण्याची आवश्यकता स्त्रीवाद्यांना जाणवू लागली. यासाठी १९७८ सालच्या नोव्हेंबरमध्ये सॅन फ्रान्सिकोमध्ये स्त्रीवाद्यांची परिषद भरवण्यात आली. या परिषदेसाठी स्त्रियांनी आपापल्या ऐपतीप्रमाणे पाच ते पंचवीस डॉलर फी द्यावी असं सुचवलं; कृष्णवर्णीय, स्थानिक अमेरिकन (रेड इंडियन), लॅटिनो, आशियाई, वृद्ध, अपंग स्त्रियांना खास सवलती दिल्या आणि परिषदेचं फलित चिनी, स्पॅनिश, जपानी आणि खुणांच्या भाषेतही छापून 'वाव्हपम'ने सर्वसमावेशकतेसाठी प्रयत्न केले.

या परिषदेसाठी स्त्रीवादी ललित आणि अललित लेखिकांना व्यासपीठावर संधी मिळाली. लैंगिकता, संभोग, हिंसा यांबद्दल स्त्रियांनी वेगवेगळी मतं मांडली. आंद्रेया ड्वॉर्किन हिने, "संभोग आणि खून हे पुरुषांच्या नेणिवेतच असतात" अशी मांडणी केली. (यापुढच्या काळात ड्वॉर्किनवर टोकाची भूमिका घेण्याचा आक्षेप अनेकदा घेतला गेला.) 'इरॉटिकामधून शक्ती, ताकद, सकारात्मकता मिळवता येते' इथपासून ते 'पॉर्नवर कायद्याने बंदी घालावी' इथपर्यंत वेगवेगळ्या भूमिका मांडल्या गेल्या. पॉर्नविरोधात कडक कायदे बनावावेत हा विषय वादग्रस्त ठरला. एकतर पॉर्न म्हणजे नक्की काय यावर एकमत होणं शक्य नव्हतं (आजही नाही) हा मुद्दा होता. शिवाय भूतकाळात अश्लीलताविरोधी कोमस्टॉक कायदा वापरून संततिप्रतिबंधक साधनं, गर्भपात आणि संततिप्रतिबंधनाबद्दल माहिती, यांच्यावर जप्ती आणल्याची उदाहरणं होती. त्यामुळे स्त्रीवादी कायदा बनवला, तरी त्याची अंमलबजावणी स्त्रीवादी पद्धतीने न होण्याची भीती (लेस्बियन लैंगिकतेवर आधारित कादंबऱ्यांवर जप्ती आणतील आणि 'हसलर'मात्र सुखासुखी प्रकाशित होईल) काहींनी व्यक्त केली. परिषदेनंतर तीन हजार स्त्रियांनी सॅन फ्रान्सिस्कोच्या रेडलाईट भागात मोर्चा नेला. या मोर्चामुळे अनेक स्त्रियांना मानसिक पातळीवर अधिक मुक्त वाटलं, समाजाकडून पाठबळ मिळाल्यासारखं वाटलं. परिषदेचा समारोप करताना डायाना रसल हिने अशी आशा व्यक्त केली, की स्त्रियाच हिंसा, पॉर्न यांना विरोध करतील, पॉर्न रोखण्यासाठी कायदे वापरण्यावरही तिने भर दिला.

'वाव्हॉ'च्या शाखांमधून काही प्रतिनिधी या परिषदेसाठी आल्या होत्या, कायदा वापरण्याची घाई होत आहे, असं त्यांना वाटलं. या परिषदेनंतर 'वाव्हॉ' आणि 'वाव्हपम'चे रस्ते निराळे होत असल्याचं दिसायला लागलं होतं. 'वाव्हॉ'ची निषेधाची पद्धत उच्च नैतिकतेची असली, तरी या पद्धतीमधून परिणाम साधायला फार काळ लागत होता; शिवाय सबळ नेतृत्त्वाच्या अभावामुळे संघटनेची ताकद फार राहिली नव्हती. 'वाव्हपम'च्या परिषदेनंतर, पॉर्नविरोधात कायदेशीर उपाय करावेत या विचारांकडे स्त्रीवादी भूमिका झुकायला सुरुवात झाली.

या परिषदेच्या दीड वर्षं आधीपासून न्यू यॉर्कमध्ये स्त्रीवाद्यांनी संघटना बांधायचा प्रयत्न सुरू केला होता. शेवटी १९७९मध्ये सुझन ब्राऊनमिलर हिच्या नेतृत्वाखाली 'वॅप' (WAP - Women Against Pornography) सुरू झाली. ग्लोरिया स्टायनम, रॉबिन मॉर्गन, एड्रियन रीच या स्त्रीवादी संघटनेच्या संस्थापक सदस्या होत्या. त्यांच्या मते 'वाव्हॉ' आणि 'वाव्हपम'चे पॉर्नोग्राफीविरोधात असणारे प्रयत्न पुरेसे नव्हते. 'वाव्हॉ'च्या रेडारवर पॉर्न कधीच नव्हतं. सुझन ब्राऊनमिलरच्या मते पॉर्न बनताना काही स्त्रियांना त्याचा उपद्रव होतो आणि त्याचा वापर होताना सैद्धांतिक पातळीवर सगळ्याच स्त्रियांचं स्थान दुय्यम ठरतं. फक्त हिंसाच नव्हे, पॉर्न हेही सर्व स्त्रियांचं शत्रूच आहे अशी मांडणी मूळ धरायला लागली होती.

एके काळी फक्त पुरुषांची मक्तेदारी असणारा कायदा हा अभ्यासविषय, समानतेच्या कायद्यांमुळे स्त्रियांनाही अभ्यासासाठी खुला झालेला होता. १९७०च्या दशकात कायदेपंडित स्त्रियांची पहिली पिढी तयार झाली होती. कायद्याच्या विद्यार्थ्यांपैकी एक तृतीयांश स्त्रिया होत्या. वांशिक समानतेसाठी शाळा-कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा वर्ण पाहणं बेकायदेशीर ठरवलेलं होतं; अशाच प्रकारे, स्त्रियांना समाजात समान स्थान मिळावं म्हणून पॉर्नविरोधी कायदे करावेत असा काही कायदाभ्यासक स्त्रीवाद्यांचा आग्रह होता. पॉर्नविरोधी कायद्याचा आग्रह धरणाऱ्यांसमोर कायद्याचा दुरुपयोग हे एक आव्हान होतं. शिवाय वर्णद्वेष ही कृती आहे आणि पॉर्न ही अभिव्यक्ती आहे. अमेरिकन पहिल्या घटनादुरुस्तीनुसार आणि बहुसंख्य नागरिकांसाठी अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे अतिशय उच्च मूल्य आहे. त्यामुळे पॉर्न ही अभिव्यक्ती आहे का नाही यावर स्त्रीवादी कायदेपंडितांचा ऊहापोह एकीकडे सुरू होता.

