बब्राबभ्राबभ्रा...

बब्रा बभ्रा कथा

बब्राबभ्राबभ्रा...

- पंकज भोसले

त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आम्ही तिघंच असल्याचा माझा भ्रम नेमाडेकाकांनी खोटा ठरवला. ते तिघं म्हणजे; जिच्यामुळे तो क्षण घडला ती डॉली गाला, तिच्या टेरेस फ्लॅटच्या बरोबर नव्वद अंशांतल्या आमच्या गॅलरीमध्ये उभा असलेला मी, आणि मौका पाहून चौका मारण्यात पटाईत असलेला आळीतला सेलिब्रेटी कुत्रा तुकाराम. पण ती घटना म्हणजे छोट्या वाक्यांत संपवता येणारी बाब नाही. चित्र स्पष्ट होण्यासाठी आधी काही तपशील लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. विशेषत: गाला कुटुंबीयांविषयी.

आख्ख्या आळीत सर्वात मोठा फ्लॅट गाला कुटुंबीयांचा आहे; पण गचाळतेमध्ये त्यांचा हात धरणारं आळीत वा आळीबाहेरही कुणी शोधून सापडणार नाही. त्यांच्या घराला 'झुरळ-उवांचं गोडाऊन' म्हणतात. कीटकांचं जतन-संवर्धन हा त्यांचा अंतर्गत धार्मिक मामला असला, तरी बाह्यजगाला त्यांचं घर म्हणजे वाळत घातलेल्या कपड्यांचं बारमाही प्रदर्शनच वाटतं. त्यांच्या संपूर्ण टेरेसवर कपडे सुकवण्यासाठी जुन्या फॅशनच्या रंगीत दोऱ्या अडकवलेल्या आहेत, ज्यावर मळकट्ट आणि कळकट्ट चिमट्यांच्या आधाराने वाळत घातलेल्या कपड्यांच्या रांगाच रांगा खालून सगळ्यांना दिसतात. पहिली रांग बेडशीट्स किंवा गाला आंटीच्या खूप साऱ्या भडक रंगांच्या साड्यांची असते. दुसरी डॉलीचे नवनवे ड्रेस आणि तिच्या भावाचे सुपरमॅन-स्पायडरमॅन आणि इतर प्रसिद्ध कार्टून चित्रांचे टी-शर्ट, जीन्स यांची. तिसऱ्या रांगेत ठोक किराणा मालाचे व्यापारी गाला यांचे आऊट ऑफ फॅशन ढगळ, गबाळे कपडे विसावलेले दिसतात. शेवटची आतली दोरी अंतर्वस्त्रांसाठी राखलेली असते. ती खालून पाहणाऱ्यांना दिसत नाही. केवळ आमच्या गॅलरीमधूनच तिचं दर्शन घडू शकतं. तर आमच्या गॅलरीतूनच दिसणाऱ्या दोऱ्यांच्या या रांगेची रचना अशी असते की ती अंतर्वस्त्रं कुणाची, ते स्पष्ट होऊ शकतं. (डॉली उद्या कोणत्या रंगाची चड्डी घालणार, हे आज वाळत घातलेल्या रंगावरून मला ताडता येऊ शकतं इतकंच; पण त्याचं खरेपण तपासता येत नाही.)

तो ऐतिहासिक क्षण घडला, तेव्हा पाऊस परतण्यापूर्वीचे वादळी वाऱ्यांचे दिवस होते. कॉलेज नसल्यामुळे मी गॅलरीत बसून आळीत शिरणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या प्रत्येक सुंदर आणि उपसुंदरसदृश्य मुलीचा एक्स रे काढत होतो. तेव्हा डॉली तिच्या टेरेसवर दाखल झाली. वाळलेले कपडे दोऱ्यांवरून काढण्यासाठी.

डॉलीच्या घराची, तिच्या आईच्या भांडणाच्या आवाजाची अपकीर्ती आळीत आहे. पण त्याहून डॉलीच्या सर्वांगीण सौंदर्य गोडाउनाची कीर्ती आळीपार झेंडे गाडून आहे. आळीतल्या सर्व पोरांना गालांच्या घराच्या गचाळपणाची माहिती आहे; तरी कोळशाच्या खाणीतल्या या हिऱ्याला पटकवण्याची सुप्त इच्छा डॉली आठवीत गेल्यापासून प्रत्येकाला आहे. आता तिच्या कॉलेजमधल्या वाढत जाणाऱ्या इयत्तांनुसार मुलांइतकंच मुलींनाही तिचं दर्शन महत्त्वाचं वाटतं, कारण आख्ख्या आळीतल्या मुलींना फॅशन-शिकवण अप्रत्यक्षपणे डॉलीने दिली. तिन्ही त्रिकाळ एफ टीव्हीवर ताज्या फॅशन ट्रेण्ड्सचं अवलोकन करत आळीतल्या मुलांनी जागतिक फॅशनभान जपलं होतं. पण मुलींची मात्र त्याबाबत पिढ्यानपिढ्या आबाळच होत होती. डॉली नसती, तर त्यांचं काय झालं असतं कुणास ठाऊक? डॉलीच्या पेहरावांकडे पाहतच पोरी एकलव्यी बाण्याने फॅशनेबल बनत होत्या. जीन्स-टॉपच्या तिकडम्‌ आवृत्त्या आळीत दिसत होत्या. सगळ्याच गोष्टीतले कॉपीकॅट्स पचवणाऱ्या लेच्यापेच्या मानसिकतेची तरुण मंडळी आळीत असली, तरी डॉलीबाबत त्यांचा ओरिजनली अट्टाहास होता.

आळीतल्या इतर सगळ्या मुलींकडून जबरदस्ती राखी बांधून घ्यायला पोरं तयार होती; पण डॉलीबाबत त्यांची मतं रानटी होती. कपड्यांचे एकापेक्षा एक भन्नाट प्रकार घालून ती पोरांच्या आगीमध्ये आणखी जाळ ओतत होती. झाडून साऱ्या पोरांनी तिला प्रपोज केलं होतं. यात बोलबच्चन स्मार्ट पत्रकार अनिरुद्ध देशपांडेही होता, अन् डॉलीपेक्षा चिक्कार लहान असलेला कुरूपकिंग विनू खांडेकरही होता. नकार पचवणाऱ्यांमध्ये मीदेखील कितवासा होतोच. डॉली आळीतल्या कुठल्याच पोराला पटणार नाही, हे सत्य आळीतल्या मुलांना कधी पटतच नसे. त्यामुळे डॉलीला प्रपोज करण्याची आवर्तनं गिरवण्यात सर्वांना मजा वाटायची. डॉली आळीतल्या कोणत्याही मुलावर थुंकायचीही कृपा करणार नाही, हे खरं होतं. पण अशी थुंकण्याची क्रिया घडती, तर तिची थुंकी पकडण्यावरून जिवलग मित्र म्हणवणाऱ्या पोरापोरांमध्येही जीवघेणी मारामारी झाली असती. डॉलीबाबत इतकी भीषण संवेदनशील अवस्था असल्यामुळे त्या दिवशी तिच्या गॅलरीतून जे पडलं, ते जाहीर कार्यक्रमाद्वारे पाडण्यात आलं असतं; तर काय गहजब झाला असता, याचा विचारही मला करता येत नाही. नवे कपडे वाळत घालून त्यावर मळकटलेले चिमटे लावत, ती वाळलेले कपडे दोरीवरून अलगद काढत होती. माझ्या डोळ्यांमधल्या एक्स-रे मशीनने त्राटकस्थिती प्राप्त केली होती. तेव्हाच तो जादुई क्षण घडला...

बभ्रा बब्रा पंकज भोसले

वाऱ्याच्या वेगाने आधी तिच्या हातातून निसटलेली गुलाबी ब्रा टेकऑफ घेणाऱ्या विमानाच्या आवेशात वर सरसावली आणि मग गुल झालेल्या पतंगीसारखी, दोन इमारतींच्या मध्ये भिरकावली गेली. दिवाळीमध्ये आकाशात फुटून उलगडलेले दोन पॅरॅशूट्स कुणीतरी बांधून सोडत असल्यासारखं ते नाजूक कुतूहल गुरुत्वाकर्षणाचा नियम चुकवण्यासाठी आटापिटा करू लागलं. डॉलीने नव्वद अंशांच्या कोनात तोंडाचा 'आ' वासून ठेवलेल्या मला पाहिले, मग हातून निसटलेली ब्रा गुरुत्वाकर्षणाचा नियम पूर्ण केल्यानंतर साधारण कोठे पडेल याचा अंदाज घेतला. त्यानंतर तिने एक चतुर कृती केली, ज्यामुळे तिच्या हुशारीबाबतचा माझा आदर शतगुणित झाला आणि तोंडाचा वासलेला 'आ' सॅच्युरेशन पॉइंटपर्यंत गेला. दोन बेडशीट्स, एक शर्ट आणि भावाची एक जीन्स असा आणखी ऐवज तिने खाली टाकून दिला. एकटी ब्रा आणण्यासाठी खाली जाण्याऐवजी घाऊकपणे कपडे खाली टाकणं तिला सोयीस्कर आणि कमी लाजिरवाणं वाटलं असावं.

खालचं दृश्य पाहिल्यानंतर मला तोंडाचा 'आ' वासण्याच्या सॅच्युरेशन पॉइंटला मागे टाकणं गरजेचं वाटलं. डॉली लिफ्टमधून खाली उतरण्यासाठी सज्ज झाली होती अन् तिकडे दोन इमारतींच्या मोकळ्या पॅसेजमध्ये तुकाराम कुत्रा येणाऱ्या कुतूहलाच्या स्वागतासाठी त्याच्या तोंडाचा सॅच्युरेशन पॉइंट दाखवत होता. मी बॅटमॅन, सुपरमॅन किंवा हाणामारीच्या हिंदी-दक्षिणी चित्रपटांमधला हीरो नसल्याची पहिल्यांदा मला खंत वाटली. गॅलरीतून मी थेट आमच्या लिफ्टमध्ये दाखल झालो आणि तुकाराम कुत्र्यापासून डॉलीची लाज वाचवण्यासोबतच, इतर किमान शंभर हेतूंना मनात घेऊन थेट खालीच निघालो.

