फुसके बार – २५ जानेवारी २०१६ - नेहरूंच्या पश्चात

फुसके बार – २५ जानेवारी २०१६

१) एबीपी न्यूजवरील प्रधानमंत्री मालिका – नेहरूंच्या पश्चात

पं. नेहरूंच्या निधनानंतर कॉंग्रेसमध्ये नेतृत्वावरून मोठीच स्पर्धा सुरू झाली. ज्येष्ठतेच्या दृष्टीने मोरारजी देसाईंनी त्या पदावर दावा सांगितला, मात्र कामराज आणि मोरारजींचे जमत नसे. त्यामुळे लालबहादूर शास्त्रीचे नाव पुढे आले. परंतु स्वत: शास्त्रींनी जयप्रकाश नारायण किंवा इंदिरा गांधी यांच्यापैकी कोणाकडे तरी नेतृत्व द्यावे असे सुचवले. जयप्रकाशांना विचारणा करण्याचे कारण नव्हते व इंदिरा गांधी त्या पदासाठी तयार नाहीत असे कामराज यांच्यासह इतर कॉंग्रेस नेत्यांना वाटत होते. त्यामुळे नेतृत्व शास्त्रींकडे आले. शास्त्री हे कमकुवत उमेदवार समजले जात, त्यामुळे त्यांच्याकडे धुरा सोपवण्यामागे त्यांच्यावर पक्षाचा दबाव ठेवण्याचे राजकारणही होते असे सांगितले जाते.

शास्त्रींकडे धुरा आली खरी, पण पंतप्रधान म्हणून त्यांनी नेहरूचे निवासस्थान वापरू नये असे इंदिरा गांधींनी त्यांना सांगितले. कारण काय, की शास्त्रींचा लोकसंग्रह नेहरूंएवढा नसल्याने त्यांना भेटायला फारसे लोक येणार नाहीत व त्यामुळे त्रिमूर्ती भवनसारख्या प्रशस्त वास्तुची त्यांना गरज नाही. त्यानंतर नेहरूची धाकटी बहिण सलेल्या कृष्णा हथीसिंग यांनी शास्त्रींना एक पत्र लिहिले. त्यात काय कांगावा केला गेला होता, तर त्रिमूर्ती भवनात न राहण्याचा निर्णय घेण्यात शास्त्री दिरंगाई करत असल्यामुळे इंदिरेची तब्येत बिघडलेली आहे व ती मधूनमधून बेशुद्ध पडत आहे. अशा लोभीपणामुळे शास्त्री वैतागले व काहीही झाले तरी त्रिमूर्ती भवनात न राहण्याचे त्यांनी निश्चित केले.

शास्त्री ज्या परिस्थितीत पंतप्रधान झाले ती अतिशय खराब होती. पाकिस्तानने कच्छमध्ये आगळीक करून भारताचा थोडा भूभाग बळकावला होता. देशभर धान्याचा तुटवडा होता. शास्त्रींनी आधी त्यांच्या मुलांवर प्रयोग केला की दिवसातून एकदाच जेवून राहणे शक्य आहे का? ते शक्य असल्याचे दिसल्यावर त्यांनी देशाला त्याबाबत आवाहन केले ते आठवड्यातून एक दिवस उपवास पाळण्याचे. तेवढीच अन्नधान्यांची बचत होईल या अपेक्षेने. व उपवासही आजकालच्या एकादशी-चतुर्थीसारखा नव्हे. यावरून सुचले, त्यावेळच्या सुखवस्तुंनीही शास्त्रींचे हे आवाहन कदाचित धुडकावून लावले असणार. जसे आता पंतप्रधान मोदींनी गॅसवरची सबसिडी धनिकांनी सोडून द्यावी असे आवाहन केले तर त्याची खिल्ली उडवली गेली. देशाच्या भल्यासाठी कोणी काही आवाहन केले तर आधी तसे करणा-याची टिंगल करायची ही बहुतेकांची प्रवृत्ती. केनेडींच्या मास्तरांचे "Ask not what your country can do for you--ask what you can do for your country" हे जे वाक्य केनेडींनी चोरले असे म्हणतात, ते केवळ पुस्तकात वाचण्यापुरतेच असावे कदाचित. त्यामुळे तेव्हा तरी शास्त्रींच्या आवाहनाला कितपत प्रतिसाद मिळाला असेल याबद्दल शंका वाटते.

