Skip to main content

अग्नि आणि संस्कार

परवा रिमोटशी चाळा करतांना एका चॅनेलवर आयुर्वेदावर चर्चा होत असलेली दिसली. त्यात एक विदुषी सांगत होती, "आजकाल घरोघरी वॉटर फिल्टर बसवायचे एक फॅड निघाले आहे. हे अॅक्वागार्डचं पाणी फार शुद्ध असतं असं हे (मूर्ख) लोक समजतात. पण आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहता ते पाणी अशुद्धच असते कारण त्यावर अग्निसंस्कार झालेला नसतो. पिण्याचे पाणी तापवून प्यावे असे आयुर्वेदात सांगितले आहे. अग्नीमधली ऊर्जा, पावित्र्य आणि इतर गुणधर्म त्या क्रियेमध्ये पाण्याला मिळतात, ते संस्कार घेऊन ते पाणी पोटात गेल्यानंतर त्याच्यामुळे जठराग्नीला चालना मिळून अन्नाचे चांगले पचन होते. फिल्टरच्या पाण्यात हे अग्नीचे गुण तर नसतातच, शिवाय ते पाणी कोळशाबिळशामधून (अॅक्टिव्हेटेड कार्बन) जात कदाचित जास्तच दूषित होत असेल. वगैरे वगैरे... या बाई दिसायला तर माझ्या मुलाच्या वयाच्या वाटत होत्या, पण त्यांची भाषा मात्र माझ्या आईच्या काळातली होती, त्यातही खास आयुर्वेदातले काही 'शास्त्रीय' शब्द मिळवून त्या बोलत होत्या.

माझी आई आयुर्वेद शिकलेली नव्हती, तिला सायन्सचा गंधही नव्हता, पण परंपरागत शिकवणींमधून ती योग्य अशा ब-याच गोष्टी करत असे. उदाहरणार्थ आजारी माणसाला किंवा लहान बाळांना द्यायचे पिण्याचे पाणी ती नेहमी तापवून देत असे. त्याच्यामागे कोणते शास्त्रीय कारण आहे याचा विचार ती करत नव्हती. तसे करायचे असते एवढेच तिला पक्के माहीत होते. मुळात 'शास्त्र' किंवा 'शास्त्रीय' या शब्दांचेच तिच्या शब्दकोषातले अर्थ फार वेगळे होते. "उपासाला रताळे चालते, पण बटाटा चालत नाही, सकाळी आंघोळ करूनच पाणी भरायला पाहिजे, पारोशाने भरले तर ते अपवित्र होते. स्वयंपाकाला ते चालत नाही, अनशापोटी किंवा उभ्याने पाणी पिऊ नये, जेवतांना फक्त उजव्या हाताच्या बोटांचा उपयोग करावा, अन्नाच्या पातेल्यालासुद्धा डाव्या हाताचा स्पर्शही होता कामा नये." असले कित्येक पारंपरिक नियम "असं शास्त्रात सांगितलंय्" असे म्हणून ती स्वतः पाळत असे आणि ते पाळायला आम्हाला सांगत असे. हे नियम शिकवणे मुलांना चांगले वळण लावण्यातला भाग आहे असे तिला वाटत असे. तिच्याबरोबर त्यावर वाद घालण्यात अर्थ नसायचा.

"अग्नीमध्ये पावित्र्य असते, शिवाय तो इतर गोष्टींनाही पावन करतो म्हणून त्याला 'पावक' असेही म्हणतात." असे माझी आई सांगत असे. सोने अग्नीमध्ये तापवल्याने त्यात मिसळलेले अन्य हिणकस पदार्थ जळून जातात आणि शुद्ध बावनकशी सोने झळाळून उठते, यापासून ते सीतामाईच्या अग्निपरीक्षेपर्यंत बरीचशी उदाहरणे तिच्याकडे होती. शिवाय साधे दुधाचे उदाहरण घेतले तर ते वेळोवेळी उकळवून ठेवले नाही तर ते नासते. आमटी भाजी वगैरेंनाही तापवल्याने त्यांना अग्नी टिकवतो वगैरे वगैरे. पाणी उकळवल्यामुळे त्यातले रोगजंतू मरतात हे शास्त्रीय कारण मी शाळेत शिकलो होतो. पाण्याला रूम टेंपरेचरपासून बॉइलिंग पॉइंटपर्यंत तापवतांना दिलेली ऊर्जा ते थंड होईपर्यंत वातावरणात निघून गेलेली असते हे सुद्धा नंतर समजले. अग्नीच्या 'संस्कारा'मधून पाण्याला यापेक्षा जास्त काही मिळत असेल असे मला तरी वाटत नाही. अॅक्वागार्डमध्ये अत्यंत सूक्ष्म छिद्गांचे गाळणे असते. पाण्यात न विरघळलेला सगळा गाळ त्यामध्ये असलेल्या काही सूक्ष्म जीवजंतूंसकट त्या फिल्टरमध्ये अडकून राहतो आणि स्वच्छ पाणी बाहेर निघते. त्यानंतर अल्ट्राव्हायोलेट किरणांचा उपयोग करून त्या पाण्याला निर्जंतुक करण्यात येते. उकळल्यामुळे केलेले पाण्याचे निर्जंतुकीकरण जास्त परिणामकारक होते, पण त्यासाठी जास्त खटाटोप करावा लागतो आणि इंधन जाळावे लागते. याचा विचार करता रोजच्या उपयोगासाठी ते सोयीस्कर वाटत नाही, त्या मानाने वॉटर फिल्टर खूप सोयिस्कर असतो आणि अगदी पूर्णपणे नसले तरी ब-याच चांगल्या प्रमाणात रोगजंतूंपासून संरक्षण देतो. काही विशिष्ट रुग्णांसाठी अत्यावश्यक असेल तेंव्हा मात्र त्यांना उकळलेले पाणीच दिले जाते. पण "आयुर्वेदाच्या काळात अॅक्वागार्ड नव्हते म्हणून ते सदोष, काही कामाचे नाही" असे त्या तज्ज्ञ विदुषींच्या तोंडून ऐकल्यामुळे तिचे विचार किंवा माहिती किती संकुचित होती हे लक्षात आले आणि मला आयुर्वेदाबद्दल वाटत असणारा आदर मात्र थोडा कमी झाला.

