Skip to main content

कुंडलीतील चवथे घर

2 minutes

भय इथले संपत नाही,
मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो,
तू मला शिकविली गीते...

असो अथवा

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता

ती आई होती म्हणूनी, घनव्याकूळ मी ही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता

अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता

गाणं असो, अशी गाणी मनात खूप गिजबिज जागवून जातात. उदास अन दुखरं, हळवं वाटत रहातं. ढगाळ, पावसाळी हवेत क्वचित कसा आवंढा दाटून येतो अन घशात दुखत रहातं तसं.
मग मी माझ्या "पॅसिफायर" कडे ज्योतिषाकडे धाव घेते ... कुठे आहे उगम या गूढ म्लानतेचा, उदासीचा, कसलं मळभ, ही कसली जीवघेणी कातरता?

अन कुंडलीतील सगळ्या फ्लॅमबॉयंट, झगमगीत, फ्लॅशी क्वचित चमकदार, हुषार घरांत मला एक घर अंग आक्रसून, छातीवर गच्च दप्तर धरुन, शांत न गूढ उभं दिसतं. ते चवथं घर ज्याच्या कारकत्वाखाली प्रत्येकाचं बालपण, आई, अंतर्मनातील कल्लोळ, सिक्रेट्स अन दुखरं मन येतं ते चवथं घर.
मूड अन भावनांची आंदोलनं आंदुळणारं, ढवळून काढणारं, प्रत्येकाच्या व्यक्तीमत्वाच्या पाळामूळांचं, पूर्वजांचं, स्वप्नांचं .... मनाचं घर.
बाहेर फसाड/मुखवटा (पहीलं घर) मारे कितीही बौद्धिक असो वा रुक्ष असो, अथवा सार्वजनिक पर्सोना (१० वं घर) किती का कणखर असो, रात्री आईच्या कुशीत शिरणारं, प्रत्येक जीवाचं घरटं/कोटीर दाखवणारं, त्यावर अधिराज्य गाजवणारं असं हे चवथं घर. नख लागेल तर चटकन दुखावेल असं नादीर, मध्यरात्रीचं घर.

आतापर्यंत मी १०-१२ तरी कुंडली पाहील्या आहेत पैकी मला सर्वात जास्त रस कुंडलीतील याच घरात असतो. ह्म्म प्लूटो आहे, युरेनस आहे? काहीतरी खूप सिक्रेटिव्ह हिंटस हे घर देऊन जातं. जातकाच्या ओठांवर कधीही येऊ शकणार नाही असं दुखरं सिक्रेटही सांगून जातं. शब्दशःनसलं तरी एसेन्स कळतो, उलाघाल, तडफड कळते, अंतर्मन, व्यक्तीमत्वाचा पाया कळतो. पुढे कर्क रास, चंद्र यांवरुन आईशी असलेलं इन्टेन्स किंवा कसंही नातं कळतं.

बरच शिकायचं आहे, अनेक कुंडल्या पहायच्या आहेत पण जेवढ्या पाहील्या तेवढ्यातून एक लक्षात आलं -

हर एक शय है तनहा यहां

.

Be kind! For everyone you meet is fighting some battle.

याविषयावरचे काही मला आवडलेले लेख -

दुवा १
दुवा २
दुवा ३

Node read time
2 minutes

नंदन Fri, 19/09/2014 - 10:20

ग्रहांनादेखील असा 'चौथा कमरा' आवश्यक असावा, असा दवणीय विचार मनात डोकावून गेला :)

अजो१२३ Fri, 19/09/2014 - 16:34

कुठे आहे उगम या गूढ म्लानतेचा, उदासीचा, कसलं मळभ, ही कसली जीवघेणी कातरता?

उच्च.
-------------
तुम्हाला शब्द कसे सापडतात हो इतकं काँप्लिकेटेड मॅटर लिहायला?

अजो१२३ Fri, 19/09/2014 - 18:15

In reply to by अजो१२३

श्रेण्यांकडे दुर्लक्ष करावे. सबब प्रतिसाद प्रामाणिक आहे. असे स्पष्टीकरण द्यावे लागणे दुर्दैवी आहे, पण तसं आहे.

अस्वल Fri, 19/09/2014 - 22:27

In reply to by वामा१००-वाचनमा…

विरोधाभासाचं उदाहरण आहे का?
प्रतिसाद मलाही प्रामाणिकच वाटला. काय काय चालतं जगात.. (आता ह्याला तरी खवचट देऊ नका)

तिरशिंगराव Fri, 19/09/2014 - 20:47

लेख आवडला. तुम्ही इतकं भावनाशील होऊन लिहिलंय की वाटतं की तुमची कर्क रास असावी.

वामा१००-वाचनमा… Fri, 19/09/2014 - 21:13

In reply to by तिरशिंगराव

होय होय :)
आपली देखील आहे एका प्रतिक्रियेत, मी वाचलेले मागे :)

रुची Fri, 19/09/2014 - 21:28

अन कुंडलीतील सगळ्या फ्लॅमबॉयंट, झगमगीत, फ्लॅशी क्वचित चमकदार, हुषार घरांत मला एक घर अंग आक्रसून, छातीवर गच्च दप्तर धरुन, शांत न गूढ उभं दिसतं. ते चवथं घर ज्याच्या कारकत्वाखाली प्रत्येकाचं बालपण, आई, अंतर्मनातील कल्लोळ, सिक्रेट्स अन दुखरं मन येतं ते चवथं घर.

अशा सारख्या वाक्यांनी विषयात रुची (आणि विश्वास) नसूनही लेख वाचावासा वाटला. कोणाला उदबत्त्यांच्या धुराच्या रेषांत आकृती दिसतात, कोणाला ढगांच्या आकारांत दिसतात, कोणाला कातळावरच्या शेवाळ्यात दिसतात, कोणाला कुंडलीत दिसतात...कोणाला ही तद्दन अंधश्रद्धा वाटते पण त्याची अशी कलेशी, भावनांशी सांगड घालण्याचा खेळ मला रोचक वाटला.

विवेक पटाईत Fri, 19/09/2014 - 21:33

अपर्णा ताई लोकतंत्राच्या 'चौथ्या खांबां' विषयी ऐकले होते. पण कुंडलीतल्या चौथ्या घर बाबत पूर्ण अज्ञानी आहे. शिकलेल्या लोकांनी या फंदात न पडणेच योग्य. 'जे प्रारब्धात आहे ते होणार आहे, मग चिंता कशाला'. गेल्या वर्षी मुलीचे लग्न केले, लोक होणाऱ्या नवर्या मुलाचा पगार विचारतात. मी फक्त एवढेच विचारले होते. दारू, तंबाकू, इत्यादी व्यसने नसलेला मुलगाच मला मुली साठी पाहिजे. पगार किती कमी असला तरी चालेल. पत्रिके बाबत साफ निक्षून सांगितले होते. न कुंडली दाखविणार,न पाहणार. सकाळी लग्न करायचे आहे. (दिल्लीत रात्रीच्या लग्नात हो तुम्ही नाही पाजली तरी लोक खिश्यात बाटली घेऊन येतात). सकाळच्या वेळी कुठला मुहूर्त आणि तारीख तुमच्या परीने ठरवून घ्या, हाल या या तारखेला रिकामा आहे). लग्न सुव्यवस्थित रीतीने पार पडले.

सविता Fri, 19/09/2014 - 22:28

In reply to by विवेक पटाईत

बाकी सगळं असो," सिगारेट, दारू, तंबाखू(काही लोक या लिस्टमध्ये नॅानव्हेज खाणेपण घालतात) या गोष्टी करत नाही " म्हणजे मुलगा चांगला असा निष्कर्ष काढतात तेव्हा मौज वाटते. शिवाय देवाधर्माचं करणारा असेल तर सोन्याहून पिवळे!

बॅटमॅन Fri, 19/09/2014 - 22:52

In reply to by सविता

एक नॉनव्हेजप्रेमी म्हणून याला दुजोरा आहेच- पण पटाईतसाहेबांनी पत्रिका नै दाखवली हे खरंच काबिले तारीफ आहे. नकार आडून कळवायचा एक तरीका म्हणून, शिवाय जण्रल अंधश्रद्धा म्हणूनही लोक पत्रिका पाहतातच. तसं न करायला डेरिंग लागतं.

