भारा: अेक स्मरणरंजन

भारा: अेक स्मरणरंजन

- निरंजन घाटे

.मला वाचायची गोडी लागण्यासाठी आणि त्या गोडीचं व्यसनात रूपांतर होण्यासाठी जे दोन महाभाग कारणीभूत ठरले, त्यांतले अेक म्हणजे भा. रा. भागवत. दुसरे म्हणजे बाबूराव अर्नाळकर, ज्यांच्यावर मी आधी लिहिलं होतं. भा. रा. भागवतांच्या निधनानंतर जी शोकसभा झाली तिला जेमतेम दहा-बारा माणसंच अुपस्थित होती, त्याचं मला फार वाअीट वाटलं होतं. त्या वेळी मी त्यांच्यावर अेक लेख लिहिला होता. त्या काळात तो छापून आला; पण तेव्हा त्या लेखावर जागेअभावी जे संस्कार झाले, त्यांमुळे भा. रा. भागवतांवर पुन्हा अेकदा अन्याय झाला.

१९५३ साली लहान मुलांसाठी जी मासिकं होती, त्यांत 'चांदोबा' हे मासिक आघाडीवर होतं. ते जरी मराठीत असलं, तरी त्यातली भाषा मराठी नसे. मूळ तमिळ मासिकातली चित्रं तशीच ठेवून अुरलेल्या जागेत मूळ मजकुराचं भाषांतर कोंबून बसवलं जायचं. त्याचा अेक फायदा असा झाला, की त्यामुळे भा. रा. भागवत अधिकच जवळचे वाटायला लागले. पुण्यात स्थिर झाल्यावर, साधारणपणे १९५४ साली 'आनंद', 'शालापत्रक' आणि 'बालमित्र' ही तीन मासिकं मी वाचनालयातून घरी आणू लागलो. तेव्हा मी चौथीत होतो; पण ज्याला खरोखरच सायकलींचं आणि टांग्यांचं शहर म्हणता येईल, अशा पुण्यामध्ये मी दोन चौक आणि बाजीराव रस्ता ओलांडून किताबमिनार वाचनालयात जाअू शकत होतो.

'बालमित्र'चा अंक भा. रा. भागवत काही वेळा अेकटाकी लिहीत असत. पुढे त्यांना भेटलो, तेव्हा त्यांनी त्यांची काही टोपणनावंही सांगितली होती, ती टिपून ठेवायला हवी होती. त्या वेळी ते सुचलं नाही, हे खरं. 'रॉबिन हुड' हा त्यांनी मिळवून दिलेला पहिला दोस्त. 'शिंग फुंकिता रॉबिन हुडचे, शेरवुड जंगल भंगेल। गडी लोटतील रंगेल।' यांसारखी ठसकेदार वाक्यं अजूनही लक्षात आहेत. ते पुस्तक 'चिरंजीव लविंद्ल भाक्कल भागवत' ह्याला अर्पण केलंय. मी त्यांना त्या अर्पणपत्रिकेची आठवण करून दिली; तेव्हा ते मनापासून हसले. "अहो, तो आता चाळिशीत आहे!" ते म्हणाले.

"तुम्हांला त्या ओळी पाठ आहेत?" त्यांनी विचारलं. हे अर्थात 'शिंग फुंकता'ला अुद्देशून होतं. "माझ्या मुलाच्याही त्या आवडत्या ओळी आहेत," मी म्हणालो. भारांनी आमच्या घरातल्या दोन पिढ्यांमध्ये कधीच दुरावा निर्माण होणार नाही, ह्याची काळजी घेतली होती.

'मायापूरचे रंगेल राक्षस' हा विषय आमच्या घरात काढून बघा. माझ्या आधी माझा मुलगा त्या पुस्तकाबद्दल भरभरून बोलेल. घंटासुराच्या त्या राज्यात तो अजूनही माझ्याअितकाच रमतो. 'मारीचदुर्ग, मारीचदुर्ग' अशी हाळी देत निघालेल्या घंटासुराच्या सैन्यातला अेक जण 'भारीच दूर गं, भारीच दूर गं' असं म्हणतो, तेव्हा वाचकाच्या चेहऱ्यावरती हास्य आलं नाही तर तो खरा वाचकच नाही, असं मी ठामपणे म्हणू शकतो. घंटासुराला पाळणा पुरेना म्हणून अेक पूल आणून अुलटा टांगायची कल्पना किंवा त्या मारीचदुर्गावरून तोफगोळे झाडले जातात, तेव्हा, "कुठला किल्ला कसला हल्ला, ह्या डासांनी जीवच खाल्ला!" म्हणणारा घंटासूर, हा माझ्या दृष्टीनं अमर आहे. लाडवांचें युद्ध, सगळं अुलटं बोलणारे 'कस्तमहामगुरुजी' हे मी विसरूच शकत नाही.