संस्कार या शब्दाचा सोपा अर्थ "चांगला बदल" असा करता येईल. नीतीमत्ता, प्रामाणिकपणा, विनम्रपणा यासारखे चांगले गुण मुलांच्या मनात रुजावेत आणि त्यांनी सुस्वभावी सज्जन बनावे असा चांगला बदल त्यांच्यावर केल्या जाणा-या संस्कारांमध्ये अपेक्षित असतो. पोरवयातल्या अल्लडपणाला थोडी मुरड घालून विद्याध्ययनाची सुरुवात करून देण्यासाठी मौंजीबंधन हा संस्कार केला जातो. अजाण बालकात चांगला बदल करून त्याला ज्ञानमार्गावरला विद्यार्थी करायचे असते. मुंजीच्या वेळी त्यासाठी त्या मुलाने काही प्रतिज्ञा करायच्या असतात. तसेच गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी आणि संसार सुखी व्हावा या उद्देशाने काही शिस्त पाळावी यासाठी त्या वर आणि वधूने विवाहसंस्कारात काही वचने द्यायची असतात. या दोन्ही धार्मिक विधींमध्ये होम आवश्यक असतो. यातल्या प्रतिज्ञा आणि वचने अग्नीच्या साक्षीने उच्चारायची असतात. यात अग्नि म्हणजे नुसता जाळ किंवा ऊष्णता नसते, तर तो ईश्वराचे दृष्य आणि परिणामकारक असे रूप असतो. अग्नीसाक्ष केलेली प्रतिज्ञा आणि दिलेले वचन पाळणे बंधनकारक आहे आणि त्याचे पालन न केल्यास देवाची फसवणूक केल्यासारखे आहे, असा धाक त्यातून घातला गेला तर त्याचे पालन अधिक चांगल्या प्रकारे होईल अशी कल्पना होती. यात प्रत्यक्ष अग्नीचा त्या बटूवर किंवा वधूवरांवर कसलाच परिणाम किंवा संस्कार होत नाही. तो फक्त साक्षीला असतो. पुढे या संस्कारांचे कितपत निष्ठेने पालन केले जाते हे आपण पहातोच आहोत आणि ते न करणा-याला जाब विचारायला अग्निनारायण कधीच पुढे येत नाही.

कडाक्याच्या थंडीत घेतलेली शेकोटीची ऊब सोडली तर माणूस अग्नीपासून दूर राहून तिची धग टाळतच असतो. पण निर्जीव वस्तू किंवा पदार्थावर त्याचे होणारे परिणाम पाहून त्यांचा उपयोग करून घेत असतो. बर्फाला आंच दिली तर त्याचे पाण्यात रूपांतर होते आणि पाणी उकळून त्याची वाफ होते. त्या वाफेला बंदिस्त जागेत कोंडले असेल तर ती थंड झाल्यावर तिचे पुन्हा पाणी होते आणि त्याला गोठवले तर बर्फ तयार होतो. अशा प्रकारचे बदल परिवर्तनीय असतात. तांदूळ शिजवल्यावर त्याचा भात होतो पण भाताला थंड करून पुन्हा तांदूळ तयार होत नाहीत. हा अपरिवर्तनीय बदल आहे. याला आपण अग्नीचा तांदळावर झालेला संस्कार म्हणू शकू. पोलादासारख्या काही धातूंना गरम करून वेगाने थंड केल्याने त्यांचे गुणधर्म बदलतात. पण अग्नीच्या संस्कारामुळे अग्नीचे गुण भातात किंवा पोलादात उतरले असे म्हणणे हास्यास्पद आहे. कोणतीही तापवलेली वस्तू ऊष्ण असतांना तिला स्पर्श केल्यास चटका बसेलच, या अर्थाने अग्नीचा एक गुण त्या वस्तूमध्ये तात्पुरता येतो. आग विझल्यानंतर ती आग रहातच नाही, पण ती तापवलेली वस्तू थंड झाल्यावर शिल्लक राहते. तापवल्यामुळे तिच्यात झालेला बदल परिवर्तनीय असल्यास ती वस्तू थंड होताच मूळ रूपात परत येते आणि ते बदल अपरिवर्तनीय असतील तर एक नवी वस्तू जन्माला येते.