डॉलीच्या लिफ्टचा प्रॉब्लेम असल्यामुळे तिच्या आधी मीच मोकळ्या पॅसेजमध्ये पोहोचलो. डॉली खाली उतरली, तेव्हा कपाळावर आठ्या ताणलेल्या पोझमध्ये दिसली. आश्चर्य म्हणजे डॉलीने नंतर टाकलेले सारे कपडे लगेचच तिच्या हातात गेले होते; पण ज्या मूळ गोष्टीसाठी ती खाली आली होती, तीच गायब होती. तुकाराम कुत्र्याच्या अस्तित्वाचं निशाणही दूरवर नव्हतं. त्यामुळे समोर पुराव्यादाखल दिसलेला मी महागुन्हेगार, महाचोर आणि महारोडरोमियो असल्याच्या थाटात तिने माझ्याकडे नजर टाकली आणि एक भीषण कॉन्व्हेंटी शिवी हासडली.

तिच्या त्या धारदार पवित्र्याकडे पाहून माझ्या तोंडून मूर्खासारखे "बब्राबभ्राबभ्राभब्रा.." असे अर्धमेल्या अवस्थेत असल्यासारखे संवाद फुटू पाहत होते. मी स्वप्नात तर नाही ना, अशी शंका मला येत होती. पण पुढे दोन्ही इमारतींचे कोपरे न् कोपरे तुकारामला धुंडाळून काढत असताना होणारा त्रास, डॉलीच्या निव्वळ खुनशी नजरेने केलेला अपमान यांचा जाच माझ्या डोक्याचा पारा चढवू लागला. डॉलीला तुकाराम कुत्र्यापासून होऊ शकणाऱ्या उपद्रवाला टाळून, तिच्याशी मैत्रीची संधी हुडकणाऱ्या मला आता कायमच डॉलीच्या विखारी नजरेचा सामना करावा लागणार हे पक्कं होतं. आळीतल्या सर्व उकिरडेसदृश्य जागा, तुकारामच्या लाडक्या कुत्र्या उंडगत असलेली ठिकाणं आणि त्याची दत्तक आई मिसेस बामणे यांच्या घरीही मी तुकारामचा माग काढत पोहोचलो. पण संध्याकाळपर्यंत तुकाराम दिसलाच नाही. अन् नंतरही नाहीच.

तुकाराम वॉचमनने पाळलेल्या या कुत्र्याचा लळा मूलबाळ नसलेल्या बामणे बाईंना लागल्यापासून आळीतले सर्वच पुरुष तुकाराम कुत्र्याचा हेवा करतात. 'बेवॉच' म्युट करून मध्यरात्री पाहिलेल्या आबालवृद्धांनी बामणे बाईंना 'आळीतल्या पामेला अँडरसन' अशी उपाधी दिली आहे, त्यामुळे मिसेस बामणेंचं विशेष वर्णन करायची गरज नाही. पण त्या खऱ्याखुऱ्या पामेला अँडरसनला लोकप्रिय होण्यासाठी म्हणे खर्चीक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या होत्या. मिसेस बामणे मात्र ओरिजनल असल्याने उलट पामेला अँडरसनने आपलं नाव बदलून बामणे करायला हवं, यावर नाक्यावरच्या साऱ्या पोरांचं एकमत आहे. काही वर्षांपूर्वी पिल्लू अवस्थेत असलेल्या तुकाराम कुत्र्याला त्या जेव्हा कवटाळत, तेव्हा ते दृश्य पाहणाऱ्या आळीतल्या प्रत्येक पुरुषाला कुत्रा व्हावंसं वाटे. हार्ट अटॅकने तुकाराम वॉचमनचा मृत्यू झाल्यानंतर मिसेस बामणेंच्या ताब्यात गेलेल्या कुत्र्याच्या पिल्लाचं नाव कालांतराने तुकाराम कसं पडलं, हा कधीच थोडक्यात सांगता न येणारा किस्सा आहे. या तुकारामाचा वाढदिवस १४ फेब्रुवारी रोजी असतो हे दूरदूरपर्यंत प्रसिद्ध आहे. आळीत अन्‌ आळीबाहेरच्या हायवेजवळ मिसेस बामणे तीन मोठ्या होर्डिंग्जच्या जागा स्वखर्चाने बुक करतात. त्यात पट्टा घातलेल्या तुकारामचा भला मोठा क्लोजअप आणि त्याखाली शुभेच्छुक म्हणून स्वत:चा, नमस्कार करतानाचा दणकट फोटो लावतात. राज्यातल्या एका संधीसाधू पक्षप्रमुखाचा खासगी सचिव म्हणून काम करणाऱ्या मिस्टर बामण्यांचा, कुठलीही भावना नसलेला (मिसेस बामण्यांच्या सूचनेनुसार जाणीवपूर्वक लहान केलेला) फोटो त्यात असतो. त्या दिवशी आळीत 'व्हॅलेंटाइन डे'ऐवजी पूर्णपणे सक्तीचा 'तुकाराम डे' साजरा होतो. गरबा, टॅलेंट प्रदर्शन आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत सर्व आळीसाठी बफे जेवणाचा कार्यक्रम (मिस्टर बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली) असतो. तुकारामविषयी चार-दोन लोकांनी फेकाफेकीयुक्त कौतुक केल्यानंतर खुद्द मिसेस बामणे माईक घेऊन त्याचे तीन रसभरित किस्से सांगतात; ज्यामध्ये पहिला घरात शिरलेल्या तीन चोरांना तुकारामने कसे पळवून लावले हा, दुसरा आळीतल्या मुलींची छेड काढणाऱ्या मुलांना चावून त्याने त्या मुलांना कसा धडा शिकवला तो आणि तिसरा घरात हरवलेल्या वस्तू शोधून देण्यात तुकाराम किती पटाईत आहे, हा असतो.

वास्तविक बामणे बाईंच्या दत्तक घराऐवजी उकिरडे फुंकण्यात स्वारस्य असणाऱ्या तुकारामविषयी बाई जे सांगतात, ते किस्से अतिरंजित असतात. काहीही बोलताना 'म्हंजे बघा' हा त्यांचा दर वाक्यानंतर येणारा दुशब्दी पवित्रा त्या घेतात. पण त्यांच्या 'म्हंजे बघा'चा अर्थ 'माझे बघा' असा लावत सगळे पुरुष आज्ञाधारक बाळासारखे त्राटक लावून बसतात. दर वर्षी त्यांच्या तुकाराम'गाथे'त मनाचा नवा मालमसाला येतो. तपशिलात फेरफार होतो. पण मिसेस बामणेंना डोळ्यांनी पिऊन घेण्यात रमलेल्या दर्शकांचे लक्ष्य त्या काय बोलतायत, याकडे कुठे असतं? मिसेस बामणेंच्या किश्श्यांपेक्षा पूर्णपणे वेगळे असे तुकाराम कुत्र्याचे टॉप टेन किस्से आळीतल्या लोकांच्या मनावर गोंदवले गेले आहेत. त्यांतले निव्वळ तीन किस्सेसुद्धा संक्षिप्तात ऐकून गार होण्यासाठी पुरे आहेत.

किस्सा क्र. १ :

एका कुत्रीला प्रेमाच्या अंतिम अवस्थेत अडकवून तुकाराम संपूर्ण आळीला, जॉगिंग ट्रॅक असल्यासारखा प्रदक्षिणा घालत होता, तो समरप्रसंग. (मिल्खासिंग ते उसेन बोल्ट या झाडून सगळ्या धावपटूंचा विक्रम मोडण्याचा निर्धार असलेला त्याचा पवित्रा ज्यांनी पाहिला, त्या बायका 'तुकाराम चुकून कुत्र्याच्या जन्माला आला' असे जाहीरपणे बोलत होत्या. हे दृश्य पाहणाऱ्या काही बोल्ड आणि अतृप्त बायकांनी तर आपण ती कुत्री असायला हवे होते, यावर खासगीत कबुलीही देऊन टाकली.) या घटनेनंतर महिनाभर आळीत कुत्र्याच्या प्रणयांवर अगणित चर्चासत्रं झडली. 'मी माझ्या डोळ्यांनी पाहिले, बोल!' असं म्हणत त्या घटनेच्या वेळी आपण हजर होतो, हे शपथेवर सांगणारे कितीतरी जण आळीत भेटू शकतील.

किस्सा क्र. २ :

दुसरा प्रकारही जगजाहीरपणे घडला. आळीतल्या भुरट्या कुत्र्यांचा संगनमताने प्रणय सुरू असताना त्यात चवताळलेला तुकारामही सहभागी होण्याचा प्रयत्न करू लागला. तुकारामच्या या जबरदस्तीच्या घोळामुळे त्या प्रणयोत्कट जोडप्याची भुंकण्या-रडण्याहूनही निराळी अशी विचित्र भेसूर स्वरनिर्मिती आळीत तयार झाली. आजवर कुत्र्यांच्या रडण्याची ऐकलेली भीषण रूपं विसरून जायला लावणारी आर्त आणि जोरकस विव्हळण मुद्रित करणं, कुठल्याही साऊंड इंजिनिअरला आव्हानात्मक ठरलं असतं. आख्खी आळी, प्रथमच ऐकलेल्या त्या आवाजाने दचकून त्याचा उगम शोधण्यासाठी घराबाहेर आली. तुकारामला अडवण्याचा कुणीच प्रयत्न केला नाही, कारण तसं करण्याची हिंमत आळीत कुणाचीच नाही. एकदा तुकारामने काही करायचं ठरवलं, की मिसेस बामणे यांनाही तो जुमानत नाही. त्यामुळे त्या जोडप्याच्या प्रणयाला चार चाँद लावण्याचं काम तुकारामने चोख बजावलं. हवं ते करण्यात पूर्णपणे यशस्वी होण्याचंच नशीब लाभलेला कुत्रा आपल्या आळीत असल्याचा तेव्हा अनेकांना अभिमान वाटला. या प्रसंगानंतर आळीत ते प्रणयी कुत्र्यांचं जोडपं पुन्हा कधीच दिसलं नाही. आळीतला नंबर एकचा पॉर्नमॅड पिनाक कुरकुरेने, या सगळ्या अजब व्यवहाराचं चित्रण मोबाईलद्वारे करून 'थ्रीसम डॉग्ज' नावाने यूट्यूबवर दोन वेळा अपलोड केलं. आता ते तेथून उडवण्यात आलं असलं, तरी पिनाककडे ते उपलब्ध आहे.

किस्सा क्र. ३ :

तुकारामच्या अलौकिक 'काम'गिरीचा हा किस्सा नाही, तर त्याच्याकडून झालेल्या प्रमादाचा आहे. डॉली गालाचा भाऊ प्रज्ज्वल पाचवीत असताना पाठीमागे पडदा असलेल्या कुणा सुपरहीरोच्या कपड्यांत आळीत फिरत होता, तेव्हा तो पडदा पकडण्यासाठी गेलेला तुकाराम प्रज्ज्वलच्या कुल्ल्यांना चावला. त्या वेळी आळीत अनंत रिश्टर स्केलचा भूकंप झाला असल्याचा निष्कर्ष वृद्ध व्यक्तींनी काढला. डॉली गालाची आई आणि तुकारामची दत्तक आई मिसेस बामणे यांच्यात जुंपलेल्या भांडणाइतका टिपेचा आवाज, कुठल्या डीजेच्या स्पीकरलाही काढता येणार नाही. हे भांडण मिटवायला आलेल्या पोलिसांनाही दोन तास कोणतीही कारवाई करता आली नाही. शेवटी मिसेस बामणे आणि गाला या दोघींचा आवाज बसल्यानंतरच पोलीस मध्ये पडले आणि कुत्र्याला तुरुंगात टाकता येणार नसल्याने, वाटाघाटी करून परत निघून गेले.

या किश्श्यांना अर्थातच तुकारामच्या वाढदिवशी थारा नसतो, कारण तुकाराम हा आळीतला सेलिब्रिटी असून त्याच्या खऱ्या करामती लोकांच्या मनात वास्तव्यास आहेत. तुकारामकडून झालेल्या डॉलीच्या ब्रा-चोरीचा नवा किस्सा माझ्याकडे ताजा असला, तरी त्याला शोधण्यासाठी मिस्टर अँड मिसेस बामणे यांचं घर माझा दिवसातला शेवटचा थांबा होता.

महासंशयी नवऱ्याच्या सहवासात संशयाच्या व्हायरसने झपाटलेली मिसेस बामणे तुकाराम-चौकशीच्या माझ्या हेतूंबाबत खोदून-खोदून विचारू लागली, तेव्हा तिच्या तावडीतून माझं सुटणं अवघड बनलं. तिनेही दुपारनंतर तुकारामला पाहिलं नव्हतं. हक्काचं दुपारचं गिळायला तुकाराम आला नसल्याने तिला तुकारामची काळजी वाटत होती. मिसेस बामणे यांच्या तुकारामच्या कौतुकाचे, 'म्हंजे बघा'च्या प्रस्तावनेतून सुरू होणारे, किस्से सुरू झाल्यानंतर मात्र माझ्या डोक्याची तार सटकायला सुरुवात झाली. डोळ्यांना धार लावायच्या अर्धवट प्रक्रियेपासून सुरुवात होऊन डॉलीची ब्रा डॉलीला परत मिळवून देण्यात आलेलं अपयश, तुकारामसारख्या गावठी कुत्र्याचा न लागलेला शोध आणि 'पामेला अँडरसन'सदृश असल्या तरी जगातल्या सर्वाधिक पकाऊ बाईंकडून तुकाराम कुत्र्याचे बोरियतने भरलेले किस्से न थांबण्याचा प्रकार, असं आपलं सगळंच बिघडत चालल्याचं जाणवायला लागलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी, आदल्या दिवशीचा प्रकार चिमुकला वाटावा इतक्या, गोष्टी बिघडायला सुरुवात झाली. मिसेस बामणेंनी दोन इमारतींच्या मधल्या पॅसेजमध्ये येऊन माझा आणि आळीतल्या दोन्ही सोसायट्यांमधल्या संशयितांच्या पिढ्यांचा उद्धार करायला सुरुवात केली. 'तुकाराम कुत्रा हरवला आहे' , 'त्याला कुणीतरी पळवून नेला आहे' किंवा 'त्याला कुणीतरी मारून टाकला आहे', या तीन निष्कर्षांना जुन्या-नव्या शिव्यांचा मुलामा देत मिसेस बामणे वाटेल त्याचं नाव घेत होत्या. काल दिवसभर मी तुकारामला शोधत असल्याचंही त्यांनी जाहीर केलं होतं, त्यामुळे नाक्यावर मला नव्या अवघड प्रश्नांना तोंड द्यावं लागणार होतं. कुणीतरी खरंच मिसेस बामणे यांना थांबवायला हवं होतं. डॉलीच्याआईशी केलेल्या भांडणाच्या डेसिबल्सना मागे टाकण्याच्या तयारीने मिसेस बामणे ओरडत होत्या, रडत होत्या, भेकत होत्या. आळीतून नव्याने जाणाऱ्या-येणाऱ्या कुणालाही या बाईचा नवरा मेला आहे असं वाटलं असतं, इतक्या आक्रोशाने त्यांच्याकडून तुकारामाचा धावा सुरू होता. गंमत म्हणजे त्यातही त्यांनी 'म्हंजे बघा'चा मारा सुरूच ठेवला होता.

काही काळानंतर मिस्टर बामणे यांना नेमाडेकाकांनी पाचारण केलं, तेव्हा त्यांना आवरण्याच्या नादात बामणे यांच्या तोंडावर मिसेस बामणे यांचा ठोसा बसला आणि नेमाडेकाकांना त्यांनी अशा पद्धतीने भिरकावून दिलं, की डब्ल्यूडब्ल्यूईची स्थानिक आवृत्ती थेट बघितल्याचा आनंद पाहणाऱ्याला मिळाला. पण हरतील तर ते नेमाडेकाका कसले?

त्यानंतर आळीत जे घडलं त्याची दृश्यफीतच पाहणाऱ्यांच्या मनांत कायमची नोंदली गेली, कारण एखाद्या बुलफायटरच्या आवेशात नेमाडेकाका पुन्हा ताठ उभे राहिले. त्यांनी विविध वाकड्या-तिकड्या पोझेस्‌ घेतल्या. एखाद्या कसलेल्या जुगलबंदीकारासारखे ते हळू आवाजात मिसेस बामणे यांना समजवू लागले. मिस्टर बामणे नेमाडेंच्या पाठीमागे उभे राहून, व्यायामशाळेप्रमाणे नेमाडेंना सपोर्ट देण्याचं काम करत होते. ते स्वतः तीन-चार वेळा ढकलले आणि पाडले गेले, तरी अखेर त्यांनी पिसाळलेल्या मिसेस बामणे यांना शांत करण्यात यश मिळवलं. विजयी बुलफायटरच्या आवेशातच त्यांनी आळीतल्या गॅलऱ्यांकडे कटाक्ष टाकला आणि सर्व प्रेक्षकांना पांगवलं.

नेमाडेकाकांच्या आवडीचा सार्वजनिक उद्योग म्हणजे, ते खूश असताना नाक्यावरच्या सर्व तरुण मंडळींना स्वत:च्या खर्चाने सूप पाजायला घेऊन जाणं. काही चांगलं वाचलं-लिहिलं-पाहिलं-ऐकलं की त्याचा पाढा आम्हां कलानिरक्षर माणसांपुढे वाचण्यासाठी ते चायनीज सूपचं आकर्षण आमच्यापुढे ठेवत. मिसेस बामणे यांना नामोहरम केल्याने त्या संध्याकाळी ते खुशीत होते. 'रेन्बो चायनीज कॉर्नर'मध्ये बामणेबाईंना आवरण्याच्या क्लृप्तीचं रसग्रहण करताना 'हे तर काहीच नाही', 'पुढची गोष्ट वेगळी आहे' या आपल्या खास वाक्यांची पेरणी त्यांनी भरपूर वेळा केली. मग आपल्या खिशात टाइमबॉम्ब असल्याचं जाहीर करत 'व्हर्जिन' अवस्थेत मरण्याची भीती आम्हां सगळ्यांना घातली.

जगात कुठेही ऐकिवात नसलेल्या कुठल्याही गोष्टी बिनबोभाट करू शकणाऱ्या नेमाडेकाकांनी खरोखरीच टाइमबॉम्ब आणला तर काय; या भीतीने, सगळे सॉसेस्‌ टाकून भरपूर आंबट केलेले सूप पिताना अनेकांची तंतरली. सुदैवाने नेमाडेकाकांनी कुठलाही स्फोटक पदार्थ बाहेर काढला नाही. त्यांनी आपल्या खिशातून डॉलीची हरवलेली ब्रा काढली. डॉलीच्या हृदयाच्या जवळ असल्याचा अनुभव देणारी वस्तू नेमाडेकाकांच्या हाती पाहून सर्व पोरं सूप प्यायचं विसरली. प्रत्येकाला एक दिवस ती ब्रा घरी घेऊन जाण्याची परवानगी नेमाडेकाकांनी दिली, तेव्हा पोरांनी त्यांना 'सर' नेमाडे हा किताब देऊन टाकला. डॉलीची ब्रा मिळवण्यासाठी केलेल्या साहसकथेची देमारपटाला लाजवेल अशी खोटी कहाणी नेमाडेकाकांनी (ब्रा हरवताना प्रत्यक्ष पाहणाऱ्या साक्षीदारासमोर) रंगवून रंगवून सांगितली, तेव्हा मला पहिल्यांदा त्यांचा राग आला. डॉलीच्या हरवलेल्या ब्रामुळे मी सांगणार असलेल्या तुकाराम कुत्र्याच्या नव्या किश्श्यातली हवाच नेमाडेकाकांनी काढून टाकली. डॉलीची ब्रा हस्तगत करण्याच्या मला जराही माहिती नसलेल्या भलत्याच किश्श्याचे नायक ते बनले; अन् या किश्श्यात मी कुठेच नव्हतो.

नेमाडेकाकांविषयी सांगताना कुठूनही सुरुवात केली, तरी ती त्यांच्यासारख्या भारदस्त व्यक्तिमत्त्वाचं कणभरही यथार्थ दर्शन घडवू शकणार नाही. कुठल्याशा इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापकी करत असलेले नेमाडेकाका आपल्या विषयासोबत सर्वच क्षेत्रांत मास्टर आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांतल्या साहित्याचा फडशा पाडणारे नेमाडेकाका वादात कुणालाही नागडं करतात.

आळीतला पत्रकार अनिरुद्ध देशपांडे त्यांच्या समोरही उभा राहत नाही. त्याच्या पेपरमधल्या चुकांचा, व्याकरणदोषांचा पाढाच नेमाडेकाका वाचून दाखवतात आणि त्याला 'करंट अफेअर'मधले नाही-नाही ते प्रश्न विचारून बेजार करतात. त्यांच्या वयाची लोक जुनी गाणी ऐकणं पसंत करत असताना; नेमाडेकाका मात्र रेहमान, अमित त्रिवेदी, हिमेश रेशमिया आणि योयो हनीसिंग यांची गाणी हुबेहूब म्हणतात.

