अ वूमन इन बर्लिन

जुनाच चित्रपट आहे, पण मी काल पाहिला. पूर्ण समीक्षा ब्लॉगवर लावलीये, पण इथे चिकटवतेय.

कुठल्याही युद्धात, आणि त्यातही दुसऱ्या महायुद्धासारख्या निर्घ्रुण युद्धात स्त्रीयांवर झालेल्या अत्याचारांबद्दल वाचायचे, धाडस मी केले नव्हते. चित्रपटातून बघतांना तर असे विषय इतके क्लेशकारक होतात, की बरेचदा त्यांच्या कडू जहर सत्यापासून आपण लांबच राहणे पसंत करतो. पण A Woman in Berlin ने त्याच सत्याचे इतके पैलू दर्शविले आहेत, की हादरून जातांनाही कुठेतरी, एक उत्तम कलाकृती बघितल्याचा आनंद मिळाला, म्हणून लिहावेसे वाटले. चित्रपटाची कथाच इतकी प्रभावी आहे, की दिग्दर्शकाचे श्रेय जाणवू नये, पण तरीही, छोट्या दृश्यातूनच नव्हे, तर प्रत्येक शॉट मधून, नजरेतिल प्रत्येक भावातून त्याने ती कथा अधिक फुलवली आहे. काही दृश्यांसाठी मनाची तयारी करूनच बघावा, पण बघावा जरूर, असा हा चित्रपट, Netflix वर उपलब्ध आहे.

मूळ कादंबरी युद्धानंतर प्रसिद्ध झाल्यावर इतके वादळ उठले, की लेखिकेने आजन्मच नव्हे, तर मृत्यूनंतरही "Anonyma" बनून राहणे पसंत केले. लेखिका नाझी जर्मनीतली पत्रकार, आणि देशोदेशी फिरलेली, अनेक भाषा अवगत असलेली, बर्लिनच्या उच्चभ्रू स्तरातली सुसंस्कृत स्त्री आहे. तिचा नवरा जर्मन सैन्यात मोठ्या पदावर असल्याने युद्धासाठी निघून जातो, आणि त्यानंतर तो परत येईपर्यंतची वाताहात तिच्या नजरेतून आपल्याला पडद्यावर दिसते.

बर्लिन काबीज करायला आलेले रशियन सैनिक तिथे उरलेल्या, नि:शस्त्र, निरपराध स्त्रीयांचे शोषण करत असतांना, ही अनामिका-नायिका धैर्याने त्यांच्या कमांडर समोर उभी राहून जाब विचारते, तेव्हा मुळात सभ्य असूनही तो तिला, "थोडावेळ सहन करा, येवढं काय त्यात?" असं उत्तर देतो! जर्मनीने युद्ध सुरू केले, जर्मन सैनिकांनी जेवढे हाल आमचे केले, तेवढे आम्ही तुमचे केले असते, तर तुम्ही अजून जिवंतच राहिला नसता, असे अनेक ताशेरे, अनेक सबबी पुढे करत, हे "जेते" पुरूष निराधार स्त्रियांना जगणं नकोसं करून सोडतात, तेव्हा, अनामिका मात्र आपल्या स्त्रीत्वाचा स्वाभिमान राखत, आपल्या स्त्रीत्वाचेच शस्त्र घेऊन ठाम उभी राहते, आणि तिच्यावर अत्याचार करणाऱ्यालाच कुठेतरी तिचा गुलाम बनायला लावते, ही जया-पराजयाची लढाई दिग्दर्शकाने अतिशय सूक्ष्म रितीने दाखवली आहे. शेवटी कमांडर तिच्यापाशी येतो, तेव्हाही, ती त्याचे हुकूम न मानता, त्याला आपल्या जबाबदारीची जाणीव करून देते.

