कलाजाणिवेच्या नावानं...

कलाजाणिवेच्या नावानं...

लेखिका - शर्मिला फडके

कलाजाणिवा अशा काही असतात आणि त्या घडवायच्या किंवा जाणीवपूर्वक विकसित करायच्या असतात असं काही माझ्या आई-वडिलांना, शाळेतल्या शिक्षकांना किंवा आजूबाजूच्याही कुणाला माहित असल्याचं मला माझ्या लहानपणी, अगदी पुढे कॉलेजात गेल्यावरही जाणवलं नाही. हा पंचवीसेक वर्षांपूर्वीचा काळ. पण अगदी विसावं शतक संपेपर्यंतही असं आसपास फारसं काही कुठे ऐकिवात आलं नाही, की कलाजाणिवा वाढवण्याचे काही प्रयोग सार्वत्रिक पातळीवरुन आजूबाजूच्या समाजात होत आहेत. 'आपला समाज फारसा कलाशिक्षित नाही, कलासुसंस्कृत तर नाहीच', ही जी बोंबाबोंब होत असते त्यामागे हेच महत्त्वाचं कारण. कलाजाणिवा जाणीवपूर्वक वाढवायला हव्या ही जाण नव्या पिढीबाबत त्यांच्या पालकांमध्ये, समाजात रुजायला एकविसावं शतक उजाडलं.

आणि तरी मी राहत होते ठाण्यासारख्या सुशिक्षित, मध्यमवर्गीय शहरात. ठाण्यातली पहिली आर्ट गॅलरी आत्ता चार-पाच वर्षांपूर्वी नुकती सुरू झाली आहे हे लक्षात घेता ही गोष्ट काही फार धक्कादायक वाटायला नको.
शाळेत असताना कलेशी संबंध, चित्रकलेच्या एलिमेंटरी-इंटरमिजिएट ड्रॉइंगच्या परीक्षा, कॅम्लिनच्या चित्रस्पर्धा, इतकाच मर्यादित होता. मला चित्रकलेची आवड आहे याचं आई-वडिलांना मर्यादित कौतुक होतं आणि म्हणून गणपतींच्या दिवसात घरच्या गौरींचे पितळी मुखवटे दर वर्षी रंगवायचं, त्यांचे डोळे, ओठ कौशल्यानं चितारायचं काम माझ्यावर जबाबदारीनं सोपवलं गेलं. सुदैवानं आमच्या घरात वाचनाची आणि प्रवासाची जबरदस्त आवड सगळ्यांनाच होती. सुट्टी सुरू होताना घरात पुस्तकांचा ढिगारा येऊन पडलेला असे. कोणत्याही प्रकारच्या वाचनावर बंधन नव्हतं. विविध मासिकं घरात येत आणि एकाच वेळी दोन लायब्रर्‍या चालू असत. शाळा संपेपर्यंत माझा जवळपास सगळा भारत बघून झाला होता, अगदी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत. त्यामुळे जाणीवपूर्वक कोणी प्रयत्न केले नाहीत, तरी एक बेसिक सांस्कृतिक जाणीव ह्या वाचन आणि प्रवासांतून नकळत विकसित होत गेली.

कलाविषयक जाणिवांबद्दल आत्ता विचार करताना मात्र त्या वयातल्या दोन-तीन गोष्टी आठवतात. अनेक चित्रं आणि चित्रकार या ना त्या निमित्तानं माझ्या जडणघडणीच्या काळात माझ्या आसपास लपेटून राहिलेले होते. अगदी रविवर्मापासून दलालांपर्यंत. उदाहरणार्थ, माझ्या आजोबांच्या घरी असलेलं एक जुनं, सागवानी काळ्या लाकडाचं कपाट, ज्याच्या अर्ध्या भागावरच्या काचेवर एका नक्षीदार खांबाला रेलून उभ्या असलेल्या एका सुंदर, नऊवारी साडी नेसलेल्या बाईचं चित्र होतं. तिच्या हाताजवळ एक हंस पक्षी होता. त्या बाईच्या उभं राहण्यातला डौल, तिची सुंदर बोटं, गळ्यातले, अंबाड्यावरचे दागिने ह्या सगळ्यांकडे मी तासनतास पाहत राही. माझे आजोबा सांगत, “ही राजा रविवर्माची 'दमयंती', फार थोर चित्रकार होऊन गेला हा रविवर्मा.” घरात, शाळेत भिंतींवर टांगलेल्या तसबिरींवर ज्या लक्ष्मी, सरस्वती असतात, त्याही रविवर्माच्याच हेही त्यांच्याकडूनच कळलं होतं. माझ्या आयुष्यात आलेला राजा रविवर्मा हा ह्या अर्थानं पहिला चित्रकार. आजोबा रविवर्माच्या गोष्टी सांगत. त्या का आणि कुठल्या; तर त्यांचं जन्मगाव, म्हणजे आमचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातलं किन्हई. किन्हईला तिथल्या औंध संस्थानाच्या महाराजांचा वाडा, मंदिर होतं. ते संस्थानिक म्हणजे औंधचे राजे श्रीमंत भवानराव उर्फ बाळासाहेब पंतप्रतिनिधी. राजा रविवर्मा औंध संस्थानामध्ये त्यांच्या आमंत्रणावरून बराच काळ येऊन राहिले होते. तिथे त्यांनी अनेक उत्कृष्ट चित्रं रंगवली. आमचं कुलदैवत किन्हई गावात असल्यानं तिथे दर एक-दोन वर्षांनी जाणं व्हायचंच. त्या वेळी यमाई देवीच्या डोंगरावर औंधच्या संस्थानिकांनी म्हणजे भवानरावांनी स्वत: बांधलेल्या वस्तुसंग्रहालयाला आवर्जून भेट देणं, हाही कुळाचाराचाच भाग असल्यासारखं होतं. त्या संग्रहालयामध्ये अप्रतिम चित्रांचा, कलावस्तूंचा खजिना आहे. राजा रविवर्माने स्वत: चितारलेली सात रंगचित्रे, हेन्री मूरची शिल्पं, इतर युरोपियन चित्रकार-शिल्पकारांच्या कलाकृती हे पुन्हा पुन्हा पाहिलं गेलं.

दुसरी गोष्ट म्हणजे शाळकरी वयात आईवडिलांसोबत केलेल्या प्रवासांमध्ये अकस्मात भेटलेली इतर काही अलौकिक चित्रं. उदा. हिमाचल प्रदेशातल्या प्रवासात रशियन चित्रकार रोरिकच्या स्टुडिओला दिलेली भेट आणि तेव्हा पाहिलेली विलोभनीय निसर्गचित्रं आणि व्यक्तीचित्रं. राजस्थानातल्या प्रवासात शेखावतीच्या हवेलीत पाहिलेली अद्भुत लघुचित्रं (मिनिएचर पेंटिंग्स्), सिटी पॅलेसमध्ये पाहिलेली बुंदी शैलीतली लघुचित्रं आणि रागमाला रंगचिरं, हैद्राबादच्या सालारजंगमध्ये पाहिलेलं हळदणकरांचं हातात दिवा घेतलेल्या बाईचं अलौकिक चित्रं. त्या चित्रात दिव्याची ज्योत कुठेही दिसत नाही, पण तरीही त्या तेजाळ, मऊ प्रकाशात ती बाई अंगोपांग न्हाऊन निघालेली आहे.

