Skip to main content

गुरुर्बह्मा आणि संशोधनक्षेत्रातील निगरगट्टपणा

आपल्याकडे आपल्या पुर्वजांनी गुरुचं माहात्म्य सांगताना कसल्याही मर्यादा पाळलेल्या नाहीत त्यामुळे गुरु हा प्रकार सोकावलेला असुन त्याची फळं आपल्याला भोगावी लागत आहेत. अगदी पुर्वापारपासुन कुणी आपल्या आवडत्या शिष्यापेक्षा दुसरा पुढे जाऊ नये म्हणुन अंगठा कापुन घेतं, तर कुणी मुलाला जास्त विद्या मिळावी म्हणुन कपट करतं. गुरुची झोपमोड होऊ नये म्हणुन शिष्याने भुंग्याला आपली मांडी पोखरु दिली तर त्याला काय फळ मिळाले? विद्या वापरायच्या ऐनवेळी विसरशील हा गुरुचा शाप. आणि अशा गुरुंच्या नावे गळे काढणारी, त्यांच्या नावाने पारितोषिके देणारी मंडळी नंतर अवतरली. अध्यात्मात आणि कला क्षेत्रात तर गुरुचं नाव घेतल्यावर कान चिमटीत जाणे आणि सद्गदीत होणे हे नेहेमीचेच. कुणी गाणं शिकायला गुरुकडे पाणी भरलं, लाकडं फोडली आणि या कथा कौतुकाने सांगितल्या गेल्या. किंबहुना त्याचमुळे अभ्यास आणि शिक्षण ही अत्यंत कष्टाने, परिश्रमाने साध्य होणारी बाब आहे असे सर्वसामान्यांच्या मनी बिंबले. मात्र हे कष्ट आणि परिश्रम हे अभ्यासावर घ्यावे लागत नसुन गुरुचा बेजबाबदार लहरीपणा सांभाळण्यासाठी घ्यावे लागतात हे संशोधन क्षेत्रात गेल्याशिवाय कुणाला फारसं कळण्याची शक्यता नाही.

सामाजिक शास्त्रे या विषयात हा त्रास वेगळ्या प्रकारचा असतो. विज्ञान विषयात कमीत कमी दोन अधिक दोन चार असं जर शिष्याने म्हटलं तर मनात नसलं तरी गुरुला होकार हा द्यावाच लागतो. मात्र सामाजिक शास्त्राची गोष्ट तशी नाही. इथे मार्क्सचे चाहते आणि विरोधी यांच्यात जुंपलेली असते. त्यामुळे तुमच्या कुठल्याही विधानाला गुरुकडे प्रत्युत्तर असतेच आणि त्याला आवश्यक असा सर्वे देखिल असतो त्यामुळे “चित भी मेरी पट भी मेरा” असा प्रकार असतो. यामुळे होतं काय की साधं सिनॉप्सीस दाखल करायचं झाल्यास गुरुकडे घालाव्या लागण्यार्‍या हेलपाट्यांना कसलाच घरबंध नसतो. गुरु वाटेल तितका वे़ळ शिष्याला छळु शकतो. त्यानंतर अठरा ड्राफ्टनंतर गाईडने सिनॉप्सीस मान्य केला वगैरे गोष्टी फुशारकीने सांगितल्या जातात, आणि काही महामुर्ख शिष्यांना यातदेखिल अभिमान वाटतो.

विभागातले वातावरण राजकारणाने बुजबुजलेले असते. त्यात ज्याच्याकडे जास्त विद्यार्थी त्याची तंगडी वर असा प्रकार असल्याने चांगल्या विद्यार्थ्यांना कळपात ओढण्याचे प्रकार सुरु असतात. गावाकडुन आलेल्या हुशार परंतु इंग्रजीत कमकुवत असलेल्या विद्यार्थ्याचे हाल कुत्रादेखिल खात नाही. नवीन नियमाप्रमाणे अनेक चाचण्यांमधुन पार पड्ण्याचे दिव्य करावे लागते. त्यात मुलाखत नावाचा अत्यंन हिन दर्जाचा प्रकार असतो. तेथुन रडत परत जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या हकिकती ऐकु येतात. पुढे कोर्सवर्क नावाचा प्रकार सुरु होणार असतो. तो सुरु झाल्यास विद्यार्थ्याने स्वतःला नशिबवान समजावे. कारण हे सहा महिने सक्तीचे असतात. ते सुरु न झाल्यास तुमचा बराच वेळ वाया जाण्याची शक्यता असते. प्राध्यापक मंडळींना स्वतःच्या राजकारणातुन, पुस्तके लिहिण्यातुन, देशोदेशी सेमिनारमध्ये हिंडण्यातुन फुरसत मिळाली तर ते आपला वेळ शिकवण्यास देतात. त्यातुन कोर्स वर्क साठी वेळ काढणे म्हणजे फारच झाले. त्यामुळे जास्त पीएचडी विद्यार्थी जमल्यास वर्ग सुरु करु असा बनिया प्रकार सुरु होतो ज्यात विद्यार्थ्यांचा बराच वेळ, कदाचित एक वर्ष देखिल वाया जातं.

विद्यार्थ्याने स्वत:ला आवडेल तो विषय निवडावा म्हणजे त्याचा संशोधन करण्यातला रस शेवटपर्यंत टिकेल असा प्रेमळ सल्ला गुरुमाऊली देते मात्र विषयाची चर्चा करायला गेल्यावर आपले राहिलेले, अडगळीत पडलेले, प्रोजेक्ट चालु असलेले संशोधन विद्यार्थ्याच्या माथी मारण्याचा भरपुर खटाटोप केला जातो आणि बहुतेक विद्यार्थी त्याला बळी पडतात. कठीण संशोधनात पडुन उगीच डोक्याला ताप करण्यापेक्षा “बिकट वाट वहिवाट नसावी” हे सूत्र कसोशीने पाळले जाते. काही शिष्योत्तम मात्र सोपा विषय निवडण्याच्या मागेच असतात हे देखिल नमुद करायला हवं. हे उभयपक्षी बरे असते.

बर्‍याच गाईडसचा विशिष्ठ तत्वज्ञानाकडे कल असतो. काहींचे, खरं सांगायचं तर सर्वांचे छुपे अजेंडा असतात. दलित विषयाला वाहुन घेतलेले गाईडस तो विषय, विशिष्ठ जाती यांचे हित सांभाळण्यात गुंतलेले दिसुन येतात आणि विद्यार्थ्यांकडुनही तीच अपेक्षा ठेवतात. मार्क्सीस्ट गाईडना तर मार्क्सवर टिका केली कि कुंकु पुसल्याइतकं दु:खं होतं. फेमिनिस्ट प्राध्यापकांची वेगळी चुल असते. तेथे फर्ड्या इंग्रजीचे महत्व जास्त दिसुन येते. फेमिनिझम आणि डायसपोरा याकडे जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या पेहराव, राहणीमान आणि भाषा यात वेगळेपणा जाणवतो. उच्च वर्णिय किंवा त्याकडे कल असलेल्या प्राध्यापकांची दलित विषयावर ठराविक मते असतात. त्यामुळे काही एक वेगळा विषय घेऊन काम करण्याची इच्छा असणार्‍या विद्यार्थ्यांची कुचंबणा होते. मग काही चलाख विद्यार्थी निघतात. त्यांना अभ्यासात रस नसतो पण पीएचडीत असतो. ते प्राध्यापकांच्या ओल्यापार्ट्यांना बाटल्या आणण्यापासुन ते अगदी गाड्यांची सर्विसिंग करण्यापर्यंत सेवा पुरवणं सुरु करतात. ही मंडळी खुप पुढे जातात, परदेशी दौरे काय मग सर्वच वाटा सुलभ होऊ लागतात.

