छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ११: घरातल्या घरात

सर्वप्रथम, विषय देण्यास उशीर झाल्याबद्दल क्षमस्व!

आम्ही फोटोग्राफी सुरु केल्यापासून बरेच प्रकार "ट्राय" करून पहिले आहेत. पूर्वी फिरायला जाताना कुल्फ्या खायचो, पण आता फिरायला गेल्यावर सेल्फ्या घेतल्याशिवाय परत येत नाही. पूर्वी फौंटन पेन ची शाई सांडल्यावर ती शाई जितकी टिपली नसेल, तितके रस्ते / नदी - नाले / उगवता सूर्य / मावळता सूर्य / मंदिरांचे कळस / झाडांचे बुडखे आमच्या कॅमेराने टिपले आहेत. एवढं सगळं करून गावाला वळसा मारून काखेतला कळसा सापडावा, तसं आमच्या आळशीपणामुळे घरी बिछान्यावर लोळत लोळत पण कॅमेरा चे फलाश मारता येतात हा शोध आम्हाला लागला. हा शोध लागल्यापासून आमचं फिरणं बंद झालं, पण घरातल्या घरात क्लिकक्लिकाट सुरु झाला. आणि आता तर एवढा आळस आलाय की फक्त लोकांनी आळशीपणे काढलेले फोटो बघुया असं मनात आलं.

तर थोडक्यात, विषय असा आहे - घरातल्या घरात (चार भिंतींच्या आत) काढलेले फोटो हवे आहेत. घरातल्या वस्तूंचे / माणसांचे / प्राण्यांचे / झाडांचे घरीच काढलेले फोटो चालतील. घर आपलंच हवं याची सक्ती नाही. दारातून / खिडकीतून दिसणाऱ्या बाहेरच्या दृश्याचे फोटो चालतील, पण त्यासाठी दार /खिडकीची चौकट पण दिसायला हवी. अपवाद म्हणून घराच्या बाहेर अंगणात / बाल्कनीत / ओट्यावर काढलेले फोटो पण चालतील पण हे फोटो तिथले आहेत हे दिसायला हवे. म्हणजे पार्कात दिसणाऱ्या सुंदर फुलाचा "macro" फोटो आपल्या अंगणातला आहे असे सांगणे चालणार नाही. थोडक्यात, घराच्या आतले फोटो "क्लोज अप" असले तरी चालतील पण घराबाहेरील फोटो तसे नकोत. स्पर्धेचे निकष छायाचित्राची तांत्रिक सफाई आणि "दिलखेचकपणा" असे असतील.

फोटो पाठवण्याची अंतिम तारीख - ७ जून , २०१५.

नियमः
१. केवळ स्वतः काढलेली जास्तीत जास्त ४ छायाचित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करावीत. मात्र विषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.
२. स्पर्धाबाह्य अशी कितीही चित्रे देण्यास हरकत नसेलच, मात्र त्यासाठी किमान एक चित्र स्पर्धेसाठी द्यावे लागेल. अन्यथा दिलेल्या चित्रांपैकी कोणतेही एक चित्र परिक्षक स्पर्धेसाठी म्हणून गृहित धरतील
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परीक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व परीक्षक असे चालू राहील.)
४. आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट ७ जून २०१५ रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. त्यानंतर लवकरच निकाल घोषित होईल व विजेती व्यक्ती पुढील विषय देईल.
५. या आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिप्पण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठरावीकच निकष लावावेत असे, बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे, इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाची व्यक्ती आव्हान देईल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले, तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा शक्यतो एकच विजेता/विजेती घोषित करणे अपेक्षित आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

खूपच छान फोटो

मस्त

निकाल

स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद! बरेचसे फोटो विषयाला अनुसरून होते. पण विषय देताना म्हटल्याप्रमाणे 'दिलखेचकपणा' या कसोटीवर जे फोटो उत्तर मार्कांनी पास झाले त्यांतल्या एकाची निवड करत आहे. अर्थात, ही कसोटी शास्त्रीय वगैरे नसल्याने "मेरा दिलखेचक वो तुम्हारा दिलभोचक" असे वाटण्याची शक्यता मी नाकारणार नाही.

