मुघल ए आजम
जोधा अकबर रिलीज होणार होता तेंव्हा उसळलेली रणधुमाळी लक्षात राहिली होती. तेंव्हाच विचार मनात आला ह्या आधी ही असे प्लॉट असणारे अनेक चित्रपट येऊन गेले आहेत आणि असा विचार करताना पहिले नाव डोळ्यासमोर आले ते म्हणजे मुघल ए आजम. हा चित्रपट मी दोन्ही कृष्णधवल आणि रंगीत अशा प्रकारात पहिला आहे. पहिल्यांदा जेंव्हा हा चित्रपट पाहिला तेंव्हा लक्षात राहिली ती मधुबाला (अकबराच्या शब्दात हसीन लौंडी), दुर्गा खोटे आणि कमळातून प्रेमपत्रे पाठवलेला प्रसंग. भारतात तयार होवून प्रदर्शित झालेल्या आणि तयार होण्यास सर्वात जास्त वेळ लागलेल्या दोन चित्रपटापैकी (पाकीझा आणि मुघल ए आजम) एक चित्रपट. सहज उत्सुकता ताणावली म्हणून गुगलून बघितले. सर्वत्र एकसारख्याच महितेचे दुवे येत गेले. त्याच दरम्यान खातीजा अकबर या लेखिकेने इंग्रजीतून लिहिलेले मधुबालाचे आत्मचरित्र (Madhubala- Her Life Her Films) वाचायला मिळाले. त्यात ह्या चित्रपटाच्या निर्मिती विषयी बरीच माहिती मिळाली. आणि नंतरही बरीच माहिती मिळत गेली त्याच माहितीचे हे संकलन आहे.
असे सांगितले जाते कि इम्तियाझ अली ताज ह्या नाटककाराचे अनारकली ह्या विषयाचे नाटक पाहून के. असिफ ला ह्या चित्रपटाची कल्पना सुचली पण अनारकली हा विषय भारतीय चित्रपट सृष्टीसाठी नवा नव्हता. कोणतेही ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध नसलेली ही कथा, लाहोर (पाकिस्तान) मध्ये मात्र अनारकली ची कबर आणि दर्गा आहे (मी पाहिलेली नाही. Madhuba- her life her films ह्या इंग्रजी आत्मचरित्ररूपी पुस्तकात संदर्भ आहे) . मुघल ए आजम च्या आधी कमीत कमी ५ चित्रपट अनारकली ह्या विषयावर येऊन गेलेले होते त्यातील दोन चित्रपटात तर सुलोचनाने अनारकलीची भूमिका केली होती. त्यानंतर बीना रॉयचा अनारकली (प्रसिद्ध गाणे - ये जिंदगी उसीकी है). खुद्द के. असिफ नेही १९४४ च्या दरम्यान अनारकली सुरु केला होता यात चंद्रमोहन, सप्रू आणि नर्गिस हे अनुक्रमे अकबर, सलीम आणि अनारकली असे होते. के. असिफ च्या दुर्दैवाने आणि आपल्या सुदैवाने फाळणी नंतर ह्या चित्रपटाचा निर्माता शिराज अली पाकिस्तानात गेला आणि चंद्रमोहन ही मरण पावला त्यामुळे थोडा तयार झालेला हा चित्रपट डब्यात गेला.
के. असिफ माणूस जिद्दीचा. त्याचे आयुष्य ही चढ उताराचे. मुंबईत त्याला त्याचा मेव्हणा नझीर (तेंव्हा तो चित्रपटात लहान मोठा भूमिका करायचा)घेवून आला, नझीर ने त्याला शिलाई चे दुकान काढून दिले. नंतर नझीर च्या लक्षात आले कि शिलाई पेक्षा असिफ चे लक्ष शेजारच्या शिलाई च्या दुकानातील एका मुलीकडे जास्त लक्ष आहे. तेंव्हा ते दुकान बंद झाले. याच दरम्यान के असिफ ने "प्रभात" फिल्म कंपनी मध्ये ही शिंप्याचे काम केले. खिशाने फकीर असलेल्या या माणसाची स्वप्ने मात्र भव्य दिव्य होती. परत नझीरच्याच ओळखीने के. असिफने चित्रपट दिग्दर्शन सुरु केले. आता कपडे शिवणे ते एकदम चित्रपटदिग्दर्शन हा प्रवास कसा झाला याची माहिती मात्र कुठे मिळत नाही. त्याने दिग्दर्शित केलेला हलचल चित्रपट चालला आणि परत के. असिफ च्या मुघल ए आजम च्या स्वप्नाला परत सुरुवात झाली आणि ह्या वेळेस मात्र चित्रपट पूर्ण करायचाच ह्या इराद्याने त्याने काम सुरु केले.
