व्हॉट्सपवरील अंधश्रद्धाप्रसार आणि या अंधश्रद्धा फॉरवर्ड करणारे म्हणजे पसरवणारे
व्हॉट्सपवरील अंधश्रद्धाप्रसार आणि या अंधश्रद्धा फॉरवर्ड करणारे म्हणजे पसरवणारे
.
व्हॉट्सअपवरील अनेक मेसेज किती मूर्खपणाचे असतात व काही लोक कसे निर्बुद्धपणे हे फॉरवर्ड करत असतात हे आपण नेहमीच पाहतो. कोणी घाबरून फॉरवर्ड करतात, कोणी केले तर काय हरकत आहे म्हणून. कोणी हे हिंदू धर्माशी संबंधित आहे, तर मग फॉरवर्ड करायला काय हरकत आहे से समजतात. पण हा असा तद्दन मूर्खपणा फॉरवर्ड करण्याच्या आपल्या बेजबाबदारपणामुळे आपण दुस-यांचे नुकसान करत असतो हेदेखील आपल्या लक्षात येत नाही.
सतत चुंबकीय, उर्जा, शास्त्रीय कारण आणि वैज्ञानिक आधार असे शब्द वापरून लोकांना मूर्ख बनवले जाते. मंदिरात दर्शनाला का जावे? या मागचा मूर्खपणाचा पसारा वाचून झाल्यावर एकजात सगळे पुजारी तपासून पहावेत. ही उर्जा दिसते तरी कशी? पुजा-याच्या चेह-यावर तेज दिसावे? की त्याच्या बुद्धीत काही जबरदस्त फरक पडलेला दिसावा? की त्याला स्पर्श केला तर आपल्याचा शॉक बसावा? त्या उर्जेमुळे सकारात्मकता वाढते म्हणे. तो पुजारी पैसे टाकले तर नारळ किंवा प्रसाद देतो म्हणू शकतो हीच त्या उर्जेतली सकारात्मकता असावी बहुतेक. तेव्हा असे काही होत नसते. किती बेअकलीपणा करावा याला काहीतरी मर्यादा हवी.
मूर्खपणा २ मध्येही हद्द केलेली आहे. बायकांनी तुळस का तोडू नये? तर तुळस हे सौभाग्याचे प्रतिक आहे म्हणून म्हणे.
देवांच्या मूर्ती किंवा फोटो एकमेकांकडे तोंड करून का नसाव्यात, विष्णूला वाहिलेले फूल आपण आपल्या डोक्यावर का ठेवू नये, असे अनेक धन्य प्रश्न आहेत व त्यांची तेवढीच हसूनहसून पोट दुखेल अशी विनोदी उत्तरे.
अमुक याचे प्रतिक आहे व तमुक त्याचे प्रतिक आहे असे म्हणून अंधश्रद्धा पसरवण्याचे हे धंदे आहेत. या अंधश्रद्धा फेकून द्या व त्या पसरवणा-यांच्या नादाला लागू नका. शक्य झाल्यास तसे करणा-यांना दोन शब्द सुनवा.
++++++++++++++++++++++++++++++
हा मूर्खपणा पसरवणे बंद करा.
मूर्खपणा १:
प्रत्येकाने एकदा वाचा...
मंदिरात का जावे?
देवपूजा का करावी?
या मागचे शास्त्रीय कारण काय?
भारतीय मंदिरे एक उर्जेचा स्त्रोत आहेत कि अंधश्रद्धा याचा शास्त्रीय दृष्टीकोनातून शोधघेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न ......
अनादी काळा पासून मनुष्य ईश्वर व ईश्वरी शक्तींच्या शोधात आहे.आता या ईश्वरी शक्ती म्हणजे काय? किंवा त्या आपले अस्तित्व कोठे दाखवतात हे पाहणे खूप महत्वाचे ठरेल.
सर्वात आधी आपण शक्ती म्हणजे काय ते पाहू. शक्ती म्हणजे चुंबकीय क्षेत्र आपल्या दैनंदिन जीवनात आपण शक्ती (power) चुंबकीय क्षेत्र निर्माण करून उत्पन्न करतो उदा: इलेक्ट्रिक मोटर यात आपण विजेच्या सहायाने चुंबकीय क्षेत्र निर्माण करतो ,त्यात शक्ती निर्माण होते व मोटर कार्य करू लागते. त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांना मानवी शक्तींचा शोध लागला तो या चुंबकीय शक्ती मधूनच. त्यांनी ओळखले कि मानवाने जर स्वत:मध्ये चुंबकीय (क्षेत्र) शक्ती निर्माण केल्या तर त्यास सर्व प्रकारच्या शक्ती व सामर्थ्य प्राप्त होऊ शकते.त्यालाच आपण ईश्वरी शक्ती म्हणतो. आणि या शक्ती निर्माण करण्यासाठी एक माध्यम हवे होते जसे मोटारीला वीज हे मध्यम आहे. आणि हे माध्यम होते पिर्रॅमीड.
पिर्रॅमीड ज्या विशिष्ट कोनात बांधला जातो त्या प्रकारच्या रचनेत मोठ्या प्रमाणात चुंबकीय क्षेत्र निर्माण होते हेआपल्या पूर्वजांनी सखोल संशोधनातून ओळखले होते. म्हणूनच आपल्या संस्कृतीतील सर्व नामांकित मंदिरेहि या पिर्रॅमिडच्या आकाराची बांधली आहेत.मंदिराचा कळस हा एक पिर्रॅमिडचा भाग आहे. म्हणून भारतातील सर्व मंदिरांचा कळस हा मुख्य भाग मानला जातो. तसेच ही सर्वमंदिरे उंच डोंगरावर बांधली गेली आहेत. उदा -तिरुपती बालाजी मंदिर, वैष्णवी माता मंदिर, अमरनाथ मंदिर. पूर्ण भारतात अशाच प्रकारे वेगवेगळ्या आकाराची , उंचीची हजारो मंदिरे विविध प्रांतात डोंगर माथ्यावरच बांधलेली आढळून येतात व हि सर्व मंदिरे वैदिक शास्त्रानुसार बांधली गेली आहेत (किंवा डोंगरावर बांधली नसली तरी पिर्रॅमिडाच्या आकाराची बांधली गेली आहेत) आणि फक्त हिंदू संस्कृतीतच नव्हे तर मुस्लीम, ख्रिश्चन या संस्कृती मध्ये सुद्धा याच तंत्र ज्ञानाचा बेमालूम वापर केला गेला आहे.
ही मंदिरे प्रामुख्याने डोंगर माथ्यावर बांधण्याचे प्रमुख कारण काय तर अशा जागेवर पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र सर्वाधिक आहे. या मागचे शास्त्रीय कारण काय असू शकते? तुम्ही जर नीट निरीक्षण केलेत तर तुमच्या लगेच लक्षात येईल की डोंगर हा पिर्रॅमीडचाच एक नैसर्गिक उत्तमप्रकार आहे. आणि या डोंगराच्या सर्वोत्तम शिखरावर सर्वात जास्त चुंबकीय क्षेत्र अस्तित्वात असते. मुख्यतः अशा जागेवर मंदिरे बांधल्याने त्या मंदिराच्या गाभार्यात चुंबकीय व विदुयत तरंग हे उत्तर व दक्षिण दिशेच्या मध्यावर एकत्रित होतात. व याच कारणाने मुख्यमूर्ती ही देवळाच्या मध्यभागी स्थापित केली जाते, त्याला "गर्भगृह" किवा "मूलस्थान" असे म्हटले जाते. खरेतर प्रथम मूर्तीची स्थापना करून मग मंदिर उभारले जाते. हा "गाभारा "म्हणजे ज्या ठिकाणी पृथ्वीचे सर्वाधिक चुंबकीय क्षेत्र असलेली जागा.
