परदेशातून मराठी नियतकालिक चालवताना...

मुलाखत विद्युल्लेखा अकलुजकर एकता नियतकालिक

परदेशातून मराठी नियतकालिक चालवताना... - विद्युल्लेखा अकलूजकर यांची मुलाखत

लेखक - जयदीप चिपलकट्टी

'एकता' त्रैमासिकाच्या सल्लागार संपादक विद्युल्लेखा अकलूजकर यांची मुलाखत

'एकता' हे नियतकालिक गेली सदतीस वर्षे टोरांटोहून प्रसिद्ध होतं आहे; भारताबाहेर स्थायिक झालेले मराठी भाषिक हा त्याचा मुख्य वाचकवर्ग आहे. अंदाजे साठ पानांचा एक असे त्याचे वर्षातून चार अंक निघतात. कथा, कविता, विविध विषयांवरचे माहितीपूर्ण लेख, पुस्तक-परीक्षण, चित्रकोडं, शब्दकोडं, पद्य समस्यापूर्ती, वधुवरांसाठी जाहिराती अशा कित्येक गोष्टींचा त्यात समावेश असतो. (नियतकालिकाबद्दल अधिक माहिती इथे पाहता येईल.) लेखन आणि संपादन ह्या दोन्ही अंगांनी 'एकता' शी अनेक वर्षे संबंधित असणाऱ्या विद्युल्लेखा अकलूजकरांची 'ऐसी अक्षरे' तर्फे जयदीप चिपलकट्टींनी घेतलेली ही मुलाखत. (दोघांची बऱ्याच वर्षांपासून अोळख असणं हे 'विद्युत' असा एकेरी उल्लेख होण्यामागचं स्पष्टीकरण आहे.)

ऐअ: विद्युत, आधी मला 'एकता' बद्दल प्राथमिक माहिती सांग. सुरुवात केव्हा झाली, आणि तुझा सहभाग केव्हापासूनचा आहे वगैरे..

विअ: 'एकता' हे त्रैमासिक टोरांटोच्या काही मराठी भाषाभिमानी मंडळींनी १९७९ साली सुरू केलं. विनायक गोखले हे पहिल्यापासून त्याच्या संपादनाचं काम पाहात; १९८९ पर्यंत ते एकटेच संपादक होते. त्यांची बायको प्रतिभा गोखले, दुर्गा पाच्छापूरकर वगैरे टोरांटोची मंडळी ते लिहून काढण्यासाठी हातभार लावत असत.

त्यावेळी, म्हणजे १९८८ च्या सुमाराला, सलमान रश्दीची 'सटॅनिक व्हर्सेस' ही कादंबरी प्रसिद्ध झाली, आणि तिचं अशोक काळ्यांनी टोपणनावाने केलेलं भाषांतर 'एकता'मध्ये क्रमाक्रमाने छापून येत होतं. त्यावर मी तपशीलवार आणि भरघोस टीका लिहून काढून 'एकता'ला पत्र लिहून कळवली, आणि गोखल्यांनी ती तशीच्या तशी छापून टाकली. मी त्यांना म्हणाले होते की हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे, त्यामध्ये तऱ्हतऱ्हेचे संदर्भ येतात, तेव्हा त्यांची नीट माहिती नसताना अर्धवट भाषांतर आणि अर्धवट रूपांतर असं वळण देऊन काहीतरी केलेलं - तेही रश्दीचा कॉपीराईट असूनदेखील त्याची परवानगी न घेता - तुम्ही छापू नका. शिवाय त्यात भाषांतराच्या खूप ढोबळ चुका होत्या, त्या तशा का आहेत हेही मी पुरावे देऊन सांगितलं होतं. या सगळ्यामुळे 'एकता'च्या कामावर गंडांतर येऊ नये असा त्यामागचा माझा विचार होता. मग ते भाषांतर येणं त्यापुढे बंदच झालं. अशा प्रकारे 'एकता'शी माझा पहिला संपर्क आला. पुढे १९८९ ते १९९९ ही दहा वर्षं गोखल्यांबरोबर मी सहसंपादक म्हणून काम केलं. संपादक म्हणून गोखले निवृत्त झाल्यानंतर वर्षभर एकट्याने संपादन केलं. सध्या पेनसिल्वेनियात मन्रोव्हिलला राहणारे अरुण जतकर हे संपादक आहेत. मी सल्लागार संपादक किंवा संपादन सल्लागार काहीही म्हण - या पदावर काम पाहते. मात्र अंकाची अक्षरजुळणी आणि मांडणी करणं, अर्थव्यवस्था पाहणं, वितरण अशा कामांत गोखल्यांचं संपूर्ण कुटुंब अजूनही गुंतलेलं असतं.

ऐअ: 'एकता' चा वाचकवर्ग कोण असतो?

विअ: बहुतेक वाचक हे उत्तर अमेरिकेत आलेल्या मराठी माणसांच्या पहिल्या पिढीतले आहेत. आपापल्या क्षेत्रात सुस्थिर असलेले, त्यातले काही नावलौकिक मिळवून असलेले, सर्वसाधारणपणे आर्थिक सुबत्तेत राहणारे असे ते आहेत. आपल्या नंतरच्या उत्तर अमेरिकेत वाढणाऱ्या पिढीचा मराठीशी आणि महाराष्ट्राशी संपर्क राहावा अशीही त्यांची इच्छा असते. युरोपात, विशेषत: इंग्लंडमध्ये राहणारे अनेक वाचक आहेत; याखेरीज फ्रान्स, जर्मनी, कुवेत अशा काही ठिकाणी तुरळक संख्येने आहेत. एकूण वर्गणीदार सातशेच्या घरात आहेत, त्यातले चारशे तेहतीस आजीव वर्गणीदार आहेत. पण प्रत्यक्षात 'एकता' वाचणाऱ्यांची संख्या यापेक्षा खूपच जास्त आहे. मित्रमैत्रिणींकडून घेऊन जाणारे, माझ्या घरी मी मोफत वाचनालय चालवते तिथून घेऊन जाणारे असे भरपूर आहेत. शिवाय महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरातल्या सोळा सार्वजनिक वाचनालयांत आम्ही विनामूल्य अंक पाठवतो.

ऐअ: इथे उत्तर अमेरिकेत जन्मलेले दुसऱ्या पिढीतले वाचक फारसे नसतात असा माझा अंदाज आहे. हे खरं का?

विअ: खरं आहे. त्याचं कारण असं की इथे वाढणाऱ्या मुलांना मासिकातलं मराठी वाचता यावं यासाठी बोलावाचायचा सराव लागतो, ते शिकवण्यासाठी त्यांच्या आईवडिलांना भरपूर श्रम घ्यावे लागतात - पण तसं होत नाही. तेवढी तयारी नसेल, ते जमलं नसेल असं काहीही कारण असू शकेल. हे मी गोखल्यांनाही पूर्वी विचारलं होतं. त्यांचंही म्हणणं असं की तुरळक इकडचे तिकडचे दोनचार वगळले तर नव्या पिढीतले कोणी वाचक आहेत असं वाटत नाही. पण नव्या पिढीचा सहभाग वाढावा म्हणून 'एकता' मध्ये आता इंग्रजी विभाग सुरू केला आहे, त्यात मात्र अनेकजण भाग घेत असतात. अर्थात मराठी बोलू शकणारे दुसऱ्या पिढीत खूपजण आहेत, पण साहित्यिक स्वरूपाचं लिखाण वाचू शकणारे फारसे नाहीत.

याउलट कॅनडात विशेषत: जे पंजाबी लोक आले, त्यांच्या तीनेक पिढ्या मी पाहिलेल्या आहेत. त्यांच्या पहिल्या पिढीतले लोक हे मुख्यत: कामगार किंवा शेतकरी वर्गातून आलेले होते. त्यांना मुळात इंग्रजी भाषा परकी वाटते, आणि अजूनही त्यांतल्या अनेकांना व्याकरणशुद्ध इंग्रजी बोलता येतं असं दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या घरातल्या सगळ्या पिढ्या आपापसांत पंजाबीच बोलताना दिसतात, शिवाय त्यांचे करमणुकीचे बहुतेक कार्यक्रम गुरुद्वारांशी संबंधित असतात, पंजाबीमध्ये इथे रेडियोसुद्धा असतो. परिणामी त्यांच्या पुढच्या पिढीतल्यांची पंजाबीतली तयारी उत्तम असते. मात्र इथे येणारी मराठी माणसं त्यांच्या नेमकी उलट असतात. त्यांपैकी पहिल्या पिढीतलेही अनेकजण इंग्रजी बोलण्यातच धन्यता मानणारे असतात, तेव्हा त्यांच्या मुलांच्या भाषेला तरी खतपाणी कुठून मिळणार?