गाईडचा कडकपणा हा विकृत वाटावा या थराला गेल्याची देखिल उदाहरणे आहेत. खाजगीत झालेल्या गोष्टींचा राग गरीब विद्यार्थ्यांवर काढणे तर नेहेमीचेच. काहीएक उद्देशाने उच्चशिक्षणाकडे वळणार्‍यांना बाहेर चारचौघांना ऐकु जाईल इतक्या जोरात अंगावर खेकसुन ओरडण्यात आपण काही गैर करत आहोत हे या वयाने वाढलेल्या गुरुमाऊलींच्या गावीही नसते. यात अत्यंत दुर्दैवाची गोष्ट ही की हे सर्व रास्त आहे. संशोधन ही अशीच कठीण बाब असते, हे सर्व सहन करावेच लागते असे मानणारी एक षंढ पिढी जन्माला आली आहे. त्यामुळे याबाबत कुठे काहीही बोलता येत नाही. मला माझ्या जेष्ठ स्नेह्यानेअनुभवी आणि प्रेमळ सल्ला दिला होता. तो म्हणाला” तुला पीएचडी करायचंय? मग जर तुझा गाईड म्हणाला अरे माझी पँट फाटलीय. तर तत्काळ सुईदोरा घेऊन, आत्ता शिवुन देतो साहेब असं तु म्ह्णु शकलास तरच तुला पीएचडी करता येईल”.

अर्थात याला सन्माननीय अपवाद आहेतच. विद्यार्थ्याला चहा बनवुन देणारे, त्याच्या पायाची जखम स्वतः औषध लावुन बांधुन देणारे, इंग्रजी न आल्यास त्याला मदत करणारे, स्वतःच्या संगणकावर विद्यार्थ्याचे सिनॉप्सीस डीझाईन करणारे, संशोधनाच्या दरम्यान अडचण आल्यास विद्यार्थ्याला सर्व प्रकारची मदत करणारे, वैयक्तीक बाबीत सल्ला देण्याइतकी जवळीक साधणारे, थोडक्यात प्रेमळ पित्याची भुमिका निभवणारे देखिल गाईड सुदैवाने पाहायला मिळाले आहेत. पुलंचे चितळे मास्तर हे मला पुलंच्या बटाट्याच्या चाळीइतकेच अपवादात्मक वाटतात. मात्र पुलंचेच एक विधान संशोधन क्षेत्रात बरेचदा चपखल लागु पडते. गुरुबीन कौन बतावे वाट्…गुरुशिवाय कोण वाट लावणार????

अतुल ठाकुर

प्रकाश घाटपांडे Wed, 18/12/2013 - 19:02

मस्त अतुलजी.
हल्ली अध्यात्मातील गुरु मंडळी म्हणल की अंगावर काटा येतो. समस्त बाबा बुवा गुरु महाराज मंडळींची प्रतिमा या आसारामबापुनी अगदी धुळीस मिळवली. या निमिताने मला यनावालांचा गुरुविण कोण लावतो वाट? हा मिष्किल लेख आठवला.

............सा… Wed, 18/12/2013 - 19:39

मला पी एच डी चा अनुभव नाही परंतु हे गुरु-शिष्य प्रकरणं जीवनात खरच फार मोठी भूमिका निभावतं हे अन्य लोकांच्या नीरीक्षणातून माहीत आहे. सुदैवाने नवर्‍याला उत्तम गाईड भेटले. पण अ‍ॅट रॉक एन्ड ऑफ पेशन्स, निसटता निसटता भेट होणं आणि आमचं भारतात परतणं टळणं हाही एक चमत्कारच आहे. पण त्याचं अतिशय संतुलीत मत आहे त्याच्या गाईड च्या कलाने त्याने जितकं घेतलं तितकच त्याच्या गाईडने त्याच्या कलाने घेतलं. काही दिवस खडतर गेले तर काही केकवॉक होते.

अर्थात प्रत्येकाचा अनुभव निराळा असतो.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 18/12/2013 - 21:18

लेख अजिबात आवडला नाही.

काहीतरी सिद्धांत मांडला आहे, पण त्याला पुरावे नाहीत, पूरक विदा नाही, त्यामागे काय कारणं असतील याचा विचार नाही, आणि हे सगळं वाचून लोकांनी नक्की काय करावं, उदा: घाऊकमधे प्राध्यापक, विद्यार्थी मंडळींचा तिरस्कार, असा काही ठोस निष्कर्षही नाही. मुळात लेख लिहीण्यामागचा उद्देशच समजला नाही. संशोधन क्षेत्रावर टीका करताना किमान शिस्त असेल अशी अपेक्षा होती, ती ही पूर्ण होत नाही. ललित लिखाणात हे चालून जाईल, पण या लिखाणला ललित म्हणवत नाही.

अशा प्रकारची टीका करणारा, 'फ्लॉप शो'चा एक भाग मला अजूनही आवडतो.

राजेश घासकडवी Thu, 19/12/2013 - 03:56

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

काहीतरी सिद्धांत मांडला आहे, पण त्याला पुरावे नाहीत, पूरक विदा नाही, त्यामागे काय कारणं असतील याचा विचार नाही,

पूरक विदा मागण्याची भावना समजू शकतो. मात्र काही वेळा मांडलेले विचार हे सिद्धांत नसून एक कैफियत असते. त्यात 'मला जे दिसलं आहे ते असं आहे' ही भूमिका असते. ते एक निरीक्षण असतं. 'मला वस्तू खाली पडताना दिसतात' हे निरीक्षण झालं. न्यूटनने मांडलेल्या गुरुत्वाकर्षणाचं विवेचन, त्याने मांडलेले नियम वगैरे म्हणजे सिद्धांत. सिद्धांतावर सर्व निरीक्षणांना सामावून घेण्याच्या जशा जबाबदाऱ्या असतात तशा निरीक्षणांवर नसतात.

समाजशास्त्र आणि भौतिकी-अधिष्ठित शास्त्रं यांमधल्या फरकांकडे लेखकानेच निर्देश केलेला आहे. समाजशास्त्रातले सिद्धांत दुर्दैवाने गणिती भाषेत मांडता येतातच असं नाही. त्यामुळे लेखकाने केलेलं सामाजिक निरीक्षण अनेक वेळा वेगवेगळ्या निरीक्षकांकडून आलं तर त्यातून भारतीय शिक्षणव्यवस्थेबद्दल काही तपासण्याजोगेे सिद्धांत मांडता येतील.

शिवाय इथे निरीक्षणांमधले काही तपशील गाळलेले दिसतात, आणि ते अपरिहार्य आहे. ज्या समाजव्यवस्थेचे आपण भाग असतो, त्याबद्दल फार तपशीलात जाऊन तक्रार करणं धोकादायक ठरू शकतं. याही मुद्द्यावरून माझी सहानुभूती लेखकाकडे आहे.

सन्जोप राव Thu, 19/12/2013 - 07:06

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रतिसाद अजिबात आवडला नाही.
कुणीतरी काहीतरी सिद्धांत मांडला आहे- एकतर यात काही 'सिद्धांत' वगैरे आहे असे मला तरी वाटत नाही- तो त्याचा वैयक्तिक अनुभव- विचार आहे हे जाणून न घेता त्यावर 'पुरावे नाहीत, पूरक विदा नाही, त्यामागे काय कारणं असतील याचा विचार नाही' असे आरोप करणे पटले नाही. आणि हे सगळं वाचून लोकांनी नक्की काय करावं, उदा: घाऊकमधे प्राध्यापक, विद्यार्थी मंडळींचा तिरस्कार, असा काही ठोस निष्कर्षही नाही ही अपेक्षाही पटली नाही. एकतर हे वाक्यही नीटसे कळाले नाही. ( 'घाऊकमधे प्राध्यापक, विद्यार्थी मंडळींचा तिरस्कार' करावा असा निष्कर्ष काढणे अपेक्षित आहे काय?) 'पुण्यातली वाहतूक व्यवस्था फारच कोसळली आहे' अशी कैफियत मांडणार्‍याने ट्रॅफिक सुधारणेचा आराखडाही प्रस्तुत करावा अशी अपेक्षा करण्यासारखे हे आहे. मुळात लेख लिहीण्यामागचा उद्देशच समजला नाही -हां, हे समजण्यासारखे आहे. भारतात-महाराष्ट्रात- गेल्या तीन-चार वर्षांत पी.एच.डी. करणे हे किती गुंतागुंतीचे, किचकट झाले आहे, त्यातून मूळ सकस ज्ञानवृद्धी हा उद्देश कसा बाजूला पडतो आहे, 'चांगला' गाईड मिळणे हाच यशस्वी संशोधनाचा कणा कसा बनला आहे - हे सगळ्यांना ठाऊक असणे शक्य नाही- तसे अपेक्षितही नाही. त्यामुळे फारफारतर लेखाला 'मास अपील नाही' असे म्हणता येईल. त्यामुळे 'मुळात लेख लिहीण्यामागचा उद्देशच समजला नाही' याऐवजी 'मुळात लेख लिहीण्यामागचा उद्देशच मला समजला नाही' असे म्हटले असते तर बरे झाले असते. संशोधन क्षेत्रावर टीका करताना किमान शिस्त असेल अशी अपेक्षा होती, ती ही पूर्ण होत नाही हा अरोप तर अनाकलनीय अहे. लेखक त्याचे संशोधन शिस्तीने करत असेलही. सदर कैफियत ही कुठेतरी वेदना होत असल्यामुळे केलेली आहे. कुणीतरी 'आई, ग!' म्हणून ओरडताना त्याला 'तुझा 'सा' जरा पातळ लागतोय हां!' असे सांगण्यासारखे हे आहे. ललित लिखाणात हे चालून जाईल, पण या लिखाणला ललित म्हणवत नाही. का बुवा?
एकून धागे भरकटत जाण्याच्या 'ऐसी अक्षरे' वरील साथीची लागण याही धाग्याला होणार असे दिसते. असो.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 20/12/2013 - 05:19