आपल्याला माहित आहे का, ताम्रपटावर काही वैदिक मंत्र लिहून त्या मुख्यमूर्तीच्या पाया खाली पुरल्या जात असत. ते ताम्रपट म्हणजे नक्की काय असते? तर हे ताम्रपट म्हणजे देव किवा पुजारी यांना श्लोक आठवून देण्यासाठी ठेवलेली पत्र नव्हेत. तर ताम्रपात्र पृथ्वीतील चुंबकीय शक्ती खेचून घेवून त्या सभोवतालच्या वातावरणात पसरवत असतात.
मंदिरात प्रदक्षिणा का घालतात? याचेही उत्तर यातच दडलेले आहे. प्रदक्षिणा म्हणजे काय तर मुळ गाभार्यातील मूर्ती भोवती एक चक्कर मारणे. म्हणजेच चुंबकीय क्षेत्र भोवती चक्कर मारणे होय. जसे इलेक्ट्रिक मोटर मध्ये शाफ्ट व रोटरच्या फिरण्याने त्या मोटर मध्ये विद्युत चुंबकीय क्षेत्र निर्माण होते त्याच प्रमाणे गाभार्यात मूर्ती भोवती फिरण्याने मानवी शरीरात चुंबकीय शक्तींचा स्त्रोत निर्माण होऊन मानवास चुंबकीय शक्तींची प्राप्ती होते ज्यास आपण ईश्वरी शक्ती मानतो.
म्हणूनच जी व्यक्ती दररोज मंदिरात येते व मुख्य मूर्तीच्या प्रदक्षिणा करतेत्या व्यक्तीचे शरीर वातावरणातील चुंबकीय तरंग शोषून घेते. ही सगळी प्रक्रिया खूप सावकाश होत असते आणि दररोज केलेली प्रदक्षिणा ह्या सर्व सकारात्मक शक्ती शरीराला ग्रहण करण्यास मदत करते. शास्त्रीयदृष्ट्या ह्या सर्व सकारात्मक चुंबकीय शक्ती आपल्या निरोगी आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असतात त्या आपणास मंदिरातूनच प्राप्त होतात.
मंदिरात ध्यान केल्याने किंवा नुसते शांत बसल्याने सुद्धा आपणास या सर्व शक्ती खूप मोठ्या प्रमाणात प्राप्त होतात. मंदिरात होणारा घंटानाद व मंत्रोचार यातून निघणार्या ध्वनी कंपनामधून मानवाच्या मेंदूतील अन्तरपटलावर या शक्तीचा परिणाम वाढतो व मनावरील ताण तणावकमी होण्यास मदत होते. मंदिरात होणारी पूजा,आरती भक्तांना त्यांचे ताण-तणाव व खाजगी प्रश्नांना (दुःख्) विसरायला मदत करते. फुलाचा सुगंध आणि कापूर व धूप या मुळे मंदिराचे वातावरण प्रसन होते. ह्या सगळ्या गोष्टी मंदिरातील सकारात्मक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
मंदिरातील “तीर्थ“ म्हणजे काय? मंदिरातील गाभार्यात असणार्या देवतेला विशिष्ट मिश्रणाने स्नान घातले जाते. हे मिश्रण म्हणजेच पाणी,दुध, मध,दही, वेलचीपूड, कापूर ,केशर, लवंग तेल, तूप, तुळशी पाने यांचे मिश्रण असते. जेव्हा ह्या मिश्रणाने मूर्तीला अभिषेक केला जातो तेव्हा मूर्ती मधील चुंबकीय शक्ती त्या मिश्रणात मिसळतात व हे मिश्रण चुंबकीय शक्तीने भरून जाते यालाच आपण तीर्थ असे म्हणतो. हे मिश्रण "तीर्थ” प्रत्येक भक्ताला प्रसाद म्हणून वाटले जाते. हे “तीर्थ” चुंबकीय शक्तीचे स्तोत्र असते. ह्या तीर्थात असलेल्या गोष्टी मुळे लवंग तेल दातदुखी कमी करते, केशर व तुळशी पाने सर्दी व खोकला या पासून संरक्षण करते आणि कापूर श्वासदुर्गंधीं नाहीशी करतो.
चुंबकीय शक्तीने भरलेले हे “तीर्थ” रक्तशुद्धी करते. हे प्रयोगावरून सिद्ध झाले आहे. म्हणूनच हे “तीर्थ“ भक्तांना प्रसाद म्हणून दिले जातं.
+++++++++++++++++
मूर्खपणा २:
देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये ?
उत्तर :-ती यमाची मृत्यू ची दिशा आहे . यमाची पुजा केली जात नाही. फक्त दिवाळीत यम व्दितीयाला यमाचे पुजन केले जाते तेव्हा दक्षिणेला दिवा लावला जातो.
स्त्रियांनी केव्हाही तुळस का तोडू नये ?
उत्तर :- ही सौभाग्य देणारी आहे म्हणून.
देव-देवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी का काढावी ?
उत्तर :- ब्रह्मरंध्राकडे निर्गुण ईश्वरी उर्जा आकृष्ट होते व ती ग्रहण करण्यासाठी टोपी काढावी.
शिवपिंडीला अर्धीच प्रदक्षिणा का घालावी
उत्तर :- शिवसुत्र आहे महादेवाचे. रद्रगण, पितृगण,लिंगाच्या टोकाला तीर्थ प्रसादासाठी बसलेले असतात. त्याना प्रदक्षिणा होईल म्हणून.
एकाच घरात दोन शिवलिंगे, दोन शाळीग्राम, दोन सुर्यकांत, दोन चक्रांक, तीन देवी, गणपती व दोन शंख पूजेस का पुजू नयेत ?
उत्तर :-प्रत्येक गोष्टीत एक तत्व असते. आई बाप दोन होऊ शकत नाही एकच असतात अव्दैताची पुजा करतात, व्दैताची पुजा केली जात नाही म्हणून
गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत का जपू नये ?
उत्तर :-हा मंत्रराज आहे, ज्या मंत्राना बीज असतात, ते मंत्र सोवळ्यातच आसनावर करायचे असतात. कारण चित्ताची एकाग्रता महत्वाची असते. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत जपताना ती एकाग्रता साधत नाही व शरीर दोष येतो अंतर्मुखता साधत नाही. त्यामुळे मंत्रजपाचे फल मिळत नाही म्हणून ....
शाळीग्राम पूजावयाचे ते सम पूजावेत. मात्र समांमध्ये दोन का पुजू नयेत ?
उत्तर :- शाळीग्राम हा स्वयंभू आहे. हे विष्णूचे प्रतिक आहे व दोन पुजले तर कर्त्याला उद्वेग, कलह प्राप्त होतो म्हणून ..
.
निरंजनात तुप व तेल कधीही एकत्र का घालू नये ??
उत्तर :- तूप हे सत्व तत्व व निर्गुण आहे व तेल हे रज तत्व व सगुण आहे . म्हणून हे दोन्ही एकत्र करता येत नाही . नाहीतर तम तत्व वाढेल . राक्षसी संकटे येतील म्हणून .
देवदेवतांच्या मूर्तीची वा फोटोची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर का
करू नयेत ?
उत्तर:- त्यांच्या तेजाच्या लहरी स्पंदने समोर फेकली जातात त्यामुळे शत्रुत्वाचा दोष येतो म्हणून ...
विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फुल मनुष्याने आपल्या मस्तकावर का ठेवू नये ?
उत्तर :-फुले ही देवतांची पवित्रके आहेत. विष्णुतत्त्व व चैतन्य त्या फुलात येते ते शक्तीस्वरुप होते ही शक्ती आपणास सहन होत नाही म्हणून ..
शिव मंदिरात झांज, सूर्य मंदिरात शंख व देवी मंदिरात बासरी का वाजवू नये ?
उत्तर :-शिवाचा तमभाव आहे व झांजेतुन तमतत्वाचे स्वर उत्पन्न होतात त्यामुळे शिवास विरक्ती येते म्हणून...
सर्य हा अग्नी तत्त्वाचा आहे व शंखनादही अग्नीतत्वाचा आहे दोन्हीही शक्ति एकरूप झाल्यावर रज कणाचे घर्षण होते . सुक्ष्म ज्वाळाची निर्मिती होते व त्यामुळे दाह निर्माण होतो म्हणुन...
देवी मंदिरात बासरी ही नाद पोकळी निर्माण करतो . शक्तीतत्व ह्या नादात पोकळीत रहात नाही . ती हिरण्यगर्भा आहे . ती प्रसूति वैराग्य आहे ..
आपली जपमाळ व आसन कधीही दुस-यास वापरण्यास का देवू नये ?
उत्तर:- त्यात आपल्या सेवेच्या सात्विक लहरीचे बंधन झालेले असते . ते दुस-यास दिल्यास त्याला ते मिळते व साधनेत त्या आसनावर आळस येतो .....
देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध का लावावे
उत्तर :- हाताची पाची बोटे ही त्या त्या तत्वाशी निगडीत आहेत .
अंगठा -आत्मा/
तर्जनी -पितर/
मध्यमा-स्वतः/अनामिका -देव/करंगळी -ऋषी /
म्हणून देव बोटानेच देवाला गंध लावावे...
समईत नेहमी १, ३, ५, ७ अशा विषम वाती का असाव्यात सम का असू नयेत.
उत्तर :-विषम तत्व हे तम आहे त्यामुळे आपल्याकडे येणारे तम ते विषम उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते म्हणून......
अंगावर फाटलेला कपडा कधीही का शिवू नये.
उत्तर :-पितराना दोष लागतो म्हणून .
उंब-यावर बसून का शिंकू नये ?
उंबरा हा मुळात बसण्यासाठी नाही. तेथे सर्वतिर्थे बसतात. तिथे घराची सात्विक ऊर्जा स्तंभित असते. शिंकेने तिला व्यास येतो त्यामुळे अपशकुन घडतो म्हणून..... घडल्यास पाणी शिंपडावे......
निजलेल्या माणसास का ओलांडून जावू नये.
उत्तर :- झोपलेला शव असतो म्हणजे शिव असतो म्हणून ..
मांजराना प्रेत ओलांडून का देवू नये
उत्तर :- प्रेत प्रेतच राहते म्हजे पिशाच्च योनित जाते त्याला मोक्ष प्राप्ती होत नाही म्हणून ..
रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीद का आणू नयेत किंवा दुस-यास का देवू नयेत ?
उत्तर :- याच्यात करणीतत्व आहेत. आकर्षण क्रिया पटकन होते व बळीतत्त्व आहे म्हणून ....
सायंकाळी केर का काढु नये ?
उत्तर :- लक्ष्मीला आवडत नाही. लक्ष्मी हळूहळू निघून जाते व अलक्ष्मीला आवडते...
रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार का करावा.
उत्तर :- शव= शिव म्हणून नमस्कार करावा....
कुणाच्या घरातून परत निघताना जातो असे न म्हणता येतो असे का म्हणावे ?
उत्तर :-येणे घडते नाहीतर कायमचे जाणे होते...
एका हाताने देवाला नमस्कार का करू नये.
उत्तर :- दश इन्द्रियाचा नमस्कार मह्त्वाचा असतो . पंचतत्त्वाचा नाही ...
फार फार वर्षांपूर्वी जेव्हा
फार फार वर्षांपूर्वी जेव्हा लोकांना अचानक इ-मेल ह्या गोष्टीचा शोध लागला, तेव्हाही असलेच प्रकार चालत.
आता इ-मेल आयुष्याचा (अविभाज्य! येस, यू गॉट इट) भागच असल्याने असले चाळे दुर्लक्षित करायला आपण शिकलो आहोत. त्याला "स्पॅम" वगैरेही लावता येतातच.
दुर्दैवाने व्हॉट्सअॅप्/फेसबुकचं मॉडेल थोडं वेगळं आहे त्यामु़ळे तिथे दुर्लक्ष करणं कठीण.
पण म्हणून असली चिंधीगिरी दिसली तर ती सोडू नये.
त्यावर उपाय म्हणून -
१. शंका विचाराव्यात.
