Skip to main content

मराठी साहित्यातली चविष्ट वर्णने

हा चर्चाविषय मराठी साहित्यातल्या खाद्यपदार्थांच्या चविष्ट वर्णनांबद्दल आहे. या धाग्यात मराठी साहित्यातील 'वेगळी' चविष्ट वर्णने असल्याच्या अपेक्षेने आलेल्या वाचकांचा हिरमोड झाला असल्यास दिलगिरी व्यक्त करते, त्यांनी या धाग्यावर जावे.

तर त्याचं असं आहे की साहित्यात खाद्यपदार्थांची चविष्ट वर्णने आली की आमचे चित्त विचलित होते आणि मूळ विषय एका बाजूला राहून मन दुसरीकडेच धावते. सुनिताबाईंची जिएंना लिहिलेली पत्रे वाचताना त्यातील वेगवेगळ्या माशांच्या जातींची वर्णने वाचून उत्सुकता चाळवली जाते. त्यांच्याच 'सोयरे सकळ' मधे जे.पी. नाईकांच्या हातचे मटण, चहात बोंबील बुडवून खाणारे वसंतराव देशपांडे यांचे उल्लेख येतात ते माझ्या अगदी पक्के लक्षात रहातात.

स्मृतिचित्रे वाचताना जिवंत फोडणी आणि पाणबुड्या भाताचे उल्लेख वाचून मन भरकटते आणि डोके दुसरीकडेच चालायला लागते; ते इतके की उत्तम स्वयंपाक करता येतो या एकमेव निकषावर त्या दुष्ट म्हाताऱ्या सासऱ्याला मनातल्या मनात माफ करून टाकावेसे वाटते. अगदी हिंदू वाचतानाही भाकरी आणि वांग्याचे भरीत म्हटले की जीभ चाळवतेच.

जुन्या मराठी साहित्यात ब्राम्हणेतर आणि त्यातही बायकांनी अधिकाधिक लिहिले असते तर त्याकाळच्या ब्राम्हणेतर पाकसंस्कृतीबद्दल काही रोचक माहिती मिळाली असती असे वाटते. 'खमंग' पुस्तकाच्या प्रस्तावनेत दुर्गाबाई भागवत लिहितात, "पाकक्रियेच्या बाबतीत मी जातीभेद अवश्य मानते व तो सुसंस्कृतपणाचा भाग आहे, असंही मानते. प्रत्येक घरात स्वयंपाकाची वेगवेगळी पद्धत असते. ही रुचीभिन्नता या देशाचं वैभव आहे. जातीयता ही मारक नसून सुगरणपणाला तारक ठरणारी आहे." हे वाचलं आणि बरंचसं पटलं.

त्या निमित्ताने हेही जाणवलं की कोणत्याही काळाच्या पाकसंस्कृतीचा त्या काळच्या चालीरीती परंपरा, हवामान, अर्थकारण या सर्वांशी घट्ट संबंध असतो. पाककृतींच्या पुस्तकातून केवळ पदार्थांची माहिती कळते पण त्याच्या आजूबाजूचे रोचक संदर्भ कळायला साहित्यातल्या नोंदी उपयुक्त ठरतात.

तर प्रस्ताव असा आहे की, मराठी साहित्यातल्या तुम्हाला आठवणाऱ्या चविष्ट वर्णनांबद्दल इथे लिहायचे. हे उल्लेख पाककृतींचे असले पाहिजेत असे नाही, वेगवेगळ्या पदार्थांबद्दल, जिन्न्सांबद्दल, खाण्यापिण्याच्या सवयीबद्दल, आवडीनिवडींबद्दल असे कोणतेही उल्लेख चालतील.

गब्बर सिंग Fri, 13/03/2015 - 05:29

जातीयता ही मारक नसून सुगरणपणाला तारक ठरणारी आहे." हे वाचलं आणि बरंचसं पटलं.

लिंबाच्या सरबतात साखर म्हंटलं की "बामनं गुळमाट लई खात्यात" असा डायलॉग किमान अर्धा डझन वेळा ऐकलेला आहे.

----

तुम्ही "माझे खाद्य जीवन" वाचलेले नाही का ? पुल्देश्पांड्यांचं ?

नंदन Fri, 13/03/2015 - 05:38

लेखाचा विषय आवडला. माझे खाद्यजीवन आणि दळवींचे आत्मचरित्राऐवजी/दादरचे दिवस इत्यादी पटकन आठवून गेलं. अर्थात यातली वर्णनं ही कृतीपेक्षा (उदा. 'खमंग'मधल्या सात पदर सुटणार्‍या पोळ्या) आस्वादकाच्या भूमिकेतून अधिक आली आहेत. (तीच गत 'मासळीचा सेवित स्वाद दुणा' म्हणणार्‍या बोरकरांची.)

परदेशी पदार्थांच्या वर्णनाबद्दल म्हटलं तर, 'पाडस'मधली रताळ्याची रोटी आठवते किंवा तलम पोताच्या, तंदुरीप्रमाणे अजिबातच मठ्ठ नसलेल्या थाई मुर्गीचं रसिकतेने वर्णन करणारे पुलं जपानी पद्धतीचा भात आणि मासा (सशिमी?) खाऊ शकत नाहीत; हा किस्सा. एका अर्थी, प्रवासवर्णनातून डोकावणार्‍या स्वभाव/चव/पूर्वग्रह यांचेच प्रतिबिंब.

तंदूरीप्रमाणे मठ्ठ नसणारी पुलंची पुलँ उर्फ फ्रेंच कोंबडी का? (मला हे मत अजिबात मान्य नाही बाय द वे. तंदूरी इज द बेस्ट)

नंदन Fri, 13/03/2015 - 11:18

In reply to by टिन

'अपूर्वाई'त फ्रेंच चिकनचा उल्लेख येतोच, पण हे तंदुरी/तलम पोत इ. 'पूर्वरंग'मधल्या थायलंड भेटीदरम्यानचे आहे.

...पण त्यानंतर जी सयामी मुर्गी आली तिने मात्र तंदुरी ते भंडारीपर्यंतच्या तमाम मुर्ग्यांचा पाडाव केला. अशी मुर्गी केवळ पूर्वपुण्याई जबर म्हणून मिळते. प्रकार तंदुरीसारखाच होता, पण कारागिरी नाजूक होती. तंदुरीत एक प्रकारचा मठ्ठपणा आहे. सयामी मुर्गीचा पोतच तलम. तिच्यावर सयामी मसाल्याचा जो हळुवार हात फिरला होता त्याच्या नुसत्या वासाने आमोद सुनास जाहले. घासाघासाला ती मुर्गी स्वतःला आणि त्या पाकपंडिताला दुवा घेत घेत गेली.

रुची Fri, 13/03/2015 - 05:51

'माझे खाद्यजीवन'चा उल्लेख अगदी स्वाभाविक आहे पण दळवींच्या आत्मचरित्राबद्दल माहीत नव्हते, वाचायला हवे.

जातींचा आणि पाककलेचा संबध लावताना एक गोष्ट (सरसकटीकणाचा दोष स्विकारून) जाणवते ती म्हणजे कायस्थांचे खाण्यापिण्यावरचे प्रेम, ज्याला साहित्यिकही अपवाद नाहीत. जास्त कायस्थ लिहिते झाले तर मराठी साहित्य अधिक चविष्ट होईल काय :-)?