ऋषिकेश Mon, 22/09/2014 - 16:06

अपर्णातै ललित लेखन आवडले.
प्रतिक म्हणून वापरल्या गेलेल्या विषयातील समज आणि आवड दोन्ही नसणार्‍या माझ्यासारख्याला हे पूर्णपणे वाचावेसे वाटले, इतकेच नाही तर समजून घ्यावेसे वाटले.

असे ललित आणखी येऊ देत.

शुचि. Mon, 20/04/2015 - 22:05

कुंडलीच्या १२ भागांपैकी, मध्यरात्रीचा प्रहर/कालावधी दर्शविणार्‍या चवथ्या घराबद्दल बरच काही लिहीता येईल. सौम्य अन कोमल पण चंचल चंद्र ज्या घराचा कारक आहे, मातृत्व ही ज्या घराची मुख्य theme आहे, असं हे vulnerable घर, बर्‍याच महत्त्वाच्या गोष्टींचे कारकत्व सांभाळून आहे. व्यक्तीचे बालपणीचे विश्व व भवताल अन पोषण हे तर चवथे घर दर्शवितेच परंतु, secrets, deep roots, बालपणीची deep ingrained impressions ही देखील या घरावरुन समजू शकतात. मन, मानसिक स्वास्थ्य/बळ तसेच सुरक्षितता असे खूप vital parameters या घराच्या कारकत्वाखाली येतात.
______

मूड अन भावनांची आंदोलनं आंदुळणारं, ढवळून काढणारं, प्रत्येकाच्या व्यक्तीमत्वाच्या पाळामूळांचं, पूर्वजांचं, स्वप्नांचं .... मनाचं घर.
बाहेर फसाड/मुखवटा (पहीलं घर) मारे कितीही बौद्धिक असो वा रुक्ष असो, अथवा सार्वजनिक पर्सोना (१० वं घर) किती का कणखर असो, रात्री आईच्या कुशीत शिरणारं, प्रत्येक जीवाचं घरटं/कोटीर दाखवणारं, त्यावर अधिराज्य गाजवणारं असं हे चवथं घर. नख लागेल तर चटकन दुखावेल असं नादीर, मध्यरात्रीचं घर.

_______
याउलट प्लूटो हा ग्रह उग्र, चमत्कारी खरं तर भेसूरच ग्रह आहे. नरकाचा अधिपती असलेला ग्रह जो आधी विनाश व मृत्यु देऊन मग परत resurrection करतो, असा उग्र ग्रह, जर कुटुंब अन बालपणीच्या चवथ्या घरात पडला तर नक्कीच विरोधी forces ची मिसळण होते. ज्योतिषात काही तज्ञ या मिलाफास "वादळापूर्वीची शांतता" म्हणतात तर काहीजण चक्क "विषारी दूध" असे संबोधतात.
पैकी "विषारी दूध" म्हणजे ज्या घटकाने बालपणी पालन-पोषण करावे, तोच घटक जीवावर उठावा हा मतितार्थ स्पष्ट आहे. अर्थात पालनकर्त्याचे क्रौर्य व बालपणी अनुभवलेली अगतिकता अन असहायता असे काहीसे dynamics चवथ्या घरातील pluto hades वरुन लक्षात येते. पण एक काळजी घेणे आवश्यक आहे अन ती म्हणजे "आई वडील व abusive powerplay हे सत्यही असू शकेल वा जातकाचे false perception ही असू शकेल." पण जातकापुरता तरी हे वास्तव असते.
_________
अर्थात पूर्वी एका लेखात लिहील्याप्रमाणे, प्लूटो ज्या घरात पडतो ते घर (त्याच्या कारकत्वाखालील घटक) बेचिराख करुन त्या घटकांचा पूर्ण साचा बदलून परत त्या घरास पुनरज्जीवन देतो, फिनीक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेतो. मानसिक सुरक्षा (चवथे घर) बेचिराख होणे म्हणजे काय हे प्रत्यक्ष जातकच सांगू जाणो. But don't forget there is a promise of resurrection.