न्यू यॉर्क विद्यापीठात कायदेतज्ज्ञ नॉर्मन रेडलिच यांच्या एका भाषणाचा विषय होता - अश्लीलता : स्त्रियांचं दुय्यम स्थान विरुद्ध अभिव्यक्तिस्वातंत्र्य. या भाषणात उपस्थित असणाऱ्या, 'वाव्हपम'च्या एका सदस्येने - टेरीसा होमल हिने - स्त्रीवाद्यांची बाजू जोरकसपणे मांडली. तिथल्या चर्चेची परिणती न्यू यॉर्क विद्यापीठात परिषद भरवण्यात झाली. या परिषदेत पॉर्नविरोधी स्त्रीवादी (सुझन ब्राऊनमिलर, आंद्रेया ड्वॉर्किन), कायदेपंडित स्त्रीवादी (ब्रेंडा फीन फास्टो, मार्जोरी स्मिथ), सामाजिक स्वातंत्र्यतावादी (civil libertarians) कायदेपंडित (पॉल शेव्हिनी), आणि पॉर्न व्यवसायाच्या बाजूने लढणारे वकील (हेराल्ड प्राईस फाहरिंजर ) यांसह अनेकांना आपापली बाजू मांडण्यासाठी आमंत्रित केलं होतं.

पॉर्नविरोधकांच्या मते: 'सगळ्यांना अभिव्यक्तिस्वातंत्र्य असावं ही कल्पना अतिशय उच्च आहे, पण ही कल्पना स्त्रियांना अंमलात आणणं जड जातं. त्यांना त्यांचं व्यक्तिगत मत मांडण्याची संधी पुरुषांमुळे मिळत नाही. पॉर्न हे स्त्रियांची दडपणूक करण्याचं एक साधन आहे. ज्या पॉर्नमुळे अर्ध्या लोकसंख्येला अभिव्यक्तिस्वातंत्र्य मिळत नाही, त्यावर बंदी घातल्यामुळे समानता प्रस्थापित होण्यास मदत होईल.'

पॉर्नविरोधकांना प्रेक्षकांकडून बराच प्रतिसाद मिळाला. पॉर्न हा अडथळा असल्याचं शेव्हिनी यांना तत्त्वतः मान्य असलं, तरी त्यावर कायदेशीर बंदी घालायला त्यांचा विरोध होता. पॉर्नमुळे खरोखर काही नुकसान होतं का हे सिद्ध करणारी विदा त्यांनी मागितली, जे स्त्रीवादी देऊ शकले नाहीत. या उदारमतवादी पुरुषांनाही प्रेक्षकांमधून बराच प्रतिसाद मिळाला. मात्र पॉर्न व्यवसायाच्या समर्थकांनी पॉर्नविरोधकांची हेटाळणी करण्याव्यतिरिक्त फार काही मुद्दे मांडले नाहीत. स्त्रीवादी कायदेपंडितांकडून पॉर्न विरोधकांना काहीसा दिलासा मिळाला. ब्रेंडा फीन फास्टो यांनी स्त्रीवाद्यांना विदा जमा करायला सुचवलं, शिवाय एखाद्या दिवाणी खटल्यात पॉर्नोग्राफर्सना अडकवावं असा सल्ला दिला. मार्जोरी स्मिथ यांनी 'वाव्हॉ'ची भूमिका पुढे चालवण्याचा सल्ला दिला. या गाजलेल्या परिषदेमुळे पॉर्नविरोधी स्त्रीवाद्यांचं नव-डाव्या लोकांबद्दल असणारं मत आणखी वाकडं झालं. वंशभेद, वर्णभेद, शेतमजूर यांची कड घेऊन; व्हीएतनाम युद्धाला विरोध; गुन्हेगारांसाठी तुरुंगात सुविधा या मुद्द्यांसाठी आंदोलन करणारे सामाजिक स्वातंत्र्यतावादी स्त्रियांच्या हक्कासाठी लढत नाहीत, पण पॉर्नोग्राफरांच्या हक्कासाठी मात्र लढतात असं मत स्त्रीवाद्यांमध्ये पसरलं.

या परिषदेमुळे पॉर्नविरोधक आणि सामाजिक स्वातंत्र्यतावादी यांच्यात काही समेट होईल अशी आशा आयोजकांना होती; पण त्यांच्यातली दरी उलट आणखीनच वाढली. एका पत्रकाराच्या निरीक्षणानुसार, सामाजिक स्वातंत्र्यतावाद्यांकडून काही सल्ला मिळेल अशा आशेने स्त्रीवादी आल्या होत्या. पण स्वातंत्र्यवादी पक्षाने स्त्रीवाद्यांकडे अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या शत्रू म्हणून पाहिलं. स्त्रीवाद्यांची अजूनच निराशा झाली.

न्यू यॉर्क विद्यापीठाच्या परिषदेआधी दोनच आठवड्यांपूर्वी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये 'वाव्हपम'ची परिषद झाली होती. त्याच काळात इतर काही घटना घडल्यामुळे माध्यमांनी परिषदेला फारशी प्रसिद्धी दिली नाही. पॉर्नचा विषय केंद्रस्थानी घेतल्यामुळे राष्ट्रीय माध्यमांमधून झटक्यात प्रसिद्धी मिळू शकते, जी माध्यमांमधून होणाऱ्या हिंस्र चित्रणाच्या निषेधातून मिळणार नाही याची स्त्रीवाद्यांना पुरेशी कल्पना होती. त्यामुळे त्यांनी पुढच्या काळात 'वॅप'मध्ये पॉर्नला विरोध या कामालाच केंद्रस्थान दिलं.

