बिपिनवरचे सिनेमे लोकांपर्यंत पोचलेच नाहीत!

बिपिनवरचे सिनेमे लोकांपर्यंत पोचलेच नाहीत!

- रघुवीर कूल

.
श्री. रघुवीर कुलकर्णी उर्फ 'रघुवीर कूल' हे एक चतुरस्र व्यक्तिमत्त्व. त्यांनी 'जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स'मधून (१९७५) शिक्षण घेतलं. पटकथाकार, कथाकार, स्तंभलेखक व कवी म्हणून त्यांनी विपुल लेखनही केलं आहे, कॉमिक स्ट्रिप्स काढल्या आहेत. त्यांच्या काही नाटकांसाठी व एकांकिकांसाठी त्यांना पुरस्कारही मिळाले आहेत. 'मोहरे' (१९८७) पासून ते चित्रपटसृष्टीत शिरले व आजवर त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांच्या विविध चित्रपटांपैकी 'लगी शर्त' आणि 'रॉंग मॉरिशस' हे दोन चित्रपट भा. रा. भागवत यांच्या 'बिपिन बुकलवार' या पात्रावर आधारित होते. त्यांनी ते 'चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी ऑफ इंडिया'साठी दिग्दर्शित केले होते. त्या निमित्ताने भा. रा. भागवत विशेषांकासाठी झालेल्या त्यांच्याशी झालेल्या गप्पांचे शब्दांकन ऋषिकेशने केले आहे.


रघुवीर कूल

भा. रा. भागवतांच्या 'बिपिन'वर आधारित चित्रपटांवर व एकूणच बाल-किशोर चित्रपटांवर काही बोलण्याआधी पार्श्वभूमीच्या उद्देशाने माझा तिथवरचा प्रवास इथे मांडणे सुयोग्य ठरेल. मी १९७५ ला 'जे.जे.'मधून शिक्षण घेऊन बाहेर पडलो. त्या वेळी कॉलेजात दामू केंकरे होते. शिवाय कॉलेजमध्ये पुरुषोत्तम बेर्डे, मी व इतर मंडळी मिळून वेगवेगळी नाटके, एकांकिका वगैरे करत असू. याच दरम्यान आमचा एक अभ्यासदौरा कर्नाटकात नेला होता. तिथे बराच प्रवास होत असे. तेव्हाच आम्हांला 'टुरटूर' नावाची एकांकिका सुचली. त्या 'टुरटूर'च्या टूरने आम्हाला बरंच काही दिलं. पुढे 'चौरंग'च्या बॅनरखाली आम्ही 'टुरटूर' व्यावसायिक रंगभूमीवरही केलं. एकूण तब्बल ५५० प्रयोग.

मी कॉलेजात असल्यापासून नाटके लिहीत असे. पुढे आम्ही मंडळी अर्थार्जनासाठी वेगवेगळ्या ठिकाणी लागलो, मात्र केंकऱ्यांनी नाटक न सोडण्याचा सल्ला दिला होता. नाटक सोडणे आम्हांलाही मंजूर नव्हतेच. आम्ही साऱ्यांनी मिळून 'या मंडळी सादर करूया' अशा मोठ्ठ्या नावाची एक प्रायोगिक नाट्यसंस्था काढली. या संस्थेच्या बॅनरखाली आम्ही जवळजवळ ८ नाटकं, १२-१५ एकांकिका काढल्या. आमचा हा प्रयोग चांगला १० वर्षे सातत्याने चालू होता.

त्याच दरम्यान मला लक्षात येऊ लागलं की माझा कल सिनेमाकडे अधिक आहे. मी 'कोळिष्टक' म्हणून एक नाटक राज्य नाट्य स्पर्धेसाठी केलं होतं, त्यातून संजय मोनेचं पदार्पण झालं होतं. त्यालाही पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे सुरुवातीला त्याच नाटकावर बेतलेली पटकथा लिहिली. मला एक वर्ष सीनियर असलेला नाना, सदाशिव अमरापूरकर व सविता प्रभुणे हे मित्र. सविताचे शिक्षक म्हणून अनुपम खेर, नाना आणि सदाशिव अमरापूरकर, यांच्यासोबत माधुरी दीक्षित अशा कलाकारांना घेऊन १९८७ मध्ये 'मोहरे' बनवला. त्यानंतर मात्र फिल्मचा किडा चावला. एकदा फिल्मचा किडा चावल्यावर माणूस दुसरं काही करू शकत नाही याची प्रचिती येऊ लागली.

