माधवराव आणि वरदा.

माधव जूलिअन् म्हणजे माधवराव हे फारसी विषयामध्ये एम्.ए.ची पदवी एल्फिन्स्टन कॉलेजातून मिळवून वयाच्या २५ व्या वर्षी पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सेवेत शिरले. ह्यापूर्वीचे त्यांचे आयुष्य आणि शिक्षण आपल्या बडोदा ह्या जन्मगावी झाले होते.

तुटपुंज्या उत्पन्नाच्या आणि सोवळ्या आणि जुन्या चालीरीति आणि विचार ह्यांना चिकटून राहू पाहणार्‍या कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांच्या सुधारकी विचारांना सहानुभूति न मिळाल्यामुळे शाळेच्या शेवटच्या वर्षांमध्ये कुटुंबाशी त्यांचे संबंध कोरडेच झाले होते. पण मंचरशा वाडिया ह्या त्यांच्या मुख्याध्यापकांचा हाताखाली Palgrave च्या Golden Treasury सारख्या पुस्तकाचा आणि रोमॅंटिक इंग्लिश कवींच्या वाचनाने आणि त्याच वेळी समवयस्क आणि कवितांचे तसेच नादी वि.द. घाटे ह्यांच्यासारखे मित्र मिळाल्यामुळे त्यांना कविता लिहिणे आणि वाचणे ह्यांमध्ये मोठी रुचि निर्माण झाली होती. बडोद्यातच राहणारे जुन्या पिढीतील कवि चंद्रशेखर ह्यांचे माधवराव भक्त होते. काशीबाई हेर्लेकर ह्या सुविद्य बाई बडोद्यात मिस मेरी भोर (’वाहवा वाहवा चेंडू हा’ ख्यात) ह्यांच्या ट्रेनिंग स्कूलमध्ये शिक्षिका होत्या. स्वत:चे स्वतन्त्र लेखनहि त्या करीत असत. अशा ह्या सुसंस्कृत बाईंशी आणि त्यांच्या मुलींशी शेजारपणामुळे वयाच्या १२-१३ वर्षापासूनच माधवरावांचा चांगला घरोबा निर्माण झाला होता. काशीबाईंची थोरली मुलगी शान्ता - नंतरच्या शान्ताबाई कशाळकर - माधवरावांहून चारेक वर्षाने मोठी होती. तच्या रसिक सहवासात माधवराव आल्याने ते तिच्याकडे ओढले गेले. पौगंडावस्थेतील माधवराव तिच्याकडे आई-बहीण-मैत्रीण-प्रेयसी अशा अनेक नात्यांतून पाहू लागले आणि एकदा धीर करून तिच्याशी विवाह करण्याची इच्छाहि त्यांनी बोलून दाखवली. वय, आर्थिक स्थिति, पोटजात हे लक्षात घेऊन असे होऊ शकणार नाही असे शांताबाईंनीच त्यांना सांगितले. माधवरावांच्या मनातील शान्ताबाई मात्र शेवटपर्यंत तशाच राहिल्या आणि त्यांनीच दिलेले ’जूलिअन्’ हे टोपणनाव माधवराव कवि म्हणून अखेरपर्यंत वापरत राहिले. ( मेरी कॉरेलीच्या 'God's Good Man' ह्या कादंबरीत Julian Adderley नावाची व्यक्तिरेखा आहे. तेच नाव शान्ताबाईंनी माधवरावांना दिले.)

ह्या सर्व वातावरणाचा प्रभाव म्हणजे विशीतले माधवराव सामाजिक विचार, स्त्रीपुरुष मैत्री अशा बाबतीत हळवे आणि प्रागतिक झालेले होते. महाराष्ट्रातील तत्कालीन मध्यमवर्गाचा स्त्रीपुरुषसंबंधांकडे पाहण्याचा संकुचित दृष्टिकोण माधवरावांना मान्य नव्हता आणि असे संबंध नैसर्गिक लैंगिकतेच्या पलीकडे शुद्ध मैत्रीचे, खेळीमेळीचे असावेत अशी त्यांची धारणा झाली होती. आपल्या काव्यातूनहि ते असेच विचार मांडत असत आणि त्यामुळे तकालीन विख्यात टीकाकार बा.अ.भिडे ह्यांच्याकडून त्यांना ’प्रणयपंढरीचे वारकरी’ असे एकाच वेळी खोचक आणि तरीहि समर्पक असे अभिधानहि प्राप्त झाले होते.

माधवराव तरुणपणाकडे वाटचाल करीत होते तेव्हाच अनेक यशापयशांमधून गेल्यामुळे आपल्या आयुष्याचे आपण नक्की काय करायचे असे विचार त्यांच्या मनामध्ये उठत होते. हळव्या प्रेमामागे लागून आयुष्याची एकदोन वर्षे वाया गेली हे त्यांना जाणवले होते. चरितार्थासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे हे त्यांनी ओळखले होते आणि म्हणून १९१६ साली बी.ए. आणि १९१८ साली एम.ए. ह्या पदव्या त्यांनी मिळविल्या. परीक्षांसाठी त्यांचा विषय फारसी हा होता. फारसीबाबत त्यांना काही विशेष प्रेम होते असे नाही कारण सुरुवातीस संस्कृत आणि नंतर इंग्लिश ह्यांकडेहि त्यांचा ओढा होता पण नोकरी मिळवायला चांगला विषय असा वडिलांचा आग्रह पडल्यामुळे काहीशा नाइलाजानेच त्यांनी फारसीची निवड केली आणि त्या भाषेवर चांगले प्रभुत्व मिळविले.

एम,ए.पदवी मिळविल्यानंतर त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडे नोकरीसाठी अर्ज टाकला आणि जून १९१८ पासून न्यू इंग्लिश स्कूल आणि फर्ग्युसन कॉलेजात इंग्लिश आणि फारसी शिकवण्याचे काम त्यांना मिळाले. अशा प्रतिष्ठित संस्थेत नोकरी मिळाल्यामुळे हे काम आपल्या बाजूने उत्कृष्ट करून आपला ठसा उमटावयाचा असा निर्धार त्यांच्या मनामध्ये उत्पन्न झाला. १९१९ साली संस्थेचे आजीव सदस्यत्वहि त्यांना देण्यात आले. (कॉलेजातील त्यांच्या वर्गात असणार्‍या विद्यार्थिनींमध्ये शकुंतला परांजपे आणि इरावती करमरकर - नंतरच्या कर्वे - ह्याहि होत्या.)

माधवरावांमध्ये जो टोकाचा सामाजिक प्रागतिकतावाद होता त्याची एक चुणूक १९१९ साली पाहायला मिळाली. चिरोल खटल्यासंबंधीच्या आपल्या विलायत दौर्‍यावरून टिळक परत आल्यावर १९१९ च्या डिसेंबर महिन्यात पुण्याच्या मंडईतील मोठया सभेत त्यांना नागरिकांतर्फे मानपत्र देण्याचा संमारंभ झाला. तत्कालीन अस्पृश्य समाजातील काहीजण, तसेच रॅंग्लर परांजपे ह्यांच्यासारखे सुशिक्षित प्रागतिक ह्या मानपत्राला विरोध करणार्‍यांमध्ये होते. प्रत्यक्ष सभेमध्ये ह्यांपैकी कोणीच उपस्थित राहिले नाहीत. केवळ एका अस्पृश्य मुलाने ’टिळक आमच्या सहभोजनामध्ये भाग घेणार असले तर आमचा मानपत्राला विरोध नाही’ अशा अर्थाचे भाषण केले आणि तो सभेतून निघून गेला. सभेच्या शेवटी मानपत्र देण्याचा ठराव सभेपुढे मतदानासाठी मांडला गेल्यावर एक व्यक्ति वगळता बाकी सर्वांनी ठरावाला अनुमोदन दिले. विरोधाचा एकुलता एक आवाज होता माधवरावांचा. टिळकांचा लोकप्रियता शिगेला पोहोचली असतांना पुण्यात सार्वजनिक सभेत त्याविरुद्ध आवाज उठविण्याचे धैर्य माधवरावांमध्ये होते. त्या दिवशी संतप्त जमावाकडून माधवरावांना चांगलाच मार पडला असता. सभेच्या आयोजकांनी संरक्षण दिल्यामुळे ते बचावले.

१९२१ साली श्री.बा.रानडे, त्यांच्या पत्नी मनोरमाबाई, यशवंत पेंढारकर (यशवंत), शंकर केशव कानेटकर (गिरीश), ग.त्र्यं.माडखोलकर अशा समशील आणि समविचारी, तसेच कविताप्रेमी मंडळींच्या सहवासात माधवराव येऊन पोहोचले आणि त्यातूनच रविकिरण मंडळाची स्थापना झाली. (मंडळात रवि एकच, माधवराव. बाकीची नुसती किरणेच! -अत्र्यांचा ’झेंडूची फुले’च्या प्रस्तावनेतील शेरा!) आपल्या सामाजिक विचारांमुळे आणि काव्यामुळे माधवराव नवविचारांच्या तरुण वर्गामध्ये लोकप्रिय होऊ लागले होते. त्याचबरोबरच ह्या नव्या विचाराच्या काव्याला जुन्या मडळींकडून विरोधहि होऊ लागला होता. रविकिरण मंडळाचे पहिले प्रकाशन ’किरण’ ह्याच्यावरच्या बा.अ. भिडे ह्यांच्या 'विविधज्ञानविस्तारा'तील अभिप्रायात अशी शंका व्यक्त करण्यात आली होती की १९व्या शतकाच्या आरंभात रावबाजीच्या चैनबाजीच्या दिवसांत जसे अनंतफंदी, प्रभाकरासारखे तमासगीर पुढे आले त्यांचेच सुधारलेले अवतार आता निर्माण होऊ लागले आहेत आणि पुढील छकडा-लावण्यांच्या उदयाचा हा काळ आहे. ’चटोरपणात माधव जूलिअन् धाडसी आहेत हे निभ्रान्त कबूल केले पाहिजे’ अशा निष्कर्षाला बा.अ.भिडे येऊन पोहोचले.

ह्याच वेळेस डे.ए.सोसायटीच्या आजीव सदस्यांमध्येहि दोन गट होते. त्यांच्यातील प्रमुख व्यक्ति के.रा.कानिटकर आणि वि.ब.नाईक ह्यांच्यावरून त्यांना कानिटकर गट आणि नाईक गट अशी नावे होती. कानिटकर गट सामाजिक विचारांच्या बाबतीत पुढारलेला होता आणि नाईक गट अधिक रूढिप्रिय होता. माधवराव खरे तर कानिटकर गटात पडायला हवे होते पण सोसायटीच्या सभांमधून अनेकदा आपल्या स्पष्ट बोलण्यामधून त्यांना ह्या वर्गाचे शत्रुत्वच मिळाले होते. माधवरावांच्या कविता आणि सामाजिक बाबतीतील त्यांची आग्रही मते ह्या गटाला अतिरेकी वाटत असत. ह्यानंतरच्या माधवरावांच्या अडचणी निर्माण करण्यात कानिटकर गटाचा हात होता आणि सनातनी मानल्या जाणार्‍या नाईक गटाकडूनच त्यांना पठिंबा मिळाला.