नंदन Fri, 13/03/2015 - 06:24

In reply to by रुची

जातींचा आणि पाककलेचा संबध लावताना एक गोष्ट (सरसकटीकणाचा दोष स्विकारून) जाणवते ती म्हणजे कायस्थांचे खाण्यापिण्यावरचे प्रेम, ज्याला साहित्यिकही अपवाद नाहीत. जास्त कायस्थ लिहिते झाले तर मराठी साहित्य अधिक चविष्ट होईल काय (स्माईल)?

+१

अगदी कणेकरांचाही सीकेपी जेवणावर लिहिलेला लेख (लोकसत्ताच्या वर्धापनदिनानिमित्त एका विशेषांकात छापून आलेला) वाचनीय आहे, म्हणजे बघा! ;)

राजन बापट Fri, 13/03/2015 - 10:53

In reply to by नंदन

कणेकरांच्या लिखाणाचा दुवा उपलब्ध आहे का ?

नंदन Fri, 13/03/2015 - 11:33

In reply to by राजन बापट

दुवा सापडला नाही. मूळ लेख ४ नोव्हेंबर १९९९ च्या संस्कृती विशेष पुरवणीत प्रसिद्ध झाला होता. दुर्दैवाने लोकसत्तेचे उपलब्ध ऑनलाईन संकलन २००० पासून सुरू होते.

नंदन Fri, 13/03/2015 - 13:34

In reply to by अजो१२३

त्या पुरवणीत सुधीर गाडगीळांचा 'मोजून मापून कोकणस्थ' हा लेखही आला होता. सध्या तो स्कॅनावस्थेत जालावर अनेक ठिकाणी सापडतो. तिथलीच तारीख उचलून हे संदर्भ लक्षात ठेवण्याचे सोंग वठवण्यात आले आहे :)

बॅटमॅन Fri, 13/03/2015 - 18:56

In reply to by वृन्दा

अहो पण निषेध कषाचा कर्तोय ते बघा की.

बाकी कायस्थ म्हटल्यावर मला नेहमी उगीचच कायरस नामक पदार्थाची आठवण येते. लहान असताना वाटे की सगळे कायस्थ बहुधा रोजच कायरस खात असावेत.

अस्वल Fri, 13/03/2015 - 06:04

"काय वाट्टेल ते होईल" चा उल्लेख करायलाच हवा.
त्यात दिलेल्या जॉर्जियन पदार्थांची यादी - खिंकाली, पिरोष्की, चाचोबिली इ.
झ्या वानो ह्या बहारदार इसमाच्या स्वयंपाककलेची वर्णनं..
वेडया चांकोच्या तोंडून ऐकलेला ट्यूना श्यांगविचचा उल्लेख...
इश्काचा रोग सोडून बाकी सगळ्यावर इलाज असलेली झ्या वानोची खास _____ (हे काय आहे ते पुस्तक वाचल्यावर कळेलच!)
खाद्यपदार्थांवर प्रेम असेल तर वाचायलाच हवं असं पुस्तक.
मूळ लेखक : George-Papashvily. अनुवादः पु.ल. देशपांडे
इंग्रजीत उपलब्धअ‍ॅमेझॉन लिंक

नगरीनिरंजन Fri, 13/03/2015 - 06:18

रविंद्र पिंग्यांचे कोकणातले दिवस आठवतात. तांबडा भात, रातांब्याचं सार, सोलकढी, बडग्यांची आमटी, गर्‍यांची भाजी, रावस/मुडदुशांचं झणझणीत सांबार, लाल तांदळाच्याच भाकर्‍या, तिखट पापड आणि गाडग्यातलं दही. कधीही फार न खाल्लेल्या या पदार्थांच्या चवीची कल्पना करुनच सगळ्या अंगाची जीभ व्हावी असं वाटायचं तेव्हा.

रुची Fri, 13/03/2015 - 07:38

In reply to by नगरीनिरंजन

वाचनयादीत घालते आहे. धागा सुरू करताना इथे भरल्यापोटीच यायचे हे लक्षात आले नव्हते, वर्णनावरून लहानपणी एका स्नेह्यांच्या कोकणातल्या खेड्यात घालवलेले उन्हाळ्याच्या सुटीतले सोनेरी दिवस आठवले. मस्त!

अंतराआनंद Fri, 13/03/2015 - 09:43

In reply to by नगरीनिरंजन

हो हो, मुडदुश्यांचं कालवण आणि त्याचा हाताला रहाणारा घमघमाट हा कर्णिकांच्या लिखाणाचा ट्रेडमार्क.

मेघना भुस्कुटे Fri, 13/03/2015 - 09:51

अहाहा... रुमाल तेवढा टाकून ठेवते आहे.
***

काय लिहू नि काय नको असं झालंय! काय सुरेख विषय काढलास.

काय वाट्टेल ते होईलः याबद्दल अस्वलानं वर लिहिलंच आहे. पण त्यातली वर्णनं. माय गॉड. ओली बडीशेप आणि लसूण खलबत्त्यात कुटताना येणारा नि मैलभर दरवळून लोकांना जाग आणणारा वास, मांसाचे अगदी पात्तळ काप काढून केलेली गरीब सँडविचेस आणि ती खपावीत म्हणून खोक्यात घातलेलं एकेका शिलिंगाचं नाणं, चांदीच्या पातळ सुरईतून मध ओतावा तशा आवाजाचे ब्लॅक लोक आणि अर्थातच पिरोष्की आणि कबाब आणि गाबोळीचं लोणचं...

पाडसः याचा नंदनरावांनी विषय काढलाच आहे. पण फक्त रताळ्याची रोटी? कमॉन नंदन. आल्याची रोटी, तळलेल्या खारीचा पुलाव, सोनेरी भाजलेला ब्रिम मासा, वाशेळं लोणी, बेकनच्या खरपूस भाजलेल्या कडा, हरणांची शिंग वाढीला लागतात तेव्हा त्यांना खाज येऊन हरणं ती झाडाच्या खोडांवर घासतात नि त्यांमधली लुसलुशीत कातडी सुटी होते - ती शिजवलेली कातडी, आयरिश बटाटे, घिरटावर मके भरडताना येताना खमंग वास, क्रिस्मसची केक, काकवीच्या शेवटच्या घाण्यात चुलाणात संत्री घालून केलेला गुळांबा, वाशेळं लोणी, ब्रायरबेरीची जेली, पाणकोबीची रानात शेकोटीवर केलेली आणि चुकून बिबट्याची चरबी घालून शिजवलेली भाजी, सुकवलेल्या मगरीच्या शेपटाचं मांस, अस्वलाच्या तुपात तळून मऊ केलेलं बेकन. डुकरं कापण्याचा तर स्वतंत्र अध्याय. ती कापणं, कापतानाचं त्यांचं केकाटणं, पण ती कापताक्षणी अन्नात होणारं त्यांचं अवस्थांतर, कापलेली डुकरं गरम पाण्यातून काढून सोलणं, त्यांच्या मांसाचे कुटून केलेले नि आतड्यांच्या माळांमधे भरून कोठीत सुकवून ठेवलेले तुकडे. काकवी आणि मिठाची पुटं देऊन खारवलेलं मांस. चरबीच्या तळाशी साचणारी खुसखुशीत करवड... (परवा 'द ट्री ऑफ वुडन क्लॉग्स' हा इटालियन सिनेमा बघताना डुकरं कापण्याचा सोहळा अनपेक्षितपणे बघायला मिळाला आणि मग सिनेमा म्हणून तो आवडण्यापूर्वीच सिनेमा अनपेक्षितपणे जवळचा झाला.) 'दी इयरलिंग'च्या प्रमुख सूत्रांपैकी एक 'अन्न आणि माणसं यांच्यातलं नातं' आहे म्हटल्यावर... पण कधीही न चाखलेले पदार्थ खाऊन बघायची इतकी तीव्र ऊर्मी फार क्वचित येते. तिचा अनुभव देणार्‍यात 'पाडस' महत्त्वाचं पुस्तक

