खास बहाणा (कातीलच्या गज़लेचा भावानुवाद)
कातीलच्या एका फारसी गज़लेचा भावानुवाद सादर करतो आहे. मूळ संकल्पना मराठी संस्कृतीला साजेशा करताना भावार्थ जपण्याचा प्रयत्न आहे. तसंच कातीलच्या गजलेत जे आशयघनता असलेले शब्द आहेत तेच मराठीत आणण्याचा प्रयत्न कृत्रिम झाला असता. म्हणून शब्दसंख्या भरमसाठ वाढवण्यापेक्षा काही शब्द अध्याहृत ठेवलेले आहेत. मूळ गज़ल, तिचा अर्थ व त्यातून भावानुवाद करण्याची प्रेरणाजयंत कुलर्णींच्या या लेखातून मिळाली.
खास बहाणा
नजरशरांनी मारुन, म्हणशी "दोष यमाचा", खास बहाणा!
दुर्लक्षाने मारुन करशी जनलज्जेचा खास बहाणा
ज्या देवीचा वेडा झालो, तिच्या दर्शनाच्या आशेने
देवळि जाता आड येतसे नमनाचा तो खास बहाणा
चुकवित नजरा विसावली ती खांद्यावर कोणा अन्याच्या
भिडता नजरा, चपापून का आधाराचा खास बहाणा?
अशी अप्सरा आसपास या पुजेत बाधा तरी कशी ना?
किलकिल डोळे तिला पहाती, मंत्रपाठ हो खास बहाणा!
मला मारुनी, रक्तच माझे शरिरावर ती माखे अपुल्या
रक्तचंदनी लेप लावुनी, शृंगाराचा; खास बहाणा
मूळ गजल
मा रा ब-घम्ज़ा् कुश्त्-ओ-कज़ा रा बहान साख़्त्
खुद सू-ए-मा ना दीद्-ओ-हया रा बहान साख्त्
रफ्तम् ब मस्जिदे के ब-बीनम् ज़माल-ए-दोस्त्
द्स्ते ब-रूख् कशीद-ओ-दुआ रा बहान साख़्त्
द्स्ते ब दोश्-ए-गैर निहाद अ़ज् सर्-ए-करम्
मा रा चूं दिद् ओ लघ्ज़िश्-ए-पा रा बहान साख़्त्
जाहद् न दाश्त् ताब्-ए-जमाल्-ए-परी रूखान्
कुन्जे गिरफ्त्-ओ-याद-ए-ख़ुदा रा बहान साख़्त्
ख़ून-ए-कातील-ए-बे सर्-ओ-पा रा बहा-ए-खीश
मलेदान-ए-निगार-हिना रा बहाना साख़्त्
वृत्त
वृत्त, मात्रा कळत नाही.
या वृत्ताला काय म्हणतात मला माहीत नाही. पण प्रत्येक ओळीत ८,८,८,८ मात्रांचे चार विभाग आहेत. प्रत्येक विभागातल्या पहिल्या दोन मात्रांवर वजन येतं.
नजरशरांनी | मारुन, म्हणशी | "दोष यमाचा", | खास बहाणा! |
आशेने च्या जागी आकारान्त शब्द आला असता तर इतरही ओळीत आल्याप्रमाणे झालं असतं हे तुमचं खरं आहे. पण हा प्रयत्न गज़ल रचनेचा असल्यामुळे शेरातल्या पहिल्या ओळीला यमकाचं बंधन नाही. अर्थात त्या कडव्यात शेराचे नियम कितपत पाळले गेलेले आहेत हे माहीत नाही.
अवांतर
अवांतर:
माझ्या अतिशय जुजबी फार्सीज्ञानानुसार 'बहाना साख्त़न' हे संयुक्त क्रियापद आहे. म्हणजे 'बहाना बनाना' (टू मेक ऍऩ एक्सक्यूज़). साख़्तनचा अर्थही बनवणे असाच आहे. 'साख़्तन' हे मसदर (धातू) फार्सीत संयुक्त क्रियापदे बनवण्यासाठी वापरतात. जसे 'तर साख़्तन' म्हणजे ओले करणे' (भिजवणे). असो. तर फार्सीतली अनेक संयुक्त क्रियापदे जशीच्या तशी हिंदीत, मराठीत आलेली आहेत. वानगीदाखल आणखी एक मजेशीर संयुक्त क्रियापद आहे 'सौगंद-ख़ुरदन'. म्हणजे 'कसम खाना' (हिंदीतही 'सौगंद खाना' वापरले जाते. 'ख़ुरदन' म्हणजे खाणे. आदमख़ोर म्हणजे नरभक्षक. हरामख़ोरचा अर्थ स्पष्टच आहे.)
आणि कवीचे नाव क़तील आहे क़ातिल नाही. ही गझल सुबुक हिंदीत (म्हणजे भारतीय फार्शीत) लिहिलेली आहे.
शेवटी चूभूद्याघ्या.
जाता-जाता:
भावानुवादाबाबत सातीशी सहमती.
भले शाब्बास!
झक्कास रे भौ
एक शंका:
भिडता नजरा, चाचपून का आधाराचा खास बहाणा?
चपापून? की चाचपून?