लाईटहौशी (भाग २)

प्रस्तावना

प्रथम, मी हे का लिहितोय हे सांगतो. मी काही खूप जास्त लाईटहाउस पहिले आहेत असं नाही. मला समुद्री प्रवास / लाईटहाउस यांचा थेट अनुभव नाही किंवा शास्त्रीय ज्ञानही फार नाही. तसंच, प्रत्यक्षात त्या त्या ठिकाणी जाऊन वर्षं उलटली आहेत. त्यामुळे या धाग्यांचा उद्देश्य वाचकांना अचूक माहिती देणे नाही, किंवा वाचकांच्या general knowledge मध्ये भर टाकावी वगैरे म्हणूनही नाही. प्रयत्न ते क्षण आणि त्या क्षणांविषयी आत्ता काय वाटतं ते एकत्र करण्याचा आहे. सोबत मी काढलेले बरेवाईट फोटो आहेतच. आपण एखाद्या ठिकाणी जातो पर्यटक म्हणून, फोटो काढतो आणि फेसबूक वर टाकतो. एक दोन छटाक लाईक आले की बास… काही दिवसांनंतर सगळं विसरून जातो. फेसबूक ने फोटो काढण्याचं कारणच बदलून टाकलंय. लोकांना "आम्ही कुठे जाऊन आलो बघा" हे दाखवायचं… तर या धाग्यामागे विचार फोटो काढण्याच्या जुन्या कारणाकडे परत जाण्याचा आहे… फोटो पाहून पुन्हा त्या क्षणांची, त्या भावनांची उजळणी करण्याचा. हा विचार खूप वैयक्तिक आहे, पण ऐसी वर धागा काढून "हे लिखाण वाचनीय होऊ शकतं का?" ही परिक्षा बघण्याचा मोहसुद्धा आवरत नाही.

लाईटहौशी (भाग २)

रत्नागिरीचं लाईटहाउस पाहून काही वर्षं झाली होती. गेल्या काळात देशांतर पण झालं होतं आणि नव्या देशाशी जुळवून घेताना बरेच नवे अनुभव पण येत होते. बऱ्याच दिवसांनी सगळे मित्र सोबत आले म्हणून अमेरिकेतली "रोडट्रीप" करायची या उत्साहाने आम्ही निघालो होतो. न्यू यॉर्क राज्याच्या उत्तरेला (upstate) "१००० बेटे" असलेल्या एका ठिकाणी जुलै च्या रणरणत्या उन्हात आम्ही १-२ दिवस फिरलो. तिथे गेल्यावर जवळच "तीब्बेत'स पोईंत" (tibbetts point) नावाचे लाईटहाउस आहे हे कळले होते आणि ट्रीप ची सांगता तिकडे करायची असं आम्ही ठरवलं होतं. देशांतर झालं तेव्हा नवा कॅमेरा घेतला आणि मग मी अशा सगळ्या सहलींमध्ये ते कॅमेरा आणि लेन्सचं ओझं वागवत आणि इतरांचा वैताग वाढवत फिरायला लागलो. या सहलीत तो कॅमेरा सोबत होताच, पण १-२ दिवसांत जे काही पाहिलं त्या सर्वांत चांगले फोटो आले ते या लाईटहाउस पाशीच!

जगातल्या सर्वांत मोठ्या गोड्या पाण्याच्या सरोवरांपैकी एक असलेल्या ontario सरोवराच्या काठावर असलेले हे लाईटहाउस… केप विन्सेंट नावाच्या लहानशा गावाबाहेर हे लाईटहाउस आणि लाईटकीपरचे घर आहे. आम्ही तिथे पोचलो रात्री ८ वाजता, पण तरीही बऱ्यापैकी सूर्यप्रकाश होता. दिवसभर गोंगाट आणि ऊन याने कंटाळलो होतो, आणि अपेक्षेप्रमाणेच, या लाईटहाउसच्या परिसरात आल्यावर तिथल्या निवांत शांततेने गुरफटून टाकलं. रत्नागिरीच्या लाईटहाउस सारखीच शांतता… मी लहान असताना ताई खोलीत अभ्यास करत असायची तेव्हा मी, माझा पसारा आणि माझा गोंगाट खोलीबाहेर असायचा. या लाईटहाउस मंडळींचं पण असंच! एकाग्रतेने बोटींना मार्ग दाखवण्यात आणि अज्ञात खलाशांचे जीव वाचवण्यात गुंतलेल्या या इमारती एक अदृश्य दार लावून घेत असतील आणि सगळं जग दाराबाहेर ठेवत असतील. रात्री मन लावून अभ्यास करायला ताई टेबललाम्प लावायची, आणि या इमारतींच्या तर डोक्यातच दिवा… चारी दिशांना फिरणारा…

रत्नागिरीला लाईटहाउसवर आम्ही गेलो तेव्हा त्या इमारतीच्या दारावर कुलूप होतं, पण कुलूप उघडून देणारा माणूस सागेच सापडला होता, आणि त्याने आम्हाला वर नेउन लाईटहाउस चा दिवा आणि लेन्स यांची माहितीही दिली होती. पण या अमेरिकेतल्या लाईटहाउसवर असलेलं कुलूप उघडणारं कुणी भेटलं नाही. ९ ते ५ काम करणारे लोक… जुलै च्या सायंकाळी फक्त सूर्यास्त झाला नाही म्हणून बाहेर भटकणाऱ्या आम्हाला भाव देणारं कुणीच नव्हतं.