चौघीजणी: 'दी लिटिल विमिन'चा शांताबाईंनी केलेला अनुवाद. रवाळ फ्रेंच चॉकलेट, खारवलेली लिंब (आणि ती डेस्कात लपवून शाळेत चोखून खाण्यातली गंमत), पॅनकेक्सचं दशम्या हे शांताबाईंनी केलेलं बहुधा चुकीचं - पण मजेशीर, माझ्या डोक्यात घट्ट बसलेलं भाषांतर, स्ट्रॉबेर्‍या सायीत घालून पेश करताना नासलेली साय घातल्यामुळे ज्योची झालेली फजिती, मेगची फसलेली बेर्‍यांची जेली. पण मेगच्या लग्नात फक्त फळं, केक आणि बिस्किटं? ते वाचून माझी चिडचिड झाली होती.

आवजो: पद्मजाचं अमेरिकेचं प्रवासवर्णन. यांत इतके निराळेच पदार्थ भेटतात, की नाविन्यानंच जाम मजा येते. चिकन आणि संत्र्याचा रस घालून पद्मजासाठी लुईसनं शिजवलेला आणि तिला डोळा मारत दुसर्‍या दिवशी बॉयफ्रेंडला 'तुझ्यासाठीच रे...' असं म्हणत पेश केलेला भात, अमेरिकन स्वैपाकघरात हाताला येतील ते मसाले घालून पद्मजानं 'कशीतरीच' केलेली नि जमलेली आमटी, द्राक्षं-बेर्‍या-अननस मिसळून एकीनं फस्त केलेला दहीभात, स्ट्रॉबेरीचं आइसक्रीम, फॉर्चून कुकीजवाले समोसे, बकलावा, खास पद्मजासाठी झालेली रँच पार्टी नि त्यात पकवलेले रेअर, मिडियम नि वेलडन स्टेक्स, एक तिखट पदार्थ-एक गोड पदार्थ-एक फळ असा निगुतीनं बांधून दिलेला डबा, कधी डब्यासाठी केळं पुढे करणारी 'कु'गृहिणी लिंडा, कधी नाईलाजानं पद्मजानं खाल्लेल्या कुकीज...

देवा... मला अजून लिहायचंय! वासंती मुजुमदारांच्या 'नदीकाठी'बद्दल, तारा वनारसेंच्या 'श्यामिनी'बद्दल, गो. नी. दांडेकरांच्या 'दुर्गभ्रमणगाथा'बद्दल आणि... दुसरा टप्पा रात्री. :प

राजेश घासकडवी Fri, 13/03/2015 - 14:33

In reply to by मेघना भुस्कुटे

नमन स्वीकारा हो भुस्कुटेबै... इतक्या डिट्टेलवार यादीतून पुस्तकं आणि खाणं या दोन्हींवरचं प्रेम उतू जाताना दिसतं. गटणेप्रमाणे भस्म्या रोग झाल्यामुळे तुम्हीसुद्धा भसाभसा पुस्तकं 'खाता' असं वाटायला लागलं.

रुची Fri, 13/03/2015 - 20:08

In reply to by मेघना भुस्कुटे

अनुवादात पदार्थांची नावे कशी रोचक होतात याचं सुंदर उदाहरण. मार्मलेडचा गुळांबा, सलामीचे 'मांसाचे कुटून केलेले नि आतड्यांच्या माळांमधे भरून कोठीत सुकवून ठेवलेले तुकडे' असे वर्णन फार रोचक आहे. आल्याची रोटी म्हणजे जिंजरब्रेड असावा काय?

मेघना भुस्कुटे Sat, 14/03/2015 - 11:49

In reply to by रुची

होय! एवढ्या उलट्या कुतूहलापोटी मी 'दी इयरलिंग' वाचायचा घाट घातला!

बादवे, 'चौघीजणी'वरच्या उल्लेखाचं शुद्धिपत्र. ते 'पॅनकेक'चं भाषांतर 'दशमी' असं नसून 'पानगी' असं आहे. पानगी जऽरा कमी चुकीचं वाटतं.

टिन Fri, 13/03/2015 - 08:28

वा...काय छान विषय आहे.
जी.एंच्या तळपट कथेतलं 'डुकराचे तळहाताएवढे मांसल तुकडे असलेला मसालेदार रस्सा' असं काहीसं वर्णन वाचलेलं आठवलं. कधीही पोर्क खाल्लेलं नसूनही प्रचंड भूक लागली होती!

ऋषिकेश Fri, 13/03/2015 - 09:18

नशीब भरल्यापोटी धागा उघडलाय! मस्त विषय!

असं सांग म्हटलं की जे आठवतंय ते आधीच वर येऊन गेलंय.
इतरही अनेक गोष्टी आहेत पण पटकन आठवायच्या नाहीत. आठवल्या की/तर देतो. तोवर वाचन'भूक' मिटवायला या धाग्यावर डोकावत राहीन :)

घनु Fri, 13/03/2015 - 10:02

खाण्याचा विषय मग तो कोणत्याही माध्यमातून असला की काय प्रसन्न वाटतं. छान धागा, विषयाला अनुरूप अश्या लिखाणामध्ये वाचनात आलेले उल्लेख आठवले की पुन्हा येतोच धाग्यावर. तूर्तास प्रतिसाद चवीने वाचतो :)

गवि Fri, 13/03/2015 - 10:06

"खुर्च्या एक न-नाट्य"मधली निमकरांच्या हॉटेलातली तळलेली डुकराच्या मांसाची भजी (चिराबाजारातल्या क्रुसाजवळ बर्फ पडत असताना)
त्याच नाटकातला वाहतूक मुरंबा..

शिवाय "बर्फमिश्रित लिंबाचे वायाळ सरबत" हा उल्लेख कोणी केलाय हे आता नेमकं आठवत नाही. चिंवि की पुलं.. कदाचित गुंड्याभाऊ मुंबईत आजारी पडतो तेव्हाच्या वर्णनात चिंवींनीच लिहिलं असावं. पण ते शब्द वाचून समहाउ रेल्वेस्टेशनबाहेर ओगराळ्याने ग्लासात भळ्ळकन ओतून दिलं जाणारं, बर्फाच्या लादीचे तुकडे पिंपात टाकलेलं सरबत डोळ्यासमोर येतं आणि ते प्यावंसं वाटतं हे महत्वाचं.

ऋषिकेश Fri, 13/03/2015 - 10:10

In reply to by गवि

बर्फमिश्रित लिंबाचे वायाळ सरबत

ए हो! मलाही आठवतोय हे. कुठे बरं?
गवि, मेघना सगळ्यांनी अशी वर्णनं दिलीएत की भरल्यापोटीही भुका उसळाव्यात.
हे ठाणेकर पक्के डांबिस!

राजन बापट Fri, 13/03/2015 - 10:23

विषय आवडला. रोचक धागा.