मागे ते दलेर मेहंदीची गाणी हुबेहूब म्हणत. 'हो गई तेरी बल्ले, बल्ले' किंवा 'तुनक तुनक तून, तुनक तुनक तून तानाना' ही गाणी आळीतल्या सांस्कृतिक कार्यक्रमात गाऊन आणि त्यावर नाचून त्यांनी तरुणांना लाजवलं होतं. त्यानंतर मशरूमसारख्या उगवणाऱ्या पॉपस्टार्सची, गझलकारांची आणि सूफी गायकांची फेज त्यांनी आळीमध्ये लोकप्रिय केली. अलताफ राजापासून ते कैलाश खेरपर्यंत अनेकांच्या गाण्यांचा अर्थ समजावून घेत, सूप पीत आम्ही ती गाणी ऐकली आहेत.

त्यांच्यासोबत नाक्यावर उभ्या राहणाऱ्या मुलांची तिसरी पिढी आली, तरी नेमाडेकाकांचं नाक्यावर उभं राहण्याचं वय मावळलं नाही. घट्ट जीन्स घातलेल्या मुलींच्या पाठीमागे तयार होणाऱ्या 'गालगुंडा'ची चर्चा ते या पिढीच्या मुलांहून अतिवाह्यात भाषेत करतात. अश्लील गाण्यांचा त्यांच्याकडे असलेला स्टॉक कधीच संपत नाही. लहान मुलांची सगळी गाणी ते अश्लील करू शकतात. पंचतंत्रातल्या सगळ्या कथा ते 'अश्लील फॉर्मॅट'मध्ये कन्व्हर्ट करू शकतात. त्यांच्या घराजवळून कधी तुम्ही सकाळी गेलात, तर माउथऑर्गनच्या सुरावटींनी तुमचं लक्ष्य विचलित होईल. सुपरबोअर राजेश खन्नाच्या 'मेरे सपनोंकी रानी' या गाण्याचे स्वर माऊथऑर्गनवर 20 मिनिटं ऐकायला मिळतील. पहिल्यांदा ऐकणाऱ्या नव्या माणसालाच त्यांच्या या सुरावटींची कदर असते, कारण गेली कित्येक वर्षं नेमाडेकाका नित्यनेमाने एकच गाणं वाजवत असल्याने (किंवा त्यांना माउथऑर्गनवर दुसरं गाणं येत नसल्याने) आळीतल्या लोकांच्या लेखी कर्कश माउथऑर्गनवर 20 मिनिटं एकच एक धून ऐकून नेमाडेकाकांची संगीतसाधना कंटाळवाणी बनली आहे. तरी न चुकता सकाळी 9 ते 9:20 या काळात कुठल्याश्या 'सपनों की रानी'ला आळवून आळवून नेमाडेकाका, या गाण्याविषयी आळीतल्या लोकांचा तिरस्कार उत्तरोत्तर वाढवत नेत असतात. नेमाडेकाका म्हणजे समांतर हिंदी, इंग्रजी आणि मराठी साहित्याचा चालता-बोलता एनसायक्लोपीडियादेखील आहेत. पण त्याची कुणालाच कदर नाही. कारण एकटा अनिरुद्ध देशपांडे सोडला, तर आळीत साहित्य वाचणारे लोक हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेही राहिलेले नाहीत. जे सापडतात, त्यांची मजल अबर-चबर बेस्टसेलर वाचनापलीकडे नाही. नेमाडेकाकांकडे मात्र अर्धा डझन हिंदी, त्याहून थोडी कमी मराठी आणि बरीचशी इंग्रजी साप्ताहिकं, मासिकं येतात. अन् ती सगळी ते खरोखर वाचतात.

दारू पिऊन तर्र झाले की मग ते साऱ्या आळीपुढे मनोजकुमारसारखा तोंडावर हात ठेवत, आपल्या चिरतरुण दु:खाची दास्तान कर्णकर्कश आवाजात सुनावतात. कुठल्याश्या एका पिक्चरमध्ये अमिताभ बच्चनने पिऊन म्हटलेल्या डायलॉगबाजीसारखी मग त्यांची भली मोठी भाषणबाजी होते. चाळीतले ते खरोखरचे बिग बी असले, तरी कदाचित प्यायल्यानंतरच त्यांना आपण बच्चन किंवा स्टार असल्याची जाणीव होते.

"खरं तर मी लेखकच झालो असतो, पण एकाच आडनावाच्या दोन माणसांना साहित्यात चमकलेलं कधी पाहिलं आहे काय, हाय?"

"सांगा - शेक्सपिअर, टॉलस्टॉय आडनावाचा दुसरा लेखक; मारख्वेज आडनावाचा दुसरा लेखक; डिकन्स, सालिंजर,पिंचन, मॉम आडनावाचा दुसरा लेखक; मराठीत खांडेकर, फडके, कुरुंदकर, खानोलकर, पेंडसे, तेंडुलकर, दळवी आडनावाचा तितकीच लोकप्रियता मिळविलेला लेखक कुणी हाय? अरे, शेकडो कथा लिहिल्यात मी या हाताने. पण कोणाला त्याची काय हाय? कथा फालतू असतात काय? आता कादंबऱ्याच लिहायच्यात मला. पण त्या नेमाडेंनी माझी ठासून मारली, आता त्याचं कुणी वाकडं करू शकत नाही. मी कितीपण उड्या मारल्या, कितीपण कथा-कविता-कादंबऱ्या लिहिल्या, तरी त्यांना शष्प वाचक मिळणार नाही."

नेमाडेकाका काय बरळतायत, याबाबत आख्खी आळी अनभिज्ञ असते. झाट्यांना संस्कृतात 'शष्प' म्हणतात, हे आम्हांला त्यांच्या या भाषणामुळे कळलं. आमच्या दहावीतल्या हिंदी-संस्कृत संयुक्त अभ्यासक्रमातून हे ज्ञान होणं अशक्यच. पण ते प्यायल्यावर काय बरळतात, याची आम्हांला अनिरुद्ध देशपांडेमुळे अंधुकशी कल्पना होती.

नेमाडे आडनावाच्याच कुणा एका लेखकाने मराठीत कधीतरी फार पूर्वी एक कादंबरी लिहिली होती. ती कादंबरी आणि ते नाव इतकं मोठं झालं, की आता आमच्या नेमाडेकाकांनी कितीही भन्नाट कादंबरी लिहिली, तरी म्हणे त्यांचं नाव होणार नव्हतं. नेमाडेकाकांना लिहिताना कुणी पाहिलेलं नाही. पण त्यांच्यातला हरहुन्नरीपणा पराकोटीचा असूनही ते लिहिण्याच्या या अजब अडचणीमुळे दु:खी आहेत, हे खरं मानायला कुणी तयार नाही. कारण सगळ्या गुण-अवगुणांच्या साठ्यात नेमाडेकाकांचं आणखी एक जबर वैशिष्ट्य म्हणजे ते आळीतल्या तिसऱ्या क्रमांकाचे पॉर्नभक्त आहेत, अन् त्यामुळेच कदाचित चिरतरुण आहेत.

मागे त्यांनी मला एकदा लाजेच्या समुद्रात नेऊन बुडवलं होतं. जुन्या, आता कालबाह्य झालेल्या व्हिडिओ कॅसेट्स (व्हीएचएस) सीडी-डीव्हीडीवर कन्व्हर्ट करता येऊ शकतील काय, असं नाक्यावर त्यांनी मला विचारलं. 'चॉईस सेंटर' या सीडी-डीव्हीडी दुकानाचा मालक माझा मित्र असल्याने, मी त्यांना संध्याकाळी माझ्यासोबत यायला सांगितलं. त्यांच्या बॅगेत व्हीएचएस भरून ते माझ्यासोबत दुकानात आले. मला वाटलं, त्यांच्या साखरपुड्याच्या, लग्नाच्या किंवा मुलीच्या बारशाच्या किंवा कौटुंबिक समारंभाच्या व्हिडिओ कॅसेट्स त्यांना कन्व्हर्ट करून घ्यायच्या असतील. आता व्हीसीआर फारसे रिपेअर करून मिळत नसल्याने त्यांना तो सगळा व्हीएचएसमधला डाटा कन्व्हर्ट करायचा असेल. पण 'चॉईस' दुकानात भर गर्दीत असताना, नेमाडेकाकांनी व्हीएचएसची बॅग उघडली. पहिलीच कॅसेट 'ब्रेस्ट स्ट्रोक' या नावाची आणि स्फोटक पोस्टर डकवलेली निघाली.

"माझ्या तरुणपणातला पॉर्नसाठा आहे हा."

दुकानमालकाने त्यांचं वाक्य संपण्यापूर्वीच सगळी बॅग आतमध्ये घेतली आणि 'कुणालापण घेऊन येतो' अशा नजरेने माझ्याकडे पाहिलं. नेमाडेकाकांनी दुप्पट पैसे खर्च करून सगळ्या कॅसेट्सच्या दोन-दोन प्रती बनवल्या. एक पिनाकसाठी आणि एक त्यांच्यासाठी. त्यांनी त्या सीडीजचं नाक्यावरच्या सर्व पोरांना साग्रसंगीत दर्शनही घडवलं. कॅमेरे, अँगल यांच्या दृष्टीने अगदीच गरीब असलेलं ते चित्रण, अंगावर केसांचे जंगल असलेले पॉर्न अभिनेते-अभिनेत्री, हे पाहून सगळ्यांना मळमळायला लागलं. त्यातल्या एका पॉर्नस्टार अभिनेत्रीला तर चक्क मिशीदेखील होती. पिनाकने या काळातल्या पॉर्नस्टार्सची नावेही अचूक ओळखून दाखवली. वर 'या सगळ्या क्लिप्स मोफत डाऊनलोड करून दिल्या असत्या', असं सांगून त्यांच्या कर्न्व्हजनमागे झालेल्या प्रचंड खर्चाबद्दल सांगून नेमाडेकाकांचा आनंद घालवला.

एका विशिष्ट काळानंतर पॉर्नोग्राफी पाहायची इच्छा मरते, असं म्हटलं जातं. नेमाडेकाकांकडे पाहिलं, तर हे विधान किती खोटं आहे, ते कळतं. पॉर्नोग्राफीबाबत त्यांची मतं प्रचंड ठाम आहेत. 'पॉर्न का पाहायचं, तर शरीराची निगा आणि स्वच्छता कशी ठेवावी याचा आदर्श वस्तुपाठ पॉर्नस्टार्स देतात.' वास्तव जीवनात स्वच्छतेशी कदाचित दुरान्वयानेही संबंध न आल्याने त्यांची मतं अशी बनलेली असावीत. पिनाक कुरकुरे या आळीतल्या नंबर एक पॉर्नभक्ताशी त्यांचं पूर्वी खूप जमायचं. पण नेमाडे पिनाकला आपला जावई बनवून घेणार, अशी खोटी बातमी कुणीतरी पिनाकपर्यंत पोहोचवली; तेव्हापासून आधीच नाक्यापासून लांब गेलेला पिनाक, नेमाडेकाकांपासून दूर राहू लागला.