अंधेरीच्या मोहन स्टुडीओचे दोन स्टेज १९५१ पासून १९६० पर्यंत ९ वर्षे बुक राहिले. अकबराच्या भूमिकासाठी ह्या वेळेस त्याने पृथ्वीराज कपूर यांना घेतले, सलीम साठी के. असिफ नि दिलीपकुमार ला निवडले, बरेच जण या निवडीबाबत साशंक होते. खुद्द अजित ज्याने सलीम च्या निष्ठावंत मित्राची भूमिका केली त्यालाही दिलीपकुमार सलीम च्या भूमिकेसाठी योग्य वाटत नव्हता. अनारकली मात्र ठरत नव्हती. मोठमोठ्या शहरांमध्ये ऑडिशन झाल्या. पण अनारकली मिळाली नाही. त्यावेळी के. असिफलाच मधुबाला या भुमिके साठी एकमेकाद्वितीय आहे असे वाटले. यथावकाश शुटींग सुरु झाले. मधुबाला शुटींग साठी स्टेज वर पहिल्या दिवशी आली तिच्या नेहमीच्या चुलबुल्या मूडमध्ये. कॅमेरा, लाईटस लागले आणि के. असिफ ने प्याक अप केले. असे ५ दिवस होत राहिले. शेवटी मधुबाला चा चुलबुला मूड जाऊन ती ही विचारात पडली आणि शुटींग ला पोहोचली. तिचा मूड बघताच के. असिफ खुश झाला आणि शुटींग सुरु झाले.
दिल्लीहून वेशभूषे साठी खास शिंपी बोलावले गेले, सुरतहून जरदोशी करणारे कलाकार आले, कोल्हापूरच्या कारागिरांनी मुकुट व तत्सम दागिने, राजस्थानी कारागिरांनी हत्यारे तर आग्र्याच्या कारागिरांनी खास त्या काळी लागणारी पादत्राणे बनवायला सुरुवात केली. युद्धाच्या शॉट साठी २००० उंट, ४००० घोडे आणि
८००० सैनिक मागविले गेले त्यापैकी बरेचसे सैनिक भारतीय सेनेतून मागविले गेले.
मोहे पनघट पे या गाण्यासाठी अस्सल सोन्याची कृष्णाची मूर्ती तयार करून घेण्यात आली.
लवकरच शीश महालची उभारणी सुरु झाली (एकूण २ वर्षे ह्या महालाची उभारणी सुरु होती) जयपूरच्या अंबर किल्ल्यातील एका महालाची प्रेरणा या कामामागे होती. पण त्यासाठी लागणारी त्या दर्जाची रंगीत काच भारतात उपलब्ध नव्हती. ही काच बेल्जियम वरून मागवावी लागणार होती. पण चित्रपटाचा निर्माता शापूरजी पल्लोनजी जो त्यावेळी भारतातला सगळ्यात मोठा बिल्डर होता, त्याला असे वाटू लागले कि पैशाचा अपव्यय होतोय कि काय. त्याने के. असिफ च्या बेल्जियम काचेच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. लवकरच ईद आली आणि शापूरजी पल्लोनजी के. असिफ च्या घरी इदी घेऊन पोहोचला. एका ताटात १ लाख रोख आणि काही सोन्याची नाणी अशी इदी त्याने आणली होती. के. असिफ ने मात्र त्या कशालाही हात न लावता एक सोन्याचे नाणे उचलले आणि उरलेल्या सगळ्या इदीतून बेल्जियमवरून शीश महाल साठी काचा आणा असे फर्मावले. आणखी एका शॉट साठी ज्यामध्ये दुर्गा खोटे दासीच्या ओट्यात मोती टाकते आणि नंतर जमिनीवर मोती पडत राहतात यासाठी के. असिफ ला पुढच्या इदी ची वाट पहावी लागली कारण ह्या शॉट साठी त्याला खरे मोतीच हवे होते.