दरम्यान भा. रा. भागवतांच्या लेखनापैकी 'बिपिन बुकलवार' या नायकाच्या मालिकेमधील एका गोष्टीवर चित्रपट करण्याचं प्रपोजल मी 'चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी ऑफ इंडिया' (CFSI)ला दिलं. सरकारदरबारी गेलेल्या अनेक प्रपोजल्सपैकी याचंही अपेक्षेप्रमाणे काहीच झालं नाही. पुढे साधारण वर्षानंतर सई परांजपे एका फ्रेंच कॉन्सुलेटच्या कार्यक्रमाला भेटली. तिची नि माझी जुनी ओळख. तेव्हा सई 'CFSI'ची अध्यक्ष होती. तिने "तू लहान मुलांसाठी चित्रपट का काढत नाहीस?", असं विचारताच मी तिला, "मी केव्हाच तुमच्याकडे एक प्रपोजल दिलेलं आहे. मात्र त्याचं पुढे काहीच झालं नाही" हे सांगितलं. अर्थात तेव्हा CFSI मध्ये दिवसाला १०-१२ प्रपोजल्स येत असत. येणारं प्रत्येक प्रपोजल अध्यक्षांपर्यंत पोचत नसे, हे मला माहीत होतं; त्यामुळे मी ते ताणलं नाही.

सई परांजपे म्हणाली, "तुझं प्रपोजल नंतर बघू. माझ्याकडे एक 'मंजुरी मिळालेलं प्रपोजल' आहे. मला ऑफीसमध्ये येऊन भेट". तिथे ती कथा मला दाखवण्यात आली आणि योगायोगाने ती कथासुद्धा भारांची आणि त्यातही 'बिपिन बुकलवार'चीच होती. मला सई परांजपे म्हणाली होती, "भारा हे मला माझ्या काकांसारखे आहेत. त्यांना मी शब्द दिलाय की तुमच्या एका तरी व्यक्तिरेखेवर मी चित्रपट काढेन."

भारांचं एकूणच बाल-किशोर साहित्यातील योगदान लक्षात घेता खरं तर कितीतरी चित्रपट काढणं शक्य होतं.

भारांच्या कथांवर चित्रपट बनवताना बिपिनच का निवडला, किंवा 'फास्टर फेणे'सारखा यशस्वी नायक का निवडला नाही, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. एक तर त्याचं मूळ माझ्या वाचनाच्या आवडीत असावं. मला वाचायची प्रचंड आवड. त्यामुळे सतत पुस्तकांत डोकं खुपसून काहीतरी शोधणाऱ्या बिपिनशी मी अधिक रिलेट झालो, ही शक्यता मोठी आहे. सईलाही बिपिनचं पात्र खूप आवडत होतं. शिवाय 'फास्टर फेणे'वरची मालिका सुलभा देशपांडेंनी आधीच केली होती - त्यात बहुधा फास्टर फेणेचं काम 'सुमित राघवन'ने केलं होतं. तेव्हा 'फाफे'वर थोडं तरी काम आधीच झालं होतं. मात्र 'बिपिन'कडे अजून कोणी वळलं नव्हतं. तेव्हा अशा प्रकारे 'बिपिन बुकलवार' या नायकाच्या पहिल्यावहिल्या 'लगी शर्त' या चित्रपटाचे काम करायचं ठरलं.

'बिपिन'वर काम करू लागलो तसा तो मला अधिकाधिक आवडू लागला होता. पूर्वी दिलेल्या प्रपोजलच्या निमित्ताने मी त्याच्यावर थोडं कामही केलेलं होतं. मात्र ही नवी कथा पूर्ण वेगळी होती आणि आहे त्या रूपात नीटशी उभी राहत नव्हती. एखाद्या कथेचं चित्रपटात रूपांतर दर वेळी तसंच जमतं असं नाही. तेव्हा मी चित्रपटासाठी कथेत बदल करायचे ठरवले. सई परांजपेंनी "चेंजेस करायचेत ते भारांच्या परवानगीने कर." अशी मंजुरी दिली होतीच. मी स्वतः भारांना दोन-तीनदा जाऊन भेटलो. तेव्हा ते पुण्यात बावधनला राहत. भागवतही मोठा उमदा माणूस. त्यांच्या होकारानंतर आम्ही कथेत बदल केले. आता तेव्हाचं खूप काही आठवत नाही, पण त्यांचं बावधनमधील घर आणि त्यांच्याकडची दोन उंच, मोठाली कुत्री तेव्हढी आठवताहेत.