ऐसीअक्षरेचे एक सदस्य श्री. संजोपराव यांनी मागे चार भागांमधे लिहिलेली "माझे खाद्य-पेय जीवन" ही लेखमाला आठवली. त्या लेखमालेचे दुवे खालीलप्रमाणे.

http://www.misalpav.com/node/9917
http://www.misalpav.com/node/9970
http://www.misalpav.com/node/10194
http://www.misalpav.com/node/10435

राजन बापट Fri, 13/03/2015 - 10:31

जयवंत दळवी यांनी "भंडार्‍याचे हॉटेल" अशा नावाचा/आशयाचा लेख लिहिलेला आहे. तोही "आत्मचरित्राऐवजी"मधे समाविष्ट आहे.
"बलुतं"मधे गाईचं मांस खाण्यासंदर्भात मेलेलं जनावर कसं आणलं जातं आणि संपूर्ण महारवस्ती तिथे कशी लोटते येथपासून जनावराच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागाना काय म्हणतात नि ते कसे तोडले जातात, प्रिझर्व्ह करण्याकरता काय केलं जातं आणि पदार्थांची नावं यांची वर्णनं आलेली आहेत. खाद्यसंस्कृतीचा हा एक निराळा पैलू.
दुर्गा भागवतांच्या लिखाणामधे खाण्यापिण्याचे उल्लेख येतात. "ऐसपैस गप्पा : दुर्गाबाईंशी" या पुस्तकात आलेले संदर्भ वाचावेसे वाटत आहेत. वाचून येथे देण्याचा प्रयत्न करतो.

मूळ पोस्टीमधे जीए कुलकर्णींचा, त्यांच्या पत्रांचा उल्लेख आलेला आहे. जीएंच्या लिखाणामधे खाण्याचे उल्लेख येतात ते त्यांच्या कथांच्या अन्य घटकांप्रमाणेच, अस्तित्त्वाच्या सीमारेषेच्या आसपासचे, अटीतटीचे असतात. रमलखुणामधे जळक्या चितेवर भाजलेले पिठाचे गोळे येतात. "खरी भूक लागलेली असते तेव्हा समोरच्या येणार्‍या माणसालाच पहिल्या क्षणी खावंसं वाटतं" अशा प्रकारची भुकेची वर्णनं येतात. खुद्द जीएंच्या तामसी आहाराच्या आवडीचे उल्लेख पत्रांमधून येतात. एम ए च्या परीक्षेकरता कोल्हापुरला नऊ दहा दिवस ते होते तेव्हा ते सगळे दिवस मिसळीवर काढलेले असल्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे.

आणखी आठवतील तसं लिहीतो.

राजन बापट Fri, 13/03/2015 - 10:57

रेसीपी : मराठी बालसाहित्यातलं एक जुनं उदाहरण :-)

लहान माझी बाहुली
तिची मोठी सावली
घारे डोळे फिरविते
नकटे नाक मिरविते
भात केला, कच्चा झाला
वरण केलं, पातळ झालं
पोळ्या केल्या, करपून गेल्या
केळ्याची शिकरण करायला गेली, दोनच पडले दात
आडाचं पाणी काढायला गेली, धुप्पकन पडली आत!

वृन्दा Fri, 13/03/2015 - 15:49

In reply to by राजन बापट

केळीच्या बागा मामाच्या , पिवळ्या घडानी वाकायच्या
मामा आमचा प्रेमाचा, घडावर घड धाडायचा
ताई मोठ्या हाताची जपून शिकरण ढवळायची
आजी मोठ्या मायेची,सायीवर साय लोटायची
मामाला ढेकर पोचवायची

गवि Fri, 13/03/2015 - 16:49

In reply to by राजन बापट

तसेच..
मामाची बायको सुगरण, रोज पोळी शिकरण- हे एक.

शिवाय..

तुपात पडली माशी हे आद्य किळसेचे उदा. ठरावे.

राजन बापट Fri, 13/03/2015 - 17:16

In reply to by गवि

बर का ग मंदा
काय झालं एकदा
ताई आमची कांदा
चिरत होती खसा खसा.
कांदा राहिला हातात
अन विळी गेली बोटात
विळी वरून उठली
नाचत सुटली
धक्क्याने मुराम्ब्याची
बाटलीच फुटली
हाय हाय हाय
काचेवरती पाय
काच गेली पायात
आता करायचं काय
-----
चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली
कढईतली पुरी मग गुरफुटुन बसली

काही केल्या खुलेना, जरा सुद्धा फुलेना
झार्‍यानं टोचलं, डेगीतलील्या पुसलं
अशी थट्टा पुरीच्या काळजाला चटली

पुरी झाली लाल, तिचे फुगले गाल
मन आले भरू, डोळे लागले झरू
तिथून उठून तरातरा ताटात जाऊन बसली

खीर थंड झाली, वाटीत बसून आली
लाडेलाडे खीर मग पुरीजवळ गेली
"पुरीताई पुरीताई बघ जरा इकडे
माझं म्हणणे ऐक गडे"
चार शब्द ऐकेल तर पुरी ती कसली

तिकडून ताई आली, तिने युक्‍ती केली
खिरीची नि पुरीची खूप गट्टी झाली
तेंव्हापासून त्यांची जोडी पक्‍की होऊन बसली

कढईतली पुरी मग.. कध्धी नाही रुसली

गवि Fri, 13/03/2015 - 17:25

In reply to by राजन बापट

अरे वा..

बरं का गं मंदा स्पष्ट आठवणीत आहे अजूनही. दुसरं आठवत नव्हतं.

एका गाण्यात "सूं सूं सूं नाक झालं लाल, डोळ्याला चिकटली कांद्याची साल" अशीही ओळ आहे.

तसंचः

कांदा लसूण मिरची आलं
त्या चौघांचं भांडण झालं.
कशावरुन?
एवढ्याश्या खोबर्‍याच्या तुकड्यावरुन
काकूबाई आल्या पदर खोचून
एकेकाला काढलं ठेचून
त्यांची झाली सुरेख चटणी
चटणी ठेवली बशीत
जेवण झालं खुशीत.

असंही एक आठवलं आता.

अमुक Fri, 13/03/2015 - 19:15

In reply to by राजन बापट

बर का ग मंदा, काय झालं एकदा
ताई आमची कांदा, चिरत होती खसा खसा.

.........थोडीशी डागडुजी
बरं का ग मंदा, काय झालं एकदा
ताई आमची चिरत होती, खसा खसा कांदा.

वृन्दा Fri, 13/03/2015 - 19:36

In reply to by राजन बापट

हे माहीते का -

अहो अहो शिंदे घ्या ना हो कांदे
मी छोटीशी भाजीवाली छान छान छान
अहो अहो पवार घ्याना हो गवार
मी छोटीशी भाजीवाली छान छान छान
अहो अहो भुजबळ घ्या ना हो पडवळ
मी छोटीशी ...

नीट आठवत नाही आता :)

बॅटमॅन Fri, 13/03/2015 - 20:36

In reply to by वृन्दा

दुकान्दार अन गिर्‍हाईक सौंवाद. फ्रॉम बाळकराम आय गेस.

गि: आंबेमोहर काय भाव?
दु: असडी सत्ताविसाने दिला.
.
. (ही ओळ विसरलोय)
दु: दिला आत्ताच गोमाजिला.
गि: जातो.
दु: माल जरा पहा तर खरे, भावात सव्वीस घ्या.
गि: साडे पंच्विस द्या.
दु: हं घ्या. कितिकसा?
गि: पल्ला (एक माप).
दु: चला, माप घ्या. (नोकरास उद्देशून).

हा संवादरूपात लिहिलाय, नैतर हे शार्दूलविक्रीडित आहे.

