'मॉसिअं व्हेर्दू' Monsieur Verdoux), १९४७ - बिनभटक्याची चॅप्लिन फिल्म
'मॉसिअं व्हेर्दू' (Monsieur Verdoux)ही आहे एका चलाख आणि तितक्याच प्रांजळ, खरंतर निष्कपट गुन्हेगाराची गोष्ट. कुणी म्हणेल,'निष्कपट गुन्हेगार' ह्या शब्दांच्या कॉम्बिनेशन मधे भलताच घोळ आहे! - हो, पण मी तरी त्या व्यक्तिमत्त्वात तेच कॉम्बिनेशन अनुभवलं.
अर्थिक मंदीमुळे बँक कॅशिअर, तसंच एक प्रेमळ पती व पिता म्हणून सामान्य आयुष्य जगत असलेला आँरी व्हेर्दू (चार्ली चॅप्लिन) झटक्यात बेरोजगार होतो आणि त्यानंतर स्वतःहूनच आपल्या आयुष्यला थरारक वळण देतो. फ्रांसच्या विविध भागांतील श्रीमंत स्त्रियांशी लग्न करणे, त्यांची संपत्ती लुबाडणे आणि वेळ येताच त्यांचा खातमा करणे असे सत्र तो चालू ठेवतो. तसं करताना आपल्या त्रिकोणी कुटुंबाशी प्रतारणा करत नाही. फिरतीवर असणारा नवरा कष्ट करून मंदीच्या भयावह परिस्थितीतही आपल्याला सुखात ठेवतोय हे पाहून त्याच्या (खऱ्या) बायकोला भरून येत असतं.
परंतु आँरी पकडला जातो व त्याला शिरच्छेदाची शिक्षा सुनावली जाते. आपले विचार स्पष्टपणे मांडून अतिशय शांतचित्ताने तो शिक्षेला सामोरा जातो...वरवर पहाता इतकीच गोष्ट!
ज्यांनी हा सिनेमा अद्याप पहिला नसेल त्यांनी 'कथा कळल्यामुळे आपला रसभंग झाला' असं वाटून घेण्याची गरज नाही - हे चार्लीच्या कोणत्याही चित्रपटाला लागू होतं. कथांचा जीव ऐकताना इवलासा वाटतो, त्या अतिसामान्य वाटतात. पण लेखन, दिग्दर्शन, संगीत आणि अभिनयातून तो ज्याप्रकारे कथाविश्व साकारतो ते पाहून विस्मय वाटतो.
चार्लीने ज्या चित्रपटांमध्ये 'भटक्या' (tramp) वठवला नाही त्यापैकी 'मॉसिअं व्हेर्दू' हा एक चित्रपट. त्याच्या कलाकृतींमध्ये गरीब-श्रीमंतांमधील मनोवौचारिक, भावनिक तुलनेला आवर्जून महत्त्व दिलेलं असतं, ते या चित्रपटात क्वचितच तरळून जातं. हास्य-कल्लोळातून पुढे सरकत (खेळीमेळीची मारामारी, पाठलाग, चकवे इ.) वेदनेला हळूहळू पाझरू दयायचं असा चार्लीच्या चित्रपटांचा साधारण रागरंग असतो, मात्र ह्या चित्रपटाला गांभीर्याची किनार थोsडी जास्त आहे म्हणून तो वेगळा वाटला.
बोलपट असूनही चार्लीच्या स्टाइलनुसार मूकाभिनय, तदानुरुप भावमुद्रा हा चित्रपटाचा गाभा आहे. दैवाचे (-त्याला काहीही म्हणा) अनपेक्षित धक्के, चटके, कुठलीही अंतरिम दिशा नसलेल्या जीवनसंघर्षाचं प्रत्ययकारी चित्रण अन्य चार्लीपटांप्रमाणे याही फिल्ममधे आहेच.
पण अंशतः थरारपट असूनही प्रत्यक्ष जीवघेणी झटापट, खुनाचं दृश्य, गुन्हेगाराच्या चेहऱ्यावर ते थंड, क्रूर हास्य, असली तऱ्हा 'मॉसिअं व्हेर्दू'त नाही. तद्दन पाचकळ, हिंसक तरीही दृश्यं चार्लीच्या कृतींत नसतातच. आँरी व्हेर्दूची भूमिका अर्थातच सराईत खुन्याबाबतच्या प्रचलित कल्पनांना छेद देते. ती प्रत्यक्ष पाहणेच उत्तम.
येनकेनप्रकारे हिरोचा विजय होऊन शेवट गोड होत नाही, हीरोला त्याचं शल्यही नाही. आपण लोकांना लुबाडलं, खून केले, आपलं चुकलं हे त्याला मान्य आहे. आँरी व्हेर्दू हा एके काळी नेकीने पैसे कमावणारा, परंतु समाजिक उलथा-पालथींमधे भरडला गेलेला माणूस आहे. समाजाचं, सामाजिक व्यव्स्थांचं अत्यंत दुटप्पी, स्वार्थी व तत्त्वविसंगत असणं ही त्याची वेदना आहे. आरोपीच्या पिंजऱ्यात उभा असताना तो विचारतो, 'मी अनेकांचे खून केले, पण विध्वंसक शस्त्रांची निर्मिती करून तुम्ही काय वेगळं करताय?'
आपण निर्दोष आहोत हे सिद्ध करण्याचा आँरीचा मुळी उद्देश नाहीच, आपल्याला शिक्षा ठोठावणारेसुद्धा या न त्यारितीने 'अपराधी' आहेत इतकंच म्हणतो तो.
रिवाजाप्रमाणे गिलोटिनवर चढवण्यापूर्वी एक पाद्री त्याला भेटायला येतो. म्हणतो: "I've come to ask you to make peace with God." ह्यावर आँरीचं उत्तर असतं: "I am at peace with God. My conflict is with Man."
चित्रपटासाठी YouTube लिंक: http://www.youtube.com/watch?v=ElnWZ_j3KDQ
भाषा: इंग्रजी
अवधी: १२४ मिनिटे
दिग्दर्शन, संगीत, पटकथा (-ऑरसन वेल्सच्या कल्पनेवर आधारित), निर्मिती व मुख्य भूमिका: चार्ली चॅप्लिन
चार्लीचे ट्रँप नसलेले चित्रपट
'मिसिऊ व्हेर्देउ' बरोबरच 'लाइमलाईट', 'अ किंग इन न्यू यॉर्क', 'अ काउंटेस फ्रॉंम हाँगकाँग' अशा सिनेमांची नावे घेता येतील. 'द ग्रेट डिक्टेटर' नंतर त्याने ट्रँप वठवणं सोडून दिलं असं म्हणतात.
'लाइमलाईट' YouTube वर पहा: http://www.youtube.com/watch?v=QxF4X-LDsgs
थोडक्यात, मार्मिक ओळख. चार्ली
थोडक्यात, मार्मिक ओळख. चार्ली चॅप्लिनचे ट्रॅंप नसलेले सिनेमे बघितलेले नाहीत. जे पाहिले तेही लहानपणी. नुकताच गोल्ड रश पुन्हा पाहिला. कारुण्य आणि विनोद किती सहजपणे तो मिसळतो हे लहानपणी लक्षात आलं नव्हतं. चार्ली आणि त्याचा मित्र एका बर्फाळ प्रदेशातल्या घरात अन्नाशिवाय अनेक दिवस अडकलेले असतात. त्यावेळी त्याच्या मित्राला चार्ली म्हणजे एक कोंबडी वाटते. जीएंच्या एका कथेत 'समोरचा माणूस दिसेदिसेपर्यंत त्याच्या मांसात तुमचे दात मनोमन रुतत नाहीत तोपर्यंत तुम्हाला खरी भूक लागलेली नाही' असं काहीसं वाक्य आहे. चार्ली तेच भयंकर गंमत करून सांगतो.
तुम्ही म्हणालात '…कारुण्य
तुम्ही म्हणालात '…कारुण्य आणि विनोद किती सहजपणे तो मिसळतो हे लहानपणी लक्षात आलं नव्हतं.' …कदाचित तुमच्या ते लक्षात आलंही असेल, कुणी सांगावं? - आपण माणसं भाषेच्या ज्ञानावरून एखादया व्यक्तीच्या जाणीवा किती परिपक्व आहेत हे ठरवतो ना. त्यामुळे लहान मुलं कायमच भावनिकदृष्टया 'अपरिपक्व' ठरतात. चार्लीने भाषेचं हेच बंधन झुगारून मुक्त अभिव्यक्ती करण्याचा प्रयत्न केला होता. अल्बर्ट आईनस्टाईन एकदा कौतुकाने त्याला म्हणालादेखील: "तू आणि तुझ्या सिनेमातील पात्रं एकही शब्द बोलत नाहीत तरी लोकांना तुला जे म्हणायचंय ते सारं कळतं, म्हणूनच ते तुला डोक्यावर घेतात!" (त्यावर चार्ली तितक्याच कौतुकाने आईनस्टाईनला म्हणाला, "तू जे म्हणतोस ते लोकांना समजलं नाही तरी ते तुला डोक्यावर घेतात!")
खुसपट
'मिसिऊ व्हेर्देउ' की 'मंस्यू व्हेर्दू'?
जाणकारांनी खुलासा करावा.
अतिअवांतर: पुण्यात प्रभात रोडवर कुठेशीक एक बंगला आहे. बहुधा त्याच्या मालकांना, काय ते नेहमीसारखे टिपिकल पुणेरी 'श्रमसाफल्य'-छापाचे नाव बंगल्याला द्यायचे, म्हणून 'जरा काहीतरी वेगळे' नाव द्यायची उपरती झाली असावी, म्हणून 'जरा काहीतरी वेगळे'च्या नावाखाली फ्रेंच नाव दिले, काय तर म्हणे 'मों आमूर' (mon amour, 'माझे प्रेम' वगैरे). ठीक आहे, हरकत नाही, चांगलेच आहे वगैरे वगैरे. पण जरा ते रोमनमध्ये लिहिले असते तर काही बिघडले असते? पण नाही! नको तेथे देवनागरीत लिहिण्याचा अट्टाहास. त्यालाही हरकत नाही. पण देवनागरीत कसे लिहावे माणसाने? 'मॉ-ना-मू-र'!
(रोमनमध्ये लिहिले असते, तर सहज खपून गेले असते, नि कोणाला पत्ताही लागला नसता. कोणास ठाऊक, कदाचित लोक 'वा-वा छान-छान'ही म्हणाले असते. अर्थात, देवनागरीत लिहूनही पुण्यात फारसा कोणाला पत्ता लागला नसावाच म्हणा. तर ते एक असो.)
उच्चारणाबद्दल
हा प्रश्न कुणीतरी उपस्थित करेल असं वाटलं होतं. :) मला फ्रेंच भाषेच्या उच्चारशासस्त्राचं ज्ञान नाही. (जर्मन भाषेचं बऱ्यापैकी आहे.) म्हणूनच लेख लिहिण्यापूर्वी इंटरनेटवर 'Monsieur Verdoux' च्या उच्चारणासाठी काळजीपूर्वक सर्च केला. फ्रेंच भाषेच्या बोली तसेच अधिकृत वापरात 'Monsieur' चा उच्चार विविधप्रकारे होतो पण ती सर्व उच्चारणे 'मिस्यू / मिसिऊ' जवळ जाणारीच असतात. 'Verdoux' चं देखील तसंच आहे. 'व्हेर्देउ / व्हेर्द्यू ' - दोन्हीपैकी काहीही चालतं.
आणि 'अतिअवांतर' ह्या शीर्षकाखाली लिहिलेल्या मजकूराबद्दल मी म्हणेन की विविध लिप्या व भाषांमधले शब्द अनुवादित न करता दुसऱ्या लिपीत लिप्यंतरित करणे ही एक कला, एक शास्त्र, एक कौशल्य आणि रंजक खेळ आहे. त्यात वावगं वाटण्यासारखं ते काय? अर्थात उच्चारांच्याबाबीत 'योग्य-अयोग्य'चा विचार व्हायला हवा असं म्हणायला जागा आहे. धन्यवाद.
खूप छान लिहीले आहे. ऐसीवर
खूप छान लिहीले आहे. ऐसीवर आपले स्वागत आहे.
स्वतःशी अत्यंत प्रामाणिक अशा कुटुंबवत्सल चोराची कथा वाटते.