सईला हा चित्रपट 'बाल-किशोर चित्रपट महोत्सवां'साठी बनवायचा होता, हे आधीच ठरलेलं होतं. तुर्कस्तान, रशिया, युरोप इत्यादी ठिकाणच्या मुलांना मुंबई काय आहे, ते समजावं; असा चित्रपट बनवण्यामागचा विचार होता. त्यासाठी सईच्या मते भागवतांची ही कथा सुयोग्य होती. 'लगी शर्त'मध्ये वेगवेगळी कोडी सोडवत बिपिन मुंबईभर फिरणार होता. बक्षीस म्हणून त्याला विश्वकोशाचे म्हणजे 'एन्सायक्लोपीडिया'चे सर्व खंड मिळणार होते. मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणी एकेक खंड ठेवलेला होता, तिथे पोचल्यावर पुढलं कोडं (क्लू) मिळणार, अश्या प्रकारची कथावस्तू होती. 'गेट वे ऑफ इंडिया'पासून त्याचा प्रवास सुरू झाला, तो क्लायमॅक्स पुन्हा 'गेट वे'लाच झाला. या कथांचं रूपांतरण नि बदल मी स्वतःच केले होते. शिवाय सोबतीला सुषमा बक्षी ही लेखिकाही होती. ती आता मालिका लिहिते, नाटकांवरही काम करते. ती अतिशय गुणी लेखिका आहे. तिच्या मदतीने भागवतांच्या कथांवर काम करून नवी पटकथा लिहिण्याचे काम मी केलं. पटकथालेखनामध्ये जरा कलाकारी किंवा कारागिरी असते. ती करावी लागतेच; तेव्हा दर वेळी मूळ लेखनाशी प्रामाणिक राहता येईलच, असं सांगता येत नाही.


'लगी शर्त'मधील दृश्य

या चित्रपटात आणखी एक बदल केला होता - तो म्हणजे बिपिन, विजू आणि मोना या तिघांच्याही वयाचा. खरंतर बिपिनच्या भूमिकेसाठी माझ्या डोळ्यासमोर अनिकेत विश्वासराव होता. तेव्हा तो साधारण १६-१७ वर्षांचा असेल. अनिकेत आणि मुख्यतः त्याचे वडील माझ्या परिचयाचे. मी त्याला घेऊन सईकडे गेलो होतो; पण तिच्या डोक्यातला बिपिन अजून लहान होता. मूळ कथेतील बिपिन याच वयाचा आहे, हे मी तिला सांगितलं; पण या कथेला लहान बिपिनच साजेसा आहे, असेच तिचे मत होते. शेवटी तिच्या (म्हणजे संस्थेच्या) मर्जीनुसार पात्र लहान वयाचे झाले व त्याच प्रमाणात विजू व मोनाही लहान झाले. बिपिन म्हणून आम्हांला नचिकेत दिघे हा छान मुलगा मिळाला. या लहानग्यांना घेऊन चित्रपट पूर्ण केला.

त्यानंतर सई निवृत्त झाली. तिच्या जागी रविना टंडन आली. तिने माझं आधीचं काम बघून, अश्याच धाटणीचा अजून एक चित्रपट करण्याची ऑफर दिली. हे त्या संस्थेलाही नवं होतं. कारण तोपर्यंत त्या संस्थेत तीन वर्षांच्या आत पुन्हा त्याच दिग्दर्शकाला काम द्यायचे नाही, असा दंडक होता; माझ्या निमित्ताने तो मोडला गेला. तिनं "कोणत्या कथेवर हे काम करायचं?", असं विचारताच माझं उत्तर तयार होतं. मागे दुर्लक्षित राहिलेल्या माझ्या मूळच्या पहिल्या चित्रपटावर मी काम करणं पसंत केलं. एकतर मला भारांच्या बिपिनवरील लेखनापैकी हे 'तिकिटाचे रहस्य' अतिशय आवडतं. दुसरं असं, की गेल्या वेळी मी त्यावर आधीच थोडं काम केलं होतं. अखेरीस त्याच कथेवर आधारित चित्रपट करायला मला परवानगी मिळाली. 'राँग मॉरिशस' या नावाने या दुसऱ्या चित्रपटाचं काम सुरूही झालं. या चित्रपटाचं स्वरूप मनोरंजनासोबत एखाद्या एज्युकेशनल फिल्मप्रमाणे असावं, असं मला वाटत होते. मुंबईतलं जी.पी.ओ., तिथे चालणारं काम, पत्रांचा प्रवास आदी माहिती मुलांना कथेच्या अनुषंगाने मिळणार होती.