'वॅप'ला अग्रस्थान -

फिल डॉनाह्यू शो या लोकप्रिय टीव्ही कार्यक्रमात १९७९ सालच्या जुलै महिन्यात फिल डोनह्यूने सुझन ब्राऊनमिलर, लिन कँपबेल आणि डोलोरेस अलेक्झांडर या तीन 'वॅप'च्या नेत्यांना बोलावलं. कार्यक्रमातून पॉर्नविरोधात जनजागरण करावं असा त्यांचा हेतू होता. पॉर्न म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून फक्त स्त्रियांचा द्वेष करणं आहे, हा मुद्दा या तिघींनी मांडला. कार्यक्रमाच्या काही काळ आधी 'हसलर'चा मालक लॅरी फ्लिंट याच्यावर गोळीबार होऊन तो त्यातून वाचला होता. यावर सुझन ब्राऊनमिलरचं मत काय असं विचारलं असता ती म्हणाली, "That may have been the best thing that could happen to him." (हे फारच छान झालं. बहुतेक.) या वाक्याबद्दल तिने माफीही मागितली, पण तिच्यावर टीकेची झोड उठली. पण एकंदर 'वॅप'ला यासंदर्भात आलेली पत्रं सकारात्मक होती. बहुतांश स्त्रियांनी, आपल्याला मुलं आहेत आणि आपला पॉर्नला विरोध आहे, अशा अर्थाची पत्रं लिहिलेली होती. कडव्या धार्मिकांनीही 'वॅप'ला पाठिंबा दर्शवला होता; या लोकांचा विवाहपूर्व, विवाहबाह्य लैंगिक संबंधांना विरोध होता, टीनेज मुलींच्या गर्भधारणांबद्दल त्यांना काळजी होती. काही स्त्रियांनी 'वॅप'च्या भूमिकेला विरोधही दर्शवला होता, पण कॅथरीन मककिनॉन या कायदेतज्ज्ञ स्त्रीवादीच्या मते, स्त्रियांनी पुरुषप्रधानता आत्मसात केल्याचं हे लक्षण होतं.

सुझन ब्राऊनमिलरच्या या वाक्यानंतर आणि एकूणच 'वॅप'ला पैसे गोळा करण्यात अडचणी येत होत्या. तरी त्यांची आर्थिक परिस्थिती 'वाव्हॉ' आणि 'वाव्हपम'पेक्षा बरीच बरी होती. 'वॅप'ने त्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले. यात प्रामुख्याने इतर स्त्रीवाद्यांसोबत जेवणाचे कार्यक्रम होते. अशा कार्यक्रमांमध्ये अनेकींनी त्यांना 'कायदेशीर मार्ग अवलंबू नये' असा सल्ला दिला. सामाजिक मूल्यांवर प्रभाव टाकण्याचे मार्ग सनातनी लोकांकडे अधिक आहेत याबद्दल त्यांना खात्री होती. कायदेशीर मार्ग अवलंबणार नाही, असं तोंडी वचनही डोलोरेस अलेक्झांडर यांनी 'वॅप'च्या वतीने दिलं होतं.

प्रमुख आणि प्रसिद्ध स्त्रीवादी व्यक्तींचा पाठिंबा, चांगली आर्थिक परिस्थिती आणि खंबीर नेतृत्व यांमुळे 'वॅप' तेव्हा 'वाव्हॉ' आणि 'वाव्हपम'च्या पुढे होती. या दोन्ही संघटनांमध्ये निरनिराळ्या कारणांमुळे नेतृत्वाचा अभाव होता. त्यात या दोन्ही संघटना पॉर्न/हिंसाविरोधी लढ्यात 'वॅप'च्या मागे पडल्या. एके काळी हिंसेविरोधात सुरू झालेला स्त्रीवाद्यांचा लढा आता फक्त पॉर्नभोवती घुटमळू लागला.

पॉर्नविरोधात जिहाद -

'वॅप'ने जून १९७९मध्ये न्यू यॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरमध्ये कार्यालय सुरू केलं. आज मोठमोठ्या जाहिरातींच्या झगमगाटासाठी प्रसिद्ध असणारा टाईम्स स्क्वेअर त्या काळात रेड लाईट भाग म्हणूनही प्रसिद्ध होता. या प्रसिद्धीमुळे पर्यटक त्या भागाकडे आकर्षित होत नव्हते, भांडवलदार भांडवल गुंतवायला तयार नव्हते. शहरातल्या लोकांचं, पर्यायाने शहराचं, उत्पन्न वाढवण्याचा भाग म्हणून न्यू यॉर्क महानगरपालिकेला टाईम्स स्क्वेअर 'स्वच्छ' करायचा होता. याचाच एक भाग म्हणून तिथे 'वॅप'ला कार्यालयाची जागा मिळाली. स्थानिक स्त्रीवादी, एलजीबीटी गट आणि पुरोगामी यांनी त्याला विरोध केला. 'स्वच्छता मोहिमे'मुळे वेश्यांचा व्यवसाय बुडणार होता. या सगळ्या वेश्या खालच्या आर्थिक स्तरातल्या, शिक्षण-कौशल्य नसणाऱ्या आणि बहुतांशी गौरेतर वर्णाच्या (कृष्णवर्णीय किंवा लॅटिना) होत्या. या स्त्रियांचा रोजगार काढून घेणं म्हणजे वर्गभेद, वंशभेद तर होताच, शिवाय यात मुख्यत्वेकरून स्त्रियांचाच रोजगार जाणार असल्यामुळे हे लिंगभेद करणारंही होतं. 'वॅप'ने या गोष्टीला महत्त्व दिलं नाही. या स्त्रिया रस्त्यावर आल्यामुळे पोलिसांकडून अटक, अन्याय होण्याचं प्रमाणही वाढलं. पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी ८५% स्त्रिया गौरेतर होत्या.

'वॅप'चा वेश्याव्यवसायालाच विरोध होता. कॅथरीन मककिनॉनचा सिद्धांत - या स्त्रियांनी आत्मसात केलेला पुरुषवर्चस्ववाद हे त्यांचं एक कारण होतं. शिवाय 'वॅप'च्या कार्यकर्त्या मध्यमवर्गीय, 'चांगल्या घरातल्या', गौरवर्णीय, मूलतत्त्ववादी स्त्रीवादी होत्या; वेश्या/पॉर्न व्यवसायात असणाऱ्या स्त्रियांची बाजू 'वॅप'ला माहीतच नव्हती. 'वॅप'चा प्रवास सांस्कृतिक स्त्रीवादाकडे सुरू झाला होता. पुरुषी लैंगिकता मुळातच हिंस्र आणि अन्यायकारक असते; स्त्रियांना भिन्नलिंगी संभोगाकडे स्वच्छ नजरेने बघताच येत नाही, कारण ती हिंसा असते अशा प्रकारची ड्वॉर्किनप्रणित, टोकाची सांस्कृतिक स्त्रीवादी मांडणी 'वॅप'ने केली होती.