रविकिरण मंडळाच्या सदस्यांभोवती जे तेजोवलय निर्माण होत होते त्यामुळे समविचाराचे नवतरुण-तरुणी त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागले होते आणि त्याच्या सदस्यांच्या काव्यगायन, काव्यचर्चा, सहली आणि सहभोजने ह्यांमध्ये असे नवतरुण-तरुणी भाग घेऊ लागले. नेमकी हीच लोकप्रियता आणि आपल्या मनाला पटेल ते उघड बोलण्याची माधवरावांची सवय त्यांना एक अनपेक्षित आघात देऊन गेली.

ह्या नवतरुणांमध्ये वरदा नायडू नावाची आंध्रातील हनमकोंडा गावाची एक तरुणीहि होती. तिच्या वडिलांनी शिक्षणासाठी तिला फर्ग्युसन कॉलेजच्या वसतिगृहामध्ये ठेवले होते. माधवराव आणि वरदा ह्यांच्यामध्ये मर्यादेपलीकडे घसट आहे अशा वावडया पुण्यामध्ये उठू लागल्या. पूर्वनियोजनाशिवाय आणि केवळ अपघातानेच घडलेल्या काही घटनांमुळे - जसे की एकत्र सहली, अन्य पोक्त स्त्रियांच्या संगतीत पण माधवराव जेथे होते अशा घरात रात्र काढणे - ह्या वावडयांना खतपाणी मिळाले. अन्य तीन पुरुष प्राध्यापक आणि माधवराव ह्या तरुणीबरोबर कॉलेजच्या कोर्टावर टेनिस खेळले ह्याचा मोठा बागुलबुवा करण्यात आला. लकडी पुलावर आणि कॉलेजच्या मागील टेकडीवरील ‘कविकातळा‘वर त्यांची नावे एकत्र लिहून ठेवण्याचा खोडसाळपणाहि केला गेला.

माधवरावांच्या विरोधी गटाला ह्या गोष्टींनी आयतेच भांडवल पुरविले. अविवाहित आजीव सदस्याने वसतिगृहातील मुलीबरोबर मैत्रीचे संबंध ठेवणे सोसायटीच्या इभ्रतीला शोभेसे नाही आणि अशा वर्तणुकीच्या सदस्याबरोबर आम्हांस काम करणे प्रशस्त वाटत नाही अशा अर्थाच्या तक्रारी सोसायटीकडे आल्या. स्वत: माधवराव, त्यांचे पाठिराखा नाईक गट अशांनी लेखी निवेदने दिली. घडलेल्या घटना अशा का घडल्या ह्याचे पूर्ण स्पष्टीकरण माधवरावांनी दिले. स्वत: वरदाने माधवरावांनी आपल्याला कसलेहि वचन दिले नाही वा फसविण्याचा प्रयत्न केला नाही असे पत्र लिहिले. बरीच भवति न भवति होऊन आणि ठराव-प्रतिठरावांचे राजकारण होऊन अखेर असा समझोता झाला की माधवरावांनी २० जून १९२४ पासून दोन वर्षांसाठी बिनपगारी रजेवर जावे, रजेच्या काळात त्यांना अन्य नोकरी करण्याची मुभा आहे. ह्या दोन वर्षांच्या काळात आपण त्या मुलीला भेटणार नाही वा तिच्याशी पत्रव्यवहार करणार नाही अशी अटहि माधवरावांकडून कबूल करून घेण्यात आली.

ह्यानंतर अमळनेरच्या प्रताप हायस्कूलमध्ये नोकरी मिळाल्यामुळे माधवराव तिकडे रवाना झाले.