एकंदरच, आम्ही सगळे तिथल्या वातावरणामुळे भारावलो होतो. मस्त गार वारा, उतरलेली उन्हं, आणि सुंदर शांतता… आम्हाला अजून काय हवं होतं? सहा ठिकाणहून आलेले आम्ही सहा मित्र… प्रत्येक जण त्या सहलीआधी या न त्या कारणामुळे कावला होता, आणि ज्या गोष्टींपासून दूर पळायचं होतं, त्या गोष्टी पिच्छा पुरवतच होत्या, पण या लाईटहाउसच्या कुंपणाने त्यांना बाहेरच ठेवलं होतं. फक्त परतीचा प्रवास लवकर करायचा म्हणून तिथून निघालो, तेव्हा कारमध्ये बोलणं सोडाच, पण गाणीसुद्धा लावाविशी वाटली नव्हती.

त्या सहलीनंतर काही दिवसांनी एका मित्राने शोधून काढलं की तिथल्या लाईटकीपरच्या घरात राहता येऊ शकतं. सगळ्यांनी अगदी शपथेवर सांगितलं, तिथे एकदा तरी राहायला जायचंच! आणि तिथे राहायला गेल्यावर रात्री झोपायचं नाही कुणीच, बाहेर येउन आकाश बघत बसायचं! Our Ultimate Relaxation!
अर्थातच, आता आमची अंतरं वाढली, सहा जण होते त्यांचे बारा / साडेबारा झाले. ते लाईटहाउस आणि तिथली शांतता आमची वाट बघत असेल?




या लाईटहाउसबद्दल योग्य ती माहिती हवी असेल तर विकीपानास भेट द्या.

(क्रमशः)

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

तर या धाग्यामागे विचार फोटो काढण्याच्या जुन्या कारणाकडे परत जाण्याचा आहे… फोटो पाहून पुन्हा त्या क्षणांची, त्या भावनांची उजळणी करण्याचा. हा विचार खूप वैयक्तिक आहे, पण ऐसी वर धागा काढून "हे लिखाण वाचनीय होऊ शकतं का?" ही परिक्षा बघण्याचा मोहसुद्धा आवरत नाही.

स्तुत्य मानस आहे.
.

प्रत्येक जण त्या सहलीआधी या न त्या कारणामुळे कावला होता, आणि ज्या गोष्टींपासून दूर पळायचं होतं, त्या गोष्टी पिच्छा पुरवतच होत्या, पण या लाईटहाउसच्या कुंपणाने त्यांना बाहेरच ठेवलं होतं. फक्त परतीचा प्रवास लवकर करायचा म्हणून तिथून निघालो, तेव्हा कारमध्ये बोलणं सोडाच, पण गाणीसुद्धा लावाविशी वाटली नव्हती.

ह्म्म्म .... जिंदगी है. पण तुम्ही ही रोड्ट्रीप काढली हे छानच झाले ना त्यातून.
.
दुसरा अन शेवटचा फोटो फार आवडला.
दुसरा कारण त्या मनोर्‍यामागे ज्या रीतीने ढग विखुरले आहेत, ते अगदी प्रभावळीसारखे वाटताहेत.
चवथा आवडला कारण सर्वांचे कुतुहल, औत्सुक्य अशा मिश्र भावना नीट टिपल्या गेल्या आहेत.
.
दिपस्तंभावर एक छान कविता होती शाळेत. आठवली की देते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद! कवितेची वाट पाहत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लाइटहौशी हा शब्दप्रयोग आवडला. शक्यतो लेखमाला चालू असेल तर ती संपेपर्यंत मी प्रतिसाद देत नाही. पण ही माला वेगळी वाटते आहे. प्रस्तावनेतूनच काहीतरी सरळसाधं प्रवासवर्णनी लिखाण करण्यापलिकडे प्रयत्न आहे हे कळलं. लेखाच्या शेवटच्या वाक्यांतून ते अधोरेखित झालं.

लाइटहाउस हे रूपक म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने त्याकडे बघता येतं. ती एक धोक्याची सूचना असते. तशीच अंधारात दिसणारी एकमेव आधाराची ठिणगीही वाटू शकते. कदाचित समुद्रप्रवाशाला विनाशाकडे खेचून नेणारा कॉल ऑफ सायरेनही असू शकतो...

अजून लिहा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

..तो नुसता लाईट नसून त्या चमकण्यात लाँग फ्लॅशेस, शॉर्ट फ्लॅशेस आणि त्यामधलं इंटर्व्हल या पॅटर्नवरुन लाँच, जहाज (आणि प्रसंगी विमान) यांच्या स्टाफला ते कोणतं ठिकाण आहे आणि काय इशारा देतंय हे कळतं..हर लाईटहाऊस कुछ कहेता है..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद!

मला कुठलाही format धरून चालायचं नाहीये या लेखमालेत. काहीतरी लिहायचं हे खूप दिवसांपासून मनात होतं आणि जेवढा वेळ हातात आहे त्यात जे मनात येईल ते लिहून काढतोय. यामुळे हे लेखन विस्कळीत सुद्धा होतंय, पण हातून काहीतरी लिहिलं जातंय हा एक स्वार्थी आनंद आहे.

तुमच्या प्रतिक्रियेमुळे पुढच्या भागाची चक्रं आत्ताच सुरु झाली डोक्यात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0