मनुष्याच्या जीवनातला शेवटचा संस्कार हिंदू धर्मानुसार अग्निसंस्कार किंवा दाहसंस्कार असतो. यात त्याचे निर्जीव शरीर नष्ट होऊन पंचत्वात विलीन झाल्यामुळे त्यातून बाहेर पडलेल्या आत्म्याला त्याची ओढ शिल्लक रहात नाही आणि तो मागे वळून न पाहता पुढच्या मार्गाला लागतो असे समजले जाते. मुळात आत्मा अस्तित्वात असतो की नाही आणि तो असलाच तर त्याचे पुढे काय होते किंवा होत नाही याची खात्री करायला काहीच मार्ग नाही.

मन Mon, 06/01/2014 - 17:34

पटलं , आवडलं.
अरुण जोशी ह्यांनी ह्या सदृशच्याच काही चर्चांत वेगळेच तर्क मांडलेले दिसतात.
ह्या लेखातील विचारावर त्यांची भूमिका लेखकापेक्षा वेगळी असेल असे वाटते.

अजो१२३ Mon, 06/01/2014 - 18:39

अग्निमुळे पाण्याचे कंपोझिशन बदलते. जिवंत जीवजंतूंच्या जागी त्यांचे मृतदेह उरतात. बरेच गॅसेस बाहेर जातात आणि नंतर शोषले जाणारे वायू वेगळ्या प्रमाणात असतात. क्षारांवरही प्रक्रिया होते. पाण्याची मात्रा बदलते.

इतर पदार्थांत (धातूंत) किती पटकन थंड केले त्याप्रमाणे त्यांची अणूरचना बदलते.

आर ओ चे डायरेक्ट पाणी पिता येत नाही. त्यात मिनरल्स मिसळतात म्हणून त्याला मिनरल वाटर म्हणतात. शुद्ध ऑस्मॉसिस केलेले पाणी सगळी मूलद्रव्ये ड्रेन करते.

बाकी निसर्गातले शुद्ध पाणी तसेच पिले तर चालते, त्याला गरम करण्याची वा गाळण्याची गरज नाही. २२ लाख वर्षे तेच पाणी मनुष्य पीत आला आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 07/01/2014 - 01:16

In reply to by अजो१२३

अग्निमुळे पाण्याचे कंपोझिशन बदलते.

काय बदल होतो?

(म्हणे मायक्रोवेव्हजमुळेही पाण्याची रचना बदलते. कशी ते कोणी सांगत नाही.)

मन Wed, 08/01/2014 - 09:29

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मला समजलेली अरुण जोशी व आयुर्वेदाचे पाइक म्हणवून घेणार्‍या काही लोकांची भूमिका :-
पाण्याचे कॉम्पोझिशन बदलते म्हणजे ते फक्त H2O बद्दल बोलत नाहियेत.
पाणी + पाण्यासोबत आलेले घटकद्रव्य्,मूलद्रव्य वगैरे अशा एकत्रित "पॅकेज"ला ते "पाणी" म्हणत आहेत.
व्यवहारात ढोबळ्मानाने पब्लिक असेच बोलते.
तर ह्या पाणी नावाच्या "पॅकेज"चे कॉम्पोझिशन बदलत आहे असे त्यांना म्हणायचे आहे; असा माझा अंदाज आहे.
उदा:- त्यातील उपयुक्तता h2o इतकीच राहणे. त्यातील नैसर्गिकदृष्ट्या मिळणारे मिनरल्स गायब होणं ;
किंवा त्यामुळे थोड्याफार प्रमानात आपोआप जी रोगप्रतिकारक्षमता बनण्यास मदत होते, ती मदत थांबणे/कमी होणे.
.
.
अर्थात ह्यालाही आनंद घारे ह्यांनी सरळ उत्तर दिलेलं आहेच. "१०० टक्के शुद्ध असे सहसा काहीच असत नाही."

अजो१२३ Wed, 08/01/2014 - 10:55

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

चला तुम्ही वेड पांघरून पेडगावला निघत असाल तर मी ही तुमच्यासोबत निघतो.

तशी ही ही रचना बदलत असणार.
१. उष्ण्तेने पाण्याची वाफ होणे
२. हायड्रोजेन पेरॉक्साईड बनणे
३. प्लाझमा अवस्था येणे
४. हायड्रोजन, ऑक्सिजन, एच्२ओ२ बनणे, ०३ बनणे
५. आण्विक विघटन

अजो१२३ Wed, 08/01/2014 - 12:07

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पाणी = H2O. हे देखिल अर्धसत्य. त्यातच काही रेणू D20 आणि T2O चे असतात. And their physical properties are different.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 08/01/2014 - 20:24

In reply to by अजो१२३

ड्यूटेरियम आणि ट्रीटियम ही हायड्रोजनची समस्थानिकं आहेत. पिरीअॉडीक टेबल (आवर्त सारणी?) मधे या दोन्हींना हायड्रोजनच समजलं जातं, ही वेगळी मूलद्रव्यं नाहीत. त्यांचे रासायनिक गुणधर्म हायड्रोजनपेक्षा निराळे नाहीत. पाणी हे एक संयुग आहे आणि त्या संयुगावर काय रासायनिक परिणाम होतात याची इथे चर्चा सुरू आहे. (D2O आणि T2O यांना मराठीत जड पाणी म्हणतात. हे जड पाणी, बहुदा T2O, अणूभट्ट्यांमधे वापरतात. त्याचे भौतिक गुणधर्म निराळे असतात म्हणून. पण पाण्याचे भौतिक गुणधर्म हा या चर्चेचा विषय नाही.)