ऐअ: मान्य! आता मला 'एकता'मधल्या वेगवेगळ्या सदरांबद्दल काही सांग - तू सुरू केलेली किंवा तुझ्या विशेष आवडीची.

विअ: अगदी सुरुवातीच्या काळात अजिता काळेने 'घराबाहेर पडून नोकरी करणाऱ्या बायकांची मनोगते' या विषयावर एक सदर सुरू केलं होतं. त्यासाठी कितीतरी बायकांच्या मुलाखती घेऊन, त्या मराठीत लिहून काढून मी तिला पाठवून दिल्या होत्या. त्यानंतर 'मुळामुठा' हे टोपणनाव घेऊन मी मिश्रविवाहांवर एक लेखमाला चालवली. त्यामध्ये मिश्रविवाहातल्या जोडप्यांशी मुद्दाम वेगवेगळ्या वेळी बोलून - म्हणजे बायको हजर नसताना नवऱ्याशी आणि नवरा हजर नसताना बायकोशी (पण दोघांना प्रश्न एकच!), ह्या मुलाखती संकलित करून प्रसिद्ध केल्या. या मुलाखतमालेचं नाव 'कृष्णा मिळाली कोयनेला' असं होतं. मराठी-डच, मराठी-जपानी, हिंदू-मुस्लिम, अमेरिकेत जन्मलेली-भारतात जन्मलेला अशासारखी ती जोडपी होती. एक सामाजिक अभ्यास म्हणून ते महत्त्वाचं होतं. ही लेखमाला लोकांना आवडलीही. अशा एकून आठ मुलाखती मी छापल्या. 'एकता' त्रैमासिक असल्यामुळे त्याला दोन वर्षं लागली. पण हे खूप वेळ घेणारं काम असल्यामुळे शेवटी मी ते थांबवलं.

'एकता' मध्ये सुरुवातीला शब्दकोडं हा प्रकार नव्हता. पण जतकर जेव्हा संपादक झाले तेव्हा त्यांनी 'अॅनाग्राम' या विषयावर 'पवार गाढ झोपला तरी' या नावाने एक लेख लिहिला, आणि गंमत म्हणून एक शब्दकोडं त्यात टाकलं. मग काही काळ मी ते पुढे नेलं, आणि माझ्यानंतर सुषमा येरवडेकरने कित्येक वर्षं ते छान चालवलं. यानंतर 'मराठीचा पापड' या नावाने त्याचं एक संकलित पुस्तकही तिने प्रसिद्ध केलं.

याखेरीज 'आस्वाद' या नावाने कवितांचं रसग्रहण करणारं एक सदर २००० साली सुरू झालं आणि अजूनही आहे. त्यातले सुरुवातीचे दोनतीन लेख मी लिहिले; माझ्या आठवणीप्रमाणे मी तांब्यांच्या 'डुमडुमत डमरू' या रचनेवर, तसंच ग. दि. माडगूळकरांच्या 'नदीचे माहेर'वर लिहिलं होतं. नंतर इतर पाचसहाजणांनी प्रत्येकी एखाददुसरा लेख लिहिला आणि मग सर्वांत जास्त म्हणजे सदतीस लेख लिहून स्वागता पंडितने २०१३ सालापर्यंत ते सांभाळलं. त्या सालच्या दिवाळी अंकापासून ते सदर पुन्हा मी चालवू लागले.

त्याखेरीज दरवर्षी 'एकता'च्या दिवाळी अंकामध्ये कथास्पर्धा असते, आणि त्यासाठीच्या तीन परीक्षकांपैकी मी एक असते. काही वर्षांपूर्वी यातल्या बक्षीसपात्र कथा निवडून त्यांचा संग्रह 'विदेशिनी' या नावाने टोरांटोच्या 'एकता पब्लिकेशन'तर्फे मी प्रकाशित केला होता. या संग्रहाची संकल्पना, कथांची निवड, संपादन आणि मुंबईत जाऊन 'लोकवाङ्मय गृहा'कडून छापवून घेणे वगैरे सर्व बाळंतपण मी केलं.