भारांचं वैशिष्ट्य म्हणजे काही गोष्टी ते मूळ गोष्टींपेक्षा रंगवून, भारतीय करून रसाळ शैलीत सांगायचे. 'भुताळी जहाज' आपल्या मानगुटावर बसलं, की पुस्तक वाचून संपलं तरी ते आपल्या मानगुटावरून अुतरत नाही. तर 'अ‍ॅलिस अिन वंडरलँड'चं रूपांतर त्यांनी ज्या सहजतेनं 'जाअीची नवलकहाणी'मध्ये केलं, ते वाचून आजही थक्क व्हायला होतं. भारांनी ज्यू्ल्स व्हर्न आणि अेच्‌. जी. वेल्स यांच्या विज्ञानकथा मराठीत आणल्या खऱ्या; पण त्यांचे खरे आवडते लेखक लुअी कॅरॉल आणि 'ल मिझराब्ल'चा लेखक व्हिक्टर ह्यूगो हेच असावेत, असं त्यांच्या बोलण्यावरून वाटायचं. त्यांनी 'जे का रंजले गांजले', 'त्यांसी म्हणे जो आपुले', 'तोचि साधु ओळखावा,' 'देव तेथेंचि जाणावा' अशा चार भागांत 'ल मिझराब्ल'चा अनुवाद केला होता. नंतर 'जाँवालजाँची कहाणी' म्हणून त्याचा संक्षेपही प्रसिद्ध झाला.

भारांचं हे लिखाण वाचून मी प्रभावित झालो, हे खरं. पण त्यांना मी मानतो ह्याचं खरं कारण म्हणजे त्यांनी मला विज्ञानकथेचा मार्ग दाखवला. त्यांनी तसं लिहिलं, म्हणून त्यांच्या ह्या विज्ञान कादंबऱ्या अनुवादित आहेत हे कळत असे. 'अिन्व्हिजिबल मॅन' वाचताना तर मी 'पुढंमागं अदृश्य व्हायचं रसायन कसं तयार करायचं आणि कुणाकुणावर सूड कसा अुगवायचा' याची अेक मोठी यादीच तयार केली होती. त्यात अर्थातच शाळेतल्या शिक्षकांचा भरणा अधिक होता. भारांचा (म्हणजे मुळात अेच. जी. वेल्सचा) अदृश्य माणूस मनात अितका घट्ट बसला होता, की त्या काळात लोकप्रिय झालेला 'मि. अेक्स' हा चित्रपट बघून नैराश्य आलं. चांगल्या कथेची हिंदी चित्रपट कशी वाट लावू शकतात, हा विचार तेव्हा प्रथम मनात डोकावला.

मला वाटतं, भारांनी जवळ जवळ सगळा ज्यूल्स व्हर्न पूर्णपणे मराठीत आणला. 'अैंशी दिवसात जगाची चक्कर' (अराअुंड द वर्ल्ड अिन अेटी डेज), 'समुद्रसैतान' (ट्वेंटी थाअुजंड लीग्ज अंडर द सी), 'मुक्काम शेंडे नक्षत्र', 'सूर्यावर स्वारी', 'पाताळलोकची अद्भुत यात्रा' (जर्नी टू द सेंटर ऑफ दी अर्थ), अशा व्हर्नच्या अेकापेक्षा अेक भारी भारी विज्ञान कादंबऱ्या त्यांनी मराठीत आणल्या. कॅप्टन नेमो, फिलिअस फॉग अशी त्यांतल्या प्रमुख पात्रांची नावं अजूनही लक्षात आहेत. अेच. जी. वेल्सच्या 'फर्स्ट मेन ऑन द मून' (चंद्रावर स्वारी), ’इन्विजिबल मॅन’ (अदृश्य माणूस) आणि'आयलंड ऑफ डॉ. मोरॉ' (सैतानी बेट) अशा निवडक कादंबऱ्यांचाच त्यांनी अनुवाद केला.

