गुजराथ डायरीज

क्रमवारीतल्या त्या तिन घटनांनी बर्‍याच गोष्टी बदलल्या. आज विस वर्षानंतर मागे वळुन पहातांना त्यांचा एकमेकांशी असलेला संबध सहज लावता येतो. पण तेंव्हा त्या गोष्टी फक्त घडत होत्या आणि त्या जसजश्या घडत होत्या तसतशी आधुनिक नागरीकशास्त्राचे काही संदर्भ नव्याने स्पष्ट करीत होत्या. एक छोटा खड्ड्याने ग्रासलेला रस्ता एकाएकीच रुंद आणि रम्य झाला तर आम्ही महाराष्ट्रातुन गुजरातेत आलो आहोत अशी आजची धारणा आहे. कधीकाळी रस्त्याच्या कडेला कचर्‍याचे मोठमोठे ढिग आणि प्लॅस्टीक जळण्याचा वास आला की गुजरात लागले असा काहिसा समज रुढ होता. घर आपले म्हणुन ते स्वच्छ ठेवायचे आणि रस्ता सार्वजनिक म्हणुन त्यावर हवी तशी घाण करायची याचे उत्तम उदाहरण त्याकाळी सुरतेत पहायला मिळायचे. अप्पलपोटेपणा म्हणा किंवा मग स्वार्थ म्हणा पण बिल्डींग आणि घरांना बाहेरुन रंग लावण्याचा खर्च न करण्याची मानसिकताही इथे आहे. समुद्रावरुन येणारा खारा वारा इमारतिच्या बाह्यरंगावर परिणाम करतो वैगेरे अशी काहिशी कारण दिली जातात खरी पण रहिवासी घरांना आजही बाहेरुन रंग न देण्याचे कारण तर्कापलिकडे आहे.

अ‍ॅस्बेटॉस आणि प्लास्टिकचे प्रदुषण वाढत राहिले, कचर्‍याचे ढिग साठले आणि मग उंदरांनी त्यात उच्छाद मांडला. आणि एकदिवस त्या उंदरावर वावरणार्‍या पिसवांनी ब्युबॉनिक प्लेगचा सुप्त विषाणु उकरुन काढला. आतापर्यंत बव्हंशी जगातुन प्लेगचा समुळ नायनाट झाला आहे असे आम्ही समजुन चाललो होतो. प्लेगच्या आठवणी मात्र लोकमानसांत रुढ होत्या. एकाएकीच बगलेत गाठ येणे आणि निदान होण्याआगोदरच रुग्ण दगावणे, गावेच्या गावे ओस पडणे इत्यादी भयंकर कथा लोक परत आठवुन भयभीत होउ लागले. जिवाच्या भीतीने विस्थापित होणार्‍या हजारो लोकांसाठी महाराष्ट्र हा मोठ्या भावाप्रमाणे पर्याय बनला. महाराष्ट्र आणि गुजरातचे आजचे नाते बघता आम्ही असे कधीकाळी एकजीव होतो याचे आश्चर्य वाटते पण १९९४ ला आम्ही एकमेकांच्या मदतिसाठी तत्पर होतो खरे. ज्यावेगाने प्लेगचा भस्मासुर उदयाला आला त्याच वेगाने त्याला आटोक्यात आणण्यात आम्हाला यश मिळाले. तोपर्यंत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला सुद्धा असे काही घडु शकते याबद्दल ज्ञान नव्हते. डब्लुएचओने तत्परतेने डिसीज इंटेलिजन्स युनिट ह्या संपुर्ण स्वतंत्र समितीची रचना करुन भविष्यात सार्वत्रिक आरोग्य समस्यांना तोंड देण्यासाठी प्रभावी मार्गदर्शक प्रणाली तयार केली. हि समस्या अस्वच्छेतुन उदभवली असल्याचे पाहुन थोर स्वातंत्र्यसैनिक आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री छबिलदास मेहतांनी अस्वच्छतेविरुद्ध लढा पुकारला, त्यांच्या प्रशासनातिल दोन महत्त्वाचे अधिकारी श्री एस व्ही राव आणि एल जगदिशन यांनी लोकांच्या सहभागातुन सार्वजनिक व्यवस्थापन आणि कचरा निर्मुलनाचे नविन शिस्तबद्ध तंत्र विकसित केले आणि जगातल्या सर्वात स्वच्छ शहरांमध्ये सुरत शहराचे नाव कोरले गेले. आज गाजावाजा होत असलेले 'स्वच्छ भारत' अभियानाचे नेमके मुळ छबिलदास मेहतांच्या गांधीवादी विचारसारणित आहे यावर कुणाचा विश्वास बसणार नाही.