'एकता'मध्ये १९९४ पासून २०१२ पर्यंत 'समस्यापूर्ती' हे सदर चालू होतं. सुरुवातीला 'चंद्रमुखी' या टोपणनावाने दिलीप चित्र्यांनी ते चालवलं. त्यानंतर 'चक्रवाक' या नावाने श्रीनिवास आणि शैलजा माट्यांनी चालवलं. त्यांनी ते काम थांबवल्यानंतरही जतकरांना ते बंद करायचं नव्हतं, तेव्हा त्यांनी आणि मी सामायिकपणे हाती घेऊन सुमारे अकरा वर्षं चालवलं. जुन्या आणि प्रचलित मराठीतली बहुतेक सगळी वृत्तं आमच्या लेखांतून येऊन गेलेली आहेत. 'समस्यापूर्ती' ही स्पर्धा म्हणून चालवली जात असे. तिचं स्वरूप असं : प्रत्येक अंकात काही ठराविक वृत्तांची (मंदाक्रांता, शिखरिणी …) सोदाहरण वर्णनं दिली जात आणि प्रत्येकी एक संकल्पनात्मक ओळ दिली जात असे. दिलेल्या ओळीच्या भोवताली त्याच वृत्तात आणखी तीन ओळी रचून स्पर्धकाने या संकल्पनेचा विस्तार करायचा असे. आलेल्या रचनांपैकी कोणत्या सरस वाटल्या किंवा कशांत कोणत्या त्रुटी आढळल्या याची चर्चा करून पहिला-दुसरा वगैरे क्रमांक त्याच्या पुढच्या अंकात जाहीर केले जात. ('समस्यापूर्ती'चा एक पूर्वप्रकाशित नमुना इथे वाचायला मिळेल.) या सदराला वाचकांचा सर्वात उत्साहाचा प्रतिसाद मिळाला, आणि ते बंद केल्यानंतर अनेकांनी आपल्या तीव्र प्रतिक्रियाही नोंदवल्या. आजही त्यातले अनेक जुने स्पर्धक माझ्याशी कवितांवर चर्चा करीत असतात.

याशिवाय 'आजीआजोबा आणि नातवंडे' या नावाने एक सदर मी २०१२ पासून चालवते आहे. 'एकता'च्या वाचकवर्गातल्या लेखक-लेखिकांचे स्वानुभव त्यात ग्रथित केलेले आहेत. आपापल्या आजीआजोबांच्या अनुभवांपासून नातवंडांपर्यंत अशा पाचसहा पिढ्यातल्या नात्यांचा, ताणतणावांचा, चिवट धाग्यांचा असा हा अनुभवपट आहे. स्थलांतरित कुटुंबांचा हा एक महत्त्वपूर्ण सामाजिक दस्तऐवज ठरेल असा माझा विश्वास आहे.

शेवटी 'एकता'चं जे मला एक वैशिष्ट्य म्हणून वाटतं ते सांगते. कुठलीही सरकारी मदत न घेता, केवळ वर्गणीदार आणि काही तुरळक देणगीदार यांच्या आश्रयाने चालणारं, उत्तर अमेरिकेतलं मराठी माणसांसाठीचं हे एकमेव त्रैमासिक आहे. नियतकालिक या शब्दाला पात्र ठरेल इतक्या नियमितपणे गेली सदतीस वर्षे ते प्रकाशित होत आलेलं आहे. निव्वळ जिद्दीने आणि प्रसंगी पदरमोड करून झटून प्रयत्न करून हा डोलारा आम्ही उभा ठेवलेला आहे.

✻ ✻ ✻

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

निलोत्पलास नयनी, मुखी अम्बुजास,
दन्तांत कुंद , अधरी नवपल्लवास
अंगात चंपक भरुनि तुझ्या विधीने,
चित्ती शिला कुठुनी गे भरली न जाणे

सुंदर! प्रेयसी ही निर्दयच असते युनिव्हर्सल अनुभव Smile
___
"कृष्णा मिळाली कोयनेला" मधील काही भाग वाचायला आवडला असता. कल्पना अतिशय रोचक आहे.
____
मुलाखत खूप आवडली. वर्गणीदार व्हायचे असल्यास कसे होता येईल> मला व सासूबाईंना हे मासिक नियमित वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

> मुलाखत खूप आवडली. वर्गणीदार व्हायचे असल्यास कसे होता येईल?

थॅँक यू. वर्गणीविषयी माहिती www.ekata.ca या ठिकाणी डाव्या पॅनेलमध्ये दिलेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

धन्यवाद Smile
___
ईमेल करुन माहीती मागवली आहे. लवकरात लवकर वर्गणीदार होण्याचा प्रयत्न करेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चिकाटीला सलाम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!