ह्या घटनाचक्राचा दुसरा अंक येथून पुढे सुरू झाला आणि त्याला कारणीभूत होते श्रीधरपंत आणि मनोरमाबाई रानडे ह्यांसारखे माधवरावांचे हितचिंतक. श्री.के.क्षीरसागर हेहि माधवरावांचे निकटवर्ती असल्याने त्यांनी ह्याचे मोठे मार्मिक विश्लेषण केले आहे. माधवरावांचे स्त्रीपूजन हे केवळ ध्येयवादी होते. लैंगिक संबंधांना आणि विवाहाच्या आकांक्षांना त्यामध्ये स्थान नव्हते. पण श्रीधरपंतांसारख्या ‘कर्त्या‘ प्रागतिकांना हे पटण्याजोगे नव्हते. स्त्रीपुरुष मैत्रीचा शेवट विवाहातच व्हावा अशी त्यांची अपेक्षा होती. वरदाकडूनहि ह्या अपेक्षेला पाठबळ मिळेल असे वर्तन घडले. तिने रानडे दांपत्याला पत्र लिहून ‘माधवरावांशी विवाह जुळवून द्यावा‘ अशी विनंति केली. तदनुसार मुंबईत रानडे ह्यांच्या घरी भेट ठरली. वरदा तेथे उपस्थित असेल ह्याची काहीहि कल्पना माधवरावांना न देता त्यांनाहि रानडयांच्या घरी बोलावण्यात आले. व्ररदाला तेथे पाहून माधवराव चकित झाले. माधवरावांनी रजेवर जातांना सोसायटीला काय संगितले होते ह्याची रानडे दांपत्याला जाणीव नव्हती पण माधवरावांना साहाय्य करण्याच्या त्यांच्या हेतूमधून माधवरावांना नुकसानच पत्करावे लागले. रानडयांच्याच सूचनेवरून माधवराव, वरदा आणि बरोबर द.ल.गोखले असे तिघेजण जुहूला गेले पण त्या बेटीतून निष्पन्न झाले इतकेच की माधवरावांनी लग्नास नकार दिला.

माधवराव आणि वरदा ह्यांची मुंबईत भेट झाली ही वार्ता पुण्यास पोहोचली आणि परिणामत: माधवरावांचे हितचिंतकहि त्यांच्यापासून दूर झाले. त्यांची बाजू ह्यापुढे आपण समर्थपणे मांडू शकणार नाही असे त्यांना वाटून माधवरावांनी आपणहून राजीनामा द्यावा असे त्यांनी सुचविले. ११ ऑक्टोबर १९२५ ह्या दिवशी माधवरावांनीच राजीनामा दिल्याने ह्या प्रकरणावर पडदा पडला.

हा सर्व घटनाक्रम आजच्या दिवसात हास्यास्पद वाटतो. इतक्या किरकोळ बाबीचे इतके मोठे पर्यवसान कसे होऊ शकते असा प्रश्न आजच्या वाचकाला पडेल. त्याला उत्तर असे की जे घडले हे त्या काळाची मानसिक घडण, सामाजिक विचार आणि सामाजिक बंधने मानण्याची तयारी दर्शवणारा आरसा आहे. आजच्या विचाराने त्याला तोलता येणार नाही.

माधवराव आणि वरदा ह्यांचे संबंध अखेरपर्यंत स्नेहाचे राहिले. वर वर्णिलेल्या घटनांचा त्यांवर काहीच परिणाम झाला नाही. माधवरावांनी १९२९ च्या मे महिन्यात गंगूताई गरुड (लीलाबाई पटवर्धन) ह्यांच्याबरोबर विवाह केला. वरदाचाहि विवाह झाला्. मधल्या काळात माधवरावांनीच तिच्यासाठी एक स्थळ सुचविले होते पण तो प्रयत्न यशस्वी झाला नाही.

(प्रा.शं.के.कानिटकरलिखित ‘स्वप्नभूमि;, गं.दे.खानोलकरलिखित ‘माधव जूलिअन‘, लीलाबाई पटवर्धनलिखित ‘आमची अकरा वर्षे‘ ह्या पुस्तकांमधून संकलित).