१९८६ च्या सुमारास 'अुत्कर्ष बुक सर्व्हिसेस्‌'मध्ये त्यांची नि माझी पहिली भेट झाली. त्याआधी मी त्यांना भेटायचा प्रयत्न केला होता. त्या वेळी ते मुंबअीत 'केनेडी ब्रिज'जवळ राहत होते; पण मी गेलो तेव्हा घरी नव्हते. 'अुत्कर्ष'मध्ये मी त्यांना पहिल्यांदा भेटलो, तेव्हा आमच्या गप्पा अितक्या रंगल्या, की आम्ही 'अुत्कर्ष'च्या सुधाकर जोशींना भेटायला तिथं आलो होतो, हे ते आणि मी, दोघंही विसरूनच गेलो. "हे भा. रा. भागवत," असं जोशींनी सांगताच मी भारांच्या पाया पडलो. त्यांना म्हणालो, "तुम्हांला गुरुस्थानी मानलं खरं. मात्र तुमच्याअितक्या सहजसोप्या भाषेत लिहिणं खरंच अवघड आहे." ते हसले. "'ब्लॅकबीअर्ड्स गोस्ट'चं 'भुताळी जहाजा'त रूपांतर करतांना काही अडचणी आल्या का?" असं मी विचारलं, तेव्हा त्यांनी मला अेक गुरूमंत्र दिला, "आपणच रॉबिन हुड किंवा ब्लॅकबीअर्ड बनायचं. त्या धुंदीत सगळं जमून जातं."

अेकदा 'सिंहगड रस्त्या'वरच्या 'आनंद नगर'मधील त्यांच्या बंगल्यावर थडकलो. त्या काळात दूरध्वनी यंत्रणांचं जाळं अेवढं पसरलेलं नव्हतं. सरळ जाअून दार ठोठावणे, अशीच भेटायची पद्धत होती. भारा व्हरांड्यात अेका आरामखुर्चीत बसलेले होते. बाहेर हिरवळीवर दोन दगडी कासवं हळूहळू अेका कोपऱ्यात ठेवलेल्या गाजराच्या तुकड्यांच्या आणि कोबीच्या पानांच्या दिशेनं सरकत होती. "या!" म्हणून त्यांनी स्वागत केलं. बोलता बोलता त्या कासवांचा विषय निघाला. "ती मला त्रास देत नाहीत, मी त्यांना त्रास देत नाही. त्यांच्याकडे बघता बघता विचारांना दिशा मिळते. लेखनाचा आराखडा तयार होतो. वेळही चांगला जातो."

भारांनी फास्टर फेणेमुळे अमाप लोकप्रियता मिळवली. त्यांच्या बिपिन बुकलवारनेही खपाचे (मराठीपुरते) विक्रम केले. मी त्यांना विचारलं, "ज्यूल्स व्हर्न आणि अेच्‌. जी. वेल्स सोडून अिकडं कसे वळलात?" त्यांनी सांगायला सुरुवात केली. " 'बालमित्र' ही माझी हौस होती. हौसेला मोल नसतं हे खरं नाही. हौसेपोटी काही हजारांचं कर्ज झालं." ही १९५५ च्या सुमारास घडलेली घटना. आज कुणाची बिलं थकवता येत नाहीत; पण तेव्हा लोक अुधारी चालवून घ्यायचे. अर्थात त्यालाही काही मर्यादा होत्या. राजपत्रित अधिकाऱ्यांनासुद्धा चार आकडी पगार नसे, त्या काळात काही हजारांचं कर्ज ही मोठी आपत्ती होती. तेव्हा 'बालमित्र'मध्ये प्रसिद्ध झालेल्या सर्व कादंबऱ्यांचे हक्क त्यांनी कर्जफेडीच्या बदल्यात अेका प्रकाशकाला विकले आणि सर्व देणी भागवली. मग पुढे काय, हा प्रश्न सोडवायला काही वर्षं जावी लागली. त्यातून फास्टर फेणे जन्माला आला.

भारांनी पूर्ण वेळ लिहिण्याला वाहून घेतलं त्याची हकिगत त्यांच्याच 'भाराभर गवत' ह्या 'सँपलर'मध्ये, म्हणजे त्यांच्या लिखाणाच्या नमुना-पुस्तकात, बघायला मिळते. ते 'ऑल अिंडिया रेडियो'मध्ये निवेदक म्हणून काम करत होते. त्या वेळी स्वातंत्र्याची चळवळ जोरात होती. 'वंदे मातरम्' म्हणणं हा गुन्हा होता. देशभक्तीनं पेटलेल्या भारांनी अेक दिवस निवेदन संपवल्यावर 'वंदे मातरम्! भारत माता की जय' अशी घोषणा दिली आणि केंद्राच्या नोकरीचा राजीनामा दिला. ते चक्क भूमिगत झाले.

बाबूराव अर्नाळकरांच्या बरोबरीने भा. रा. भागवत, द. पां. खांबेटे आणि नारायण धारप हे माझे आवडते लेखक. आपण अमेरिकी वाङ्मयाची अुधार-अुसनवारी केली, हे ह्या चौघांनीही मोकळ्या मनानं मान्य केलं. चौघांच्याही लेखनाचा स्रोत म्हणजे मुंबअीच्या पदपथांवर सहज अुपलब्ध होणारी 'पल्प' (म्हणजे पुनर्चलनात आणलेल्या कागदावर छापलेली) पुस्तकं आणि नियतकालिकं (ह्यांना 'पल्प मॅगेझीन्स' म्हणत असत). त्यावरूनच आपल्या '९ आणे-माला', '४ आणे-माला' सुरू झाल्या. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सैनिकांच्या करमणुकीसाठी जहाजं भरभरून ही पुस्तकं आणि मासिकं भारतात येत असत. त्यांतली काही भारतातल्या शहरांतल्या पदपथांवर येत. आणा-दोन आण्याला हा कच्चा माल बऱ्याच लेखकांना अुपलब्ध होत असे. काही लेखक ते मान्य करत. काही लेखक त्याआधारे लेखकराव बनत असत. हे चौघं मात्र असे लेखकराव नव्हते.

'अुडती छबकडी' ह्या १९६६ साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत भारांनी म्हटलंय, "मुंबअीच्या फुटपाथवर 'अस्टाअुंडींग स्टोरीज', 'अस्टाअुंडिंग सायन्स फिक्शन' यांसारखी मासिकं मला अुपलब्ध होत. त्यांतली मध्यवर्ती कल्पना मी अुचलत असे."

पुढं त्यावर हे चौघंही जो भारतीय साज चढवीत असत, ती किमया त्यांच्या लेखणीचीच होती. खांबेटे आणि धारपसुद्धा त्यांच्या कथांबद्दल बोलतांना मूळ कल्पना कुठली हे सांगत असत. अर्नाळकर ते खाजगीत मान्य करत असत. ह्या माझ्या आवडत्या लेखकांपैकी भा. रा. भागवतांवर मात्र बालसाहित्यिक हा शिक्का अुगीचच बसला होता. आपल्या देशात, का कोण जाणे, विज्ञानकथा-कादंबऱ्या हा प्रांत प्रौढांचा आणि प्रगल्भ वाचकांचा नाही, असा अेक गैरसमज पसरला आहे. असं का, हे खरं तर कोडंच आहे. खरं म्हणजे अमेरिकेत मार्क ट्वेनपासून अनेक महत्त्वाच्या लेखकांनी विज्ञानकथा-कादंबऱ्या लिहिल्या आहेत. 'हा वाङ्मयप्रकार हाताळायला अवघड आहे' असंही त्याबद्दल म्हटलं आहे. आयझॅक अॅसिमॉव्हला 'राष्ट्रीय ठेवा' म्हणून घोषित केले गेले. रॉबर्ट हाअीनलाअीननं चंद्रप्रवास किमान पंचवीस वर्षे लवकर घडवून आणला, म्हणून 'नासा'नं त्याचा सत्कार केला. अनेक मान्यवर शास्त्रज्ञांनी विज्ञानकथा लिहिल्या. 'नासा'तले ६०% किंवा त्याहून अधिक शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ विज्ञानसाहित्य वाचून अवकाश-संशोधनाकडं वळले. रशियन अवकाशवीरांनी 'अवकाशप्रवासात कुठली पाच पुस्तकं बरोबर घ्याल' ह्या प्रश्नाला जे अुत्तर दिलं, त्यात बहुतेक सर्वांनी दोन तरी विज्ञानकथा-कादंबऱ्या नमूद केल्या.