मात्र शास्त्रींनी दाखवलेल्या खमकेपणामुळे त्यांना दुबळे समजणारे विरोधी पक्षांचेच काय, कॉंग्रेसी नेतेही चकीत झाले.

पुढे पाकिस्तानशी चकमकी वाढत गेल्या व त्याला पूर्ण युद्धाचे स्वरूप मिळाले. चीन युद्धानंतर भारताचे सैन्य दुबळे झाल्याचा पाकिस्तानच्या ज. अयुब यांचा समज झाल्यामुळे उर्वरीत काश्मीर बळकावण्यासाठी तीच संधी योग्य असल्याचे त्यांना वाटले. पण भारतीय फौजांनी त्याचे मनसुबे धुळीला मिळाले. भारतीय हवाई दलाकडून यावेळी भारतीय लष्कराला मिळालेली साथ हा या युद्धाचा विशेष पैलू ठरला. कधी नव्हे ते एका भारतीय नेत्याने म्हणजे शास्त्रींनी लष्कराला व हवाई दलाला आपल्या सीमेबाहेरही हे युद्ध नेण्यास परवानगी दिली. आणि आज्ञा मिळाल्यास अगदी काही मिनिटांमध्ये लाहोर ताब्यात येईल अशी परिस्थिती आली. मात्र शास्त्रींनी लाहोर हल्ला करण्यास नकार दिला. नंतर ताश्कंदमध्ये झालेल्या करारात पाकिस्तानचा जो भूभाग ताब्यात घेतला गेला होता, तो परत करावा लागणार होता. थोडक्यात, युद्धात जिंकलेले सारेच तहात गमवावे लागले.

या कराराबद्दल भारतात जनमत काय म्हणते आहे याचा अंदाज घेण्याकरता त्यांनी भारतातील वृत्तपत्रे काबूलमध्ये मागवली होती, कारण ताश्कंदहून काबूलला जाण्याचा त्यांचा विचार होता. मात्र करार झाल्यानंतर ताश्कंदमध्ये असतानाच शास्त्रींना हृदयविकाराचा धक्क्यामुळे मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले. एवढ्या मोठ्या नेत्याचा मृत्यु झाला तरी त्यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टेम केले गेले नाही.

शास्त्रींचा मृत्यु नैसर्गिक नसल्याचे सांगितले जाते. त्यांचे शरीर विषप्रयोग केल्यासारखे काळेनिळे पडलेले होते असे म्हणतात व त्यामुळेही पोस्टमॉर्टेम का केले गेले नाही हा प्रश्न विचारला जातो. ते भारतात परतायच्या आधी एका महत्वाच्या व्यक्तीला मी भेटणार आहे असे त्यांनी घरच्यांना सांगितले होते असे म्हणतात. ती व्यक्ती म्हणजे दुसरे-तिसरे कोणी नसून नेताजी सुभाषचंद्र बोस होती असे म्हटले जाते. शिवाय या हत्येत कॉंग्रेसमधील सत्तासंघर्ष होता व इंदिरा गांधीचाच तो कट होता आणि तो पंतप्रधानांबरोबर रशियात गेलेल्यांपैकीच कोणामार्फत तरी तडीस नेण्यात आला असे अनेकदा म्हटले जाते. दुसरा एक प्रतिवाद असा की युद्धात जिंकलेले सारेच गमवावे लागल्याचे मनाला लावून घेतल्यामुळे शास्त्रींचा मृत्यु ओढवला. मात्र या मालिकेत मात्र यांचा काही उल्लेख नाही. केवळ पोस्टमॉर्टेम केले न गेल्याचा उल्लेख आहे.

शास्त्रींच्या मृत्युनंतर नवीन नेतृत्वासाठी शोध घेण्याचे काम पुन्हा सुरू झाले. मागच्यासारखेच मोरारजी यावेळीही उमेदवार होतेच. त्यांनी आपले नाव मागे घेण्यास शेवटपर्यंत नकार दिला. नेहरूंच्या निधनानंतर काळजीवाहू पंतप्रधान झालेले गुलजारीलाल नंदा यांनी यावेळीही तीच जबाबदारी स्विकारली होती. मात्र त्यांची महत्त्वाकांक्षा वाढल्यामुळे यावेळी आपल्याला लोकसभेची मुदत पूर्ण होईपर्यंत या पदावर कायम राहू दिले जावे असे त्यांनी सांगितले. इतर नेत्यांचा तुम्हाला पाठिंबा असेल तर हरकत नाही असे कामराज यांनी त्यांना वरवर सांगितले. नेहरूंच्या मृत्युच्या सुमारास कामराज यांच्या नेतृत्वाखाली काही जणांचे एक सिंडीकेट निर्माण झाले होते. शिवाय त्यावेळी मोजकीच राज्ये अस्तित्वात असल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्यालाही महत्त्व असे. या सर्वांनी सुरूवातीला स्वत: कामराज यांनीच नेतृत्व स्विकारावे असे सुचवले. त्यांनी होकार दिला असता तर तेच देशाचे पुढचे पंतप्रधान झाले असते अशी त्यांची हुकमी स्थिती होती. नंतर सोनिया गांधींच्या बाबतीतही तशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र कामराज यांचे हिंदी व इंग्लिश हे दोन्हीही चांगले नसल्यामुळे त्यांनीच ती जबाबदारी नाकारली. तेव्हा द्वारका प्रसाद मिश्रा या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्याचे दिल्लीदरबारी विशेषत: इंदिरा गांधी यांच्याकडे खुप वजन होते. त्या त्यांच्याशी अनेकदा सल्लामसलत करत. कामराज यांनी स्पर्धेतून माघार घेतल्यावर मिश्रांनी लगेच इंदिरा गांधींचे नाव पुढे केले. नंदा स्पर्धेत होतेच. मात्र ते मोरारजींपुढे उभे राहू शकणार नाहीत अशी खात्री असल्यामुळे अखेर इंदिरा गांधीचे नाव निर्णायकपणे पुढे आले.

मोरारजींनी आपला हेका न सोडल्यामुळे अखेर मतदान घ्यावे लागले. मोरारजींना १५९ तर इंदिरा गांधी यांना ३५० मते मिळाल्यामुळे त्या पंतप्रधान झाल्या. मात्र संसदीय नेता म्हणून अलीकडे केवळ लोकसभेच्या सदस्यांमध्ये मतदान होते. त्यावेळी राज्यसभेच्या सदस्यांनीही मतदानात भाग घेतला. हा नियम नंतर बदलण्यात आला का हे शोधायला हवे.

