लोथलच्या निमित्ताने: एक उनाड दिवस (१/२)

काही कामासाठी गुजरातला गेलो होतो. हाफिसाकडून अहमदाबादेत राहायची सोय मोठी छान होती. दरम्यान एक दिवस मोकळा होता, मात्र अहमदाबाद-गांधीनगर भागातील बहुतांश स्थळे बघून झालेली आहेत, त्यामुळे या एका दिवसात अहमदाबादहून ७०-८० किमी दूर असलेल्या लोथलला भेट द्यायचे ठरवले. हडप्पा संस्कृतीतील अवशेषांसोबत माझी पहिलीच भेट असणार होती. मात्र जालावरील बहुतांश पर्यटक तिथे रस्त्यावरून गेले होते, तेही दुसरे एखादे ठिकाण बघायचे ठरवल्यावर वाटेत हे लागले म्हणून! त्यामुळे इथे पब्लिक ट्रान्स्पोर्टने कसे जावे हे शोधणे जरा कठीण गेले. शेवटी विकीट्रॅवलवर जवळ "लोथल-भुर्कल" नावाचे स्टेशन आहे हे समजले. गूगल मॅप्सवर मात्र जवळील स्टेशनचे नाव "गुंडी" दाखवले होते. मी लगेच शेक्सपिअरला आठवून "नावात काय आहे?" असा प्रश्न विचारला आणि तिथे जायचे नक्की केले.

एकटाच जाणार होतो शिवाय वेळही नव्हता त्यामुळे फार शोधाशोध वा प्लॅनिंग केलं नव्हतं. फक्त लोथलला जायच्या - यायच्या ट्रेनचं टाईमटेबल व हॉटेलपासून गांधीग्राम स्टेशनवर जायचे विविध पर्याय याची माहिती शोधून ठेवली होती. गांधीग्राम स्टेशनहून लोथलला सकाळी ७ वाजता एक ट्रेन होती पण ती पकडायची तर सकाळी ६ च्या सुमारास मला हवी ती बस सुरू होत नसल्याने नंतरची म्हणजे ९ वाजताची ट्रेन पकडायचे ठरवले. सकाळी तेथील लोकल पीयम्टीछाप खच्चून भरलेल्या बसने एका स्टॉपवर सोडले. तिथून गांधीग्राम स्टेशन १ किमी वर होते. एका भल्या पहाटे ८ वाजता मॉर्निंग वॉकला निघालेल्या पादचारी दुकलीपैकी नवर्‍याने "सामनेवाले पटरीसे जाना, २ मिनिटमे पहुचोगे" सांगितले तर त्याच्याच पत्नीने (अर्थातच विरुद्ध) मत दिले की "वहा सें मत जाना पुलिस पकडती है पटरी पे चलोगे तो. उससे अच्छा..." वगैरे सांगत राइट-लेफ्ट-राइट-लेफ्ट- फीर एक फाटक फीर राइट-राइट असा पत्ता सांगितला. माझा स्त्रीवादी बाणा जागृत होऊन (म्हणजे तो असतोच) मी सौ.चे ऐकले आणि त्यांच्या वादाकडे फारसे लक्ष न देता पुढे निघालो. खरंतर एका कि.मी.त इतकी वळणे कशी असा (पुणेरी) प्रश्न पडला होता पण पत्ता बरोबर निघाला. (अहमदाबादेत पादचारीच काय रिक्षावाल्यानेही कोणाला फसवले नाही. अजून पुण्यातील रिक्षावाल्यांशी त्यांची भेट झाली नसावी वगैरे संवाद नंतर पुन्हा पुण्यास परततेवेळी आमच्या गटात झाल्याचे नमूद करणे अगत्याचे आहे)

स्टेशन अगदी सुस्त होते. ही पॅसेंजर ट्रेन होती. सगळे डबे अनरिझर्व्ह्ड. परतीचे तिकीट काढून स्टेशनवर आलो. गाडीच्या वेळेच्या जवळजवळ ४५ मिनिटे पोचल्यामुळे बसायला छान बाकडे मिळाले. समोरच खाली उकिडवे बसून दोन फेटे-धोतरवाले गावकरी तंबाखुचे तोबरे भरून गुजरातीत मुक्तकंठाने गप्पा ठोकत होते. मला गुजराती कळते असा माझा समज तिथे खोटा पडू लागला होता. तोंडातील तोबर्‍यामुळे मला उच्चार नीट समजत नाहियेत असा मी समज करून घेतला. दुसर्‍या बाजूला खालीच बंजारा मंडळींचे पोशाख असतात तसा पोशाख केलेल्या - आरशांच्या चोळ्या, घागरा, नाकात ते कानात जड चेनसदृश दागिना, मांडीवर नी गळ्याभोवती प्रत्येकी एक असे रडते/पिते मुलं वगैरे नेहमीच्या जामानिम्यांसकट - २-३ बायका बिड्या फुंकत गप्पा हाकत बसल्या होता. त्यांच्याच बाजूला काही फाटकी पोरं उगाच एकमेकांना मारत कल्लोळ-कल्लोळ खेळत होती. त्यांच्यापलीकडे ३-४ मोर दाणे, सांडलेल्या बिस्किटांचे-पावांचे तुकडे टिपत हिंडत होते. गुजरातमध्ये पहिल्यांदा आलो होतो तेव्हा या मोरांचं अप्रूप वगैरे होतं. नंतरच्या ट्रिप्सना हे नावीन्याचं अप्रूप काहीसं ओसरलं असलं तरी त्या पक्षाचं देखणेपण इतकं की नजर रोखून बघतच राहावंसं वाटतं - दरवेळी; दरवेळी नव्याने!

गाडी आली. वेळेआधी २० मिनिटे फलाटाला लागली. फलाटावरच्या 'हार्मनियस केऑस'मधली हार्मनी निघून गेली. इतका वेळ एका लयीत असलेल्या त्या स्थिरवत चित्राला अचानक जलद हालचालींचं ठिगळ जोडलं गेलं. बाया पदर सावरत उठल्या, गावर्‍यांनी फेटे काढून पुन्हा निगुतीने बांधून घेतले, आयांनी त्या हुंडणार्‍या पोरांचे जे काही मिळेल ते हातात धरून सगळे विश्व जिथून शक्य असेल तिथून त्या गाडीत चढू लागले. मी होतो तिथेच बसून होतो. मुंबईच्या सरावलेल्या नजरेला ही मुळात गर्दीच वाटेना. कितीही नंतर शिरलो तरी सहज बसायला जागा मिळेल हा माझ्या नजरेला आलेला अंदाज खोटा ठरला नाही. गाडीचे इंजिन कोळशाचे आहे हे बघून मी वार्‍याची बाजू पकडली नाही (म्हणजे माझ्या वर्णाची चिंता नाही तो धुराशी स्पर्धा करू शकेल पण कपडे मात्र उजळपणाकडे झुकणारे असल्याने व दोन दिवस -पुन्हा पुण्याला जाईस्तोवर - बॅगेत असणार असल्याने फार मळून वा धुरकट वास लागून चालायचे नव्हते). एकाच बाजूला चार बाय चारची बसायची रचना असणार्‍या गाडीत बसून जमाना झाला होता. माझ्या भोवती चार कडक सफार्‍या, एक लांब शेपटा असणारी पिटपिटकुमारी कॉलेजकन्यका व तिला टापणे ही प्रवासाची इतिकर्तव्यता मानणारे दोन तिच्याच वयाचे कुमार अशी मंडळी होती. त्यांना निरखण्यात, त्यांच्या गप्पा कमेंट ऐकण्यात पुढील दोन तास सहज गेले. त्या सफार्‍या बर्‍याच पुढपर्यंत जाणार होत्या (नंतर कळलं की ते हिरेव्यापारी असतात. जेव्हा हिरे जवळ नसतात तेव्हा फुल्टु सफारी वगैरे घालुन ऐटीत फिरतात). लोथलच्या आधीचं आर्णेज स्टेशन गेल्यावर मी दारात येऊन उभा राहिलो. काही वेळात गाडी स्लो झाली. एक मातीचा अस्पष्टसा चौथरा जमिनीलगत होता. बावटा दाखवणार्‍या कर्मचार्‍याची एक छोटी केबिन आणि त्या मातीच्या पट्ट्याच्या दोन्ही बाजूला बर्‍यापैकी उडालेली लोथल-भुर्कल अशी पाटी बाकी सुनसान स्टेशन! मी आणि काही तुरळक जन्ता उतरली. बावटाधारकाशी बोलून अंतर, रिक्षावाला किती पैसे घेईल वगैरे अंदाज घेऊन बाहेर आलो

जालावर काही ठिकाणी लिहिले आहे की बाहेर शेअर रिक्षा असतात नी काही प्रायवेट; पैकी प्रायवेट घ्यावी आणि त्यालाच १-२ तास - अवशेषस्थळ बघेपर्यंत - थांबायच्या बोलीवर घेऊन जावे. मी बाहेर पोचलो तर एकच रिक्षा उभी होती. डोक्यावर भर साडे अकराचे ऊन. त्याला विचारले "लोथल?" तर तो काहीतरी अगम्य गुजरातीसदृश भाषेत बोलला. "कितना लोगे?" वगैरे प्रश्नावर त्याने काहीतरी बोलायचा प्रयत्न केला पण काही समजेना. माझ्या सोबत ट्रेनमधून उतरलेली मंडळी कुठेकुठे पांगली होती. स्टेशनच्या बाहेर वस्ती अशी फारशी नव्हतीच. इतक्यात कुठुनसा एक २०-२२ वर्षांचा दिसणारा मुलगा आला. त्याला हिंदी येत होते. त्याने दुसर्‍या कुठल्याशा गावाचे नाव विचारलेले कळले. नी तो रिक्शात बसला. माझ्या चेहर्‍यावरचे प्रश्नचिन्ह वाचून त्याने सांगितले की "रिक्षावाल्याचे अजून ठरतेय की तू जातोयस त्या दिशेने जायचे का ते, आपण दोघे त्याच दिशेने चाललोय पण रिक्षावाला आर्णेजचा आहे. तिसरा व्यक्ती कुठे जायचं म्हणतोय त्यावर ठरेल!" आता आम्हाला तो बावटेवाला सोडल्यास तिसरा व्यक्तीही दिसेना. इतक्यात समोरच्या गुत्त्यासारख्या जागेतून एक भगवा साधू बाहेर आला नी त्यालाही त्याच दिशेने जायचे असल्याने मी हुश्श केले. त्या तिघांचे काहीतरी बोलणे झाले नी आमची रिक्षा निघाली.

पुढे एखाद किमी रिक्शात कोणीच बोलत नव्हते. नंतर तो रिक्षावाला आणि साधू कैतरी बोलू लागले. माझ्या बाजूला बसलेला मुलगा मला म्हणाला "कहा सें हो?"
मी म्हटलं "पुणेमे रहता हू| लेकीन हु बेसिकली मुंबईसे"
"तो यशा सिर्फ लोथल देखने आये?"
"आज हां! सिर्फ लोथल देखने आया. वैसे गुजरात ऑफिस के काम सें आया हू"
"कैसे आये पॅसेंजरसे?"
मी नुसतीच मान डोलावली
"फीर खाने का क्या करोगे?"
"पता नही वहा स्टेशन के आसपास तो कुछ नही दिखा. अभि लोथलमे कुछ तो खाऊंगा"
"वहा कुछ नही मिलेगा!"
"अं?! उधर एक म्युझियम है ना? कँटिन वँटिन रहेगा कुछ तो"
"देखो. नही मिला तो मुझे बोलना. मै वहासे आगे लगभग तीन किमी पर सगरथल करके गाव है वहा जा रहा हू. कुछ नही मिला तो फोन करना मै कुछ इंतजाम कर सकता हू"
मला समजेना काय उत्तर द्यावं. मी जरा विचार केला. तो सांगत होता त्यावरून तरी लोथलला काही खायला मिळेल असे वाटत नव्हते. परतायची पहिली ट्रेन संध्याकाळी साडेचार वाजता होती. तोवर भुकेलं राहणं शक्यही नव्हतं. तरी अशा अनोळखी व्यक्तीसोबत जायचा धीर होईना. रस्त्यावर आजूबाजूला एक वाहन नव्हतं की रस्त्याला एकही वळण! भगभगीत रस्त्यावरून भर उन्हात आम्ही चाललो होतो.
"ठीक है. आपका नंबर देके रखो. एक बार देखता हू कुछ मिलता है तो नही तो कॉल करता हू"
"ओके. मेरा नंबर XXXXXXXXXX है."
तोवर लोथल ला जाणार्‍या रस्त्याचा फाटा आला होता. मी रिक्शातून उतरलो. रिक्षावाल्याला पैसे दिले.
"ठीक है शुक्रिया. आपका नाम?" मी विचारले
"इम्तियाज" तो म्हणाला. आणि रिक्षा पुढे निघून गेली!

आता तिथे लोथलकडे जाणारा एक रोड होता, अर्ध्या किमीवर लोथल म्युझियम होते. अख्खा रोडच नाही तर दूर दूरवर मनुष्यवस्तीची कोणतीही खूण नव्हती!

(क्रमशः - भाग २)

field_vote: 
4.6
Your rating: None Average: 4.6 (5 votes)

प्रतिक्रिया

काय चपखल ठिकाणी 'क्रमशः' टाकलं आहेस! सिरियली लिहितोस का फावल्या वेळात? खूप उत्सुकता आहे पुढच्या भागाची. लवकर टाक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

काय चपखल ठिकाणी 'क्रमशः' टाकलं आहेस!

अगदी अगदी मोक्याच्या ठीकाणी क्र-म-शः!!
पण ज्याअर्थी तुम्ही हा लेख लिहीलात त्याअर्थी सगळं चांगभलं झालेलं असणार Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वतःहून मदत ऑफर करणे अजब वाटले.
वाचतोय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

चांगल लिहिलय. पुभालटा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

लै भारी! पुभाप्र!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

येऊद्या.

माझा स्त्रीवादी बाणा जागृत होऊन (म्हणजे तो असतोच) मी सौ.चे ऐकले

तुम्ही दुसऱ्यांच्या पण बायकोचे ऐकता काय? सवयीचा परिणाम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

"एकमार्गी परतीचे" म्हणजे काय असू शकेल याचा विचार करतेय..
आणि हो, लेख छान आहेच. वरती योग्य ठिकाणी 'क्रमशः' टाकल्याने पुढच्या लेखाची वाट पाहाणे आलेच..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

"एकमार्गी तिकीट इतके या दराने परतीचे इतक्या दराचे तिकीट काढले" अश्या अर्थाचे मूळ वाक्य होते. पुनर्वाचनात एकुण फ्लोला बाधक असा हा रुक्ष तपशील टाळून बदल केला खरा पण 'एकमार्गी' शब्द राहून गेला होता. आता बदल केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एक म्ह्णजे शीर्षक झकास आहे ; आणि न ठरवता केलेल्या अशा अचानक प्रवासांबद्दल/प्लॅन्सबद्दल खूप आत्मियता आहे- विषय छान निवडलाय!
पुढचा भाग येऊ दे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. पुढील भागाची वाट पाहतो आहे.

अवांतर -

गाडीचे इंजिन कोळशाचे आहे हे बघून मी वार्‍याची बाजू पकडली नाही (म्हणजे माझ्या वर्णाची चिंता नाही तो धुराशी स्पर्धा करू शकेल पण कपडे मात्र उजळपणाकडे झुकणारे असल्याने व दोन दिवस -पुन्हा पुण्याला जाईस्तोवर - बॅगेत असणार असल्याने फार मळून वा धुरकट वास लागून चालायचे नव्हते).

यावरून इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातला (मराठी माध्यम) बहुधा इंदिरा गांधींनी लिहिलेला एका प्रवासवर्णनात्मक धडा आठवला. त्यात इंजिनाच्या धुरामुळे कपडे 'pretty dirty' होतात; अशी (तेव्हा) लक्षवेधक वाटणारी शब्दरचना होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोथल पाहून निराशा झाल्याचे स्मरते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

वरती इतके मस्त डीटॆल मध्ये लिहलय आणि नंबर मात्र xxxxx. हे काय बरोबर नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फलाटावरच्या 'हार्मनियस केऑस'मधली हार्मनी निघून गेली. इतका वेळ एका लयीत असलेल्या त्या स्थिरवत चित्राला अचानक जलद हालचालींचं ठिगळ जोडलं गेलं. बाया पदर सावरत उठल्या, गावर्‍यांनी फेटे काढून पुन्हा निगुतीने बांधून घेतले, आयांनी त्या हुंडणार्‍या पोरांचे जे काही मिळेल ते हातात धरून सगळे विश्व जिथून शक्य असेल तिथून त्या गाडीत चढू लागले.