'राँग मॉरिशस'मधील दृश्य

या वेळी पात्रयोजनेचा प्रश्न नव्हता. दरम्यानच्या वर्षांत तिघेही मोठे झाले होते व पुस्तकाप्रमाणे बऱ्यापैकी सुयोग्य वयाला आले होते. त्यामुळेच बिपिन तोच ठेवला, फक्त विजू बदलला- कारण आधीचा आमचा 'विजू' कोल्हापुरला शिकायला गेला होता. 'मोना'सुद्धा तीच राहिली (गौरी वैद्य). पुढे जाऊन 'दे धक्का'मध्ये गौरीने चांगलं काम केलेलं आपण बघतो आहोतच. इतर पात्रयोजनेपैकी चोराची भूमिका नंदू माधवने केली होती, तिकिटांचं कलेक्शन करणारा निखिल रत्नपारखी होता (हा त्याचा पहिलाच चित्रपट). सेक्रेटरीचं काम अतिशा नाईकने केलं होतं, सिद्धार्थ जाधवनेही एका पिझ्झा डिलीवरी बॉयची छोटेखानी भूमिका यात केली होती.

आधी म्हटलं तसं, मी खूप पुस्तकं वाचत असे. 'कॉमिक स्ट्रिप्स' वाचायचीही खूप आवड होती. भारांची शैलीही तितकीच चित्रमय होती. १९६२च्या आसपास हे 'तिकिटाचे रहस्य' पुस्तक लिहिलं गेलं असेल. त्या वेळी 'राँग मॉरिशस'सारख्या नवख्या व अनोख्या विषयाबद्दल, मुलांसाठी इतक्या रसाळ शब्दांत लिहिणं हेच मुळात ग्रेट होतं. आता इंटरनेटच्या काळात अधिक माहिती मिळवणं सोपं आहे, पण तेव्हा अशा एखाद्या गोष्टीवर इतकं तपशीलवार लेखन करणं, ते कथानकात गुंफणं किती अवघड असेल व त्याला किती व्यासंग व वाचन लागत असेल याची मला हा चित्रपट करताना चांगलीच कल्पना आली. या निमित्ताने मी नेटवर शोधलं तर सध्या 'ते' तिकीट 'रेमंड वेल'कडे आहे. त्याचाही वापर मग चित्रपटात केला.

भागवतांच्या नायकांचे चित्रपट करताना आव्हानात्मक काही असेल तर, त्यांतली विविध लोकेशन्स - स्थळं - चित्रपटांत आणणे. त्यांनी आपल्या बहुतांश कथांमध्ये प्रत्यक्षात अस्तित्वात असणारी स्थळं घेतली आहेत. त्या स्थळांची तपशिलात वर्णने आहेतच, शिवाय कथासूत्रही स्थळांशीच जोडलेलं आहे. त्यामुळे वाचक कथेसोबत अधिक जोडला जात असला, तरी त्यामुळे चित्रपट बनवणे प्रचंड धावपळीचे बनते. 'लगी शर्त'मध्ये अशी खूपच स्थळं होती. एका जागेवरचा शॉट संपवून दुसरीकडे एखादा शॉट घ्यायचा म्हटलं, तर मध्ये अख्खं युनिट तिथे घेऊन जाणं, सर्व सेटिंग करणं यातच किमान २-२:३० तास जात. त्याव्यतिरिक्त इतरही सव्यापसव्यं असतंच. उदाहरणार्थ, आम्हांला या कथेसाठी 'गेट वे'सारख्या ठिकाणाची गरज होती. अशा वेळी सर्वांत तापदायक काही असेल तर अनेक विभागांतून परवानगी मिळवणं. 'गेट वे' पुरातत्त्व विभागाच्या अधीन आहे, तेव्हा आधी त्यांची परवानगी, मग महानगरपालिका, पोलिस, टूरिस्ट पोलिस, स्थानिक चौकी, फायर ब्रिगेड वगैरे, अशा जवळजवळ ७-८ ठिकाणांहून परवानगी घ्यायची, त्यांची (म्हणे रिफंडेबल!) भाडी द्यायची, तेव्हा कुठे तिथे शूटिंग करता येतं. या चित्रपटाच्या वेळी तर आम्ही २-३ माणसं केवळ परवानगी काढायला ठेवली होती.