आंबेमोहर काय भाव असडी, सत्ताविसाने दिला |
..................दिला, आत्ताच गोमाजिला |
जातो माल जरा पहा तर खरे, भावात सव्वीस घ्या |
साडे पंच्विस द्या, हं घ्या कितिकसा, पल्ला चला माप घ्या ||

महाराष्ट्र सारस्वतात अशाच चित्रचमत्कृतीची काही प्राचीन उदाहरणे दिलेली आहेत त्यांपैकी एकः

बहुत दिवस झाले पत्रिका येत नाही म्हणुनि सतत माझे चित्त चिंताप्रवाही पडत असुन याचे हेतुचा मी विचार अनुनिद करिताहे. त्यामुळे हा प्रकार त्यजुन अतिकृपेने पत्रिका येत जावी. व परम ममतेची वृद्धि होण्यात यावी.

हे वरवर पाहता गद्य, पण खरेतर मालिनी वृत्तात बसते. (चालः कठिण समय येता, किंवा अनुदिनि अनुतापे इ.इ.)

बहुत दिवस झाले पत्रिका येत नाही
म्हणुनि सतत माझे चित्त चिंताप्रवाही
पडत असुन याचे हेतुचा मी विचार
अनुनिद करिताहे त्यामुळे हा प्रकार
त्यजुन अतिकृपेने पत्रिका येत जावी
व परम ममतेची वृद्धि होण्यात यावी.

अशीच उदाहरणे आर्या व अभंग वृत्तांमधलीही सारस्वतात दिलेली आहेत.

वृन्दा Fri, 13/03/2015 - 21:54

In reply to by बॅटमॅन

ही कविता माझ्या पुढच्या बॅचला होती. अन मला पुढल्या वर्षी ती हवी होती. अगदी हवीच होती. पण नेमकी आमच्याच बॅचला पुस्तके बदलत असत.त्यामुले आता आठवत नाही पण काहीशी अशी होती -

वाटाणा फुटाणा शेंगदाणा
उडत चालले टणाटणा
वाटेत भेटला चिमुकला तीळकण
हसायला लागले तिघेजण,
तीळा तीळा , कसली रे गडबड?
सांगायला वेळ नाही थांबायला वेळ नाही
तीळ चालला भराभर, वाटेत लागले ताईचे घर,
तीळ शिरला आत, थेट स्वैयंपाकघरात ,
ताईच्यापुढ्यात रिकमी परात
हलवा करायला तीळ नाही घरात!
ताई बसली रुसून, तीळ म्हणाला हसून
घाल मला पाकात , हलवा कर झोकात
ताईने घेतला तीळ परातीत , चमच्याने थेंब थेंब पाक ओतीत , इकडून तिकडे बसली हलवीत,
शेगडी पेटली रसरसून , वाटाणा फूटाणा गेले घाबरुन
पण तीळ पहा कसा ? हाय नाही हूय नाही , हसे फसा फसा!!

बॅटमॅन Fri, 13/03/2015 - 22:01

In reply to by वृन्दा

आयला जबरीच कविता!

बाकी रामदासांवरच्या दास डोंगरी राहतो या कादंबरीत रामदास स्वयंपाकाचे ओवीबद्ध काव्यात वर्णन करतात असा एक प्रसंग आहे. तेही वर्णन लय भारी आहे.

वृन्दा Fri, 13/03/2015 - 22:04

In reply to by बॅटमॅन

बॅट्या, तुझ्या प्रतिसादास उपप्रतिसाद देते आहे पण विशेष संबंध नाही. किंचीत संबंध आहे.
शिवाजी राजे - रामदास स्वामी अन बेडकीची कथा फार आवडती आहे.
विशेषतः तात्पर्य -

आम्ही काय कुणाचे खातो,
तो राम आम्हाला देतो|

चार्वी Fri, 13/03/2015 - 23:02

In reply to by वृन्दा

ही कविता माझी आई आसपासच्या चिल्यापिल्यांना शिकवत असते!

वाटाणा फुटाणा शेंगदाणा
उडत चालले टणाटणा
वाटेत भेटला तिळाचा कण
हसायला लागले तिघेही जण,
तीळ चालला भराभर, थांबत नाही कुठे पळभर
तीळा तीळा, कसली रे गडबड?
सांगायला वेळ नाही थांबायला वेळ नाही
काम आहे मोठं, मला नाही सवड!
ऐक तर जरा, पहा तर खरा,
कणभर तिळाचा मणभर नखरा
पहा तरी थाट, सोडा माझी वाट!
करूया गंमत, बघूया जंमत
चला रे जाऊ याच्याबरोबर
तीळ चालला भराभर
वाटेत लागले ताईचे घर,
तीळ शिरला आत, थेट स्वैयंपाकघरात ,
ताईच्या हातात छोटीशी परात
हलवा करायला तीळ नाही घरात!
ताई बसली रुसून, तीळ म्हणतो हसून
घाल मला पाकात, हलवा कर झोकात
ताईने घेतला तीळ परातीत, चमच्याने थेंब थेंब पाक ओतीत , इकडून तिकडे बसली हलवीत,
शेगडी पेटली रसरसून, वाटाणा फूटाणा गेले घाबरुन
पण तीळ पहा कसा ? हसे फसा फसा!!
पाकाने फुलतोय, काट्याने खुलतोय
अरे अरे पण तीळ कुठे गेला?
काटेरी पांढरा हलवा कुठून आला?

मेघना भुस्कुटे Tue, 17/03/2015 - 11:07

In reply to by चार्वी

चि. विं. च्या 'वायफळाचा मळा'मध्ये हिवाळ्यावरच्या एका लेखात हलवा करण्याच्या कृतीचं खास चि.वि.स्टाईल वर्णन आहे. हात पुसायला साधा सुती रुमाल, घाम पुसायला कमरेला रेशमी रुमाल, केशराच्या काड्या घातलेलं पाणी, खास शेगडी आणि निखारे, धुऊन वाळवलेले तीळ ... असा सगळा जामानिमा करून हलवा करायला घेणार्‍या बायका... छ्या! पुन्हा वाचलं पाहिजे.

शहराजाद Tue, 17/03/2015 - 00:04

In reply to by वृन्दा

लहानपणी हे गाणे पाठ केले होते :)

लहान भावाच्या वेळच्या एका गाण्यात 'चक चक चकली, काट्याने माखली' असे काहीतरी होते.

शहराजाद Wed, 18/03/2015 - 01:07

In reply to by वृन्दा

आणखी एक पाठ:

केळीच्या बागा मामाच्या , पिवळ्या घडानी वाकायच्या
मामा आमचा प्रेमाचा, घडावर घड धाडायचा
आत्या मोठ्या हाताची, भरपूर साखर ओतायची
आई ( ----?----) मायेची, तिनेच साय लोटायची
ताई नीटस कामाची जपून शिकरण ढवळायची
वाटीवर वाटी संपायची,मामाला ढेकर पोचवायची

बॅटमॅन Fri, 13/03/2015 - 11:21

खाद्यपदार्थांचे वर्णन पुलंच्या वंगचित्रे मध्येही आहे, पण ते चविष्ट म्हणण्यासारखे नाही. नाही म्हणायला सकाळी उठून खजूररस प्यायला जातात तेव्हाचे वर्णन छान आहे.

घनु Fri, 13/03/2015 - 12:04

तीन चार वर्षापूर्वीच्या लोकप्रभा मधे येत असलेल्या 'खाली पेट' सदरातले इब्राहीम अफगाण ह्यांचे लेख आठवले. वा काय ती शैली लिखाणाची आणि काय ती खाद्यसंस्कृती ची सफर. माणसाची नुसती भूकच चाळवत नसे तर त्या भागात अगदी तिथे जाऊन यायलाच हवं असं होत असे. प्रत्येक शुक्रवारी तुफान वाट पहायला लावणारं होतं ते सदर.