हिंसा, प्रेम, राष्ट्राभिमानाचे अनेक अर्थ इथे प्रतीत होतात, तसेच स्त्री-पुरूषांमधल्या नात्याचेही. कारण ज्या पुरूषाने जग जिंकायला पाऊल पुढे टाकले, त्याच्या घरी मागे राहिलेल्या आया-बहिणी मात्र तो या जुगारात केव्हाच हरलेला आहे! ज्या मूल्यांसाठी तो प्राणपणाने लढला, त्याच मूल्यांची होळी तो स्वहस्ते पेटवतो आहे, केवळ आता होळी पेटलेले घर शत्रूचे आहे, येवढाच फरक! हा विरोधाभास चित्रपटामधे दर क्षणी जाणवतो, आणि तोच ह्या स्त्रीच्या कथेचा कणाही आहे.

देशाला, सैनिकांना प्रेरित करायला हिटलरसारख्या नेत्यांनी नीतिमूल्यांचे शब्द वापरले. नायिकासुद्धा त्या शब्दांनी वहावत जाऊन श्रद्धेने जर्मनीच्या विजयाची, आपल्या नवऱ्यच्या विजयाची आस धरून बसलेली असतांनाच, शत्रूच्या नजरेतून तिला वेगळंच दृश्य दिसतं. आपल्या राष्ट्रीय-व्यक्तित्वाचा कुठला अर्थ आपले देशबांधव त्यांच्या क्रूर-कर्तृत्वाने सिद्ध करताहेत, हे लक्षात आल्यावर, ती मनातून पराभूत होते.

जर्मनीला "पितृभूमी" मानत असले, तरी, बर्लिनचे स्त्री रूपक स्पष्ट आहे. ज्या पुरूषावर प्रेमाने, विश्वासाने विसंबलो, संरक्षक म्हणून त्याची "पूजा" बांधली, तोच आता नजरेतून उतरल्यावर, शत्रूपक्षाच्या कमांडरबरोबर नवीन मांड मांडण्यावाचून नायिकेला गत्यंतर उरत नाही. कमांडरही शेवटी पुरूष असला, तरी इतरांपेक्षा जास्त सभ्य, सुसंस्कृत, आणि पर्यायाने स्त्रियांचा आदर करणारा आहे, म्हणून त्याचे मित्र, हाताखालचे सैनिकही हळूहळू त्या स्त्रियांना सहानुभूतीने वागवू लागतात. त्या स्त्रियांनी आश्रय घेतलेले घर, कुठेतरी त्या सैनिकांचे आश्रयस्थान होते, जिथे आपल्या घराच्या, बायका-मुलांच्या आठवणीत ते रमतात, गातात, नाचतात, रशियाच्या विजयाचा एकत्र जल्लोश करतात, आणि युरोपियन एकतेची स्वप्न बघतात.

शेवटी घरी परत आलेल्या नवऱ्याला अनामिका जेव्हा आपले अनुभवकथन वाचायला देते, तेव्हा तो ही पूर्णपुरूष श्रीरामा प्रमाणे तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन निघून जातो. पुरूषांच्या युद्धोन्मादाचे घाव दाखवणारी अनामिका, आणि बर्लिन-नगरी, एकवार पुन्हा स्त्रीस्वभावानुसार जगात सौंदर्य, सृजनता, सुजनता निर्माण करायला सिद्ध होते. पण ह्यावेळी ती केवळ स्वयंसिद्धा आहे, हेच काय ते थोडके समाधान.

4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

छान नेटका परिचय. आभार! आणि

छान नेटका परिचय. आभार!

आणि ऐसीवर स्वागत! (स्माईल)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद!

धन्यवाद! मी म्हणतात त्याप्रमाणे, समीक्षा करायला तांत्रिक बाजू, दिग्दर्शन, अभिनय, चित्रपट-सृष्टीची माहिती असायला हवी, तेवढी मला नाही. इतकेच काय, मी दिग्दर्शकाचे नावही नमूद केले नाही. एका कथेच्या पातळीवर समीक्षा केलिये, असे समजू शकता. एक-दोन वाक्ये नंतर सुचली, ती अशी:

चित्रपटात लक्षात राहणारी एक गोष्ट म्हणजे उत्तम संवाद आणि लेखन. मूळ जर्मन भाषेच्या अनुवादित तळटीपा बघूनही सहज समजणारे, आणि अर्थवाही. शेवटच्या प्रसंगात अनामिका जेव्हा कमांडरला विचारते, "आम्ही तुझ्याविना कसे जगावे?" तेव्हा तो प्रश्न त्याला व्यक्तिश: तर आहेच, पण तो ज्या आदर्शांचा प्रतिनिधी आहे, त्यांनाही आहे. महायुद्धामुळे दिशा, आणि जुनी जीवनपद्धती हरवलेल्या एका संपूर्ण पिढीचा तो प्रश्न आहे!