के. असिफच्या जास्तीत जास्त अस्सलच्या हट्टापायी पृथ्वीराज कपूर दुपारच्या भर उन्हात वाळवंटात चालला. असे ठरले होते कि जेंव्हा तप्त वाळूचे चटके सहन होणार नाहीत त्यावेळी पृथ्वीराज कपूर कॅमेरामेन ला विशिष्ट खुण करतील आणि तिथे शॉट कट होयील. नैतिक धैर्य म्हणून के असिफ ही त्या वाळवंटात विना चपलाचे थांबले होते. शॉट सुरु झाला पृथ्वीराज कपूरांच्या खुणेची वाट कॅमेरामेन बघत राहिला आणि एका शॉट मध्ये सीन ओके झाला. असिफने पळत जाऊन पृथ्वीराज कपूरना मिठी मारली तो पर्यंत दोघांच्याही पायाला फोड आले होते.
तसेच कैदेत असलेल्या चित्रीकरण दरम्यान मधुबालाने खरेखुरे साखळदंड लावूनच सगळे शॉट दिले. अभिनेत्री नादिरा च्या म्हणण्यानुसार मधुबालाचा हृदयाचा विकार हेच जड साखळदंड वापरून वाढला. एका प्रसंगात मधुबाला दोन महालाची दालन पळत जाते, खरं तर ह्या शोट साठी तीची डमी वापरावी असा सल्ला होता (तिच्या हृदयविकारामुळे) पण जास्तीत जास्त अस्सलसाठी मधुबालाने स्वतःच हा शॉट दिला आणि शॉट कट होतो तेथे बेशुद्ध होऊन पडली.
सलीम आणि अनारकलीवर उत्कट पण सोज्वळ प्रणयदृश्य चित्रित करायचे असे ठरले.
के असीफ ने चित्रपटाचा संगीत दिग्दर्शक नौशाद ला बोलावले आणि सांगितले की ह्या काळात तानसेन सारखा गाणारा कोण भेटेल. (गाणे – प्रेम जोगण बन के) नौशादनी सुचवले की बडे गुलाम अली खान साहेबच ह्या गाण्याला पुरेपूर न्याय देऊ शकतील. पण बडे गुलाम अली खान साहेब चित्रपटासाठी गात नव्हते, चित्रपटासाठी गाणे त्यांना कमीपणाचे वाटायचे म्हणून त्यांनी नौशाद ला नकार कसा द्यायचा यासाठी एका गाण्याचे २५,००० रुपये मागितले, त्याकाळात लता आणि रफी ही ४०० किंवा ५०० रुपये एका गाण्याचे घ्यायचे (विकीपेडीया ची माहिती, काही ठिकाणी हाच आकडा ४००० ते ५००० असा आहे). के असीफ ने एका मिनिटात मागणी मान्य केली. आणि ह्या चित्रपटात, राग सोहनी आणि रागेश्री वर आधारित दोन गाणी प्रत्येकी २५,००० रुपये देऊन गाऊन घेतली.
तसेच प्यार किया तो डरना क्या ह्या गाण्याच्या वेळी हवा तसा प्रतिध्वनी (एको) रेकॉर्डिंग मध्ये येईना म्हणून हे गाणे रेकॉर्डिंग स्टुडीओच्या बाथरूममध्ये लता कडून नौशाद ने गाऊन घेतले (हा किस्सा विकिपीडियावर आहे, प्रत्यक्ष गायिका किंवा संगीत दिग्दर्शकाने सांगितल्याचे ऐकिवात नाही). हे गाणे १०५ वेळा, पसंत पडेना म्हणून परत परत लिहून घेतले होते. तसेच शीश महल मध्ये शुटींग करणार असल्याने कुठे न कुठे कॅमेरा दिसायचाच सरतेशेवटी ५-६ तासाच्या मेहनतीनंतर अशा काही जागा सापडल्या की जेथून कॅमेरा दिसत नव्हता. पुढे वेगळीच समस्या आली, लाईट्स काचेवर चमकायचे योग्य चित्रीकरण व्हायचे नाही. तेव्हढ्यात कॅमेरामन ला एक जागा अशी दिसली की जिथे प्रकाश परावर्तीत होत नव्हता शोध घेतल्यानंतर असे कळले की त्या ठराविक जागी मेणाचा पातळ थर आला आहे त्यामुळे प्रकाश तर परावर्तीत होत नाही आणि शीश महालाच्या सौंदर्यात ही बाधा येत नाही. सर्व काचावर मेणाचा पातळ थर लावला गेला. चित्रपट कृष्ण धवल असला तरी हे गाणे मात्र रंगीत होते. के असीफ ला नवीन रंगीत तंत्रज्ञान आल्यानंतर सर्व चित्रपट रंगीत करायचा होता पण निर्माते परत पैसे घालायला तयार नव्हते आधीच ३ चित्रपट तयार होतील एवढी फिल्म १ चित्रपटासाठी वापरली होती तेंव्हा ८५ % चित्रपट कृष्ण धवल तर १५% चित्रपट रंगीत बनवला गेला.
हे गाणे कथ्थक ह्या नृत्य प्रकारात करायचे ठरले, डान्स डायरेक्टर लच्छू महाराज त्याप्रमाणे मधुबाला ला शिकवू लागले पण साहजिकच लच्छू महाराज कथ्थकमध्ये मधुबाला पेक्षा अधिक पारंगत होते तेंव्हा के. असीफ ने बी. आर. खेडकर नावाच्या मूर्तीकाराला बोलावले, हे गृहस्थ मुखवटे करण्यात पारंगत होते. बी. आर. खेडकरानी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे लच्छू महाराजानी मधुबालाचा मुखवटा वापरून सर्व दृश्ये चित्रित झाली. आवश्यक तेथे मधुबालाचा क्लोज अप वापरला गेला. खरंतर हा किस्सा ऐकून मला मधुबालाच्या ऐवजी दुसरे कोणी आहे हा विचार कसातरी वाटला, पण तेच खरे आहे. गाण्यात कोठेही कळून येत नाही की पूर्णवेळ मधुबाला नाचत नाही.
मुघल ए आझम चे उत्कट प्रेम दृश्ये पाहताना अशी शंका हि येत नाही त्या वेळेस मधुबाला आणि दिलीपकुमार एकमेकांशी बोलतही नव्हते. चित्रपटाला एवढा वेळ लागलेला पाहून अताउल्ला खान सतत के. असीफ ला धमकावयाचा की मधुबालाला आता चित्रपटातून काढून घेतो, नया दौरच्या वेळी मधुबालाच्या वडिलांनी (अताउल्ला खान) केलेला आततायीपणा पाहून के. असीफ ही शहाणा झाला होता. (मला सतत असा वाटतं की मांग के साथ तुम्हारा या गाण्याची वेळी मधुबाला कशी दिसली असती, याचा अर्थ असा नाही की वैजयंतीमालाने वाईट काम केलंय). अशा वेळेस के. असीफ अताउल्ला खानला चित्रपटाचे तयार झालेले रशेस दाखवून त्याला शांत बसवायचा.
चित्रपट निर्मितीस लागणारा वेळ आणि पैशाचा विचार करून निर्माता शापूरजी अनेकवेळा अस्वस्थ होत, प्यार किया तो डरना क्या ह्या गाण्याच्या चित्रीकरणाआधी असेच ते अस्वस्थ झाले आणि त्यांनी सोहराब मोदीला सेट वर पाठवून दिले. सोहराब मोदी सेट वर गेले तेथे प्रत्येक गोष्ट अति चौकसपणे चाललेली पाहून ते अस्वस्थ झाले आणि त्यांनी के असीफ ला विचारले , प्यार किया तो डरना क्या ह्या गाण्याच्या चित्रीकरणाला किती वेळ लागेल? के असीफ म्हणाला ९ दिवस. सोहराब नी हुकुम केला ३ दिवसात हे गाणे झाले पाहिजे, के असीफने शांतपणे उत्तर दिले “क्षक्षक्ष” याला बोलवा तो २ दिवसात शुटींग पूर्ण करेल. तोपर्यंत मधुबालानेही जाहीर केले, दिग्दर्शक बदलणार असेल तर ती यापुढे या चित्रपटात काम करणार नाही. सोहराब मोदीने शापूरजीना जाऊन सांगितले की के. असीफ चा भरपूर पैसे मिळवयाचा इरादा दिसतो म्हणूनच इतका वेळ आणि पैसा लागतोय हे ऐकल्याबरोबर सोहराब कडे दिलेले काम शापूरजीनी काढून घेतले, कारण त्यांना माहित होते वेळ आणि पैसा लागतोय पण के. असीफ प्रामाणिक आहे.
युद्ध प्रसंग चित्रित करताना मात्र वेगळीच समस्या निर्माण झाली, अधिकतर सैनिक भारतीय सेनेतून चित्रीकरणासाठी वापरले होते पण जोशात येऊन बरेच सैनिक एकमेकांना नकळत इजा करायचे त्या नंतर अतिशय जपून चित्रीकरण करण्यात आले. पृथ्वीराज कपूर आणि दिलीपकुमार दोघानाही घौडदौड करण्याची भीती वाटायची ह्यासाठी खऱ्यासारखे दिसणारे कागदी लगद्याचे खोटे दोन घोडे केले गेले आणि चित्रीकरणात ट्रिक फोटोग्राफीचा वापर करून असे प्रसंग चित्रित झाले की चुकुनही वाटत नाही की ते घोडे खोटे आहेत. हे घोडे ही बी. आर. खेडकरानी बनवले होते.
तब्बल ९ वर्षानंतर अनेक समस्या, संकट पार करीत हा चित्रपट ५ ऑगस्ट १९६० ला रिलीज झाला. मुघल राजे जसे फर्मान काढायचे तशाप्रकारच्या लांब वाटोळ्या उर्दू आमंत्रण पत्रिका काढल्या गेल्या. अॅडव्हान्स बुकिंग साठी ३ दिवस आधीच रांगा लागल्या होत्या, चित्रपट रिलीज झाल्यानंतर ही ह्या रांगा बरेच दिवस अशाच राहिल्या. चित्रपटाची पहिली प्रिंट हत्तीवरून आणली गेली. एकूण १.५ कोटी खर्च आलेल्या (त्याकाळी ए ग्रेड चित्रपट फार फार तर १० लाखात तयार होत) ह्या चित्रपटाने त्या काळी बॉक्स ऑफिसवर ५.५० कोटी चा धंदा करून रेकॉर्ड केले जे पुढे शोलेने मोडले.
नोव्हेंबर २००४ मध्ये मूळ निर्माता शाप्पुरजी पल्लोनजी यांच्या नातवाने नवीन तंत्रज्ञान वापरून सर्व चित्रपट रंगीत करून पुन्हा रिलीज केला, त्यावेळी रिलीज झालेल्या इतर नव्या चित्रपटांच्या तुलनेत ह्या जुन्या पण नवीन कपडे परिधान केलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर २५ आठवडे चांगला धंदा केला.
के. असीफ ने असाच आणखी एक भव्य रंगीत चित्रपट तयार करण्याचे ठरविले त्याप्रमाणे गुरु दत्त आणि निम्मी ला घेऊन त्याने चित्रपट सुरु केला पण आकस्मिक गुरु दत्तचा मृत्यू झाला त्यानंतर संजीव कुमार ला घेऊन हा चित्रपट परत सुरु केला पण १९७१ साली वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी के असीफ चा मृत्यू झाला. हा अर्धवट चित्रपट १९८६ मध्ये लव्ह अॅड गाॅड या नावाने रिलीज झाला असे म्हणतात, कुठे मिळाला तर बघायची इच्छा आहे.
मला मिळालेली माहिती इतकीच आहे. जाणकारांनी सुधारणा / भर टाकावी.
कदाचित अनारकली या पात्र संकल्पनेचा फारसा ऐतिहासिक पुरावा सापडत नाही पण जोधा आणि अकबर या दोघांविषयी ही बरेच ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध आहेत यामुळेच नसलेले किंवा कमी माहिती उपलब्ध असलेल्या पात्राला मध्यवर्ती ठेवून कथा तयार करणे जास्त सोपे आहे. म्हणूनच मूळ अनारकली कथेचा शेवट के. असीफ ने बदलला आणि तिला जिवंत ठेवले मात्र जोधा अकबर उलट सुलट ऐतिहासिक पुरावे आणि त्यातून निर्माण झालेले वाद यात अडकला.
बाकी “न्यून ते पुरते अधिक ते सरते”. (काही ठिकाणी फोटो टाकायचे होते, कसे टाकायचे कळले नाही, काही सोपा मार्ग नाही का?)
मजेची गोष्ट अशी की
मजेची गोष्ट अशी की फिल्मफेअरने त्यावर्षीच्या सर्वोत्कृष्ट संवादाचा अॅवार्ड ह्या चित्रपटाला दिला मात्र ४ जणांनी संवाद लिहिले होते पुरस्काराची बाहुली मात्र एकाच त्यामुळे हा पुरस्कार स्वीकारला गेला नाही. मधुबालाला पुरस्कार मिळाला नाही (तिला असा कुठलाच पुरस्कार कधीच मिळाला नाही) तसेच बेस्ट आर्ट डिरेक्शन चा पुरस्कार चौदवी का चांद ला दिला, वास्तविक शीश महाल तयार करताना उरलेल्या वस्तुमधून बराचसा चौदवी का चांदचा सेट उभारला होता. बेस्ट फिल्म चा त्यावर्षीचा पुष्कर मात्र मुघल ए आझम ला मिळाला पण नायक, नायिका, कथा, आर्ट या कशालाही पुरस्कार न मिळता एखादा चित्रपट सर्वोत्कृष्ट कसा होऊ शकतो असा प्रश्न विचारून के. असीफ ने हा पुरस्कार स्वीकारला नाही.
+१
सहमत आहे. खरेखुरे मोती हवेत तर मग मधुबालाचा मुखवटा का वापरला, युद्धप्रसंगात खोटे घोडे वापरणं हे विचित्र वाटतं. त्या काळच्या शूटींगमधे जिथे खोटे घोडे कळत नाहीत, खरे मोती आहेत हे तरी कसं समजणार आहे? नाटकांत निदान प्रत्यक्ष दिसत असल्यामुळे बालगंधर्वांचा खर्या गोष्टी वापरण्याचा हट्ट पटतो, पण तेव्हाच्या चित्रपटांसाठी हा हट्ट अस्थानी वाटतो.
ही सुंदर मधुबाला या 'सोंगा'च्या प्रेमात का पडते हे मला कधी समजलंच नाही; उलट ही पैशांसाठीच त्याच्या प्रेमात पडली असेल असं सतत वाटत राहिलं (काय करणार, मला समजायला लागलं तेव्हा टीव्हीवर असलेच पिच्चर जास्त लागायचे). मुघल-ए-आझम एवढा महान का हे मला कधी पटलंच नाही.
मला हा सिनेमा आवडतो, तो संवाद
मला हा सिनेमा आवडतो, तो संवाद आणि गाण्यांसाठी. मधुबालाच्या सौंदर्याबद्दल दुमत असायचा प्रश्नच नाही. पण जनरली तो सिनेमा अतिभव्य-दिव्य वाटण्याऐवजी नेहमीच मला लाउड वाटतो, आणि महान अजिबात वाटत नाही. दिलीपकुमार मला नेहमीच सोंग वाटतो आणि असं मत असल्यामुळे माझा मूर्खपणा कसा आपोआपच सिद्ध होतो हे वेळोवेळी वडिलांकडून ऐकवण्यात आलय्..पण माझं मत कायम आहे :)
नवीन माहिती
मधुबाला ही काही चांगली नर्तकी नव्हती, म्हणूनच प्यार किया तो या गाण्याच्या लाँग शॉट्स मधे डमी वापरली असणार असे वाटतच होते(विशेषतः त्या गाण्यातल्या चक्री आणि पदन्यास), पण ते स्वतः लच्छू महाराजजी आहेत हे माहिती नव्हते. लच्छू महाराज हे लखनौ घराण्याचे प्रसिद्ध कथ्थक नर्तक बिरजू महाराजजी यांचे गुरू आणि काका. वडीलांच्या(अच्छन महाराज) मृत्युनंतर, बिरजू महाराजांनी आपले काका लच्छू महाराज आणि शंभू महाराज यांच्याकडे नृत्याचे धडे घेतले.
प्रणयदृश्यातील डमी आणि कंटाळवाणा लव्ह अँड गॉड
सलीम आणि अनारकलीवर उत्कट पण सोज्वळ प्रणयदृश्य चित्रित करायचे असे ठरले.>
मुघल ए आझम चे उत्कट प्रेम दृश्ये पाहताना अशी शंका हि येत नाही त्या वेळेस मधुबाला आणि दिलीपकुमार एकमेकांशी बोलतही नव्हते.>
प्रणयदृश्याचे चित्रीकरण करण्याकरिता देखील डमी वापरली होती का?
हा अर्धवट चित्रपट १९८६ मध्ये लव्ह अॅड गाॅड या नावाने रिलीज झाला असे म्हणतात, कुठे मिळाला तर बघायची इच्छा आहे. >>
मी बघितलाय. अतिशय वाईट चित्रपट आहे. संजीवकुमार अगदी केविलवाणा भासतो. फक्त "अल्ला तेरे साथ है, मौला तेरे साथ है|" हे गाणे बरे आहे.
कौतुक
तुमच्या क्षमातेचं कौतुक वाटतं.
मागे तुम्ही तो अमजद खान्-श्रीराम लागू ह्यांचा तो मुलगा किडनॅप होण्याची थीम असलेला चित्रपट पाहिला होतात.
त्यात तुमच्या मित्राला अमजद खान डाव्या पायाने उजवा पाय खाजवतो हे द्दृश्य भारी वाटे.
८०च्या दशकातील आपला चित्रपट वावर बराच दिसतो.
लव्ह अॅड गाॅड मी आताच कित्येक जणांना विचारलं कुणालाच ठाउक नाही.
<< तुमच्या क्षमातेचं कौतुक
तुमच्या क्षमातेचं कौतुक वाटतं. >>
धन्यवाद मन!
मागे तुम्ही तो अमजद खान्-श्रीराम लागू ह्यांचा तो मुलगा किडनॅप होण्याची थीम असलेला चित्रपट पाहिला होतात.
त्यात तुमच्या मित्राला अमजद खान डाव्या पायाने उजवा पाय खाजवतो हे द्दृश्य भारी वाटे. >>
तुम्ही इन्कार विषयी बोलताय तर.
८०च्या दशकातील आपला चित्रपट वावर बराच दिसतो. >>
होय. ते माझ्या शालेय जीवनातले दिवस होत. एखाद्या चित्रपटाने मोहिनी घातली म्हणजे त्याचा क्रमिक पुस्तकांपेक्षाही जास्त मन लावून अभ्यास करायचा हा माझा शिरस्ताच होता आणि अजूनही आहे.
लव्ह अॅड गाॅड मी आताच कित्येक जणांना विचारलं कुणालाच ठाउक नाही.>>
मी शाळेत असताना अभ्यास करतेवेळी आकाशवाणीच्या विविधभारती केंद्रावरील ०८:३० ते ०९:४५ या वेळात प्रसारित होणारा चित्रलोक हा कार्यक्रम अगदी मन लावून ऐकत असे. त्यावर ’अल्ला तेरे साथ है, मौला तेरे साथ है।’ हे गाणे अनेक वेळा वाजत असे. ते ऐकून हा चित्रपट बघायचाच असे ठरविले. संजीव कूमार यांचे निधन झाल्यावर दूरदर्शन ने हा चित्रपट दाखविला तेव्हा अगदी आवर्जून बघितला आणि प्रचंड निराशा झाली. अलिफ लैला यांच्या आयुष्यावरील या चित्रपटात "अलिफ दीवाना है। अलिफ दीवाना है।" असे तारस्वरात ओरडून सांगणारे लोक खल प्रवृत्तीचे दाखविले आहेत परंतु अलिफचा एकूणच वावर पाहून ते लोक देवदूतच भासतात.
चांगली माहिती
छान माहिती रंजकतेने सांगितली आहेत. सिनेमासाठी सगळ्या खर्या गोष्टी वापरून कलाकृतीच्या दर्जात खरंच काय फरक पडतो कोण जाणे?
मुघले आजम मी कधीच एका बैठकीत पूर्ण पाहिला नाही त्यामुळे तितकासा आवडलाही नाही. त्यातले संवाद "नौटंकी"छाप वाटले आणि दिलीपकुमारला राजबिंडा वगैरे करण्यासाठी त्याचं चमकदार केस केलेलं ध्यान पाहून हसू आलं होतं.
मधुबाला आणि "जब प्यार किया तो" हे मात्र अव्वल!