आपण मात्र भारांवर बालसाहित्यिक असा शिक्का मारून त्यांना दुर्लक्षित ठेवलं.

भा. रा. भागवत आम्हांला का आवडले? माझे बरेच समकालीन, तसंच शाळासोबती हे भारांचे चाहते होते आणि आजही ते नातवंडांसाठी भारांची पुस्तकं आणायला प्रदर्शनातून आवर्जून हिंडतात. भारांची सोपी-सुटसुटीत, नादपूर्ण वाक्यं, त्यांच्या लेखनातला तरल विनोद, अेखादा प्रसंग वाचकाच्या डोळ्यांसमोर जसाच्या तसा अुभा करण्याची चित्रमयी वर्णनशैली, ह्यांमुळं भारांनी वाचकांना मोहित केलं होतं. पुढंही 'एका चिन्याचा जमालगोटा', 'दुर्मिळ तिकिटाची साहसयात्रा' ह्या पुस्तकांच्या नावांमुळेच आपण त्या पुस्तकांकडे आकृष्ट होतो.

भारांना मी जेव्हा भेटलो, तेव्हा ते सत्तरीच्या पुढे होते. पण त्यांच्या चालण्याबोलण्यातला अुत्साह बघितला की फास्टर फेणे त्यांच्याच लेखणीतून अुतरला हे तर पटत असेच; पण अितर कुणालाही त्यांच्यासारखा फास्टर फेणे लिहिणं जमलं नसतं, हेही पटायचं.

मी भारांना चार-पाच वेळा भेटल्याचं अलीकडेच मी कुणालातरी सांगितलं. तो गृहस्थ म्हणाला, "तू भाग्यवान आहेस, लेका! आधी का सांगितलं नाहीस? मलाही त्यांना भेटावंसं खूप वाटायचं!"

ज्या लेखकांना आपल्याकडे मुख्य साहित्यप्रवाहात स्थान नाही, अशा अनेक लेखकांबद्दल अशा प्रतिक्रिया अैकल्या आहेत. माझ्या आवडत्या भारांना भेटायची अिच्छा असलेले अितरही अनेक जण असतील. त्यांची आणि भारांची भेट घडवून आणण्याची अेक संधी या लेखाच्या निमित्ताने मला मिळते आहे. ३१ मे २०१५ रोजी त्यांची १०५ वी जयंती आहे. या वेळी त्यांचे चाहते 'ऑनलाअीन' अेकत्र येताहेत हे कळलं, त्यांच्यासाठी ही भारांची स्मरणभेट.

***
'चंद्रावर स्वारी'चे चित्रः जालावरून साभार
'उडती छबकडी'चे चित्रः भागवत कुटुंबीयांकडून
संपादकीय टिपणः लेखातील स्वरलेखनाची विशिष्ट पद्धत मूळ लेखनाबरहुकूम राखली आहे. तसेच लेखकाच्या इच्छेनुसार 'Jules Verne' या नावाचा उच्चार 'ज्यूल्स व्हर्न' असा ठेवला आहे.

***
विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

अुत्कृष्ट..अेकदम ..अुत्तम..रुचिरा पुस्तक जुनी आवृत्ती आठवली.

अेक अुकळी आणावी वगैरे.

..लेख मस्त..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अुत्कृष्ट..अेकदम ..अुत्तम..रुचिरा पुस्तक जुनी आवृत्ती आठवली.

अेक अुकळी आणावी वगैरे.

..लेख मस्त..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान लिहिलंय!

फाउंटनचा फुटपाथ ही अजूनही अलीबाबाची गुहा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
कृपया लहान चेंडू घेऊ नका.

वा! छान स्मरणरंजन!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

"अ"चे आकारउकार कसे जमवले ? वेगळे युनिकोड नंबर्स आहेत का त्यांचे ऑलरेडी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्मरणभेट आवडली. घाट्यांची पुस्तकं लहानपणी वाचली आहेत, त्यामुळे त्यांनी लहानपणी काय वाचलं असेल याबद्दल वाचताना थोडी अधिक गंमत वाटली.

(अवांतर - "अ"चे आकारउकार जमवण्यासाठी बोलनागरी वापरून टंकन केलं. युनिकोडबद्दल अधिक माहिती इथे; चर्चा करायची असेल तर इथे लिहिता येईल.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.