पॉर्नविरोधात जनमत तयार करण्यासाठी त्यांनी पॉर्नसहली सुरू केल्या. सॅनफ्रान्सिस्कोला केलेल्या 'ब्रॉडवेच्या फेरफटक्या'ची ही पुढची आवृत्ती होती. 'वॅप'ची कार्यकर्ती स्त्रियांना घेऊन स्थानिक अडल्ट पुस्तकांची दुकानं, टॉपलेस बार, सेक्स एंपोरियम्समधून फिरवून आणायची. त्यात त्यांच्याबद्दल माहितीही मिळत असे. 'वॅप'साठी यातून पैसा गोळा होत असे; स्त्रियांचं सबलीकरण आणि पॉर्नविरोधात प्रक्षोभ तयार करणं हा दुसरा आणि महत्त्वाचा हेतू होता. अशा प्रकारची सहलींचं आयोजन 'वाव्हपम'ने सॅन फ्रान्सिस्कोमध्येही केलं. लैंगिकतेबद्दल किळस उत्पन्न व्हावी अशा प्रकारे लैंगिकतेचं दर्शन या सहलींमधून होत असे.

या सहलींचा मोठा दुष्परिणामही होता. पॉर्न/सेक्स व्यवसायात असणाऱ्या गौरेतर स्त्रियांनी पॉर्नविरोधी स्त्रीवाद्यांवर वंशद्वेष आणि वर्गद्वेषाचा आरोप केला. त्यात तथ्य होतं; कारण पॉर्न/सेक्स नाही तर पोटाचं काय, या प्रश्नाला 'वॅप'कडे उत्तर नव्हतं. शिक्षण, व्यावसायिक कौशल्यं नसणाऱ्या, निम्नआर्थिक वर्गातल्या स्त्रियांनी प्रगतीची आणि आर्थिक स्तर उंचावण्याची आशा नसणारी मोलकरणीची, स्वयंपाक्यांची, सेवा क्षेत्रातली कामं करावीत आणि त्याच्या चौपट मिळणारं उत्पन्न सोडावं अशी अपेक्षा धरणं गैर होतं. अनेक मध्यमवर्गीय स्त्रिया फक्त लग्न करून आयुष्याची सोय लावत होत्या, त्यापेक्षा पॉर्न/सेक्स व्यवसाय वेगळा कसा याची मांडणी 'वॅप'ने केली नाही. त्याशिवाय 'वॅप' या व्यवसायाकडे हिणकसपणे बघत असे; त्यामुळे या स्त्रियांच्या दृष्टीने 'वॅप' ही स्वयंघोषित संस्कृतिरक्षक संघटना होती. 'वॅप'च्या या मांडणीत तिसऱ्या पिढीतल्या लैंगिकतेला सकारात्मक मानणाऱ्या मांडणीची बीजं आहेत.

१९८० साली 'डीप थ्रोट'मधली मुख्य अभिनेत्री लिंडा बोरमन (लव्हलेस हे पडद्यावर असलेलं नाव) हिचं आत्मकथन प्रकाशित झालं. तिच्या म्हणण्यानुसार तिच्या गळ्याशी बंदूक धरून तिच्या तत्कालीन नवऱ्याने तिच्याकडून काम करवून घेतलं. "'डीप थ्रोट' पाहताना माझ्यावर झालेला बलात्कार बघत असता," असं तिचं विधान होतं. 'डीप थ्रोट' येऊन तेव्हा सात वर्षं झालेली होती, तरी तो न्यू यॉर्कच्या एका चित्रपटगृहामध्ये सुरू होता. 'वॅप'ने तिथे निदर्शनं केली. 'लोलिता' नावाच्या कादंबरीवर एक नाटक ब्रॉडवेवर येणार होतं. त्यांनी मूळ कथेत बदल केला होता. चौदा वर्षांची मुलगी आपल्या सावत्र वडिलांना स्वतःशी संबंध ठेवायला भाग पाडते असं चित्रण नाटकात होतं. नाटक वाईट असल्याचं अनेक समीक्षकांनी म्हटलेलं होतंच, 'वॅप'नेही नाटकाविरोधात निदर्शनं केली. नाटक बंद पडलं (त्यात 'वॅप'चा वाटा किती हा मुद्दा विवादास्पद आहे).

इतर अनेक स्त्रीवादी वेश्याव्यवसायाकडे नैतिक प्रश्न म्हणून न पाहता आर्थिक प्रश्न म्हणून बघत होते. वेश्याव्यवसायावर बंदी आणण्यापेक्षा, या व्यवसायातल्या स्त्रियांचं सबलीकरण करण्यासाठी त्यांना आरोग्यविमा मिळावा, कामगार कायदा लागू व्हावा अशा प्रकारच्या मागण्या ते करत होते. त्याच काळात एडवर्ड डॉनरस्टाईन, नील मॅलामूथ यांच्यासारखे अभ्यासक माध्यमांमधली हिंसा, पॉर्न आणि त्याचे लोकांवर होणारे परिणाम या विषयांवर संशोधन करत होते. त्यांचे निष्कर्ष 'वॅप'च्या पथ्यावर पडणारे होते. पण हे संशोधक पुरुष असल्यामुळे त्यांना 'वॅप'च्या कार्यक्रमांना आमंत्रण नव्हतं. 'वॅप'ने १९८२मध्ये पॉर्नसंबंधी चर्चा करण्यासाठी परिषद भरवली होती. ह्या परिषदेत पॉर्न म्हणजे काय, यावरून लेस्बियन-भिन्नलिंगी अशी दरी पडली. बेटी डॉडसन ही लैंगिकतेला सकारात्मक मानणारी स्त्रीवादी कलाकार आणि पॉर्नोग्राफर ह्या परिषदेत आपल्या एका S/M लेस्बियन समूहातल्या मैत्रिणीसह, डोरोथीसह गेली होती. - माझ्या ओळखीच्या/नात्यातल्या पुरुषाने पॉर्न बघितलं आणि माझ्याशी जबरदस्तीने संभोग केला - असं अनुभवकथन करणं असा काहीसा एकंदर परिषदेचा रागरंग होता.