तेव्हा कलाजाणिवा ह्या काही असतीलच तर त्या स्वतंत्रपणे, वैयक्तिक पातळीवर जश्या आणि जितक्या वाढत गेल्या तितक्याच. मात्र कलेकडे पाहण्याची एक दृष्टी मात्र नक्कीच विकसित झाली असं आता म्हणता येतं.

जेजे स्कूल ऑफ आर्टचं एक आकर्षण माझ्या मनात त्या वयात खूप होतं. आमच्या वर नाटककार श्याम फडके राहायचे, त्यांची मोठी मुलगी जेजेमध्ये फाईन आर्टला होती. माझ्या मोठ्या बहिणीची मैत्रीण जेजे स्कूलला आर्किटेक्चर शिकायची. त्या दोघी तिथल्या वातावरणाबद्दल सतत बोलत. ते इतर कॉलेजेसपेक्षा खूप वेगळं आहे, तिथे गेल्यावर चित्रं, शिल्पं वगैरेबद्दल शिकता येतं ह्याचं आकर्षण होतं. त्यात थ्रिल, वेगळेपणा वाटायचा. मी तिथेच शिकायला जाणार, हे मी घरात जाहीरही करून टाकलं होतं. पण आठवीनंतर शाळेतली चित्रकला संपली आणि हे कुठेतरी मागे पडलं. एसेस्सीला ऐंशी टक्क्यांच्यावर मार्क्स पडले आणि प्रथेप्रमाणे मी सायन्सला प्रवेश घेऊन टाकला. बारावीनंतर आर्किटेक्चरला प्रवेश घ्यायचं ठरवलं, पण दुर्दैवाने परीक्षा झाल्यानंतर मला कावीळ आणि टायफॉइड दोन्ही झाला. मोठं आजारपण होतं ते, दोन-तीन महिने त्यातच गेले. मग एकदा मी आणि बाबा चौकशीकरता जेजे स्कूलमधे गेलो. आर्किटेक्चरच्या एन्ट्रन्स् एक्झाम होऊन गेल्या होत्या. फाईन आर्टला प्रवेश घेता आला असता, पण पुन्हा दहावीच्या मार्कांवर प्रवेश घ्यायला नको वाटलं. दोन वर्ष वाया जातील असं वाटलं. मुख्य म्हणजे आपल्याला चित्रकला आवडते, पण स्वत: काढायला आवडेलच असं आतून वाटत नव्हतं. मी जेजेमधून त्या वेळी उदास मनानं बाहेर पडले. पण मनातून त्या परिसराचा ठसा कधीच पुसला गेला नाही. तिथली गर्द झाडी, व्हरांडे, भव्य खिडक्या, त्यांना असलेल्या नक्षीदार जाळ्या, पुतळे, कमानी, त्यावरची रंगीत चित्रं, पेंटिंग्ज, जागोजागी असणारे पुतळे, समोरच दिसलेलं 'मंदिरपथगामिनी'चं देखणं शिल्प.. ह्या सर्वांची भुरळ मनावर होती. 'चिन्ह'करता मी नंतर जेजेतले दिवस आणि जेजेच्या बंगल्यातले दिवस, अश्या दोन लेखमालिका केल्या त्या कदाचित म्हणूनच खूप मनापासून आणि उत्साहानं. 'चिन्ह'करता केलेलं ते माझं पहिलं मोठं काम. त्या वेळी काही प्रमाणात का होईना, पुन्हा जेजेतल्या कलात्मक वातावरणाशी नातं जुळल्याचं समाधान लाभलं. गंमत म्हणजे दुसरं मोठं काम राजा रविवर्मावरच्या लेखाचं. तो लेख लिहिताना रविवर्माचा खोलवर जाऊन इतका मनापासून अभ्यास केला त्याचंही मूळ कदाचित असंच खूप मागे, खोल जाणारं.

स्वत:ला चित्र काढण्याची फारशी आवड नाही हे वेळीच लक्षात आलं होतं, पण आपल्याला चित्र पाहायला आणि त्या अनुषंगानं चित्रकाराविषयी जाणून घ्यायला खूप आवडतं, हेही माहीत होतं. चित्रनिर्मितीच्या प्रक्रियेबद्दलचं एक कुतूहल मनात कायमच जागृत असतं. चित्रकार कुठे, कोणत्या वातावरणात, कशी चित्रं काढतो, त्याचा परिसर, स्टुडिओ, त्याच्या चित्रांमागच्या प्रेरणा, तंत्र ह्या सगळ्या गोष्टींविषयी जाणून घेण्याच्या आंतरिक कुतूहलाला 'चिन्ह'मध्ये वाट मिळाली. आधी वाचताना आणि मग लिहिताना. 'चिन्ह'मधून चित्रकारांच्या कहाण्या वाचताना मन थरारून जायचं. भास्कर कुलकर्णींबद्दल वाचताना तर चित्रकार असाही असतो, असाही जगतो, ह्यावर विश्वास बसला नव्हता. व्हॅन गॉगसारख्या पाश्चात्त्य चित्रकारांच्या जगण्याच्या, मनावर परिणाम करणार्‍या कहाण्या वाचल्या होत्या, पण भारतीय चित्रकारांविषयी असं काहीच ऐकलं नव्हतं. 'चिन्ह'च्या सुरुवातीच्या पर्वातले हे गायतोंडे, बरवे, भास्कर कुलकर्णींवरचे अंक मी त्या वेळी वाचले, ते माझ्या जेजेमधे शिकणा-या एका मित्रामुळे (त्याच्याशी मैत्री करण्याचं कारणच मुळात - तो जेजेमध्ये फाईन आर्ट शिकतो - हे होतं :प).