फार शब्दश: असा उल्लेख आठवत नाही पण एका लेखात त्यांनी वरणाच्या वेगवेगळ्या भागातल्या वेगवेगळ्या पाककृती दिल्या होत्या, त्याची पद्धत अप्रतिम होती. म्हणजे पंजाबचं वरण (दाळ-तडका) पंजाबी बायांसारखं असतं जसा त्यांचा रोजचा मेकअप ही थोडा भडक असतो तसं ते तडका मारलेलं वरण दिसतं. तसंच ब्राह्मणी वरण, कोकणी वरण, द.भारतातलं वरण, कश्मिरी दाल असे काय काय प्रकार तिथल्या पारंपारिक स्त्रियांच्या स्वभाव व दिसण्या प्रमाणे असते असा मस्त खुशखुशीत लेख त्यांनी लिहीला होता.

त्यांच्याच लेखात एकदा 'टोस्ट' ह्या ब्रिटीश टीव्ही फिल्म चा अप्रतिम उल्लेख वाचला आणि तो लेख वाचल्या वाचल्या लगेचंच तो सिनेमा पहाण्याचा आनंद घेतला. टोस्ट सिनेमा म्हंटलं की टोस्ट पेक्षा (lemon meringue pie) चं जास्त आठवतं :) अगदी तस्साच्या तस्सा लेमन-मरँग-पाई खायची त्या दिवसापासून ची सुप्त इच्छा आहे :)
(उत्कृष्ट लेमन-मरँग-पाई पुण्यात कुठे मिळतो सांगितल्यास बहूत आभार).

बॅटमॅन Fri, 13/03/2015 - 12:36

In reply to by घनु

पर्शियन फूड नामक डाकुमेंट्री पाहिल्यावर अस्सल इराणी जेवणाबद्दल अशीच उत्सुकता दाटून आलेली आहे. पण तशा प्रकारची हाटेलेच कुठे नाहीत. इराणी क्याफेमधून तसे पदार्थ मिळत नाहीत.

घनु Fri, 13/03/2015 - 13:22

In reply to by बॅटमॅन

"पर्शियन फूड" डॉक्युमेंट्री ... अरे वा, पहायला हवी. तसं फूड सफारी ह्या फॉक्स ट्रॅव्हलर चॅनलच्या कार्यक्रमात पर्शियन फूड ची सफर केली आहे म्हणा.

बॅटमॅन Fri, 13/03/2015 - 13:34

In reply to by घनु

यूट्यूबवर तसं सर्च मार फक्त. मिळून जाईल. प्रत्येकी अर्ध्या तासाचे असे एकूण ४ भाग आहेत. कुणी अस्त्रालयीन शेफ आहे.

घाटावरचे भट Fri, 13/03/2015 - 14:23

In reply to by घनु

'आमच्याकडे दाल म्हणजेच दाल माखनी. पिवळी दाल / दाल तडका वगैरे हवे असेल तर तसे स्पष्ट सांगावे लागते' असे एका सरदार मित्राने सांगितल्याचे स्मरते. आणि अलीकडच्याच पतियाला भेटीत त्याचा प्रत्ययही आला.

राजेश घासकडवी Fri, 13/03/2015 - 14:45

धागा पाहून सर्वात आधी दळवींचं 'दादरचे दिवस' आठवलं होतं. त्याचा अनेकांनी उल्लेख केलेला आहेच.

मात्र अन्नसंस्कृती हीच कादंबरीचा किंवा कथेचा एक प्रमुख भाग असलेली मराठी पुस्तकं आठवत नाहीत. एक तैवानी (इंग्लिशमध्ये डब केलेला) सिनेमा पाहिलेला होता - त्याचं नाव 'ईट ड्रिंक मॅन वुमन'. एका संपूर्ण कुटुंबाचे एकमेकांशी असलेले संबंध अन्न आणि स्त्रीपुरुष संबंध यांच्या भोवती फिरताना कसे बदलतात याचं मस्त चित्रण होतं. बाप वयस्क शेफ असतो आणि त्याच्या तरुण ते मध्यमवयीन पर्यत चार मुली. त्यांचे आपापले उद्योग असतात. दर आठवड्याला विशिष्ट वेळी एकत्र जेवणं हा त्यांचा रिवाज असतो. मुलींवर बापाने केलेले संस्कार, त्यांच्याकडून असलेल्या त्याच्या अपेक्षा, आणि कुटुंबात होणारे बदल याला कायम अन्न बनवण्याची आणि रिच्युअली खाण्याची पार्श्वभूमी आहे. अन्न बनवण्याचं चित्रणही सुंदर आहे. मला एक प्रसंग आठवतो तो म्हणजे सगळ्यात धाकटी मुलगी तंद्री लागल्याप्रमाणे डोशासारखा पदार्थ तयार करत असतेे. तिच्या हातात पिठाचा गोळा असतो. आणि गरम तव्यावर ती तो नाजूकपणे आपटते. त्या गोळ्याचा पातळ थर तव्यावर जमतो. आणि दोन सेकंदात भाजला जातो. एका हाताने ती लयबद्ध पद्धतीने हे 'डोसे' टाकते, आणि दुसऱ्या हाताने त्याच लयीत हलकेपणे काढते. एखादं सुंदर नृत्य पाहावं तसा हा प्रसंग पाहाताना मला वाटलं.