मला आवडलेल्या फोटोंमध्ये अरुणजोशी यांचे कोळशाच्या लाडवांचे चित्र हे एक… चित्रात काहीतरी वेगळे आहे जे नेहमी बघायला मिळत नाही, आणि त्यातून तयार झालेला आकृतिबंध… यांमुळे हे चित्र लक्षवेधी वाटले. अदिती यांचे भेगा पडलेली भिंत आणि त्यावरच्या खुंट्या यांचे चित्र पण असेच लक्षवेधी… भिंतीला एवढ्या भेगा पडल्या आहेत पण डागडुजीची चिन्हे कुठेही नाहीत. तसंच, खुंटीवर कपडे जणू काही फेकून दिले आहेत… या घराचे मालक बेफिकीर म्हणावे, की आदतसे मजबूर म्हणावे की परिस्थितीने गांजलेले वगैरे वगैरे… फोटो मध्ये माणूस नसूनही माणसांची चाहूल लावून देणारा फोटो… प्रणव यांचे किटली वगैरेचे चित्र पण आवडले ते प्रत्येक कोपर्यातून डोकावणाऱ्या भांडयांमुळे… पण फोटो काहीसा निर्जीव आहे, शाळेत पूर्वी चित्रकलेचे सर वर्गात ३-४ वस्तू ठेवून त्यांची चित्रं काढायला लावायचे त्यातला प्रकार…

या स्पर्धेचा विजेता फोटो आहे अमुक यांचा अंधाऱ्या स्वैपाकघराचा… त्यांनी दिलेली कविता तर उत्तम आहेच, पण त्यांनी दिलेला फोटो मला विषयाला सर्वांत जास्त अनुरूप वाटला… या फोटोने फक्त घरातल्या वस्तू टिपल्या नहिएत, तर एक विशिष्ट वेळ पण टिपली आहे. फोटो पाहताना स्थळ आणि काळ हे दोन्ही लक्षवेधी ठरतात… नकळत त्या स्थळ / काळाशी निगडीत गोष्ट मनात तयार होते… काही तासांपूर्वी स्वैपाक होऊन त्याचे वेगवेगळे वास तरंगत असलेल्या खिडकीबंद अंधारात नेल्याबद्दल अमुक यांना धन्यवाद!

धन्यवाद

धन्यवाद. नवे आव्हान लवकरच देतो.

चांगली निवड. मी "घरी" नाही,

चांगली निवड. मी "घरी" नाही, नाहीतर पाठवले असते अजून.

फोटो क्रमांक २

manaamanasi.wordpress.com

?

हे काय आहे नक्की?

दुधावरची साय

दुधावरची साय

manaamanasi.wordpress.com

वेगळीच दिसते नेहमीपेक्षा!

वेगळीच दिसते नेहमीपेक्षा!

कशासाठी कोण जाणे देती

कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी
कोणी बोलायाला नाही, कशी व्हावी कट्टी-बट्टी
खेळ ठेवले मांडून परि खेळगडी नाही


.
.

.
(आय नो, उगिच सेंटी आहेत त्या ओळी पण फार साजेश्या अजून वेगळ्या ओळी आठवल्या नाहीत. लोकांच्या डोळ्यात बोटं घालून पाणी काढायचा नक्कीच हेतू नाही (डोळा मारत) )

काय फसवे फोटो लावता हो घनोबा!

काय फसवे फोटो लावता हो घनोबा! (डोळा मारत)

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

म्हणूनच ती तळटीप टाकली आहे

(दात काढत)
म्हणूनच ती तळटीप टाकली आहे फोटो खाली (डोळा मारत)

घनोबा तुला फक्त "कशासाठी कोण

घनोबा तुला फक्त "कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी" ही एकच ओळ लिहायची होती ना? खरखर सांग (डोळा मारत)

'हलकट' आणि 'मनकवडा' दोन्ही

'हलकट' आणि 'मनकवडा' दोन्ही श्रेण्या तुला (डोळा मारत)

'घरातल्या घरात' विषय पाहून

'घरातल्या घरात' विषय पाहून आरती प्रभूंची एक जबरदस्त कविता आठवली -

टेबलावर बंद पेन मौनासारखे
घडी घातलेला ध्यानस्थ चष्मा
भिंतीवर समाधीची तसबीर
कोन्यात हात जोडल्याश्या वहाणा

दाराच्या फटीतून डोकावणारे
आसमंत : औषधाच्या दर्पासारखे
वस्तूवस्तूंची नावे वाटताहेत
झोपेतले बरळणे अर्थहीन परके

जांभईप्रमाणे एक रिकामी खुर्ची
वाटतो उदास त्यात निराकार बसलेला
प्रत्येक आकारांतील बंदिस्त भार
गुहेतील प्राचीन शिल्पसा फ़ुटलेला.