पंतप्रधान झाल्यानंतर इंदिरा गांधी यांच्यापुढची स्थितीही फार चांगली नव्हती. धान्यपुरवठ्याचे मोठेच संकट होते. नेहमीपेक्षा केवळ २०-२५% उत्पादनच झाले होते. त्यामुळे विरोधी पक्षांकडूनच नव्हे तर त्यांना पक्षांतर्गत विरोधही सहन करावा लागत होता. शिवाय मोठमोठ्या नेत्यांमध्ये त्याआधी उठबस असली व शास्त्रींच्या मंत्रीमंडळात माहिती व नभोवाणी खात्याचे मंत्रीपद भुषवलेले सले, तरी कसलाही प्रभावी प्रशासकीय अनुभव नसल्यामुळे उघडपणे आपले मत व्यक्त करायलाही त्या घाबरत. सुरूवातीला कामराज यांच्यामुळे त्यांनी बहुतेक गोष्टी कशाबशा निभावून नेल्या. या काळात धान्याच्या राज्यवार विभागणीची सुत्रेही गंमतीशीर होती. केरळच्या वाट्याला प्रतिमाणशी १४० ग्रॅम (हा दर दिवसाचा कोटा असावा) तर इतर काही राज्यांच्या वाट्याला २५०-३०० ग्रॅम पर्यंत तांदूळ मिळे. अशा विषमतेबद्दलही विरोध व्यक्त केला जात होता.

अमेरिकेतून गहू आयात करण्याचा निर्णय घेतला गेला व त्याबद्दल बोलणी करण्यासाठी इंदिरा गांधी अमेरिकेला गेल्या. अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी धान्यपुवठ्याची तयारी तर दाखवली, पण ती अतिशय अपमानास्पद अटींच्या बदल्यात. एका डॉलरला चार रूपयांपेक्षाही कमी विनिमयदर असताना रूपयांचे अवमूल्यन करण्याची मोठीच अट त्यांनी घातली, त्यानंतर हा दर जवळजवळ दुप्पट झाला. त्यावेळी विरोधी पक्षांसह कॉंग्रेसी नेत्यांनीही या निर्णयाला विरोध केला. आज मात्र मुक्त अर्थव्यवस्थेत शेअर बाजाराप्रमाणे रूपयाच्या किंमतीत झपाट्याने बदल होतात, तरी ते फार गंभीरपणे घेतले जाताना दिसत नाही.

त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसने ७८ जागा गमावल्या, मात्र बहुमताला काही फरक पडला नाही. आतापर्यंत गुंगी गुडिया म्हणून लोहियांनी ज्यांना संबोधले, व जे तेव्हा खरेही होते, त्या इंदिरा गांधी त्या प्रतिमेतून बाहेर आल्या व त्यांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला.

२) नुकताच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबरोबरीने महाराष्ट्रातील एका नेत्याचाही जन्मदिन एकच असल्याचे निमित्त काय झाले, दोघांचेही फोटो एकत्र झळकत होते. त्यातल्या एकाने नेहमीच खंडणीखोरीचे, कायदे धाब्यावर बसवण्याचे, दलितांविरूद्ध आणि धार्मिक विद्वेष पसरवण्याचे, दंगली भडकावण्याचे, धर्माच्या आधारावर निवडणूक प्रचार करण्याचे; ज्यामुळे थेट सर्वोच्च न्यायालयाने ज्यांचा मताधिकार रद्द केला; असे व ज्यांनी नेहमीच संधीसाधू राजकारण केले, त्यांचे नाव या मोठ्या स्वातंत्र्यसैनिकाच्या बरोबरीने घेतले जावे यासारखा दैवदुर्विलास कोणता नाही.

तारतम्य हरवलेले आहे. अशा व्यक्तीचे स्मारक सरकारी मदतीने करायचे घाटत आहे, हे आणखी एक दुर्दैव.

३) आणखी काही काळानंतरचा निवडणुकीतील उमेदवार आणि मतदार यांचा संवाद

साहेब, तुम्ही तर तसेही समाजासाठी निरलसपणे कामे करता. तेव्हा तुम्ही निवडणुकीत जिंकला काय आणि हरला काय, आमच्यासाठी कामे करतच रहाल. पण तो उमेदवार आम्हाला आमच्या मताच्या बदल्यात भरपूर पैसे देत आहे. तेव्हा असे करू, की आम्ही त्याला मत देतो व त्याला निवडून देतो. म्हणजे तुम्ही दोघांनीही आमच्यासाठी कामे केलीत तर आमचे भलेच होईल, नाही का?

४) खेळाडू व रक्ताला चटावलेले पत्रकार

भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत शेवटच्या सामन्यात विजय मिळवला. त्याआधी सलग चार सामने हरल्यामुळे संघाच्या क्षमतेबद्दलच प्रश्न विचारले जाऊ लागले. एक लक्षात घेतले गेले नाही की हा पराभव असला तरी तो नांगी टाकण्यासारखा पराभव नव्हता. दोन्ही बाजूंनी धावांचे डोंगर उभे राहिले. विजयी होत राहण्यासाठी दोन संघात जी छोटी दरी असते, ती मिटवण्यासाठी जिगरीचे प्रयत्न होताना दिसले नाहीत हे मात्र खरे.

मालिका चालू असताना कर्णधाराला या पराभवांमुळे पद सोडणार का असे महान प्रश्न विचारणा-या पत्रकारांचे खरोखर कौतुक वाटते. अशा दौ-यांवरील पत्रकारपरिषदांमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ नयेत याबाबत मार्गदर्शक तत्वे असायला हवीत. ऐन निवडणुकीतही एखाद्या राजकारण्याला तुम्ही निवृत्त केव्हा होणार किंवा निवडणुकीतून माघार का घेत नाही, असे प्रश्न विचारले जात नाहीत. तेव्हा खेळाडुंना विचारल्या जाणा-या प्रश्नांमध्ये तारतम्य बाळगले जायला हवे असे वाटते.

++++++++++++
येथील संपादक मला या पोस्ट्स एकाच टिकाणी टाकण्यास सांगत आहेत. म्हणजे उदा. आधीच्या पोस्टलाच प्रतिसाद म्हणून. म्हणजे थोडक्यात अडगळीत. त्यामागील कारणांचा व त्याच्या परिणामांचा मी इतरत्र उहापोह केलेला आहे. येथे पुन्हा लिहित नाही. तरीही मला पुन:पुन्हा असे सांगूनही मी तसे न केल्यामुळे या पोस्ट्स वाचनमात्र केल्या जात आहेत. म्हणजे कोणाही वाचकाला त्यावर कमेंट करता येणार नाही. अशी 'शिक्षा' दिलेली आहे. वर मला असे किती वेळा सांगितले आहे हे आता मोजायलाही सुरूवात झालेली आहे. त्यावरून कदाचित ही शिक्षा अणखी तीव्र होऊन मला पोस्ट टाकण्यासही बंदी येण्यापर्यंत जाऊ शकेल. माझ्या माहितीप्रमाणे मी इथले कोणतेही नियम तोडत नाही आहे. तरीही हे निर्बंध लादले जात आहेत. कोणतेही नियम न तोडताही अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी करणा-या सूचना करत असतील तर त्या न पाळण्याचा मलाही अधिकार आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्य वगैरे अशासाठी खूप मोठे शब्द अाहेत असे काही जणांना वाटेल, पण त्याला उपाय नाही. संपादकांनी काही जणानी माझ्या पोस्ट्सवर अतिशय घाणेरड्या स्वरूपाच्या कमेंट्स करत आपला दर्जा व आवड दाखवलीच आहे. डुकराच्या पिलावळीसारख्या पोस्ट, भाजपचा अजेंडा वगैरे विशेषणे संपादकांकडून लावली गेली आहेत. शिवाय अाता या पोस्ट्स त्यांच्या व्हीम्स न फॅन्सीजचे संरक्षण करण्यासाठी वाचनमात्र करण्यामुळे या पोर्टलचा उदात्त म्हणून जो हेतू सांगितला गेला आहे तोही सफल होतोच आहे असेच म्हणावे लागेल. इथल्या संपादकांचे त्याकरता अभिनंदन.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वारंवार सांगूनही योग्य ठिकाणी लेखन न केल्यामुळे धागा वाचनमात्र करण्यात येत आहे. अशी सूचना देण्याची ही तिसरी वेळ.


  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0