दीपगिरी अमरावती भाग 2

(मागील भागावरून पुढे)

चेन्नई शहराच्या अतिशय गजबजलेल्या आणि दाट लोकवस्तीच्या ज्या भागातून, भारतातील सर्वात जास्त प्रदूषित नदी हा बहुमान प्राप्त झालेली कूऊम नदी, कचरा वाहत नेताना आपल्याला दिसते त्याच नदीच्या उत्तर काठाजवळ एग्मोर ही पेठ वसलेली आहे. मात्र एग्मोरकडे मला नेत असलेली रिक्षा मात्र संपूर्णपणे अनोळखी छोटेखानी रस्ते आणि गल्ल्या यामधून आता जाते आहे. या सर्व अनोळखी भागाचे एक समान वैशिष्ट्य मला दिसते आहे. सकाळच्या या दुसर्‍या प्रहरी सुद्धा, हे सर्व पथ वाहतुकीने अतिशय गजबजलेले दिसत आहेत. काही ठिकाणी तर वाहतूक मुरंबेही झालेले दिसत आहेत. मला नेत असलेला रिक्षावाला या सगळ्या अडचणींना मोठ्या सफाईदार रितीने तोंड देत जातो आहे व आपण सराईत असल्याचे सहजपणे दर्शवून देतो आहे. थोडे अंतर गेल्यावर मला एका बाजूला पॅन्थिऑन रोड असा एक फलक दिसतो. चेन्नई सारख्या शहरातल्या एका रस्त्याला, हे रोमन नाव कोणी दिले असावे अशा विचारात मी पडतो. परंतु येथे कधी एके काळी असलेल्या आणि पॅन्थिऑन कॉम्प्लेक्स या नावाने ओळखल्या जाणार्‍या एका भल्या मोठ्या शासकीय इस्टेटमुळे हे नाव बहुधा पडलेले असावे असे कोठे तरी वाचल्याचे मला स्मरते. या पॅन्थिऑन कॉम्प्लेक्स इस्टेट मध्ये प्रथम निर्मिती केली गेलेली महत्त्वाची वास्तू म्हणजे एग्मोर संग्रहालय. ही वास्तू 1854 मध्ये बांधली गेली होती. काही दशकांनंतर संग्रहालयाने तोपर्यंत संग्रहित केलेल्या एका विशाल पुस्तक संग्रहासाठी सुरक्षित वास्तू असली पाहिजे म्हणून संग्रहालयाच्या मूळ वास्तूला जोडूनच शेजारी अ‍ॅनेक्स या नावाने "कॉनमेरा लायब्ररीची" वास्तू बांधली गेली व ही लायब्ररी 1896 मध्ये सुरू झाली. ही लायब्ररी आजही कार्यरत आहे. संग्रहालयाच्या मूळ वास्तू शेजारी आणखी काही वास्तू 1864 मध्ये आणि 1890 मध्ये बांधल्या गेल्या होत्या.

ऑटोरिक्षा एका मोठ्या गेटसमोर थांबते व मी खाली उतरतो. समोर मला दिसते आहे एक विस्तीर्ण आवार, ज्यात अनेक इमारतींचा एक मोठा कॉम्प्लेक्स उभा असलेला मला दिसतो आहे. मला आणि माझ्या कॅमेर्‍याला आत प्रवेश घेता यावा म्हणून मी प्रथम प्रवेश शुल्क भरतो. मला प्रवेश शुल्क फक्त रुपये 10 असले तरी माझ्या कॅमेर्‍याला मात्र 20 पट म्हणजे 200 रुपये प्रवेश शुल्क आहे. जवळच एक क्लोक रूम आहे त्यात असलेल्या लॉकर्समध्ये तुमच्या जवळील सर्व सामान ठेवावे लागते; आत संग्रहालयात कोणतीही वस्तू नेण्याची मुभा नाही. संग्रहालयाच्या प्रवेशद्वारामधून दिसणारे दृष्य तसे मनावर छाप पाडणारे वाटत असल्याने इकडे तिकडे बघत समोर दिसणार्‍या लाल रंगाच्या एका वर्तुळाकार इमारतीकडे जाण्यासाठी मी हळूहळू चालण्यास सुरुवात करतो. या लालसर इमारतीचा दर्शनी भाग अतिशय ठसा उठवणारा आहे आणि इमारतीच्या बाहेरच्या बाजूस असलेल्या वर्तुळाकार व्हरांड्याच्या बाहेरील कडेवर बांधलेल्या स्तंभांमुळे, दिल्लीच्या पार्लमेंट हाऊसची खचितच आठवण होते आहे. डावीकडे असलेल्या दुसर्‍या एका भव्य इमारतीचा दर्शनी भाग; उत्तर हिंदुस्थानातील मुघल कालीन स्थापत्याचा भास करून देतो आहे. मात्र या समोरच्या लाल इमारतीची भव्यता, प्लॅस्टिकच्या कापडावर छापलेल्या आणि दोन खांबांना गुंडाळलेल्या दोर्‍यांमध्ये लटकवून दिलेल्या,एका भल्या थोरल्या जाहिरातीमुळे अंशत: तरी झाकोळून गेलेली आहे. ही जाहिरात तमिळमध्ये असल्याने त्यावर काय लिहिले आहे हे समजण्यास मला वाव नाही पण त्यावर छापलेला अम्मांचा हसरा चेहरा मला नक्कीच ओळखता येतो आहे. निरनिराळ्या ऐतिहासिक समर प्रसंगांमध्ये वापरल्या गेलेल्या अनेक तोफा या वर्तुळाकार इमारतीच्या परिघाबाहेर मांडून ठेवलेल्या दिसत आहेत.