पॉर्नविरोधकांची मांडणी साधारण ह्याच प्रकारची असते - त्यात पॉर्न बघून मनुष्यांवर काय दुष्परिणाम होतो, कसा दुष्परिणाम होतो, याबद्दल वैज्ञानिक मांडणी करण्याऐवजी पॉर्न बघून मला किंवा माझ्या ओळखीतल्या कोणाला त्रास झाला, बळजबरी संभोग करावा लागला, अशा प्रकारच्या सांगोवांगीच्या कथा असतात. (सदर अंकातला श्री. आजगावकर ह्यांचा लेख अशाच धर्तीचा आहे.) अशा पीडीत स्त्रिया (आणि बालकां)च्या दुःखाबद्दल पूर्ण सहानुभूती बाळगूनही, ह्यात पॉर्न गुन्हेगार की अशा कृती करणारी व्यक्ती गुन्हेगार असा प्रश्न विचारावासा वाटतो. बेटी आणि डोरोथी यांच्या अशा प्रश्नांना 'वॅप'च्या व्यासपीठावर काहीही स्थान नव्हतं. ह्या प्रसंगाबद्दल बेटी 'The Feminist Porn Book' या पुस्तकात लिहिते -

Dorothy was busy taking notes while I sat there stunned by the realization that I was in the midst of an orgy of suffering, angry women. Each speaker's words and tears were firing up the group into a unified rage. Emotionalism without intellect from victims without power was how lynch mobs and nationwide hate groups were formed - the basic strategy of fascism, I concluded with shiver.

पॉर्न आणि वंश यांबद्दल मूलभूत मांडणी करण्यात 'वॅप' कमी पडली. 'वाव्हॉ' आणि 'वाव्हपम' या संघटनाही गौरेतर स्त्रियांपर्यंत पोहोचू शकल्या नव्हत्या.

गौरेतर स्त्रियांचे पॉर्नविरोधातल्या लढ्याबद्दल मूलभूत आक्षेप होते. एकतर त्यांच्यापैकी काहींचा हा रोजीरोटीचा प्रश्न होता. पुरुष अत्याचारीच असतात अशी मांडणी 'वॅप'ने केली होती. कृष्णवर्णीय स्त्रियांचा याला आक्षेप होता. त्यांच्यासाठी कृष्णवर्णीय पुरुष हे त्यांच्या वंशभेदाच्या लढ्यातले कॉमरेड्स होते. अत्याचार गौरवर्णीय पुरुष करतात; गुलामगिरीच्या काळत कृष्णवर्णीय स्त्रियांवर बलात्कार करण्याची गोऱ्या पुरुषांना अनुमती होती, त्या कायद्यांचे अवशेष आजही समाजमनात सापडतात असा या स्त्रियांचा आरोप होता. आशियाई स्त्रिया बालिश समजल्या जातात. या प्रकारच्या वर्णद्वेष्ट्या समजांबद्दलही 'वॅप'ची काहीही भूमिका नव्हती. लिंडा बोरमन आणि 'लोलिता' या गौरवर्णीय स्त्रियांच्या बाजूने 'वॅप' उभी राहिली, यामुळे वर्णद्वेषाच्या आरोपांत भरच पडली.

'वॅप'चा शेवट, पॉर्नचा 'विजय' -

त्याच सुमारास राजकीय वातावरणामध्ये धार्मिक बाजू जड होत होती. चलनवाढ, बेरोजगारी या गोष्टी वाढत होत्या. कट्टर धार्मिक लोकांनी याचं खापर सामाजिक स्वातंत्र्यावर फोडलं. धार्मिक लोकांनी 'वॅप'ला पाठिंबा द्यायला सुरुवात केली होती. चर्चशी संबंधित लोकांनी 'वॅप'कडे मदत मागितली असता, आपली स्त्रीवादी भूमिका स्पष्ट करण्याऐवजी, 'वॅप' त्यांचं स्वागत करत होती. खरंतर धार्मिक लोकांचा विवाहबाह्य-विवाहपूर्व लैंगिक संबंध, आनंदासाठी आणि गर्भधारणेविना संभोग, गर्भपात, संततीनियमनाच्या साधनांचा वापर या सगळ्यांचा पुरस्कार करणार्‍या स्त्रीवादी भूमिकेला कट्टर विरोध होता. १९८२-८३मध्ये कॅथरीन मककिनॉन या मूलतत्त्ववादी स्त्रीवादी कायदेपंडितेने मिनेयापोलिस आणि इंडियानापोलिस या दोन मोठ्या शहरांमध्ये पॉर्नविरोधी कायदा तयार करण्यात मदत केली. दोन्ही शहरांमध्ये कट्टर धार्मिक लोकांचं प्राबल्य होतं. मिनेयापोलिसमध्ये आंद्रेया ड्वॉर्किन या दुसऱ्या मूलततत्ववादी स्त्रीवादी भावनोत्कट भाषणं करून लोकमत ह्या कायद्याच्या बाजूने वळवण्यास मदत केली होती. मिनेयापोलिसच्या पॉर्नबंदी कायद्यासाठी फिलीस श्लाफ्ली* यांनी बरीच रसद पुरवली होती. (या फिलीस श्लाफ्ली यांचा एक मुलगा अँडी श्लाफ्ली. राजेश घासकडवी यांनी लिहिलेल्या लेन्स्की वि. श्लाफ्ली या मालिकेतला हाच तो श्लाफ्ली.)

कट्टर धार्मिक लोकांकडून समर्थन मिळवून मककिनॉन यांचा कायदा पारित झाला याबद्दल मककिनॉन यांची भूमिका अशी, की या विधेयकाला धार्मिक लोकांचा पाठिंबा आहे हे त्यांना माहीत नव्हतं. अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाने १९८६ साली हे कायदे रद्दबादल केले.

१९८०च्या दशकात 'वॅप'ने आपली सगळी ऊर्जा कायदेबदल करण्यासाठी खर्च करायला सुरुवात केली होती. कामासाठी मदत म्हणून त्यांनी फक्त वर्गणी, देणग्या मागणं एवढंच ठेवून बाकी लोकसहभाग वगळला. त्यांचा सामान्य लोकांशी असणारा संपर्क तुटला. जनमत काय आहे, याची कल्पना 'वॅप'ला नव्हती. याउलट 'वाव्हॉ' आणि 'वाव्हपम' काम करत असताना त्यांचा लोकांशी संपर्क होता, जनजागरण हा त्यांच्या कामाचा मुख्य भाग होता. हिंसा/पॉर्नविरोधी लढा फक्त कायद्याची भाषा बोलायला लागला, तेव्हा त्यात सामान्य लोकांनी योगदान द्यावं असं फारसं काही उरलं नाही.

उलट बाजूने लैंगिकतेला सकारात्मक मानणारे स्त्रीवादी, उदारमतवादी, पुरोगामी लोक 'वॅप'च्या "जिहादा"मुळे आणि कट्टर धार्मिकांच्या उन्मादामुळे सक्रिय झाले. पॉर्नविरोधक कायद्याच्या विरोधात या लोकांनी न्यू यॉर्क, मॅडिसन या शहरांमध्ये निदर्शनं केली. त्यांनी लोकसहभाग नाकारला नाही. स्त्रीवाद्यांनी फॅक्ट (FACT – Feminists Anti- Censorship Taskforce) नावाचा गट स्थापन केला. ('द फेमिनीन मिस्टिक'ची लेखिका) बेटी फ्रीडनने सुरू केलेल्या नाऊ (NOW - National Organization for Women) या संघटनेनेही पॉर्नविरोधाला विरोध सुरू केला.

तंत्रज्ञानात होणारा विकास पॉर्नोग्राफर्सच्या पथ्यावर पडत होता. चित्रपटगृहांमध्ये अडकलेलं पॉर्न व्हिडिओ कॅसेटच्या माध्यमातून घरोघरी पोहोचायला लागलं. चित्रपटगृहात जाऊन तिथली लादी चिकट करण्यापेक्षा घरात, एकान्तात बसून आपले शौक पुरवणं सगळ्यांसाठीच सोयीचं होतं. ज्या स्त्रियांना पॉर्न पाहून लैंगिक शिक्षण मिळवायचं होतं, त्यांच्यासाठीही व्हिडिओ कॅसेट हे वरदान होतं. टेलिफोन वापरून १-९०० नंबरांवर फोन करून लैंगिक गप्पा मारणं १९८२ सालापासून शक्य झालं. हा लोंढा परतवणारे कायदे करणं काय किंवा पत्रं पाठवून १-९०० गप्पा बंद करणं काय, दोन्ही निव्वळ अशक्य बनलं होतं.

'वॅप'चं काम १९८६ साली आलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कमी व्हायला लागलं होतं. १९८९ साली 'वॅप' अधिकृतरित्या बंद झाली. पुढच्या काळात अमेरिकेत पॉर्नविरोधक जिंकले का पॉर्नविरोधाचे विरोधक हे मुद्दाम निराळं सांगायची गरज नाही.

१९७० चं दशक हिप्पी चळवळ, गर्भपाताला मान्यता, गर्भधारणा रोखणाऱ्या गोळीचा वाढता खप यांचं होतं. १९८० चं दशक पॉर्नविरोधी स्त्रीवादी क्रूसेड आणि त्याला इतर काही स्त्रीवाद्यांनी आणि सामाजिक स्वातंत्र्यवाद्यांनी केलेला विरोध यांचं होतं. (याच दशकात पुरुष समलैंगिकांमध्ये एक जीवघेणा आजार पसरत होता; ज्याला आता आपण 'एड्स' म्हणून ओळखतो. या अंकात तो इतिहास फार महत्त्वाचा नसला, तरीही एड्सवरून खेळलं गेलेलं राजकारण हाही रोचक विषय असल्याची नोंद करून आपण पुढे जाऊ.) १९९०चं दशक 'सेक्स वॉर्स'चं होतं.

एकीकडे पॉर्नला कायदेशीर विरोध सुरू असताना, १९८५ साली कँडीडा रोयाल या पॉर्न कलाकार, स्त्रीवादीने फाम प्रॉडक्शन्स नावाची स्वतःची चित्रपटनिर्मिती संस्था सुरू केली. ह्या संस्थेतर्फे निर्माण केलेल्या चित्रपटांमध्ये स्त्रियांसाठी आणि जोडप्यांसाठी पॉर्न बनवलं गेलं; कँडीडाने अशा १७ चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं.

पुढची पिढी - ट्रिस्टन टाओर्मिनो

ट्रिस्टन टाओर्मिनो हिने १९९८ साली स्वतःचं पहिलं 'How to' पुस्तक प्रकाशित केलं, The Ultimate Guide to Anal Sex for Women. या पुस्तकानंतर तिने अमेरिकाभर गुदसंभोगाबद्दल शिक्षण देण्यासाठी कार्यशाळांचं आयोजन केलं. तिला मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आली, ती अशा अर्थाची होती; की या कार्यशाळेचे व्हिडिओ बनवल्यास त्याचा खूप जास्त फायदा होईल. अशा प्रकारच्या शैक्षणिक फिती चिकार होत्या, पण त्या सेक्सी नव्हत्या अशी तिची तक्रार होती. आपल्याला हवी तशी वस्तू उपलब्ध नसेल, तर ती आपण स्वतः बनवावी, असा विचार तिने केला.

स्वतःचे पैसे घालून, स्वतः चित्रपट बनवून तो स्वतःच वितरित करावा असा एक पर्याय होता. पण तो नेहेमीच्या वर्तुळाबाहेर पोहोचणार नाही अशी मोठी शक्यता होती. म्हणून तिने आपल्या प्रकल्पासाठी आर्थिक पाठबळ मिळवण्यासाठी अनेकांना संपर्क केला. त्यात इव्हिल एंजल निर्मितीगृहाच्या जॉन स्टालियानोने तिला सकारात्मक प्रतिसाद दिला. स्टालियानोला गोंझो विधेच्या पॉर्नचा जनक मानला जातो. स्टालियानोसारखा दिग्गज निर्माता असल्यामुळे तिला 'मनी शॉट'ने चित्रपट संपवण्याशिवाय पर्याय नव्हता. पण त्या चित्रपटात स्त्रियांना आवडेल असा फोरप्ले असेल आणि मनी शॉट असला तरीही अभिनेत्रीच्या चेहेऱ्यावर वीर्य दाखवणार नाही याची तिने काळजी घेतली. नवागत, अननुभवी आणि स्त्रीने बिग बॉसशी असा पंगा घेणं अनपेक्षित होतं, पण तिला त्यात यश मिळालं.

दोन चित्रपट बनवून ती काही काळ लेखन, संपादन आणि लैंगिक कार्यशाळा यांकडे वळली. पण पुन्हा सहा वर्षांत (२००५) साली ती पॉर्नोग्राफी बनवण्याकडे वळली. कारण गोंझो विधेत स्त्रियांच्या गरजा, मानसिकता यांकडे पर्यायाने स्त्री प्रेक्षकांकडे दुर्लक्ष होतं याबद्दल तिला खात्री होती. तिला स्वतःला गोंझो विधेबद्दल जिव्हाळा असल्यामुळे त्यात दिसणारा धसमुसळा प्रकार, सर्कसछाप करामती, एकाच वेळेस किती भोकांत काय-काय मावेल याची शर्यत या गोष्टी तिला स्त्रियांसाठी मानहानिकारक वाटत होत्या. स्त्रियांसाठी बनणाऱ्या पॉर्नमध्ये काहीही वैविध्य नसणं ही नेहेमीची तक्रार होतीच. कँडीडा रोयालने सुरुवातीला पॉर्न बनवलं तेव्हा त्यात नावीन्य होतं, त्या धक्क्यामुळे लोक तेव्हा दचकले होते; पण पुढे लोकांची तिचीच री ओढली. त्यातलं नावीन्य संपलं होतं. पुन्हा एकदा, जी वस्तू उपलब्ध नाही ती आपण स्वतः बनवावी या विचारांनी ती पॉर्नोग्राफीकडे वळली.

पॉर्नपटांचं दिग्दर्शन ही गोष्ट तिच्यासाठी आव्हानात्मक होती. पॉर्नच्या बाजूने पॉर्नविरोधक स्त्रीवाद्यांशी वाद घालणं, सैद्धांतिक पातळीवर पॉर्नचा विचार करणं आणि पॉर्नमध्ये बदल घडवण्याची क्षमता आहे हे एका बाजूला, पण तसं प्रत्यक्ष कृतीतून करून दाखवणं अवघड आहे. ट्रिस्टनची स्वतःची 'स्मार्ट अॅस प्रॉडक्शन्स' ही चित्रपटनिर्मिती संस्था आहे. तिने २४ अडल्ट चित्रपट बनवले आहेत. तिला 'अडल्ट व्हिडीओ न्यू' आणि फेमिनिस्ट पॉर्न पुरस्कार मिळाले आहेत.

'द फेमिनिस्ट पॉर्न बुक' या पुस्तकाच्या संपादनाचं कामही ट्रिस्टनने केलं आहे. त्यात २६ लोकांचे लेख आहेत; पैकी २४ लोक स्वतःला स्त्रिया म्हणवतात. या सगळ्यांचा पॉर्नशी सक्रिय संबंध आहे. तरुण वयात बॉडीसेक्स वर्कशॉप चालवणाऱ्या बेटी डॉडसनने अगदी ८२ व्या वर्षी त्या कार्यशाळेबद्दल माहितीपट बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बेटी डॉडसन लिहिते की इंटरनेट येण्याआधी 'मास्टरबेशन' हा शब्द वापरला की लोकलज्जेला सामोरं जाणं वा काही विनोद सुरू आहे असे प्रतिसाद तिला येत असत. इंटरनेटनंतर माझ्यावर सेन्सॉरशिपची बंधनं उठली; असं ती म्हणते. इंटरनेटसंदर्भात अनेक पॉर्न कलाकार या पुस्तकात लिहितात, porn is here to stay.

---

पॉर्नविरोधात कायदे बनवून नक्की काय मिळालं, याची थोडी गंमत बघितली तर १९९२ साली कनेडीयन सर्वोच्च न्यायालयाने बटलर वि. द क्वीन या खटल्यात अश्लीलताविरोधी कायद्याचा अन्वय 'वॅप'च्या भूमिकेच्या जवळ जाईल असा लावला. त्यामुळे अमेरिकेतून कॅनडात जाणाऱ्या पुस्तकं, वस्तूंची सीमेवर तपासणी सुरू झाली. त्यात दोन पुस्तकांवर जप्तीची वेळ आली. या दोन पुस्तकांची नावं होती - 'Pornography : Men Possessing Women' आणि 'Women Hating'. पुस्तकांची लेखिका आंद्रेया ड्वॉर्किन - विसाव्या शतकातली सगळ्यात प्रसिद्ध मूलतत्त्ववादी, सांस्कृतिक स्त्रीवादी. कायदेशीर मार्ग वापरू नये कारण मूल्यं, श्लीलाश्लीलाचा अर्थ लावण्याची व्यवस्था सनातनी लोकांच्या हातात असते, ही इतर स्त्रीवाद्यांनी केलेली भविष्यवाणी आंद्रेया ड्वॉर्किनच्या पुस्तकांबाबतच खरी ठरली. कायदेतज्ज्ञ नेदीन स्ट्रोसन हिच्या मते "अश्लीलतेचा अर्थ लावताना स्त्रीवादी पळवाट असण्याची शक्यता उरलेली नव्हती". टोकाच्या, कट्टर भूमिकेचा काव्यगत पराभव झाला होता.

दुसऱ्या पिढीतल्या स्त्रीवादाच्या अभ्यासक केटी रॉईफ, नेओमी वुल्फ यांनी त्या स्त्रीवाद्यांचं वर्णन 'बळी पडलेल्या स्त्रीवादी' असं केलं आहे. त्या काळात जी सामाजिक, राजकीय परिस्थिती होती त्यातून या स्त्रीवादी आणि त्यांचे विचार घडले. वंश, वर्गदृष्ट्या सर्वसमावेशक असण्यात त्या कमी पडल्या. पण आर्थिक, सामाजिक परिप्रेक्ष्याचा विचार करता अनेक मध्यमवर्गीय, गौरवर्णीय स्त्रियांचं सबलीकरण स्त्रीवाद्यांच्या या पिढीने केलं. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांच्या बाबतीत 'चाल छे' असा दृष्टिकोन बदलण्यासाठी त्यांनी समाजाला भाग पाडलं. बलात्कार, विवाहांतर्गत बलात्कार, कौटुंबिक हिंसा याविरोधात बोलण्यासाठी त्यांनी स्त्रियांना बळ दिलं.

'द फेमिनिस्ट पॉर्न बुक'मध्ये काही लेखांमध्ये असं दिसतं की या पॉर्नसंबंधित कामं करणाऱ्या लोकांचा पॉर्नकडे बघण्याचा दृष्टीकोन 'आपण काही जगावेगळं करत आहोत' असा नाही. काही लोक फेसबुकवर स्वतःच्या चेहेऱ्याचा फोटो लावत नाहीत; काही लोक दर पंधरवड्याला प्रोफाईल पिक्चर बदलतात आणि आपला चेहेरा मिरवतात. संभोग, पॉर्न या विषयात काही लोकांकडे अशासारखंच कुतूहल आणि प्रयोगशीलता असते. पॉर्न अभिनेत्री लिहितात की प्रेम वा पॅशनेट संभोगाच्या आधी त्यांनी निवडलेले त्यांचे बॉयफ्रेंड किंवा शय्यासोबती 'तुम्हाला अमुक एक गोष्ट करायला आवडेल का' असं विचारत नाही. पण पॉर्नच्या चित्रीकरणाआधी ह्या स्त्रियांना काय-काय करायचं आहे याची पूर्वकल्पना दिली जाते; त्यांच्या परवानगीशिवाय काहीही घडत नाही. ट्रिस्टन टाओर्मिनो लिहिते की ती तिच्या चित्रपटांसाठी आधी एक अभिनेत्री/ता निवडते आणि मग त्यांना कोणाबरोबर काम करायला आवडणार नाही त्यांना वगळून पुढची पात्रयोजना, मग पुढच्या व्यक्तीची अशी नावड यादी वगळून पात्रयोजना, अशा प्रकारे काम करते.

आजही फुकटात उपलब्ध असलेलं बरंचसं पॉर्न हे भिन्नलिंगी पुरुषांचा विचार करूनच बनवलेलं दिसतं. हे सगळ्या स्त्रियांना आवडतंच नाही, असं नव्हे. पण गेल्या काही वर्षांमध्ये फुकट पॉर्न दाखवणाऱ्या संस्थळांवर 'फेमिनिस्ट पॉर्न' अशी कॅटेगरी दिसायला सुरुवात झालेली आहे. ही कॅटेगरी सोडूनही स्त्रियांचा अवमान न करणाऱ्या, 'मनी शॉट'ने न संपणाऱ्या फिती दिसतात. या अंकात आनंद करंदीकर आपल्या लेखात शेवटी म्हणतात की स्त्रिया पॉर्ननिर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणावर उतरल्याशिवाय चित्र बदलणार नाही.

बाहेरच्या समाजातलं, अन्य 'सोज्ज्वळ' माध्यमांमधलं स्त्रियांचं मोठ्या प्रमाणावर आणि माणूस म्हणून दर्शन होत नाही तोवर पॉर्नकडूनही निराळी अपेक्षा धरता येणार नाही. आणि इथेच पुन्हा एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं मी 'वाव्हॉ'च्या आंदोलनाकडे येते. मुख्य माध्यमांमध्ये स्त्रियांचं चित्रण करताना, स्त्रियांवर हिंसा केली, त्यांच्याशी धसमुसळेपणाने वागलेलं त्यांना सरसकट आवडतं हे मिथक मोडून काढण्याची आवश्यकता तेव्हाच्या अमेरिकन समाजात होती. आजही काही मोजके अपवाद वगळता (पॉर्नसकट) सगळ्याच क्षेत्रांमध्ये पुरुषांची मक्तेदारी मोडून काढण्याची गरज आहे. स्त्रियांनी चित्रपट, जाहिराती, सरकारी धोरणं, आणि पॉर्न बनवल्याशिवाय ते स्त्रियांना आपलंसं वाटेल असं असणार नाही. एरिका लस्टने बनवलेलं हे एक उदाहरण.

सर्व चित्रं जालावरून साभार

field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (4 votes)

प्रतिक्रिया

या सहलींचा मोठा दुष्परिणामही होता. पॉर्न/सेक्स व्यवसायात असणाऱ्या गौरेतर स्त्रियांनी पॉर्नविरोधी स्त्रीवाद्यांवर वंशद्वेष आणि वर्गद्वेषाचा आरोप केला. त्यात तथ्य होतं; कारण पॉर्न/सेक्स नाही तर पोटाचं काय, या प्रश्नाला 'वॅप'कडे उत्तर नव्हतं. शिक्षण, व्यावसायिक कौशल्यं नसणाऱ्या, निम्नआर्थिक वर्गातल्या स्त्रियांनी प्रगतीची आणि आर्थिक स्तर उंचावण्याची आशा नसणारी मोलकरणीची, स्वयंपाक्यांची, सेवा क्षेत्रातली कामं करावीत आणि त्याच्या चौपट मिळणारं उत्पन्न सोडावं अशी अपेक्षा धरणं गैर होतं. अनेक मध्यमवर्गीय स्त्रिया फक्त लग्न करून आयुष्याची सोय लावत होत्या, त्यापेक्षा पॉर्न/सेक्स व्यवसाय वेगळा कसा याची मांडणी 'वॅप'ने केली नाही. त्याशिवाय 'वॅप' या व्यवसायाकडे हिणकसपणे बघत असे; त्यामुळे या स्त्रियांच्या दृष्टीने 'वॅप' ही स्वयंघोषित संस्कृतिरक्षक संघटना होती. 'वॅप'च्या या मांडणीत तिसऱ्या पिढीतल्या लैंगिकतेला सकारात्मक मानणाऱ्या मांडणीची बीजं आहेत.

हे माहीती नव्हते. जे झाले ते ('वॅप'चा शेवट, पॉर्नचा 'विजय') चांगलेच झाले.
.

ऑगस्ट १९७७मध्ये 'मॅक्स फॅक्टर' या कंपनीने चेहऱ्यावर लावण्याच्या 'सेल्फ डिफेन्स' नावाच्या क्रीमची जाहिरात बाजारात आणली. "Warning! A pretty face isn't safe in the city. Fight back with Self Defense." (सावधान! सुंदर चेहरा या शहरात सुरक्षित नाही. 'सेल्फ डिफेन्स' (हे मॉइश्चरायजर) वापरून प्रतिकार करा.) अशी त्या जाहिरातीची मुख्य ओळ होती. या जाहिरातीचा निषेध हे 'वाव्हपम' (WAVPM - Women Against Violence in Pornography and Media) या संस्थेचं पहिलं मोठं काम होतं.

शी अ‍ॅड म्हणायची का काय ही. एकदम चूकीची जाहीरात आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिती म्हणून या लेखद्वयाचं महत्त्व मोठं आहे. मात्र माझी - पुन्हा एकदा - दमछाक झाली. आणि माहितीबाबत फार कातरी न चालवता ती टाळता आली असती असंही माझं मत झालं.
यासंदर्भात पूर्वी झालेल्या एका वादाची आठ॑वण झाली. स्त्रीवाद हा शेवटी एक पायरीच आहे. पुरुषांच्या जागी स्त्रियांची स्थापना करून अन्यायाची चाकं उलट फिरवण्यात रस असलेल्यांना स्त्रीवादी म्हणत नाहीत, बदलावादी म्हणतात, यावर एकमत होतं. मग स्त्रीवाद्यांच्या भावना जपताना निरनिराळ्या लैंगिक क्रीडांमध्ये रस असणार्‍यांच्या अभिव्यक्तीवर घाला येत असेल, तर ते नक्की कसं काय समर्थनीय ठरतं, असा प्रश्न होता. त्या विसंगतीला भिडण्याचा प्रयत्न या लेखद्वयात जाणवला. तो तितकासा यशस्वी झाला नाही, हे खरं. पण सुरुवात मात्र झालीच. या प्रश्नाला तोंड फोडण्याचं काम हेही मोठंच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन