फिल्म न्वार: कथा हाच निकष

फिल्म न्वार: कथा हाच निकष

लेखक - मिलिंद

('डेथ ऑन द चीप' ह्या ऑर्थर ल्यॉन्सलिखित पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणाचा अनुवाद)

डबल इंडेम्निटी

फिल्म न्वार म्हणजे नेमके काय? गेल्या वीस वर्षात ह्या विषयावर विपुल लेखन झालेले आहे, व त्यात ह्यावर जोरदार चर्चा झाली आहे. त्याचे वर्णन चळवळ, वर्ग1, आवर्तन, मन:स्थिती, एक अनुभूती, एक जग, अशा विविध प्रकारे केले गेले आहे. काही समीक्षकांनी व दिग्दर्शकांनी त्याची व्याख्या, एका विशिष्ट काळातील (बहुधा १९४०-१९५९) चित्रपटांचा एक अमेरिकी प्रकार अशी केली. इतरांच्या मते न्वार कधी बंद पडले नाही, फक्त त्या स्वरूपाच्या चित्रपटांची निर्मिती कमीजास्त होत गेली. १९६० व १९७०च्या दशकांत कमी झाली, व १९८० व १९९०च्या दशकांत दिग्दर्शकांना हा वर्ग पुन्हा सापडल्यामुळे ती खूप वाढली.

खरे म्हणजे फिल्म न्वारचा उगम वर्ग म्हणून नाही, तर गुन्हेगारी चित्रपटांची बांधणी वेगळ्या प्रकारे करण्याची टूम म्हणून झाला. चिकित्सक विश्लेषणाने, व ४० व ५०च्या दशकांतील न्वार चित्रपटांच्या शैलीचे पुनरुत्थान करण्याच्या जाणीवपूर्ण आधुनिक प्रयत्नांनी, अस्तित्वात नसणारा एक वर्ग निर्माण केला. १९४४ साली, बिली विल्डर डबल इन्डेम्निटी, व एडवर्ड डिमिट्रिक मर्डर, माय स्वीट बनवत असताना तुम्ही जर त्यांना विचारले असते की तुम्ही कोणत्या प्रकारचे चित्रपट बनवताहात, तर त्यांनी गुन्हेगारी अतिनाट्य, किंवा रहस्यकथा असे उत्तर दिले असते. परंतु आज अशा प्रकारचा चित्रपट बनवत असणाऱ्या दिग्दर्शकाला विचारलेत तर तो नि:संदिग्धपणे फिल्म न्वार असे उत्तर देईल.

चित्रीकरणाची काळोखी, गूढ, डीप-फोकस दृश्यशैली; किआरोस्क्युरो प्रकाशयोजना; विचित्र कोनांतून केलेले चित्रीकरण; कथानकातील गुन्हे, विशेषत: खून; शहरी पार्श्वभूमी; आणि पार्श्ववृत्तनिवेदना2चा व कथनात्मक पूर्वदृश्यचित्रणा3चा विपुल वापर हे फिल्म न्वारचे आवश्यक गुणधर्म आहेत ह्यावर इतिहासकारांचे सर्वसाधारण एकमत आहे.

व्हर्टिगो

ह्या विश्लेषणातील अडचण अशी आहे की चाळीस व पन्नासच्या दशकांतील अनेक चित्रपटांमध्ये फिल्म न्वारचे शैलीगत गुणधर्म दिसत असले तरी ते न्वार नव्हते. उलटपक्षी, हे शैलीगत गुणधर्म, सुटे सुटे किंवा समुच्चयाने, अनेक मान्यताप्राप्त न्वार चित्रपटांत नाहीत. अनेक न्वार चित्रपटांचे चित्रीकरण तुलनेने सपाट शैलीत केले गेले. त्यांचे चित्रीकरण फारसे काळोखेही नव्हते—उदाहरणार्थ हाय सिएरा (१९४१), इम्पॅक्ट (१९४९), द कॅप्चर (१९५०), द स्ट्रिप (१९५१), जिओपार्डी (१९५३), कॉज फॉर अलार्म (१९५३), आणि व्हाइल द सिटी स्लीप्स (१९५६). जनमानसात फिल्म न्वारचा संबंध जरी कृष्णधवल चित्रपटांशी जोडलेला असला तरी अभिजात न्वार काळात काही दिग्दर्शकांनी लीव हर टू हेवन (१९४५), रोप (१९४८), द मॅन ऑन द आयफेल टॉवर (१९४९), नायागारा (१९५३), रीअर विन्डो (१९५४), आय डाइड अ थाउजंड टाईम्स (१९५५), हेल्स आयलंड (१९५५), हाउस ऑफ बॅम्बू (१९५५), स्लाइट्ली स्कार्लेट (१९५६), व व्हर्टिगो (१९५८) ह्यांसारखे रंगीत न्वार चित्रपटही काढले. एस इन द होल (१९५०), डीप व्हॅली (१९४७), द रेड हाउस (१९४७), आणि स्टॉर्म फिअर (१९५६) ह्यांची पार्श्वभूमी शहरी नव्हती. गुंतागुंत आणखी वाढवण्यासाठी की काय, समीक्षकांनी बनवलेल्या फिल्म न्वार चित्रपटांच्या याद्यांमध्ये हमखास काही चित्रपट असे असतात ज्यात गुन्हेगारी नसते. उदाहरणार्थ, कॉट (१९४९), बॉर्न टू बी बॅड (१९५०), व क्लॅश बाय नाइट (१९५२).

एस इन द होल

ह्या साऱ्या चित्रपटांचे फिल्म न्वार वर्गात एकत्रीकरण करणारे घटक आहेत त्यांचा कणखर, तुच्छतावादी सूर, आणि त्यांचा आशय. माजी गुप्तहेर, व सद्यकालीन न्वार पटकथाकार व कादंबरीकार जेराल्ड पेटिएविच (टू लिव्ह ऍन्ड डाय इन एल.ए., १९९१; व त्याच्या मनी मेन कादंबरीवर आधारित बॉइलिंग पॉइन्ट, १९९३) म्हणतो, "फिल्म न्वार फक्त कथेवरून ठरते. दिग्दर्शकाच्या आवडींशी व तंत्रांशी न्वारच्या मूलबंधाचा काही संबंध नाही.”

अलीकडच्या काळात ह्या वर्गात मोडणारे चित्रपट काढणाऱ्या, व ह्या वर्गाच्या व्याख्या ठरवणाऱ्या, दिग्दर्शकांना हे मान्य आहे. मॅस्करेड (१९८८) लिहिणाऱ्या व दिग्दर्शित करणाऱ्या बॉब स्वेमने एका मुलाखतीत म्हटले, "मॅस्करेडद्वारा ह्या वर्गातील महान चित्रपटांची नक्कल न करता एक अभिजात फिल्म न्वार निर्माण करण्याचा मी प्रयत्न केला आहे. चाळीसच्या दशकातील लांब सावल्यांच्या जागी मी ब्रूस वेबरच्या राल्फ लॉरेन जाहिरातींची शैली वापरली. मोठ्या माणसांच्या भूमिकांसाठी पौगंडावस्थेतील नट घेतले. फिल्म न्वारबद्दल मला हे आवडतं की त्यात प्रेरणा हाणामारी नसून लालसा असते.”