अंतराळाच्या फिकट उजेडाचा बाण
कौलारांतून थेट तिरपा घुसलेला
अष्टकोनी खोलीत वर-खाली पाहत
मी कुणी एक होऊन बसलेला

रंगमिश्रणापेक्षा माझी निनावी दृष्टी
डोळ्यांतून हिवासारखी थरथरणारी
दिसूच नये अशा एकांतातून आरपार
गार गार थेंबासारखी ठिबकणारी

वस्तूवस्तूवर माझा दाट स्पर्शस्तर
वस्त्रगाळ धुळीप्रमाणे साठलेला
दुरून कुणी एक काठी हापटीत
घडाळ्याचा ताल धरून चाललेला

जवळच कुठे उंच विव्हळून
एक कुत्रा मध्येच गप्प झालेला
पडसादाच्या पल्याडचा शंखनाद
माझ्याभोवती दबा धरून गोठलेला

---
चित्र १.

Camera: NIKON COOLPIX L120, ISO: 400, Exposure: 1/40 sec, Aperture: 3.8, Focal Length: 10.2mm

ब्लॅक & व्हाइट फोटो खूप सुंदर

ब्लॅक & व्हाइट फोटो खूप सुंदर आहे. एकदम उन्मनी करणारा, तेजस्वी शुभ्रतेचा.

रंगीत

छायाचित्र रंगीत आहे. खिडकीतून येणार्‍या प्रकाशात इतर रंग झाकोळले गेले आहेत.

क्या बात है!! कालपासून अनेकदा

क्या बात है!! कालपासून अनेकदा ही कविता वाचली. जबरदस्तच आहे. साहिरची मूळ "कभीकभी" अमिताभ ने वाचली आहे तशा खर्ज आवाजात, संथ गतीत ही कविता ऐकावीशी वाटतीये.

दाराच्या फटीतून डोकावणारे
आसमंत : औषधाच्या दर्पासारखे
वस्तूवस्तूंची नावे वाटताहेत
झोपेतले बरळणे अर्थहीन परके

याचा अर्थ लागला नाही.

(चित्र पण सुंदरच आहे!)

@रोचना - दाराच्या फटीतून डोकावणारे

दाराच्या फटीतून डोकावणारे आसमंत औषधाच्या दर्पासारखे भासते आहे. ज्याप्रमाणे आपण झोपेत काहीबाही बरळत असतो, त्याप्रमाणे घरातल्या वस्तूंची नावे ही परकी वाटताहेत. हा चमचा, ही शेगडी, हा पलंग.. हे शे-ग-डी काय आहे प्रकरण ? वस्तू आणि तिचे नाव यांचा संबंध हरवल्यासारखी भावना.

आव्हान धाग्यांच्या दुसर्‍या

आव्हान धाग्यांच्या दुसर्‍या पर्वात खरंतर आव्हान देताना थेट विषय देण्यापेक्षा अशी एखादी कविता, गाणे, गद्य उतारा वगैरे देणेच अपेक्षित होते. तो उतारा/कविता/गाणे/ऑडीयो/व्हिडीयो बघुन/वाचून/ऐकून जी प्रतिमा डोळ्यासमोर येईल किंवा त्याच्याशी संबंधित प्रतिमा एखाद्या छायाचित्रात उतरवून इथे द्यायची अशी कल्पना होती.
---
अर्थात पुढे ते स्वरूप फारसे कोणी पुढे चालवले नाही याची खंत आहेच, पण ते असो.
---
या प्रतिसादा निमित्ताने अजूनही तसे करता येणे शक्य आहे अशी आशा मनात पुन्हा जागृत झाली

बहोत खूब प्रतिसाद नी छायाचित्रही!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दुसऱ्या पर्वाची हि अपेक्षा मी

दुसऱ्या पर्वाची हि अपेक्षा मी तरी लिखित स्वरुपात कुठे वाचली नाही. तरीही, बंडखोरी केल्याबद्दल क्षमस्व! पण विषय शक्य तितका "abstract" देण्याचा प्रयत्न केला आहे.

अहो घरातल्या घरात हा काय

अहो घरातल्या घरात हा काय अबस्ट्रॅक्ट विषय झाला काय?

पुढच्या खेपेला "जाणिवेच्या पलिकडे" असला विषय द्या. ह्यो झाला जन्विन अबस्ट्रॅक्ट. किती बी इचार केला तरी डोस्क्यात कंचा बी फटू येनार नाय.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

माझा "abstract" शब्द बहुदा

माझा "abstract" शब्द बहुदा चुकला असेल. तेवढी भाषेवर कमांड नाही. मला एवढेच म्हणायचे होते की दुसऱ्या पर्वात असे विषय आले आहेत ज्यांत वेगवेगळ्या शक्यतांना वाव आहे. तेच या विषयाबद्दल पण… "घरातल्या घरात" हा फक्त परीघ. त्या परिघात काय वाट्टेल ते घाला. आतापर्यंत बरेच फोटो आले. चांगले पण आहेत. पण घराघरांतून पसरलेल्या "पसाऱ्याचा" फोटो अजून नाही आला. वाट पाहत आहे. घर नीटनेटकं असतं, तसंच अस्ताव्यास्तही. हा अस्ताव्यस्तपणा घराच्या जास्त गोष्टी सांगतो. असे पण फोटो येउद्या.

सोप्या विषयाला धरून अवघड फोटो

सोप्या विषयाला धरून अवघड फोटो टाकणे यातच तर खरी गम्मत आहे. माझा खरा निकष तोच आहे. अगदी सोपा विषय असला तरी कोण अगदी अगम्य फोटो टाकतो ते बघूया म्हणे.

भाग १ मध्ये लिहिले होते

भाग १ मध्ये लिहिले होते बहुधा! असो.
नंतर फार कोणी ते फॉलो नाही केलं तुम्ही एकट्याने नव्हे (स्माईल)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कविता खूपच छान आहे. सोबत

कविता खूपच छान आहे. सोबत दिलेला फोटो पण आवडला, एकदम ओळखीचा वाटला. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये माझी आई सकाळच्या स्वैपाकाची लगबग आवरून, स्वैपाकघराची खिडकी लावून दुपारची झोप काढत असायची. तेव्हा घरातच खेळता खेळता किंवा पुस्तक वाचता वाचता नकळत भूक लागायची. त्यावेळी चिवडा / बिस्किटांचा फराळ शोधण्यासाठी स्वैपाकघराच्या खिडकीबंद अर्धवट अंधारात शिरून डबे चाचपून बघायचो, ते सगळे क्षण तुमच्या फोटोमुळे आठवले.

प्रभाते मनी


आधी कोणत्यातरी धाग्यात दाखवून झाल्यामुळे स्पर्धेसाठी नाही.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

...

'मनी'चा प्रयोग प्रभात टॉकीजमध्ये लागल्याचे ठाऊक नव्हते. वाचून एक अस्सल जुना पुणेकर म्हणून ऊर अभिमानाने इ.इ.

बादवे, फोटूची रंगसंगती ही कायशीशी 'थेटराला लागली आग' छापाची आहे, तेवढी ती नसती, तर फोटू कदाचित बरा वाटू शकला असता. (अर्थात, आमची स्वतःचीही छायाचित्रणकला यथायथाच आहे म्हणा, पण तरीही. नेहमीच्याच सवयीने अंमळ 'प्लेइंग टू द बाल्कनी... आपले, ग्यालरी'चा एक माफक प्रयोग करून पाहिला, इतकेच. सोडून द्या झाले.)

थेट्राला आग लागली तरी तिथेही

थेट्राला आग लागली तरी तिथेही पिटात बसून शिट्या मारणारे बघे जमतात. पुण्यात काय, काहीही होऊ शकतं.

असो. मला हा फोटो आवडतो. त्यात मी आहे, हे एक कारण. पण हे असं उन आमच्या घरात मार्च आणि नोव्हेंबरमधले काही आठवडेच येतं. ढग नसतील तरच हा असा प्रकाश दिसतो. त्यातही अगदी स्वच्छ आकाश असेल तर अगदी पाच मिनिटांपुरता असा लालसर रंग दिसतो. पूर्वेकडे खरोखरच आग लागल्यासारखा रंग असतो, पण ती आग न वाटता शेकोटी वाटावी अशा दिवसांमध्ये हे उन घरात येतं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

`आईवडील हे उपयुक्त पशू

`आईवडील हे उपयुक्त पशू आहेत.`

एकदम हसलो, मग guilty वाटले..

एक सुचवण

एखाद्या लहान (अ‍ॅज़ इन कायद्याने अज्ञान) बालकाच्या आईच्या किंवा बापाच्या पादत्राणांत उभे राहून हे वाक्य म्हणून पहा. कदाचित... कदाचित वेगळी अनुभूती येऊ शकेल. (अनुभवाचे बोल!)

(किंबहुना, आईबापांनी उपयुक्त पशू का असू नये? जे आईबाप उपयुक्त पशू नाहीत, ते आईबाप आईबाप कसले?)

(अर्थात, आमची स्वतःचीही

(अर्थात, आमची स्वतःचीही छायाचित्रणकला यथायथाच आहे म्हणा, पण तरीही. नेहमीच्याच सवयीने अंमळ 'प्लेइंग टू द बाल्कनी... आपले, ग्यालरी'चा एक माफक प्रयोग करून पाहिला, इतकेच. सोडून द्या झाले.)

Sad

नबा तुम्ही गेल्या वेळेस टाकलेली स्मायली हे तुमचं मत होतं. त्यात काही आक्षेपार्ह नव्हतं.
एकच चूकी झाली की ती स्मायली अवाढव्य होती अन अंगावर आली. यापुढे हाइट, विड्थ देत चला हाकानाका (स्माईल)

...

यापुढे हाइट, विड्थ देत चला हाकानाका

हुसेनसाहेबांनी, ततःपर आपल्या चित्रांतील नग्नदेवतांवर कपडे रंगवायला हवे होते, हाकानाका, नाही काय?

बाकी, सल्ला जेव्हा विना-मूल्य असतो, तेव्हाच तो विना-संकोच देणे सुलभ होत असावे. असो.

------------------------------------------------------------------------------------

ईमृशांदे.

यांच्या चित्रकारितेबद्दल - चित्रकलेतील काहीही कळत नसूनसुद्धा - फारसा आदर नाही२अ. मात्र, यांच्या अभिव्यक्तीच्या - आणि अभिव्यक्तीच्या निवडीच्या - स्वातंत्र्याबद्दल आदर जरूर आहे.

२अ बोले तो, आम्ही जितके भिकार प्रतिसादकार (आणि विनोदकार) आहोत, साधारणतः तितकेच ते भिकार चित्रकार होते, असे वैयक्तिक मत आहे. (चूभूद्याघ्या.) असो बापडे.

गरजूंनी हा शब्द सुयोग्यरीत्या बदलून घ्यावा.

घरातलं घर

...

छायाचित्रास 'पिंजरा' असे शीर्षक अधिक यथार्थ, समर्पक आणि रियालिष्टिक (याला मराठी संज्ञा चटकन आठवली नाही. कदाचित मराठीत अशी काही संकल्पना नसावी.) वाटले असते. प्रस्तुत शीर्षक काहीसे यूफीमिष्टिक वाटते.

असो.

मधुपर्यायोक्ती नाही बरे,

मधुपर्यायोक्ती नाही बरे. चित्रातले दार उघडेच आहे. दुसरे कोणीही जिथे जात नाही अशी ही अगदी त्याची एकट्याची ही जागा आहे. नेहमी घरात सोफ्यावर, पांघ्रुणांवर, खुर्चीखाली बैठक मारणारा हा कुत्रा इतरांची ब्याद नको असली की आपण होऊनच त्याच्या ह्या गुहेत (den) जाऊन बसतो. कधी सोबत त्याची चघळायची, आवाज करणारी खेळणी घेऊन जातो तर कधी कधी, वरच्या चित्रात आहे तसा स्वस्थ चिंतन करत बसलेला असतो. त्याच्या दॄष्टीने मोठ्या घरातले हे छोटेसे खाजगी घरच झाले!

घरी

NIKON D40X
f/5.6 exp 1/125 55mm ISO125

माझे प्रयत्न

कॅमेरा - Nokia Lumia 610

व्यवस्थापकः कृपया फोटो देताना width="" height="" हे टॅग्ज टाळा किंवा अवतरणचिन्हात योग्य ते रोमन आकडे द्या

पहिल्या फोटोत उजव्या बाजूला

पहिल्या फोटोत उजव्या बाजूला काये? नॉनस्टीक प्यान पालथा घालून त्यावर बेलन ठेवलंय का?

दुसरा फोटे... उं... टायट्यानिक आठवला फिदीफिदी (जीभ दाखवत)

Amazing Amy

--

comment delete कशी करतात?

उजव्या बाजूला? kettle आहे, ते

उजव्या बाजूला? kettle आहे, ते काळ handle आहे.

titanic पाहिला नाही अजुन , पण google केल्यावर कळाला reference.

अच्छा केटल आहे होय ती. मला

अच्छा केटल आहे होय ती. मला मोबाईलवर नीट लक्षात आले नाही. छान आलाय तो फोटो.

कमेंटखाली 'संपादन' पर्याय आहे. त्यावर क्लिक करुन एडीट करायचं. एकदा दिलेला प्रतिसाद पुर्ण डिलीट करता येत नाही. आणि संपादन दिसत नसेल तर त्या प्रतिसादावर उपप्रतिसाद आल्याने तो एडीटदेखील करता येत नाही.

Amazing Amy

(No subject)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दुसरा मस्त आहे. पहिला काही

दुसरा मस्त आहे. पहिला काही समजत नाहीये ..

पहिल्या फोटोतून काही विशेष

पहिल्या फोटोतून काही विशेष सांगायचं आहे असं नाही. भिंतींचा गिलावा उडलेल्या घरात काय वस्तू आहेत याचं चित्र आहे एवढंच.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एकच प्याला ...

फोटो घरातच काढलेला आहे फक्त थोडीशी प्रकाशयोजना करण्याचा प्रयत्न करून ... स्पर्धेसाठी चालावा ...

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

मणिपूर

घरोघरी कमलकुंड

(पण विधानसभेत अजून एकही जागा नाही.)
चुलीसाठी कोळश्याचे लाडू

पूजेची तैयारी

कोंबडीखाना

आता जरा घराबाहेर डोकावू. घरात बोर झालं. (स्पर्धेसाठी नाही.)

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

कोळशांच्या लाडूचा फोटो आवडला.

कोळशांच्या लाडूचा फोटो आवडला. पाककृती सांगता येईल काय प्लीज ? अशाच प्रकारे शेणाच्या गोवर्‍या थापण्यापेक्षा लाडू वळले तर जास्त वेळ जळतील काय असा विचार करतो आहे.

काय राव मुटके साहेब...लाडू हा

काय राव मुटके साहेब...लाडू हा शब्द केवळ आकार दर्शवण्यासाठी आहे. पाककृतीचा काय संबंध?

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

साहेब !

प्रश्न खरोखरच गांभीर्याने विचारला आहे. केवळ लाडू शब्द आला म्हणून पाककृती शब्द वापरला आहे. नाहीतर केवळ कृती द्या असे म्हटले असते.
मला असे म्हणायचे आहे की कोळसा घन स्वरुपात असतो मग त्याला लाडूसारखा / गोल आकार कसा काय देता येतो ?

पाककृति

लाकूड जाळताना अतिशय लहान लहान (चित्रात न दिसणारे) आकाराचे कोळशाचे तुकडे बनतात. (मोठा तुकडा क्रश करत नाहीत.). त्यात चित्र नं १ मधे असलेल्या पाँडच्या तळाची (जमिनीवरची नाही) माती/चिखल थोडी टाकतात. ती अतिशय चिकट असते. म्हणून लाडू बनतो.

सांगणाराच्या मते, अन्यत्र हे तुकडे कचरा म्हणून फेकून देतात.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

मस्त आहेत फोटो. मध्यंतरी एक

मस्त आहेत फोटो. मध्यंतरी एक मणीपुरी फिल्म पाहीलेली. त्यातलं हे असं वातावरण पाहून एवढं छान वाटलं की खास नसतानाही दुसर्^या दिवशी परत बघितली. कोकणासारखं पण वेगळं पावसाळी छटेचं, सुंदर असं वातावरण पहायला फार बरं वाटतं होतं.