शब्दांचे बुड्बुडे। उडती क्षणभर
मनामधे घर। करीत ना
http://aavarta.blogspot.com/

कथा नेहमीप्रमाणे दुसर्‍या

कथा नेहमीप्रमाणे दुसर्‍या महायुद्धाच्या बॅकड्रॉपवर भावनाविवश करणारी आहे, पण चित्रपटाची समीक्षा केली असती तर अधिक आवडली असती.

चित्रपटाच्या तपशीलाबद्दल

चित्रपटाच्या तपशीलाबद्दल काहीही न सांगता, चित्रपटाबद्दल सांगणारा परिचय आवडला. अशा प्रकारचे चित्रपट परिचय जालावर दिसणं कठीणच असतं. चित्रपट यादीत आलेला आहे, पण बघण्यासाठी पुरेशी शांतता, ऊर्जा कधी मिळेल याची वाट पाहते आहे.
(बायका यंव नी त्यंव प्रकारच्या धाग्यांमुळे ही ऊर्जा फारच खर्च होते, दुर्लक्ष करायला सुरूवात केली पाहिजे.)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चित्रपट परीचय आवडला.

चित्रपट परीचय आवडला.

Amazing Amy

ओह माय गॉड!!! अशा विचित्र

ओह माय गॉड!!! अशा विचित्र प्रकारचं उदाहरण माझ्याही ऐकीवात आहे. नवरा अन बायको (चुकून) भर गर्दीत जेंटस डब्यात, लोकलमध्ये शिरले. अन त्या जमावाने बाई पाहून हात साफ करुन घेतले. ती बाई नवर्‍याला बोलावत राहीली अन नवर्‍याने मागे वळूनही पाहीले नाही व तो पुढे उतरुन निघून गेला, मागे ती कशीबशी धावत गेली. पुढे जेव्हा कधी तिने, त्याला जाब विचारला, तेव्हा त्याने फ्लॅट डिनाय केले की असे कधी घडलेच नाही.

मला या चित्रपटात अन वरील प्रसंगात साम्यस्थळ हेच वाटाते की नवर्‍याची हतबलता अन त्यातून आलेले डिनायल.

चित्रपट पाहीनच. उत्तम परीक्षण.

पराजित सैनिकांची अवस्था

सारिका,

चित्रपटात पराजित जर्मन सैनिकांची अवस्थाही फार विषण्ण करून सोडणारी आहे. त्यांनीही कुठल्यातरी ध्येयाने प्रेरित होऊनच प्राण पणाला लावले असतील, पण पराभवाने त्यांची ध्येयंच चुकीची ठरवली आहेत. आपल्या स्त्रियांसमोर लज्जित होऊन उभं राहणं त्यांना शक्य होत नाही. नवीन परिस्थितीत रशियनांबरोबर मैत्री करणे त्यांना अशक्यच असते, अशी एक दोन उदाहरणं चित्रपटात आहेत.

अनामिका बलात्कारिता तर आहेच, शिवाय त्या शोषणातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग म्हणून ती गणिका होते, असं दर्शवलं आहे. नवर्‍याच्या पुरूषी अहंकाराला हे सहन होत नाही. आपली खोली, आणि बायको, दोन्हीचा वापर झालेला आहे, आणि कितीही प्रयत्न केला तरी ती पूर्वीसारखी होणे शक्य नाही, हे त्याला मान्य होत नाही.

शब्दांचे बुड्बुडे। उडती क्षणभर
मनामधे घर। करीत ना
http://aavarta.blogspot.com/

उत्तम परीक्षण

तो नवरा निघून जातो? Sad ....!!!
सिनेमा फार सुंदर वाटतो आहे.