गंमत म्हणजे चित्रकलेविषयी आस्था असूनही मुंबईतल्या आर्ट गॅलर्‍यांमध्ये जाऊन चित्रकारांची प्रदर्शनं बघायची असतात, ती बघता येतात वगैरे मला कॉलेज संपेपर्यंत डोक्यातच नव्हतं. आर्ट गॅलर्‍या कुठे असतात, त्यात कोणती प्रदर्शनं भरतात हे सामान्य माणसांपर्यंत, ज्याचा चित्रकलेशी थेट संबंध नाही, अश्यापर्यंत पोहोचायचा काही स्कोपच नव्हता. जहांगीर मला भेटलं ते अपघातानेच. त्यावेळी मी एम्.एस्.सी.ला प्रवेश घ्यायच्या विचारात होते. त्याकरता फोर्टमधल्या सायन्स इन्स्टीट्यूटमधे गेले होते. खरं तर अभ्यासाचा मनातून कंटाळा आला होता. आणि अचानक फोर्टमधे माझा जुना, जेजेमधे फाईन आर्ट शिकणारा मित्र भेटला. तो आता 'चैत्र' नावाच्या जाहिरात एजन्सीमध्ये नोकरी करत होता. त्या विश्वाबद्दल तो भरभरून बोलला, जे मला आवडलं. त्यातूनच मग मी सायन्स इन्स्टीट्यूटमध्ये एमएस्सी करायचा नाद सोडून चर्चगेटच्या के.सी. कॉलेजमध्ये संध्याकाळच्या जाहिरात आणि कॉपीरायटिंग शिकवणार्‍या एका पी.जी. डिप्लोमा कोर्सला प्रवेश घेतला. तिथे फॅकल्टी म्हणून किरण नगरकर होते. त्यांनी कोर्सचा एक भाग म्हणून पहिल्यांदा जहांगीरमध्ये नेलं. त्यावेळी जहांगीरचं चित्रांचं प्रदर्शन आणि समोवारमधला चहा या दोन्हीचा पहिल्यांदा अनुभव घेतला. And then I was totally hooked to that surrounding. जहांगीर आर्ट गॅलरी, तिथली प्रदर्शनं, चित्रकार, आर्ट मॅगझिन्स आणि पुस्तकं, चित्रांच्या प्रिन्ट्स् मिळणारं तिथलं दुकान ह्या सगळ्याकरता मग जहांगीरच्या अगणित वार्‍या करणं अपरिहार्य ठरलं. त्यानंतर मग 'एन्.जी.एम्.ए.'मध्ये ज्या सुप्रसिद्ध चित्रकारांच्या आजवर फक्त कहाण्या वाचल्या होत्या, त्यांची पेंटिंग्ज पाहिली. चित्रकाराचा थोरपणा त्याच्या चित्रांमधून कसा आपसूक सामोरा येत राहतो हे त्या वेळी अभ्यासता आलं.

गेल्या वर्षी 'भाऊ दाजी लाड' संग्रहालयात मी भारतीय आधुनिक आणि समकालीन चित्रकलेचा इतिहास शिकवणारा एक कोर्स करत होते, त्या वेळी तिथे मुंबईतल्या विविध शाळांमधली मुलं आपल्या शिक्षकांसोबत शिस्तीत रांगा लावून संग्रहालयातल्या कलाकृती बघायला येत, ते दृश्य पाहिलं आणि हळहळ वाटली, की आपल्या लहानपणी आपल्या शाळेद्वारे अशा काही अॅक्टिव्हिटीज केल्या गेल्या असत्या तर किती छान झालं असतं. आता मुलांच्या सुट्ट्यांच्या काळातही एन्.जी.एम्.ए., छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, भाऊ दाजी लाड संग्रहालय ह्या सगळ्या ठिकाणी खास आर्ट कॅम्प्स घेतात, मुलांना जागतिक चित्रकारांच्या चित्रांची शैली, वैशिष्ट्य ह्यांची ओळख करून दिली जाते, 'चित्रपतंग'सारख्या संस्था मुलांमधल्या उपजत, सुप्त कलाजाणिवांना नैसर्गिकरीत्या जोपासण्याकरता प्रयत्न करतात, हे सगळं पाहून खरंच खूप हेवा वाटतो आत्ताच्या पिढीचा. पण मग असंही वाटतं, की अशी जाणीवपूर्वक वगैरे कलाजाणिवा विकसित झालेली ही मुलं पुढे कलेच्या क्षेत्रात नक्की काय करणार आहेत, काय पाहणार आहेत? कलेचे शुद्ध आस्वादक होऊ शकायला ह्याची मदत खरोखर होणार आहे का? मुळात पुढच्या पिढीकरता शुद्ध कला कितपत अस्तित्वात राहिली असू शकेल? हे वाचताना सिनिकल वाटेल, पण जेजेसारख्या एके काळच्या दर्जेदार कलाशिक्षण संस्थेची आता अक्षरश: दुर्दशा झाली आहे. बाकी महाराष्ट्रातही कलाशिक्षणाची हेळसांडच आहे आणि ह्या सर्वांपेक्षाही महत्त्वाचं म्हणजे आज कलेकडे पाहण्याची बदललेली समाजातल्या सर्वांचीच दृष्टी. ती नको इतकी व्यावसायिक झाली आहे. कलेकडे पाहण्याच्या दृष्टीतला भाबडेपणा कधीच लयाला गेला, ती चांगलीच गोष्ट. पण त्यासोबत नैसर्गिक ओढ, कुतूहल, रसही पातळ झाला. आता या सर्वांपेक्षाही वरचढ आहे कलेचं मूल्य. अमुक एक पेंटिंग इतक्या कोटींना विकलं गेलं, आर्टिस्ट्सना देशपरदेशात किती भाव आहे, आर्ट गॉसिप्स्, कलेतलं राजकारण, कलाकारांना पेज थ्रीमधे मिळणारं महत्त्व ह्या सर्वांमुळे कलेकडे पाहण्याची प्रत्येकाची दृष्टी गढुळलेली आहे. अशी गढुळलेली दृष्टी घेऊन ही नवीन पिढी कलेच्या प्रांतात नेमकं काय करणार आहे? त्यांच्या कलानिर्मितीच्या प्रेरणा नेमक्या कोणत्या असणार आहेत, हे जाणून घ्यायचा प्रयत्न मला करावासा वाटतो.

कलास्वाद आणि कलानिर्मिती ह्या दोन्हींमधे गेल्या १०-१२ वर्षांमधे आमूलाग्र बदल झाले. जागतिकीकरणानंतर कलेचं स्वरूप बदललं, कलाव्यवहार बदलले, कलेच्या आंतरिक आणि बाह्य संरचनेमध्येच मूलभूत बदल झाले. चित्रकलेच्या क्षेत्रामध्ये हे बदल सर्वात जास्त आणि सर्वात वेगानं झाले. कलेच्या बाजारात, जागतिक लिलावांमध्ये ओल्ड मास्टर्सच्या पेंटिंग्जना कधी नव्हे एव्हढं मूल्य मिळायला लागलं आणि कलेच्या क्षेत्रातल्या पैशांचा बोलबाला कलाजगतात आणि बाहेरच्या समाजात मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. गायतोंडेंची पेंटिंग्जही कधी न पाहिलेल्यांना त्यांच्या चित्रांना कोटींची किंमत मिळाल्याचं माहित झालं, हुसेनची चित्रं कधी गॅलरीत जाऊन न पाहताही हुसेनबद्दलचं सगळं गॉसिप सामान्यांना माहित होतं, चित्रकारांची लोकप्रियता अशी वेगळ्या अंगानं वाढायला लागली. कलेकडे गुंतवणूक म्हणून पाहायला सुरुवात झाली. हुसेनच्या शंभर कोटींच्या चित्रांची बातमी ठळक मथळ्यात वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर छापली.

नव्या प्रयोगांबद्दल बोलायचं तर चित्रकलेच्या क्षेत्रात गेल्या १५-२० वर्षांपासून सातत्यानं अनेक नवनवे प्रयोग होत आहेत. चित्रकला म्हणजे 'कॅनव्हासवर केलेलं पेंटिंग', ही व्याख्या तर कधीच मागे पडली होती. वेगवेगळी माध्यमं वापरात येऊन अनेक दशकं उलटली आहेत. तसे तर युरोप-अमेरिकेतले कलेच्या जगतातले नवनवीन प्रवाह, कल्पनांची आयात फ़ार पूर्वीपासून घडून येत होतीच, पण गेल्या १२-१३ वर्षांमध्ये त्यात एक वेग आला, झपाटा आला, आग्रह आला. ह्यात चित्रकलेमध्ये अनेक उलथापालथी झाल्या. काही चांगल्या, काही वाईट. प्रयोग हे नेहमीच स्वागतार्ह असतात. कलेतला साचेबद्धपणा त्यामुळेच नाहीसा होतो, कला प्रवाही राहते. चित्रकलेच्या क्षेत्रात होत असलेले हे प्रयोग चित्रकलेची पारंपरिक चौकट समूळ तोडणारे ठरले. त्यामुळे चित्रकलेचे काही पारंपरिक वृत्तीचे आस्वादक ह्या नव्या चित्रकलेपासून दुरावले. चित्रकला म्हणजे फक्त रंग, पोत, रेषा, आकार, अवकाश ह्यांचा मेळ नाही, तर त्यात विज्ञान, तंत्रज्ञान, संकल्पना, त्रिमिती, घनता, ध्वनी, गंध, स्मृती, जाणिवा, मूलभूत भावना, इतिहास ह्या सर्वांना सामावून घेता येऊ शकतं, हे या प्रयोगांमधून प्रत्यक्षात येत होतं. मात्र नवे प्रयोग आंतरिक उर्मीतून करणं आणि जागतिक बाजारपेठेत स्वीकारले जाण्याच्या अट्टहासातून करणं ह्यात फार मोठा फ़रक आहे. तो फरक अनेकदा पुसट झालेला दिसतो. कॅनव्हासवर पेंटिंग करणं म्हणजे मागासलेपणा, त्याला बाजारात मागणी नाही. ते केलं तर आपण आधुनिक, समकालीन कलेच्या क्षेत्रात प्रतिगामी समजले जाऊ, असा समज पसरला असावा अशी खात्री पटण्याइतके अचानक सगळेच जण इन्स्टॉलेशन्स्, व्हिडिओ आर्ट, कन्सेप्च्युअल आर्टकडे वळले. आज एक दशक उलटून गेल्यानंतर लक्षात येतं की ह्या लाटेमधे आंतरिक उर्मीने ज्यांनी प्रयोग केले तेच कलाकार तरले. आज रणबीर कालेकासारख्या सीनियर आर्टिस्टची किंवा किरण सुबैय्यासारख्या तरुण कलाकाराची व्हिडिओ आर्ट बघताना त्यात उपरेपणा किंवा कृत्रिमता जाणवत नाही, सहजस्फूर्तीतून आलेली उमज, परिपक्वता जाणवते. पण तसं सर्वांच्याच बाबतीत झालं नाही, होत नाही. एक क्रेझ म्हणून, मार्केट डिमांड म्हणून, गॅलर्‍यांचा आग्रह म्हणून न्यू मिडियाकडे वळणारे ना इथे, ना तिथे असे झाले. सर्वांनाच पुष्पमाला, सुबोध गुप्ता, मोनाली मेहेर, शिल्पा गुप्ता किंवा तुषार जोग ह्यांच्यासारखी जागतिक मान्यता मिळाली नाही. ह्यांना मिळाली, कारण त्यांनी आपल्या प्रयोगांतून काही जेन्युईन वेगळेपणा दाखवला. अर्थात ह्यातही देवदत्त पाडेकर किंवा प्रकाश वाघमारेसारखा तरुण चित्रकार हे स्वत:ला पटतील अशीच कॅनव्हास पेंटिंग्ज करूनही यशस्वी होतात, पण असे तरुण पिढीमधे खूप कमी आहेत. आज अजूनही अॅक्रिलिक, ऑइल पेंटींग्ज, वॉटरकलर्स करणारे बहुतेक सगळे चित्रकार आधीच्या पिढीतलेच आहेत. अर्थात त्यातही ज्यांनी आपली वेगळी शैली जाणीवपूर्वक जोपासली, आपल्या आंतरिक हाकेशी जे प्रामाणिक राहिले आहेत, ते काहीसे मागे पडल्याचं चित्रही दिसतं. जनसंपर्क, संवादमाध्यमांशी दोस्ती, आर्ट गॅलर्‍या, डीलर्सशी जवळिकीचे संबंध जोपासणं ज्यांना जमलं ते शो-बिझमध्ये नाव कमावून वेगळ्या रितीनं मोठे बनले आहेत.

कलेच्या क्षेत्रात हे असे वेगळे प्रयोग होत असताना, ह्या घडामोडी होत असताना सामान्य चित्ररसिक ह्या सगळ्यात नेमका कुठे होता? आहे? तर दुर्दैवानं तो ह्या नव्या कलेच्या प्रयोगांपासून अनेक मैल दूर फेकला गेला आहे. 'बिएनाले', आर्ट फेअर्सना गर्दी होते, पण गर्दी करणारे ह्या कलेच्या क्षेत्रांशी, कलाव्यवहारांशी जवळून संबंधित असणारे, किंवा कलेचे खरेदीदारच असतात. सामान्य प्रेक्षक शुद्ध आस्वादकाच्या भूमिकेतून अगदी क्वचितच ह्या आधुनिक कला-प्रदर्शनांकडे वळतो. हे खेदजनक आहे. आर्ट इन्स्टॉलेशन्स, आर्ट परफॉर्मन्सेस, फोटो-आर्ट, व्हिडिओ आर्ट पाहिल्यावर सामान्य चित्ररसिक अनेकदा विचारतो, की पण ह्यात चित्रकला कुठे आहे? असं त्यांनी विचारावं ह्यातच तो ही कला, कलेमागची संकल्पना समजावून घेण्यात कमी पडतो आहे, हे दिसून येतं. पण त्याहीपेक्षा त्याच्यापर्यंत हे सगळं पोहोचवण्यात कलाकार, कलासमीक्षक कमी पडताहेत हे नक्की. मगाशी मी म्हटलं की २०-२५ वर्षांपूर्वीच्या काळात जाणीवपूर्वक कलाजाणिवा विकसित करण्याचे काहीच प्रयत्न कोणीच करत नव्हतं. तरीही आसपास, सहज दिसू शकेल, नजर पोचू शकेल, समजू शकेल अशी चित्रकला होती. रविवर्माची पेंटिंग्ज कुठे ना कुठे शिल्लक होती, 'दलालां'च्या सुंदर चित्रांनी मासिकं सजलेली असायची, 'आरां'च्या फुलदाण्या कॅलेंडरांवर असायच्या, हुसेनचे घोडे दिसायचे. आज ती चित्रकला पाहिलेली पिढी न्यू मिडिया आर्टला सहजासहजी स्वीकारत नाही, कारण खरं तर त्यांच्यापर्यंत ती पोहोचतच नाही. परदेशातल्याप्रमाणे पब्लिक आर्टद्वारे सामान्य लोक आणि कला ह्यांच्या दरम्यानची दरी मिटवता आली असती, पण तसंही इथे होत नाही.