पाण्याची वाफ होते तरीही पाणी H2O असंच रहातं. (बर्फाचंही तेच.) उष्णतेने पाण्याचा प्लाझ्मा कोणाच्या घरात होत असेल असं वाटत नाही. एवढी उष्णता आणि दाब घरात कोणी तयार करत असतील अशी शंका मला तरी येत नाही. (फक्त उष्णतेने पाण्याचा प्लाझ्मा होणार नाही, त्यासाठी वातावरणात असतो त्यापेक्षा बराच जास्त दाब, pressure, पाण्यावर लावावा लागेल.) पाण्याचं तापमान वाढवून हायड्रोजन पेरॉक्साईड बनत नाही. ते बनवण्यासाठी काय प्रक्रिया वापरतात ते विकीपीडीयावर सापडेल. (हा दुवा) अॉक्सिजनचा ओझोन बनवण्यासाठीही उष्णता उपयोगाची नाही. वातावरणात अतिनील किरणांमुळे अॉक्सिजनचा ओझोन बनतो. आणि उष्णतेने कोणत्याही अणूचं विघटन होत नाही हे अणूविज्ञानातलं अगदी मूलभूत तत्त्व आहे. (झालंच तर आण्विक विघटन होताना उष्णता बाहेर पडते. ती वापरून वीज बनवतात.)

"वेड्याचं सोंग" वगैरे खवचट भाषा वापरायला हरकत नाही, पण निदान त्याआधी अभ्यास वाढवा. नाहीतर हॅ हॅ हॅ ...

---

पाण्याचे कॉम्पोझिशन बदलते म्हणजे ते फक्त H2O बद्दल बोलत नाहियेत.
पाणी + पाण्यासोबत आलेले घटकद्रव्य्,मूलद्रव्य वगैरे अशा एकत्रित "पॅकेज"ला ते "पाणी" म्हणत आहेत.

अशा वेगळ्या (पाण्याच्या) व्याख्या वापरायच्या असतील तर त्या आधी सांगायला हरकत नाही. पण पुढच्या प्रतिसादातले प्रश्न पहाता ती शंकाही खरी वाटत नाही. एक पे रहना, घोडा बोलो नहीं तो चतुर बोलो. तसं नसेल तर मग नक्की व्याख्या काय म्हणायचं आहे हे ही समजेनासं होतं.

अजो१२३ Wed, 08/01/2014 - 21:28

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अदितीजी, विषय पिण्याचे पाणी आहे. एच्२ओ हा रेणू नाही हे सांगायची गरजच नाही. समोरचे लोक मूर्ख असतात समजून आणि त्यांनाच ज्ञान वाढवायची गरज आहे असा ठाम समज असला कि असे होते.

शिवाय मी उष्णतेने जे काही होते ते लिहिले आहे ते 'फक्त उष्णतेने' होते असे लिहिले आहे का? उगाच? बाकी आपण लिहिले आहे ते सामान्य ज्ञान आहे, त्यासाठी विशेष ज्ञान वाढवायची गरज नाही.

पिण्याचे पाणी नुसते धातूच्या (वा इतरही) भांड्यात ठेवले तर त्याचे रेणू फूटतात. आयन बनतात. अगदी विद्युतप्रभार देखिल तयार होतो. मग तुम्ही आमच्या पाणी शब्दाचा असा रेणू अर्थ काढला तर आम्हीही तुमच्या एच्२ओ चा काहीही अर्थ काढू शकतो.

मी नुसते कंपोझिशन बदलते म्हणालो तेव्हा सुज्ञपणे समजून घ्यायचे ना मला काय म्हणायचेय ते. तुम्हाला पाण्याचे पूर्ण रसायनशास्त्र माहित आणि आम्ही काहीही म्हणतो असाच अर्थ घेऊन लिहिलेत म्हणून आम्हीही पेडगावला जाऊन आलो.

शिवाय इथे ज्ञान वाढवायची गरज स्पष्टपणे तुम्हाला दिसत आहे.
१. आण्विक प्रक्रिया (एच२ ची) चालू करण्यासाठी प्रचंड उर्जा लागते. ती self sustaining ठेवण्यासाठीही खूप उर्जा लागते.
२. अतिनील किरणे पडणे म्हणजे गरम होणे, थंड नव्हे.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 09/01/2014 - 00:33

In reply to by अजो१२३

गरम होणं म्हणजे अणू/रेणू पातळीवर नक्की काय होतं, ऊर्जावहनाचे वेगवेगळे प्रकार, आण्विक प्रक्रियांचे प्रकार किती, त्या नक्की काय, कशा घडतात याबद्दल मला लिहायला किंवा कोणी लिहीलं तर वाचायला आवडेल.

बाकीचं मला न झेपणाऱ्या मितीत जातंय. मी थांबते.