लहान मुलांना घेऊन असे चित्रपट बनवणं अधिकच आव्हानात्मक होतं. त्यांच्या कलानं बरंच घ्यावं लागे. 'लगी शर्त'मध्येच आम्हांला बऱ्याच प्रयत्नांनंतर 'गेट वे'वरच्या शूटिंगची परवानगी एका विशिष्ट तारखेपुरती मिळाली. तर नेमकी त्याच दिवशी 'विजू'चं काम करणाऱ्या मुलाची परीक्षा होती. पण बिचाऱ्याने आदल्या रात्री अभ्यास उरकला. त्याला घ्यायला गाडी पाठवली. त्यानं गाडीत लहानशी झोप काढली. तो राहायचा ठाण्याला. पहाटे 'गेटवे'ला आला, आपले शॉट्स दिले आणि ११ च्या परीक्षेला त्याला पुन्हा केंद्रावर सोडून आलो. त्याची परीक्षाही महत्त्वाची नि आम्हांला नेमकी त्याच दिवसाची परवानगी मिळालेली. त्याच 'गेट वे'च्या शूटिंगची दुसरी गंमत अशी की, आम्हांला शूटिंगसाठी करावे लागणारे लायटिंग पूर्ण होईस्तोवर रात्रीचे दोन वाजले. तोवर ही सगळी चिमुरडी नायक मंडळी झोपून गेली होती. त्यांना मग त्यांच्या कलानं घेऊन उठवा, गोड गोड बोलून जागे करा, हवी असल्यास कॉफी पाजा, वगैरे बाबापुता करून शॉट्स पूर्ण करून घेतले.

लहान मुलांच्या कलानं घेऊन चित्रपट बनवले की मुलंही छान सहकार्य देतात. केवळ अभिनयच नाही, तर अन्य अनेक ठिकाणी ते आश्चर्यकारक रिझल्ट्स देतात. उदाहरणार्थ डबिंग. प्रत्यक्षात ते अतिशय टेक्निकल काम. मात्र डब करताना पोरं अतिशय सहजपणे करतात - अगदी फर्स्ट क्लास! मोठमोठ्या स्टुडियोज्‌मध्ये कित्येक कुशल तंत्रज्ञ आहेत, तेही पोरांची सफाई बघून अतिशय चकित झाले होते. प्रथितयश कलाकारांनाही डबिंग करताना कित्येक टेक घ्यावे लागतात, नि त्याउलट लहान मुलं मात्र कितीतरी पटापट डबिंग करतात. त्यांना कोणतंही टेन्शन नसतं, हे मूळ कारण असावं.

भारांच्या कथांवर हे दोन चित्रपट बनवले खरे; पण खरी खंत अशी की आपल्याच लोकांपर्यंत ते म्हणावे तसे पोचले नाहीत. परदेशात ते फिल्म फेस्टिव्हल्सना दाखवले गेले, मात्र भारतातल्या चित्रपटगृहांत रिलीज होऊ शकले नाहीत. आपल्या सरकारी संस्थांकडे चित्रपट बनवायचं बजेट असतं, पण ते वितरित करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नसतो. काही शाळांमध्ये हे दोन्ही चित्रपट दाखवले गेले. तिथून मुलांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र अतिशय उत्साहवर्धक होत्या. सई होती तोवर तिच्या प्रयत्नाने 'लगी शर्त' 'सोनी गोल्ड'ला विकला होता. त्यावर तो एक-दोनदा दाखवलाही गेला होता. तेव्हाही अनेकांनी मला फोन करून आपले अभिप्राय नोंदवले. पण तितकंच. पुढे काही नाही. खरंतर सई होती म्हणून इतकं तरी झालं. कित्येक बालचित्रपटांच्या नशिबी इतकंही येत नाही. आता हे चित्रपट यूट्यूबवरही दिसत आहेत, असंही काही लोक मला कळवतात. मात्र तिथे काय प्रतिक्रिया असते ते मी पाहिलेलं नाही.

मी स्वतः एक लेखक असल्याने भागवतांकडे मी अतिशय आदराने बघतो. काळाच्या पुढे असणारा तो बालसाहित्यकार होता. हल्ली मुलं वाचत नाहीत हे मुलांचं दुर्दैव आहे. १९६२ मध्ये 'राँग मॉरिशस' सारखा नवा विषय घेऊन, कुमारसाहित्यात तो पेलून दाखवण्याची ताकद असणारा हा लेखक 'सिंपली ग्रेट' होता. लहान मुलांसाठी इतक्या वेगवेगळ्या विषयांवर इतकं लिहिणं, हा विनोद नाही. त्यांनी कित्येक मुलांच्या माहितीच्या आवाका वाढवला आहे. त्यांचं स्वतःचं वाचन जबरदस्त होतं नि त्यातील उत्तम गोष्टी मराठी वाचकांपर्यंत पोचवायची ओढही त्यांना होती!

माझ्या मते, 'फास्टर फेणे'ला मिळाली, त्याहूनही अधिक प्रसिद्धी व त्यायोगे भागवतांना कितीतरी अधिक मान मिळणं आवश्यक होतं. त्यांच्या लिखाणाची पातळी त्यांच्यानंतर अजूनही कोणी गाठू शकलेले नाही.

हे खरं आहे की आता मुलांना पुस्तकांसोबत उत्तमोत्तम चित्रपटही पहायला मिळतात. त्यामुळे जर समोर हालतं-बोलतं काही सहज बघायला असेल तर प्रत्येकाला पुस्तक वाचावंसं वाटेलच, असं नाही. मात्र परदेशात जसा 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' बनतो किंवा 'हॅरी पॉटर' बनतो, तसं आपल्याकडे काही उल्लेखनीय व दर्जेदार बनत नाही. 'फास्टर फेणे', अनेक वर्षांनी 'बोक्या सातबंडे', तर अलीकडे कॉमिक स्ट्रिपमधून चित्रपटांपर्यंत पोचलेला 'चिंटू' हे तीनच 'हीरोज' म्हणता येतील. अशी पात्रं वगळता, मराठी साहित्यात आणि चित्रपटसृष्टीतही फारसे मराठमोळे बाल-हिरो आले नाहीत. याचं कारण आपल्याकडे यात पैसे गुंतवायला कोणी तयार होत नाही.

यावरून आठवलं, १९७५मध्ये अनंत पै कॉमिक्स करायचे. मीही तिथे जायचो, तिथेच आबिद सुरतीची ओळख झाली. तो 'अमर चित्रकथे'मध्ये काम करायचा. मीही तिथे जाऊ लागलो. तिथे एकदा फॅंटमचा निर्माता 'ली फाक' आला होता. तो म्हणाला, "आमच्या अमेरिकन लोकांसमोर मोठा प्रॉब्लेम असतो. आम्हांला सुपरहिरो तयार करावे लागतात, सुपरमॅन तयार करावा लागतो, कॅप्टन अमेरिका तयार करावा लागतो. तुमच्याकडे महाभारतात-रामायणात ते तयार आहे." आज जेव्हा मी 'छोटा भीम' डिस्नेच्या लोकप्रियतेला टक्कर देताना पाहतो, तेव्हा मला तेच आठवतं.

मुलं काय नि किती वाचतील, हे मला ठाऊक नाही. त्यांनी भागवत वाचावे असं मात्र जरूर वाटतं. वाचन होणार नसेल, तर मुलांना भागवत पाहायला तरी मिळावेत, असं वाटतं. नवे बालसाहित्यकार आता फारसे नाहीत; मात्र लहान मुलांसाठी चांगले चित्रपट करण्याला अजुनी मोठा वाव आहे. आता तंत्रज्ञानातही क्रांती झाली आहे. नुसतं सादरीकरणच नाही; तर कॅमेरा, डबिंग, एडिटिंग इत्यादी सर्वच अंगं अता प्रचंड बदलली आहेत. चित्रपटांद्वारे भारतात, मराठीत मुलांसाठी काही कसदार निर्माण झालं, तरच भागवतांचा वारसा आपण अल्पांशाने तरी पुढे नेला असं म्हणता येईल.

***

लेखातील चित्रपटांच्या स्थिरदृश्यांचा स्रोत - 'बाल चित्र समिती, भारत'
लेखातील इतर चित्रे: जालावरून साभार

***
field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

मस्तं मुलाखत. आवडली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

बिपिनवर सिनेमे असल्याचंच मला मुळात ठाऊक नव्हतं! आता बघतो तूनळीवर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

साला काय काय नवीन माहिती पुढे येईल काय सांगता येत नाही. माहितीकरिता अनेक धन्यवाद! पिच्चर पाहिले जातील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मुलाखत आवडली. हे असे चित्रपट बनतात, CFSI अशी काही संस्था असते याची कल्पनाही नव्हती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.