भारत-पाक १९६५ युद्ध....त्रोटक आणि विस्कळित माहिती
१९६५ चे भारत पाक युद्ध सुरु कसे झाले?
पार्श्वभूमी:-
१९६०चे दशक एक वेगळेच समीकरण जागतिक राजकिय पटलावर मांडत होते. शीतयुद्धाला रंग चढत होता. NATO च्या छत्राखाली अमेरीकन समर्थक देश व कम्युनिस्टांच्या लेबलखाली तत्कालीन USSR म्हणजे रशियाचे समर्थक अशी कधी छुपी तर कधी उघड स्पर्धा सुरु होती. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळताच अमेरिकेने स्वतः मैत्रीचा हात पुढे करत भारतात अमेरिकन तळ मागावायचा प्रयत्न केला. भारताने तो फेटाळुन लावल्यावर राजकिय दृष्टीने अमेरिकेच्या मनात भारताविषयी अढी निर्माण झाली ती पुढे कित्येक दशके वाढतच गेली. इतरही कारणे त्यास होतीच.
१९४७ नंतर नेहरूंच्या नेतृताखालील सरकारची दिशा समाजवादी राज्यव्यवस्थेकडे झुकताना दिसू लागली. (भारतातल्या कट्टर समाजवाद्यांना ते मान्य नाहिच म्हणा) ही व्यवस्था ही भांडवलशाहीपेक्षा साम्यवादाच्या जवळ जाते. त्यामुळे साम्यवादी जगताचे नेतृत्व करणार्या रशियाबद्दलचे आकर्षण भारतीय नेत्यांत, सत्तावर्तुळात जास्त होते. अमेरिका त्यामुळे बर्याच प्रमानात भारतापासून दुरावत चाललेला देश होता.
त्याचवेळी पाकिस्तानने स्वतःहून लष्करी तळ देउ केल्याने अमेरिका त्यांच्यावर खुश होत बरीचशी मदत त्यांना करु लागली. त्याचवेळी मॅकमोहन लाइनच्या प्रश्नावरून १९६२ साली भारताचा लष्करी पराभव करत चीनने जवळपास अक्साई चीन हा नकाशाने काश्मीर राज्यात दाखवला जाणारा भाग ताब्यात ठेवण्यात यश मिळवले. ह्या युद्धाने भारत हा चीन आणि पाकिस्तानचा समान शत्रु झाला. अमेरिका-पाक्-चीन अशी एक वेगळिच आघाडी भारताविरुद्ध उभी राहिली.
१९६२ च्या पराभवातून धडा घेत भारतीय लष्कराची पुनर्बांधणी आणि काही प्रमाणात आधुनिकीकरणास वेग मिळाला. १९६५च्या अखेरिस भारतीय लष्कराची पुनर्बांधणी व आधुनिकीकरण ह्याचा अंदाज पाक गुप्तचर, सत्तावर्तुळास येउ लागला. एकदा का भारताचे लश्कर आहे त्याहून मजबूत झाले तर थेट समोरासमोर युद्ध करून आपल्या मागण्या ताकदीच्या बळावर रेटणे अशक्यप्राय होइल हे तिथल्या सरकारला जाणवले. ह्या "मागण्या" म्हणजेच प्रामुख्याने काश्मीर प्रश्नाचा पाकिस्तानला अनुकूल असा निकाल ताकदीच्या बळावर लावणे अशक्य होइल हे जाणवले. काही हालचाल करायची असेल तर ती झपाट्याने अंमलात आणली पाहिजे; तातडिने काहीतरी केले पाहिजे हे त्यांना जाणवले. युद्धाच्या मैदानात अजूनही भारताला वेळ पडल्यास आपण हरवू शकतो असे त्यांना वाटत होते.
.
इकडे भारत स्वतः शीतयुद्धातील तटस्थ देशांचे प्रतिनिधित्व करत असला तरी रशियाशी आपले सामरिक करार होतेच. शिवाय इराण्,इजिप्त, लेबानॉन,अफगाणिस्तान हे मुस्लिम जगतातील देशही भारताचे सहानुभूतीदार होते. काश्मीरचा पूर्ण भूभाग आपल्या ताब्यात आला नाही ही टोचणी भारत पाकिस्तान दोघांनाही होतीच. पण उर्वरीत काश्मीरही घेउन टाकावा अशी महत्वकांक्षा आणि आक्रमक वृत्ते पाकिस्तानी लष्करात होती. अमेरिकन युद्धसामुग्री मिळताच चीनकडून मार खाणार्या भारताला वेळ पडल्यास उघड मैदानात आपण नक्कीच हरवु असा विश्वास त्यांच्यात येउ लागला. काश्मीर प्रश्न काय आहे आणि त्या राज्याची वाटणी कशी झाली आहे हे जालावर तसेही बर्याच वेळा चर्चिले गेले आहे; त्यावर पुन्हा लिहित नाही.
घटना:-
पाकिस्तानने वेष बदललेल्या सैनिकांना मुजाहिदीन्/काश्मीरी स्वातंत्र्यसैनिक म्हणुन काश्मीरात पाठवले. जेणेकरुन काश्मीरी "जनतेचा उठाव" म्हणुन घडलेल्या घटनेला दाखवुन काश्मीर तोडता येइल.ते तसे पोचलेसुद्धा. त्यांनी तिथे काही प्रमाणात हिंसाचारही केला. भारतीय सैनिकांवर हल्ले केले. उद्देश हाच की काश्मीरी जनताच कशी "बंड" करुन उठली आहे व आता भारताच्या ताब्यातील काश्मीरमध्ये कसे आराजक माजले आहे आणि त्याचवेळी पाकव्याप्त काश्मीर कसे सगळे आलबेल आहे हे दाखवणे. म्हणजेच,भारताला अचानक उठाव करुन तिथुन हुसकावून लावणे व अलगद काश्मीर घशात घालणे. काश्मीरींनी त्यालाही(पाकमध्ये सामील होण्यासही) विरोध केला तर ताबडतोब त्यांना तथाकथित स्वातंत्र्य देतानाच स्वतःचे अंकित राष्ट्र बनवणे.
पहिले काही असे "स्वातंत्र्यसैनिक" भारतात पोचताच ह्याचा सुगावा लागला, व रागाचा पारा चढलेल्या भारताने ताबडतोब मग थेट आंतरराष्ट्रिय सीमा राजसथान्-पंजाब मार्गे ओलांडत फारशा प्रतिकाराशिवाय लाहोर-सियालकोटाच्या अगदि जवळपर्यंत धडक मारली व अचानक घोडदौड थांबवली. का? तर भारतीय लष्कराला थेट निर्विरोध इतका आत प्रवेश मिळणे म्हणजे कदाचित एखादा मोठा trap असु शकत होता. निदान तशी शंका भारतास आली आणि अत्यंत सावधगिरीने पावले उचलण्याचे ठरवण्यात आले. एवढा वेळ मिळाल्याने पाकिस्तानने लागलिच सैन्याची जमवाजमव करुन लाहोरच्या पिछाडीपर्यंत सैन्य आणले. व आख्खे शहर काही दिवस का असेना पण ताब्यात ठेवायचा भारताचा प्रयत्न हुकला. पण मुळात असे झालेच कसे? लाहोर आणि सियालकोट ही महत्वाची शहरे संरक्षणहीन कशी ठेवली गेली? कारण----------
कारण भारत मुळात आंतरराष्ट्रिय सीमारेषा ओलांडेल हेच मुळात लश्करशहा अयुब खान ह्याला पटत नव्हते/वाटत नव्हते. त्याची अपेक्षा ही होती की मुळात काश्मीर हा भारत्-पाक ह्यांच्या ताब्यात अर्धा-अर्धा असा आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेवरुन (LineOfControl) म्हणजे काश्मीरमधुन भारत हल्ला करेल. ह्या भागात लढाई करणे पाकिस्तानला अत्यंत सोयीचे होते कारण युद्धमान स्थितीत (दोन्ही बाजुंच्या ताब्यातील भौगोलिक रचना लक्षात घेता)भारताला आपल्या सैन्याला रसद पुरवठा करणे अत्यंत जिकिरीचे होते.तेच पाकिस्तानला अत्यंत सोयीचे होते. हे लक्षात घेउन भारताने तिथे युद्ध करणे टाळले. इतकेच काय, तर भारताच्या ताब्यातील काही चौक्याही काश्मीरमध्ये पाकिस्तानने ताब्यात घेतल्या.
खेमकरण सेक्टर मध्ये अमेरिकेकडून पाक ने मिळवलेले पॅटन रणगाडे अब्दुल हमीद सारख्यांच्या पराक्रमामुळे आपण थांबवू शकलो ही मोठीच गोष्ट ठरली.
कच्छ च्या रणातील , पाकसीमेवरील गुजरात राज्यातील ५०० स्क्वेअर किलोमीटर च्या आसपासचा भाग पाकिस्तानने घशात घातला.
(मॅकमोहन लाइन जशी चीनसोबत वादग्रस्त मुद्दा आहे; चर्चेचा मुद्दा आहे; काश्मीरवरून पाक सोबत वाद आहेत; तसेच कच्छ च्या रणाबद्दलही पाकिस्तानशी वाद आहेत.
तिथेही आंतरराष्ट्रिय सीमा स्पष्ट आणि उभयपक्षी मान्य नाही. का कुणास ठाउक, तो वाद कधी इतका प्रकाशझोतात नसतो; इतर दोघांइतका.
शिवाय आता त्याच भागाच्या आसपास भरपूर नैसर्गिक वायूचे साठे सापडल्याने एक नवेच वळण त्या वादाला लागू शकते. असो.)
.
म्हणजे, पाकिस्तानातला पंजाबकडला काही भाग भारताच्या ताब्यात तर काश्मीरकडचा भारताचा काही भाग पाकिस्तानच्या ताब्यात! स्टेलमेट स्थिती निर्माण झाली.आंतरराष्ट्रिय समुदायाने स्वतःहून हस्तक्षेप करत समेटासाठी दोन्ही बाजुंवर दबाव टाकला. तेव्हाच्या U S S R मधील ताश्कंद(आजच्या उझबेकिस्तान) येथे दोन्ही बाजुंना समेटासाठी बोलावण्यात आले. युद्धपूर्व स्थिती आणि कब्जा दोन्ही बाजुंनी जवळ्पास जशाला तसा मान्य करण्याचे ठरले.
१९६५च्या पूर्वी जशे नकाशे होते, तसेच ते नंतरही राहिले. ज्या दिवशी ताश्कंद मध्ये तह झाला, तत्काळ त्या रात्री भारतीय पंतप्रधान ह्यांचा अचानक रात्री हृदयविकाराने मृत्यु झाला.
परिणामः-
दोन्ही देशातल्या काही लोकांनी हे युद्ध आपणच जिंकले असा दावा करायला सुरुवात केली. युद्धोत्तर जेवढी वर्षे गेली तितका हा दावा करणार्यांची संख्या वाढतेच आहे दोन्ही देशात. प्रत्यक्षात युद्धात झालेल्या नुकसान, मानहानी ह्यामुळे जनमत आणि लश्करातील काही शक्ती पाकिस्तानी सत्ताधीश अयुबखान ह्यांच्या विरोधात गेल्या. राज्य करणे कठीण होउन बसल्यामुळे काही काळाने अयुबखान ह्यांना सत्ता सोडावी लागली. अप्रत्यक्षपणे सत्ता तेव्हा नुकत्याच लंडनमध्ये शिकुन आलेल्या पुढारलेली राहणी असलेल्या एका नव्या नेत्याकडे येउ लागली.....
त्याचे नाव झुल्फिकार अली भुत्तो. प्रत्यक्षात ह्या नेत्यास पंतप्रधान होण्यास बराच अवकाश लागला.
भारत आणि पाकिस्तान ह्यांच्या दोन्ही अर्थव्यवस्था अधिकच अड्चणीत आल्या. भारतात आधीच अन्नटंचाइ होती, ती अधिकच जाणवु लागली. म्हणुनच हरित क्रांतीच्या दिशेने प्रयत्न करण्याचे भारतीय सत्ताधार्यांच्या आणि इतर प्रभावशाली घटकांच्या लक्षात येउ लागले. सुरुवातीची काही वर्षे पाकिस्तानचा विकासदर हा भारतापेक्षा खूपच जास्त होता तो हळुहळु घसरु लागला. पाकिस्तान परकिय मदतीवर अधिकाधिक अवलंबुन होउ लागले. पाकिस्तानी लश्करात सर्वाधिक भरणा पश्चिम पाकिस्तानातल्या पंजाबी लोकांचा होता. ते अधिकाधिक सामुग्री स्वतःकडे जमवु लागले.त्यासाठी पूर्व पाकिस्तान(आताचा बांग्लदेश) मधीलही महसूल सर्रास बंगाली लोकांकडुन थेट हिसकावुन पश्चिम पाकिस्तानात वळवण्यात येउ लागला. आधीच उपेक्षित जिणे जगणार्या बंगाली पाकिस्तान्यांना अधिकच एकटेपण जाणवले. अलगाववाद वाढु लागला. बांग्लादेश निर्मितीची बीजे रोवली जाउ लागली.
इकडे भारतीय गुप्तचर यंत्रणा सक्षम करण्यासाठी खास RAW(Research And Analysis Wing)ची स्थापना करण्यात आली. ह्या रॉने पुढे अत्यंत महत्वाची कामगिरी युध्दकालात तसेच शांतताकालातही बजावली.
एक आपल्याला माहित नसणारी घटना म्हणजे ह्यामुळे भारत वाटातो तितका दुबळा नाही हे चीनच्या लक्षात आले. भारताच्या मदतीला थेट रशिया म्हटल्यावर मग तर भारताला दाबणे आपल्या एकट्याच्या आवाक्यातले काम नाही हे चीनच्या लक्षात आले. रशिया-चीन ह्या दोन देशातील वितुष्ट तसेही सीमाप्रश्नावरुन होतेच. ते वाढायला सुरुवात झाली. आणि १९७१ ला रशियाच्या विरुद्ध म्हणुन माओशासित चीन आणि अमेरिकन अध्यक्ष रिचर्ड निक्सन ह्यांची ऐतिहासिक द्दृश्ट्या महत्वाची भेट झाली. अमेरिकेशी ह्या भांडवलशाही जगताच्या नेत्याशी संबंध दृढ करण्याचे प्रयत्न कम्युनिस्ट चीनमध्ये सुरु झाले आणि पुढे दशकभरातच सर्वात मोठा कम्युनिस्ट देश, चीन हा भांडवलशाही अमेरिकेचा महत्वाचा आंतरराष्ट्रिय आर्थिक आणि सामरिक भागीदार बनला.
आपल्यातल्या काहिंना वाटते तसे हे युद्ध आपण १००% जिंकले, अशातला भाग नाही. आपण काही फार कमावले नसले तरी गमावले नाही इतकेच. पाकिस्तानी वायू दल तर आपल्या वायूदलाला वरचढ ठरले म्हणण्यास वाव आहे. वर आपले पंतप्रधान हे करार केल्याबरोबर एका रात्रीतच हृदयविकाराच्या झटक्याने कसे काय गेले ह्याबद्दल एक संशयी चर्चा दबक्या आवाजात कायम सुरु राहिली ते वेगळेच.
.
.
मोठ्या लढाई, युद्धानंतर नुसता निकाल नाही तर कित्येकदा aftermaths हेच महत्वाचे ठरतात . जसे बाजीप्रभु घोडखिंडीत लौकिकार्थाने धारातिर्थी पडले तरीही त्या घटनेला "पराभव" कुणीच मानत नाही. उलट "यशस्वी योजना" असेच मानतात. तसेच पर्शियन साम्राज्याच्या अजस्र सैन्याच्या आक्रमणाला उत्तर म्हणुन केवळ तीनेकशे च्या घरात फौज घेउन निघणार्या, लढणार्या आणि धारातिर्थी पडलेल्या स्पार्टाच्या लिओनायडासच्या राजालाही गौरवलेच जाते, त्याने पर्शियन आक्रमण खिंडीत थोपवून धरले म्हणुन. किंवा अलिकडील इतिहासात तर "डंकर्कची यशस्वी माघार" हा शब्द्च रूढ झाला. "डंकर्क गेले" किंवा "हारलो" असे कुणी म्हणत नाही. ह्या तीनही लढायांसारखेच इतरत्रही महत्वाचे ठरते ते aftermaths. रशिया१९७९ मध्ये अफगाणिस्तान ह्या लश्करीदृष्ट्या दुय्यम देशावर चालुन गेला, दशकभर ठाण मांडुन बसला. पण परिणामी आर्थिक आघाडीवर तीन्-तेरा वाजु लागले. वरवर बघता रशियाने भूभाग कमावला तरी शेवटी दूरच्या काळात त्यांची हारच झाली.
.
तर या घटनेचं aftermaths म्हणजे, आपण युद्धात फारसं गमावलं नाही. शास्त्रीजींच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतरही भारतात लोकशाही कायम राहिली. लष्कराचे कौतुक, गौरव झालेच; पण विजयोन्मादात थेट सत्ताच भारतीय लष्कराने हाती घ्यायचा प्रयत्न केला ; असे झाले नाही.
तिकडे पाकमध्ये अस्थिरता माजली. अयुब खान ह्यांना अंतर्गत विरोध तीव्र झाला. सत्ताधारी बदलण्याच्या दिशेने वाटचाल सुरु झाली; पण सत्ताधारी बदलले
तरी सत्तेची सूत्रे लष्कराकडेच राहण्याची तिथली परंपरा अधिकच दृढ झाली.
.
१९७१ च्या युद्धातील दैदिप्यमान यशामुळे त्याबद्दल आपण बरेच वाचलेले ऐकलेले असते. पण १९६५ बद्दल त्यामानाने कमी चर्चा होते.म्हणून मुद्दाम१९६५ बद्दल असलेली माहिती संकलित केली आहे. इतर प्रतिसादांमधुन अधिकाधिक्,उपयुक्त भर पडत जाइल अशी आशा आहे.
तुमच्याकडे अधिक माहिती असेल; काही दुरुस्ती सुचवायची असेल; तर अवश्य इथे द्या.
--मनोबा
लेख आवडला...आला तेव्हाच वाचून
लेख आवडला...आला तेव्हाच वाचून झाला होता.पण प्रतिक्रीया दिली नव्हती. ज्यांना ह्या युद्धाबद्द्ल फार काही माहित नसतं त्यातलीच मी. त्यामुळे काही फार उपयोगी प्रतिक्रीया देऊ शकणार नाही.
नववीच्या वर्षापर्यंत मी इतिहास फक्त एक आपला आहे शाळेत विषय म्हणून शिकले. त्याबद्द्ल काहीच विचार केल्याचा आठवत नाही. पण दहावीत एक चांगल्या बाई आल्या शिकवायला. पहिल्याच वर्गाला त्यांनी रोज येणार्या बातम्यांचा आणि इतिहास विषयाचा संबंध आहे याचा साक्षात्कार घडवला. तरी ते वर्ष संपलं आणि इतिहास विषय पुढे अभ्यासालाच नव्हता त्यामुळे परत सगळा उत्साह थंड पडला. नंतर बीएस्सीला दुसर्या(का पहिल्या) वर्षाला इतिहास विषय होता-पण फक्त भारताचा स्वातंत्र्यलढा....'अँड दे लिव्ड हॅप्पीली एव्हर आफ्टर'च्या थाटात भारताला स्वातंत्र्य मिळाले-पाकिस्तान निर्माण झाला, की संपली गोष्ट.
१९४७ साली भारताला स्वातंत्र्य
१९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळताच अमेरिकेने स्वतः मैत्रीचा हात पुढे करत भारतात अमेरिकन तळ मागावायचा प्रयत्न केला. भारताने तो फेटाळुन लावल्यावर राजकिय दृष्टीने अमेरिकेच्या मनात भारताविषयी अढी निर्माण झाली ती पुढे कित्येक दशके वाढतच गेली. हे कुठे आले आहे? मला तरी विकिवर असे काहीही आढळले नाही.
हे पाहा https://en.wikipedia.org/wiki/India%E2%80%93United_States_relations
रुझ्व्हेल्ट यांनी चर्चील ला भारताला स्वातंत्र्य देण्याविषयी सांगितले होते. त्यांनी ते आततायीपणे झटकले.
नंतरही खरे तर अमेरिकेने १९४७ ते १९५९ पर्यंत अमेरिकेने भारताला अन्नधान्य वगैरेची मोठी मदत केली. जीप पण याच काळात भारतात आली. पण नेहरूंचा अतिशहाणपणा बहुदा नडत राहिला. कारण चीन चे साम्यवादी शासन मान्य न करणे किंवा कोरियन युद्धात नको तेव्हढी मुत्सद्देगीरी करणे यामुळे त्यांनी भारताच्या पायावर धोंडे पाडले (असे माझे मत विकि वाचून झाले. :) )
नेहरू साम्यवादीच होते असे म्हंटले पाहिजे कारण नंतर रशियाबरोबर त्यांनी घट्ट मैत्री केलीच! केनेडीनेही १९६१ मध्ये भारताला चुचकरण्याचा प्रयत्न केला. चीन युद्धात मदतही केली. इतकी की चीन ने दुसरे आक्रमण केले तर अमेरिका भारताच्यावतीने युद्धात उतरेल असा इशारा दिला. इतकेच नाही तर किटी हॉक ही युद्ध नौका बंगालच्या उपसागरात धाडली. अमेरिकेनेच स्वतःहून साठ की सत्तरच्या दशकात आय आयटी कानपुरला पहिला संगणक दिला होता.
पण आपल्या पंतप्रधानांना रशियाचे नामक उंटाचे मुके घेणे जास्त पसंत होते. आता दहावेळा हात पुढे करूनही भारत काही पुढे येणारच नसेल तर कसे संबंध प्रस्थापित होतील?
१९४७ ते १९६२+ या काळात भारताला अमेरिकेने भरपूर मदत केली आहे.
पुढे केनेडींचा खून झाला आणि निक्सन काळात भारताला डावलले गेले ते गेलेच! त्याच वेळी पाकिस्तानने बरोबर वेळ साधली आणि आपल्याकडे अमेरिकेचे लक्ष वळवले. त्यांचा युद्धातही पाठिंबा मिळवला.
म्हणजे १९६२ मध्ये अमेरिकेसारखे बलदंड राष्ट्र भारताच्याबाजूने उभे होते. याच अमेरिकेला आपण इतके लाथाडले की १९७१च्या युद्धात हाच देश आपल्या विरुद्ध पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला!
फार अवांतर झाले असल्यास क्षमस्व!
विकीची सगळी माहिती खरी नसते.
विकीची सगळी माहिती खरी नसते.
+१, विकी ची माहिती वरून एक अनुभव माझाही. कदाचित धाग्याशी विसंगत मुद्दा :
खूप वर्षांपूर्वी सरिता जोशी ह्यांच्या बद्दल विकीवर वाचत असतांना त्यांच्या 'पर्सनल लाईफ' विभागात लिहीलं होतं - ह्यांना तिन मुली आहेत - केतकी दवे (तीच ती अरारा वाली), पुर्वी जोशी आणि ........निवेदिता जोशी :O ... मला वाटलं असेल दुसरी कोणी निवेदिता जोशी तर पुढे असाही खूलासा केला होता की 'Nivedita Joshi is married to veteran marathi actor Ashok Saraf'... हे अजबच होतं. नंतर ते खोडून तिथे दुरुस्ती केली गेली.
छान लेख
छान लेख. राम गुहा ह्यांनी इंडिया आफ्टर गांधी पुस्तकात १९६५ बद्दल अशी बरीच माहिती दिली आहे. शिवाय नजम सेठी हा पाकिस्तानी अवलिया चक्क पाकिस्तान सगळी युद्धे हरला आहे आणि आपल्या आर्मी मुळे पाकिस्तानचे प्रचंड नुकसान झाले आहे असे बिनधास्त सांगत असतो. सध्या सेठी वर पाकिस्तानी फारच खवळून आहेत.
ह्या ह्या हे फारच सौम्य आहे
ह्यांना ठेचून मारले पाहिजेल, इंडिअन एजंट आहेत. गद्दार आहेत. सेठी बाबा तर आत्ता नवाज शरीफ्ला निवडून आणण्यासाठी खूप घोटाळा केला अशी एक पुडी सोडून देवून हैराण केले आहे. कठीण आहे. आपल्याकडे जसे रादिया टेप्स झाले तशीच टेप सेठीची आहे असे सांगितलेलं गेले आहे पण टेप काही कोणी प्रसिद्ध करत नाहीये आणि लोक पण भरपूर विश्वास ठेवतात. माझा एक कलिग तर म्हणजे एकदा बोलायला लागला की आता हा आत्ता उठून सेठीला गोळ्या घालणार असेच वाटते. फार कमी लोक सरळ विचार करतात. गम्मत म्हणजे त्याचे असे स्पष्ट मत आहे की २६/११ चा मुंबईचा हल्ला हा आपल्याच भारतीय हेरखात्याने केलाय आणि ९/११ तर ज्यू आणि अमेरिकन लोकांनीच केलाय. कितीही सांगितले तरी पटत नाही. अवघड लोक आहेत.
खेमकरण ची स्टोरी. ऐकीव मामला
खेमकरण ची स्टोरी. ऐकीव मामला आहे. सत्यासत्यता तपासून पहावी लागेलच.
पण भारतीय स्थलसेनेच्या फौजेला पाकी पॅटन रणगाड्यांनी हैराण केले होते. रणगाडे शेतात ठिया देऊन बसले होते. व अरुण वैद्य वगैरे मंडळी रात्री गेली व त्यांनी कालव्यातले पाणी शेतात सोडून दिले. त्यामुळे रात्र संपेपर्यंत सगळे शेत चिखलमय झाले व दुसर्या दिवशी पाकी मंडळी पाहतात तो काय ... रणगाडे चिखलात रुतले. व परिणाम व्हायचा तोच झाला. (All this sounds fantastic ... but needs verification.)
एक मत
आपल्याच माणसाचे कौतुक करु नये म्हणतात. पण इथे पॅटन रणगाड्यांबद्दल जी चर्चा चालू आहे त्यांत माझ्या माहितीची भर घालावी असे वाटते.
माझे मामा, डॉ. वा.द. पटवर्धन हे आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ होते आणि पुण्याच्या तेंव्हाच्या ईआरडीएल आणि एआरडीई या सरकारी संस्थांचे डायरेक्टर होते. या युद्धाच्या वेळेस त्यांनी पॅटन टँक्स चा अभ्यास करुन त्यातील त्रुटी शोधून काढल्या होत्या. एका विशिष्ठ ठिकाणी आघात केल्यास हे टँक निकामी होत असत. ही माहिती भारतीय लष्कराला पुरवल्यामुळे त्यांनी अनेक पॅटन टँक्सचा खातमा केला. त्याबद्दल माझ्या मामांना पद्मश्री मिळाली. ही हकीगत त्यांनी आम्हाला रिटायर झाल्यावरच सांगितली.
ते फारच मितभाषी होते. पुढे, डॉ. अब्दुल कलाम राष्ट्रपती झाल्यावर त्यांना पुण्यात भेटायला आले आणि त्यांच्या पाया पडले तेंव्हा आम्हाला कळले की ते माझ्या मामांना गुरु स्थानी मानत.
सांगायचा उद्देश हाच आहे की कित्येक दैदिप्यमान घटनांमागे कुणा शास्त्रज्ञांचे हात असतात, पण ते कायम पडद्याआडच रहातात.
वा तिर्शिंगराव!!! नवीनच
वा तिर्शिंगराव!!! नवीनच माहिती मिळाली. ग्रेट _/\_
कुतूहलापोटी नेटवर सर्चवले असता १९७४ सालच्या पद्मश्री लिष्टीत त्यांचे नाव आढळले. त्यांच्यावर एक छोटेसे विकी आर्टिकलही तिथून सापडले.
http://en.wikipedia.org/wiki/Waman_Dattatreya_Patwardhan
विकीमधील खालील माहितीही रोचक आहे.
He developed the solid propellant for India's first space rocket launched at Thumba. He was responsible for developing the detonation system of India's first nuclear device which was successfully tested in 1974,[1] an operation codenamed Smiling Buddha.
छान
लेख सुंदर झाला आहे.
गब्बर यांच्या प्रतिसादात एक छोटी भर. कालवा फोडला ही गोष्ट खरीच आहे. त्या कालव्याचे नाव इच्छोगिल. पंजाबी शेतकर्यांनी मोठेच नुकसान सहन केले. आर्मीने युद्द्धसमाप्तिनंतर लगेच तो बांधलाही. पण पिकांचे नुकसान झालेच. तेव्हाची एक अत्यंत मोठी जमेची बाजू म्हणजे १९७५ पर्यंत आपली पंजाब सीमेवरची जनता खंबीरपणे भारताच्या बाजूने होती. केवळ भारताच्या बाजूने होती असेच नव्हे तर ती पाकिस्तानला शत्रू मानत होती. फाळणीदरम्यान झालेला शिखांचा नरसंहार आणि गमवावे लागलेले प्रिय लाहौर यांचा सल दीर्घकाळ त्यांच्या मनात होता. विशेषतः लाहौर ही रणजितसिंहाच्या शिख साम्राज्याची राजधानी. शिखांचा मानबिंदू. शिखांच्या मनातली सूडाची आग विझली नव्हती. पंजाब्यांच्या या भक्कम पाठिंब्यामुळे पाकिस्तानला नेत्रदीपक विजय मिळवता आला नाही. ही बाब बरोबर हेरून पुढे धूर्तपणे खालिस्तानची बीजे रोवली गेली. कॅनडा, अमेरिका येथील शिखांनी यात हिरिरीने भाग घेतला. अजूनही कॅनडातले शिख प्रचंडपणे भारतविरोधी आहेत. हा शिताफीने पेरलेला अंतर्गत उद्रेक आपल्याला युद्धापेक्षाही महाग पडला. आपल्या पंतप्रधानांची आहुती घेऊनही तो थांबलेला नाही.
कश्मीरमध्ये निर्विवाद विजय मिळवणे कठिण होते; आता तर अधिकच आहे. कश्मीर आघाडीवरचा ताण कमी व्हावा म्हणून पंजाब आघाडी उघडली गेली. गुजरात-कच्छमध्येही आघाडी उघडण्याची योजना होती पण तोपर्यंत सीज़्फायर झाले.
हा लेख वाचायचाच राहिला
हा लेख वाचायचाच राहिला होता.
माझीही माहिती अशीच काहीशी आहे. पाकिस्तानचं शस्त्रबळ एकेकाळी खूप जास्त होतं, म्हणजे लहान देश असूनही भारताच्या तुल्यबळ. त्यामुळे भारत अधिक प्रबळ होण्याआतच सोक्षमोक्ष लावून टाकावा असा प्रयत्न होता. अतिशय वेगाने काश्मिर घेऊन टाकू असं त्यांना वाटलं होतं. तसं झालं नाही, आणि जसजसं युद्ध पुढे गेलं, तसतसं कोणीच जिंकणार नाही अशा परिस्थितीला पोचलं.
पाकिस्तान आणि भारत यांच्या लष्करावरच्या खर्चाची तुलना खाली दिलेली आहे - जीडीपीच्या टक्केवारीत. आकडे ८८ सालपासूनचे आहेत, पण त्याआधीही खर्चाचा ट्रेंड असाच असावा. गेल्या तीन दशकांत पाकिस्तानमधलं लष्कर तुलनात्क दृष्टीने कमकुवत झाल्यासारखं वाटतं.
+
>>पाकिस्तानचं शस्त्रबळ एकेकाळी खूप जास्त होतं, म्हणजे लहान देश असूनही भारताच्या तुल्यबळ.
हे अजूनही आहे असं वाटतं. खूप जास्त किंवा जास्त नसावं पण अगदीच कमी वगैरे नसणार. म्हणूनच भारत इशारे देणे यापलिकडे फार काही करू शकत नसावा.
याची कारणे ब्रिटिश काळाच्या परिस्थितीतही असावीत. ब्रिटिश काळात अफगाणिस्तान सीमा बहुधा नेहमी अशांत रहात असावी. त्यामुळे ओव्हरऑल लष्कराची उपस्थिती/इन्फ्रास्ट्रक्चर आजच्या पाकिस्तानात जास्त असण्याची शक्यता आहे. आजचे राजस्थान पंजाब वगैरे सीमावर्ती भाग त्या काळी इंटिरिअर भाग होते. भारताला स्वातंत्र्यानंतर हे सगळे नव्याने उभारायला लागले असावे.
बहुधा नसावे
याची कारणे ब्रिटिश काळाच्या परिस्थितीतही असावीत
कदाचित तसे नसावे.
माझ्या (वाचीव) माहितीवरून असे वाटते की १९४७ पूर्वी ब्रिटिशांनी उभारलेल्या सर्व ऑर्डिनन्स फ्याक्टर्या स्वतंत्र भारतातच राहिल्या. पाकिस्तानी प्रदेशात एकही नाही. त्यामुळे इतर लष्कराची विभागणी झाली तरी मूळचे इन्फ्रास्ट्रक्चर भारताच जास्त राहिले.
पाकिस्तान नंतर अधिक तुल्यबळ झाला तो अमेरिकी कंपूत गेल्यामुळे.
+१ शिवाय नव्या सीमेभोवती
+१
शिवाय नव्या सीमेभोवती दोघांनाही इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करावे लागलेच. त्या न्यायाने बांगलादेशाही तितकाच शस्त्रसज्ज हवा होता पण तसे नाहिये (अर्थात त्याची याव्यतिरिक्तही बरीच वेगळी कारणे आहेत).
अमेरिकी कंपूत जाणे, सिंधुपार/भोवती अनेक काळाने पुन्हा एक इस्लामी राष्ट्र उभे राहिल्याने अरब राष्ट्रांची सुरूवातीला (व काहि प्रमाणात अजूनही) होत असलेली घसघशीत मदत, लोकांना - जनतेला युद्धखोरीत गुंतवून ठेवण्यात आलेले लष्करी यश यामुळे बराच पैसा शस्त्रसज्जतेकडे वळावता आला.
+
+
यप्स.
पाकिस्तान एकूणात भारताच्या बरोबरीने बोलू पाही.
(क्वचित नकाशा पाहून बोलायचं झालं तर "आपण पाकपेक्षा अमुक अमुक पट मोठे आहोत" वगैरे म्ह्ण्णारी मंडळी भेटतात.
पण युद्धे नकाशे करत नाहीत. लष्करं युद्धं लढतात.
चीनच्या तुलनेत जपान दिसायला कैच नै. पण त्यानं बराच काळ चीनवर वर्चस्व गाजवलं.
जर्मनीदेखील रशियनसाम्राज्य + फ्रान्स ह्या दोघ्यांच्या एकत्रित आकार/लोकसंख्या ह्यापेक्षा लहानच.
पण पहिल्या आणि दुसर्या महायुद्धातही जर्मनीनं फ्रान्स + रशिया ह्यांना भूमीवरील थेट युद्धात अचाट लढत दिली होती.
(१९१०च्या दशकात ब्रिटिश साम्राज्य जागतिक पातळीवरचं अतिबलाढ्य म्हणवलं जात असलं तरी लष्करीकरणात जर्मनी कैक पुढं होता.
युरोपमधील फ्रान्स + ब्रिटन ह्यांची एकत्रित जितकी खडी फौज होइल, जवळपास तितकीच एकट्या जर्मनीनं उभारली होती असं ऐकलय.
)
पाकिस्तान फक्त भारताहून लहान "दिसतो" म्हणून क्षुल्लक आहे; असे वाटत असेल तर ते चूक आहे.
त्याचं लष्करीकरण त्याकाळात अधिक झालं होतं. त्याला इतर ठिकाणाहून अधिक मदत मिळत होती.
मदत आर्थिक रुपात होती तशीच थेट ऐनजिनसी मदत -- म्हणजे अत्याधुनिक शस्त्रसामुग्री वगैरेही मिळत होती.
)
देशाचा भौगोलिक आकार अथवा अर्थव्यवस्थेचा आकार आणि एकूण लश्करी सज्जता ह्यांचं व्यस्त प्रमाण सध्याच्या काळात पहायचं तर एक उत्कृष्ट उदाहरण म्हंजे उत्तर कोरिया.
नकाशावर टिचभर दिसणारा हा देश ; लोकसंख्येच्या मानानं पहिल्या दहांतही नसावा.
पण एकूण खडं लष्कर , संख्याबळाच्या दृष्टीनं पहिल्या पाचात येतं ह्यांचं स्थान(खरंतर पहिल्या दोघा-तिघांतच येतं, पण नक्की आठवत नाहिये).
अर्थातच हीसुद्धा ऐकिव माहिती आहे.
ही उदाहरणं फक्त "१९६५लाही अशी परिस्थिती असणं शक्य आहे " ह्या विधानाच्या पुष्ट्यर्थ दिलीत.
संख्याबळ
पण एकूण खडं लष्कर , संख्याबळाच्या दृष्टीनं पहिल्या पाचात येतं ह्यांचं स्थान(खरंतर पहिल्या दोघा-तिघांतच येतं, पण नक्की आठवत नाहिये).
अर्थातच हीसुद्धा ऐकिव माहिती आहे.
केवळ लष्करी संख्याबळात पहिले २-३ बहुधा चीन, अमेरिका आणि भारत आहेत बहुतेक. नक्की मलाही ठाऊक नाही.
भावार्थ
तपशीलात दुरुस्त्या असू शकतात.
माझ्या म्हणण्याचा सारांश इतकाच :-
देश लहान वाटत असला तरी शेजारच्या मोठ्या देशाहूनही तो लहानसा देश लश्करीदृष्ट्या अधिक सुसज्ज असणे शक्य आहे.
तसा पाकिस्तान बराचसा तुल्यबळ होता १९६५पर्यंत.
नंतर आधुनिकीकरण करत करत भारत पाकिस्तानहून वरचढ झालेला असू शकतो.
anybody there?
अरे कुणी वाचतच नैय्ये का?
काही दुरुस्ती वगैरे कुणाला सुचवायची नाही का?
असो.
हा लेख पूर्वप्रकाशित आहे.
दीड दोन वर्षाखाली मिपावर टाकला होता.
त्यावेळी ऋषिकेश आणि थत्ते ह्यांनी त्या लेखात सुचवलेल्या अनेक दुरुस्त्या ह्या लेखात केल्या आहेत.
त्याबद्दल त्यांचे आभार. आणि इथे तीन रेटिम्ग देणार्याचे आभार.