हेच?

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

फोटो वेगळे आणि छान आहेत.

फोटो वेगळे आणि छान आहेत. खुराड्याला कोंबडीखाना हा शब्द पहिल्यांदाच ऐकला. हे खुराडंही नेहमी दिसणार्‍या खुराड्यांसारखं नाही.

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

हे जे काही आहे त्याचं नि

हे जे काही आहे त्याचं नि खुराड्याचं स्वरुप मॅच होईना म्हणून मी तो शब्द वापरण्याचा आगाऊपणा केला आहे. बाय द वे, वरच्या बाजूला जो फाटका भाग आहे तो दाणे आत टाकायला आहे.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

फारच सुंदर फोटो

सगळेच विषय छान आहेत. फोटोसाठी ऑब्जेक्ट निवडण्यातली कल्पकता आवडली. बाय द वे, श्राद्धपूजेच्या तयारीतली ती केळीची पाने इतकी गोल कशी कापता आली? की ती निसर्गतःच तशी वेगळी जात आहे? की ती पाने कृत्रिम म्हणजे प्लास्टिकची आहेत?(आजकाल मिळतात.) कारण केळीचे पान कातरताना कडा अशा गुळगुळीत राहात नाहीत. पान थोडे तरी मध्येच फाटते. विड्याप्रमाणे केळीची पानेही दोन-दोन ठेवली आहेत काही ठिकाणी.
वेगळे विषय म्हणून अधिक आवडले.

ती पाने गोल नाहीयेत. तर

ती पाने गोल नाहीयेत. तर उभ्यातून अर्धी कापलेली आणि गोल दिसतील अशा बेताने ओव्हरलॅपिंग ठेऊन छान मांडणी केली आहे असे वाटले/दिसले.

अजो, छान आहेत फोटो.

श्राद्धाला चपला वगैरे ठेवायची पद्धत महाराष्ट्रातही बघितली आहे.
ल्हानपणी एकांकडे तर त्या आजोबांची कवळी ठेवलेलीही बघितली आहे (डोळा मारत)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

(अवांतर)

श्राद्धाला चपला वगैरे ठेवायची पद्धत महाराष्ट्रातही बघितली आहे.

काही वेगळ्या प्रयोजनार्थ चपला ठेवण्याची पद्धत मराठी संस्थळविश्वातही पाहिलेली आहे. असो.

धन्स. ----------------- फळे

धन्स.
-----------------
फळे ठेवलेली पाने व्यवस्थित गोल कापलेली आहेत.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

पाने नैसर्गिकच आहेत. कात्रीने

पाने नैसर्गिकच आहेत. कात्रीने कापली आहेत. हे काम करायला सवता माणूस असतो.
--------------------------
ही पाने सहसा जिरिबाम म्हणून आसाम-मणिपूरच्या सीमेवरच्या जिल्ह्यातून येतात. ही प्रजाती किंचित भिन्न असू शकते. लोकल केळी मद्रासी केळांसारखी जास्त आणि उत्तर भारतीय केळांसारखी कमी आहेत.
----------------------------------------
काही पूर्ण गोल, कही अर्धगोल पाने आहेत.
====================================================================================
प्रत्यक्षात मी असले फोटो काढत असतो तेव्हा माझ्या कल्पकतेला विचित्रपणा, मूर्खपणा इ इ गणले जात असते हो. (लोळून हसत) (लोळून हसत)

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

कॅमेरा - Samsung Galaxy S5,

कॅमेरा - Samsung Galaxy S5, mobile camera.
अधिकची माहिती - अस्थिर्हस्त, डिफॉल्ट सेटींग्ज.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

एक नंबर जबराट फटू.

एक नंबर जबराट फटू.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

भाषेचं दौर्बल्य - दिसतंय

भाषेचं दौर्बल्य -
दिसतंय भाजपप्रेम. (डोळा मारत)

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

धन्स.

