बंगाली चित्रपट परीक्षण - 'आशा जावार माझे'

काही दिवसांपूर्वी कोर्ट चित्रपटाबद्दल लिहिताना मी असे म्हटले होते कि दैनंदिन घटनांचे चित्रण पाहायला मला आवडते. 'कोर्ट' मध्ये न्यायालयातील सुनावणी ही अश्याच दैनंदिन गोष्टींपैकी होती. 'कोर्ट' पाहून झाल्यावर लगेचच तश्याच धाटणीचा एखादा चित्रपट पाहायला मिळेल असे वाटले नव्हते. पण ती वेळ काल आली.
'आशा जावर माझे' हा बंगाली चित्रपट. पण इथे भाषा कोणती याचा काहीच फरक पडत नाही कारण चित्रपटात संवादच नाहीत. पार्श्वसंगीत सुरु असते, लोक बोलतात, रेडीओ वर गाणी सुरु आहेत पण चित्रपटामधील मुख्य पात्रे मात्र काहीच बोलत नाहीत. या चित्रपटाचे इंग्रजी मधील नाव आहे - लेबर ऑफ लव्ह. परंतु हे शब्दशः भाषांतर नाही. शब्दशः भाषांतर आहे In between coming & going. चित्रपट पाहिल्यावर हे शीर्षक खूपच योग्य वाटते.
गेल्या १-२ वर्षात इतका सुंदर आणि प्रतिमांचा भरगच्च वापर असलेला, रोमँटिक चित्रपट पाहण्यात आला नाही. या चित्रपटाला ६२ व्या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट ऑडीओग्राफी असे दोन पुरस्कार मिळाले आहेत.

(चित्रपटामध्ये तपशीलावर जास्ती भर असल्याने ते न सांगता काहीच लिहिणे शक्य होणार नाही. तेव्हा ज्यांना कुणाला हा चित्रपट पहायची इच्छा असेल त्यांनी कृपया कथा वाचू नये. )
------------------------------------------------------------------------------------------------------------------
*कथा*
चित्रपटाची सुरुवात होते बिस्मिल्ला खान यांच्या शहनाईने. चित्रपटाची नायिका गल्लीबोळातून जोरात पावले टाकत जात आहे. जसा ट्राम चा आवाज येतो तशी ती अजून पटपट चालू लागते. ट्राम मध्ये बसल्यावर केकचा एक तुकडा ती आपला नाश्ता म्हणून खाते, ट्राम मधून उतरून बस पकडून ती बर्याच वेळाने आपल्या कामाच्या ठिकाणी - एका बॅग तयार करणाऱ्या कारखान्यात - पोहोचते.
इकडे घरामध्ये चित्रपटाचा नायक आपल्याला तयार होऊन बसलेला दिसतो. आता तो उठून बाहेरच जाईल कि काय अशी शंका यावी इतपत. पण तसे काही होत नाही. तो कपडे बदलतो, अंघोळ करून खुर्चीत येउन बसतो आणि नायिकेने जो केक खाल्ला तश्याच प्रकारचा केक तोही खातो. थोडा वेळ बसल्यानंतर तो बाजारात जातो. मासे, किराणा सामान वगैरे आणतो, पैसे एका छोट्याश्या डब्यात ठेवतो आणि टेबलवरील झाकून ठेवलेल्या ताटात जे काही वाढून ठेवले आहे ते खातो. त्यानंतर तो झोपून जातो.
त्याला उठवायला म्हणून नायिकेचा फोन येतो. तो उठतो, वाळू घातलेले कपडे आत आणून ठेवतो आणि तयार व्हायला लागतो. जेवणाचा डबा घेतो आणि कामाला निघून जातो. त्याच वेळी नायिका घरी येते. थोडा वेळ बसल्यानंतर ती परत कामाला लागते. फ्रीज मधील सकाळी तयार केलेली भाजी घेऊन ती जेवण करते, भांडी वगैरे घासून झोपून जाते. नायक प्रिंटींग प्रेस मध्ये कामाला आहे. तो सकाळी नायिकेला फोन करतो. त्या आवाजाने ती उठते आणि तो फोन ठेवून देतो.
ती उठून स्वयंपाक करते, स्वतःसाठी आणि त्याच्यासाठी डबे बनवते, एक डबा फ्रीज मध्ये ठेवते, त्याच्यासाठी ताटामध्ये जेवण वाढते आणि कामाला जायला तयार व्हायला लागते. तेवढ्यात चित्रपटाचा नायक दरवाज्यात येतो. पुढचे ५-१० मिनिट ते कुठल्यातरी वेगळ्याच जगात प्रवेश करतात जिथे ते फक्त एकमेकांच्या सोबत आहेत आणि तिथे शब्दांना जागा नाही. त्यानंतर ती दरवाजा उघडते आणि कामाला जायला निघते. नायक तिला पाहायला म्हणून खिडकीत जातो, तेव्हा पुन्हा शहनाईचे सूर ऐकायला येतात.
*कथा समाप्त*

चित्रपटामध्ये चितारलेला काळ हा मंदीचा आहे. चित्रपट सुरु होण्याच्या आधी रेडिओ वर एक मिल बंद झाल्याची बातमी येते. सगळ्यांनाच आपल्या नोकर्या वाचवण्याची चिंता असणार्या काळामध्ये चित्रपटाचे कथानक घडते. नायक आणि नायिकेला जी कामे आहेत ती टिकवून ठेवल्याशिवाय पर्याय दिसत नाही. त्यामुळे दिवस असो व रात्र ते पर्वा न करता काम करत राहतात. त्यांच्या या अश्या दैनंदिन आयुष्यात दोघांनी मिळून घालवावे असे ते प्रेमाचे क्षण किती यावेत? परंतु त्यांचे प्रेम आपल्याला पूर्ण चित्रपटात जाणवत राहते. त्यांच्यात संवाद नाहीत पण त्यांच्यातील मूक संवाद चित्रपटभर बरेच काही सांगून जातो. जरी ते समोरासमोर नसले तरी एकाने सांगावे आणि दुसर्याने ते काम करावे अश्या पद्धतीने ते दोघेजण मन लावून घरातील कामे करताना दिसतात. याच वेळी दुसरी व्यक्ती आपल्यासोबत नाही याचे वैषम्यही त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत राहते.

चित्रपटामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवर विशेष लक्ष दिले आहे. उदा: नायक जो केक खातो त्याचे प्लास्टिकचे आवरण तो खालीच टाकतो. जेव्हा नायिका दुसर्या दिवशी घर झाडत असते तेव्हा तो कागद आपल्याला फ्रेम मध्ये दिसतो. त्याने आणून ठेवलेले किराणा सामान प्रत्येक गोष्टी बरणीत भरतानाचा आवाज वेगळा येतो. ती सकाळी जी उदबत्ती लाऊन जाते , ती नायकाची अंघोळ होईपर्यंत संपलेली असते. ती जेव्हा घरी येते तेव्हा नायक अजून एक उदबत्ती लाऊन गेलेला असतो ती संपत येते. हेच चक्र दुसर्या दिवशी पण पाहायला मिळते. सकाळी ती ट्राम पकडायला जाताना कॅमेरा तिच्याबरोबर जातो असे आपल्याला वाटत राहते पण जसा ट्राम चा आवाज ऐकू येतो तसा तसा कॅमेरा मागे राहायला लागतो. जेव्हा तो सकाळी प्रेस मधून सायकलवर परत येतो तेव्हा कॅमेरा परत त्याची साथ करतो पण काही सेकंदातच तिला भेटण्याचा उद्देशाने तो सायकल जोरात चालवू लागतो आणि कॅमेरा मागे राहायला लागतो. बर्याच गोष्टी ज्या आपण दैनदिन दिवसामध्ये पाहत नाही त्या या कॅमेरा ने चित्रपटामध्ये पाहिल्या आहेत , आपल्याला पाहायला लावल्या आहेत.
चित्रपटामध्ये बरीच जुनी गाणी तसेच शहनाई वापरली आहे आणि ती त्या त्या क्षणांना अतिशय चपखल बसली आहेत. चित्रपटाचे ध्वनी संयोजन अतिशय उत्कृष्ट आहे. आवाजांबद्दल थोडेसे वरती लिहिले आहेच परंत मागून येणारे शाळेतील मुलांचे आवाज, प्रिंटींग करणाऱ्या मशीन चा आवाज, बॅग तयार करणाऱ्या मशीनचा आवाज, सायकलच्या पॅडलचा येणारा आवाज,ट्राम, बस, पंखा, नळाचे पाणी, कढईतील उकळणारे पाणी, ते पाणी उकळून वाफ झाल्यावर तेल ओततानाचा आवाज, वेगवेगळ्या पक्षी आणि प्राण्यांचे आवाज हे सगळे अगदी सुस्पष्टपणे आपल्यापर्यंत पोहोचतात. यातील काही आवाज आपल्या परिचयाचे नसले तरी ते वेगळे आहेत आणि दोन आवाज मिसळून गोंगाट होतोय असे अजिबात वाटत नाही. या सर्व आवाजामधूनही कुठेतरी शांतता आणि एकटेपणा जाणवत राहतो. तो एकटेपणा आणि शांतता त्या दोघांच्या आयुष्यातील आहे हे ते बाजूचे आवाज सतत आपल्यावर बिंबवत राहतो.
जरूर पाहावा असा हा चित्रपट!