In reply to by सन्जोप राव

"मुळात लेख लिहीण्यामागचा उद्देशच समजला नाही" या वाक्यात कर्ता कोण असणारे? "लेख लिहीण्यामागचा उद्देश समजत नाही" अशी सरसकट तक्रारही नाही.

असो. भारतातला माझा अनुभव पार निराळा आहे. अगदी मुंबई, पुणे, गोरखपूर विद्यापीठांमधेही अशी परिस्थिती पाहिलेली नाही. त्यामुळे इथे "माझा-शब्द-विरुद्ध-तुमचा-शब्द" यापलिकडे या वादाला काही अर्थ नाही. पीएच.डी., पोस्टडॉक्सना येणारे चांगले-वाईट अनुभव, भारतात, receiving end कडून अनुभवल्यानंतरही हे चित्र मला एवढं वाईट दिसत नाही. अगदी पुरुष प्राध्यापकांनी स्त्री विद्यार्थ्यांचं molestation करण्याचे केलेले प्रयत्न माहित असूनही, हे चित्र मला लेखातल्याएवढं काळं वाटत नाही.

---

प्राध्यापकांना एखादा विषय महत्त्वाचा वाटत नाही हा त्यांचा दोष कसा? विषय बदलून वेगळ्या विषयात रस घेणारे आणि त्यामुळे मागचा विषय मागे सोडून देणारे काही भारतीय आणि परदेशी प्राध्यापक मी पाहिलेले आहेत. यात काहीही नवीन नाही. मला हवा तोच प्राध्यापक, मला हवा तोच विषय हा हट्ट आपल्याला अनुभव नसताना नाही करता येत. शिका, अनुभव घ्या आणि विषय बदला असे प्रकार आत्ताच्या विद्यार्थ्यांनाही भविष्यात करता येतीलच. यात अन्यायकारक काय हे मला खरोखरच समजलं नाही.

सन्जोप राव Fri, 20/12/2013 - 06:09

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हे सगळे 'पसंद अपनी अपनी-खयाल अपना अपना' करायचे ठरवले तर कशाचेच जनरलायझेशन करता येणार नाही. अगदी संशोधनातही 'आऊटलायर्स' सोडून देऊन बाकी सर्वसामान्य निरिक्षणांवरच निष्कर्ष काढावे लागतात.
चित्र लेखातल्याइतकं काळं नसेलही. तसं सरसकट ते आहे असं लेखकाला म्हणायचं आहे असंही वाटत नाही. तो एक ध्यानात आलेला 'पेन पॉईंट' आहे इतकंच.
प्राध्यापकांना एखादा विषय महत्त्वाचा वाटत नाही हा त्यांचा दोष कसा?
यामागे त्या प्राध्यापकाचा-गुरुचा- काही विचार, अभ्यास असेल आणि मग त्याने तो विषय नाकारला तर हे ठीक आहे- समजण्यासारखेही आहे. पण यामागे गुरुचा अहंकार- आणि त्याहीपेक्षा दुर्दैवी म्हणजे अज्ञान असेल तर? संशोधकाला काय म्हणायचे आहे, काय करायचे आहे, का करायचे आहे हे त्याच्या गुरुला समजलेच नाही तर?
ओके, अशा केसेस फार कमी असतात हे मान्य. पण अशी एकही केस असणे एकूण संशोधनाच्या दृष्टीने घातक नाही काय? आणि अशा केसमध्ये जो / जी भरडला जातो/ जाते, त्याच्या/ तिच्या दृष्टीने शंभर टक्के हाच अनुभव खरा नाही काय? (सदोष वाक्यरचनेबद्दल क्षमस्व)

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 20/12/2013 - 19:26

In reply to by सन्जोप राव

यामागे त्या प्राध्यापकाचा-गुरुचा- काही विचार, अभ्यास असेल आणि मग त्याने तो विषय नाकारला तर हे ठीक आहे- समजण्यासारखेही आहे. पण यामागे गुरुचा अहंकार- आणि त्याहीपेक्षा दुर्दैवी म्हणजे अज्ञान असेल तर? संशोधकाला काय म्हणायचे आहे, काय करायचे आहे, का करायचे आहे हे त्याच्या गुरुला समजलेच नाही तर?

हे त्या ठराविक विषयातली माहिती नसताना, या उदाहरणाबद्दल काहीच माहिती नसताना कसं सांगणार? पण असा कोणी अज्ञानी, अहंकारी माणूस असेलच तर त्याच्याबरोबर काम करण्याचा हट्ट धरणं व्यावहारिक आहे काय? (अहंकारी आणि दुराग्रही माणसाबरोबर काम केल्यामुळे माझ्या एका मित्राचं नुकसान झालं आहे. ते ही विज्ञान विषयात. हे आधी लक्षात आलं नाही म्हणून तो बरीच वर्ष हळहळला. पुढे मनासारखं पोस्टडॉक मिळालं तेव्हा हे थांबलं.)

माझा एक एक्स-बॉस. त्याने अनेक वर्षांपूर्वी विषय बदलला आणि तेव्हाच्या हॉट केक असणाऱ्या क्षेत्रात आला. त्या विषयात अनेक दशकं काम केलं. हा विषय तसा आता मागे पडतो आहे, बॉस पुन्हा मूळ विषयाकडे वळला. त्याचा मूळ विषय सध्या अजिबातच हॉट केक नाही. खूप काही पायाभूत काम त्यात होईल अशी येत्या पन्नासएक वर्षात तरी शक्यता नाही. तरीही त्या विषयावर तीन-चार वर्ष काम करून रेडीओ खगोलशास्त्राची मूलभूत पण सखोल माहिती शिकता येते. या शिक्षणाचा वापर करून, थिसीसवर काम सुरू आहे त्या तीन-चार वर्षात आजूबाजूला काय सुरू आहे हे वाचून पीएच.डी. झालेल्या लोकांना पोस्टडॉक्स मिळवता येतात. अशी गुरूबंधू/भगिनींची उदाहरणं माझ्या माहितीतही आहेत.

समाजशास्त्रात काय चालतं, काय शिस्त आहे हे मला माहित नाही. पण पीएच.डीसाठी एका विषयावर काम केलं आणि पोस्टडॉक्स असताना, ठरवून भलत्याच विषयावर काम केलं असे चिकार लोक माझ्या ओळखीचे आहेत. पीएच.डी झाल्यावर किंवा एक-दोन पेपर प्रकाशित केल्यावर बरंच जास्त स्वातंत्र्य मिळतं.

सन्जोप राव Sat, 21/12/2013 - 06:08

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

समाजशास्त्रात काय चालतं, काय शिस्त आहे हे मला माहित नाही.
इथे खरे तर वाद संपतो.
'हरिभजनावीण काळ घालवू नको रे' या भजनात एक उद्बोधक ओळ आहे.

राजेश घासकडवी Fri, 20/12/2013 - 06:44

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

भारतातला माझा अनुभव पार निराळा आहे.