धन्स.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

मस्त आहेत फोटोज अजो... त्या

मस्त आहेत फोटोज अजो... (स्माईल)
त्या पुजेची तयारी असलेल्या फोटोत चप्पल ठेवल्या आहेत. त्या चप्पल सुद्धा 'वन ऑफ द' पुजेचा भाग आहे का? शिवाय ते फळं - म्हणजे संत्र आणि सफरचंद ह्यांचा वरचा भाग काढून ठेवला आहे - असं का? सफरचंदात पण दोन प्रकारचे वेगवेगळे ठेवलेले दिसताहेत - नेमकं का ते? कसली पूजा आहे ही - जाणून घ्यायला आवडेल.

ही एक श्राद्ध पूजा आहे. त्या

ही एक श्राद्ध पूजा आहे. त्या चटईवर, पूजेत बायकोच्या आज्जीची सारीच वस्त्रे, माळा, इ इ (नविन सेट) आहे. त्या चपला देखिल तिच्या अटायरचा एक भाग आहेत म्हणून नवी चप्पलजोड ठेवलेली आहे. पूजेत किमान पाच प्रकारची फळे लागतात म्हणून. प्रत्येक फळाला नि फूलाला सुंदर आकार वैगेरे देतात. (या चटईशेजारी अजून बरेच प्रकार आहेत. त्यांचे स्क्वे मी चटईपेक्षा जास्त आहेत. हा केवळ एक फोटो आहे, इतर फोटोंत माणसे असल्याने आणि चारच फोटो टाकायचेत म्हणून ...)
-------------------------------------------------
धन्यवाद.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

माहिती बद्दल धन्यवाद अजो.

माहिती बद्दल धन्यवाद अजो. श्राद्धाची पु़जा असावी असा अंदाज आलाच होता ( ते पांढरे गोळे पाहून). पण मांडणी पाहून प्रसन्न वाटली पुजा-व्यवस्था (स्माईल)

कोळश्याचे लाडू मस्त! पूजेच्या

कोळश्याचे लाडू मस्त! पूजेच्या तयारीचा फोटो उभा करून टाकायला हवा होता असे वाटते. त्यातल्या केळीच्या पानावर ठेवलेल्या चपला विशेष आवडल्या. घराबाहेरचा फोटो पण छान आहे.

परफेक्ट रेक्टँगल असलेल्या

परफेक्ट रेक्टँगल असलेल्या वस्तूचा फोटो घेताना तिच्या सीमा कॅमेर्‍याच्या डिस्पेलेच्या सीमांशी कधीच का येत नाही असा प्रश्न मला नेहमी पडतो. उंच टांगलेले चौकोनी चित्र, किंवा जमिनीवरच्या चटईचा नीट फोटो कसा काढावा माहित नाही.
============================================================
त्या चपला मी कालच पाहिल्या.
===============================================
शेवटचा फोटो गावाबाहेरचा आहे.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

माझ्या मते, अशा गोष्टींचा

माझ्या मते, अशा गोष्टींचा फोटो शक्यतो त्या गोष्टीच्या समांतर रेषेत किंवा काटकोनात कॅमेरा ठेवून काढले तर छान दिसतात. उदा. जमिनीवर मांडलेल्या गोष्टींचा फोटो त्या गोष्टींच्या वर काटकोनात उभे राहून फोटो काढला तर चांगल्या दिसतील किंवा ते शक्य नसेल तर त्या मांडणीच्या समांतर रेषेत खाली बसून, म्हणजे मांडणीच्या उंची एवढ्या किंवा थोड्याशा अधिक उंची वरून फोटो काढला तर चांगले दिसू शकते. उंचावर टांगलेल्या चित्रासाठी पण त्या चित्राच्या उंचीवर जाऊन फोटो काढल्यास जास्त चांगला फोटो येऊ शकतो असे मला वाटते. हा फक्त माझा अनुभव आहे, तांत्रिकदृष्ट्या बरोबर आहे की नाही ते नाही सांगू शकणार…

ते पांढरे वस्त्र उजवीकडे

ते पांढरे वस्त्र उजवीकडे निमुळते होत जात आहे असे वाटते. जेव्हा कि असं नव्हतं. (माझी स्मृती इतकी तल्लख नाही, पण नसावं). आता त्याला काटकोनात टिपण्यासाठी मला कैतरी भयंकर आसन शिकायला लागेल... (लोळून हसत) (लोळून हसत) (लोळून हसत)

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.