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

ब्यापोक लिखेछो भाई! एबार देखते हॉबे मोने होच्चे! Smile

बायदवे कोथाय थेके देखले- आमादेर बोनहुगलिर शोनाली थिएटारे नाकि दोरिद्रो.कॉम थेके डौनलोड मेरे? Wink जोदि डौनलोड मेरेछो ताहोले एखाने तार लिंक-टा दियेइ दाव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरे वा! आभार!
नक्की बघण्यात येईल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सिनेमा न पाहाताही परीक्षण वाचून चित्रं डोळ्यासमोर आली. शब्दांचा आवाज कमी केला की चित्रांची भाषा जास्त स्पष्ट ऐकू येत असावी. म्हणून कदाचित मूक चित्रपट असावा. तसंच, दोघांना एकमेकांशी बोलायला मिळत नाही हे अधोरेखितही करायचं असावं. अर्थात हे सगळे सिनेमा न पाहाता केलेले अंदाज.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनेक मित्र मैत्रिणींकडून या सिनेमाचे चांगले रिपोर्ट ऐकतेय. बघायची इच्छा आहे त्यामुळे पूर्ण लेख वाचला नाही.
सव्यसाची, तुम्ही शुमोन घोष चा "कादोंबोरी" पाहिलात का? कसा वाटला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@बॅटमॅन : धोन्नोबाद! अरे सॉल्टलेक सिटीसेंटरला जाउन पाहिला. शोनालीला असे सिनेमे लागत नाहीत. Smile बाकि दिग्दर्शक असे म्हणाला होता की जर थिएटरमध्ये रीलीज नसेल होणार तर युटयुबवर रीलीज करेन. आता लिमिटेड रीलीज झाला आहे. तेव्हा युट्युब रीलीज होइल का याची कल्पना नाही.
@ऋषिकेशजी : धन्यवाद. जर पाहायला मिळेल तर जरुर पाहावा असा हा चित्रपट.
@राजेशजी : तुमचा अंदाज अचुक आहे. इथे दिग्दर्शकाची छोटीसी मुलाखत आहे. त्यात संवाद नसण्याचे कारण त्याने सांगितले आहे. ते भेटत नाहीत हे दाखवण्यासाठीपण याचा वापर केला आहे.
@ ऱोचना ताई: जरुर पाहा. पुढच्या आठवड्यापर्यंत हा चित्रपट असेल असे वाटते आहे. मी गेलो त्यादिवशी प्रतिसादही उत्तम होता.
मला कादंबरी पाहायचा होता. कोंकना सेनच्या अभिनयासाठी तरी नक्किच. पण परीक्षा आणि सबमिशन्स यामुळे राहिला. हा चित्रपटही हुकलाच असता, पण माझ्या मित्राने इतके कौतुक केले की शेवटी जाउन पाहुन आलो. चित्रपट पाहिल्यावर, त्याचे कौतुक सार्थक वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे सॉल्टलेक सिटीसेंटरला जाउन पाहिला. शोनालीला असे सिनेमे लागत नाहीत.

अर्थातच रे. शोनाली म्हणजे आपलं ते हे...असोच. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं