Skip to main content

एक मुलगा उदास कोणाचा

मान ठेवा कशास कोणाचा
कोण होईल दास कोणाचा

एकमेकांस वाहुनी पाहू
भार होतो कुणास कोणाचा

केवढा खिन्न वाटतो रस्ता
ठप्प झाला प्रवास कोणाचा

शेकडो हूड छोकर्‍यांमध्ये
एक मुलगा उदास कोणाचा

ईप्सिते क्लिष्ट होत जाणारी
काय तगणार ध्यास कोणाचा

भुलवणे ही तुझी नशा मानू
गुंतलो तो विलास कोणाचा

-विजय दिनकर पाटील

धर्मराजमुटके Fri, 24/07/2015 - 22:29

दोन दिवस उलटून गेले तरी एकही प्रतिसाद नाही म्हणून तुम्ही उदास होऊ नये आणि तुमचे मनोधैर्य टिकविण्यासाठी हा प्रतिसाद. लिहत रहा.

तिरशिंगराव Sat, 25/07/2015 - 13:02

एकमेकांस वाहुनी पाहू

एकमेकांस वाकुनी पाहू, असे लिहिले असते तर जास्त प्रतिक्रिया आल्या असत्या.

ऐसीवर बाळबोध लेखनाला फारसे प्रतिसाद येत नाहीत. कारण इथे उच्च विद्वान वावरतात.

विजय दिनकर पाटील Sun, 26/07/2015 - 09:17

In reply to by तिरशिंगराव

धन्यवाद तिरशिंगराव,

इथेच नव्हे तर आंतरजालावर चहुकडेच असे 'झट्पट विद्वान' उगवलेले आहेत. प्रत्येकाचा स्वतःला विद्वान समजण्याचा अधिकार कोणी हिरावून घेऊ शकत नाही :;

पिवळा डांबिस Sun, 26/07/2015 - 00:12

एकमेकांस वाहुनी पाहू
भार होतो कुणास कोणाचा
केवढा खिन्न वाटतो रस्ता
ठप्प झाला प्रवास कोणाचा

लिहितांना तुमच्या मनात काय अर्थ होता ते मला अर्थातच ठाऊक नाही, पण मला या ओळी वाचतांना कुठेतरी स्वतःचाच क्रूस खांद्यावर वाहून वधस्थलाकडे नेणारा येशू ख्रिस्त आठवला........

.शुचि. Tue, 28/07/2015 - 00:23

आवडली आहे. अशा प्रकारच्या कविता आवडण्याकरता एक प्रकारचा उदास, mellow मूड बनावा लागतो. आज तसा बनला असल्याने कविता आवडली.

शेकडो हूड छोकर्‍यांमध्ये
एक मुलगा उदास कोणाचा

:(

एकमेकांस वाहुनी पाहू
भार होतो कुणास कोणाचा
केवढा खिन्न वाटतो रस्ता
ठप्प झाला प्रवास कोणाचा

या ओळी विशेष आवडल्या.