मुंबईतील काही रस्त्यांची आणि जागांची नावे - भाग १
सॅम्युएल टी. शेपर्ड नावाच्या इंग्रज लेखकाने लिहिलेले 'Bombay Place Names and Street Names’ अशा नावाचे आणि आणि १९१७ मध्ये छापलेले एक पुस्तक माझ्यासमोर आले. मुंबईच्या रस्त्यांची आणि जागांची २०व्या शतकाच्या दुसर्या दशकात काय नावे होती आणि त्या नावांमागे काय इतिहास दडलेला आहे अशी बरीच मनोरंजक माहिती त्यामध्ये आहे. बहुतेक माहिती दक्षिण मुंबई आणि जवळचे भायखळ्यासारखे भाग येथील रस्त्यांबाबत आहे कारण पुस्तकाच्या इंग्रज लेखकाचे राहणे-फिरणे ह्याच भागात होत असणार. ह्या माहितीपैकी बारीकसारीक गल्ल्याबोळ सोडून सर्वसामान्यत: कोणाहि वाचकास परिचित वाटतील अशा माहितीचे संकलन करून एक लेखमालिका लिहिण्याचा विचार आहे आणि त्यातील पुढील लेख पहिला असून इंग्रजी आद्याक्षरे अ आणि ब इतकी त्याची व्याप्ति आहे. लेखाची तयारी करतांना संदर्भासंदर्भाने अन्य पुस्तके, विशेषत: डॉ.जे.गर्सन दा कुन्हा ह्यांचे Origin of Bombay, एस.एम.एडवर्ड ह्यांचे The Rise of Bombay ही दोन पुस्तक आणि जालावरील समोर आलेली माहिती ह्यांचाहि उपयोग येथे करण्यात आला आहे.
शेपर्ड ह्यांनी आपल्या पुस्तकामध्ये अनेक ठिकाणी रावबहादुर पी.बी.जोशी आणि आणि आर.पी.करकारिया अशा दोन माहितगार हिंदुस्तानी व्यक्तींच्या माहितीचा हवाला दिला आहे. ह्यांपैकी रावबहादुर पी.बी.जोशी ह्यांच्याविषयक त्रोटक उल्लेखांशिवाय काहीच माहिती गूगलशोधात मिळाली नाही परंतु सिद्धेश्वरशास्त्री चित्राव ह्यांनी संकलित केलेल्या अर्वाचीन चरित्रकोशाच्या खंड २, पान २९९ येथे ह्यांच्याबाबत थोडीफार माहिती मिळते. पुरुषोत्तम बाळकृष्ण जोशी (१८५६-१९३०) हे मुंबईमधील एक अभ्यासू इतिहाससंशोधक गृहस्थ आणि मराठी लेखक होते. बर्याच अन्य संशोधकांनी त्यांच्याकडून मिळालेल्या साहाय्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केल्याचे आढळते. ह्यांना एशिऍटिक सोसायटीने ’कॅंबेल मेडल’ देऊन गौरविले होते. ह्यांची स्वत:ची राहण्याची जागा ’बनाम हॉल लेन’ मध्ये होती असा उल्लेख शेपर्ड ह्यांनी त्या लेनच्या संदर्भात केलेला आहे हे पुढे ’बनाम हॉल लेन’शी संबंधित भागामध्ये येईलच. रुस्तुमजी पेस्तनजी करकारिया हे असेच एक पारशी माहितगार गृहस्थ. ह्यांचीहि विशेष माहिती मिळत नाही पण ह्यांनी लिहिल्या बर्याच पुस्तकांचे त्रोटक उल्लेख गूगलशोधात दिसतात. स्वत: शेपर्ड ह्यांनी लिहिलेल्या 'The Byculla Club 1833-1916' आणि 'Bombay' अशा नावांच्या अन्य दोन पुस्तकांचा उल्लेख गूगलशोधामध्ये दिसला.