स्वत:ला तरणी मुलगी असूनही नेमाडे इतरांच्या मुलींचा शरीरविकास त्या आठवी-नववीत गेल्यापासून मोजायला सुरू करतात. नाक्यावर त्यांच्या किश्श्यांचा तास सुरू झाला की अश्लील शब्दांची भली-मोठी पोतडीच ते बाहेर काढतात. तुम्ही 'चॉकलेटचा बंगला' हे लहान मुलांचे ऑलटाइम फेवरीट गाणं ऐकलं असेल, तर त्याची 'नेमाडे व्हर्जन' पूर्णपणे अठरा वर्षांच्या वरच्या मुलांसाठी आहे. हे गाणं ते अनेकदा जाहीरपणे गुणगुणतात. सतीश तांबे या नावाच्या कुठल्यातरी लेखकाच्या (नेमाडेकाकांनीच जबरदस्ती वाचायला लावलेल्या) एका कथेत मी वाचलं होतं, त्याप्रमाणे इथे ते सोयीसाठी आक्षेपार्ह शब्दांची अदलाबदल करून लिहिलं आहे. नेमाडेकाका मात्र कुणाची काडीचीही लाज न बाळगता मोठ्या आवाजात, शब्द न बदलता हे गाणं जोरात म्हणतात.

(चाल : चॉकलेटचा बंगला)

गुलाबी लाल च्यांबोचा बंगला
सगळ्यांना आवडतो पाहायला चांगला (2)
च्यांबोच्या बंगल्याला लांबॉचे दार
पॉम पॉम दाबून झाले बेजार (2)
गुलाबी लाल...

च्यांबोच्या बंगल्याला चिपूची खिडकी
दोच्यून दोच्यून झाली तिरकी (2)

या गाण्याशिवाय ससा आणि कासवाच्या शर्यतीची आजच्या काळातली गोष्ट नाक्यावर सगळ्यांना पाठच आहे. ही गोष्ट ते लहान मुलांना सांगावी अशा पद्धतीने आम्हांला सांगतात.

"एकदा काय झालं, ससा आणि कासवाची म्हणे डोंगर चढायची शर्यत लागली. ससा धावत डोंगराच्या टोकावर चढून जाणार हे कुणीही शेंबडा पोरगा सांगू शकतो. पण ससा होता मादरचोद. आरामात मजा करत गेलो, तरी शाटू कासव आपल्याला हरवू शकत नाही, याची त्याला खात्री होती. दोघांची शर्यत सुरू झाली. प्रामाणिक, कष्टकरी आणि मेहनती कासव न थांबता चढण्याची कसरत करीत राहिलं. असे महिनेच्या महिने निघून गेले आणि कासवराव डोंगराच्या टोकावर यशस्वीरीत्या पोहोचले. तिथे आपण सशाच्या आधीच पोहोचलो या आनंदात नाचू लागले. ओरडू-गाऊ लागले. थोड्या वेळाने ससा तिथे हजर झाला, तेव्हा त्याला जीभ काढून चिडवून दाखवू लागले. 'मी जिंकलो, मी जिंकलो' करत चेहरा वाकडा-तिकडा करून दाखवू लागले."

"सशाने त्यांना थांबवलं आणि 'तुम्ही शर्यत हरला आहात' असं सांगितलं. आश्चर्यचकित झालेल्या कासवरावांनी विचारलं,

'कसं?'

'तुम्ही माझ्या आजोबांसोबत शर्यत लावली होती.'

सशाने हे सांगताच कासवरावांचं जिंकल्याच्या गर्वाने भरलेलं घर पूर्णपणे रिकामे झालं.

तात्पर्य : प्रामाणिकपणा, सचोटी आणि मेहनत करून डोंगराचं टोक गाठता येतं; पण त्यात इतर अनेक गोष्टी चढायच्या राहून जातात."

दररोजच अशा प्रकारच्या एकापेक्षा एक विचित्र गोष्टी सांगून नेमाडेकाकांनी आमचा नाका किस्सेसमृद्ध बनवला.

नेमाडेकाका काय वाचतात किंवा त्यांनी कथा-कादंबरी की काय ती लिहिली असती तर ते लोकप्रिय झाले असते की नसते, याच्याशी आम्हांला काही देणं-घेणं नसलं; तरी नेमाडेकाका आमचे खरे हीरो आहेत. त्यांनी वापरलेल्या आकर्षक वाक्यांचं अनुकरण करून पोरं इतरांवर (म्हणजे अर्थातच आळीबाहेरच्या देखणेबल मुलीवर) इम्प्रेशन पाडतात. पिनाक कुरकुरेने मागे मला त्याचं एक सिक्रेट सांगितलं होतं. त्याने म्हणे एक मराठी ब्लॉग लिहायला सुरुवात केली आहे. त्यातल्या सगळ्याच गोष्टी चावट होत्या आणि माझ्या आठवणीप्रमाणे काही नेमाडेकाकांनी सांगितलेल्या किश्श्यांनी वाढवलेल्या होत्या.

अश्लील, दोन अर्थांच्या, भाषेत बोलण्यात नेमाडेकाकांच्या तोडीचं कुणीच आजवर पाहायला मिळालेलं नाही. देवाने त्यांना सगळंच भलं-बुरं भरभरून दिलं असलं, तरी त्यांचे स्पेशल वीक पॉइंट्स आम्हांला पाठ आहेत. त्यांना भारतीय वर्णाच्या पॉर्नस्टार्स अजिबात आवडत नाहीत. सनी लिओनी, प्रिया राय किंवा अलीकडेच लोकप्रिय झालेल्या लायला रोझ नामक पॉर्नस्टारला पाहिल्या पाहिल्या ओकारीच येते, असं ते कबूल करतात. त्यांना गोऱ्या, उंच आणि खास करून ब्रिटिश पॉर्नस्टार्स आवडतात. पिनाकसोबत संबंध चांगले असताना त्यांनी पेज टर्नाह या ब्रिटिश पॉर्नस्टारचे सगळे व्हिडिओ एक्स्टर्नल हार्ड डिस्कवर उतरवून घेतले आहेत. त्याशिवाय सोफी डी, तान्या टेट, टेलर वेन या पॉर्नस्टार्सचे व्हिडिओ इंटरनेटवरून डाऊनलोड करून मिळवले आहेत. दररोज त्यांपैकी कुठल्यातरी एका पॉर्न-क्लिपचं रसग्रहण ते करतात. तब्बल अर्ध्या तासाहून अधिक काळ ते अश्लील वर्णन रंगत जातं. पोरांना मग ती पॉर्न-क्लिप पाहायची गरज उरत नाही, अशा सचित्र वर्णनांनी ते 'हे तर काहीच नाही, पुढची गोष्ट वेगळी आहे'च्या नादात बीपी कथापाठ सांगतात.

'रेन्बो चायनीज कॉर्नर'मध्ये सूप पिताना नेमाडेकाकांनी डॉलीची सापडलेली ब्रा सगळ्यांना देण्याचं कबूल केलं खरं, पण त्यातल्या पहिल्या ब्रा-उपभोक्त्याचा नंबर महिन्यानंतर लागणार होता. म्हणजे नेमाडेकाका एक महिना डॉलीच्या ब्रावर अत्याचार करणार होते. मला डॉलीच्या नजरेत माझी छबी चांगली करण्यासाठी ती ब्रा नेमाडेकाकांनी नासण्याआधी तिला परत नेऊन द्यायची होती. तिचा माझ्यावर अचानक तयार झालेला राग उतरवायचा होता, आणि तिच्याशी जमल्यास मैत्रीही करायची होती. नेमाडेकाकांकडून डॉलीची ब्रा सहीसलामत सोडवण्यासाठी कोणतीतरी क्लृप्ती लढवावी लागणार होती, अन् त्याच्याच मागे मी लगेच लागलो.

डॉलीची ब्रा हरवली आणि नेमाडेकाकांकडे सापडली, त्याच दिवसापासून तुकाराम कुत्रा गायब झाला होता. त्याला डॉलीच्या ब्राचा कॅच घेण्यासाठी सावरून तयार अवस्थेत शेवटचा पाहणारा बहुदा मीच होतो. त्याच्या आधीच्या एकूणच प्रतापांवरून त्याला डॉलीची ब्रा मिळाली नाही. हे त्याचं पहिलं अपयशदेखील पाहणाराही बहुतेक आळीतला मी एकमेव होतो. तुकारामच्या ताब्यातून नेमाडेकाकाच काय, कुणीच कुठली वस्तू घेऊ शकत नाही. त्यामुळे ब्रा नेमाडेकाकांच्या ताब्यात कशी आणि कधी गेली, याचं कोडं न सुटणारं आहे. खुद्द नेमाडेकाका सांगत असलेल्या किश्श्यात जसा मी कुठेच नाही, तसाच तुकाराम कुत्राही कुठेच नाही. याचा अर्थ नेमाडेकाकांकडून ब्रा मिळवण्याच्या स्पर्धेत झालेला पराभव न पचवता आल्याने तुकाराम आळी सोडून गेला की काय? त्याचं अपहरण तरी कोण करणार?

मिसेस बामणे सोडून तुकाराम कुत्र्याला हात लावण्याचीही कुणाची हिंमत नाही, अन् तो कुणाला हात लावूनही देत नाही. कदाचित मिसेस बामणेंना अपहरणकर्त्याचा फोन आला असणार? किंवा त्याला पालिकेच्या कुत्रा पकडणाऱ्या पथकाने उचललं असणार. पण त्या पथकानेही तुकारामची धास्ती घ्यावी, अशा प्रकारे मिसेस बामणे यांनी अनेकदा शिव्या देऊन त्यांची उतरवून ठेवली होती. त्या पथकाने आठवड्याभरात पकडलेल्या सर्व कुत्र्यांना, मिसेस बामणे यांच्या घरी 'वन टू वन' ओळख परेडसाठी आणलं होतं; तरी त्यात तुकारामसदृश कुणी नव्हता.