शासकीय नोकरशाहीच्या कार्यपद्धती प्रमाणे या भव्य वर्तुळाकार इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार कुलुप आणि त्यावर सील लावून बंद केलेले दिसते आहे. या इमारतीमध्ये आता फक्त "सिंधू संस्कृती" या विषयावरच्या एका छोटेखानी प्रदर्शनाचा कक्ष तेवढा आहे. हा कक्ष बघायचा असल्यास मागच्या बाजूस असलेल्या एका छोट्या प्रवेशद्वारातून आत यावे लागते. या कक्षात मला मुख्यत्वे दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात असलेल्या हडप्पाकालीन मूळ वस्तूंच्या प्रतिकृती फक्त मांडून ठेवलेल्या दिसत आहेत. याच्या बाजूच्या कक्षात काही हत्यारे आणि बंदुका ठेवलेल्या आहेत. थोडक्यात म्हणजे आवर्जून बघण्यासारखे येथे फारसे विशेष काही नाही.

या वर्तुळाकार इमारतीच्या उजव्या बाजूस असलेल्या एका इमारतीमधे संग्रहालयाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. यामधून प्रवेश केल्यावर आत परत एक डावीकडे जाणारा एक पॅसेज लागतो या पॅसेजने गेल्यावर आपण संग्रहालयाच्या मुख्य इमारतीत पोचतो जी वर्तुळाकार इमारतीच्या बरोबर मागे आहे. (‌वाचकांना हे वर्णन बरेच गोंधळून टाकणारे वाटेल पण प्रत्यक्षात ते तसे नाही.) संग्रहालयाचे मुख्य प्रवेशद्वार ज्यामध्ये आहे त्या इमारतीचा दर्शनी भाग म्हणजे लालभडक रंगाने रंगवलेली एक भिंत फक्त आहे.या भिंतीवर पांढर्‍या रंगात रंगवलेले प्राणी, पक्षी आणि देव-देवता यांची चित्रे पॅचवर्क सारखी चिकटवलेली आहेत. एकूण दर्शनी भागाची सजावट, कमालीची भडक, रुचीचा अभाव दर्शवणारी आणि बटबटीत वाटते आहे. मुख्य प्रवेशद्वाराजवळ परत एक धातू शोधक फ्रेम बसवलेली आहे, शेजारी गार्ड उभा आहे. या फ्रेम मधून जाताना बीप बीप वगैरे आवाज आले तरी फारसे कोणी त्याकडे लक्ष देते असे दिसत तरी नाही. दाराजवळच एक पुस्तक विक्रीचे दुकान आहे व बरेच संशोधन प्रबंध आणि पुस्तके विक्रीसाठी ठेवलेली दिसत आहेत. मुख्य प्रवेशद्वाराच्या मागेच पुरातत्त्व विभाग चालू होतो. यात अनेक कक्ष आहेत व त्यात हिंदू, बौद्ध, जैन पाषाण शिल्पे व याशिवाय इतर काही शिलालेख कोरलेले पाषाण आणि ताम्रपट ठेवलेले आहेत. बघण्यासारखे भरपूर निदान येथे तरी दिसते आहे. माझ्याकडे असलेल्या सीमित कालसमयामुळे मी या बाकी सगळ्या शिल्पांकडे न बघता सरळ पुढे जातो.

आत गेल्यावर थोडे पुढे जाऊन एक जिना चढून वर आले की डाव्या हाताला एक लांबलचक कॉरिडॉर लागतो. या कॉरिडोरच्या दोन्ही बाजूंना अतिशय दुर्मीळ अशी पाषाण शिल्पे ठेवलेली असल्याने या कंटाळवाण्या कॉरिडॉरला एक प्रकारची शोभा आली आहे हे मात्र नक्की. या कॉरिडॉरच्या अखेरीस हिंदू पाषाण शिल्पांचा कक्ष आहे. या कक्षातून चालत पुढे गेल्यावर बौद्ध पाषाण शिल्पांचा कक्ष लागतो. या कक्षांतर्गत एकदम चकाचक पॉलीश केलेल्या लाकडी पॅनेल्सनी सजवलेला आणखी एक कक्ष आहे. या कक्षात जे बघण्यासाठी म्हणून मी एवढ्या लांबवरून आलो आहे ते अमरावती स्तूपाचे पाषाण मांडून ठेवलेले आहेत.

अमरावती स्तूपाचे पाषाण चेन्नई संग्रहालयात कसे पोचले याची माहिती संग्रहालयात मिळालेल्या एका माहितीपत्रात दिलेली आहे. आपण आधीच्या भागात यासंबंधीची हकिगत बघितलेली आहे पण त्यापेक्षा ही मला निराळी वाटते आहे आणि मुख्य म्हणजे ब्रिटिश संग्रहालयात पाठवलेल्या पाषाणांचा यात उल्लेखही नाही. यामुळे ही माहिती थोड्या पुनरावृत्तीचा धोका पत्करूनही खाली देतो आहे.

" संग्रहालयात असलेल्या प्राचीन बौद्ध शिल्पांमध्ये अमरावती येथील भग्नावस्थेतील स्तूपाच्या जागेवरून मिळालेल्या पाषाणांचाही समावेश आहे. आंध्रदेशातील कृष्णा खोर्‍यातील अमरावती येथे केलेल्या 1801 आणि नंतरच्या उत्खननात या पाषाण शिला प्राप्त झाल्या होत्या. भारताच्या त्रिकोणमितीय पाहणी विभागाचे कर्नल कॉलिन मॅकेंझी यांना या स्थानी असलेल्या एका टेकाडाबद्दल माहिती प्रथम मिळाली होती वा त्यानंतर त्यांनी या स्थानाला भेट दिली होती. या ठिकाणी ख्रिस्तकालीन कलात्मक भग्नावशेष सापडत असल्याने, त्यांना या स्थानाबद्दल बरीच रुची प्राप्त झाली होती. मात्र त्यावर्षी त्यांनी थोडी स्केचेस फक्त काढली होती. नंतर 1830 मध्ये येथे मिळालेल्या काही पाषाण शिला मछलीपट्टणम येथील नगर चौक सुशोभित करण्यासाठी म्हणून वापरल्या गेल्या आहेत असे जिल्हाधिकारी रॉबर्टसन यांना समजले. 1835 मध्ये मद्रासचे गव्हर्नर सर फ्रेडरिक अ‍ॅडॅम यांनी आपल्या भेटीत या पाषाण शिला बघितल्या व त्या त्वरित तेथून काढून मद्रासला पाठवून त्यांची जपणूक करण्यासाठी मद्रास लिटररी सोसायटीच्या संग्रहालयाच्या स्वाधीन केल्या जाव्यात असा हुकूम काढला. डॉ. बेल्फोर यांनी मद्रासच्या संग्रहालयाची सूत्रे हातात घेतल्यापासून या पाषाण शिला संग्रहालयात हलवण्यासाठी प्रयत्न सुरू केले व पाषाण शिलांची पहिली बॅच संग्रहालयात 1856 मध्ये पोचली. पाषाण शिलांच्या पुढच्या बॅचेस डॉ. बिडि यांच्या कार्यकालात संग्रहालयात जमा झाल्या व या सर्व शिला संग्रहालयातील सध्याच्या जागी प्रेक्षकांना बघण्यासाठी ठेवण्यात आल्या. संग्रहालयातील प्रदर्शन आणि व्यवस्था याबद्दल भारतील पुरातत्त्व विभागाचे संचालक बर्जेस यांच्याबरोबर अनेक वेळा डॉ. बिडि यांचे तीव्र मतभेद झाले. प्रख्यात पुरातत्त्वज्ञ असलेल्या बर्जेस यांच्याशी त्यांची या विषयासंबंधी बरीच गरमागरमी होऊनसुद्धा डॉ. बिडि या पाषाण शिला कशा व कोठे संग्रहित करायच्या या बद्दलचे आपले मतच सर्वात योग्य आहे या आपल्या म्हणण्यापासून जराही विचलित झाले नाहीत."
(वाचकांनी हे वर्णन मी आधी दिलेल्या वर्णनाशी ताडून बघावे. 1859 मध्ये संग्रहालयातूनच लंडनला पाठवलेल्या 121 पाषाणशिलांचा उल्लेख सुद्धा या वर्णनात नाही ही एक आश्चर्यजनक बाब आहे असे मला वाटते.)