'पब्लिक आर्ट' हा प्रकार आपल्याकडे मुळातच फार ढिसाळपणे राबवला गेलेला प्रकार आहे. सार्वजनिक ठिकाणी दिसणारी चित्रं-शिल्पं, म्यूरल्स, इन्स्टॉलेशन्स पहाताना सामान्य रसिकाच्या मनात त्याबद्दल कुतूहल, आवड निर्माण व्हायला हवी, त्यानं स्वत:हून त्याबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करायला हवा, ही जाणीव दुर्दैवानं कुणालाच नाही.

सुधीर पटवर्धनांसारखे महत्त्वाचे, सिनियर चित्रकार महाराष्ट्राच्या अंतर्भागात चित्रप्रदर्शनं घेऊन जातात, लोकांपर्यंत पोचण्याचे प्रयत्न करतात, तसे अनेकांनी करायला हवेत. पब्लिक आर्टमध्ये लोकांचा सहभाग, रस वाढेल असे प्रयोग व्हायला हवेत. खरं तर कला हा स्वतंत्र प्रकार राहण्याचीच आवश्यकता नाही. वर्तमानातल्या प्रत्येक घडामोडीत ती सहज मिसळून जायला हवी.

कलाशिक्षण नसल्यानं इथला सामान्य रसिक आजवर फार क्वचितच उत्साहानं, स्वत:हून आर्ट गॅलर्‍यांकडे वळतो. प्रदर्शनं भरतात, पण लोकांपर्यंत ती पोचवायचा प्रयत्न होत नाही. आज कोणत्याही मराठी वृत्तपत्रात चित्रप्रदर्शनांबद्दल सातत्यानं लिहून येत नाही, चित्रांची समीक्षा केली जात नाही. एक चांगलं आहे, की निदान आजकाल चित्रकारांच्या मुलाखती, लेख वगैरे मासिकांमधून, पुरवण्यांमधून मोठ्या प्रमाणावर छापल्या जातात, पण त्यातही पुन्हा आग्रह असतो फिगरेटीव्ह चित्र काढणार्‍या चित्रकारांच्याच मुलाखती छापण्याचा. कारण लोकांना अजूनही तेच आवडतं, कळतं असं संपादक म्हणतात. पण मग ही न्यू मिडिया आर्ट त्यांच्यापर्यंत पोचणारच कशी? कसा वाटणार त्यांना आपलेपणा त्याबद्दल?

इथे 'चिन्ह'चं काम महत्त्वाचं ठरतं, कारण त्यात मोनाली मेहेर, सुनील गावडे, सुबोध केरकरसारख्या न्यू मिडिया आर्टमधे काम करणार्‍या चित्रकारांबद्दल, त्यांच्या कामाबद्दल सविस्तरपणे लिहिलं जातं. ह्या मुलाखती, लेख करताना समकालीन चित्रकलेच्या क्षेत्रात नेमकं काय घडत आहे, नवे प्रयोग कोणते, इथलं राजकारण, स्पर्धा, आर्ट गॅलर्‍यांचे व्यवहार कसे चालतात ह्याबद्दल मला जास्त सखोलपणे जाणून घेता आलं. कलेच्या झपाट्यानं बदलत्या जागतिक स्वरूपाबद्दल, प्रयोगांबद्दल जाणून घेणं ही एरवी फार कठीण गोष्ट आहे. त्याकरता जागतिक कलाप्रदर्शनं, कलाजत्रांना हजेरी लावायला लागते. तरुण पिढीच्या चित्रकारांपुढे हेही एक नवं आव्हानच असतं. आर्ट गॅलरीचा भक्कम पाठिंबा असणारे चित्रकार ह्या बाबतीत सुदैवी ठरतात.

आपल्याला आपली कला, आपली भाषा हे शक्यतो पारंपरिकतेला घट्ट चिकटून बसणारीच हवी असते. त्याला आपल्या संस्कृतीचं परिचित अस्तर असलं, की आपली नाळ त्याच्याशी सहजतेनं जोडता येते. पण मग त्यामुळे कलेत, भाषेत तीच रचनाकृती, तीच अभिव्यक्ती, तीच शैली पुन्हा पुन्हा समोर येत राहते. कलेत आता खूप काही वेगळं घडत आहे, वेगळी अभिव्यक्ती होते आहे तर ती लोकांपर्यंत नीट पोचायला हवी.

कला म्हणजे केवळ सौंदर्यानुभव नाही. त्याही पलीकडे जाऊन कलेतून सामाजिक भान, राजकीय जाणिवा, वर्तमान परिस्थितीवरचं भाष्य, भविष्यातलं दृश्य, द्रोह, धार्मिक-रूढीवादी संकल्पनांना आव्हान, भ्रष्टाचाराविरुद्ध बंडखोरी असायला हवी, हे कलाभान आज कधी नव्हे इतक्या टोकदारपणे कलाक्षेत्रात आहे. त्याकरता चित्रकार निराळी, नव्या तंत्रज्ञानानं परिपूर्ण माध्यमं हाताळत आहेत. आर्ट आणि सायन्स, आर्ट आणि टेक्नॉलॉजी, आर्ट आणि सिनेमा ह्या गोष्टींचा मेळ आजच्या चित्रकलेत दिसतो. जागतिकीकरणाचे, स्थलांतरितांचे, पर्यावरणाचे, राजकीय-सामाजिक प्रश्न त्यातूनच प्रभावीपणे मांडले जात आहेत. त्याकरता फोन संभाषण, सामान्य लोकांशी साधलेला थेट संवाद, स्पर्शाचा वापर, चित्र-ध्वनिफितींचा वापर केला जातो. गेल्या वर्षी राडिया टेप्स प्रकरणावर आधारित जी कलाकृती सादर झाली त्यात साउंड आर्टचा प्रभावी वापर केला गेला. शिबा छाचीसारखी कलाकार लाईट बॉक्सेसच्या माध्यमातून गुगलमॅप्सचा वापर करून अवकाश, काळ संकल्पना ताकदीने साकारते. तल्लूर हा भारतीय इतिहासातल्या, पौराणिक संकल्पनांना आधुनिक माध्यमांमधून नव्या प्रतिकांसहित मांडतो.

हे सारे तरुण कलाकार, त्यांचे प्रयोग लोकांपर्यंतही प्रभावीपणे पोचायला हवेत. तसं होत नाही. कारण आर्ट जर्नालिझम, आर्ट रायटींग मराठीमध्ये फारसं गंभीरपणे घेतलं जात नाही. कलेवर अभ्यासूपणे लिहिणारे फार थोडे आहेत, आणि जे आहेत त्यांना लिहायला संधी, माध्यमंही फार कमी आहेत. त्यातल्या त्यात एक चांगलं म्हणजे आता फेसबुक, वैयक्तिक किंवा सोशल वेबसाईट्स, ब्लॉग्ज अशा न्यू एज माध्यमांमधून कलाकार स्वत:च ह्या नव्या प्रयोगांबद्दल बोलतात, ते पोहोचवायचा प्रयत्न होतो. अर्थात मजा म्हणजे फेसबुकवर अजूनही सर्वाधिक लाइक्स, प्रतिसाद मिळवणारी चित्र फिगरेटीव्ह असतात. त्या खालोखाल सुप्रसिद्ध चित्रकारांची अनेकदा माध्यमांमधून झळकलेली अॅबस्ट्रॅक्ट चित्रं असतात. आणि सर्वात कमी प्रतिसाद मिळतो तो इन्स्टॉलेशन्स, परफॉर्मन्सेसचे व्हिडिओज किंवा इमेजेस यांना. त्यातही अपेक्षा असते काही खळबळजनक, धक्कादायक असेल अशी. तसं असेल तरच लक्ष दिलं जातं. इथे आर्टिस्ट्सची ठाम भूमिका महत्त्वाची आहे.

स्वत:च्या चित्रांबद्दल काहीही बोलणं कमीपणाचं मानणारी, आम्हाला जे वाटतं ते आम्ही चित्रांमधून मांडलं, बघणार्‍यानं त्याला हवा तो अर्थ काढावा, त्याला चित्रं समजली नाहीत तर ती आमची जबाबदारी नाही, असं म्हणणारी एक चित्रकारांची पिढी होऊन गेली. त्या काळात अमूर्त चित्रकलेपासून सामान्य चित्ररसिक जे दुरावले, आजतागायत त्यांची नाळ या चित्रांशी जुळू शकली नाही. आपल्याकडे आर्ट अॅप्रिसिएशन कोर्सेस, कलारसास्वादाच्या कार्यशाळा, चित्रकार-रसिक संवाद, कलासमीक्षकांचे सोप्या भाषेतले लेख असे प्रयत्न पुरेशा ताकदीनं कधी झालेच नाहीत. एखादेच बाबुराव सडवेलकर त्या काळात ह्याबद्दल लिहिते होते.

मात्र नंतरची चित्रकारांची पिढी चित्रांबद्दल, चित्रजाणिवांबद्दल खूप लिहिणारी होती/आहे. प्रभाकर बरवेंनी 'कोरा कॅनव्हास' लिहून चित्ररसिकांशी अनमोल असा सहज संवाद साधला. प्रभाकर कोलतेही जाणीवपूर्वक, सुंदर लिहितात. सुहास बहुळकर लिहितात. जयंत जोशी, चंद्रमोहन कुलकर्णी, शुभा गोखलेंसारखे चित्रकार फेसबुकाच्या माध्यमातून चित्रांबद्दल, चित्रजाणिवांबद्दल बोलतात. हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. तसंच कला संग्रहालय हे अनौपचारिक शिक्षण देणारं महत्त्वाचं माध्यम आहे, ह्याकडेही आता लक्ष दिलं जातं. लोकांनीही काही पावलं स्वतःहून उचलायला हवीत. देश-परदेशातली कलामासिकं, चित्रकलेवरची पुस्तकं लोकांनी वाचायला हवीत, प्रदर्शनं सातत्यानं पाहायला हवीत. कलाजाणिवा वाढवायला चित्रकार आणि सामान्य रसिक दोघांनीही प्रयत्न करायला हवेत आणि त्यांच्यामधला दुवा म्हणून कला पत्रकारिता, कलाविषयक लिखाण ह्यांचं महत्त्व वाढवायला हवं.

आज बर्‍याच शाळांमधून कलेचा इतिहास, कलेचे प्रवाह, इझम्स इत्यादी विद्यार्थ्यांना शिकवले जातात. त्याकरता कला अभ्यासकांची व्याख्यानं, प्रदर्शनं आयोजित केली जातात. हे खूप छान, महत्त्वाचं, पॉझिटीव्ह वाटतं. मात्र अनेक 'आय्.बी. स्कूल्स'च्या वर्गांत 'तंत्रज्ञानाचा वापर व्हायलाच हवा', ह्या आग्रहातून चित्रकला ही आयपॅडच्या माध्यमातून शिकवली जाते. हा प्रकार लवकरच इतर शाळा, खासगी क्लासेसमधून सार्वत्रिक होऊ शकतो. पण मग ह्यात चित्रकला म्हणजे 'कागद, पेन्सिल, रंग, ब्रश वापरून चितारायची कला' ही व्याख्या मागेच पडणार आहे का, अशी भीती वाटते. रंगांच्या प्रत्यक्ष हाताळणीतून मिळणारा पोत, स्पर्श ह्या तंत्रज्ञान-विस्फोट पाहिलेल्या पिढीला अनुभवायलाच नाही मिळाला तर?

'आयपॅडवर चित्रकला शिकवताना आम्हाला मुलांच्या जागतिक कलाजाणिवा विकसित करण्याकरता खूप वेगवेगळे अॅप्स उपलब्ध होऊ शकतात. 'मातिस'ची रंगशैली, 'व्हॅन गॉघ'च्या शैलीतले स्ट्रोक्स मुलांना प्रत्यक्ष वापरता आणि आत्मसात करता येऊ शकतात', असं एक शिक्षक ह्या संदर्भात बोलताना म्हणाले. पण शैली ही एक स्वतंत्र, वैयक्तिक गोष्ट आहे, ती कालांतरानं विकसित होते, त्यावर स्वयंभू ठसा उमटायला हवा त्याचं काय? की तेही आता कालबाह्य आहे? गोंधळ उडतो.

फेसबुकसारख्या सोशल साईट्सवर किंवा ब्लॉग्जवर आपल्या वैयक्तिक अभिव्यक्तीला वाव मिळतो, सहज प्रेक्षकवर्ग मिळतो. त्यातच आता फोटोग्राफर, चित्रकार बनणं ही सोपी गोष्ट आहे असं मानलं जातं. अनेक नवोदित, हौशी कलाकारांना झटपट प्रसिद्धी मिळतेही. कॉम्प्यूटर ग्राफिक्स, फोटोशॉप ह्यापलीकडे चित्रकला ही एक फार मोठी, साधनेची गोष्ट आहे हे अनेकदा माहीतच नसतं का, असं हे पाहून वाटतं. अनेक प्रथितयश चित्रकारही ह्या झटपट लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ होतात. अतिप्रसिद्धी ही कोणत्याही कलाकाराच्या दृष्टीनं घातक गोष्ट असते. लोकप्रियतेच्या, विक्रीच्या मोहात पडून आपल्या कलेच्या एकामागून एक आवृत्त्या काढून त्या बाजारात आणणं, ही ह्या तंत्रज्ञान विस्फोटात फार सोपी गोष्ट बनली आहे. स्वत:चं पेंटिंग हे स्वत:च्या आंतरिक अनुभूतीतून साकारलेली कलाकृती असते. त्याला इतर कोणाची मदत, इतर कोणाचा हात लागणंही अपमानास्पद मानणार्‍या चित्रकारांची पिढी आता जवळपास लयाला गेली आहे. अनेक चित्र-साहाय्यक मदतीला घेऊन किंवा संगणकाच्या मदतीनं झटपट कलाकृती साकारल्या जाण्यात आता काहीही वावगं समजलं जात नाही. कलेचा, व्यवसाय म्हणून विचार केला, की हे सगळं क्षम्य असं मानलं जातं. पण ह्यात गुणवत्तेचं काय, दर्जा कसा आहे, कलेची शुद्धता ह्याचा फारसा विचार होत नाही. मग ते खरोखरच इतकं महत्त्वाचं आहे का, असं वाटतं.

नुकतीच कलेची पदवी घेऊन बाहेर पडलेली अनेक तरुण मुलं-मुली भेटतात. शिक्षण संपल्यावर आर्ट फेअर्स, बिएनाले बघत हिंडताना, आजूबाजूच्या कलाव्यवहारांचा अनुभव घेताना ही मुलं गोंधळून गेल्यासारखी वाटतात. आज जगभर सगळेच जण इन्स्टॉलेशन्स, परफॉर्मन्सेस, न्यू मिडिया आर्ट करतात, मग आपणही तेच करायला हवं आहे, तरच गॅलर्‍या आपल्याकडे लक्ष देतील, आपल्या कॅनव्हासवरच्या पेंटींग्जना कोण विचारणार, नावाजलेल्या गॅलर्‍यांमध्यी कसा प्रवेश होऊ शकेल, त्याकरता कोणत्या आर्ट कॅम्पला गेलं की कोणासोबत जास्त संबंध वाढवायचे, आर्ट रेसिडेन्सीजमध्ये कसा शिरकाव करून घेता येईल, ह्यामध्ये हे सगळे जण खूप गुंतून गेल्यासारखे वाटतात. आपली स्वत:ची शैली विकसित करण्याकरता, स्वत:चं माध्यम मिळण्याकरता काही काळ जाऊ द्यायला हवा, एकाग्रतेनं कलेची साधना करायला हवी, हे सगळं कालबाह्य झालं आहे का असं वाटून जातं. गायतोंडे तासनतास समुद्राकडे बघत चिंतन करत असत, लक्ष्मण श्रेष्ठा हिमालयाच्या एकांतवासात दिवसेनदिवस एकटे राहत हे सगळं ह्या मुलांनाही माहीतच आहे. पण त्याचं महत्त्व आर्टची करिअर करण्याच्या रेट्यात दुर्लक्षिलं जात आहे कदाचित.

- शर्मिला फडके (कला-अभ्यासक आणि लेखक)

field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

सध्याचं बदलतं कलाविश्व आणि सामान्यांच्या कलाजाणिवा याबद्दलचं चिंतन आवडलं.

आर्ट इन्स्टॉलेशन्स, आर्ट परफॉर्मन्सेस, फोटो-आर्ट, व्हिडिओ आर्ट पाहिल्यावर सामान्य चित्ररसिक अनेकदा विचारतो, की पण ह्यात चित्रकला कुठे आहे? असं त्यांनी विचारावं ह्यातच तो ही कला, कलेमागची संकल्पना समजावून घेण्यात कमी पडतो आहे, असं म्हणण्यापेक्षा त्याच्यापर्यंत हे सगळं पोचवण्यात कलाकार, कलासमीक्षक कमी पडताहेत हे नक्की.

मुळात चित्रकलेची एक स्वतंत्र लिपी, स्वतंत्र भाषा असतेे आणि तीमधून चित्रकार आपल्या परीने, आपल्या दृष्टिकोनातून रसिकाशी संवाद साधतो आणि काही संदेश देऊ पहातो, सांगू पहातो. ही भाषा काहींना कळायला सहजसोपी जाते, काहींना चित्रांच्या वेडापायी शिकणं जमतं. मात्र बहुतांश त्या भाषेपासून दूर रहातात.

बघणाऱ्यानं त्याला हवा तो अर्थ काढावा, त्याला चित्रं समजली नाहीत तर ती आमची जबाबदारी नाही असं म्हणणारी एक चित्रकारांची पिढी होऊन गेली.....मात्र नंतरची चित्रकारांची पिढी चित्रांबद्दल, चित्रजाणिवांबद्दल खूप लिहिणारी होती/आहे.

हे आश्वासक आहे. चित्रलिपीत लिहिणारांनी ती उलगडून दाखवली तर अधिकांना ती कळेल, आणि नवीन अर्थ शोधण्याबद्दल आत्मविश्वास वाटेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद राजेश.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला.

सहजस्फूर्तीतून आलेली उमज, मॅच्युरिटी जाणवते. पण तसं सर्वांच्याच बाबतीत झालं नाही, होत नाही. एक क्रेझ म्हणून, मार्केट डिमांड म्हणून, गॅलऱ्यांचा आग्रह म्हणून न्यू मिडियाकडे वळणारे ना इथे, ना तिथे असे झाले. सर्वांनाच पुष्पमाला, सुबोध गुप्ता, मोनाली मेहेर, शिल्पा गुप्ता किंवा तुषार जोग ह्यांच्यासारखी जागतिक मान्यता मिळाली नाही; ह्यांना मिळाली, कारण त्यांनी आपल्या प्रयोगांतून काही जेन्युईन वेगळेपणा दाखवला. अर्थात ह्यातही देवदत्त पाडेकर किंवा प्रकाश वाघमारेसारखा तरुण चित्रकार स्वत:ला पटतील अशीच कॅनव्हास पेंटींग्ज करुनही यशस्वी होतात, पण असे तरुण पिढीमधे खूप कमी आहेत. आज अजूनही अॅक्रिलिक, ऑइल पेंटींग्ज, वॉटरकलर्स करणारे बहुतेक सगळे चित्रकार आधीच्या पिढीतलेच आहेत. अर्थात त्यातही ज्यांनी आपली वेगळी शैली जाणीवपूर्वक जोपासली, आपल्या आंतरिक हाकेशी जे प्रामाणिक राहिले आहेत ते काहीसे मागे पडल्याचं चित्रही दिसतं. जनसंपर्क, संवादमाध्यमांशी दोस्ती, आर्ट गॅलऱ्या, डीलर्सशी जवळीकीचे संबंध जोपासणं ज्यांना जमलं ते शो-बिझमध्ये नाव कमावून वेगळ्या रितीनं मोठे बनले आहेत.

हा आणी शेवटचा परिच्छेद वाचून नक्की समजले नाही की,
हे नेमके मागे पडणे म्हणजे काय? तुलना नक्की कोणत्या मुद्द्यावर केली आहे? शो-बीझ मधे मोठे झालेले कलाकार केवळ कलेवर नाही तर अन्य स्कीलसेट असल्यानमुळे हा मुद्दा मांडलाय की ते काही "खरोखर मोठे" कलाकार नाही असा अप्रत्यक्ष आरोप?

नवकलाकाराला नेमके कशात व कसे करीयर करायचे समजत नाही आहे असा मुद्दा असेल तर यावर असलाच तर नेमका काही उपाय आहे असेही मांडल्याचे दिसले नाही. जेव्हा अन्य शिक्षण घेतलेले लोक, नोकरी, लग्न, घर संसार यात पद्धतशीरपणे मार्गक्रमण करत असतात त्यात हे लोक मागे पडतात म्हणून हा फक्त पैसेवाल्यांचा अथवा मनस्वी कलाकारांचाच प्रांत आहे असे सुचवायचे आहे का?