---

पुरवणी -
उष्णता या विषयावर थोडं बहुत खरडलेलं आहे. ज्यांना हौस आहे त्यांनी वाचावं.
मी लिहीलेल्या लेखांमधे हा एक लेख सापडला. यात सूर्यासारख्या ताऱ्यांच्या पोटात हायड्रोजनचा हेलियम कसा बनतो, हे खरडलेलं आहे. थोडक्यातच ऊर्जावहनाचे प्रकारही दिलेले आहेत.

Nile Wed, 08/01/2014 - 09:43

In reply to by अजो१२३

अग्निमुळे पाण्याचे कंपोझिशन बदलते. जिवंत जीवजंतूंच्या जागी त्यांचे मृतदेह उरतात. बरेच गॅसेस बाहेर जातात आणि नंतर शोषले जाणारे वायू वेगळ्या प्रमाणात असतात. क्षारांवरही प्रक्रिया होते. पाण्याची मात्रा बदलते

च्या ऐवजी

इनोमुळे (पोटातल्या) पाण्याचे कंपोझिशन बदलते. जिवंत जीवजंतूंच्या जागी त्यांचे मृतदेह उरतात. बरेच गॅसेस बाहेर जातात आणि नंतर शोषले जाणारे वायू वेगळ्या प्रमाणात असतात. क्षारांवरही प्रक्रिया होते. (पोटातल्या) पाण्याची मात्रा बदलते.

------------
१. तुमच्या आवडीचे कोणतेही पाचक चालेल.
२. पोटातल्या अब्जावधींपैकी कित्येक जीवजंतू सारखे मरत असतीलच की. शिवाय पीहेच्च इकडंतिकडं झाला म्हणून (जसं 'आपल्यात' खाण्यात काहीतरी इकडंतिकडं झालं म्हणून लोकांचा जातो तसा) जीव जाणारेही जीवजंतू वगैरे असतीलच (शेवटी माणसाच्याच पोटातले ते.)
३. तुम्ही कोठे राहता यावर कोणते वायू शोषले जातात हे अवलंबून आहे. पुण्यात बहुतेक करून कार्बन डाय अन मोनोऑक्साईडच शोषले जाते. किरकोळ ऑक्सिजन या दोहोंसोबत जात असावा.
४. अहो, लोकांचे कशाने पोट दुखेल ते सांगता येत नाही, मात्रा तो किस खेत की मु(ऊऊ)ली.
५. मुलिंना विनम्र अभिवादन करून माझे दोन शब्द संपवतो.

अजो१२३ Wed, 08/01/2014 - 12:04

In reply to by ऋषिकेश

आपण ज्याला पिण्याचे पाणी म्हणतो ते सहसा १००% शुद्ध पाणी नसते. अगदी hydrocloric acid म्हणतो वा सोने म्हणतो तेव्हादेखिल १००% शुद्धता अपेक्षित नसते. If we want to say so, we say 100% concentrated HCL or 24 caret gold. आपण एका द्रावणालाच तसे म्हणत असतो. तिथे पाण्याची काय कथा? पाणी उकळून थंड केल्यावर त्याची चव बदललेली असते. त्यात क्षार असतात ते संहत होतात. त्यातला गोडवा (ज्याकशाने असेल) तो कमी होतो.
कंपोझिशन शब्दाचा अर्थ रेणूचे कंपोझिशन इतकाच घेणारांची किव करावी नाही तर काय? भाषेपेक्षा अकलेला मर्यादा फार!!!

राजेश घासकडवी Tue, 07/01/2014 - 00:50

छान लेख. 'अग्निसंस्कार' अशी काहीतरी जादूई संज्ञा तयार केली की प्रत्यक्ष परिणाम काय साधायचा आहे हे महत्त्वाचं राहत नाही. मग जंतू नष्ट होतात की नाही यापेक्षा तो विशिष्ट संस्कार झाला आहे की नाही यावर भर येतो. साध्यापेक्षा साधन अधिक महत्त्वाचं ठरतं. सत्याकडे जाण्याचे अनेक मार्ग असतात, पण 'माझाच मार्ग केवळ खरा' अशी हटवादी भूमिका येते.

निनाद Tue, 07/01/2014 - 06:56

वॉटर फिल्टरची गाळणी सदैव स्वच्छ करत राहणे आवश्यक असते. अन्यथा त्यातच घाण अडकून नवीन जंतू पैदास केंद्रे तयार होतात/होऊ शकतात. किमान २० मिनिटे उकळलेले पाणी पिणे त्यातल्या त्यात बरे असावे.

ऋषिकेश Tue, 07/01/2014 - 09:36

नेमका लेख! आवडलाच.
त्याच बरोबर घारेसरांचे लेखन बर्‍याच दिवसांनी वाचायला मिळाले हा आनंददायक भाग आहेच!

आनंद घारे Tue, 07/01/2014 - 10:53

उकळलेले पाणी सर्वात जास्त खात्रीलायकपणे निर्जंतुक असतेच, पण सरसकट सर्वांसाठी ते व्यवहार्य वाटत नाही. शिवाय जन्मभर फक्त उकळलेले पाणीच पीत राहिल्यास रोगप्रतिकारकशक्ती कमी होण्याची शक्यता असते. घराबाहेर जिथे जाल तिथे ते पाणी सोबत न्यावे लागते. मला तरी कोणत्याही हॉटेलात बॉइल्ड वॉटर ठेवलेले दिसले नाही. फिल्टर्ड वॉटर किंवा मिनरल वॉटर मिळते.
साध्या फिल्टरमधली सिरॅमिक गाळणी स्वच्छ करणे फारसे कठीण किंवा कष्टाचे काम नसते. अॅक्वागार्डमधली गाळणी त्या कंपनीचा माणूस येऊन स्वच्छ करून जातो. तेवढे पुरेसे असते.
अग्निमुळे पाण्याचे कसले कंपोझिशन बदलते? त्यात विरघळलेल्या क्षार किंवा वायूंचा समावेश केमिकल कॉंपोजिशनमध्ये होत नाही. त्यांचे प्रमाण अत्यल्प असते आणि त्यांची गणना इम्प्यूरिटीजमध्ये केली जाते.
इतर फिल्टर्समध्ये पाण्यात न विरघळलेले घन पदार्थ गाळले जातात, विरघळलेली अशुद्ध द्रव्ये पाण्यामध्येच राहतात. रिव्हर्स ऑस्मासिस (आरओ) या क्रियेत पाण्यात विरघळलेले क्षारसुद्धा बाहेर काढले जातात. त्यामुळे ते अधिक शुद्ध होते. ते पिता येत नाही असे कोणी सांगितले? आज अरब देशात समुद्राच्या खा-या पाण्यापासून आरओ ने शुद्ध केलेले पाणी पिण्यासाठी वापरतात. भारतातसुद्धा अनेक लोकांच्या घरात आरओ फिल्टर्स बसवलेले आहेत. त्यातून निघालेले पाणी मी प्यालो आहे.
पाण्यात विरघळलेले सगळेच क्षार आपल्या शरीराला आवश्यक असतात असेही नाही आणि सगळे चांगलेच असतात असेसुद्धा नाही. अनेक ठिकाणच्या विहिरींमधले क्षारयुक्त पाणी पिववत नाहूी. त्या ठिकाणी राहणारे लोक म्युनिसीपालिटीकडून मिळणारे नदीचे मर्यादित पाणी पिण्यासाठी भरून ठेवतात आणि विहिरीचे किंवा बोअरवेलचे पाणी आंघोळ आणि धुण्यासाठी वापरतात असे मी पाहिले आहे..
बावीस लाख वर्षे माणूस निसर्गातले पाणी पीत आला आहे, याबरोबरच पटकी आणि काविळीसारख्या रोगांना तो बळी पडतही आला आहे. हिमालयातल्या काही ठिकाणचे नैसर्गिक पाणी अत्यंत शुद्ध तसेच उपयुक्त अशा क्षारांनी युक्त असते पण त्याचा आपल्याला काय उपयोग आहे? वाढती वस्ती, बदलती राहणी, साबण आणि सदृष्य रसायनांचा वाढता वापर, कारखान्यांमधून निघणारे सांडपाणी इत्यादि अनेक कारणांमुळे नद्यांमध्ये होत असलेले वाढते प्रदूषण ही आजची वस्तुस्थिती आहे. मुंबईपुण्यासारख्या मोठ्या शहरांमधल्या महानगरपालिका ते पाणी शुद्धीकरण केंद्रामध्ये गाळून आणि क्लोरिनसारख्या जंतुनाशकाचा उपयोग करून निर्जंतुक करून त्याचा पुरवठा करतात. आज समाजातले बहुसंख्य लोक नळाचे पाणी निर्धास्तपणे पितात आणि त्यांना सहसा काही अपाय होतही नाही. पण त्या पाण्याच्या चांचणीमध्ये सापडलेली अनिष्ट द्रव्ये किंवा रोगजंतू यांचे प्रमाण मर्यादेहून अधिक असल्याचे रिपोर्ट्स अधून मधून येत असतात. यामुळे मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय लोकांना जास्त खात्रीलायक पाणी प्यावे असे वाटते, तसेच त्यांना परवडते म्हणून ते फिल्टर बसवून घेतात. रुग्णांना आवश्यक असल्यास गाळून आणि उकळलेले पाणी देतात.

अजो१२३ Tue, 07/01/2014 - 11:18

In reply to by आनंद घारे

या प्रतिसादातली सर्व माहिती योग्य आहे सिवाय के

अग्निमुळे पाण्याचे कसले कंपोझिशन बदलते? त्यात विरघळलेल्या क्षार किंवा वायूंचा समावेश केमिकल कॉंपोजिशनमध्ये होत नाही

तसं तांत्रिक दृष्ट्या हे ही बरोबर आहे. कारण पाणी म्हणजे १००% शुद्ध पाणी असा शब्दप्रयोग करता येतो. पण हे ॑००% शुद्ध पाणी मिनरल युक्त पाण्यापेक्षा हिन दर्जाचे असते, पिण्यासाठी.

मन Tue, 07/01/2014 - 11:22

In reply to by अजो१२३

तात्विक चर्चा दोन मिनिटांपुरती बाजूला ठेवूयात का?
उपलब्ध परिस्थितीत नियमित घरगुती वापरासाठी काय करावे असा आपला सल्ला आहे?
एक्-दोन दिवसापूर्वी मीच विचारणा केली होती. माझ्यासाठी हा महत्वाचा प्रश्न आहे.
आमच्याकडे सध्या बोअरवेलचे* पाणी येते मनपाच्या पाण्यात मिसळून.
आता मी नेमके काय करावे?

*बोअरवेलला "हापसा" म्हणता येइल का?

ऋषिकेश Tue, 07/01/2014 - 12:53

In reply to by मन

पाण्याचे पीएच तपासा आणि मग योग्य तो फिल्टर घ्या.
कोणत्याही कंपनीच्या एजंटाला बोलवा त्यांछ्याकडे पोर्टेबल पीएच मीटर अस्तओच. फुक्टात चेक करून मिळेल.
फुकटात पीएच समजल्यावर त्याला कटवा आणि स्वतः दुकानांत जाऊन जो उत्तम डील देईल त्याच्याकडून तो फिल्टर खरेदी करा. :)

आनंद घारे Tue, 07/01/2014 - 17:41

In reply to by मन

यात तीन प्रकारच्या समस्या असू शकतात.
१.क्षार - पीएचमीटरने ते पाणी आम्ल आहे की अल्कली आहे हे समजेल, पण त्यावरून नेमका निर्णय घेणे (सायन्स शिकले नसल्यास) जमेल की नाही सांगता येणार नाही. पाणी क्षारयुक्त असेल तर आरओ उपयोगी आहे. त्यामुळे काही उपयुक्त क्षारसुद्धा वगळले जातील, ते पालेभाज्या आणि फळे वगैरेंमधून मिळवता येतील.
२. रोगजंतू - विजेवर चालणा-या फिल्टरमध्ये अल्ट्राव्हायोलेट किरणांनी ते मारले जातात. आजकाल विजेच्या भारनियमनाचे प्रमाण कमी झाले असल्याने तो प्रॉब्लेम येत नाही. तरीसुद्धा दिवसभरासाठी पाणी भरून ठेवलेले चांगले असते.
३.गाळ - जमीनीखाली खोलवर बोअर केले असल्यास त्या पाण्यात माती मिसळलेली असल्याची शक्यता कमी असते. पण पाण्यात गढूळपणा असल्यास फिल्टर कार्ट्रिज किंवा सेमिपर्मिएबल मेम्ब्रेन लवकर चोक होऊ शकते.

अग्नि आणि संस्कार या विषयापासून थोडे दूर जात आहोत, पण हरकत नाही. पाणी उकळवून पिणे हा अल्टिमेट उपाय आहेच.

ऋषिकेश Wed, 08/01/2014 - 09:47

In reply to by आनंद घारे

पीएचमीटरने ते पाणी आम्ल आहे की अल्कली आहे हे समजेल, पण त्यावरून नेमका निर्णय घेणे (सायन्स शिकले नसल्यास) जमेल की नाही सांगता येणार नाही. पाणी क्षारयुक्त असेल तर आरओ उपयोगी आहे. त्यामुळे काही उपयुक्त क्षारसुद्धा वगळले जातील, ते पालेभाज्या आणि फळे वगैरेंमधून मिळवता येतील.

खरे आहे. स्वतः सायन्सचा विद्यार्थी असल्याने हे अनेकदा अध्याहृत ठरते.

माझ्या आठवणीतून जमेल ती माहिती देतो:
अतिशुद्ध पाण्याचा पीएच ७ असतो. ७ हून खालील पीएच द्रवाची/वस्तुची 'अ‍ॅसिडिटी" दर्शवतो. अर्थात सदर वस्तु अॅसिडीक असते. उदा. दूध ६.५ किंवा ताक ६, तर सल्फ्युरिक आम्ल्सांसारखी तीव्र आम्लांचा पीएच २ असतो. आपल्या कारमधील बॅटरीचा १ असतो बहुदा (चुभेदेघे). त्याउलट ७ च्या वरील पीएच व्हॅल्यु अल्कलायनिटी दर्शवते. उदा. सोडा ९च्या आसपास तर बाथरूम/टॉयलेट्स ब्लीच १३ च्या आसपास असतात.

पिण्यासाठी शुद्धपाणी अर्थात पीएच ७ सहज मिळतच नाही. त्यात काहीतरी मूलद्रव्ये असतातच. किंचीत अल्कलाईन पाणी (७ ते ८ च्या मधील) पिण्याकरिता योग्य समजले जाते. आपल्या बोअरिंगच्या पाण्यात क्षार असतात. जर ते खूप प्रमाणात असले तर पीएच व्हॅल्यू ७च्या खाली जाते. अश्यावेळी RO फिल्टर्स उपयुक्त ठरतात.

आमच्या सोसायटीत बोअरिंगचेच पाणी ६ पॉईंट काहितरी आहे. त्यामुळॅ त्यात कॉर्पोरेशनचे पाणी मिसळल्यावर पीएच वॅल्यू आपोआप ७च्या वर जाते. त्यामुळे आरओ फिल्टरची गरज पडत नाही. मात्र गाळ, जंतु वगैरेसाठी उत्तम गाळणी असणारा व UV लाईटवाला फिल्टर प्रीकॉशन असावी म्हणून वापरतो. (पावसाळ्यात हमखास उपयोग होतो)

आनंद घारे Tue, 07/01/2014 - 17:53

In reply to by अजो१२३

असे सहसा काहीच असत नाही. सगळ्या केमिकल अॅनॅलिसिसच्या रिपोर्ट्समध्ये (कॉम्पोझिशनमध्ये) मुख्य घटकच मोजले जातात. उदाहरणार्थ नायट्रोजन, ऑक्सीजन, कार्बन डायॉक्साइड आणि पाण्याची वाफ हेच हवेतले घटक धरले जातात. आर्गॉन, हिलियम, निऑन, झेनॉन असल्या ट्रेस एलेमेंट्सची गणना होत नाही. पॉवर स्टेशनमध्ये वाफ बनवण्यासाठी वापरलेले पाणी अत्यंत शुद्ध असावे लागते, शिवाय वारंवार त्याची वाफ होऊन पुन्हा द्रवरूप होतांना ते डिस्टिल होत असते. तरीसुद्धा त्याचे पृथःकरण केल्यास त्यात काही पीपीएम (पार्ट्स पर मिलियन) इम्प्यूरिटीज येतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवावे लागते.

वामन देशमुख Wed, 08/01/2014 - 16:43

In reply to by अजो१२३

"पण हे ॑००% शुद्ध पाणी मिनरल युक्त पाण्यापेक्षा हिन दर्जाचे असते, पिण्यासाठी"

हे थोडं उकलून सांगता का?

अजो१२३ Wed, 08/01/2014 - 16:59

In reply to by वामन देशमुख

comparison of distilled water and mineral water for drinking असे थोडेसे गुगला.

मूलतः अतिशुद्ध पाणी शरीरातली सारी कामाचीही द्रव्ये घेऊन उत्सर्जित होते (अन्यथा होऊ शकत नाही)म्हणून मिनरल पाण्यावाल्या कंपन्या मिनरल मिसळून पाणी देतात वैगेरे वैगेरे.

प्रभाकर नानावटी Tue, 07/01/2014 - 11:45

>>> मनुष्याच्या जीवनातला शेवटचा संस्कार हिंदू धर्मानुसार अग्निसंस्कार किंवा दाहसंस्कार असतो. यात त्याचे निर्जीव शरीर नष्ट होऊन पंचत्वात विलीन झाल्यामुळे त्यातून बाहेर पडलेल्या आत्म्याला त्याची ओढ शिल्लक रहात नाही आणि तो मागे वळून न पाहता पुढच्या मार्गाला लागतो असे समजले जाते. मुळात आत्मा अस्तित्वात असतो की नाही आणि तो असलाच तर त्याचे पुढे काय होते किंवा होत नाही याची खात्री करायला काहीच मार्ग नाही.

थोडेसे (गमतीशीर) अवांतर...

अतृप्त आत्म्यास कमी पडणारे पुण्य त्याला कुठल्या माध्यमाद्वारे पोहोचविता येईल ह्यावर प्राचीन ऋषी - मुनींनी वर्षानुवर्षे केलेल्या अथक संशोधनाचे फलित म्हणजेच अंत्यसंस्कारादि अंत्यविधी.....!

सर्व शास्त्रशुद्ध विधिसहित योग्य प्रकारे मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जाणे अत्यंत आवश्यक आहे. कारण तो मृतदेह आत्म्याचे त्या जन्माचे घर असतो व साहजिकच आत्म्याशी संलग्न भावना देहाशी निगडित असतात. देहाला जमिनीत पुरून त्या भावनांतून आत्म्यास सोडविणे शक्य नसते. पुन्हा पुन्हा आत्मा त्या देहाकडे आकर्षित होऊन मुक्तीच्या मार्गातून ढळू शकतो. आणि अंतिम ध्येयापासून वंचित राहतो. ह्याकरिता देहाचे पूर्ण ज्वलन करून तो संपूर्ण नष्ट करण्यासाठी अंत्यसंस्कारात देहाला अग्नी दिला जातो. शिवाय परमेश्वराने दिलेल्या देहाचे हवन करून तो त्यास समर्पित करण्याचा भाव त्यामागे आहे. व्यक्तिच्या देहाचा हा होम साहजिकच त्यास ईश्वरारकडे नेऊ शकतो कारण शास्त्रान्वये ईश्वरापर्यंत वस्तू पोहोचविण्याचे अग्नी हे माध्यम आहे. त्याखेरीज ईश्वरी शक्तीच्या विरुद्ध कार्य करणार्‍या असुरी शक्ती अग्नीला घाबरतात आणि म्हणूनच त्या मृतदेहाचा पर्यायाने त्या आत्म्याचा ताबा घेण्यास अशा शक्ती धजावत नाहीत.

काही महाभाग मृतदेहास अग्नी न देता विद्युतदाहिनीत जाळतात. ते शास्त्रान्वये पूर्णत: अयोग्य असून असे कदापि करू नये. लाकडात सुप्त शक्ती असल्याने लाकडाला धार्मिक महत्व आहे. ...चंदनाचे लाकूड पवित्र तर असतेच पण चंदनाची शीतलता आत्म्यास उद्विग्नता येऊ न देता शांत व विरक्त मार्ग दर्शवून मोक्षाकडे नेते. अग्नीसंस्कारात म्हणून लाकडाचा अग्नी असावा हेच खरे!

तरी बरे, घारे सरानी टीव्ही चॅनेलवर सदा झळकत असलेल्या अजून एका आयुर्वेदाचार्यांचे (असंबद्ध!) विश्लेषण ऐकले नाही. ;;)