राही Fri, 13/03/2015 - 14:45

व्यंकटेश माडगूळकरांनी आपल्या सुरुवातीच्या दिवसांच्या आत्मपर कथनात रानावनात उंडारताना त्यांची टोळी काय काय खात असे त्याचे बरेच उल्लेख केले आहेत. छर्र्याने होले पाडणे, ते भाजून खाणे, फड्या निवडुंगाची लाल बोंडे चाखणे असे अनेक उल्लेख आहेत. म्हातारा आणि समुद्र या पुस्तकात सुद्धा मांसाच्या प्रकारांचे उल्लेख आहेत. तसे तर जुन्या इंग्लिश कादंबर्‍यात 'इन' किंवा तावेर्नात काय काय खाल्लेप्याले त्याचे अनेक उल्लेख असतात. आत्ता नेमके आठवत मात्र नाहीत. जेम्स बाँड सुरुवातीच्या पुस्तकांतून फक्त 'कॉन्यक' प्यायचा, किंवा कधीमधी मैत्रीण बरोबर असताना 'शिवास रीगल' मागवायचा, हेही आठवतेय. इंग्लिश कादंबर्‍यांतून नानाविध मद्यांचे, चीझचे, कॅविअरचे अनेक उल्लेख असतात.
शंकर सखाराम यांनी रायगड जिल्ह्यातल्या पदार्थांवरआणि एकंदर संस्कृतीवरही सुंदर लिहिले आहे. त्यातला 'खापुरला' हा लेख आठवतो. कोंड्याच्या भाकरीवर, किंवा 'आगोटी'साठी केल्या जाणार्‍या साठवणुकीवरही त्यांनी लिहिले आहे. खाडीतली कोलंबी किंवा शेतातल्या खेकड्यांचे गरमागरम कालवण हे पावसाच्या संततधारेत आणि गुढघाभर चिखलात 'आवणी' करून परतल्यावर कसे स्वर्गसुख असते तेही त्यांनी लिहिले आहे. मला वाटते, र.वा. दिघे यांच्या 'पाणकळा'मध्येही असे उल्लेख आहेत. नंदा मेश्राम यांच्या आत्मचरित्रात आपल्या हातची बिर्‍यानी पती केशव मेश्राम यांना कशी आवडत असे ते लिहिले आहे. मासळी आणि चिकन शिजवण्याचे आणखीही उल्लेख आहेत.
झेंडूच्या पाकळयांच्या तळाशी असलेले 'खोबरे', घाणेरीची काळी फळे, इक्झोर्‍याची लाल फळे, पिकलेली भोकरे खाल्ल्याचे उल्लेखही 'बालपणीचे दिवस'सदृश कथनात वाचल्याचे आठवते.
मुकुंद टांकसाळे यांनी फार्म-हाउसवर पाहुणे गोळा करून त्यांना चिकन शिजवून खाऊ घालण्याच्या एके काळी पुण्यात बोकाळलेल्या फॅडवर छान विनोदी लेख लिहिला आहे.
स्त्रीगीते, कहाण्या, तात्पर्यकथा यांमधून तर असंख्य उल्लेख वाचले आहेत. एक सासू सासुरवासामुळे बारीक होऊन माहेरपणाला आलेल्या आपल्या लेकीसाठी भात शिजवताना त्यात चांगली अर्धी कथली तूप घालते. सुनेला मात्र भात वेळून निथळलेला निवळ देते. ते सगळे तूप निवळात जाऊन सुनेच्या पोटात जाते. सून टुमटुमीत होते आणि लेक तशीच बारीक राहाते अशी एक गोष्ट वाचली आहे. आणखी एक सासू सुनेला छळण्यासाठी तिला पाणी पिण्याअगोदर गाजर खाऊ घालते आणि लेकीला मात्र आवळा खायला देते. गाजरावर पाणी प्यायले तर ते कडू लागते आणि आवळ्यावर प्यायले तर मधुर, म्हणून. बालगीतांमध्येही अनेक उल्लेख आहेत. 'डोल ग जांभळी डोलाच्या' मध्ये 'मामीच्या अंगी कापड-चोळी, कर ग मामी पुरणपोळी; पुरणपोळीशी नाही तूप, बाळाला लागली भूक' असे म्हणताना भावजयीचा उद्धार केला आहे. 'तूपरोटी खाऊन जा' हे तर सुप्रसिद्ध. चल रे भोपळ्या टुणुक टुणुक मधली आजी सुद्धा तूपरोटी खाण्यासाठी लेकीकडे निघालेली असते.
असे अनेक. अर्थात हे उल्लेख तेव्हढेसे चविष्ट नाहीत हे आहेच.

वृन्दा Fri, 13/03/2015 - 16:03

In reply to by राही

ते हलके पिसासारखे बदाम पडतात अन मग तो पापुद्रा काढून आतला बदाम खातात ते माहीत आहे का? "सांगावेसे वाटले म्हणून" पुस्तकात शांता शेळके यांनी वेगळ्या सुरेख नावाने त्या बदामाच्या झाडाचा उल्लेख केला आहे.

राही Fri, 13/03/2015 - 22:26

In reply to by वृन्दा

त्या बियांचे नाव वावळा,बिवळा, विबळा असे काहीसे आहे. या बिया एका एक सें.मी. व्यासाच्या आणि गवती रंगाच्या पातळ दुहेरी पर्णचकतीच्या मध्यभागी असतात. ही चकती अगदी हलकी असून वार्‍यावर तरंगते. त्यामुळे बीजप्रसार होतो.पवईच्या हिरानंदानीबागेत, राणीबागेत, संजय गांधी उद्यानात ही झाडे पाहिली आहेत.बिया तुरीच्या दाण्यापेक्षाही लहान असतात.

वृन्दा Fri, 13/03/2015 - 22:30

In reply to by राही

लहानपणी उंबराची फळे. घाणेरी (टणटणी) ची काळी फळे, त्यांच्या फुलातील मध अहाहा!! अन वावळ्याचे बदाम खूSSSSप खाल्लेत. हां अन कैर्‍या व विलायती चिंचा.

घाटावरचे भट Sat, 14/03/2015 - 11:10

In reply to by राही

>>त्या बियांचे नाव वावळा,बिवळा, विबळा असे काहीसे आहे

झाडाला वावळ/वावळा म्हणतात. आमच्या घराच्या खिडकीत आहे. या दिवसांत बियांचा जाम कचरा होतो घरात.

वृन्दा Sun, 15/03/2015 - 04:14

In reply to by घाटावरचे भट

राही, भट आठवलं नाव - शांताबाईंच्या पुस्तकात या झाडाला "चंदनचारोळी" म्हटले आहे. :)

राही Fri, 13/03/2015 - 20:34

In reply to by रुची

आघोट/आगोट/आगोटी म्हणजे पावसाळा. त्यासाठी बेगमी करून ठेवायची असते.लाकडे, सुकी मासळी,मसाले वगैरे.

गवि Fri, 13/03/2015 - 16:51

श्यामची आई हे पुस्तक कोंकणातल्या खूप पदार्थांचे उल्लेख आणि तपशील यांचा दस्तावेज आहे.

पानगी, हळदीच्या पानातले पातोळे, ताकतई, श्रीखंडाच्या वड्या, सांदणे, कांदेपाक हे तातडीने आठवलेले काही.

मेघना भुस्कुटे Fri, 13/03/2015 - 18:18

गवि, मुसु, गुर्जी, राही... यांचेही प्रतिसाद खूप आवडले.

खाण्याबद्दल प्रेमानी लिहिणार्‍यांच्यात पु.ल. नि दुर्गाबाई प्रसिद्धच आहेत. गो. नी. दांडेकरांचं नाव कुणी चटकन घेणार नाही. पण आप्पांना खाण्याबद्दल भलतंच प्रेम नि जाण असावी. 'दुर्गभ्रमणगाथा'मध्ये त्यांनी गडावर गेल्यावर उत्तम खिचडी रांधल्याचं वर्णन केलं आहे. 'नामांकित शिधा' पोरासोरांच्या हाती पडून पदार्थाची वाट लागू नये, म्हणून मागे राहून त्यांनी खिचडी रांधली. तुपात तळून घेतलेले पापड, मग त्यात केलेली खमंग फोडणी, तळून घेतलेल्या मिरच्या नि कांदे-बटाटे, कढीलिंबाची रसरशीत पानं आणि मग आधणात ओईरलेले 'दाळ-तांदूळ' (डाळ नव्हे, माइंड यू!). चुलीवरून ते खिचडीचं पातेलं उतरवताना पातेलं कलंडून थोडी उकळती खिचडी त्यांच्या पायावर सांडली आणि पाय भाजला. पण खिचडी वाया जाऊ नये, म्हणून कुणीतरी पातेलं सुरक्षितपणे बाजूला ठेवेस्तोवर ते भाजणं सोसत तसेच थांबले, हा आणिक रोचक तपशील. आणिक एक वर्णन म्हणजे - साऊ अवकीरकरीण ही त्यांची गडावरची मानलेली बहीण - तिनं 'शहरी लोकांना' घातलेल्या जेवणाचं वर्णन. घरातली म्हसरं एका बाजूला बांधून पाहुण्यांना जेवायला केलेली जागा. माशा वारायला सगळ्यांना हातात आंब्याचे टहाळे. कांदा-बटाट्याचा रस्सा, दूध-गूळ आणि सुवासिक तांदळाचे 'घावणे'. या वर्णनात पुढे पुढे दांडेकर 'त्या गरीब माऊलीचं प्रेम... अशी चव शहरात मिळते का... ' वगैरे टि-पि-क-ल दांडेकरी पद्धतीत भावुक होतात. पण ठीक आहे, तितकं माफ! त्यांच्या 'पडघवली'त माझे लाडके पोहे अनेकदा भेटतात. गुजाभावजींना 'थोरल्या' पातेलीत कालवून दिलेले दूध-गूळ पोहे, बारकाचं भात नि त्याचे पोहे, ताकभात, व्यंकूभावजी नि त्यांची बायको दोघंच जण खातात ते हातफोडणीचे कोरडे पोहे... नुसती पोहेपंचमी आहे 'पडघवली'मध्ये. 'कुण्या एकाची भ्रमणगाथा'मध्ये संन्यासी विश्वातले पदार्थ भेटतात. कुण्या मठात तुपावरून पाय घसरून पडायची भीती वाटेल इतकं तूप घालून रांधलेला हलवा नि पूडी, नर्मदेच्या काठावर एका सपाट दगडावर पीठ भिजवून राखेत भाजलेले गाकर, उपासाच्या दिवशी केलेला मकाण्यांचा फराळ... तशीच एका कुत्र्यासोबत वाटून घेतलेली सुकी चपातीही.

गौरी देशपांडे खाण्याबद्दल लिहील असं चटकन वाटत नाही. पण तिनं एका 'साप्ताहिक सकाळ'च्या दिवाळी अंकात काही आधुनिक दंतकथा लिहिल्या होत्या. त्यात एका सासू-सुनेच्य जोडीची गोष्ट होती. सासू ब्राह्मण आणि सून बहुधा कष्टकरी अब्राह्मण वर्गातली. सासूबाईंच्या प्रोफेश्वर लेकाची विद्यार्थी प्रेमिका. लेकाच्या पोटाच्या चोचले पुरे करायला म्हणून सासूबाई सुनेला ब्राह्मणी स्वैपाकात तयार करतात. घडीच्या, पापुद्रे सुटलेल्या, सोनेरी पोळ्या; वाफेवर शिजवायच्या, खोबरं घालून करायच्या भाज्या, चिंचगुळाची आमटी... वगैरे वगैरे. पुढे लेकानं पुरुषी अहंकाराचे दिवे लावल्यावर आणि अजून काही लफडी केल्यावर सूनबाई वेगळ्या होतात, नि शिक्षण अपुरं राहिलेलं असल्यामुळे चरितार्थ चालायची पंचाईत होते. मग हा खास बामणी स्वैपाक करून चक्क पोळपाट-लाटणं चालवतात, अशी ती गोष्ट. गोष्टीच्या शेवटी लेकाच्या मनमानी कारभाराला विटलेल्या सासूबाई सुनेला 'कर गं तुझं ते लालभडक कालवण आणि भात... सूंसूं करत खाऊ. मला ती चव हवीशी वाटतेय..' अशी फर्माईश करतात, हा खास गौरी-वळसा. तशीच तिच्या 'दुस्तर हा घाट'मधे भेटलेली शेतातल्या घरातली वर्णनं. 'हे हिरवे धणे आई लसणीच्या पातीबरूबर वाटती. मग लई भारी लागत्यात' हे वाचून लग्गेच खावंसं वाटलं होतं. तशीच व्हिस्कीची खाडकन जाग आणणारी कडू भाजरी चव, डच चीज, 'करून ठेवलेला खुमासदार आधुनिक स्वैपाक'. 'थांग'मधे 'बदामाच्या बाऽरीक धांदोट्या' बयाजवार काढणारी दिमित्रीची बोटं...

हुह... नि अजून.... टॅम्प्लीज. :ड

रुची Fri, 13/03/2015 - 19:55

In reply to by मेघना भुस्कुटे

सकाळ-संध्याकाळ जेवणाला पुस्तके खातेस हे माहीत आहे पण वाचलेल्या गोष्टी इतक्या तपशीलात आठवाव्यात म्हणजे धन्य आहे. अजून येऊदेत, मजा येतेय.

बॅटमॅन Fri, 13/03/2015 - 18:31

वरील प्रतिसादातले दुर्गभ्रमणगाथेतले अवकीरकरणीच्या घरचे वर्णन खास दांडेकरी शैलीतले आहे अन जब्राट आहे. तो एक अर्धवट श्लोकही भारी आहे-

अहो लक्षुंबाई, बहुत तुमचा भात बरवा |
मधीं राहे कच्चा, तळिच जळला, तोंडि हिरवा ||

अतिशहाणा Fri, 13/03/2015 - 18:57

मराठी साहित्यातली खाद्यसृष्टी पुलंपासून सुरु होऊन दळवींपर्यंत संपत असल्याने माझा प्रतिसाद थोडा विसंगत वाटण्याची शक्यता आहे. ;) पण शंकर पाटील यांनी 'पाटलाची चंची'मध्ये त्यांच्या खाण्यापिण्याच्या आवडीबाबत थोडे लिहिले आहे. श्रीमंत, तालेवार घराण्याला गरिबी आल्यानंतर खाण्याचा दर्जा कसा घसरत गेला या अनुषंगाने त्यांचे लिखाण प्रामुख्याने गेल्याचे वाटते. खवैय्या किंवा connoisseur ची भूमिका घेऊन मी किती वेगवेगळे पदार्थ खाल्ले याची जाहिरात वाटण्याऐवजी त्यांचे लेखन ग्रामीण बागातील खाद्यसंस्कृतीचे किंचित दर्शन करवून देणारे वाटते. थोरल्या भावाच्या लोभी वृत्तीमुळे खाण्यापिण्याचे कसे हाल झाले व हॉटेलातील चमचमीत खाण्याची हौस पुरवण्यासाठी काय सव्यापसव्य करावे लागले याचेही थोडे वर्णन आहे. 'पाहुणचार' या कथेत त्यांनी खाण्यापिण्याच्या आग्रहाच्या अतिरेकावर छान विनोदही केला आहे. नेमाड्यांनी खवैय्याच्या भूमिकेतून खाण्यापिण्याचे वर्णन केले नसले तरी कोसलामध्ये मद्रास कॅफेतला डोसा, सिगरेटी-चहा, पार्टीत मेहताने दिलेली बासुंदी या गोष्टी कथानकाचा अविभाज्य भाग वाटतात. पुढे चांगदेव चतुष्टयमध्येही काऱ्या माणसाचे जेवण व विवाहिताचे जेवण यातील फरक त्यांनी चांगला दाखवून दिलाय. श्रॉफचे पंचतारांकित जेवण, राजेश्वरीबरोबरचा टोमॅटो ज्यूस किंवा शेखमास्तरबरोबरचे बीफ खाणे, शेर ए पंजाबमधली कोंबडी, पवारांच्या घरचे पोहे व चहा, इतर प्राध्यापकांसोबत क्यांटिनमध्ये किंवा घरी स्वतः ऑम्लेट वगैरे बनवून खाणे या गोष्टीही समकालीन खाद्यसंस्कृती चांगल्या प्रकारे दाखवून देतात.

जालावर संजोपराव आणि चौकस दोघांनीही खाण्यापिण्याविषयी छान लिहिले आहे.

जिन्क्स Thu, 19/03/2015 - 19:18

In reply to by अतिशहाणा

मनोगत वर संजोपरावांच लेखन कसे पाहता येयिल?? दुवा मिळेल का?