डॉ. बिडि यांचे मनोमन आभार मानावे असे मला वाटते आहे. केवळ त्यांच्याच अथक प्रयत्नांमुळे अमरावती मधून खणून काढण्यात आलेल्या या पाषाण शिला चेन्नई मध्ये सुरक्षित रितीने सांभाळल्या गेल्या व आपण त्या आजही बघू शकतो आहोत. त्यांनी हे प्रयत्न केले नसते तर कदाचित इतर काही पाषाण शिलांप्रमाणे या पाषाण शिलाही लंडनला पाठवल्या गेल्या असत्या. (लंडनला पाठवलेल्या पाषाण शिलांची संख्या थोडीथोडकी नसून 121 एवढी आहे.)

हा भव्य स्तूप प्रत्यक्षात होता तरी कसा? काही जण संगमरवरी पाषाणामधील एक काव्य असे ताज महालाचे वर्णन करतात. कदाचित अमरावती स्तूप तसाच काहीसा दिसत असावा असे म्हणता येते. या स्तूपाच्या मध्यभागी एक 90 फूट उंचीचा घुमट होता. या घुमटावर संगमरवरी पाषाण शिलांचे संपूर्ण आच्छादन होते. या घुमटाच्या माथ्यावर, पाषाणातून कोरलेल्या छत्र्या उभ्या केलेल्या असत. चारी प्रमुख दिशांना, उंच आणि सडपातळ, किंबहुना मोठ्या सुयांसारख्या भासणार्‍या, चार संगमरवरी स्तंभांची एक ओळ, नक्षी कोरलेल्या चौथर्‍यावर उभी केलेली होती. चारी दिशांना असलेल्या स्तंभांच्या ओळींसमोरच पुष्पमाला किंवा साखळ्या या सारख्या सजावटीने सजवलेली चार प्रवेशद्वारे होती. या प्रवेशद्वारांच्या दोन्ही बाजूस उभे असलेल्या पाषाण स्तंभांवर सिंहांची शिल्पे विराजमान असत. संपूर्ण स्तूपाच्या भोवताली अप्रतिम शिल्पकाम केलेल्या पाषाण शिलांमधून बांधलेले, 14 फूट उंचीचे रेलिंग उभे होते. या वर्णनावरून सहज कल्पना करणे शक्य होते की हा स्तूप किती भव्य आणि नेत्रदीपक दिसत असला पाहिजे. ही नेत्रदीपक वास्तू, सातवाहन साम्राज्याच्या वैभवाचे एक महत्त्वाचे चिन्ह होते असे म्हणणे सयुक्तिक ठरेल.

स्तूपाच्या मध्यवर्ती घुमटाभोवतीचे आणि बाहेरच्या रेलिंगवर असलेले शिल्पकाम 4 कालखंडात केले गेले होते असे पुरातत्त्वज्ञ मानतात. मानतात. हे 4 कालखंड साधारणपणे कालखंड-1: 200-100 इ.स.पूर्व; कालखंड-2: इ.स.100; कालखंड-3: इ.स.150; कालखंड-4: इ.स.200-250 असे असावेत. महायान आणि हिनयान या दोन्ही पंथांच्या कालात हे शिल्पकाम झाले असल्याने साहजिकच बुद्धांच्या प्रतिमा फक्त काही ठिकाणीच (महायान कालात केलेल्या शिल्पकामात) आढळून येतात.

प्रथम दर्शनी तरी मला असे वाटते आहे की संग्रहालयाने अमरावती पाषाण शिल्पांच्या या प्रदर्शनाची मांडणी विचारपूर्वक आणि अतिशय उत्तम रितीने केलेली आहे. कक्षामध्ये, काचेच्या शो केसेस जमिनीवर पेडस्टल्सवर तर ठेवलेल्या आहेतच पण काही भिंतींवर सुद्धा बसवलेल्या आहेत. मध्यभागी अगदी छतापर्यंत पोहोचणारे एक पार्टिशन उभारलेले आहे. या पार्टिशनला अनेक आकारांच्या खिडक्या पाडलेल्या आहेत. आकाराने लहान असलेल्या पाषाण शिला या खिडक्यांमध्ये छान मांडून ठेवलेल्या आहेत.

या पाषाण शिला व काही ठिकाणी ठेवलेले त्यांचे बारीक तुकडे हे बघून माझ्या मनाला अतिशय खेद होतो आहे. काही उत्साही ब्रिटिश अधिकार्‍यांच्या, हा स्तूप खणून तेथील पाषाण शिला दुसरीकडे पाठवण्याच्या अतिउत्साहात किंवा नादात या मूळ वास्तूचे अपरिमित आणि पुन्हा कधीच भरून न काढता येण्यासारखे नुकसान झाले आहे हे स्पष्ट समोर दिसते आहे. या ऐवजी कंबोडियातील मंदिरांप्रमाणे हा स्तूप जर परत बांधून काढला असता ताज महालाच्या तोडीची पण 2000 वर्षांपूर्वी निर्मिती केली गेलेली एक वास्तू आज आपल्या समोर पुन्हा उभी राहिली असती.
एक हलकासा सुस्कारा सोडून मी पहिल्या पाषाण शिलेकडे वळतो.

मूळ इंग्रजी लेखासोबत असलेली छायाचित्रे या दुव्यावर क्लिक केल्यास बघता येतील.

(क्रमश:)

23 ऑगस्ट 2014

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

मस्त लेख. अमरावती स्तूपाबद्दल ऐकले होते पण फारशी माहिती वाचनात आली नव्हती. धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा भागदेखील वाचनीय.
वाहतूक मुरांबे :-D.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखमाला वाचत आहे. पुढील भागाची वाट पाहतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

अभ्यासपूर्ण लेख, दांडगी नीरीक्षणशक्ती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखमाला आवडते आहे. आणि ललित पद्धतीच्या वर्णनशैलीमुळे जरा जास्तच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कनिंगहम ह्यांना सांची स्तूप १८५१ मध्ये असा दिसला. अमरावती स्तूपहि असाच असू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सांचीचा स्तूप हा सर्वात जुना म्हणजे सम्राट अशोकाने बांधलेला होता असे इतिहासकार मानतात. सांची स्तूपाच्या बाजूला जे कोरीव काम आहे ते फक्त प्रवेशद्वाराजवळील कमानींच्यावर आहे आणि ते सुद्धा बहुधा पुढच्या काळात केलेले असण्याची शक्यता आहे. स्तूपाभोवतालच्या रेलिंगवर येथे कोरीव काम नाही.

अमरावती स्तूपाच्या रेलिंगवर "अफलातून" बास रिलिफ शिल्पे आहेत. या शिवाय स्तूपाला चिकटून बसवलेल्या आतील रेलिंगवर सुद्धा अप्रतिम शिल्पकाम आहे.

समकालीन तिसरा महत्त्वाचा स्तूप मध्य प्रदेशातील बारहट येथे होता. येथे रेलिंग आणि कमानी या दोन्हीवर कोरीव काम होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समकालीन तिसरा महत्त्वाचा स्तूप मध्य प्रदेशातील बारहट येथे होता. येथे रेलिंग आणि कमानी या दोन्हीवर कोरीव काम होते.

कोलकाता येथील इंडियन म्यूझियममध्ये ह्या स्तूपाच्या काही कमानी ठेवण्यात आलेल्या आहेत. 'अप्रतिम' इज़ द वर्ड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बारहट स्तूपाचे जे काही अवशेष मिळाले ते ब्रिटिश अधिकार्‍यांनी कोलकाटा येथील इंडियन म्युझियम येथे हलवून ठेवलेले आहेत. बारहट मधे आता स्तूपाची कोणतीच खूण नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0