पुस्तकातील माहिती येथे संकलित करतांना मी दोन चाळण्या लावलेल्या आहेत. ब्रिटिश सत्तेखालील मुंबईतील हॉर्नबी, मेडोज, फ्रेअर अशी रस्त्यांची नावे स्वातन्त्र्योत्तर काळात बहुतेक बदलली गेली आहेत आणि त्या जुन्या नावांचा उल्लेख आताच्या वाचकाला बुचकळ्यात टाकतो. रस्त्यांना नावे देणारे हे पूर्वकालीन प्रतिष्ठित कोण होते ह्याची माहितीहि शोधू पाहणार्यास सहज जालावर सापडते. ह्या कारणांसाठी अशा रस्यांची नावे येथे वगळली आहेत. जुन्या किल्ल्याच्या उत्तर भागातील भुलेश्वर-भायखळा-परळ अशा भागातील लहानसहान रस्ते त्या परिसराशी परिचय असणार्यांनाच माहीत असतात, इतरांना त्या त्या नावांवरून काहीच बोध होत नाही. अशी नावेहि येथे वगळण्यात आली आहेत. आजहि वापरात असलेल्या आणि मुंबईची सर्वसामान्य ओळख असणार्या व्यक्तीस माहीत असू शकतील अशाच स्थानांच्या वा रस्त्यांच्या नावांना ह्या संकलनात जागा दिली आहे. मुंबईचे माहितगार वाचक ह्यामध्ये अजून भर घालू शकतील.
१) अल्टामॉंट वा अल्टामाउंट रोड आणि ऍन्स्टी रोड- खंबाला हिलवरील उच्चभ्रू वस्तीच्या अल्टामॉंट वा अल्टामाउंट रोड ह्या रस्त्याचे नाव त्यावर एकेकाळी असलेल्या ’अल्टामॉंट’ नावाच्या बंगल्यावरून पडलेले आहे. हा बंगला कोणी बांधला, तेथे कोण राहत असे, बंगल्याचे पुढे काय झाले अशी काही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही पण १८६५ पर्यंत तो जागेवर होता. जेम्स डग्लसलिखित Glimpses of Old Bombay ह्या पुस्तकात पान ४७ वर हा बंगला १८६५ साली रु.१००० भाडयाने दिला गेल्याचा उल्लेख आहे.
मुंबईतील जुने प्रख्यात वकील टी.ई.ऍन्स्टी (१८१६-७३) ह्यांचे नाव ऍन्स्टी रोड ह्या रस्त्यास मिळाले आहे.
२) अलेक्झॅंड्रा, लॅबर्नम आणि सिरस (Cirrus) मार्ग - ह्या तिनांपैकी लॅबर्नम रोड प्रसिद्ध आहे आणि शेजारच्या चित्रात दिसत आहे. त्याच्याच जोडीला अलेक्झॅंड्रा आणि सिरस अशा नावाचे त्याला समान्तर असे दोन रस्ते होते. हे तिन्ही रस्ते बॉंबे इंप्रूवमेंट ट्रस्टने ह्या भागाची नव्याने आखणी करतांना निर्माण केले आणि त्यांना तीन फुलझाडांची नावे दिली. पैकी अलेक्झॅंड्रा आणि सिरस ही नावे कोठल्या फुलझाडांसाठी आहेत हे लवकरच विसरले गेले कारण ही फुलझाडे इतकी प्रसिद्धहि नव्हती. स्वातन्त्र्यानंतरच्या नावे बदलण्याच्या लाटेत ह्या दोन रस्त्यांना वाच्छागांधी आणि काशीबाई नवरंगे ह्यांची नावे मिळाली. (काशीबाई पं. रमाबाईंसारख्याच ख्रिश्चन शैक्षणिक चळवळीत होत्या आणि तो भाग ह्या कार्यासाठी आजहि प्रसिद्ध आहे.) तिसर्याचेहि नाव बदलले जायचे पण लॅबर्नम म्हणजे अमलतास अथवा बहावा. हे नाव कोठल्या साहेबाचे नाव नसून एका फुलाचे आहे हे वेळीच लक्षात आल्यामुळे तेवढे मात्र वाचले!
![]() |
३) अपोलो गेट/बंदर - मुंबईच्या किल्ल्याच्या दक्षिणेस असलेल्या गेट आणि बंदराला हे नाव का पडले असावे ह्याबाबत अनेक तर्कवितर्क आहेत. Bombay City Gazetteer Vol I मधल्या अंदाजानुसार जुन्या काळात ’पाल-पालव’ नावाच्या देशी नौका तेथे नांगरलेल्या असत त्यावरून हे नाव पडले असावे. गर्सन दा कुन्हा ह्यांनाहि हाच अर्थ जाणवतो.
४) ऍंटॉप हिल - ह्या नावाच्या उगमाबद्दल मतमतान्तरे आहेत. रा.ब. जोशींच्या मते ’अंतोबा’ हे नाव मुंबईच्या जुन्या रहिवाशांमध्ये लोकप्रिय होते आणि ह्या टेकडीचा भाग कोणा अंतोबाच्या मालकीचा असावा. नंतर पोर्तुगीज काळात हे सूत्र विस्मरणात जाऊन नावाचा कालान्तराने ’ऍंटॉप हिल’ असा अपभ्रंश झाला.
५) ऍश लेन, ओक लेन आणि टॅमरिंड लेन - तीन झाडांची नावे ह्या तीन छोटया रस्त्यांना मिळाली आहेत. त्यांपैकी ओक लेन नक्की कोठे होती हे आता गूगलला समजत नाही, जरी त्या भागाच्या पोस्टमनांना ते माहीत असावे कारण अनेक जागांच्या पत्त्यांमध्ये अजूनहि तिचा उल्लेख गूगलशोधामध्ये दिसतो. बाकीचे दोन रस्ते शेजारच्या चित्रात दिसत आहेत.
त्यांपैकी ऍश लेन ह्या नावाचे कोडेच आहे कारण त्या भागात कधीकाळी एखादे ऍशचे झाड असल्याचा उल्लेख नाही. तसेच ऍश हे झाड मुंबईच्या दमट हवेत वाढू शकेल काय ह्याचीहि खात्री नाही. टॅमरिंड लेन ह्या नावाला मात्र निश्चित कूळकथा आहे.लेनच्या थोडया उत्तरेला असलेल्या सेंट थॉमस कॅथीड्रल आणि बॉंबे ग्रीन ह्यांच्या मध्यावर एक चिंचेचे झाड होते. तेथे आधी चिंचेची बरीच झाडे होती पण अखेर एकच उरले होते आणि त्याच्या सावलीत सार्वजनिक लिलाव चालत असत. भाडयाने गाडया चालवणार्यांच्या शब्दात त्या जागेला ’आमली आगळ - चिंचेसमोरची जागा’ असे नाव होते. (’आमली आगळ’चा ह्याच अर्थाने उल्लेख गर्सन दा कुन्हा ह्यांच्या Origin of Bombay ह्या पुस्तकाच्या पान ५९ वरहि मिळतो.) हे शेवटचे झाड नोवेंबर १८४६ मध्ये तोडले गेले. त्याची आठवण आता केवळ रस्त्याच्या नावात उरली आहे.
६) बॅरक रोड/स्ट्रीट २९ आणि मरीन लाइन्स ९८. शेपर्ड ह्यांनी दिलेल्या माहितीनुसार बॅरक स्ट्रीट नावाचा रस्ता बझार गेट स्ट्रीटपासून मिंट रोडच्या मध्ये होता. ईस्ट इंडिया कंपनीकडे स्वत:चे नेटिवांतून भरती केलेले सैनिक होतेच पण ब्रिटनमधील राजाचे गोरे सैनिकहि त्यांचा खर्च देऊन कंपनी आपल्याकडे ठेवत असे. अशा सैनिकांच्या राहण्याच्या जागेला ’King's Barracks' असे म्हणत असत आणि ही जागा किल्ल्याच्या भिंतीभाहेर एस्प्लनेड मैदानाच्या उत्तर अंगाला होती. त्यांचे नाव ह्या रस्त्यास मिळाले आहे. सध्याच्या गूगलमधील नकाशात एक बॅरक रोड दिसत आहे पण तो बझार गेट स्ट्रीटच्या जवळपास कोठेच नाही. अशी शक्यता वाटते की कंपनीच्या स्वत:च्या चाकरीत असलेल्या नेटिव सैनिकांच्या बॅरक्स येथे असू शकतील.
१८३० सालापर्यंत कंपनीची ’बॉंबे मरीन्स’ नावाची लढाऊ नौसेना होती आणि नंतर तिचेच वेळोवेळी इंडियन नेवी, रॉयल इंडियन नेवी असे नाव बदलत गेले. ह्या नौसैनिकांच्या बॅरक्सवरून त्या भागाला मरीन लाइन्स हे नाव पडले आहे.
७) बॅंक स्ट्रीट - हॉर्निमन सर्कल (जुने एल्फिन्स्टन सर्कल) येथून दक्षिणेकडे निघणारा रस्ता. १८६५ च्या कापूस घोटाळ्यात जुनी बॅंक ऑफ बॉंबे बुडाली. पुनर्रचित बॅंक ऑफ बॉंबे आपल्या नव्या इमारतीत १८६६ साली गेली. ती इमारत ह्या रस्त्यावर होती आणि रस्त्याला ’बॅंक स्ट्रीट’ हे नाव मिळाले. १९२१ साली नव्या इंपीरियल बॅंकेत ही बॅंक १९२१ मध्ये विलीन झाली. इंपीरियल बॅंकेचा पुढचा अवतार म्हणजे सध्याची स्टेट बॅंक ऑफ इंडिया होय.
८) बाबुला टॅंक, बाबुला टॅंक रोड आणि डोंगरी जेल - बाबुला टॅंक नावाची जागा अजूनहि खाली दाखविलेल्या गूगल मॅपच्या तुकडयामध्ये भुलेश्वर-उमरखाडी भागात दिसत आहे पण तेथे सध्या कोठलाच तलाव नाही. शेजारच्या १८८२ सालच्या सर्वे नकाशात मात्र तलाव दिसत आहे आणि तलावाजवळ एक जेल आणि जेल रोडहि दिसत आहे. त्यापैकी जेल आता तेथे नाही कारण त्याच्या जागी ’आशा सदन’ ही स्त्रियांसाठीचे आसराघर दिसत आहे. कोल्हापूरचे कारभारी माधवराव बर्वे ह्यांनी गुदरलेल्या अब्रूनुकसानीच्या खटल्यात निकाल विरुद्ध जाऊन मराठा आणि केसरीचे मुखत्यार अनुक्रमे आगरकर आणि टिळक ह्यांना १८८२ साली जेथे १०१ दिवस तुरुंगवासात काढावे लागले तेच हे डोंगरी जेल. टिळकांची १९०८ साली मंडालेला पाठवणी झाली तेव्हाहि तेव्हाहि त्यांना पुण्याहून आणून येथेच ठेवले होते. हा भाग थोडा उंचवटयाचा असल्याकारणाने त्यास डोंगरी म्हणत असत.
बाबुला टॅंक हा तलाव कोणा उदार व्यक्तीने १८४९ साली मुंबईकर रहिवाशांना पाणी पु्रवण्यासाठी खोदला आणि १९०७ पर्यंत तो तेथे होता. १९०७ साली तो बुजवण्यात आला आणि आता त्याचे नावच काय ते उरले आहे. त्या भागात एकेकाळी असलेल्या बाभळीच्या झाडांवरून त्या तलावास हे नाव पडले असे दिसते. १८८२ च्या नकाशात बाबुला टॅंक रोडहि दिसत आहे त्याचे आता रामचंद्र भट मार्ग असे नामकरण झाले आहे असे दिसते.