प्रथमदर्शनी, फिल्म न्वारला काही मूलभूत आशय होता असे वाटणार नाही. न्वार चित्रपट गुंडांविषयी आहेत (व्हाईट हीट, १९४९, व द ऍस्फाल्ट जंगल, १९५०); खाजगी हेरांविषयी आहेत (द माल्टीझ फाल्कन, १९४१, व मर्डर, माय स्वीट, १९४४); पुरुषांना गोत्यात आणणाऱ्या मोहक स्त्रियां4विषयी आहेत (द लेडी फ्रॉम शान्घाई, १९४८, व टू लेट फॉर टीअर्स, १९४९); ओलिसांविषयी आहेत (डायल १११९, १९५०, व द डेस्परेट आवर्स, १९५५); बाल गुन्हेगारांविषयी आहेत (सिटी अक्रॉस द रिव्हर, १९४९, व क्राय टफ, १९५९); धोक्यात असलेल्या स्त्रियांविषयी आहेत (स्लीप, माय लव्ह, १९४८, व सडन फिअर, १९५२); एकामागून एक खून करत जाणाऱ्या मनोविकृत व्यक्तींविषयी आहेत (फॉलो मी क्वाएटली, १९४९, व द स्नायपर, १९५२); समाजघातक व्यक्तींविषयी आहेत (बॉर्न टू किल, १९४७, व किस टुमॉरो गुडबाय, १९५०); सारख्या दिसणाऱ्या व्यक्तिंविषयी5 आहेत (द डार्क मिरर, १९४६, व द मॅन विथ माय फेस, १९५१); दैवाचा शिकार ठरलेल्या निर्दोष माणसांविषयी आहेत (डीटूअर, १९४६, व डी. ओ. ए., १९५०); तसेच न्यायव्यवस्थेचा बळी ठरलेल्या निर्दोष माणसांविषयी आहेत (रेलरोडेड!,१९४७, व द रॉन्ग मॅन, १९५६). अनुबोधपटसदृश न्वार चित्रपट आहेत (द हाउस ऑन फिफ्टी सेकन्ड स्ट्रीट, १९४५, व कॉल नॉर्थसाइड ७७७, १९४८); पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आधारित आहेत (द नेकेड सिटी, १९४८, व द टॅटूड स्ट्रेन्जर, १९५०); तुरुंगातील आयुष्यावर आधारित आहेत (ब्रूट फोर्स, १९४७, व केज्ड, १९५०); मनोवैज्ञानिक अतिनाट्य आहेत (द वूमन इन द विंडो, १९४४, व द लॉकेट, १९४७); विशिष्ट काळ उभा करणारे चित्रपट आहेत (द लॉजर, १९४४, व आयवी, १९४७); राजकीय कटकारस्थानांवर आधारित चित्रपट आहेत (द वूमन ऑन पियर १३, १९४९, व द व्हिप हॅन्ड, १९५१); आणि स्वत्वपेच व व्यक्तिमत्त्व विघटनावर आधारित चित्रपट आहेत (समव्हेअर इन द नाईट, १९४६, व पसेस्ड, १९४७). अमेरिकी सामाजिक संस्थांची व न्यायव्यवस्थेची नीतिभ्रष्टता (इल्लिगल, १९५५); पोलीस (रोग कॉप, १९५४); राजकारण (द फिनिक्स सिटी स्टॉरी, १९५५); खेळ (द सेट-अप, १९४९); वैद्यकीय व्यवसाय (बिहाईंड लॉक्ड डोअर्स, १९४८); व्यापार (थिव्ज हायवे, १९४९); वृत्तपत्र व्यवसाय (द स्वीट स्मेल ऑफ सक्सेस, १९५७); कुटुंब (पिटफॉल, १९४८); अगदी स्वत: चित्रपट व्यवसाय (द बिग नाइफ, १९५५) ह्या विषयांवरही न्वार चित्रपट बनलेले आहेत.

अ‍ॅस्फाल्ट जंगल

ह्या साऱ्या चित्रपटांच्या विषयवस्तूंमधील समान धागा हा आहे की नायकाचे अंतर- किंवा बाह्य विश्व त्याच्या ताब्यात राहिलेले नसते. द ऍस्फाल्ट जंगल ह्या न्वार चित्रपटात गुंडाची टोळी योजना आखून जवाहिऱ्याचे दुकान लुटते. त्याच्यात आणि लिटिल सिझर (१९३०) व द पब्लिक एनिमी (१९३१) ह्या आधी येऊन गेलेल्या गुंडपटांमध्ये फरक म्हणजे, व्यक्तिमत्त्वातील दोष, व दैव, मिळून चोरांना अपयशी कसे करतात व अंतिमत: त्यांचा विनाश कसा घडवून आणतात ह्याचा हा चित्रपट मानसशास्त्रीय अभ्यास आहे. चोरी करत असताना काही अकल्पित घटनांमुळे काही गुंडांचा मृत्यू होतो, व इतरांची ओळख पटते. त्यांच्या योजनेला भांडवल पुरवलेले असते एका लबाड वकिलाने. त्याला हाव सुटते. आपल्या साथीदारांना फसवण्याच्या प्रयत्नात त्याचे पतन होते व त्या साथीदारांचा मृत्यू ओढवतो. चित्रपटाच्या शेवटी योजनेचा सूत्रधार डॉक पळून जाऊ शकला असता, परंतु एका बारमध्ये एक सुंदर तरुणीला बघत बसल्यामुळे पकडला जातो.

अशाच प्रकारे, १९५६ साली आलेल्या द किलिंग नावाच्या न्वार चित्रपटात अश्वशर्यतीच्या मैदानात केलेली चोरी दाखवली आहे. ह्यातदेखील दुर्दैव, आणि व्यक्तिमत्त्वातील दोष, ह्यांच्या संयोगाने गुंड टोळीची धूळधाण उडते, व परिपूर्ण होऊ शकणारा गुन्हा अयशस्वी होतो. आपल्या बदफैली बायकोवरील एलाइशा कूकच्या आंधळ्या प्रेमापायी स्टर्लिंग हेडन सोडून बाकी सर्वांचा मृत्यू होतो. सारे पैसे आता हेडनकडे असतात. तो शेवटी आपल्या मैत्रिणीसोबत देश सोडून जायला निघतो. पैसे भरण्यासाठी एका तारणपेढीतून हलक्या दर्जाची सूटकेस विकत घेतो. परदेशी नेणाऱ्या विमानाकडे जात असताना अचानक एका प्रवाशाचा कुत्रा त्याच्या सामानवाहू ढकलगाडीला आडवा जातो. सूटकेस धावपट्टीवर पडून फुटते, आणि चोरीचे लक्षावधी डॉलर बाहेर पडतात. हेडन व त्याची मैत्रीण विमानतळातून बाहेर जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलीस तिथे पोहोचतात. ती त्याला पळण्याचा आग्रह करते, पण तो थकून, "उपयोग काय?” इतकेच म्हणतो. ह्या दैववादात व लिटिल सीझर मधील एडवर्ड जी. रॉबिनसनच्या अखेरच्या शब्दांत प्रचंड परस्परविरोध आहे. गोळ्या खाऊन गटारात पडलेला रॉबिनसन अविश्वासाने विचारतो, "हाच का रिकोचा अंत?”. मृत्यू आपल्यापासून केवळ एका पावलाच्या अंतरावर आहे हे न्वार पात्रांना ठाऊक असते. फाईन लाईन फीचर्सच्या निर्मितीसंचालक एमी लाबोविट्स म्हणतात, "मला ह्या चित्रपटांमध्ये निराशाजनक परिस्थितीतही एक प्रकारचा भीषण व औपरोधिक विनोद जाणवतो, आयुष्य निर्दय असल्याची जाणीव दिसते. एक चूक करा—फक्त एक—आणि तुम्ही संपलात.”

डीटूअर

फिल्म न्वारमध्ये निर्दय जगाची भूमिका मोठी असते. डि.ओ.ए.मध्ये एडमन्ड ओ'ब्रायन अजाणतेपणी एक विक्रयपत्र प्रमाणित करतो, व त्यामुळे त्याला विष दिले जाते. द रॉन्ग मॅनमध्ये (१९५६) एका हत्यारबंद चोराशी साम्य असल्यामुळे हेन्री फॉन्डाला अटक होते व त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते. डीटूअरमध्ये (१९४५) टॉम नील लोकांकडून लिफ्ट घेत घेत पश्चिम किनारी राहणाऱ्या आपल्या होणाऱ्या बायकोला भेटायला चाललेला असतो. दारू व अमली पदार्थाच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीकडून अभावितपणे लिफ्ट घेतो आणि दोन खुनांमध्ये गुंततो. चित्रपटाच्या शेवटी, पोलिस त्याला अटक करून घेऊन जात असताना, तो प्रेक्षकांना सांगतो, "कोणत्याही क्षणी, दैव किंवा कोणतीतरी गूढ शक्ती कारणाशिवाय तुमचा बळी घेऊ शकते.” हा विचार अस्तित्ववादी अल्बर्ट काम्यूच्या, "कोणत्याही नाक्यावर विसंगती माणसाच्या थोबाडीत मारू शकते" ह्या म्हणण्याच्या जवळ जाणारा आहे.

न्वारचा नायक ज्या जगात राहतो ते निर्दयच नाही, तर बहुश: भ्रष्ट असते. त्यामुळे चित्रपटातील किंवा साहित्यातील रूढ, पारंपरिक नायक इथे संभवत नाही. ऍस्फाल्ट जंगलमध्ये पोलीस जवळ जवळ गुंडांइतकेच भ्रष्ट आहेत. चोरीच्या योजनेला आर्थिक पाठबळ पुरवणाऱ्या लुईस कॅल्हर्ननामक लबाड वकिलाचे हेच मत असते. जेव्हा त्याची आजारी पत्नी त्याला विचारते, की तो इतक्या वाईट माणसांशी संबंध कसा ठेवू शकतो, तेव्हा तो म्हणतो, "गुन्हेगारी केवळ एक वेगळ्या प्रकारचा मानवी प्रयास आहे.” ज्या जगात सर्व काही सापेक्ष आहे त्यात केवल नायकाला स्थान नाही.

न्वार जगात पोलिसांसहित सर्व पात्रे पैशाच्या मोहाने किंवा वासनेने झपाटलेली असतात, किंवा दुरावलेली व एकाकी असतात. न्वार चित्रपटांमध्ये नायकपदाच्या त्यातल्या त्यात जवळ जाणारे पात्र म्हणजे खाजगी हेर. तोही ह्याला अपवाद नसतो. तो अनुभवांती हेच शिकलेला असतो की जगात सारे काही भ्रष्ट आहे, कोणीही सुरक्षित नाही; तो कोणावरही, अगदी ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यावरही, विश्वास ठेवू शकत नाही. द माल्टीझ फाल्कनच्या (१९४१) शेवटी सॅम स्पेड (हम्फ्री बोगार्ट) त्याची प्रेयसी तथा पक्षकार असलेल्या ब्रिजिड ओ'शॉनेस्सीला (मेरी ऍस्टर) सांगतो की त्याच्या भागीदाराचा खून केल्याचा आरोपाखाली तो तिला पोलिसांच्या हवाली करणार आहे. सॅमचे त्याच्या भागीदाराशी पटत नसे, भागीदाराच्या बायकोशी त्याचे विवाहबाह्य संबंध असतात, ब्रिजिडवर त्याचे प्रेम असते. पण ह्या साऱ्या गोष्टी त्या वेळी महत्त्वाच्या नसतात. जेव्हा एखाद्याच्या भागीदाराचा खून केला जातो, तेव्हा "त्याबद्दल काहीतरी करणं भाग असतं"; तिला सोडून देणे, "धंद्यासाठी वाईट... सर्व हेरांसाठी वाईट" ठरले असते. आपल्याला सोडून द्यावे अशी ती कळकळीची विनंती करते. पण तो नकार देतो. तिच्यावर विश्वास न ठेवण्याच्या कारणांची जंत्री सादर करतो, आणि मग तिला विचारतो, "अन्‌ दुसऱ्या पारड्यात काय आहे? एवढंच की कदाचित तुझं माझ्यावर प्रेम असेल आणि कदाचित माझं तुझ्यावर प्रेम असेल.”