काळ आणखी पुढे सरकला. गुजरातेत राजकिय बदलाचे वारे वाहु लागले, धार्मिक राजकारणाची नवनवी समिकरणे बनु लागली. या बदललेल्या समिकरणांत कॉग्रेस पक्ष आपले अस्तित्व राखु शकला नाही. गुजरातेत भारतीय जनता पक्षाची एकाधिकारशाही सुरु झाली आणि हे सर्व होत असतांनाच मग एक दिवस भुजमध्ये भुकंपाची भयावह आपत्ती उभी राहिली. इमारतींचे बांधकाम करतांना एकेरी विटांच्या भींती, निकृष्ट दर्जाचे सिमेंट आणि पुराणमतवादी वास्तुशास्त्राचा आधार घेणार्‍या नफेखोरांनी गावेच्या गावे धुळीत मिळवली. या भुकंपात मरणार्‍यांमध्ये जसे गरीब होते तसे श्रीमंतही होते, हिंदु होते तसे मुस्लिमही होते आणि शाळेतुन ध्वजवंदनाहुन परततांना उघड्यावर असल्याने वाचलेली आठ हजार लहान मुलेही होती. २६ जानेवारी २००१ चा त्या भुकंपाने वीस हजारहुन लोकांना मृत्यच्या दरीत लोटले, लाखो लोकांना विस्थापित केले आणि क्षणार्धात आठ हजार अनाथ मुलांची एक नवी पिढी तयार केली. या विदारक परिस्थितीत भारतीय सैन्यदल, अनेक आंतराष्ट्रिय सेवाभावी संस्था आणि रेडक्रॉस तत्परतेने मदतीला धावले. निस्वार्थी मानवतेच्या भावनेतुन रेडक्रॉस या संस्थेने युरोपातुन दोन दशलक्ष डॉलरची मदत मिळवुन आजपर्यंतचे सर्वात मोठे तात्पुरते हॉस्पिटल बांधले. भुज भागात रेडक्रॉसचे रुग्णसेवेचे कार्य भुकंपानंतर किततरी दिवस अविरत चालु होते या प्रकियेत आंतराष्ट्रिय मदत मिळविण्यापासुन ती शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहचविण्यात अग्रभागी होते 'मुरली देवरा'. भुकंपानंतर अवघ्या दोन दिवसात रेडक्रॉसचे हॉस्पिटल उभारले गेले. भुकंपानंतर आठवड्याभरानंतर एका माहिलेला प्रसुतीवेदना होत असतांना दाखल करुन घेण्यात आले आणि गुंतागुंतीच्या सी सेक्शन शस्त्रक्रियेनंतर त्या महिलेने 'लुलु' नावाच्या सुंदर बाळास जन्म दिला. 'लुलु' ह्या शब्दाचा अर्थ आहे प्रेम करणारा. मानवसेवेच्या निस्वार्थी प्रेमातुन तयार होणार्‍या व्यापक कार्यापलिकडे एक शिस्तबध्द समांतर सेवाकार्य धार्मिक स्वयंसेवी संस्थानी सुरु केले होते. नुस्तीच अन्न वा आर्थिक मदत न मिळविता या संस्थांनी दैनंदिन वापरातल्या वस्तुंची एक व्यवस्थित यादी तयार केली आणि या यादीबरहुकुम मदत मिळवुन ही मदत लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले. अर्थात ह्या संस्था धार्मिक असल्याने त्यांची मदत फक्त त्यांच्या धर्मापुरतीच मर्यादित होती. मानवतेच्या वैश्विक भावनेला संकुचितपणाची झापडे लाउन माणसाच्या माणसाशी असलेल्या नात्याला कुठेतरी मोठा छेद देण्याची सुरुवात इथेच सुरु झाली असावी.