२. ह्या गोष्टीची वारेमाप स्तुती करून मग नेणतेपणाचा आव आणून "पण मग असं का?" अशी सुरूवात करावी.
३. सरळसरळ "मूर्खपणा आहे." म्हणून टाकावं आणि पुरावे द्यावेत.
नाहीतर लोक विचार न करता "कस्लंभारीना!" म्हणून बटण दाबून टाकतात. की मग हा प्रकार आणखी शंभर लोकांच्या टाळक्यात घुसायला तयार.
हा लेख दहा ओळींचा आणि
हा लेख दहा ओळींचा आणि त्याखाली चिकटवलेल्या अंधश्रद्धात्मक गोष्टी शंभर ओळींच्या. जे पसरवू नका म्हणून लेखक सांगत आहे, तेच लेखकाने इथे डकवून त्याचा आणखीनच प्रसार केलेला नाही का? सगळं न डकवता त्यातली एक-दोन वाक्यं उद्धृत करणं अधिक योग्य झालं असतं. त्यासाठी जे कष्ट पडले असते ते घ्यायची तयारी इथे दिसत नाही.
मला तुमच्या प्रतिसादांमधून एक
मला तुमच्या प्रतिसादांमधून एक पॅटर्न दिसायला लागलेला आहे. कोणीही लेखनाबद्दल काहीही सूचना केली की सूचना करणारांचंच लॉजिक चुकीचं असतं, त्यांचेच गैरसमज झालेले असतात, तेच पुरेसा आदर दाखवत नाहीत असं तुम्ही वारंवार म्हणत असता. ही फारशी चांगली भूमिका नाही. ऐसीवर वेगळे विचार मांडणारांच्या मताचीही कदर केली जाते, जोपर्यंत त्यांनी ते पुरेसे कष्ट घेऊन विचारपूर्वक मांडलेले असतात तोपर्यंत. मात्र योग्य ते उत्तर प्रामाणिकपणे देण्याऐवजी जर टीका करणारावरच अपमानास्पद आरोप केले तर वाचक त्यामुळे दुरावतात हा अनुभव आहे. त्याचा फायदा करून घ्यायचा की नाही हे तुम्ही ठरवा.
Don't put ideas in that head!
शेवटचा प्रयत्न -
काय अंधश्रद्धा पसरवल्या जातात त्यांची लांबचलांब फॉरवर्ड्स इथे डकवण्याजागी त्यात नक्की काय अवैज्ञानिक, अंधश्रद्ध आहे याबद्दल विवेचन आलं असतं, या फॉरवर्ड्सना लोक बळी का पडत असतील याबद्दल काहीतरी सिद्धांत (भले त्यामागे काही आधार का नसेना) आला असता तर निदान काही कष्ट केल्यासारखं वाटलं तरी असतं. एरवी अशी फॉरवर्ड्स पाठवायला व्हॉट्सअॅप आहे. इथेही लोकांना तेच देऊन का पकवायचं?
एवढी टीकाही सहन होत नसेल तर प्रतिसादकांनी दुर्लक्ष नावाचा एक प्रतिसाद द्यायला शिकण्याची वेळ आलेली आहे.
कमेंट करणा-याची काहीच जबाबदारी नाही का?
त्याचे कारण येथे मूळ पोस्ट सोडून भलत्याच मुद्द्यांवरून पोस्टकर्त्यावरच आरोप करणे चालू झालेले आहे. खालचीच कमेंट पहा. 'एरवी अशी फॉरवर्ड्स पाठवायला व्हॉट्सअॅप आहे. इथेही लोकांना तेच देऊन का पकवायचं?' मी व्हॉट्सअपवरचे मेसेज तेथेही फॉरवर्ड करत नाही तर येथे तसे कशाला करेन? ते मेसेज देऊन त्याविरूद्धची एक स्पष्ट कमेंट आहे. त्यात दोन्ही मेसेजेसमधील प्रत्येकी एका मूर्खपणाचे उदाहरण देऊन त्यावर कमेंट आहे. ते मेसेज का दिले आहेत? कोणत्या प्रकारच्या अंधश्रद्धा असू शकतात याची वाचकांना कल्पना येऊ शकते. तरीही तुम्ही त्याला अंधश्रद्धांचा प्रचार म्हणता. म्हणून त्यामागे काय लॉजिक आहे हे विचारले तर तुम्ही म्हणता तसे समज करून घेता.
मुळात जी पोस्टच अंधश्रद्धांना विरोध करणारी आहे ती त्याचा प्रसार करणारी कशी असेल याचा विचार न करता 'अंधश्रद्धांचा प्रसार करतो' हाच आरोप मुळात बेजबाबदारपणाचा नाही का? मग त्याला प्रमाणिकपणाने कसे उत्तर द्यायचे?
प्रत्येक वेळी पोस्ट अशी असायला हवी होती, लेखकाने याच्याऐवजी असे करायला हवे होते हा उपदेश कशासाठी? जे लिहिले आहे त्यावर ऑब्जेक्टिव्ह कमेंट करताच येत नाही का?
३_१४ विक्षिप्त अदिती यांचीही इथली कमेंट अगदी तशीच आहे.
उपदेश नको. लेखकावर हेत्वारोप नकोत. जे लिहिले आहे ते सोडून भलतेच विषय त्यात आणून जणू काही लेखकााने त्यांचा उल्लेख केला नाही म्हणजे लेखकाचा त्या चुकीच्या गोष्टींना पाठिंबाच आहे समजून लेखकावर हल्ला चढवणे हे प्रकार त्यांनी येथेच नव्हे तर माझ्या दुस-या पोस्टवरही केले आहेत. तुम्ही स्वत: पाहू शकता. वर माझ्याच पोस्टकडे दुर्लक्ष करण्याबद्दल सांगण्याचा मानभावीपणा मात्र त्यांच्याकडे आहे.
अशी परिस्थिती असतानाही तुम्ही फक्त माझ्याकडून अपेक्षा ठेवता ही खरेतर मौजेची बाब आहे.
तुम्ही स्वत: कोल्हटकरांच्या कमेंटच्या बाबतीत काय केलेत हे मी तेथेही दाखवले आहे.
माझ्यावर कोणताही आरोप न करणारी, खोडसाळपणा नसलेली कमेंट असली तर माझी त्यावरची कमेंटही तशीच असेल याची खात्री. तेथे मी कोणालाही वैयक्तिकपणे ओळखत नाही, तेव्हा कोणाचा खोडसाळपणा सहन करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. हा खोडसाळपणा म्हणजे नवीन सदस्याचे रॅगिंग आहे. अाता रॅगिंगबाबतची तुमची भूमिका काय आहे ते तुम्ही सांगा. शिवाय अशी परिस्थिती असताना ऐसीअक्षरे या पोर्टलच्या श्रेष्ठत्वाच्या गप्पा तुम्ही मारता. कमाल आहे.
टीका वस्तुनिष्ठ हवी. रॅगिंग नको.
योग्य कारण असेल तर टीका जरूर करावी. कठोर म्हणजे काय माहित नाही. त्यात वैयक्तिक किंवा भलत्याच मुद्द्यावरून टीका करण्याचा अंश असेल तर खिलाडूपणाने घेतले जावे हे विसरावे. तसे नसेल तर मग पोस्टकर्त्याकडून होणारी प्रतिटीकाही खिलाडूव्ृत्तीने घ्यावी. वन वे ट्रॅफिक नको. सगळेच भलत्याच मुद्द्यावरून व वैयक्तिक आरोप करत झोडपताहेत आनि पोस्टकर्ता 'खिलाडूपणाने' सगळे गुमाने ऐकून घेत आहे. एकदा डोळ्यासमोर आणून पहा हा प्रकार म्हणजे तुमच्या या वाक्याची प्रचिती येईल. ते वाक्य बदलून 'लेखनावर वस्तुनिष्ठ कठोर टीका होऊ शकते' असा बदल करता येतो का ते पहा. अन्यथा रॅगिंगला तुमची मान्यता आहे असा त्याचा अर्थ होतो.
आचरटपणा आहे.
आचरटपणा आहे.