Skip to main content

गौतमशेटचं उडालंय मन शहरावरून

नव्वदोत्तरी कविता.

गौतमशेटचं उडालंय मन शहरावरून

लेखक - अरुण काळे

प्रश्नांची झाडं लावणारे
फरार आहेत उत्तरांसहीत
चळवळीच्या चेंडूला शोधायला
शहरातले गेलेत जंगलात काही
दलित, शोषित, पीडीत ह्यांचे
हरवून गेलेत अर्थ
चैत्यभूमीतून उठणार होतं एक वादळ
सालाबादप्रमाणे त्याला शोधण्यात आलं
अरबी समुद्रात
मैदान राखतंय मोर्चाची इज्जत
मिडिया कार्यकर्त्यांनी वाकवलंय स्टेज
रेतीत खेळणाऱ्यांची जुने-जाणते घेतात सामान्यज्ञान टेस्ट
काही खात्यांच्या प्रमुखांची नावे सांगा?
उदाहणार्थ —
अन्न आणि तुरुंग
जंगल आणि नागरी पुरवठा
माहिती आणि पाटबंधारे
वीज आणि शिक्षण
आदिवासी विकास आणि दारूबंदी प्रचारकार्य
गृह आणि समाजकल्याण
अर्थ आणि आरोग्य
ही कंची खाती?
गीताबाई हसतेय गालात
नव्यांनी तुडवलं सामान्यज्ञान रेतीत
निस्कारण आलो की काय सारं सोडून?

गौतमशेटचं उडालंय मन
शहरावरून

---

(संग्रह - नंतर आलेले लोक, २००६; प्रकाशक : लोकवाङ्मय गृह)
परवानगीसाठी आभार : श्रीमती कल्पना अरुण काळे

सर्व प्रताधिकार श्रीमती कल्पना अरुण काळे यांच्याकडे आहेत. मजकूर पूर्णत: वा अंशत: प्रकाशित वा कुठल्याही माध्यमातून प्रसारित करण्यासाठी त्यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच अशा कुठल्याही प्रसारित/प्रकाशित केलेल्या मजकुरासोबत प्रस्तुत लेखाचा 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावरील दुवा (weblink) देणे आवश्यक. ते शक्य नसल्यास ' 'ऐसी अक्षरे' - दिवाळी अंक २०१५ (http://aisiakshare.com/diwali15) मधून' असे नमूद करणे बंधनकारक राहील.

विशेषांक प्रकार