मिस्टर बामणे आणि नेमाडेकाका एकत्रितरीत्या मिसेस बामणेंचे सांत्वन करत असले, तरी त्यातून काही निष्पन्न झालं नव्हतं. या कुत्र्याच्या हरवण्यामुळे नेमाडेकाकांचा बराचसा वेळ बाहेरच जात होता. डॉलीची ब्रा त्यामुळे त्यांच्या बॅगमध्ये सुरक्षितरीत्या राहिली होती. मिसेस बामणेंच्या लाडक्या कुत्र्याला शोधण्यात त्यांना त्या ब्राचा आस्वादही घेता आला नव्हता.

नेमाडेकाकांकडून डॉलीची ब्रा हस्तगत करण्यासाठी मला एक आयडिया सुचली. ज्या पॉर्नस्टार्स नेमाडेकाकांना आवडतात, त्यांच्याहून अधिक उत्तम पॉर्नचा साठा त्यांना नेऊन द्यायचा. त्यासाठी पिनाक आणि विन्या यांची मदत घ्यायची. पॉर्नभक्तीमध्ये पहिला क्रमांक पिनाकचा, तर दुसरा क्रमांक खांडेकरांच्या विन्याचा लागतो. त्यांच्यानंतर नेमाडेकाकांचा क्रमांक. हल्लीच विन्याने म्हणे एक नवीन कौशल्य हस्तगत केलं होतं. जगात एका चेहऱ्यासारख्याच हुबेहूब चेहरा असणाऱ्या म्हणे दोन-तीन व्यक्ती असतात. मात्र त्या सामान्य असल्याने आणि जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांत विखुरलेल्या असल्याने कधीच एकमेकांच्या समोर येऊ शकत नाहीत. आमच्या आळीत हातगाडीवरून कांदे घेऊन येणाऱ्या एका तरुणाचा चेहरा थेट पॉप गायक रिकी मार्टिनसारखा आहे. आळीत घरकाम करणाऱ्या कस्तुरी नावाच्या एका तरुणीचा चेहरा केट विन्स्लेटसारखा आहे. आता या दोघांना प्रत्यक्षात विचाराल, तर केट विन्स्लेट आणि रिकी मार्टिन नावाच्या कुणी व्यक्ती आहेत, हेदेखील त्यांना माहिती नसेल. पिनाकच्या डोळ्यांनी इतकं पॉर्न पचवलं आहे, की त्याला पॉर्नस्टार्स नावाने माहिती आहेत. पण विन्याने पिनाकच्या पुढे जाऊन असा दावा केला की तुम्ही कुठलीही बाई दाखवा, तिच्याशी समांतर चेहरेपट्टी असलेली पॉर्नस्टार मी दाखवून देऊ शकतो. हे पटवून देण्यासाठी त्याने हिंदी-मराठी चित्रपटांतल्या कित्येक टॉप अभिनेत्रींसारख्या चेहरेपट्टीच्या तरुणी आम्हांला दाखवल्या. माजी विश्वसुंदरी ते आळीतली कुठलीही पोरगी यांना समांतर चेहरेपट्टी असलेली पॉर्नस्टार तो एका फटक्यात शोधून दाखवू शकतो, इतका त्याचा पॉर्नाभ्यास तगडा बनला आहे. त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले, तर त्याच्या जवळ कुणी मुलगी उभी राहणार नाही, असं वाटतं. पण साल्याकडे काहीतरी जादू आहे, त्यामुळे सुंदर आणि भरलेल्या मुली त्याच्यासोबत अनेकदा पाहायला मिळतात. मी त्याच्याकडे गेलो तेव्हा तो त्याच्या बेडरुममध्ये कडी लावून बीपीच बघत होता.

"मला नेमाडेकाकांना गिफ्ट द्यायला नवा स्टॉक हवा आहे."

"त्यांचा काय बर्थडे आहे काय?"

"तुला डॉली गालासारख्या चेहरेपट्टीची पॉर्नस्टार काढून दाखवता येईल?"

"नेमाडेकाकांना डॉली गाला नको देऊ. मिसेस बामणेंसारखी सेम पॉर्नस्टार मला सापडलीय. ती त्यांना आवडेल."

"काय नाव आहे त्या पॉर्नस्टारचं?"

"रेजिना रेझ्झी आणि ऍलिसन टेलर. दोन्ही टेरर आहेत. आपल्या मिसेस बामणेंनाही मागे टाकणाऱ्या. एकदा पाहिलं तर नेमाडेकाका वेडेच होतील."

"त्या ब्रिटिश आहेत?"

"कोणाला माहिती! पिनाकला विचार. मी काही त्यांचा देश पाहत नाही."

त्याने दाखवलेल्या पॉर्न क्लिप्स पाहून माझेही डोळे ३६० अंशांत फिरू लागले. मिसेस बामणेंशी कितीतरी चेहरासाम्य असलेल्या या पॉर्नस्टार्सच्या सगळ्या उपलब्ध क्लिप्स पिनाककडून हार्डडिस्कमध्ये भरून घेता येणार होत्या. पण या मधल्या दोन-तीन दिवसांच्या काळात मी मिसेस बामणेसदृश पॉर्नस्टारच्या प्रेमातच पडलो. ऍलिसन टेलरच्या ब्रा बदलण्याच्या एका सीनमध्ये मला डॉलीची आठवण झाली आणि तोवर ऍलिसन टेलरच्या शेकडो क्लिप्सनी भरलेली हार्ड डिस्क घेऊन मी नेमाडेकाकांचं घर गाठलं.

नेमाडेकाकांच्या घरी पोहोचलो, तेव्हा त्यांची 'सपनो की रानी'ची आरती माउथऑर्गनवर नुकतीच पूर्ण झाली होती. ते एका कापडाने माउथऑर्गन पुसत होते. त्यांच्या घरात नेहमीप्रमाणे शांत वातावरण होतं. खोलीत पुस्तकं आणि मासिकांचा ढीग लागलेला होता. माझ्या हातात हार्ड डिस्क पाहिल्यानंतर मी नवा स्टॉक आणल्याचं त्यांना समजलं आणि अफलातून आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकला.

"काय रे हर्षा, आज कोणता वार?"

"शनिवार."

"अंहं... आज पॉर्नवार."

मारुतीच्या आणि शनीच्या वाराला भलतीचं नावं देणारे सदाहरित नेमाडेकाका सकाळपासूनच फॉर्मात दिसत होते.

"तुला माहीत आहे हल्ली घराघरांत विकेंड कसा जातो?"

"म्हणजे?"

"म्हणजे शनिवारी लोकांचा पॉर्नवार सुरू होतो. शुक्रवारी रात्री १२ वाजल्यानंतर पॉर्न साईट्सच्या अवलोकनाचं सत्र सुरू होतं. मग रात्री उशीरात उशीरापर्यंत नवं पाहिलेलं, घरी प्रयोगशाळा असल्यास प्रत्यक्षात आणण्याचा असफल प्रयत्न."

"प्रयोगशाळा?"

"बायको... किंवा गर्लफ्रेण्ड... आता पर्याय काय कमी आहेत?"

"तर प्रयोगशाळेत असफल झाल्याचं दु:ख घेऊन शनिवारची सकाळ दुखऱ्या अवस्थेत लोळत घालवायची. मग शनिवारी दुपारचं जेवण झाल्यावर नव्या जोमाने प्रयोगशाळा पुन्हा उघडायची. प्रयत्न पुन्हा असफल होण्याची वाट पाहत कार्यमग्न व्हायचं. शनिवारची रात्र नव्या प्रयोगांचं अवलोकन करण्यासाठी पुन्हा सज्ज असतेच. मग शनिवारी रात्री पुन्हा दुखरेपणाचा कळस गाठायचा आणि रविवारची सकाळ अस्वस्थ-विस्तीर्ण सकाळ बनवून टाकायची. मटन किंवा चिकन घेताना, मुर्गी-बोकडाचे तुकडे केले जात असतानाही मग रात्रीच्या दुखऱ्या आठवणी राखून ठेवायच्या. दुपारचा तगडा मद्य-मांसाचा आहार जिरवत, पादत-पादत दुपार घालवायची. आता प्रयोगशाळेत जाण्यासाठी जीव शाबूत आहे का, ते कुरवाळून पाहत भली मोठी झोप काढायची. संध्याकाळी प्रयोगशाळेला घेऊन मॉलबिल घुमायचा आणि बाहेरच जेवून सुन्न डोक्याने पुढच्या आठवड्यात प्रयोगशाळा गाजवायचा चंग बांधायचा. आजच्या मध्यमवर्गाची ही सरिअल शोकांतिका आहे, नाही का?"

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किंमती घसरण्या-वाढण्यामुळे होणारी महागाई, कॉन्ट्रॅक्ट सिस्टिमने सीटूसी पगारातून कर्मचाऱ्यांची आयुष्यभरासाठी ठासली जाणं आणि ग्लोबलायझेशनमुळे जगण्यातलं आंतरराष्ट्रीयपण जपण्यासाठी होणारा अनावश्यक खर्च; ही मध्यमवर्गाची शोकांतिका आहे, असं दररोज पेपर वाचणाऱ्या मला वाटायचं. पण नेमाडेकाकांनी मला मध्यमवर्गीयांच्या भलत्याच रहस्यात भागीदार बनवलं.

"माझ्याकडे तुम्ही आजवर न पाहिलेला अफलातून स्टॉक आहे."

"तुझ्याकडे वाईट होता कधी? हे पॉर्न ऍडिक्शन ठीक आहे. सगळेच आता पॉर्न पाहतात. मुलीदेखील. माझी मुलगीदेखील गुपचूप पाहत असेल. मला पाहताना दिसली तरी मी काही आक्षेप घेणार नाही. पण पॉर्नमुळे लोक वाचाय-लिहायचे विसरलेत. कुठलाही छंद करायचे विसरलेत. या ऍडिक्शनमुळे लोक विचार करायचादेखील विसरलेत. एकदा तुम्ही रात्री पाहायला सुरू केले की पहाट कधी होते, ते कळत नाही. ड्रग्ज आणि दारूच्या व्यसनापेक्षा हे डेंजर आहे."

"तुम्ही कुठे विसरलात वाचायला आणि छंद करायला? उलट तुमच्याइतका वाचणारा आम्ही कुठेच पाहिला नाही. तो अनिरुद्ध देशपांडे तुमच्यासमोर यायलासुद्धा घाबरतो, कारण तुम्ही त्याला फाडून टाकता."

"मी अपवाद असेन. पण माझं पाहणं लिमिटमध्ये असतं."

"असं प्रत्येक पॉर्न ऍडिक्ट म्हणतो."

"तुझ्याकडे कोणता साठा आहे?"

"मिसेस बामणेंच्या दोन डुप्लिकेट."

"दाखव पाहू."

ऍलिसन टेलर पाहिल्यानंतर नेमाडेकाकाही विरघळून गेले.

"आयला, डिट्टो मिसेस बामणे!"

"आपले पॉर्नमित्र पूर्वीच्या सायंटिस्टांहून अधिक काम करतात. विजेपासून सगळेच शोध गेल्या शतकात सायंटिस्टांनी लावून टाकले. त्यामुळे या शतकात आता शोधायला काय कामच राहिलेलं नाही. तेव्हा हे पॉर्नप्रेमी त्यांच्याहून अधिक मेहनत करून असे नवनवे शोध लावत असतात."

"पिनाकची फाइंड आहे ही?"

"नाही. खांडेकरांच्या विन्याचा शोध."

"अभ्यास करायलाच हवा आज हिचा."

"मला या मोबदल्यात डॉलीची सापडलेली ब्रा हवीय."

डॉलीची ब्रा एका आठवड्याच्या बोलीवर नेमाडेकाकांकडून सोडवून घेतल्यानंतर मी सुपरमॅनच्या ताकदीच्या आनंदातच घरी आलो. ब्रा मिळाल्यास तातडीने डॉलीला नेऊन द्यायची असं माझं ठरलं होतं, पण ते सगळं अचानक मोडलं. उद्या किंवा परवापर्यंत मला त्या ब्राचं अवलोकन करता आलं असतं. शिवाय डॉलीच्या ब्रावर आळीतल्या मुलांकडून होणारा अत्याचार वाचवल्यामुळे सर्वात आधी त्या 'व्हर्जिन ब्रा'वर अत्याचार करण्याचा हक्क मी बजावू शकणार होतो.

पण मी घरी पोहोचलो, तेव्हा मिसेस बामणेंनी मिस्टर बामणेंना घराबाहेर काढून नव्या साउंड डेसिबल्सचा तमाशा सुरू केला होता. आळीतल्या दोन्ही सोसायट्यांच्या गॅलऱ्यांमध्ये मिसेस बामणे मिस्टर बामणेंना एका हाताने धरून झाडूने कशा मारतात, याचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी झाली होती.

समोरच्या गॅलरीमध्ये डॉली तिच्या मम्मीसोबत खिदळत असताना तिचं माझ्याकडे लक्ष गेलं आणि मी तिला चक्क हात करून खाली येण्याची खूण केली. ब्रा ताब्यात आल्यानंतरच्या ताकदीचा हा नमुना होता. एरव्ही तिला पाहून तंतरलेल्या अवस्थेत जाणारा मी कसल्याशा झिंगेत तिला हात करत होतो.

तिची मम्मी शेजारी नसती, तर बेधडकपणे तिने 'कानाखाली देईन'ची ऍक्शन केली असती. तिच्याकडे पाहून शिट्या वाजवणाऱ्या किंवा तिला खुणा करणाऱ्या अनेकांना तिने तशी ऍक्शन करून दाखवल्याचं मी पाहिलं आहे. मी तिला आजवर कधी खुणावलेलं नाही, पण तिचा एक्स-रे काढत असल्याची जाणीव तिला नक्कीच आहे. शिवाय तिला प्रपोज करण्याव्यतिरिक्त इतर मुलींशी गैरवर्तनाचा माझा रेकॉर्ड नसल्याने, मुलींमध्ये तसा मी बऱ्यापैकी निरुपद्रवी कॅटेगरीत मोडतो. कदाचित मी इतक्या बिनधास्तपणे खुणावलेले आवडून किंवा तिच्या मम्मीच्या संभाव्य तमाशाला टाळण्यासाठी तिने 'नंतर'च्या आशयाचं स्पष्टीकरण खुणेनेच दिलं.

तोवर मिस्टर बामणेंना मिळणारा झाडूचा मार जबरदस्त वाढला होता. 'म्हंजे बघा'च्या नादात मिस्टर बामणे यांनीच कुणाला तरी सोबत घेऊन तुकाराम कुत्र्याला पळवलं आणि दूर कुठेतरी सोडून दिलं, असं मिसेस बामणेंच्या ओरडण्यातून स्पष्ट होत होतं. पण मिस्टर बामणे त्या आपल्या साथीदाराचं नाव सांगत नव्हते, म्हणून मिसेस बामणेंनी त्यांना बाहेर काढून सार्वजनिक चोपाचा कार्यक्रम चालवला होता.

"सांगा कुणी पळवलं? सांगा कुणी उचललं? सांगा कुठे सोडलं माझ्या तुकारामाला?", मिस्टर बामणे यांना बोलू देण्याची संधीही न देता, त्या त्यांच्यावर झाडूने प्रहार करत होत्या. हा सगळा कार्यक्रम तब्बल अर्ध्या तासाहून अधिक काळ चालला, तेव्हा आळीतल्या कुणीतरी नेमाडेकाकांना पाचारण केलं. मिस्टर बामणेंची दया आली म्हणून कुणी हा प्रकार केला नव्हता. मिसेस बामणे यांचा लाउडस्पीकर आता सर्वांच्या कानठळ्या बसवू लागला होता. शिवाय मिसेस बामणेंच्या मर्यादित शिव्यांचा स्टॉक ऐकून पाहणाऱ्यांना कंटाळा आला होता. मिस्टर बामणे मार खात होते, शिवाय नॉनस्टॉप मारामुळे तोंडही उघडू शकत नव्हते.

नेमाडेकाका याही वेळी बुलफायटरच्याच आवेशात आले. आता काहीतरी वेगळं पाहायला मिळणार याची खात्री सर्व गॅलऱ्यांमधल्या प्रेक्षकांना झाली. मात्र नेमाडे दिसताच काही क्षणांसाठी मिसेस बामणे थांबल्याची संधी साधून मिस्टर बामणे ठो-ठो बोंबलू लागले.

"या नेमाडेचीच आयडिया होती. त्यानेच तुकारामला उचलून घोडबंदर रोडवर सोडलं." ही त्यांची रडत-रडत झालेली एका वाक्याची जबानी आळीतल्या काही क्षणांच्या स्तब्धतेत सर्वांना डॉल्बी साऊंडमध्ये ऐकू आली.

बुलपासून जीव वाचवण्यासाठी अखंड पळणाऱ्या बुलफायटरला कुणी पाहिले नसेल, पण नेमाडेकाकांच्या मागे त्यांना ठार करण्याच्याच आवेशात धावणाऱ्या मिसेस बामणेंना पाहून सगळे त्या दिवशी थक्क झाले.

दुसऱ्या दिवशी नेमाडेकाका 'रिस्क केअर हॉस्पिटल'मध्ये कोमामध्ये होते. डॉलीची भेट घेतल्यानंतर, आदली रात्रभर ओकून-ओकून माझा जीव जाण्याची वेळ आल्याने मलाही तिथेच दाखल करण्यात आलं होतं.

नेमाडेकाका कोमात गेले, त्याला मिसेस बामणे जबाबदार नव्हत्या. पण त्याचा तपशील नंतर सांगतो. आधी डॉली आणि माझ्या भेटीचा तपशील सांगणं महत्त्वाचं आहे. नेमाडेकाका दैत्याकारी रूपातल्या मिसेस बामणेंच्या भीतीने आळीतून पसार झाल्यानंतर सर्व गॅलऱ्यांमधली गर्दी पांगली. पाच-दहा मिनिटांपूर्वी सुरू असलेल्या मिसेस बामणेंच्या टारझनी गर्जनांनंतरची आळीतली शांतता, ही सर्वांना घाबरवून सोडणारी स्मशानशांतता बनली. प्रत्येक गॅलरीमध्ये पाच-दहा मिनिटांनंतर कुणीतरी बाहेर येऊन काही नवं घडण्याची वाट पाहत होतं. डॉली एकटीच जेव्हा तिच्या गच्चीत आली, तेव्हा मी पुन्हा तिला खुणेने पॅसेजमध्ये यायला सांगितलं, आणि तिने 'तातडीने ये' अशी खूण केली.

यापूर्वी तिला असं बोलावलं असतं तरी जमलं असतं. पण माझी हिंमत कधीच झाली नव्हती. व्हर्जिन अवस्थेतली तिची हरवलेली ब्रा, जवळजवळ त्याच अवस्थेत एका बॉक्समध्ये भरून मी तिला देणार होतो. लहान गोंडस मूल असल्यासारखे ब्राचे जमतील तितके पापे घेऊन तिला एका गिफ्टपॅकमध्ये भरली. माझ्या पाप्यांचं पाप उघडं पडत नाही ना, याची तपासणी करायलाही मी विसरलो नाही.

डॉलीला ब्रा परत करून, तशीच दुसरी ब्रा विकत घेऊन मी ती नेमाडेकाकांना देणार होतो. डॉलीला तिची ब्रा मिळाल्यानंतर, मी तिला काहीतरी अवघड कहाणी सांगून तुकारामच्या तावडीतून ब्राची कशी सुटका केली हे सांगणार होतो. अर्थातच तिच्याशी मैत्री वाढवून पुढे-मागे तिला 'प्रपोज पार्ट टू'ही करण्याचा विचार होताच. एकूण या ब्रामुळे डॉलीशी संवाद साधणं मला शक्य होणार होतं. मी चित्रपटातल्या समोरासमोर राहणाऱ्या प्रेमींची 'एक दुजे के लिए' छापाची गाणी गुणगुणत, तरंगतच लिफ्टमधून खाली आलो होतो.

डॉली तिच्या सुपरमॅन भावासोबत खाली दाखल झाली होती. कपाळावर आठ्या असलेल्या अवस्थेत तिने माझ्याकडचा बॉक्स हातात घेतला. तुकाराम कुत्र्याच्या तावडीतून मी काय वाचवून आणलं आहे, याचा मी लाजत लाजत पाढा वाचला.

पुढच्या क्षणी त्या संध्याकाळच्या बऱ्यापैकी प्रकाशातही माझ्या डोळ्यांसमोर तारे चमकले. डॉलीने 'ये मेरीवाली नही है', असं सांगत पुन्हा साग्रसंगीत कॉन्ह्वेंटी शिव्या सुरू केल्या. सोबत माझ्या कानाखाली जोरकस प्रहार झाला. त्याने माझ्या मनाची सुचायची दारं काही क्षणांसाठी बंद झाली.

नेमाडेकाकांनी केलेल्या महादगाबाजीने माझा राग टोकाच्या अवस्थेत गेला; पण तासाभरापूर्वी चुंबनं घेतलेली ब्रा, नेमाडेंची ओंगळवाणी मुलगी नक्षी नेमाडे हिची असल्याच्या शक्यतेची किळस माझ्या संपूर्ण शरीरात पसरली. गिफ्टबॉक्समध्ये विसावलेल्या त्या पांढरट गुलाबी चिंधीकडे पाहतानाच माझ्या शरीरात जमा झालेलं पित्त बाहेर यायला सुरुवात झाली होती. माझी शुद्ध हरपू लागली, तेव्हाही ते थांबायचं नाव घेत नव्हतं.

दुसऱ्या दिवशी रिस्क केअर हॉस्पिटलमध्ये आळीतल्या सगळ्या तरुण पोरांची गर्दी जमली होती. नेमाडेंना आणि मलाही पाहायला सगळे जण घाऊकमध्ये आले होते. नेमाडेंना गंभीरपणे पाहून झाल्यानंतर, ते माझ्या स्थितीकडे पाहत हसत होते.

'मी डॉलीला काहीतरी गिफ्ट देत होतो आणि डॉलीने माझ्या कानाखाली मारली. डॉलीची थप्पड इतकी मोठी होती की मला हॉस्पिटलमध्येच दाखल करावे लागले.', ही कुणीतरी रचलेली कपोलकल्पित कहाणी अख्ख्या आळीत लोकप्रिय झाली होती. डॉलीला मी गिफ्ट काय देत होतो, याचा बभ्रा सगळीकडे व्यवस्थित झाला होता. आता पुढचे काही दिवस नाक्यावर तोंड दाखवायची स्थिती राहिली नव्हती.

नेमाडेकाकांना इथे आणलं गेल्याची कहाणी मात्र वेगळीच होती. अनिरुद्ध देशपांडे आणि इतर कुणी कुणी तुकड्यांमध्ये जोडत ती पूर्ण केली होती. नेमाडेकाका आदल्या दिवशी संध्याकाळी निवांतपणे त्यांच्या बेडरूममध्ये स्वत:ला कोंडून, लॅपटॉपवर मी त्यांना दिलेली ऍलिसन टेलर आणि रेजिना रिझ्झीची बीपी पाहत होते. त्या वेळी मिस्टर बामणे यांना वाचवण्यासाठी, त्यांना घेऊन जायला कुणीतरी त्यांच्या घरी दाखल झालं. नाखुशीनेच बीपी पाहण्याचं टाळून, नेमाडेकाका आळीच्या पॅसेजमध्ये आले. तिथे मिस्टर बामणे यांनी तुकाराम अपहरणाचा कट उघड केल्यानंतर, म्हशीसारख्या आवेशात मागे धावत येणाऱ्या मिसेस बामणेंना पाहून नेमाडेंनी जी धूम ठोकली, ती पुन्हा धडधाकट अवस्थेत आळीत न परतण्यासाठीच.

धावत गेलेल्या मिसेस बामणे हताशपणे हापत हापत परतल्या; कारण नेमाडेकाका दोन गल्ल्यांनंतर कुठे गायब झाले, ते त्यांना जराही दिसले नाही.

नेमाडेकाका पुढच्या आळीतल्या 'श्रीराम हेअर ड्रेसर्स'मध्ये लपून राहिले होते. एम.ए. मराठी असलेला 'श्रीराम हेअर ड्रेसर्स'चा मालक राम हा नेमाडेंचा खास साहित्यमित्र. नेमाडेंची दाढी किमान दोन तासांत होते आणि केस कापायला कितीही वेळ लागू शकतो, कारण अशा साहित्यचर्चा नेमाडेकाकांना हक्काने तिथेच करायला मिळतात.

मराठी साहित्यातली परंपरा, खांडेकर-फडके वाद, जी.ए. कुलकर्णी नावाचं मराठी साहित्याला पडलेलं स्वप्न, साठोत्तरी कथेची बंडखोरी, खानोलकर, व.पु., पु.ल. आणि आजच्या लेखनातलं दम नसलेपण अशा अनंत विषयांवर, तिथे उपस्थित असलेल्या इतर ग्राहकांना शष्पही न कळणाऱ्या चर्चा झडतात.

तर काका तिथे चर्चा करायला त्या दिवशी गेले नव्हते; मिसेस बामणेंपासून लपायला ते तिथे पोहोचले होते. तेव्हा आपल्या ए.सी. सलूनमध्ये रामने लावलेल्या, तमाम मराठी भूषणं बाळगणाऱ्या मराठी वृत्तवाहिन्यांवर जी बातमी लागली होती, ती पाहून आणि ऐकून नेमाडेकाका मनातून तुटून गेले. नेमाडेकाकांनी ज्या व्यक्तीचा आयुष्यभर तिरस्कार केला, ज्याच्यामुळे त्यांना लेखक बनता आले नव्हते, त्या कुणा नेमाडे नावाच्या लेखकाला कसलातरी मोठा पुरस्कार मिळाला होता. सगळ्या पेपरांमध्ये त्या नेमाडेकाकांच्या शत्रूचा फोटो पहिल्या पानावर झळकत होता. पुरस्कार मिळाला तर इतके काय ना? पण नेमाडेंनी म्हणे श्रीराम हेअर ड्रेसर्समधून बाहेर पडत जवळचा 'शिमला बार' गाठला आणि तिथेच ते काही तासांनी बेशुद्ध पडले. 'नेमाडेकाका स्वत:लाच आई-बहिणीवरून शिव्या देत होते' असं डॉक्टरांना बारमधील माणसांनी सांगितलं.

नेमाडेकाका कोमामध्ये गेले, पण त्यांच्या कोमामध्ये जाण्यामुळे अनेकांचीच मोठी गोची झाली. तुकाराम कुत्र्याला नक्की कुठे आणि कुणाकडे सोडण्यात आलं याची माहिती तेच देऊ शकणार होते, अन् जोवर ती माहिती मिळाली नसती, तोवर मिस्टर बामणेंना मिसेस बामणे घरात घेणार नव्हत्या. आळीतली पोरं माझी जी नाचक्की करतील, त्याचं मला काहीच वाटत नव्हतं' पण डॉलीची ओरिजनल ब्रा केवळ तेच देऊ शकणार होते. जिच्या आधारे डॉलीशी मैत्रीची शेवटची संधी मला दडवायची नव्हती. नाहीतर विन्या खांडेकरकडून क्लिप्स घेऊन पुढचं सारं आयुष्य डॉली गालासारख्या दिसणाऱ्या पॉर्नस्टारला स्क्रीनवरच बघण्यावर समाधान मानावं लागणार होतं.

***

चित्रश्रेय : अवंती कुलकर्णी

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

ROFL ROFL
कमाल कथा आहे. तूफान विनोदी.
____
तुमची गन्नम स्टाइल कथा वाचल्यापासून अपेक्षा उंचावलेल्या होत्याच Smile त्याला पुरे पडून दशांगुळे उरलात.
___
इरसाल नेमाडेकाका आणि मठ्ठ आणि हव्या तिथे लठ्ठ बामणे बाईंचं व्यक्तीचित्र इतकं मस्त रंगलय. अरेरे ते कुत्र्याचे किस्से!!! बाप रे ROFL
____________
मध्यमवर्गियाची शोकांतिका ROFL
अशक्य अशक्य कथा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोल! लय भारी लिहिता तुम्ही!

(तुमच्या कथा वाचायला आवडतील. आणखी कुठे लिहिता?)
आय स्टँड करेक्टेड. मी पण ना...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

जबरदस्त ! माझ्या ओळखीच्या एका अप-डाऊन वाल्याची प्रकर्षाने आठवण करुन दिलीत, नेमाडे व्यक्तिमत्वावरुन.
आमच्या कष्टप्रद अप-डाऊन प्रवासाचे दिवस चांगले करण्याचे मुख्य श्रेय त्यांना जाते. त्यांच्या कथा ऐकायला, आसपासच्या डब्यातले लोकही येत ऐकायला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथा वाचताना पुढे काय होणार, यापेक्षा ते कसं घडवून आणणार याबद्दल प्रचंड कुतूहल लागून राहतं. आणि त्या बाबतीत गन्नम आणि ही कथाही गुंगवून ठेवणाऱ्या आहेत.

चित्रसुद्धा आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

थोडं लांबलंय पण पात्रंवर्णन चांगलं जमलंय. चाळीचं { गिरगावातील} आळी केल्यासारखं वाटलं.नेमाडे पुराण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हा हा हा!! थोर आहे कथा! मस्त!

फक्त अचरटराव म्हणतात तसं म्ह्टलं आळी असलं तरी गिरगावातल्या चाळीतलं कथानक वाटलं

---

चित्र नीट दिसतच नाहीये

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आपलं दोघांचं आडनाव एकंच नसल्याने मी असं काही कधीतरी लिहू शकेन किमानपक्षी चित्र तरी काढू शकेन असा अंधुक विश्वास वाटतोय... पण कृपया याचा कुठे बभ्रा करू नका

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तय!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगली झाली आहे कथा.
मस्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या जातीचा तिरका विनोद इतक्यात कुठे वाचल्याची आठवण नाही. एकमेवाद्वितीय असा विनोद आहे. निम्नमध्यमवर्गीय आयुष्य, त्यातलं खुराडेपण, शारीर व्यवहारांमधली ऊर्जा आणि अपरिहार्यता - आणि या जोडीला लेखकाचं तीव्र (आणि तिरकस) साहित्यिक भान. अजब रसायन.

संपादकीय पोतडीतली माहिती - या कथा सुट्याही आहेत आणि नाहीतही. अशा सुमारे तेरा-चौदा कथा मिळून लेखकाच्या नजरेतलं एक विश्व साकारतं. त्या कथा आणि त्यांतली पात्रं एका विस्तृत पटाचा भाग आहेत. त्या एकत्रित उभ्या राहतील, तेव्हा त्यांचा आवाका आत्तापेक्षाही परिणामकारकपणे जाणवेल. वाचक म्हणून हे अतिशय आनंदाचं आहेच, पण त्यांतलं आव्हान जाणून लेखकाला अनेकानेक शुभेच्छा आणि धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तुझ्या प्रतिसादांमधुन नवनवे शब्द (संदर्भबहुलता, संदर्भसंपृक्त) तर कळत आहेतच पण जुन्या शब्दांचा "पसरट" वगैरे नवीन वापरही कळून येतो आहे. प्रतिसाद सुद्धा पुन्हापुन्हा वाचावे असे आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0