यासारख्या सुंदर वर्णनांनी बहार आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'गविं'ना लोथल ऑप्शनमध्ये. का? पहा येथे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याचा अर्थ काय ? कृपया स्पष्ट करावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शीर्षकात १/२ असे लिहिल्यावर क्रमशः येणार हे ठाऊक होतेच. ते अतिशय चपखल ठिकाणी आले!

पुभाप्र.

अवांतर १ - कोळशाच्या इंजिनावरून आठवले - लहानपणी माथेरानला जाताना वार्‍याच्या दिशेला बसलो. डोळ्यात कण गेला नि अख्खी माथेरान ट्रिप डोळे चोळत काढली! त्यानंतर कधी कोळशाच्या इंजिनवाल्या ट्रेनने जायचा प्रसंग आला नाही पण आलाच तर वार्‍याच्या दिशेची जागा पकडणार नाही - कपडे वा वर्ण काळा पडेल म्हणून नव्हे तर डोळ्यात कण जाऊ नये म्हणून!

अवांतर २ - आजकाल 'व्यक्ती' ह्या शब्दाचे लिंग हे त्या सदर व्यक्तीच्या लिंगाप्रमाणे बदलले जाते काय? पूर्वी असे नव्हते!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्यक्ती ही 'ती'च असते. संजोपराव आधीच शुद्धलेखनावरुन चिमटे काढत होते म्हणून मी काही म्हटले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबर्‍या.

पुभाप्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अय्याऽ मोरऽऽ कित्तीऽऽऽ छान! (कॉलेजकन्या नसूनही डोळे पिटपिटणारी स्माईली)

जबर्या लिहीलय. पुभाप्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

5.gif
ही अशी का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

हो हो हीच ती! काय कोड? याहूवर ; ; ) आहे बहुतेक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अय्याऽ मोरऽऽ कित्तीऽऽऽ छान!

अय्याऽ मोऽऽर कीऽऽऽत्ती छान!

(तुम्ही लिहिलेय त्याप्रमाणे ते एखाद्या कन्नडभाषक कॉलेजकन्यकेने मराठी आड्यन्ससाठी म्हटल्यासारखे वाटते. विशेषतः, तो 'मोरऽऽ' भाग.)

.............................................................................................................................

(इन्सिडेण्टली, मोरास कधी प्वाइण्ट ब्ल्याङ्क रेञ्जमध्ये ऐकले असल्यास, त्यानंतर कधी नुसता दिसला जरी, तरी गळा घोटावासा वाटतो, एवढेच जाताजाता नमूद करतो. मोर हा राष्ट्रीय पक्षी असल्याकारणाने मयूरवध हा गुन्हा आहे, म्हणून वाचतो लेकाचा. असो.)

- (आयुष्याची चार-साडेचार वर्षे मोरांमध्ये काढलेला) 'न'वी बाजू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आहो ऋराव, कधीचे लटकलोय आम्ही गुजराथेत. सांगा की पुढची गोष्ट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

दिवाळी नंतर नक्की सध्या कामात गुंतलोय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पेसेंजर ट्रेनमध्ये जाताना आपल्या स्टेशनच्या थोडे अलीकडेही पाऊणेक तास गाडी थांबते कधीकधी. तात्पर्य :स्टेशनात अर्धी गाडी शिरल्यावरच बसल्या जागेवरून उठायचं.

ऋभाऊ ढिगारे आणि खापरांचं पुराण सुरू करून क्रमश: टंकलं असतं तरी चाललं असतं. आम्ही लोथाल भुर्खिलाच ताटकळणार ४.२४ अथवा ६.४२च्या गाडीसाठी मोर बघत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile भा.पो.
लवकरच वेळ काढून गाडी स्टेशनात पोचवतो Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!