भौतिकी शास्त्रांमधलं चित्र आणि समाजशास्त्रांमधलं चित्र यामध्ये फरक असल्याचं लेखकाने म्हटलेलंच आहे. मला वाटतं भौतिकी शास्त्रात विद्यार्थ्याला 'माझं बरोबर, गाइडचं चुकीचं' हे सिद्ध करता येतं. समाजशास्त्रात उत्तरं तितकी सोपी नसल्यामुळे बॅलन्स ऑफ पॉवर बदलत असावा. तो प्रस्थापित प्राध्यापकाला सोयीचा ठरेल याची कल्पना करता येते.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 20/12/2013 - 19:03

In reply to by राजेश घासकडवी

घरची, बाहेरची अशी काही मोजकी उदाहरणं माहित आहेत ज्यांनी समाजशास्त्रात संशोधन केलं. या गोष्टीला दोन दशकं झाली. पण या कोणाचेही अनुभव असे किंवा इतके काळे नव्हते.

सन्जोप राव Sat, 21/12/2013 - 06:09

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

या गोष्टीला दोन दशकं झाली.
खरे तर इथेही वाद संपतो.
'हरिभजनावीण काळ घालवू नको रे' या भजनात एक उद्बोधक ओळ आहे.

अतुल ठाकुर Fri, 20/12/2013 - 13:42

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हा मुद्दा असा आहे कि खरोखर आपण म्हटल्याप्रमाणे यावर कधीही न संपणारा वाद होऊ शकेल. कारण तुम्हाला आलेले अनुभव वेगळे आहेत. मात्र मी काही गोष्टी अशा पाहिल्या, ऐकल्या आहेत की माझा लेख मला त्यापुढे अगदीच अळणी आणि सपक वाटतो.खैर.

माझ्या बरोबरीने संशोधन करणार्‍या मित्राला शंकराचार्यांच्या अद्वैत सिद्धांतात रस होता. त्याचा सामाजिक अंगाने अभ्यास करण्याची त्याची इच्छा होती. पुढे गाईड कडे गेल्यावर त्याला त्यातल्या अवघडपणाची जाणीव करुन देण्यात आली. आणि शंकराचार्यांच्या अद्वैतावर संशोधन करण्याची मनिषा बाळगणारा आमचा मित्र आता मुंबई रेल्वेशी संबंधीत कसल्याशा सामाजिक समस्येचा आपल्या संशोधनात गुंता सोडवत आहे. यात विषयाचा सरस निरस हा भाग नाही किंवा श्रेष्ठ कनिष्ठ हा ही भाग नाही. यात माझ्या मित्राचा दोष मला जास्त वाटतो.

ए. आर. देसाई हे नाव मार्क्सवादी गटांत अत्यंत आदराने घेतलं जातं. मुंबई विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागात प्राध्यापक असलेल्या देसाइंचे गाईड होते "ईंडॉलोजीस्ट" म्हणुन काहीवेळेला हेटाळणीपूर्वक उल्लेख केला जाणारे विभागप्रमुख डॉ. घुर्ये. डॉ. घुर्येंसारख्या माणसाच्या हाताखाली कट्टर मार्क्सवादी विद्यार्थी संशोधन करु शकतो हा मला तरी अक्षरश: चमत्कारच वाटतो. यात धुर्येंना स्वतःचा जो काही कल असेल त्याला संपूर्ण मुरड घालुन आपल्या विद्यार्थाला मार्गदर्शन करावे लागले असेल. आजच्या परिस्थीतीत एखाद्या मार्क्सवाद्याने बिगरमार्क्सवादी संशोधनाला मार्गदर्शन करणं म्हणजे मला एखाद्या मुल्लाने मदरशात गायत्रीमंत्र शिकवण्याइतकं दुरुरापस्त वाटतं.

बॅटमॅन Fri, 20/12/2013 - 14:07

In reply to by अतुल ठाकुर

आजच्या परिस्थीतीत एखाद्या मार्क्सवाद्याने बिगरमार्क्सवादी संशोधनाला मार्गदर्शन करणं म्हणजे मला एखाद्या मुल्लाने मदरशात गायत्रीमंत्र शिकवण्याइतकं दुरुरापस्त वाटतं.

वाटायचं काय त्यात, आहेच ते तसं. त्या वायझेडांना तेवढी अक्कल नसतेच बहुधा कधी.

अतुल ठाकुर Wed, 18/12/2013 - 21:23

प्रतिसादाबद्दल धन्यवाद :) मला आणि माझ्या बरोबरीच्या मित्रांना आलेल्या अनुभवांवर आधारलेला लेख आहे. सिद्धांत मांडलेला नाही. आणि ललित किंवा इतर कुठलं असा भेद मी मानत नाही. मी सगळीकडे असंच लिहितो अगदी हेलनच्या कॅब्रेवर लिहिताना देखिल. लेख अजिबात आवडला नाही ही स्पष्टोक्ती मात्र खुप आवडली.

सन्जोप राव Thu, 19/12/2013 - 07:33

लेख पटला आणि त्यामागची वेदनाही कळाली. संशोधनातल्या गुरुंनी आपल्या शिष्यांना मदत करावी, दिशा द्यावी, आपल्या अनुभवाच्या त्यांना फायदा करुन द्यावा अशी अपेक्षा असते. त्याऐवजी शिष्यांचा छळ करण्यात धन्यता मानणारे गुरु जसे तुमच्या पाहाण्यात आहेत, तसे माझ्याही आहेत. हे कदाचित थोडेसे रॅगिंगसारखे असावे. 'माझ्यावर रॅगिंग झाले म्हणुन मी पुढच्या पिढीवरही करणार, मग ते मला पटो किंवा न पटो' असे.
विद्यार्थ्याने स्वत:ला आवडेल तो विषय निवडावा म्हणजे त्याचा संशोधन करण्यातला रस शेवटपर्यंत टिकेल असा प्रेमळ सल्ला गुरुमाऊली देते मात्र विषयाची चर्चा करायला गेल्यावर आपले राहिलेले, अडगळीत पडलेले, प्रोजेक्ट चालु असलेले संशोधन विद्यार्थ्याच्या माथी मारण्याचा भरपुर खटाटोप केला जातो आणि बहुतेक विद्यार्थी त्याला बळी पडतात. कठीण संशोधनात पडुन उगीच डोक्याला ताप करण्यापेक्षा “बिकट वाट वहिवाट नसावी” हे सूत्र कसोशीने पाळले जाते. काही शिष्योत्तम मात्र सोपा विषय निवडण्याच्या मागेच असतात हे देखिल नमुद करायला हवं. हे उभयपक्षी बरे असते.
हेही खरे आहे. त्यामुळे गुरुमाऊलींची स्वतःची पी.एच.डी. उदाहरणार्थ 'दीनानाथ मंगेशकर' या विषयात तर त्याच्या चेल्यांच्या पी.एच.ड्या 'लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ..' अशा- हे अगदी सहजी दिसते. 'बिकट वाट वहिवाट नसावी' हे खरे असले तरी दुर्दैवी आहे. या बाबतीत शिष्यच अधिक कारणीभूत आहेत. '१९९० ते २०१० सालादरम्यानचे पुण्यातील रिक्षावाल्यांची सरासरी मिळकत' या विषयावर संशोधन करणे उदाहरणार्थ सोपे आहे, पण ते पी.एच.डी.च्या लायकीचे आहे का? अशा बाबतीत शिष्यांनी जरा आपली बुद्धी वापरुन, थोडे कष्ट घेऊन आपला संशोधनाचा विषय निवडावा असे अपेक्षित आहे.
मग काही चलाख विद्यार्थी निघतात. त्यांना अभ्यासात रस नसतो पण पीएचडीत असतो. ते प्राध्यापकांच्या ओल्यापार्ट्यांना बाटल्या आणण्यापासुन ते अगदी गाड्यांची सर्विसिंग करण्यापर्यंत सेवा पुरवणं सुरु करतात. ही मंडळी खुप पुढे जातात, परदेशी दौरे काय मग सर्वच वाटा सुलभ होऊ लागतात
हे तर फारच दुर्दैवी आहे. काही गुरुजींना आपल्या हाताखालून किती पी.एच.ड्या गेल्या या आकड्यात रस असतो. त्यामुळे त्यांना असे शिष्य मिळाले की मग काय, दुधात साखरच! (किंवा व्हिस्कीत सोडाच!)
शेवटी एक निरीक्षण. गुरुचे लांगूलचालन करुन- त्याला बाटल्या पुरवण्यापासून त्याची पँट शिवण्यापर्यंत सर्व प्रकारची चाटूगिरी करुन- पी.एच.डी मिळवणे हा एक सर्वमान्य, सोपा प्रकार. स्वतः विचार, कष्ट, प्रयत्न करुन खरोखर काहीतरी महत्त्वाचे, संशोधन करणे -इतके की त्याबद्दल आपल्या गुरुला अभिमान, आदर वाटावा हा दुसरा कठीण, लांबचा पण 'रोड नॉट टेकन' असा रस्ता. यातला कोणता मार्ग स्वीकारावा हे ठरवणे हे बाकी शिष्याच्या हातात असते. ही ज्याची त्याची निवड असते.

अतुल ठाकुर Thu, 19/12/2013 - 09:07

In reply to by सन्जोप राव

अगदी अलिकडलं उदाहरण देतो. माझी मैत्रिण जिला फेमिनीझम, जेंडर स्टडीज अशा विषयात सुरुवातीपासुन रस. आकडेवारी मुखोद्गत, जुडीथ बटलर प्रभुती लोकांच्या संशोधनाचा अभ्यास केलेला आणि या विषयात काहीतरी नवीन भर टाकण्याची इच्छा. अतिशय आवडत्या प्राध्यापकाच्या हाताखाली संशोधन करायला मिळावे म्हणुन पार दिल्लीपर्यंत त्याच्या महाविद्यालयात धाव.

आणि परवा अत्यंत निराशेने सांगत होती कि त्याला हा विषय महत्वाचा वाटतच नाही. त्याला हीने एनव्हारनमेंट किंवा कास्ट हा विषय घ्यावा असे वाटते आता तर हीच्या लिखाणाला त्याने प्रत्युत्तर देणेचे बंद केले आहे. हताश होऊन ती मुंबईला परत यायचा विचार करीत आहे. मी तिला थोडा अजुन प्रयत्न करायला सांगीतले आहे. पण प्राध्यापक महाशयांचा आडमुठेपणा कमी होण्याची शक्यता आता मलादेखिल कमीच वाटते.

मन Thu, 19/12/2013 - 09:17

अमोल पालेकर,स्वरुप संपत , उत्पल दत्त , शत्रुघ्न सिन्हा अभिनित एक खुसखुशीतपट आहे "नरम गरम" नावाचा.
त्यातील एक प्रसंगः-
त्यात पद्मा चव्हाण हिच्या नाटक कंपनीत बिरजू हा गरजू व होतकरु कलाकार नुकताच जॉइन झालेला आहे.
पद्मा चव्हाण त्याला टॉवेल का काहीतरी आणायला सांगते (का पाय चेपून दे म्हणते)
तो थाडकन् नकार देत निघून जायला लागतो. ती त्याला म्हणते
"कलाकार की अक़ड है तुझ़ में | मरेगा रे तू |"

सन्जोप राव Fri, 20/12/2013 - 06:13

In reply to by मन

'अ वेन्सडे' या सिनेमात खलनायक पोलिस इन्स्पेक्तरची मग्रुरी बघून म्हणतो, 'तुमको देखके हमें हमारी जवानी याद आ गयी. मौत के बगल में भी बैठते थे तो अकडके.'
अकड ही फार मोहक गोष्ट आहे. मृत्यूपेक्षाही. अकडच शेवटी मृत्यू मिळवून देणार असेल तर त्यापेक्षा अधिक काय हवे?

अंतराआनंद Thu, 19/12/2013 - 16:18

खरंय , खास करून

कला क्षेत्रात तर गुरुचं नाव घेतल्यावर कान चिमटीत जाणे आणि सद्गदीत होणे हे नेहेमीचेच. कुणी गाणं शिकायला गुरुकडे पाणी भरलं, लाकडं फोडली आणि या कथा कौतुकाने सांगितल्या गेल्या. किंबहुना त्याचमुळे अभ्यास आणि शिक्षण ही अत्यंत कष्टाने, परिश्रमाने साध्य होणारी बाब आहे असे सर्वसामान्यांच्या मनी बिंबले. मात्र हे कष्ट आणि परिश्रम हे अभ्यासावर घ्यावे लागत नसुन गुरुचा बेजबाबदार लहरीपणा सांभाळण्यासाठी घ्यावे लागतात हे संशोधन क्षेत्रात गेल्याशिवाय कुणाला फारसं कळण्याची शक्यता नाही.

गुरू म्हणजे परमेश्वर असा समज असणारया कलाक्षेत्रात गुरूजींच्या झेरॉक्स कॉप्या तयार होतात आणि नावाजल्याही जातात. खरा गुणवत्ता असेल पण तोंड्पुजा करायची सवय नसलेल्याला कोणी विचारतही नाही.

गब्बर सिंग Fri, 20/12/2013 - 13:56

गावाकडुन आलेल्या हुशार परंतु इंग्रजीत कमकुवत असलेल्या विद्यार्थ्याचे हाल कुत्रादेखिल खात नाही.

हे वाक्य मी खंबीरराव खंडागळे (सरपंच शेंडेवाडी बुद्रुक) पासून मुलायमसिंग यांच्यापर्यंत सगळ्यांकडून वेगवेगळ्या काँटेक्स्ट मधे ऐकलेले आहे.

गावाकडून आलेल्यां मुलांना इंग्रजी येत नसल्याने .... शहरातील लोकांनी समजावून घ्यावे/मदत करावी अशी गावाकडच्या मुलांची, पालकांची, जनतेची, समाजसेवकांची व राजकीय पुढार्‍यांची ही इच्छा असते. नव्हे आग्रह असतो. (तसे अतुलदांनी थेट म्हंटलेले नाही हे मला माहीती आहे.) एका बाजूला ही तक्रार व दुसर्‍या बाजूला "मग काय इंग्रजी येत नाही म्हणून रिसर्च पोटॅन्शियल नाही असे म्हणताय काय ?" हा प्रश्न .... किंवा एतद्देशीय भाषांमधे प्राविण्य मिळवून जे संशोधन होते ते व्हॅल्युएबल नसते का ? असले ambitiously excessively basic प्रश्न विचारून आपण फार् मोठ्ठे "थॉट लिडर" आहोत असे दाखवायचा सोस असतो. किंवा आपण अविकसितांचे कैवारी कसे आहोत ते दाखवायचा सोस. किंवा ज्ञान व संशोधन हे इंग्रजीतच असते असा गब्बर चा गैरसमज झालेला दिसतो - असले शेरे मारले जातात.

अतुलदांनी मुख्यत्वे सामाजिक शास्त्रां मधल्या संशोधनाबद्दलचा मुद्दा मांडलेला आहे. सामाजिक विषयांमधे भाषा हा एक प्रमुख घटक आहे. भाषेचा मानसशास्त्र, समाजशास्त्र या विषयांशी अत्यंत जवळचा संबंध असतो (आता इथे जवळचा संबंध इतर कोणत्या विषयाच्या तुलनेत ??? - असा ambitiously excessively basic प्रश्न विचारू नये). मी तर थोडासा अ‍ॅग्रेसिव्हली मुद्दा असा मांडतो की ज्या व्यक्तीस अनेक भाषा येतात ती व्यक्ती जास्त चांगला विचार करू शकते. भाषेच्या अनुपस्थितीत व्यक्ती विचार कशी करू शकेल या प्रश्नाचे उत्तर शोधून पहा. व जास्त चांगला विचार करणे हे पीएचडी करणार्‍या व्यक्तीचे मुख्य कौशल्य असायला हवे. व सामाजिक शास्त्रांमधील संशोधनांत भाषेवरील प्रभुत्व, किंवा अनेक भाषा समजणे - ही एक उच्च अर्हता असायला हवी .... किमान संशोधकांसाठी तरी. और चूंकी ये उच्च अर्हता है ... जिसके पास ये उच्च अर्हता नही होगी वो कम माना जायेगा. और यही उचित है.

खरंतर - इंग्रजी येत् नसल्यामुळे गावाकडच्या मुलांची अवस्था दयनीय होते - हे इष्ट आहे. ( त्यांची दयनीय अवस्था होते - हे खरे आहे की नाही यावर मी बोलत नसून - ते खरे आहे असे गृहीत धरून - पुढे असे म्हणतोय की ते इष्ट आहे). अवस्था दयनीय होणे हे एका अर्थाने ह्युमिलियेशन आहे. The humiliation is desirable and is designed to make it painful to the individual where it hurts the most.

हे असे का आहे ? त्याचे उत्तर हे - की जर सगळ्या गावाकडच्या मुलांना शहरातली महाविद्यालये समजून घेऊ लागली तर याच्यातून मोरल हझार्ड तयार होतो. की आपल्याला ती महाविद्यालये समजून घेणार आहेत ना - मग ठीकाय - मग इंग्रजी शिकण्याचे नंतर बघू - अशी वृत्ती गावाकडच्या मुलांमधे वाढू लागते. याही पुढे जाऊन - गावाकडची मुलं - तुम्ही मला समजावून घेता ते तुमचे कर्तव्यच आहे - असा दावाही करू लागतील.

पुनश्च - मुद्दा इंग्रजी वि. एतद्देशीय असेलही ... पण माझे दोन आक्षेप हे एपिस्टेमिक्स व एकॉनॉमिक्स या दोन एंगल्स नी प्रेरित आहेत.

मी Fri, 20/12/2013 - 14:52

In reply to by गब्बर सिंग

अवस्था दयनीय होणे हे एका अर्थाने ह्युमिलियेशन आहे. The humiliation is desirable and is designed to make it painful to the individual where it hurts the most.

कॅपिटलिस्ट कमेंट आहे, समतेसाठी काही रिझर्वेशन ठेवाल कि नाही? गृहितकाबद्दल साशंक - the humiliation will not always necessarily bring the good out of the people.

अजो१२३ Fri, 20/12/2013 - 16:52

In reply to by गब्बर सिंग

खरंतर - इंग्रजी येत् नसल्यामुळे गावाकडच्या मुलांची अवस्था दयनीय होते - हे इष्ट आहे. ( त्यांची दयनीय अवस्था होते - हे खरे आहे की नाही यावर मी बोलत नसून - ते खरे आहे असे गृहीत धरून - पुढे असे म्हणतोय की ते इष्ट आहे). अवस्था दयनीय होणे हे एका अर्थाने ह्युमिलियेशन आहे. The humiliation is desirable and is designed to make it painful to the individual where it hurts the most

मी गावाकडून आलेलो आहे. मराठी माध्यमाचा आहे. आणि इंग्रजीने दयनीय करणे हे ह्युमिलियेशन मी स्वतः अकरावीला सायन्स ला अचानक माध्यम बदलणे, आय आय टीची परीक्षा, इंजिनिअरींगला कँपस सिलेक्शनच्या परीक्षा, जी आर इ, आय आय एमची प्रवेश परीक्षा आणि नोकरीच्या ठिकाणी वाहते इंग्रजी प्रयोग करणार्‍या पण एरवी मूर्ख अशा लोकांना मिळणारी बढत इतक्या ठिकाणी अनुभवला आहे, अनुभवत आहे. आपल्या इष्टतेचा रिमार्क वाचताना आमचे कितीतरी शाळकरी मित्र आठवले. त्यांनी सरळ ईंग्रजीपुढे शरणांगती पत्करली. शिक्षणच सोडून द्यावे लागले. मग ते इतरत्र घुसले. त्यांनी व्यापार, राजकारण यांत भाग घेतला. त्यांनी आणि त्यांच्यासारख्या इतरांनी व्यापार , राजकारण इतके नासवले कि इंग्रजी शिकणारांची आणि नोकरी करणारांची अवस्था दयनीय करून टाकली. पहिल्यांदाच ते इष्ट झाले असे वाटले.

अनामिक Fri, 20/12/2013 - 19:57

In reply to by अजो१२३

बर्‍यापैकी सहमत आहे. मीसुद्धा गावातलाच असल्यामुळे ह्या गोष्टी नक्कीच समजु शकतो. तसं पहायला गेलं तर गावाकडून आल्याने, इंजिनियरींग किंवा तत्सम पदवी पूर्ण होईस्तोवरही इंग्रजीत बोलायचा तसा फार संबंध येत नाही. नंतर मात्र नोकरीनिमित्ताने शहरीभागात आल्यावर इंग्रजी एकदम अंगावर आल्यासारखी होते. गावाकडच्या लोकांत इंग्रजीमुळे न्युनगंड निर्माण झालेला आणि तुम्ही म्हणताहात त्याप्रमाणे शरणागती पत्करलेलं पाह्यलं आहे. असे असुनही, ह्या लोकांनी अधिक प्रयत्न करायला हवे होते असे वाटते. स्वानुभवावरून असे म्हणू शकतो की मला इंग्रजीचा सराव आणि इंग्रजीतून विचार केल्याने इंग्रजीतून बोलायला सोपे गेले. अगदिच न बोलता येण्यापासून आज नियमीत इंग्रजी बोलू शकतो(?). अर्थात, मला माझ्याभोवती असलेल्या वातावरणाचा आणि मित्रांचाही फायदा झाला.

सन्जोप राव Sat, 21/12/2013 - 06:20

In reply to by गब्बर सिंग

हे ह्युमिलियेशन (नाचक्की हा शब्द चालेल का?) काही अंशी तरी आवश्यकच आहे. अशी हेटाळणी झाल्याशिवाय काही लोकांमधले स्फुल्लिंग वगैरे चेतवले जात नाही.आणि इंग्रजीचा बागुलबुवाच अधिक केला जातो. मुळात भाषा या बाबतीतच 'चलता है' अशी भूमिका असल्याने 'आमी गावाकडची मानसं, आमाला फाडफाड विंग्रजी बोलाया कसं येनार आन्ना? आं?' हे संतापजनक कारण पुढे करुन लोक आपल्या कामचुकार वृत्तीवर पांघरुण घालण्याचा प्रयत्न करतात.
या बाबतीत इतर अनेकांप्रमाणे अच्युत गोडबोलेंचे उदाहरण लक्षात घेण्यासारखे आहे.

गब्बर सिंग Sat, 21/12/2013 - 06:27

In reply to by सन्जोप राव

मुळात भाषा या बाबतीतच 'चलता है' अशी भूमिका असल्याने 'आमी गावाकडची मानसं, आमाला फाडफाड विंग्रजी बोलाया कसं येनार आन्ना? आं?' हे संतापजनक कारण पुढे करुन लोक आपल्या कामचुकार वृत्तीवर पांघरुण घालण्याचा प्रयत्न करतात.

आणि शहरातली माणसं ही "रामपुरका लक्ष्मण" किंवा "गाव हमारा शहर तुम्हारा" सारख्या चित्रपटांनी प्रभावीत होऊन खेड्यातल्या माणसांना उगीचच मदत करायला धावतात. विकसीतांनी विकसनशीलांच्या प्रगतीसाठी विशेष यत्न करायला हवेत (नव्हे ... ते त्यांचे कर्तव्यच आहे) हा घाणेरडा विचार गेली ५० वर्षे राबवला गेला त्यातून हा सगळा चक्रम पणा जन्मास येतो. हा सगळा बाष्कळपणा त्या "खेड्याकडे चला" च्या बकवासातून उत्पन्न झालेला आहे.

अजो१२३ Sat, 21/12/2013 - 11:31

In reply to by गब्बर सिंग

आणि शहरातली माणसं ही "रामपुरका लक्ष्मण" किंवा "गाव हमारा शहर तुम्हारा" सारख्या चित्रपटांनी प्रभावीत होऊन खेड्यातल्या माणसांना उगीचच मदत करायला धावतात. विकसीतांनी विकसनशीलांच्या प्रगतीसाठी विशेष यत्न करायला हवेत (नव्हे ... ते त्यांचे कर्तव्यच आहे) हा घाणेरडा विचार गेली ५० वर्षे राबवला गेला त्यातून हा सगळा चक्रम पणा जन्मास येतो. हा सगळा बाष्कळपणा त्या "खेड्याकडे चला" च्या बकवासातून उत्पन्न झालेला आहे.

.
शहरातले लोक १४ रु किलो ने तूर दाळ शेतकर्‍याकडून घेतात नि १२० रु किलो ने शहरात पॉलिश करून विकतात. चित्रपटांचा प्रभाव यावरून स्पष्ट व्हावा. शहरी लोकांचे गावकर्‍यांवरील प्रेम 'गावकर्‍यांचे गावातले उत्पन्न तंत्रज्ञान बदलून बुडविणे, प्रकल्पांसाठी त्यांच्या जमिनी माझ्या नाही माझ्या बापाच्या म्हणून घेणे, त्यांना शहरांत विस्थापित करणे, स्वतःचा पगार २ लाख रुपये प्रतिमाह शहरात कमी पडत असताना ४००० ते ६००० रु प्रतिमाह देऊन जीवन नासवणे' इ इ नी पुरेसा स्पष्ट व्हावा.

शहरी लोकांचे गावाकडच्या लोकांवर 'गावाकडचे म्हणून' प्रेम? असा काही कंसेप्ट असतो हे पहिल्यांदाच ऐकतोय. विकसनशीलांच्या प्रगतीसाठी प्रयत्न? विकसीतांकडून? गब्बरजी, आपण कुठे राहता? निर्दयपणे भाव ठरवणे अजूनही गावकर्‍यांची इच्छा नाही, त्यांना ते माहित नाही, जमत नाही आणि अजून ज्ञान नाही. पण ज्यात खरे कष्ट आहेत अशा सगळ्या गोष्टींचे भाव वाढत आहेत. शहरी गोष्टी, ज्यांत बुद्धिमत्ता हा मेन कंटेंट आहे त्यांचे भाव पडत आहे. शहरी लोक महागाईला बीट करू पाहत आहेत. ही गावकर्‍यांच्या जागृततेची चूणूक आहे. दिल्ली अभी दूर है.

आणि खेड्याकडे चला ही भलावण आहे. शहरी जनसंख्येचे प्रमाण (%) वाढत आहे. तिचे उदाहरण देणे ही चूक आहे.

आडकित्ता Sun, 22/12/2013 - 22:01

In reply to by सन्जोप राव

अजून चर्चा वाचतो आहे, पण,
>>
(नाचक्की हा शब्द चालेल का?)

humiliation = अपमान.

सलील Fri, 20/12/2013 - 19:53

आमच्या शेवटच्या वर्षाच्या सेमिनारला माझ्या मित्राने एक मनेजमेंट वर सेमिनार दिला होता. एक्सटनरल एक्झामिनारला तो फारच आवडला होता पण इंटर्नल पक्का टेक्निकल होता त्याने त्याला इतके कमी मार्क दिले की शेवटी तो काठावर पास झाला. त्याआधी त्याला जाम छळाला होता एक्सटनरल एक्झामिनारने जास्त मार्क दिले नसते तर नापासच व्हायचा.

अक्षय पूर्णपात्रे Sat, 21/12/2013 - 00:02

भारतात मानवी अभ्यासशाखांची अवस्था बिकट आहे. इतरत्र संधी न मिळू शकल्याने समाजशास्त्र-पत्रकारिता या विषयांकडे वळलेल्या/वळत असलेल्या लोकांनी कमीत कमी महाराष्ट्रातल्या विद्यापीठांना/वृत्तपत्रांना पोखरून टाकलेले आहे. अशा अर्धवटरावांकडे शिकण्याची इच्छा बाळगणार्‍या विद्यायाचकांना शुभेच्छा देऊन हा उद्धट प्रतिसाद संपवतो.

नीरा Sat, 21/12/2013 - 11:34

काही निवडक विद्यापीठे सोडून भारतातच समाजशास्त्रांची अतिशय केविलवाणी अवस्था आहे. मोठमोठ्या विद्यापीठांचीही या बाबतीत 'बडा घर पोकळ वासा' अशीच दशा आहे (मुंबई आणि पुणे विद्यापीठ तर अगदी ढळढळीत उदाहरणं). एखाददुसरा उत्तम, दर्जेदार संशोधक-शिक्षक आढळतोही, पण अशांची संख्या अपवादाने नियम सिद्ध होण्यापुरतीच.

साधारण १९६०-७० नंतर या क्षेत्रांमधे अपूर्व खोगीरभरती झालेली दिसते. बहुतेक उत्तम विद्यार्थी हे सातत्याने इंजिनरिंग, डॉक्टरकी अशा तांत्रिक व्यावसायिक क्षेत्रांकडे, काहीच नाही तर किमान शास्त्रशाखेकडे जात राहिल्याने, ज्यांना फारसं काही जमलं नाही असेच जण बहुसंख्येने समाजशास्त्राच्या अभ्यासक्रमांना गेले. आवड म्हणून गेलेले खूप कमीच. साहजिकच शिक्षकपेशातही हळूहळू अशांचे प्राबल्य वाढतच राहिले. माझ्याकडे फारसा विदा नाही पण माझ्या अंदाजाने तेव्हा असलेली शिक्षक-प्राध्यापक आणि इतर शास्त्रशाखाधारित करिअर्स किंवा बॅन्केच्या नोकर्‍यांमधील पगारांची तफावतही याला कारणीभूत असावी. शिवाय कधीही शिक्षणक्षेत्रात मर्यादितच रोजगार संधी उपलब्ध असतात त्यामुळे ती 'अनिश्चितता' समाजशास्त्राकडे वळण्यासाठी मध्यमवर्गीय मानसिकतेला रोखत आली. बहुतेक सगळा मराठी मध्यमवर्ग हा तुलनेने गरीबीतून कष्ट करून वरती आल्याने आपल्या पुढच्या पिढ्यांनी आर्थिक अनिश्चितता टाळण्यासाठी सरकारी, निमसरकारी, बॅन्क अशा नोकर्‍यांमधे जावं आणि क्षमता असेल तर इंजिनिअर, डॉक्टर व्हावं अशा मानसिकतेत राहिला. अजूनही बराचसा आहे. (समाजशास्त्रात करिअर करणं हे अजूनही आपल्याकडे 'व्हॅलिड करिअर ऑप्शन्स' मधे समाविष्ट होत नाही)
या अशा सगळ्यामुळे जे मीडिऑकर लोक संशोधक झाले त्यांनी आपलं वर्चस्व कायम राहावं म्हणून स्वतःपेक्षाही कमी क्षमतेचे लोक नव्या जागांवर घेतले असंही वारंवार दिसून आलं आहे. जे सहसा बरे, हुशार विद्यार्थी असतात आणि ज्यांना समाजशास्त्रात पुढे काही गंभीरपणे करायची इच्छा असते ते फारतरफार एमेपर्यंत महाराष्ट्रात थांबतात, त्यानंतर दिल्ली किंवा परदेश गाठतात असंही बघितलं आहे

गंभीरपणे आंतरराष्ट्रीय दर्जाचं संशोधन करायची कटकट पाठीमागे लावून न घेतल्याने विभागीय राजकारणात डुबक्या मारायला अनेकांना भरपूर वेळ आणी उत्साह असतो. त्यामुळे ठाकूर यांनी लिहिल्याप्रमाणे परिस्थिती उत्पन्न होते

अर्थात हे सगळं खरं असलं तरीही लेखकाला फर्डं इंग्लिश बोलणार्‍यांबद्दल जरा अढी दिसते आहे. उत्तम इंग्लिश आत्मसात करणं हे त्या विषयाची बेसिक्स आत्मसात करण्याएवढंच महत्वाचं आहे. जर तो विषय खरंच मुळातून समजवून घ्यायचा असेल तर मराठी पुस्तकं वाचून किंवा सोप्या इंग्लिशमधली टेक्स्टबुक्स वाचून समजणारच नाहीये. खरंच शिकायची आस असेल तर भाषा उत्तम केली जातेच, त्यावर कष्ट घेतले जातात. नाहीतर मग फाडफाड इंग्लिश बोलणार्‍यांना पाहून मनात एक न्यूनगंड तयार करून घेऊन 'शहरातले विद्यार्थी केवळ इंग्लिश बोलता येण्यामुळे पुढे जातात' वगैरे समजुती करून घेऊन स्वतःच्या कोशात बसून वैफल्य कुरवाळून घेणे वगैरे सोपं असतं.

अडगळीत पडलेले, प्रोजेक्ट चालु असलेले संशोधन विद्यार्थ्याच्या माथी मारण्याचा भरपुर खटाटोप केला जातो>> हे कितीही खरं असलं तरी मुदलात किती विद्यार्थी स्वतःचे संशोधनाचे नक्की बेत घेऊन पीएचडीची सुरुवात करायला येतात? बहुसंख्य जण या ना त्या गाईडमागे 'टॉपिक द्या ना' असं म्हणत खेटे घालत असतात. परीक्षा आणि मुलाखत यांच्या मागचा हेतू आधी विद्यार्थ्यांकडे संशोधनाचे सुनिश्चित आराखडे असावेत असाही असतो. पण सतत स्पूनफीडिंगचं बाळकडू मिळालेले विद्यार्थी क्वचितच स्वतःची अक्कल वापरून त्यांना स्वतःला काय विषय घेऊन संशोधन करायला आवडेल याचा विचार करतात. मग फक्त गाईड्सना दोष देऊन उपयोग नाही. शिवाय अनेकदा गाईडच्या स्वतःच्या संशोधनविषयाचा आवाका खूप मोठा, एकट्याला न संभाळता येण्यासारखा अस्तो. तेव्हा मग असे परावलंबी पण बरी क्षमता असलेले विद्यार्थी घेऊन गाईड स्वतःचं काम पुढे न्यायचा प्रयत्न करतात. त्यात चुकीचं, गैर असं काहीच नाही!

आणि राजकारण कुठेच चुकत नाही. अगदी आंतरराष्ट्रीय ख्यातनाम संशोधकसुद्धा स्वतःच्या विभागात राजकारणं खेळत असतातच. फक्त त्याचं स्वरूप वेगळं असतं आणि अगदी हीन पातळीवर ते क्वचित उतरतात आणि एक सशक्त अशी विद्यार्थी संशोधकांची फळी निर्माण करतात. अर्थात हे भारतात क्वचितच होते

अतुल ठाकुर Sat, 21/12/2013 - 12:23

नाही. अढी नाही. मात्र ते नीट न येणार्‍यांबद्दल जो तिरस्कार व्यक्त केला जातो आणि वर्गात देखिल त्यामुळे जे गट पडतात ते चमत्कारीक वाटतं.

बाकी मी लेख लिहिलाय तो समाजशास्त्राकडे गांभीर्याने पाहाणर्‍या विद्यार्थांच्या दृष्टीकोणातुन.

शिवाय अनेकदा गाईडच्या स्वतःच्या संशोधनविषयाचा आवाका खूप मोठा, एकट्याला न संभाळता येण्यासारखा अस्तो. तेव्हा मग असे परावलंबी पण बरी क्षमता असलेले विद्यार्थी घेऊन गाईड स्वतःचं काम पुढे न्यायचा प्रयत्न करतात. त्यात चुकीचं, गैर असं काहीच नाही!

मला हे चुकीचं वाटतं. परावलंबी पण बरी क्षमता असलेले विद्यार्थी जर स्वतःचा विषय घेऊन येण्याची अक्कल नसलेले असतील तर त्यांना नाकारण्याचा हक्क गाईडला असतोच. त्यांना स्वतःची आवड विकसित करण्याचा सल्ला देण्याऐवजी स्वतःचे प्रोजेक्ट माथी मारण्याने नक्की काय साधलं जातं ते कळंलं नाही.

मात्र मी पाहिलेले बरेचसे शिक्षक हे समाजशास्त्राकडे नाईलाजाने वळलेले वाटले नाहीत. त्यातले काही समाजकार्यात अ‍ॅक्टीव आहेत. काहींचे विशिष्ठ विषयावर संशोधन सुरु आहे. काहींची पुस्तके लेख प्रसिद्ध होत असतात. समाजशास्त्र विषयात अनेक स्तरांवर त्यांची दखल घेतली जाते. त्यांचे प्रबंध सतत अभासिले जातात. या सार्‍या गोष्टींतुन मला फार काही सुचवायचं नाही. त्यातही भ्रष्टाचार आहेच. पण अगदीच उरलेला गाळ या वर्गवारीत येणार नाहीत असे अनेक प्राध्यापक मला माहित आहेत.

या शाखेकडे मुलिंचा भरणा खुप असेलसे वाटते. आमच्या वर्गात एम ए ला ४५ विद्यर्थ्यांत जवळपास ३५ मुली होत्या. शेवटपर्यंत २३ जण उरले. त्यात सहा मुलं टीकाव धरुन होती. काहीजणींनी लग्नानंतर शिक्षण सोडले. एकीने एमए केल्यास त्यात तोडीचा चांगला नवरा मिळेल ही इच्छा स्पष्टपणे बोलुन दाखवली होती. सोपा म्ह्णुन त्याकडे गेलेले सर्वजण टीकत नाहीत. त्यानंतर संशोधनाकडे खुपच कमी जण वळतात असा अनुभव आहे. बरेच जण बीएड करुन शिक्षकाच्या पेशात गेलेले पाहिलेत. मात्र त्याहीपेक्षा जबरदस्त पैसा देणारं एन जी ओ चं क्षेत्र आता या लोकांना खुलं झालेलं आहे. तिकडे वळण्याचं प्रमाण चिकार आहे. शिवाय बरोबरीने मॅनेजमेंट करुन एच आर वगैरेकडे जाणारे आहेतच. त्यामुळे प्राध्यापकी करण्यासाठी आणि संशोधनाकडे अशातले किती जण वळत असतील याचा अंदाज यावा.

मुळातच यातील पाळण्यातले पाय एम ए लाच दिसुन येतात असा माझा अंदाज आहे. कोर विषय सोडल्यास मार्क मिळवण्यासाठी सोपे विषय निवडणे, जो शिक्षक भरभरुन मार्क देईल अशाचे विषय निवडणे असा ज्यांचा दृष्टीकोण असेल त्यापकी कितीजण संशोधनाबाबत गंभीर असणार. तिसर्‍या सेमिस्टरला कराव्या लागणार्‍या प्रोजेक्टकडे जाणार्‍यांची संख्या अत्यल्प असते. हा प्रोजेक्ट मीनी पीएच्डी सारखाच असतो. त्यामूळे बरेच जण आधीच ढेपाळलेले असतात. समाजशास्त्रासारख्या विषयात जेथे असंख्य शंका प्रत्येक थेअरीबद्दल मनात घोंघावत असतात, वर्गात कधीही तोंड न उघडणारे परंतु उत्तम मार्क मिळवलेले विद्यार्थी मला माहित आहेत. शाळेतल्याप्रमाणे उत्तरे तोंडपाठ करुन येणारे देखिल माहित आहेत.

मुळातच मिडीयोकोर सोडाच परंतु चांगली बुद्धीमत्ता असलेल्यांकडेदेखिल संशोधनासाठी लागणारी चिकाटी असेलच हे सांगता येत नाही त्यामुळे हा माणुस कदाचित संशोधनाकडे वळेल हे वाटत असतानाच ती व्यक्ती नोकरी करुन शिक्षणाला राम राम ठोकते. मात्र येथे व्यक्त झालेल्या काही मतांशी सहमत आहे.

फारसा इंटरेस्ट नाही पण पीएचडी व्हायचंय. नोकरी परमनंट हवी. परदेशी वार्‍या खुणावत असतात. समाजशास्त्राच्या संशोधनात पैसा तर अफाट आहे. अर्थात त्यासाठी लागणारं बुद्धी कौशल्य देखिल यांच्याकडे असतं. तेव्हा झटपट संशोधन, सोपे विषय, चालवुन घेणारे गाइडस असा प्रवास सुरु होतो. हे सारं टाळुन मला असं म्हणावसं वाटतं की सोप्या गोष्टीं स्वीकारणारे गाइडस आणि विद्यार्थी आपण बाजुला ठेउयात. जे प्राध्यापक आणि विद्यार्थी या बाबतीत गंभीर आहेत त्यांच्या तरी असा संघर्ष का व्हावा? ही बाब मला अतीव दु:खाची वाटते.