धाग्याचा प्रकार निवडा: : 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (5 votes)

प्रतिक्रिया

माहितीपूर्ण

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माहितीपूर्ण लेख - (अवांतर : हणमकोंडा या गावालाच जोडून आता वारंगळ हेही गाव आहे. त्याकाळी त्यांच्यात किमान १० किमीचे अंतर असावे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजमेर पासून १० किमीवर पुष्कर तीर्थ आहे. दिल्लीपासून मथुरा (किंवा अमेठी ,लखनौ, इटावा,मैनपुरी वगैरे उत्तर भारतीय शहरांतील अंतरे) अमुक किमीवर आहे अशा वाक्यातील चिमुकल्या किलोमीटर संख्येची मौज वाटते खरी. सरळ पुष्कर तीर्थ ग्रेटर अजमेरमध्ये किंवा बृहन अजमेरमध्ये असं का नाही म्हणायचं?
"पुण्यापासून पाच सात किलोमीटर अंतरावर असणार्‍या कोथरुडमध्ये आम्ही राहतो " हे आज कुणी म्हटलं तर गंमत वाटेल.पण अर्ध शतकापूर्वी हे सहजपणे होत असावं.
अंतर धिटुकली वाटताहेत हल्ली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

भारीच लेख!

सनातनी नाईक गटाने पाठिंबा द्यायचं कारण "शत्रूचा शत्रू तो माझा..." एवढंच होतं असं दिसतंय. नाईक गट वि. कानिटकर गट या साठमारीत माधवरावांचा बळी पडल्याचं एकंदर चित्र वाटतंय...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

नाईक गटाचे होते म्हणून त्यांची विकेत काढली असे नव्हे.
लोक त्यांच्या बोलण्यानं दुखावले गेले होते असं दिसतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कानिटकर आणि नाईक गट ह्याबाबत शं.के.कानेटकर आणि खानोलकर ह्यांची पुस्तके वाचून असे दिसते 'शत्रूचा शत्रु तो आपला मित्र'असले काही कारस्थानी विचार नाईक गटाच्या मनात नव्हते. दोघाहि लेखकांनी - जे माधवरावांना १९२२-२४ पासून त्यांच्या मृत्यूपर्यंत चांगले ओळखत होते आणि माधवरावांच्या अत्यंत जवळच्या मित्रांपैकी होते - असे लिहिले आहे की सनातनी विचाराचे नाईक हे अतिशय सरळमार्गी स्वभावाचे आणि उदारमनस्क होते आणि माधवरावांच्यावर अनावश्यक कारवाई केली जात आहे असे वाटून ते माधवरावांच्या मागे उभे होते.

(माझ्या आठवणीप्रमाणे वि.ब.नाईक हे सोसायटीमधीक एक आदरणीय व्यक्तिमत्त्व मानले जात असे. त्यामुळेच प्राध्यापकांच्या कॉमन रूममध्ये चित्र असण्याचा मान त्यांना देण्यात आला आहे. माधवरावांचे दुसरे पाठिराखे जी.बी.कोल्हटकर हेहि असेच एक आदरणीय व्यक्ति होते. महाराष्ट्रातील पहिल्या पिढीचे ते रसायनशास्त्राचे प्राध्यापक आणि हिंदुस्तानभरचे रसायनशास्त्राचे पुढच्या पिढीतील अनेक प्राध्यापक त्यांचे विद्यार्थी असत असे वाचल्याचे आठवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मनोरंजक माहिती.

माधवरांच्या प्लेटोनिक प्रेमाच्या आसक्तीची अत्र्यांनी खूपच खिल्ली उडवली होती. अर्थात, त्यामुळे माधवरावांना कमी लेखण्याचे कारण नाही.

एक शंका आहे - हणमकोंड्याची वरदा नायडू आणि माधवराव यांचे संभाषण नेमके कोणत्या भाषेत होत असावे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वरदाला मराठी चांगले येत होते.

मी वर लिहिल्याप्रमाणे वरदाने आपले माधवरावांशी असलेले संबंध कसे होते ह्याचे वर्णन करणारे पत्र पाठवले होते. ते पत्र तिने माधवरावांचे मित्र गिरीश (शं.के.कानेटकर)ह्यांना लिहिले होते. पूर्ण पत्र 'स्वप्नभूमि'मध्ये छापलेले आहे आणि ते नेहमीच्या मराठीत आहे, त्यावर फक्त हैदराबादी उर्दूची थोडी छाया जाणवते.

मला वाटते की २०व्या शतकाच्या पहिल्या भागापर्यंत आन्ध्रात आणि विशेषतः रायलसीमा भागात मराठीचा चांगलाच प्रभाव होता आणि मराठी बोलता-वाचता येणे हा एक प्रतिष्ठेचा मुद्दा मानला जाई. हे मी केवळ ऐकलेले आहे पण विसूनानांसारखे त्या भागाची अधिक माहिती असलेले ह्यावर अधिक काही सांगू शकतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक!

माधव ज्यूलियनांच्या चरित्रात हा घटनाक्रम वाचल्याचे आठवते- शेवटी कालाय तस्मै नमः हेच खरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

लेख नेहमीप्रमाणेच वाचनीय! धन्यवाद!

माधवराव आणि वरदा यांच्यातील संबंधाबद्दलचा इतिहास रोचक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

रोचक माहिती! लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहितीपूर्ण.

बरीच भवति न भवति होऊन आणि ठराव-प्रतिठरावांचे राजकारण होऊन अखेर असा समझोता झाला की माधवरावांनी २० जून १९२४ पासून दोन वर्षांसाठी बिनपगारी रजेवर जावे, रजेच्या काळात त्यांना अन्य नोकरी करण्याची मुभा आहे. ह्या दोन वर्षांच्या काळात आपण त्या मुलीला भेटणार नाही वा तिच्याशी पत्रव्यवहार करणार नाही अशी अटहि माधवरावांकडून कबूल करून घेण्यात आली.

टिळकांना जाहिर सभेत विरोध करणार्‍या माधवरावांनी हे मान्य का केले असावे हे कळत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सेतुमाधवराव पगडी ह्यांचे 'जीवनसेतु' हे अतिशय वाचनीय आत्मचरित्र फार वर्षांपूर्वी वाचले होते आणि अलीकडे ते पुनः हातात आले.

सेतुमाधवराव १९२२ साली निजामाच्या प्रदेशातून पुण्यास शिकायला येऊन न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दाखल झाले आणि शाळेच्या गद्रेवाडयातील वसतिगृहात राहू लागले. (हा वाडा आता जागेवर नाही.) वसतिगृहावर देखरेखीचे काम माधवराव पटवर्धन आणि त्यांचे सहकारी आणि रविकिरण मंडळाचे एके सदस्य द.ल. गोखले होते. माधवरावांच्या ऋजु स्वभावावर सेतुमाधवरावांनी प्रशंसेने लिहिले आहे. माधवराव-वरदा कथा त्या काळातीलच पण सेतुमाधवरावांना त्याची काहीच कल्पना तेव्हा नव्हती.

पुढे सेतुमाधवरावांनी १९५०त हैदराबादमध्ये घरासाठी ज्यांच्याकडून जागा विकत घेतली ते केशवलु नायडू ह्यांच्याशी वरदाबाईंचा विवाह झालेला होता अणि त्या हैदराबादेत त्यांच्या शेजारीच राहात होत्या असा योगायोग सेतुमाधवरावांनी नोंदविला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा प्रसंग वाचल्याचे आठवते. तसे बहुधा ऐसीवरच कुठेतरी लिहिले देखील होते.

अन जीवनसेतूच्या वाचनीयतेबद्दल अतिशय सहमत. जीवनसेतू आणि दिवस असे होते ही दोन अतिशय आवडती आत्मचरित्रे आहेत. त्यातही जीवनसेतूचा बाज निराळाच!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं