नेपाळ - - ‘कुमारी’प्रथा !

नेपाळमध्ये स्वतंत्र राज्यं होती तेव्हाच्या काही प्रथा-परंपरा आजही सुरू आहेत. त्यातीलच एक ‘कुमारी’प्रथा !
साधारण ३ ते १० या वयोगटातील मुलगी. तिची निवड धर्मगुरू करतात. तिची रहाण्याची सोय ठराविक देऊळवजा आश्रमात केली जाते. धार्मिक गुरूंच्या देखरेखीखाली तिने तिथे रहायचे, कुटुंबियांपासून दूर! साधारणपणे ५ ते ७ वर्षांचा काळ (ती वयात येईपर्यंत) तिचं वास्तव्य तिथेच असतं. गुरूजींच्या परवानगीनुसार कुटुंबिय तिला वर्षाकाठी एखाद्यावेळी भेटू शकतात. तिचं धार्मिक व शालेय शिक्षण तिथे होतं. अधून मधून तिच्या वयाचे सवंगडी तिच्याबरोबर खेळण्यासाठी बाहेरून आणले जातात. तिचं दर्शन वर्षातून एकदाच, ठराविक दिवशी, भव्य स्वरूपात भरवल्या जाणार्‍या यात्रेत करता येतं. एरवी ती दर्शन देत नाही. जर ती रहात असलेल्या देवळात पर्यटक भेट देत असतील व गुरूजींनी परवानगी दिली तरच काही क्षणांसाठी ती ठराविक ठिकाणी उभी राहून दर्शन देऊ शकते. आम्हांलाही पाटणकुमारीचं दर्शन घेता आलं, परंतु तिचे फोटो काढण्यास मज्जाव होता. एका देवळात इतर काही कुमारींचे फोटो बघितले.
तिचा तिथला मुक्काम संपला की ती बाह्य जगात, तिच्या कुटंबियांकडे परत जाऊन, पुढील शिक्षण, लग्न, संसार असं सामान्य माणसांचं जीवन जगू लागते.
.. तिच्या निवडीचे निकष काय असतात?
.. तिच्या वास्तव्याच्या ठिकाणी तिच्यासमवेत इतर कोण असतं?
.. धार्मिक शिक्षण व शालेय शिक्षण म्हणजे नक्की काय स्वरूपाचं असतं?
.. बाहेर पडल्यानंतर समाजात तिला कशा प्रकारची वागणूक मिळते?
आणि सर्वांत महत्त्वाचं...
.. तिला स्वत:ला या प्रक्रियेत शिरताना - असताना - तिथून बाहेर पडताना व त्यानंतर सामान्य स्त्री म्हणून जगताना तिच्या मनात नक्की काय-काय असतं?
गाईडकडून मिळालेल्या माहितीने मनात अनेक प्रश्न निर्माण झाले, पण उत्तारांविना मनात तसेच पडून राहिलेत.

चित्रा राजेन्द्र जोशी - २५.०१.२०१५

3
Your rating: None Average: 3 (2 votes)

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

जाला वर ह्याबद्दल अतिप्रचंड

जाला वर ह्याबद्दल अतिप्रचंड माहीती उपलब्ध असावी

+१ होय दिसतीये खरी.

+१ होय दिसतीये खरी.

Vestal Virgins इत्यादि..

कुमारी अवस्थेतील अक्षतयोनि मुलीमध्ये काही विशेष पावित्र्य आणि शक्ति असते अशा कल्पना सर्व समाजांमध्ये निरनिराळ्या प्रकाराने दिसून येतात. मुलीला येल्लम्मा दिसणे (आणि म्हणून तिने जोगतीण बनून आयुष्यभर जोगवा मागत आयुष्य काढायचे), प्राचीन रोममधील Vestal Virgins ही संस्था, इतकेच काय आपल्याकडे काही विशेष दिवशी कुमारिकांना बोलावून त्यांची पूजा करून त्यांना भोजन-दक्षिणा द्यायची प्रथा ह्या गोष्टी अशा विचाराच्याच निदर्शक आहेत. प्रसिद्ध मानवत कांड - 'आक्रित' ह्या पालेकरदिग्दर्शित चित्रपटाचा विषय - हे कुमारिकांचे बळी देऊन त्यांच्या योनीमधील रक्ताने देवीची पूजा केल्यास पुत्रप्राप्ति होते ही समजुतीतूनच झाले.

नेपाळी हिंदु आणि बौद्ध धर्मांमध्ये शाक्त तन्त्राचा प्रभाव जुना आहे त्याच्यातून कुमारी देवीची प्रथा तेथे सुरू झाली असावी. त्याबाबत अधिक माहिती येथे पहा. (अनेक वर्षांपूर्वी मी नेपाळला गेलो असता तेथील देवळांमधील कोरीव कामामध्ये हाडाचे सापळे अशा देवी जिकडेतिकडे पाहिल्याचे आठवते. नेपाळमध्ये नरबलि दिले जातात अशी स्मजूत अगदी अलीकडेपर्यंत प्रचलित होती.)

प्राचीन रोममध्ये Vestal Virgins चे फारच प्रस्थ होते. ३० वर्षे Vestal Virgin म्हणून काढल्यावर त्या मुलीस निवृत्त केले जाई आणि तिला आयुष्यभर निवृत्तिवेतन मिळे. त्यांना विवाहहि करता येई आणि अशी मुलगी पत्नी म्हणून पटकावणे हा एक मान मानला जाई. रोम शहराच्या मध्यावर कॅपिटॉल हा रोमन सम्राट जेथे राहून कारभार चालवीत असा भाग आहे त्याच्या पडक्या अवशेषांमध्ये Temple of the Vestal Virgins ह्याचेहि अवशेष टिकून आहेत.

कुमारी देवी

कुमारी देवीचे रूप समजली जाते. परंपरेनुसार, पूर्वी तिचा मान राजापेक्षाही (तत्वतः) मोठा समजला जात असे. वयात आल्यावर तिचे देवीपण संपते आणि दुसरी लहान मुलगी तिची जागा घेते. देवी असताना त्या मुलीचे आयुष्य धर्मगुरुंच्या देखरेखीखाली काटेकोर नियमांत बांधलेले असले तरी मानावे आणि सुखासीन असते. कुमारी ऋतू येण्याच्या वयाची झाली की नव्या कुमारीचा शोध सुरू होतो. सत्शील कुटुंबातून आलेली आणि जन्मापासून एकदाही अंगातून रक्त न निघालेली मुलगी निवडली जाते. निवडीचे आणखीही काही निकष असू शकतील. एकदा देवत्व संपले की मात्र या मुलींचे भवितव्य फारसे चांगले नसते. भूतपूर्व कुमारीशी लग्न करणे नवर्‍यासाठी अशुभ मानले जात असल्यामुळे पुढे लग्न होणे खूप कठीण होऊन बसते. उर्वरित आयुष्यासाठी तिला निवृत्तीवेतन मिळत नाही. आईवडील गरीब असतील आणखीनच बिकट परिस्थिती. हे आता बदलत चालले आहे असे म्हणतात. मागे एका नेपाळी महिलेला मी याबद्दल विचारले होते. अस्पृश्यतेच्या प्रथेबद्दल विचारल्यावर एखाद्या भारतीयाने ज्याप्रमाणे, आता लोक असल्या रूढी फारशा पाळत नाहीत, असे आग्रहाने सांगावे त्याप्रमाणे तिने आता कुमारी देवीचे महत्व तितके उरले नाही आणि तिच्यासारखे बहुसंख्य लोक असल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत असे सांगितले.

तिची निवड धर्मगुरू करतात.

तिची निवड धर्मगुरू करतात. तिची रहाण्याची सोय ठराविक देऊळवजा आश्रमात केली जाते. धार्मिक गुरूंच्या देखरेखीखाली तिने तिथे रहायचे, कुटुंबियांपासून दूर! साधारणपणे ५ ते ७ वर्षांचा काळ (ती वयात येईपर्यंत) तिचं वास्तव्य तिथेच असतं.

आणि तिथे करायचं काय? म्हणजे ही प्रथा कशासाठी आहे? साध्य काय करायचं असतं?

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)