भुकंपात हानी झालेल्या गुजरातचे मग नवनिर्माण सुरु झाले. या प्रक्रियेचा वापर एका दुरदर्शी राजकीय महत्त्वाकांक्षेचा पाया बनली. शहरे नव्याने वसवित असतांना त्यातले प्रभाग सर्वसमावेशक न रहाता विशिष्ट धर्मांभोवती केंद्रित होउ लागली. या धार्मिक रहिवासी केंद्रीकरणात लोकभावनेपेक्षा राजकिय इच्छाशक्तीला प्राधान्य देण्यात आले. धार्मिक लोकसंख्येने अतिकेंद्रित झालेल्या शहरी प्रभागांना मग लवकर इतिहासातल्या एका भयंकर घटनाक्रमाला सामोरे जावे लागले. शहरे आग आणि धुराने धुमसु लागली. भुकंपानंतर अवघ्या अकरा महिन्यांनी विस्थापितांची एक नवि पिढी तयार केली. यात पुन्हा मृत्युच्या दरीत ढकललेले लोक होते, एका क्षणात अनाथ झालेली निष्पाप बालके होती. मदत करणार्‍या सेवाभावी संस्थांना मदतकार्याला नेमकी कुठुन आणि कशी सुरुवात करावी याबद्दल काहीही समजत नव्हते. हजारो लोक प्रचंड तणावाच्या एका मानसिक धक्क्यांत सापडले होते. मदतकार्यात सर्वात जास्त गरचं होती ती मानसोपचार तज्ञांची, हि गरज जशी अन्याय झालेल्यांना होती तशीच अन्याय करणार्‍यांचीही. काळ आणि निसर्गनियमाने यावेळीही काही स्त्रियांना प्रसुतीवेदना होत होत्या, दुर्दैवाने त्यांची प्रसुती करायला कुठलिही सेवाभावी संस्था काम करीत रहाण्याची शक्यता नव्हती. दंगल पेटत राहिली, शांत झाली, पुन्हा पेटली अन मग हळुहळू पुढे कुठेतरी जाउन तिचे प्रमाण संपले. त्या एका घटनाक्रमानंतर सगळेच बदलले. यथावकाश गुजरातचे नवनिर्माण पुन्हा नव्या वेगाने सुरु झाले. त्याची घोडदौड सुरु झाली, अलिकडच्या सार्वत्रिक सत्ताबदलात गुजरातची भुमिका सर्वात मोठी आहेत पण गुजरातला राजकिय प्रयोगशाळा करुन तिथल्या निष्कर्षांचा वापर देशाच्या राजकारणासाठी करण्याच्या महत्वाकांक्षाही मोठ्या आहेत.

दोन हजार एक ते दोन हजार चौदा हा काळ एका तपाहुनही मोठा आहे. २००१ मध्ये श्यामजी कृष्णवर्माना प्रेरणास्थान बनवुनही लोकांमध्ये त्यांची प्रतिमा उंचाविण्यात आलेल्या अपयशाने उजवे राजकारण हरले नाही. सरदार पटेलांना आपले नविन प्रेरणास्थान बनविले असुन गांधी आणि नेहरुंचा इतिहास कसा पुसता येईल यावर उजवे अविश्रांत श्रम घेत असुन त्यात बरेचसे यशस्वीही होत आहेत. शेवटी इतिहास हा नेहमी जेत्यांचा असतो. काल काँग्रेस सत्तेत असतांना ऐतिहासिक सत्य त्यांच्याकडे झुकणारे होते आज सत्तेत असल्याने इतिहासाच्या चाव्या उजव्यांकडे असतील पण या डाव्याउजव्या पक्षपाती इतिहासाच्या पलिकडे असतो तो मानवतेचा इतिहास. प्रदिर्घ आजाराने मुरली देवरा यांचे काल मुंबईत निधन झाले. त्यांना कॉग्रेसचा नेता, माजी पेट्रोलियम मंत्री, एक मुरब्बी राजकारणी म्हणुन त्यांचे समर्थक आणि विरोधक दोघेही सलामी देतील. पण राजकारण आणि पक्षाच्या पलिकडे मुरली देवरांनी रेडक्रॉस या सेवाभावी संस्थेसाठी केलेले काम जास्त महत्त्वाचे होते.

कुठल्याही पक्षपातात न अटकता अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी झटणार्‍या छबिलदास मेहता, एल जगदिशन, एस व्ही राव आणि मुरली देवरा यांना माझा सलाम!

संदर्भ :-
द न्युयॉर्क टाइम्स २५/९/१९९४
इंटरनॅशनल सोसायटी ऑफ रेडक्रॉस अ‍ॅन्ड रेड क्रेसेंट ०५/०२/२००२
द एक्स्प्रेस ट्रिब्युन पाकिस्तान २/१०/२०१४ (इंटरनॅशन न्युयॉर्क टाइम्सच्या सहयोगातुन)
युनिसेफ प्रेस रिलीज २०/०१/२००१
द पॉलिटिकल बायोग्राफी ऑफ अ‍ॅन अर्थक्वेक (एडवर्ड सिम्पसन)
छायाचित्र: जेमिनी पंड्या. रेडक्रॉस

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3.8
Your rating: None Average: 3.8 (5 votes)

व्वा! यातील काही तपशील नवे आहेत.
मुरली देवरा यांच्या या कार्याबद्दल माहिती नव्हते.

लेख आवडला

जाता जाता:

एक छोटा खड्ड्याने ग्रासलेला रस्ता एकाएकीच रुंद आणि रम्य झाला तर आम्ही महाराष्ट्रातुन गुजरातेत आलो आहोत अशी आजची धारणा आहे.

प्रत्यक्ष गुजरातला जाऊन आल्यावर असे काही जाणवले नाही. तेथील रस्ते अजूनही महाराष्ट्रापेक्षा कमी दर्जाचेच वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>प्रत्यक्ष गुजरातला जाऊन आल्यावर असे काही जाणवले नाही. तेथील रस्ते अजूनही महाराष्ट्रापेक्षा कमी दर्जाचेच वाटले.

असे आम्ही २०१० पासून प्रत्यक्ष पाहून (दीड वर्ष तिथे राहून) सांगत आहोत पण ते कोणाला पटले नाही.

थोडासा फरक जाणवला तो म्हणजे फिनिशिंग टचेस गुजरातमध्ये चांगले असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मुरली देवरा हे एक सहृदय, मुळे जमिनीत आणि पाय ठाम जमिनीवर असलेले लोकाभिमुख व्यक्तिमत्व होते. अशी माणसे खरोखरच दुर्मीळ. त्यांना श्रद्धांजली. या निमित्ताने त्यांचे पूर्वसूरी श्री. रजनी पटेल आणि श्री. स.का. पाटील यांची आठवण होते. रजनीभाई हे तर पूर्वायुष्यात कट्टर कम्यूनिस्ट. मुंबईतल्या गिरणगावात अतिशय सक्रिय. बॅरिस्टर असल्याने कामगारांची कायदे किंवा कोर्ट-केसेससंबंधी छोटीछोटी कामे करता करता कामगारांचे प्रस्ताव मालकांसमोर मांडणे, कामगारांना दिशादर्शन करणे अशा कार्यातून लोकप्रिय आणि प्रसिद्ध झाले. इंदिरा गांधींनी त्यांना हेरले नसते तर नवल. बघता बघता ते मुं.प्र.काँ.क.चे सर्वेसर्वा झाले. वाणीवर प्रभुत्व आणि गिरणीमालक आणि उद्योगपती यांमध्ये ऊठबस यामुळे लवकरच ते काँग्रेसचे अनधिकृत खजिनदार बनले. अर्थात यात वाईट काहीच नव्हते. पण तेव्हढ्यातच आणिबाणी आली आणि अखखी काँग्रेस बदनाम झाली. त्यात आणीबाणीतल्या गुप्ततेमुळे म्हणा किंवा गृहकलहामुळे म्हणा, रजनीभाईचा स्वभाव तुटक आणि कोशात गेल्यासारखा झाला. आणि त्यांची घसरण सुरू झाली. आणीबाणी उठल्यावरही त्यांचा पूर्वीचा दबदबा आणि करिश्मा त्यांना परत मिळवता आला नाही.
स.का. पाटील यांनीसुद्धा अनेक सत्कार्यांना भरघोस मदत मिळवून दिली आहे. कन्याकुमारीच्या विवेकानंद स्मारकासाठी मला वाटते जास्तीत जास्त रक्कम त्यांनी मुंबईतून मिळवून दिली होती. ते वल्लभभाईचे उजवे हात होते. त्यांचेही वक्तृत्व उत्तम होते. संस्कृत भाषा बर्‍यापैकी अवगत होती. त्या काळच्या बहुतेक नेत्यांप्रमाणे इंग्लिशवरही प्रभुत्व होते. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दशकात, धान्य पिकवणारा प्रदेश पाकिस्तानात गेलेला असल्यामुळे भारतात टंचाई निर्माण झाली तेव्हा पी.एल.४८० या अमेरिकन योजनेखाली भारताला धान्य मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. अमेरिकन उच्चपदस्थांशी (यात अध्यक्ष-उपाध्यक्षही आले) त्याची उत्तम समीकरणे होती. पण संयुक्त महाराष्ट्र चळवळीत 'यावच्चंद्र दिवाकरौ' प्रकरण झाले आणि अत्र्यांसारख्या भाषाप्रभूने त्यांना सळो की पळो करून सोडले. त्यात अत्रे तेव्हा डावीकडे झुकत होते आणि स.का. पाटील म्हणजे उजव्यांचा मेरुमणी. संमहाराष्ट्र चळवळीमुळे किंवा त्यादरम्यान मुंबईत आणि महाराष्ट्रात डाव्या विचारांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. असे लोकप्रियतेचे शिखर नंतर फक्त आणीबाणीत आणि आणीबाणीआधीच्या अल्प काळातच डाव्यांना गाठता आले. या वावटळीत स.का. पाटीलांची वाताहत झाली. त्यांची लोकप्रियता घसरणीला लागली ती लागलीच. १९६७मध्ये 'जायंट किलर' जॉर्ज फर्नँडिसांकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. पुढे काँग्रेस फाटाफुटीत ओघानेच ते निजलिंगप्पा काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतरही बनासकांठामधून हरले. एकेकाळी नेहरूंनंतर कोण? या प्रश्नाच्या उत्तराचा अल्पकाळ का होईना, एक पर्याय असलेले स.का.पाटील पार विस्मृतीत गेले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<अत्र्यांसारख्या भाषाप्रभूने त्यांना सळो की पळो करून सोडले> ह्यावरून आठवली कोठेतरी कोपर्‍यात पडून राहिलेली अत्र्यांची एक ओळ - शेम सदोबा शेम, महाराष्ट्राच्या भवितव्याशी तुम्ही खेळता गेम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अस्वस्थ करणारं सुंदर लेखन.

मुरली देवरांबद्दल काहीही माहिती नव्हती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सुंदर लेखन. अशा अनेक कारणांमध्ये असे लेखही आहेत ज्यांसाठी आंजावर यावेसे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय ओघवतं लेखन. एका राज्यातल्या काही वर्षांच्या घटनांचा असा बर्ड्स आय व्ह्यूने आढावा घेतानाही आलेले बारीक मानवी तपशील निरीक्षणात्मक लेखाला मानवी ऊब देऊन जातात. डायरीतली अजून पानं वाचण्याच्या प्रतीक्षेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१ असेच म्हणते. लेख आणि राहीतैंचे प्रतिसाद खूप आवडले.
मुरली देवरांना आदरांजली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१९८१ ते १९९२ ह्या दहाबारा वर्षांत गुजरातमध्ये खूप सामाजिक उलथापालथ झाली. १९८०-८१ मध्ये प्रथम आरक्षणविरोधी दंगल झाली. तेव्हा खाम (K.H.A.M.-Kshatriya, Harijan, Adivasi, Mislim)जातींना एकत्र आणण्याचे तंत्र वापरले गेले. त्यामुळे/नंतर १९८५मध्ये काँग्रेसला भरघोस विजय मिळाला. परंतु उच्च जाती पूर्ण विरोधात गेल्या. त्याच सुमारास विहिंप आणि बजरंग दलाच्या शाखा गुजरातमध्ये पसरू लागल्या. पटेल ही उच्च-निम्नांच्यामधली आर्थिक, राजकीय आणि सांख्यिकदृष्ट्या तगडी जात दंड थोपटून आरक्षणाविरोधात उभी राहिली. गुजरातमध्ये जातियुद्ध नेहमीचे झाले. ते हळूहळू हिंसकही बनू लागले. पण त्याचबरोबर वनवासी आणि ओबीसींचे एक वेगळेच संघटन बनू पहात होते-घडवले जात होते जे रस्त्यावरच्या लढाईसाठी तयार होत होते. पण असा हिंदू-हिंदूंमध्येच उच्च-निम्नवर्ण संघर्ष अपेक्षित नव्हता आणि ते ईप्सितही नव्हते. हिंदूएकता राखायचीच होती. उच्चजातींचा आरक्षणविरोधाचा रोख, जातियुद्धाचा रोख हळूहळू बदलू लागून तो कम्यूनल बनला. आरक्षणविरोधी दंगलींपाठोपाठ हमखास धार्मिक दंगली घडू लागल्या. '८१पे़क्षा '८५च्या दंगली अधिक हिंसक होत्या. आक्रमक ओबीसींनी पटेलांची घरेदारे जाळली. उच्चवर्णीयांनी आपल्या बायकामुलींना पोलिसांपुढे उतरवले. पोलिसही हतबल झाले. कदाचित वर्णयुद्धज्वर आटोक्यात आणण्यासाठी शासनाने त्याचा मोहरा धार्मिक चकमकींकडे वळवला. इकडे विहिंपने पोलिस मुस्लिमधार्जिणे असल्याची ओरड उच्चकंठनादात सुरू केली होतीच. पोलिस दोन्हीबाजूंनी मार खाते झाले शेवटी त्यांच्या हतबलतेसमोर किंवा देखरेखीखाली ४०० मुस्लिम घरे जाळण्यात आली. नंतर गुजरातने मागे वळून बघितलेच नाही. '९०मध्ये सोमनाथ-अयोध्या रथयात्रा निघाली. सारा गुजरात ढवळून निघाला. नरेंद्र मोदी हे मुख्य रचनाकार होते. '८६,'८७,'८८,'८९ मध्ये ते बीजेपीचे जेनरल सेक्रेटरी होते. बाबरी मशिदीवर गेलेले बहुधा सगळ्यात मोठे पथक गुजरातचे होते.
सुरत हे एक औद्योगिक शहर होते, धार्मिक अशांतीचा इतिहास तेथे नव्हता. पण ६ नोव.१९९२नंतर सुरतेमध्ये हिंसेचा आगडोंब उसळला. मुसलमानांची निर्घृण हत्या झाली. वडील-मुलगा-नवर्‍यासमोर बायकांवर अत्याचार झाले. आणखीही क्रूर प्रकार झाले. त्यांच्या फिल्म्स काढल्या गेल्या. त्या कॅसेट्स चवीने मिटक्या मारत पाहिल्या जाऊ लागल्या. उघडपणे सार्वजनिक जागी डोळे मिचकावून त्यावर चर्चा होऊ लागली. 'जोवानुं छे? आजे जोईशुं' असे कार्यक्रम खुल्लमखुल्ला आखले जाऊ लागले. (हे चक्षुर्वै सत्यम् आहे. कॅसेट मात्र पाहिली नाही. शक्यच नसते झाले.) ह्यावेळी एक कल दिसून आला. तो म्हणजे आदिवासींनी उघडपणे हिंसक लढ्यात भाग आणि पुढाकार घेतला. अशा तर्‍हेने ते मेन-स्ट्रीम हिंदूंमध्ये आले. एक काम पूर्ण झाले.(गणेश देवी यांनी आपल्या 'वानप्रस्थ' या बहुचर्चित पुस्तकात एक अख्खे प्रकरण यावर खर्ची घातले आहे.) क्रौर्य मिरवण्याचा हा प्रकार मुस्लिमांना फारच झोंबला. मुंबईतील काही ओळखीच्या मुस्लिम लोकांच्या तिखट आणि हताश प्रतिक्रिया अजूनही लक्ष्यात आहेत.
असे म्हणतात की सुरतेचा बदला घेण्याचा निश्चय काही ठिकाणी केला गेला. असे म्हणतात की जैवयुद्द्धाची चाचणी सुरतमध्ये घेण्यात आली. ह्याला अर्थात लिखित आधार काहीही नाही. केवळ कुजबूज.
ह्या प्लेगमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रचंड बदनामी झाली. आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून भारतातली विमानसेवा खंडित होण्यापर्यत वेळ आली. भारतीय विमानांचे फयूमिगेशन, प्रवाश्यांना क्वारंटाईन घडू लागले. गेल्या तीनचारशे वर्षांतल्या साथींमुळे योरपमध्ये प्लेगची प्रचंड भीती आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत हा एक प्रचंड मागासलेला, संबंध न ठेवण्याजोगा देश आहे अशी भावना सर्वत्र पसरली. भारताची नाचक्की करण्याचा हेतू जर होता असेल तर तो अंशतः सफल झाला.
असो. लेख अत्यंत आवडला आणि त्यानिमित्ताने हे सर्व अवांतर लिहावेसे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहितीपूर्ण श्रेणी देण्यापलिकडे जाऊन विशेष आभार मानावेसे वाटले.
असा "जैसे थे" आढावा वाचायला मिळणे दुर्मिळ होत चालले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद.
ज्याला लिखित पुरावा नाही अशी विधाने करावी की करू नये असा संभ्रम पडला होता. कोणी अंगावर धावून आले तर विद्यानिशी प्रतिवाद करता येत नाही.
मागे एकदोनदा नौदल आणि रॉविषयी संदिग्धतासूचक (किंवा संदिग्ध आणि सूचक) विधाने केल्यावर 'विदा द्या' म्हणून लोक मागे लागले होते. आता रॉच्या फायली विकीवर प्रकाशित व्हाव्यात की काय? आपली स्वतःची मते म्हणून काही तर्कात्मक विधाने करता येतील. घटनेविषयी लिहिताना मात्र सत्यात्मकता महत्त्वाची ठरते. तेही एकवेळ 'माझा चष्मा, माझा दृष्टिकोण,माझे इंटर्प्रिटेशन' म्हणून बाजूला सारता येईल.पण इथे संस्थळाच्या जबाबदारीचाही प्रश्न येतो.
एकदा खुलासा व्हावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणी विदा द्या म्हणू लागल्यास "एखाद्या गोष्टीचा पुरावा नाहीये, ही ऐकीव/प्रत्यक्ष अनुभवलेली बाब आहे" इतके स्पष्टीकरण पुरेसे ठरावे. असे स्पष्ट केल्यानंतर प्रत्येकाने अशा कुजबुजीला/विधानांना किती योग्य/वैध समजावे हा ज्याच्या त्याच्या जजमेंटचा प्रश्न ठरतो (मला वरील माहितीपूर्ण परिच्छेद वैध व बर्‍यापैकी सत्यांश असलेला वाटला. मागे कै.श्रावण मोडक यांच्याशी गुजराथेतील आदीवासींसंबंधी एका प्रत्यक्ष गप्पांच्यावेळी याला पूरक माहितीच त्यांनी दिली होती).

बाकी संस्थळाच्या जबाबदारीचा प्रश्न बघितला तरः ऐसी अक्षरे किंवा यासारख्या सर्वच संकेतस्थळांवर लेखनाचा मालक व जबाबदार लेखकच असतो. लेखनाचे श्रेय लेखकाला मिळाते, प्रताधिकारही लेखकाकडेच असतो नी त्याबरोबर जबाबदारीही.

प्रशासन प्रत्येक प्रतिसाद वाचतेच असे नाही त्यामुळे जर संपादकांना लेखन बेकायदेशीर/बदनामीकारक/प्रक्षोभक वगैरे काही दिसले/वाटले किंवा कोणी तशी तक्रार केली तर संपादकमंडळ त्या त्या वेळी आपल्या सारासारबुद्धीने /कायदेशीर सल्ल्याने योग्य ती कृती करण्यास बांधील असते.

ऐसीच्याही धोरणांत

लेखकांच्या विचारांशी, प्रकाशित होणाऱ्या मजकुराशी, व्यक्त झालेल्या मतांशी व्यवस्थापन, मालक, संपादक, मॉडरेटर्स सहमत असतीलच असे नाही.

हे विधान सामील आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

'संस्थळाची जबाबदारी' हे शब्द लिहिताना 'आपल्या लिखाणामुळे संस्थळ अडचणीत तर येणार नाही ना' ही जबाबदारी हा अर्थ अभिप्रेत होता. म्हणजे संस्थळाला त्रास होऊ नये हे पाहाण्याची जबाबदारी.
संस्थळाने एखादा मजकूर प्रसिद्ध केला तर ती त्या संस्थळाची जबाबदारी असा अर्थ नव्हता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'आपल्या लिखाणामुळे संस्थळ अडचणीत तर येणार नाही ना'

+१. अगदी मनातलं लिहिलंत!

हे फिलिंग येतं खरं.
ऐसी किंवा तत्सम स्वान्तसुखाय/अव्यावसायिक संस्थळांवर लिहिताना हे फिलिंग अधिकच येतं आणि मग शब्द कधी संदिग्ध तर कधी थेट न लिहिता केवळ निर्देश करणारे लिहिले जातात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझा एक भाउ डीआरडीओ मध्ये आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे प्लेग वगैरे काहीही नव्हते तर चक्क बायलोजीकल वेपन्स टेस्ट केली पण त्याचे म्हणणे कि हे भारताचे काम नव्हते. आता ह्याला माझ्याजवळ काहीही पुरावा नाहीये पण हाच युक्तिवाद अजून एका मिल्ट्री मधल्या माणसाकडून आईकालेला आहे. खरे खोटे देवालाच माहिती. पण असा प्लेग मधूनच काहीही कारण नसताना कसा काय येतो हा खरोखरच एक प्रश्न आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख वाचल्याबद्दल सगळ्यांचे मनोमन आभार. राही यांनी दिलेल्या माहितीबद्दल आणि त्याची भाषा मुळ लेखाच्याच टोनमध्ये आणखी पुढे लिहल्याबद्दल त्यांचे वेगळे आभार. माझे ह्या विषयावर अजुन बरचं संशोधन चालु असुन मुख्य लिखाण नेमके कधी सुरु करता येईल याबद्दल काही सांगता येत नाही पण एखादी घटना डोके भंजाळुन काढते आणि मग त्यातुन असे काहीतरी प्रसवते. सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0