कोअर-कले बरोबरच लेखन व भाषण ह्या कला देखील कलाकारांना अवगत असल्या पाहीजेत व प्रतिथयश माध्यमातून त्याला नियमीत व वाढते स्थान हवे अशी अपेक्षा.

"कलाकार तुमच्या घरी" अश्या आशयाची एक टिव्ही मालीका पाहीली होती. ज्यात सामान्य लोकांच्या घरी कलाकार जाउन, त्या कुटुंबाची कलाजाणीव, त्यांची वैयक्तीक आवड, निवड, प्रेरणा ध्यानात घेउन कुठलेना कुठले आर्ट प्रोजेक्ट त्यांच्या घरी, त्यांना सामील करुन.[होम रिनोव्हेशन नव्हे] एकंदर कलाशिक्षण-रंजन अशी एक फार रोचक थीम होती. तसे काही प्रयोग आपल्याकडे होतात का? दूरदर्शनचे असे काही कार्यक्रम कलेला वाहीलेले आहेत काय?

अन्यत्र एका लेखात जसे "दुसर्‍या" प्रकारच्या सिनेमाला आंतरजाल उपलब्ध असल्याने, प्रसार , प्रचार लाभल्याने वाढता प्रतिसाद आहे तसाच या "दुसर्‍या" भारतीय कलाकारांना, कलाप्रकारांना लाभो ही सदिच्छा!

दिवसेंदिवस बकाल दिसणार्‍या आपल्या शहरांना हे नवकलाकार आपल्या सर्जनशीलतेने(??) सुंदर बनवो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

हे नेमके मागे पडणे म्हणजे काय?>> मागे पडणे हे चित्रकलेच्या क्षेत्रात स्वत:ची अशी स्वतंत्र ओळख निर्माण करुन यशस्वी होण्याच्या स्पर्धेत, जी आज अपरिहार्य आहे.

की ते काही "खरोखर मोठे" कलाकार नाही असा अप्रत्यक्ष आरोप?>>> त्यांच्यापेक्षाही जेन्युईन आणि गुणी कलाकार असताना हे कलाकार जास्त यशस्वी, बोलबाला असणारे झाले यात त्यांच्याकडे असलेले प्रसिधीतंत्राचे वेगळे स्किलसेट नक्कीच उपयोगी पडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक लेखन आहे.. बरेच मुद्दे मांडले आहेत. पुन्हा एक-दोनदा वाचावे लागेल
पहिल्या वाचनात लेख एकूणात आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेखातील सर्वच मुद्दे पटले नसले तरी लेख आवडला. वेगळे दृष्टिकोन कळले.

(तरीही काही बाबतीत आमच्या रुची जुनाट त्या जुनाटच.उदाहरणार्थ, मध्यंतरी जालावर एका पाश्चात्य वर्तमानपत्रात इंग्लंडमध्ये कुठेतरी भरलेल्या कलाप्रदर्शनाविषयी बातमी वाचली. त्यात एका कलाकाराने (?) आर्ट इन्स्टॉलेशन म्हणून एक सर्वसामान्य मुतारी (युरिनल) ठेवली होती. सदरहु वर्तमानपत्राने त्याचे छायाचित्रही दिले होते. खूप प्रयत्न करूनही माझ्या मध्यमवर्गीय, पांढरपेशा मनाला त्यात कला नाही दिसू शकली. आमच्या कलाजाणिवाच बुर्जुआ त्याला कोण काय करणार? :/ )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दगड तो, नका त्यास शेंदूर फासू
अशानेच नाच्यास नटरंग केले

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ,इलिंद.

युरिनल आर्ट इन्स्टॉलेशन म्हणजे तुम्ही जर मार्सेल डुशॅम्पच्या 'फाउंटन' या इन्स्टॉलेशनबद्दल बोलत असाल तर नवकलेच्या संदर्भात या इन्स्टॉलेशनच्या उल्लेख सर्वात जास्त गाजलेली,टीका झालेली आणि तरीही एक महत्वाचा टप्पा म्हणून ओळखली जाणरी कलाकृती म्हणून ओळखली जाते. कन्सेप्च्युअल आर्ट या प्रकारात कलाकार आपली 'कला' म्हणून जे काही सादर करत असतात त्यामागे त्यांची निश्चित कन्सेप्ट नेमकी काय आहे, त्यांना काय सांगायचे आहे'दाखवायचे आहे हे जाणून घेणे महत्वाचे असते. लोकांनी ते स्वतःहून करावे किंवा कलाकाराशी बोलून, त्याने या संदर्भात काय सांगीतले आहे ते वाचून मग पुन्हा ती कलाकृती बघावी. त्या त्या वेळच्या 'वर्तमानाशी' ती बांधलेली असते, त्यात काही द्रोह असतो, तो कळला तरच ती आर्ट कळते अनेकदा. सामान्यांपासून ती दूर जाण्याचे हे एक कारण तर आहेच. पण फक्त टीका करण्याआधी तिच्याबद्दल जाणून घेणे हे निश्चित करावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोडाच भाग समजला. तेवढा चांगला वाटला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माझ्या डोक्यात थोडा गोंधळ आहे.
'लोकाभिमुखता महत्त्वाची, कारण समाजात जागरुकता नसेल, तर चित्रं बघणार कोण?' हे बरोबरच. नि 'कोण लोक? मी नि माझं चित्र याशिवाय तिसर्‍या कुणालाही नि कशाला मी का झक मारायला विचारू?' हेही बरोबरच. बहुदा निरनिराळे टप्पे असतात. त्यांच्या गरजा निरनिराळ्या. दोन्ही भूमिका आपापल्या जागी, आपापल्या वेळी गरजेच्या नि बरोबरच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मी नि माझं चित्र याशिवाय तिसर्‍या कुणालाही नि कशाला मी का झक मारायला विचारू? >>> परफॉर्मिंग आर्टच्या बाबतीत हे खरंच 'खरं' असतं मेघना? साहित्य आणि कला हे 'तिसर्‍या'कोणा लोकांच्या म्हणजेच रसिक, दर्शक यांच्या सहभागाशिवाय खरोखरंच खर्‍या अर्थाने शक्य असतं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या लेखात उल्लेख केलेलं न्यू मीडिआतलं काम पाहण्याविषयी ज्यांना उत्सुकता आहे त्यांच्यासाठी - सध्या मुंबईच्या केमोल्ड गॅलरीमध्ये जे प्रदर्शन चालू आहे, त्यात राडिया टेप्सवरची कृती, शिल्पा गुप्ता आणि पुष्पमाला ह्यांचं काम पाहता येईल. इतरही काही कलाकारांचं समकालीन काम पाहता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आभार.
त्याच दुव्यावर वरवरचं आवरण बाजुला केल्यावर त्या प्रदर्शनाचे फोटो मिळाले. इथे बघता येतील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

फोटोंवरून किंचितच अंदाज येईल, कारण प्रदर्शन अनेक माध्यमांचा प्रभावी वापर करतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पण हळदणकरांचे 'ग्लो ऑफ होप' हैदराबादला सालारजंगमध्ये नसून मैसुरला जगनमोहन पॅलेसमधे जयचमराजेन्द्र आर्ट ग्यॅलरीत आहे असे आठवते. चुभूद्याघ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0