आनंद विरुद्ध कार्लसन - डाव ३
तेराव्या मूव्हपर्यंत
क्वीन्स गॅंबिट डिक्लाइण्ड च्या व्हेरिएशन्सपैकी एक. पांढऱ्याचा डाव सी खान्यामधलं प्यादं पुढे ढकलत न्यायचं असा आहे. एकदा ते सातव्या ओळीत पोचलं की त्याचा वजीर होऊ नये यासाठी काळ्याचे मोहरे अडकून पडतात. त्यांची आत नाकेबंदी करून आपल्या वजीराला आणि हत्तींना बाहेर मोकळं रान मिळवणं हा हेतू आहे. तेराव्या मूव्हपर्यंत आनंदला हे करण्यात यश मिळालेलं आहे. यात अर्थात विशेष काही नाही, कारण असे अनेक डाव आधीही खेळले गेले आहेत. प्रश्न असा आहे की ही कोंडी आवळण्यात आनंदला यश मिळतं की पुरेसा वेळ बचाव करून हळूहळू त्यातनं मार्ग काढायला कार्लसेन यशस्वी होतो.
आनंदचं प्यादं पुढे येऊ देताना कार्लसेननेही आपलं प्यादं ए६ पर्यंत पोचवलेलं आहे. त्यामुळे आनंदकडून एक चुकीची खेळी झाली तर आक्रमणाचं पारडं फिरू शकतं.
पंचविसाव्या मूव्हपर्यंत
आनंदने आपली खेळी उत्तम ठेवलेली आहे. कार्लसेनचे वजीर आणि हत्ती पूर्णपणे वजीर होऊ न देण्याच्या कामात गुंतले आहेत. आनंदच्या २६. आर सी ६ मुळे दबाव प्रचंड वाढलेला आहे. त्याचा वजीर आणि दोन्ही हत्ती पुढच्या काही काळासाठी निरुपयोगी झालेले आहेत. आता यातून बाहेर पडण्यासाठी कार्लसेनचे प्रयत्न चालू आहेत. त्याने सुरूवात केली ती २६..... जी ५. हे प्यादं पुढे टाकून त्याला पांढऱ्या उंटावर आक्रमण करायचं आहे. आनंदचं सगळ्यात दुर्बळ प्यादं म्हणजे इ३ वरचं प्यादं. त्याला उंटाचा जोर आहे. हा उंट हलवायचा, गरज पडली तर एफ ५, एफ ६ खेळून उंटाचा पुढे पोचलेल्या प्याद्यापर्यंतचा रस्ता बंद करायचा, आणि आपला उंट बाहेर काढायचा हे सगळं कार्लसेनला साधता येईल. तसंच वजीराला थोडी श्वास घ्यायला जागा मिळावी हाही हेतू आहे.
या कोंडीत कार्लसेनला पकडून ठेवून आपला अजून न वापरलेला हत्ती येन केन प्रकारेण बी८ वर नेऊन ठेवायचा असा आनंदचा प्रयत्न आहे. एकदा ते झालं की कार्लसेनचा सी८ वरचा हत्ती जातो.
आनंदच्या अठ्ठाविसाव्या
आनंदच्या अठ्ठाविसाव्या खेळीनंतर उरलेल्या तेरा खेळींसाठी कार्लसेनकडे फक्त बारा मिनिटं उरलेली आहेत, आणि आनंदकडे चाळीस. ही कार्लसेनसाठी अशक्य पोझिशन नसली तरी वेळेचा दबाव पडून ती किंचित धोकादायक झालेली आहे. अर्थात कार्लसेन हा ब्लिट्झ आणि रॅपिड चेसचा जगज्जेता आहे. पण म्हणून आनंदसारख्या खेळाडूकडे इतका प्रचंड वेळ शिल्लक असताना कठीण परिस्थितीत हातात कमी वेळ राहणं निश्चितच आदर्श परिस्थिती नाही.
टाइमप्रेशर आणि आनंदची उत्तम
टाइमप्रेशर आणि आनंदची उत्तम पोझिशन यापोटी कार्लसेनला सी७ वरचं प्यादं मारण्यासाठी आपल्या मोहऱ्याचा बळी देणं भाग पडलं. उंटाने ते प्यादं मारल्यावर तो उंट हलू शकत नाही, आणि त्यावर आनंद जितके जोर आणू शकतो तितके आणता येत नाहीत. आनंदचा उंट घेऊन हत्ती दिला. हे म्हणजे कार्लसेनच्या उंटाचं मरण थोडं पुढे ढकलणंच आहे. कारण आनंदचा हत्ती सी फाइलमध्ये आल्यावर आनंदचे तीन जोर, तर कार्लसेनचे फक्त दोन जोर. कार्लसेनचा सध्या डाव वजीर मोकळा करून चेक देत चाळीस मूव्हपर्यंत पोचण्याचा वाटतो आहे.
जे व्हायचं ते शेवटी झालंच. इ६
जे व्हायचं ते शेवटी झालंच. इ६ खेळीनंतर ते प्यादं घेणं कार्लसेनसाठी मूर्खपणाचं ठरलं असतं. कारण हत्तीने ते प्यादं मारल्यावर वजीर हलवावा लागतो, त्याला बिचाऱ्याला फार कुठे जागा नाही. मग तो हलवल्यावर हत्ती हलवून वजीराचा डिस्कव्हर्ड चेक लागतो! आणि दरम्यान हत्ती कुठेही जाऊन कोणावरही आक्रमण करू शकतो. हे म्हणजे वजीर घालवणं किंवा मेट होण्याचे डोहाळे. त्यामुळे राजा नाइलाजाने हलवावा लागला. आता हे प्यादं डोक्यावर येऊन बसलं. त्यात आरसी१ मुळे उंटावर तिघांचा हल्ला झाला. त्याला बळ देणारे केवळ दोघेच. तेव्हा त्या मारामारीनंतर आनंद एका हत्तीने वर जात होता. हे टाळणं अशक्य होतं. त्यामुळे कार्लसेनला शरणागती पत्करण्याशिवाय इलाज नव्हता.
या खेळानंतर दोघांचे गुण १.५ -
या खेळानंतर दोघांचे गुण १.५ - १.५ झालेले आहेत. कालच्या काहीशा मानहानिकारक पराभवानंतर आनंदच्या खेळाविषयी प्रश्नचिन्हं निर्माण झाली होती. याहीवेळी कार्लसेन आनंदचा धुव्वा उडवणार की काय, असं वाटत होतं. पण आजच्या अत्यंत सफाईदार विजयानंतर आनंदच्या समर्थकांच्या आशा पुन्हा पल्लवित झालेल्या आहेत. आता मागच्या तीन खेळांकडे बघताना आनंदची एक शेवटची चूक सोडली तर अत्यंत आकर्षक आणि तुल्यबळ स्पर्धा होते आहे असं दिसतं आहे.
क्वीन्स गॅंबिट डिक्लाइन्ड