रशियन साहित्य व संस्कृतीचा आरंभ : 'प्राथमिक शाळेचा वृत्तान्त' आणि राजपुत्र व्लादिमिर

ऍलिस चुडोलिखित 'ऍन्ड क्वाएट फ्लोझ द वॉड्का, ऑर व्हेन पुश्किन कम्ज टु शोव' ह्या पुस्तकातील “बिगिनिंग्ज - द प्रायमरी स्कूल क्रॉनिकल ऍन्ड प्रिन्स व्लादिमिर” ह्या पहिल्या प्रकरणाचा स्वैर अनुवाद

रशियन साहित्याचा सर्वात प्राचीन उपलब्ध नमुना आहे एक खापरीचा तुकडा. त्यावर "मस्टर्ड" हा शब्द लिहिलेला आहे. रशियन साहित्याची सुरुवात प्रभावशाली नव्हती असे म्हणणार्‍यांना हे खोटे पाडते. मस्टर्डोव, क्युमिन, पेप्परिन, व सॉल्टिकोव-शेड्रिन ह्यांच्या महान, “मसालेदार" कादंबर्‍यांचा उगम ह्यातून झाला. मध्ययुगात फेनु द ग्रीकच्या धर्मशास्त्राची प्रेरणासुद्धा हीच.
ह्या मस्टर्ड प्रकारापासून रशियन लिखाणाची वर्गवारी मसाल्यानुसार केली जाते. नामवंत स्लॅविक तज्ज्ञ वि. वि. वायनोपियानोव ह्यांच्या मते रशियन व्याजोक्ति पेप्पर युगाच्या सुरुवातीस उदयास आली, तर धर्मशास्त्र गार्लिकियाहून आयात केले गेले. “माती" व "शेण" असे ज्यावर लिहिले होते त्या मडक्यांमधून वास्तववाद जन्माला आला, आणि ज्यावर "वॉड्का" असे लिहिले होते त्यातून ह्या परंपरेतील सर्वात शक्तिमान चळवळ, मद्यवाद, उपजली.
होमरची निषेधाज्ञा शिरसावंद्य मानून रशियन साहित्य मध्य युगासोबत मधूनच सुरू झाले. त्यामुळे ते कायम आपल्या उगमाच्या शोधात राहिले आहे. "प्राथमिक शाळेचा वृत्तान्त" हे रशियन साहित्याच्या अगदी सुरुवातीच्या काळातील पुस्तकांपैकी एक. (“माध्यमिक शाळेचा वृत्तान्त" हा त्याचा पुढला भाग महा विरेचनात हरवला.)
आपल्या देशात नॉर्मन नावाचे परदेशी प्रथम येऊन वसले असे रशियन विद्यार्थी प्राथमिक शाळेत शिकतात. त्या परदेशियांचे आडनाव मात्र गुलदस्त्यात राहिले. एकच एक नाव धारण करण्याचा नॉर्मनांना लवकरच कंटाळा आला, व म्हणून रशियाच्या भावी राजपुत्रांची व राजकन्यांची नावे ऑल्गा, ऑलेग, आणि लेगो झाली. पण ही नावे बिनचूक लिहिणे परदेशियांना खूपच सोपे होते. तेव्हा, राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव राजपुत्र लवकरच स्वत:ला स्वियाटोपोल्क, वासिली, आणि व्लादिमिर म्हणवू लागले. 'एकमेव व्लादिमिर' ह्या नावाने ओळखला जाणार्‍या पहिल्या व्लादिमिराला आपल्या प्रजेची असंस्कृतता, अज्ञान, पाशवी वृत्ती, व मदिरासक्तता जाणवली. (ह्यालाच नंतरच्या काळातील अभ्यासकांनी रशियाचे सुवर्णयुग म्हटले आहे.) आपल्या प्रजाजनांना धर्माची आत्यंतिक निकड आहे असे त्याने ठरवले.
जगाच्या बाजारात त्याला ज्युडाइझ्म, इस्लाम, ख्रिस्ती धर्माचे दोन प्रकार - डेमोक्रॅटिक रिपब्लिक (पूर्व), व फेडरल रिपब्लिक (पश्चिम), इत्यादी स्पर्धक सापडले. हे सर्व नोंदवून ठेवताना मुसलमानांचा उल्लेख पाखंडी, घाण, आणि डुकरे असा करणारा, व ज्यूंवर इतका मेहेरबान नसल्यामुळे त्यांना बुर्जुआ म्हणणारा निष्पक्ष बखरकार सिलवेस्टर द कोलोफॉन हा तेव्हापासून रशियन सचोटी व सहिष्णुतेचा आदर्श ठरला आहे.
व्लादिमिरने सर्व प्रतिस्पर्धी धर्मांच्या प्रतिनिधींना आपल्या दरबारात पाचारण केले. मात्र, तिथून सगळ्यात जवळचे स्वच्छतागृह यास्नाया पोल्यानाला आहे हे त्यांना सांगितले नाही. त्यांच्याकडील परकीय चलनाच्या बदल्यात अधिकृत सरकारी दराने रुबल्स घ्यायला त्यांना भाग पाडले. परिणामी, जे पैसे त्यांना दोन वर्षे सहज पुरले असते ते ढेकुणभरल्या यात्री निवासातील एका रात्रीच्या वास्तव्यास जेमतेम पुरले. अशा प्रकारे व्लादिमिरने त्यांच्या धर्मशास्त्रचर्चांना कात्री लावली.
ज्यूंना त्याने गंमत म्हणूनच बोलावले असल्याने ते सर्वप्रथम जायला निघाले. त्यांनी त्याला सांगितले की एकमेव खर्‍या देवाचा आदेश होता की त्याच्या भक्तांनी इतरांशी मिसळू नये, व कायम दु:ख सोसत राहावे. व्लादिमिरच्या लक्षात आले की त्याच्या गोतावळ्यात झिडोव व ज्यूविन ह्या टोपण नावांखाली वावरणारे अनेक ज्यू आहेत. त्यांच्याकडील पैसे अधिकृत दराने बदलून घेण्यास भाग पाडून मग त्याने त्यांना रशियातून हाकलून लावले. फेडरल रिपब्लिक ख्रितींनी त्याच्या ह्या धार्मिक कार्याची स्तुती केली. मग, एका घोर पापासाठी एक सरदारकी ह्या नेहमीच्या दराच्या अर्ध्या दरात त्याला कम्यूनिअन देण्याची लालूच दाखवून त्यांनी ऍनन्सिएशन, एग्झिक्रेशन, व इवॅपोरेशनची तत्त्वे त्याला समजावून सांगितली. हेही सांगितले की त्याने आपले सारे महाल पोपच्या स्वाधीन केल्यास त्याचा आत्मा पापमुक्त होईल. बखरकार लिहितो की धर्मशास्त्रावरील हे भाषण ऐकून व्लादिमिर म्हणाला, “अतिशहाणेच आहेत हे फ्रॅन्क्स ", व त्यांना सीमेवर नेऊन तोफेतून उडवले (निरोप देण्याची ही पारंपरिक रशियन पद्धत आहे).
मुसलमानांना वाटले आता आपले काम फत्ते झाले. त्यांनी व्लादिमिरला परलोकातील ख्रिस्ती तंतुवाद्ये वगैरे विसरून जायला सांगितले, कारण मुसलमानी स्वर्गात त्याला अख्खा दिवस लोळत राहायला मिळेल. सुंदर स्त्रिया त्याला द्राक्षे भरवतील, व द्राक्षे त्याला सुंदर स्त्रिया पुरवतील. अभ्यवेक्षित लेखक त्याला स्तुतिपर कवने ऐकवतील, आणि तो अनेक काव्यगायनाच्या कार्यक्रमांचा तसेच अनेक सेवकांचा उपभोग घेऊ शकेल. व्लादिमिरला हे सर्व ऐकून छान वाटले, पण त्याने स्वर्गातील वॉड्काविषयी विचारले तेव्हा तिथे दारूबंदी असल्याचे मुसलमनांना कबूल करावे लागले. त्याक्षणी व्लादिमिरने रशिअन साहित्यातील सर्वात प्रसिद्ध वाक्य उच्चारले, “कोणताही रशियन मदिरेवाचून जगू शकत नाही, कारण मदिरा ही रशियन लोकांचे आनंदनिधान आहे.” शुद्धीत राहण्याचे नुसते सुचवल्याबद्दल मुसलमान दूतांना त्यांचे उर्वरीत आयुष्य रशियात घालवण्याची शिक्षा सुनावण्यात आली. पूर्वापार ही सर्वात क्रूर शिक्षा समजली जात असे. उदाहरणार्थ, एका अतिशय जुन्या रशियन लोककथेत एका तरुणाला अनेक साहसांनंतर बक्षीस म्हणून एक जादूची टोपी दिली जाते. ती घातली की माणूस अदृश्य होत असे. ती टोपी घालून तो सीमेवरील शिपायांना चकवून सीमापार पळून जातो. आणखी एका धार्मिक कथेत दोन भाऊ अनेक ज्यूंना मारल्याबद्दल झारकडून बक्षीस मिळवतात. एक साता समुद्रापलीकडे, जिथे "झुरळं दौडत नाहीत" असा ठिकाणी जातो, तर दुसरा रशियातच राहतो, आणि मूर्ख ख्रिस्ती म्हणून ओळखला जातो.
अशा प्रकारे, इतर पर्यायांच्या अभावी, व्लादिमिरने डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ बायझॅन्टियम निवडली आणि आपल्या प्रजेला नदीत उडी मारायला सांगितले. ह्या निर्णयाचे परिणाम जीवघेणे ठरले.

**********************************************************************

१: महा विरेचनाची 'महानतर विरेचना'शी अथवा ''त्याहूनही महानतर विरेचना'शी गल्लत घालू नये.
२: सिलवेस्टर द कोप्राफाइलशी ह्याची गल्लत घालू नये.
३: अनुवादकाची नोंद: यास्नाया पोल्याना मॉस्कोपासून २०० किलोमिटरहून अधिक दूर आहे.
४: ह्या घटनेवरील जॉन डॉनची "द कॅननाय्झेशन" कविता पहा.
५: बखरकाराच्या म्हणण्यानुसार ह्या "रशियनांच्या बाप्तिस्म्या"दरम्यान ४९ माणसे बुडून मेली. ह्यात पॉलिकार्प (पूर्वाश्रमीचा मोनोकार्प) नावाच्या भिक्षूने जाणूनबुजून पाण्याखाली धरून बुडवून मारलेले दोन पापीही आहेत.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

मस्तच.
जेवढा समजला तेवढा गंमतीशीर वाटला.
"तोफेतून उडवणे ही निरोपाची पद्धत" किंवा "रशियातच रहायला लागणे हीच शिक्षा" हे भारीच.
ह्यातून बिकांच्या "माझं खोबार " मधील अरबी ज्योक आठवला.
person1:-arabia is the second best place on earth.
person2:-which is the best place then?
person1:- rest of the world!! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

विनोदी लेखन समजून घ्यावे लागेल असे वाटले नव्हते.. पण पहिल्या पेक्षा दुसर्‍या वाचनात मजा अधिक येतेय! Smile
मस्त.. असेच काही येत राहु दे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लिखाण मस्त आवडले. खुसखुशीत शैली अन संदर्भांचा वापर आवडला. "फेनु द ग्रीक" हे प्रचंड आवडले.

(एकोणिसाव्या शतकातले रशियन ब्याकग्रौंड आवडणारा) ब्रूसान वेनोव्स्की ऊर्फ बॅटमॅन फ्रॉम सेंट गॉथमबर्ग.

अवांतरः यास्नाया पॉल्याना म्हणजे टॉलस्टॉयचे जन्मस्थान तेच ना ते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सुरुवात वाचली थोडीशी. काही झेपल नाही Sad
परत सावकाश वाचायचा प्रयत्न करेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेष्टॅच्या सुरात इतिहास आणि संस्क्रुतीमधील काही गोष्टींबद्दल लिहिलय.
"दगडांच्याच देशा" नावाच कणेकरांच्या लेखाचा काही भाग ह्याच धर्तीवर होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मलाही कळले नाही. Sad परत वाचेन म्हणते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फारच खोडसाड पद्धतीने लिहिले आहे इतके कळले. अगदी अ‍ॅना करेनिना वाचलेलं असूनही काही कळलं नाही म्हणजे आमच्यासारख्यानी स्वतःची पात्रता कळवून घ्यावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अ‍ॅना करेनिना अंमळ कमी वाचणेबल आहे अन मूड डार्कच आहे. ते वाचत गेलो वाचत गेलो पण वॉर अँड पीससारखं भव्यदिव्य कधी वाटलं नाही. त्याचे पुनर्वाचन कधी करेन असं वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खुसखुशीत लेखन. मराठीत या पद्धतीच्या लेखनाच्या जवळात जवळ येणारं म्हणजे पुलंचं 'मराठी वाङमयाचा गाळीव इतिहास'

शुद्धीत राहण्याचे नुसते सुचवल्याबद्दल मुसलमान दूतांना त्यांचे उर्वरीत आयुष्य रशियात घालवण्याची शिक्षा सुनावण्यात आली.

वगैरेसारखी वाक्यं भारीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झकास.

मूळ कथा भारी असणार आणि अनुवादही जमला आहे. "'एकमेव व्लादिमिर' ह्या नावाने ओळखला जाणार्‍या पहिल्या व्लादिमिराला ..." हे मस्तच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.