तू
काल रात्री लाईट गेली होती
मी लपटोप उघडला आणि तुझा फोटो बघितला
झूम करून मोजत होतो तुझ्या चेहऱ्यावरचे तीळ
एक, दोन , तीन , चार, पाच , सहा आणि सात
एक कपाळावर
एक उजव्या गालावर
एक नाकावर
आणि दोन ओठांच्या अगदीवर
आणि एक गळ्यावर
तुझ्या चेहर्याला स्पर्श करायचा प्रयत्न केला
पण फक्त प्लाज्माच जाणवत होता
तू हुक्का ओढताना बाहेर पडलेला धूर तुझ्या डोळ्यात विरतोय
दोन टपोरे चोकलेटी डोळे
काही विशेषणेच उरली नाही आहेत
चोकलेटी , चाफा वैगेरे अगदी टिपिकल वाटत
तू तुझे डोळे रात्री एका वाइन च्या बाटलीमध्ये काढून ठेवतेस
आणि ते दोन गोल्डफिश बनतात आणि सकाळी पुन्हा तुझे डोळे
विचित्र आहे ना?
मी तुला मरमेड म्हणून सुधा इमजिन केला आहे
तू शापित आहेस का नाहीस ते माहिती नाही
इतकी नाजूक आणि फुलांसारखी
आणि तरीही दगडांसारखी
दगडांच्या पावसासारखी
माझ्या आत्म्याचा रेनकोट फाडून
दगड मला जखमी करून जातात
पण तू तितकीच निस्तब्ध
तू भरती आणतेस माझ्या लाटांना
लाडीकपणे जेव्हा केस मागे घेतेस
तेव्हा केस निर्जीव असतात हे पटतच नाही
तुझ्या केसांचा वास असा बाटलीत बंद करून ठेवावासा वाटतो
खूपच अब्सर्ड आहेस तू
साध समोर याव अन मी काहीतरी बोलाव
आजच मौसम कसा आहे
हवेत एक दमट सुगंध जाणवतोय
उष्मा गारवा पाऊस सगळे ऋतू आहेत ना आज?
लाटांचा आवाज आणि त्यांचा खारा वास
तुझे उडणारे केस एका बाजूला
पृथ्वी जशी कलंडते एका बाजूला तसे!
या शतकाची प्रेमकविता
"तुझ्या चेहर्याला स्पर्श करायचा प्रयत्न केला
पण फक्त प्लाज्माच जाणवत होता""तू तुझे डोळे रात्री एका वाइन च्या बाटलीमध्ये काढून ठेवतेस
आणि ते दोन गोल्डफिश बनतात आणि सकाळी पुन्हा तुझे डोळे""तू भरती आणतेस माझ्या लाटांना
लाडीकपणे जेव्हा केस मागे घेतेस
तेव्हा केस निर्जीव असतात हे पटतच नाही
तुझ्या केसांचा वास असा बाटलीत बंद करून ठेवावासा वाटतो"
-इथे कविता जाणवते. पण कविता एकदाच लिहून होत नसते याची जाणीव ठेवावी.
प्रस्तुत कवीत शक्यता आहेत चांगला कवी होण्याच्या. या शतकाची/तली मराठी कविता अशीच असत जाईल यापुढे.
आमचाही प्रयत्न
काल रात्री लाईटही गेलेली
मोबाईलची बॅटरीही संपलेली
पण मग लॅपटॉप उघडला
त्यात तुझा चेहरा सापडला
झूम करून लागलो मोजू
चेहर्यावरचे तीळ, डावी बाजू
गालावर एक, उजव्या ओठाशी दोन
ओठाशी तीन, अन् हनुवटीचा कोन
त्यावर एकदम चार, पाच, सहा...
नाही... ते तर आहेत मेकपचे -
बोटांनी ते गेलो मी पुसायला
एल्सीडीची धूळ लागली हाताला
लक्ष वेधणारे चॉकलेटी डोळे
छ्या या कवींनी उगाच सगळे
शब्द वापरून आहेत नासवले
उपमांना चोथा करून ठेवले
पाण्याची चकमक, म्हणे मासोळी
मदाने लालसर म्हणे चाफेकळी
जणूकाही दोन गोल्डफिश गडद
चाफ्याच्या बागेत
दारूच्या बाटलीत
थरथरताहेत उगाच अलगद
परीकथाच बर्या तुझ्यासाठी?
त्यांना सुद्धा आहे आडकाठी
मरमेड म्हणायची पण नाही
शापित तू नाही तर मी
मऊ नाहीस तू परी
आहेस मूर्ती संगमरवरी
थंड, कंगोरेवाली धारदार
माझे कवच फोडणारी
माझे काळीजही सोलणारी
नाही. हे केस नाहीत गळा कापणारे
मुलायम, वार्यावर भुरभुर उडणारे
मंद सुगंध दरवळणारे
मला लवू गोंजारणारे
झुळकेसरशी काळा पावसाळा
सुगंधी वसंत, गार हिवाळा
उरात उष्मा, सगळे ऋतू यावेत
पृथ्वी कलंडावी, पण तुझ्या कवेत
मी मस्त आहे
मी घट्ट आहे
शीघ्रकवितेकरिता वृत्त किंवा यमक बरे
शीघ्रकवितेकरिता वृत्त किंवा यमक बरे.
प्रतिभा नसल्यास, किंवा श्रम करायचे नसल्यास मुक्तछंदात लिहिणे म्हणजे लाज उघडी पाडणे. हे तुमच्यासारख्या अनुभवी व्यक्तीला सांगणे नलगे. ("सांगणे नलगे" म्हणजे "सांगतो आहे"चे जुनाट रूप आहे.)
तुमच्या कवितेत आशय आहे. भावना आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी शुभेच्छा आहेत.
मी काही अनुभवी तज्ञ व्यक्ती
मी काही अनुभवी तज्ञ व्यक्ती वेगैरे नाही आहे.मराठी ज्या प्रकारे बोलतो आहे त्या प्रकारे कविता किंवा इतर साहित्य प्रकार लिहिले जावेत अस मला वाटत. गणितासारखे एकाच ओळीत आठ अक्षर पाहिजेत, यमक जुळल पाहिजे हे नियम भावनांना वरचढ होऊ नयेत.(कवितेला पिंजर्यात घातलाय अस काहीतरी वाटत)किंवा कधी कधी लिहिता लिहिता कविता त्या फॉर्म मध्ये बसते. पण हे कविता लिहून झाल्यावर कळत. उगाच सुरवातीलाच असा हट्ट धरू नये अस वाटत.
बाकी आश्या शार्दुलविक्रीडीत किंवा यमकवाल्या कविता मी जनरली वाचत नाही किंवा वाचल्या तरी कळत नाहीत(माझा कमीपणा किंवा माझे मराठी भाषेचे ज्ञान तोकडे असल्यामुळे)
झाले दीस अनेक पाडुनि खरे शार्दूलविक्रीडित!!!
जाता लाइट काल रात्रि अवचित् ल्याप्टाप तो खोलला
त्याते लौकरि फोटु झूम करुनी मी गे तुझा पाहिला
झूमोनी तव चेहर्यावरिलचे मी मोजले तीळ गे
गालाते उजव्या, कपाळि, गळि जे नाकी व ओठांवरी
ऐशा सप्ततिळेस मी तुज अगे स्पर्शू बघे जैं परी,
प्लाज्मा फक्त गमे, दिठीत धूमकलिका सामावलीसे खरी
डोळे जाति विशेषणांपलिकडे साचे तुझे तप्किरी,
रात्री वारुणिकुंभिं घालिसि तया, ते होति गे स्वर्णझष्
प्रातःकाळि फिरोनि नेत्र बनती, कैसी हि जादू तरी?
चित्ती तू गमसी जणों मज कुणी गे मत्स्यकन्या जशी
आहेसी परि शापिता खरिच की? जाणे मती ना अशी
पुष्पासदृश कोमला, तरिहि तू पाषाणवृष्टीपरी
भेदोनी मम चित्तचैल करिती, घायाळ पाषाण ते
पैं नि:स्तब्धचि तू, नुरे तव मनी, काहीहि शिर्काण ते
मच्चित्तोर्मि तुझ्यामुळेचि भरती येवोनिया खौळती
जैं तू केशकलापकेलि करिसी, तैं जागती केशही
वाटे कुंतलगंध तो कुपितुनी, की साठवावा अगे!
वाटे कल्पनकल्प तूस बघता, कैसे वदावेचि गे!
वाटे अन्वट गंध तो दमटसा, आहे हवेचा बरा
उष्मा पाउस गारवा सकलही, गे जाणवे का खरा?
उर्मीनाद-सवेचि गंध गमतो, बेफाटसे दृश्य हे
पृथ्वीदोलन होतसे जधि तुझे गे हालती केश हे!!!
ती केस निर्जीव नसल्याची
ती केस निर्जीव नसल्याची फिलिंग येते मलासुद्धा. भारी.