अनिरुद्धबापू, त्यांच्यापासून समाजाला असलेले धोके व आपण घ्यायची काळजी
अनिरुद्धबापू, त्यांच्यापासून समाजाला असलेले धोके व आपण घ्यायची काळजी
.
अनिरुद्धबापू म्हणवून घेणारे एक प्रस्थ अनेक वर्ष महाराष्ट्र राज्यात आहे. हे बापू शिक्षणाने वैद्यकीय डॉक्टर आहेत. कदाचित वैद्यकीय क्षेत्रापेक्षा अध्यात्मातल्या गुरूगिरीचा बाजार मोठा असल्याचे त्यांनी वेळीच ओळखल्यामुळे ते इकडे वळले असावेत.
ते स्वत: शिर्डीचे साईबाबा, राम व विष्णु यांचे अवतार आहेत असे सांगितले जाते. ते शाळेत असल्यापासूनच ते शिर्डीचे साईबाबा असल्याचे त्यांना वाटे म्हणे. म्हणजे शिर्डीच्या साईबाबांना कुठल्या तरी विद्यापीठाने डॉक्टरकीची पदवी दिली असे समजुयात. त्यांना राम म्हणावे, तर त्यांची पत्नी सीता व त्यांचा एक भाऊ किंवा जवळचा मित्र हनुमान. त्यांना विष्णु म्हणावे तर त्यांची पत्नी लक्ष्मी व तो मित्र किंवा भाऊ शेषनाग असा मौजेचा मामला आहे.
मध्यंतरी या मित्राचे किंवा भावाचे त्यांच्याशी मतभेद झाले व त्याला बदलून दुसरा त्या जागी आला. काही भक्तांनी सांगितले की तो आधीचा लक्ष्मण किंवा शेषनाग फ्रॉड होता, आताचा हा खरा आहे असे बापूंनी सांगितले. इतक्या लोकांचे अवतार असलेल्या बापूंना तो फ्रॉड आहे हे आधीच कसे कळले नाही असे प्रश्न यात विचारायचे नाहीत.
बापू हेलिकॉप्टरने जेथे जेथे जातात तेथे त्यांना हार घालण्याची इच्छा असलेल्यांना २५,००० रू. वगैरे मोजावे लागतात असे अनेक उल्लेख माहितीजालावर दिसतात.
त्यांचा भक्तपरिवार अफाट आहे. याचाच अर्थ आपले डोके त्यांच्याकडे गहाण टाकलेल्यांची संख्या बरीच आहे. अर्थात आपल्याकडे अशा लोकांची कमतरता नाही. यातले अनेकजण सुशिक्षित आहेत बरे का! त्यांना सावध करायला जा तर त्यांचा फणकारा पहायला मिळतो इतक्या घातक प्रमाणावर त्यांचे ब्रेनवॉशिंग करण्यात आले आहे. आसाराम व त्याचा दिवटा नारायण यांचे धंदे माहित होऊनदेखील ते नराधम तसे करणारच नाहीत याची खात्री असलेले लोक अजुनही त्यांच्या सुटकेची वाट पहात आहेत, तसेच.
कोणाला वाटेल लोक बापूंच्या निमित्ताने देवधर्माच्या मागे लागले आहेत तर त्यात वाईट काय आहे?
काही वर्षांपूर्वी निर्भया प्रकरण झाले, त्यानंतर काही दिवसात या महाभागाने एक प्रवचन झोडले. त्यात बलात्काराच्या संदर्भात त्याने जे तारे तोडले, ते ऐकताना एक सुशिक्षित म्हणायला अक्षरश: लाज वाटते. त्यांनी तोडलेले तारे पहा. त्यांनी पाच कलमे सांगितली.
१. स्त्री किंवा पुरुष यांच्यापैकी कोणावरही बलात्कार झालेला असेल व त्या व्यक्तीने १०८ वेळा अनिरुद्ध चलिसा ११ दिवस म्हटली तर बलात्कार करणारी व्यक्ती नपुंसक होईल व तसे झाल्याचे सर्वांना लगेच कळेल.
२. जी व्यक्ती रोज पाच वेळा गुरूक्षेत्र मंत्र म्हणेल त्या व्यक्तीवर कोणी कुठ्ल्याचप्रकारे जबरदस्ती करू शकणार नाही. अगदी १०० लोक जरी बलात्कार करायला गेले तरी त्यांना ते शक्य होणार नाही.
३. ज्या व्यक्तीला स्वतःवर बलात्कार होईल अशी सतत भीती वाटते त्या व्यक्तीने मातृवात्सल्य उपनिषदातले दोन अध्याय वाचाल्यासं त्या व्यक्तीचे भय व भयाचे कारण कायमचे नाहीसे होईल.
४. ज्यांना लिहिता वाचता येत नसेल किंवा अगदी मुक्या व्यक्तींनी मनातल्या मनात जरी अनिरुद्ध अनिरुद्ध असे म्हटले तर सर्व वाचन स्वतः सद्गुरु म्हणजे बापू स्वत: करतील व त्याचा संपूर्ण फायदा त्या व्यक्तीस मिळेल.
५. अहिल्या संघाच्या माध्यमातून ते असे काही तंत्र शिकवणार आहेत की ती स्त्री बलात्का-याला जागच्या जागी छक्का (त्यांच्याच भाषेत) करून टाकू शकेल.
मात्र हे सारे काही टर्म्स व कंडिशन्सवरच अवलंबून आहे बरे का! जसे जाहिरातींमध्ये fine print असते तसे. कारण बापू सांगतात की तुमची बापूंवर भक्ती, प्रेम व श्रद्धा असेल तरच हे शक्य होईल. आता कळले की निर्भया प्रकरणानंतरही देशातच काय सा-या जगात बलात्कार चालूच का आहेत? कारण त्यांची अनिरुद्धबापूंवर श्रद्धा नाही. आता बलात्कारावरचा एकच उपाय, तो म्हणजे सा-या जगाला बापूंच्या चरणी घालायचे. तरीही तसे काही प्रकरण झालेच, तर खुशाल समजायचे की त्या बलात्कारित स्त्रीची अनिरुद्धबापूंवर श्रद्धा नाही किंवा नव्हती. इतका साधा मामला आहे. अर्थात श्रद्धा आहे की नाही हे तपासायला बॅटरीचा चार्ज किती आहे ते तपासू शकेल असे लाल-पिवळा-हिरवा असे रंग दाखवणारे यंत्र काही बापू देत नाहीत बरे का! म्हणजे तुमची त्यांच्यावर पुरेशी श्रद्धा अाहे की नाही हे बापूच ठरवणार. आहे की नाही गंमत.
हे सारे प्रवचन युट्युबवर आहे बरे! बापूंना काही दिव्य शक्ती असल्या तरी त्यांना हे प्रवचन देताना मधूनमधून खोकला मात्र येतो बरे! मुळात डॉक्टर असल्यामुळे मध्येच अर्धे-एक वाक्य इंग्रजीतही बोलतात.
बलात्कार झालेल्या स्त्रीला आयुष्यभर त्याचे ओझे वहावे लागते अशा अर्थाचे तारे पण तोडलेले आहेत. कोठेही हे सांगणे नाही, की जे झाले त्यात त्या स्त्रीची काहीही चूक नाही, जे झाले ते विसरून पुढे पाहिले पाहिजे, आयुष्य फार सुंदर आहे, वगैरे.
बापूंचे हे असे बरळणे चालू असताना त्यातला फोलपणा समोरच्या प्रेक्षकांपैकी, माफ करा, भक्तांपैकी एकाही मुर्खाच्या लक्षात आला नाही. म्हणजे डोके वा मेंदू गहाण ठेवणे हे कुठल्या थराला जाऊ शकते ते पाहून अंगावर काटा येतो. तो जादुटोणा कायदा इतका अर्थहीन केला गेला की यांच्यासारखे लोक त्यात अडकू शकणारच नाहीत.
हे एक प्रवचन झाले. आणखीही आहेत. पहा, ऐका व धन्य व्हा.
आता सांगा अशा धार्मिक गुरूंची जागा तुरूंगात हवी की मनोरुग्णालयात? आणि त्यांच्यासमोर बसून हा मूर्खपणा शांतपणे ऐकून घेणा-यांचे काय करावे? आपण अशा ठिकाणी नसतो ना, हे पाहण्याची जबाबदारी शेवटी आपलीच की.
या धन्य प्रवचनाची आठवण येण्याचे कारण म्हणजे काही शाळांमध्ये प्रवचने नियमितपणे आयोजित केली जातात यासंबंधीची बातमी. तर अशा शाळांमधील मुलांच्या मनावर काय परिणाम होत असेल ते वेगळेच.
मागे मी चेन्नईतल्या कल्कीमहाराजाच्या नादी लागलेल्या महाराष्ट्रातल्या सुशिक्षित कुटुंबाबद्दलही लिहिले होते.
असं आठवतं की खूप वर्षांपूर्वी
असं आठवतं की खूप वर्षांपूर्वी ट्रेनमधे मोठ्या संख्येने भक्त गात, वाजवत आणि नाचत जाताना पाहून बापूंचा प्रभाव खूप जाणवला होता. बापूंसारख्या मिशा ठेवणारे अनेक भक्त होते. ते ज्या पद्धतीने खानपान करतात तसंच फॉलो करणारेही भक्तही दिसायचे. एका मनुष्याला पेप्सीमधे की कोकाकोलामधे (चुभूदेघे)चिमूटभर मीठ टाकून पिताना पाहिलं तेव्हा तो इतरांना सांगत होता की बापू असं सेवन करतात म्हणून त्यानेही सुरु केलंय. (पुन्हा एकदा ख.खो.दे.जा.) बापू मॉडर्न मेडिसिनचे तज्ञ असल्याचा अभिमान सर्व भक्तांमधे विशेषत्वाने दिसायचा.
लोकल ट्रेनमधे:
लेके चलो पालकी क्ष की
खांदा लगाके बोलो जय य की
यामधे दादरके लालकी, शेरावाली की, शेषनाग की वगैरे असे पहिल्या ओळीत क्षच्या जागी आणि क्रमाने बापू, श्रीमती आणि बंधु सुचितदादा यांपैकी योग्य ती नावं दुसर्या ओळीत यच्या ठिकाणी. (पुन्हा पुन्हा तपशिलातली बारीकशी चुभूदेघे)
पूर्ण वातावरण बापूमय होत असे. सर्वजण एकमेकांना स्वतःला झालेले दृष्टांत सांगताना दिसत आणि एकूण एक भक्तांना स्वतःला काहीना काही अद्भुत अनुभूति आल्याचं त्या बातचीतींवरुन लक्षात यायचं. (ज्योत दिसली, संकट टळलं, पाऊस थांबला, पाऊस पडला, छत्री परत मिळाली, ताप उतरला, पडताना कोणीतरी हात दिला). ते सर्वजण आनंदात आणि उत्साहात असायचे. सुरुवातीच्या स्टेशन्सनंतर गर्दी जरा कमी झाली की पोक्त बायकापुरुषांसुद्धा सगळे आपले आकारउकार विसरुन मुक्तपणे नाचायचे. अनेकजणांना रोजच्या तापपीडांमधून केवळ या एकत्र येण्याने, नाचण्या गाण्याने रिलीफ होत असणार असं पाहून वाटायचं.
असं सर्व आठवून नॉस्टाल्जिया आला.
१९८६ ते १९९९ या कालखंडात
१९८६ ते १९९९ या कालखंडात मुंबईत नागपुथ्र जिम्मी आणि नागकन्या योगिनी असला कल्ट लैच फोफावला होता. डोक्याला भगवी स्कलक्याप आणि कपाळाला भगवा शेंदूर उभा फासून वावरत हे लोक. अजूनही दिसतात. पण कमी.
उगाच अधिकची माहिती:या योगीनी
उगाच अधिकची माहिती:
या योगीनी आता ७०-८० वर्षांच्या आहेत - योगी त्याहूनही! ते मुळचे पारशी होते असे म्हणतात. त्यांच्या अत्यंत जवळच्या सेवेकर्यांकडून कळलेली माहिती अशी की ते दोघेही आता आजारी व घरीच असतात. फक्त महिन्या-दोन महिन्यातून एकदा त्यांच्या भक्तगणांना दर्शन देतात. त्यांना बहुदा मुले नसल्याने (व इतर कोणाकडे 'गादी' द्यायची इच्छा नसल्याने- हा अंदाज) पुढे वयापरत्वे त्यांना हा व्याप झेपेनासा झाला असावा.
मात्र त्यांच्या अजूनही वर्षानुवर्ष टिकलेल्या भक्तगणांच्या मुलांच्या फिया भर, त्यांना जागा घ्यायची असेल तर बिनव्याजी कर्जे दे, त्यांना नोकर्यांना लाऊन दे वगैरे गोष्टी करत असतात असे समजते.
मात्र होय ७०-८०च्या दशकात हे लई फॉर्मात होते. शर्टाच्या खिशांच्या वरच्या भागात वा साड्यांच्या पदरांवर दिसतील असे नागाचे चित्र असलेले बिल्ले त्यांचे भक्तगण लावत.
यांचा कल्ट वाढीस लागत असताना
यांचा कल्ट वाढीस लागत असताना आमच्या एका परिचितांकडून मुंबई पंढरपूर एका दिवसाच्या ट्रीपचे ५-७ हजार का काहितरी रुपये घेतले होते! ही गोष्ट १५-१७ वर्षांपूर्वीची!
ते परत आल्यावर त्यांच्याकडील प्रसादाचे लाडू का असाच काहिसा पदार्थ आम्ही विकत घ्यायला नकार दिल्याने आजतागायत ते गृहस्थ आमच्याशी संबंध तोडून आहेत =))
तिकडे
प्रसादाचे लाडू का असाच काहिसा पदार्थ आम्ही विकत घ्यायला नकार दिल्याने आजतागायत ते गृहस्थ आमच्याशी संबंध तोडून आहेत (लोळून हसत)
तिकडे, मिपावर, प्रसादाचा लाडु नाकारला म्हणून रणकंदन चालू आहे. अर्थात तिथे भक्तिधुंद तांडे जास्त संख्येने असल्यामुळे असत्याचा विजय होताना दिसतो.
अहो प्रसादाचा म्हणून नाकारला
अहो प्रसादाचा म्हणून नाकारला नव्हे.. विकत घ्याला सांगितला तो ही "ह्या एवढ्या किंमतीला" म्हणून नाकारला..
प्रसादाचा लाडू विकत काय घ्यायचा.. नुसता दिला असता तर अगदी मंतरलेला वगैरे आहे म्हणाले असते तरी मान्य केला असतं आणि खाल्ला असता.
@शुचि:
मला श्रद्धा कळते. माझी श्रद्धा लाडवावर आहे :प ;)
अनिरुद्धबापू - एक आठवण
मी ज्युनियर कॉलेजमध्ये असताना अनिरुद्धबापूंच्या प्रभावाने माझ्या काकांचा अत्यंत ताबा घेतला होता हे आठवते. माझे वडील-काका आणि त्यांचे मावस-आतेभाऊ वगैरेंमध्ये वेगवेगळ्या बुवांची चलती होती. खरंतर दोनतीन गट होते असं आठवतंय. पांडुरंगशास्त्री आठवल्यांच्या कह्यात दोन-तीन कुटुंबे होती. त्यांच्या घरी दर गुरुवारी सत्संग की काहीसा सोहळा होत असे. वर्षा-सहामहिन्यांनी होणाऱ्या गाठीभेटींमध्ये आठवल्यांसाठी आम्ही गेल्या काही महिन्यांत काय काय केले याची सुरस वर्णने ऐकायला मिळत. दुसऱ्या गटात श्रीश्रीश्री रविशंकर व तत्सम अधिक श्रीमंत गुरुंची चलती होती. त्यांचे त्रैमासिक सोहळे, तिथले एअरकंडिशन्ड हॉल्स, चकचकीत टॉयलेट्स वगैरे ऐकून पाठ झाले होते. या दरम्यान माझ्या थोरल्या काकांनी अनिरुद्धबापूंची अनाऊन्समेंट केली. हे कुटुंबात सर्वात थोरले (व तुलनेने अधिक पैसेवाले) असल्याने त्यांच्या बोलण्याला नेहमीच मान दिला जात असे. तुमचे सगळे बाबा-बुवा भंपक असून बापू हेच तेवढे कसे खरे यावर दिवाळीच्या फराळाच्या वेळी वादावादी होऊ लागली. एकदा बापूंचे दर्शन घ्या मग सगळी प्रचीती येईल असे खुले आव्हान त्यांनी दिले. अंधेरीच्या छत्रपती क्रीडा संकुलात बापूंचा वार्षिक कार्यक्रम असे. आमचे काकाही चार बंगला की सात बंगला परिसरात राहत असत. त्यामुळे सर्वांनी त्यांच्याकडेच मुक्कामाला जावे असे ठरवले गेले. काकांनी दहा उपस्थितांसाठी प्रत्येकी हजार रुपयाचे एक अशी स्पेशल तिकीटे घेतली. (त्या वेळचे दहा हजार म्हणजे या वेळचे.. या यदुनाथ जवळकर थाटात पुढे नंतर तीन चार वर्षे आम्हाला हे वाक्य ऐकावे लागले).
बापूंच्या दर्शनाचा दिवस आगळाच होता. सर्वांचे आवरुन निघायला अकरा वाजले. मुंबईच्या दमट हवेने घामाने थबथबलेल्या अवस्थेत रिक्षाने मार्गक्रमणा सुरु केली. क्रीडा संकुलापासून अर्धा किलोमीटरच्या अलीकडेच रिक्षावाल्याने सोडले. पुढे भक्तांचे प्रचंड ट्राफिक असल्याने रस्ते बंद झाले होते. त्यामुळे चालत चालत भक्तांचा तांडा निघाला. नाश्ता हुकल्याने मला प्रचंड भूक लागली होती. एकदोनदा कुरकुरून मी भुकेची जाणीव करुन देण्याचा प्रयत्न केला पण इतरांना बापूंच्या दर्शनाची तहान लागल्याने त्याकडे अर्थातच दुर्लक्ष झाले. जाता जाता भक्तमंडळींच्या गाड्यांकडे हातवारे करत, ती मर्सिडिझ बघ, ही इम्पाला बघ अशी 'इतक्या श्रीमंत लोकांना जे समजते ते या गाववाल्या नातेवाईकांना कळत नाही' या थाटात काकांची रनिंग कमेंट्री चालू होती. सुरक्षा तपासणी वगैरे करुन आत प्रवेश करताना, ही तपासणी करावी लागणे हे एक वेगळे स्टेटस कसे आहे यावर माफक उपदेश ऐकला. शेवटी तिकीटावर छापलेल्या विंगमध्ये आमच्या खुर्च्यांवर स्थानापन्न झाल्यावर वेगवेगळ्या विंगच्या तिकीटांची किंमत किती आहे याची अमूल्य माहिती आम्हाला मिळाली. बापूंच्या सर्वात समोर लाल गालिच्याच्या बाजूला असलेल्या गाद्यांवर बसण्याचा भाव दहा हजार रुपये आहे हे ऐकून हा देव खरंच भावाचा भुकेला आहे याची खात्री पटली.
रंगमंचावर एकदाचे बापू पंचायतनचे आगमन झाले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, बंधू, आणखी दोघेजण अशी काही महत्त्वाची पात्रे होती. ठरल्याप्रमाणे पब्लिकचा नमस्कार चमत्कार. नंतर काही स्पेशल आमंत्रितांना थेट मंचावर बापूंचे कन्सल्टेशन आणि नंतर बापूंचे प्रवचन, आरती वगैरे यथासांग पार पडले. बाहेर पडताना बापूंचे काही फोटो, पुस्तके, स्टीकर्स वगैरे विकत घेऊन काकांनी आम्हाला दिले. प्रत्येकाला दर्शनानंतर कृतकृत्य झाल्यासारखे वाटत होते असे प्रत्येकाने दुसऱ्याला सांगितले
मला मात्र बाहेर आल्यावर समोरच्या उडप्याच्या हॉटेलात डोसा हाणल्यावरच कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. बापूंचा एक फोटो नंतर आमच्या देव्हाऱ्यात लागला. खंडोबा, यमाई, शाळीग्राम अशा पितळी-दगडी देवांमध्ये चकचकीत फ्रेम केलेला बापूंचा फोटो सुरुवातीला विजोड वाटत होता. मात्र दररोज गंध, तेलाचा दिवा वगैरे लावून तो काही वर्षानी पुरेसा कळकट झाल्यावर आता इतर देवांइतकाच प्राचीन वाटतोय.
ह्म्म्म. मिपावर यनावालांनी
ह्म्म्म. मिपावर यनावालांनी लेख आस्तिक-नास्तिकतेवरचा लेख टाकला आहे. त्यात त्यांनी पुजार्याकडून लाडू नाकारला असे काहीसे आहे. तिथले काही प्रतिसाद वाचले आणि मग आम्ही नास्तिक म्हंजे लै श्याणे असा पवित्रा वाचून ऊबग ऊबग आला. व वाचायचे थांबवले.
___
एकतर एकदम टकाटक श्याणेसुरते नास्तिक नाहीतर मग एकदम बुवाबाजीच्या मागे लागणारे तांडे यांच्या अधेमधे काही नसतच हा पवित्रा इतका तद्दन रद्दड वाटतो ना. नाही ना जाणून घेता येत श्रद्धा तर मग थोबाड तरी बंद ठेवा, कशाला सर्व जगाला "शहाणे" करुन सोडण्याच्या मागे लागता?
एकदम टकाटक श्याणेसुरते
एकदम टकाटक श्याणेसुरते नास्तिक नाहीतर मग एकदम बुवाबाजीच्या मागे लागणारे तांडे यांच्या अधेमधे काही नसतच ...
या अधल्यामधल्या लोकांनी 'भक्तीधुंद' हा शब्द स्वतःच्या अंगाला लावून घेण्याचं काही कारण नाही.
यनावालांचा लेख मी वाचलेला नाही, त्यावरचे प्रतिसादही वाचले नाहीत. (वाचणारही नाही, तेच-तेच वाचायचा कंटाळा येतो आणि भडकपणाची भीतीच वाटते.) 'श्रद्धा' जाणून घेता येत नाही असं नसतं, उलट आकलन बदलल्यानंतर तिचं महत्त्व वाटत नाही. 'श्रद्धा' ही निरुपयोगी आणि प्रसंगी घातक भावना वाटते.
उदा० अभ्यास केला की पास होतो
उदा० अभ्यास केला की पास होतो ही श्रद्धा (ही आषाढी कार्तिकीच्या वार्या करताना संपली)
चांगलं काम केलं की प्रमोसन मिळतं ही श्रद्धा (ही संपायच्या मार्गावर आहे)
.. वगैरे.
जो० अ० : पण
- इनपुट आणि आऊटपुटमधला कार्यकारणभाव समजलेला नसणे
- पण तरी अमुक प्रकारचं इनपुट दिलं की तमुक प्रकारचं आऊटपुट मिळेल असा विश्वास वाटणे (कारण अ: इनपुट आणि आऊटपुटमध्ये काही कोरिलेशन दिसतं म्हणून; किंवा कारण बः चार शाणी माणसं सांगतात म्हणून)
याला मी श्रद्धा म्हणतो. ती नेसेसरीली देवावरच असली पाहिजे असं नाही.
निरूपयोगी का नाही?
उदा० अभ्यास केला की पास होतो ही श्रद्धा (ही आषाढी कार्तिकीच्या वार्या करताना संपली)
चांगलं काम केलं की प्रमोसन मिळतं ही श्रद्धा (ही संपायच्या मार्गावर आहे)
म्हणजे ती निरूपयोगी आहे असं तुम्हीच म्हणताय का नाही?
श्रद्धा ही तर 'बेसलेस' असेल तर ती कशावरही असली तर ती बव्हंशी निरूपयोगीच ठरणार नाही का? अपायकारक नसेलही, कदाचित. आणि बेसलेस नसेल तर तिला श्रद्धा का म्हणावे?
व्याख्या
समस्या व्याख्येची आहे तर. कोरिलेशन वगैरे असेल तर मी तर्क, अंदाज, खात्री वगैरे शब्द वापरतो. ज्यांच्यावर भरवस आहे अशी माणसं सांगतात त्यासाठी, विश्वास, समज वगैरे शब्द वापरतो.
हे हे मॉडेल वापरलं तर असा असा रिझल्ट येईल अशी माझी श्रद्धा आहे असं मी तरी कधी म्हणत नाही. असो.
'बुडती हे जन देखविती ना डोळां'
श्रद्धेची अंधश्रद्धा कधी बनते, कधी आपण भटजी, पुजारी, मांत्रिक या प्रकारांना बळी पडतो हे ज्यांना समजत नाही त्यांच्या बाबतीत श्रद्धा ही घातक भावना वाटते.
बाकी ज्यांना आपापल्या घरांत, आपापल्या सोयीसवडीनुसार जी भक्ती, श्रद्धा आहे त्याबद्दल काहीच तक्रार नाही. जोपर्यंत स्वतःचं काही नुकसान करून घेत नाहीत, आणि इतरांना अजिबातच ताप देत नाहीत त्यांच्या श्रद्धेबद्दल आक्षेपार्ह काहीच नाही. अगदी शेंडी राखणाऱ्या, रोज संध्या करणाऱ्या मित्राबरोबर अंधश्रद्धांना नावं ठेवताना, फालतू अस्मितांबद्दल भंकस करताना, राक्षसी स्वरूप धारण करण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या धार्मिक संघटनांबद्दल चिंता व्यक्त करताना आम्हाला दोघांनाही काही अडचण वाटत नाही.
(बाकी माझ्या घरात एक मांजर आल्ये. आम्हाला एकमेकींबद्दल प्रेम उत्पन्न झालंय. अनेकांना मांजर आणि प्रेम निरुपयोगी वाटत असेल. पण त्याबद्दल आक्षेपार्ह काही वाटत नाही. तसंच.)
भक्तिधुंद
भक्तिधुंद हा शब्द मलाही आवडल्यानेच परत परत वापरतो. कट्यार नाटकातल्या, 'घेई छंद' गाण्याचे, 'घेई छंद, भक्तिधुंद' असे विडंबन करावे की काय, असे वाटू लागले आहे.
उदाहरणार्थ, काहीतरी असे,
घेई छंद, भक्तिधुंद
प्रिय हा जरी, मंद
प्रभूपूजना दंग, कर्मठांध, हा धुंद
मिटता मनचक्षुबल, होई बंदी हा गुंग
परी सोडिना फांस, भजनात हा दंग
पेशन्स असेल तर वाचून पहा.
पेशन्स असेल तर वाचून पहा. भरपूर करमणूक मटेरियल आहे.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103384/121799.html
अत्र्यांच्या कोणत्यातरी
अत्र्यांच्या कोणत्यातरी पुस्तकात अशाच एका बुवाबद्दल वाचलं होतं. अतिशय रंजक माहिती (म्हणजे त्याच्या भक्तिणी त्याच्या तळपायांना स्वतःच्या स्तनांनी मसाज करायच्या इत्यादी (हे अत्र्यांना कोणी सांगितले ते माहित नाही)).
म्हणजे पन्नास-साठ वर्षांत परिस्थिती अजिबात बदलली नाहीय; बदल एवढाच की या लेखात तितकी रंजक माहिती नाही.
हे कल्कीमहाराज काय प्रकरण
हे कल्कीमहाराज काय प्रकरण आहे?