माल्टीझ फाल्कन

तो समस्येतून अंग काढून घेत असल्याचा, त्याचे तिच्यावर प्रेम आहे हे त्याला चांगलेच ठाऊक असल्याचा टोला ब्रिजिड हाणते तेव्हा तो म्हणतो, "ठाऊक असेलही कदाचित. तुला पोलिसात दिल्यावर काही रात्री मला नीट झोप लागणार नाही. पण तेही सरेल. माझ्या म्हणण्याचा अर्थ तुला कळत नसेल तर जाऊ दे. असं म्हणूया की परिणामांचा विचार न करता तुला सोडून द्यावं असं माझं मन जरी मला सांगत असलं तरी मी तसं करणार नाही, कारण तू माझ्या व इतर सर्वांच्या बाबतीत त्यावरच विसंबून राहत आलेली आहेस.”

डॅशिएल हॅमेटने शब्दांत व बोगार्टने पडद्यावर चितारलेला स्पेड हा परम शिकारी आहे. आपल्या सावजाप्रमाणेच तोही हाव व स्वार्थाने प्रेरित आहे. स्वसंरक्षण हे त्याचे अंतिम ध्येय असल्यामुळे प्रेम व पैसा नाकारण्याची त्याची तयारी असते. अनेक खून केलेल्या चार्ल्स स्टार्कवेदरने एका मानसोपचारतज्ज्ञाला ज्या शब्दांत आपल्या भावना सांगितल्या त्या शब्दांत सांगायचे, तर न्वार चित्रपटांमधील इतर खाजगी हेरांप्रमाणे व पोलिसांप्रमाणे स्पेड "माणसांपासून तुटलेला आहे". कोणावरही विश्वास ठेवू शकत नसल्यामुळे एकाकी असणे ह्या शिकाऱ्यांचे भागधेय असते; त्यांनी नको तितके पाहिलेले असते, आपल्या काळोख्या जगात ते नको तितके राहिलेले असतात.

१९३९ साली सुरू होऊन पुढील वीस वर्षे चालणाऱ्या फिल्म न्वारच्या अभिजात युगाआधी दुरावा, सामाजिक भ्रष्टाचार, भावातिरेक, दैववाद, आणि लैंगिक विकृती हे विषय मुख्य प्रवाहातील चित्रपटांत क्वचित सापडायचे. उदाहरणार्थ द अन्डरवर्ल्ड (१९२७), थंडरबोल्ट (१९२९), सिटी स्ट्रीट्स (१९३१), पेमेन्ट डिफर्ड (१९३२), टू सेकन्ड्स (१९३२), आय ऍम अ फ्युजिटिव फ्रॉम अ चेन गॅंग (१९३२), ब्लड मनी (१९३३), क्राइम विदाउट पॅशन (१९३४), द स्काउन्ड्रेल (१९३५), बेस्ट ऑफ द सिटी (१९३६), फ्युरी (१९३६), आणि यू ओन्ली लिव वन्स (१९३७). (एक मनोवेधक गोष्ट: अमेरिकी स्वप्नाची अवनती आणि मध्यमवर्गीय मूल्यांचा ऱ्हास हा दुसऱ्या महायुद्धोत्तर फिल्म न्वारचा महत्त्वाचा भाग असणारा विषय १९३०च्या दशकात चित्रपटांत अजिबात नव्हता. पिटफॉल (१९४८), ऑल माय सन्स (१९४८), आणि क्राइम ऑफ पॅशन (१९५७) ह्या न्वार चित्रपटांवर; आणि रिबेल विदाउट अ कॉस (१९५५) ह्या अ-न्वार चित्रपटावर ह्या विषयाचा गडद प्रभाव होता. हा विषय १९३०च्या दशकात नव्हता, कारण त्या वेळी बहुधा अमेरिकी स्वप्नच अस्तित्वात नव्हते. ज्या काळात अर्धा देश फुकट पाव-वाटपाच्या रांगेत उभा होता तेव्हा वाटीभर सूप हेच अमेरिकी स्वप्न होते.)

पुशओव्हर

ह्या काही अंधारमय चित्रपटांद्वारे हॉलिवूडने प्रयोग करून पाहिला असला, तरी लगेच माघार घेत फ्रेड ऍस्टेअर व जिंजर रॉजर्स ह्यांच्या संगीतप्रधान चित्रपटांच्या 'शुद्ध मूल्यां'कडे व सुरक्षिततेकडे परतला. महायुद्ध येऊन ठेपल्यावरच अमेरिकी दिग्दर्शकांनी ही 'काळी बाजू' स्वीकारली. त्यानंतर अमेरिकी प्रेक्षकांनी वीस वर्षे ही बाजू, हे विषय, व ह्या प्रतिमा मनापासून स्वीकारल्या. तसे नसते तर डबल इन्डेम्निटीमध्ये बार्बरा स्टॅनविकला आपल्या नवऱ्याचा खून करायला मदत केल्याच्या दहा वर्षांनंतर फ्रेड मॅक्मरे पुशओव्हरमध्ये (१९५४) स्वत:ला 'शेवटचं टोक गाठण्यापासून' थोपवू शकला असता. त्या चित्रपटात तो एका पोलिसाची भूमिका साकारतो. किम नोवॅक बॅंकेवर दरोडा टाकलेल्या एका गुंडाची मैत्रीण असते. तिच्यावर पाळत ठेवता ठेवता तो वासनेच्या व लोभाच्या आहारी जातो, त्या गुंडाचा थंड डोक्याने खून करतो, आणि स्वत:साठी व नोवॅकसाठी दरोड्याचे पैसे चोरतो. पण फिल्म न्वारमध्ये गोष्टींचा इतका व्यवस्थित समारोप कधीच होत नाही. त्याला खून करताना पाहिलेल्या दुसऱ्या पोलिसाचाही तो खून करतो, पण पळून जात असताना त्याला गोळ्या लागतात. वाममार्गाला लागल्यामुळे गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत तो नोवॅकला आलंकारिक प्रश्न विचारतो, "आपल्याला खरं तर त्या पैशांची गरज नव्हती, नाही?”

न्वार पात्रांना खरे तर पैशांची गरज नसते, हव्यास असतो; अन्‌ ते का हवेत ह्याची कारणे अनेकदा त्यांची त्यांनाही समजत नाहीत. समजली तरी त्यांचे निर्णय अटळपणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील दोषांनी,न्यूनांनी, विवशतेने, आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटनांनी ठरतात. स्लॅमडान्स (१९८७) ह्या आधुनिक न्वार चित्रपटाचा कला दिग्दर्शक युगेनियो झारेटी म्हणतो, "न्वारचे आकर्षण कालातीत आहे, कारण न्वारच्या नायकाला सुटकेचा मार्ग नसतो, पर्याय नसतात. तो नियतीच्या हातचं बाहुलं असतो. लोक न्वारला प्रतिसाद देतात कारण ते त्यांच्या रोजच्या आयुष्याचा एक भाग आहे. आपण सारेच आपल्याला पसंत नसलेल्या गोष्टी करायला परिस्थितीने बांधिल असतो, विवश असतो.”

1Genre

2Voice-over

3Narrative flashback

4Femme fatale

5doppelgänger

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

वॉव! माझा आवडता चित्रपट प्रकार! छान झालय भाषांतर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न्वॉर चित्रपट मलाही आवडतात. लेख छान झालाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान आहे लेख.

भाषांतर काही काही ठिकाणी थोडं यांत्रिक वाटलं मात्र. विशेषकरून काही उद्धृतांच्या बाबतीतः "गुन्हेगारी केवळ एक वेगळ्या प्रकारचा मानवी प्रयास आहे." किंवा "कोणत्याही नाक्यावर विसंगती माणसाच्या थोबाडीत मारू शकते." या भाषांतरामागचा मूळ इंग्रजी मजकूर काय असेल, असं तत्काळ डोक्यात आलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन