अखेरची अंगाई

ये आई.....ऐक ना !

रक्तमांसाच्या सड्याने
विटाळलेल्या ह्या शहरात
दहशतीच्या सावल्या बरोबरच
असतात,
घरी आलो की
खुंटीला टांगुन
उद्या बरोबर न्यायच्या असतात !

तुझ्या गोष्टीतल्या
आटपाट नगरात आता
निभावच लागत नाही गं
भयस्वप्नानी चुरगाळलेले
डोळे रोजच सांगतात
इथे आपले कुणीच
नाही गं !

आता तुझी अंगाई
झोपेचे भय दाखवते
भेसूर होऊन कानाचे
पडदे फाडते,
परवा स्फोटात
आईबाप गमावलेली पोरे
झोपली अंगाईवीनाच !

तू कधीतरी डोळे
मिटशीलच
आम्हास मात्र डोळे
सताड उघडे ठेवावे
लागणार,
अन्
गाफिलच राहिलो तर
अंगाईशिवायच
आम्ही भररस्त्यात डोळे मिटणार !

माफ कर आम्हास
तुझ्या स्वप्नातले गाव
आम्ही कधीच जाळलय
तेव्हा.....
गांधी मेल्यावर जळीत करून
आणि आज
गांधीजीना परत मारुन !
नियमाप्रमाणे आम्ही तुझ्याबरोबर
येऊ शकत नाही ना गं ?
आणि गांधीजीना परत परत किती वेळा मरणार ?

विजयकुमार...................

18 / 03 / 2009, मुंबई

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

बाप रे! अंगाईची सांगड अशा भीषणतेशी नका घालू हो. प्लीज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0