९) बाबुलनाथ मंदिर आणि बाबुलनाथ मार्ग - बाबुलनाथ मंदिराला ते नाव का पडले ह्याबद्दल आर.पी. करकारिया ह्यांचे मत असे की बाबुल नावाच्या एका सुताराने येथे शिवलिंगाची स्थापना केली आणि त्यावरून देवळाचे नाव बाबुलनाथ असे पडले. मंदिराच्या पुजार्यांचा ह्याला पाठिंबा आहे. उलटपक्षी रा.ब. जोशी म्हणतात की बाबलजी हिरानाथ नामक सोमवंशी क्षत्रिय ज्ञातीतील गृहस्थाने हे देऊळ निर्माण केले आणि त्याच्या नावावरून देवळास बाबुलनाथ म्हणतात. मूळचे देऊळ १७८० चे असून सध्याचे देऊळ तेथेचे १९०० साली बांधण्यात आले आहे. देवळावरून जाणारा बाबुलनाथ रस्ता इंप्रूवमेंट ट्रस्टने १९०१ साली बांधून कॉर्पोरेशनच्या ताब्यात दिला.
१०) बापू खोटे स्ट्रीट आणि किका स्ट्रीट - बापू खोटे हे नाव हिंदु माणसाचे वाटते पण ह्या रस्त्याचे बापू खोटे हे त्या भागातील बर्याच मालमत्तांचे मालक असलेल्या एका कोंकणी मुसलमान व्यक्तीवरून पडले आहे. ते प्रसिद्ध हकीमहि होते अशी समजूत आहे. जगजीवन किका ह्यांच्याबद्दल नावापलीकडे काही अन्य माहिती उपलब्ध नाही.
११) बलराम रोड आणि बॅप्टी रोड - बलराम रोडचे नाव रा.ब. येल्लप्पा बलराम (१८५०-१९१४) ह्या तेलुगु व्यक्तीवरून वरून पडले आहे. त्यांचे राहते घर ह्या रस्त्यावर होते. मुंबई-पुणे-कराची येथील इंग्रज सैन्याला घाऊक प्रमाणावर दूध पुरवण्याच्या व्यवसायातून ह्यांचे आजोबा आणि वडील मुंबई-पुण्याकडे आले. येल्लप्पा ह्यांनी दुधाचा व्यवसाय बंद करून बांधकाम कंत्राटे घेण्यास सुरुवात केली. १८५६-६० ह्या काळात विहार तलाव बांधल्यानंतर मुंबईला पाणी पुरविण्यासाठी शहरातील उंच ठिकाणांवर साठवणीचे तलाव बांधून तेथपर्यंत विहारचे पाणी पंपाने पोहोचविण्याची सोय करण्यात आली. त्यांपैकी एक तलाव माझगाव भागातील भंडारवाडा टेकडीवर निर्माण करण्यात आला. त्याचे बांधकाम हे येल्लप्पा बलराम ह्यांचे विशेष काम मानले जाते. (ह्या तलावाच्या जागी आता जोसेफ बॅप्टिस्टा उद्यान उभे आहे.)
बॅप्टी रोडचे नाव जेम्स बॅप्टी ह्यांच्यावरून पडले आहे. ह्या भागात त्यांची पिठाची गिरणी आणि केकसाठी प्रसिद्ध असलेली बेकरी होती.
१२) बनाम हॉल लेन - रा.ब.जोशींचे राहते घर ह्या गल्लीतच होते. तिच्या नावाबाबत त्यांनी पुरविलेली मनोरंजक माहिती अशी. ह्या जागी प्रथम असलेल्या नारळांच्या वाडीमध्ये एक घर होते आणि त्याला ’वन महाल’ अथवा ’बन महाल’ असे ओळखत असत आणि त्या घरावरून गल्लीला बन महाल लेन असे ओळखत असत. मुंबईचे कमिशनर ऍकवर्थ (१८९०-९५) हे रजेवर इंग्लंडला गेले होते आणि ते माल्वर्न गावात आपल्या ’बेनहम हॉल’ नावाच्या घरात राहात होते. तेव्हा त्यांच्याकडे मुंबईहून काही पत्रे आली ज्यावर ह्यावर ह्या गल्लीचा पत्ता होता. गल्लीच्या आणि त्यांच्या घराच्या नावातील साम्यामुळे त्यांना असे वाटले की ह्या गल्लीचे नाव बेनहम हॉलवरून ठेवावे. त्यांची सूचना अर्थातच (!) मंजूर होऊन गल्ली ’बेनहम हॉल लेन’ झाली आणि त्याच नावाचे रूपान्तर देशी लोकांच्या बोलण्यात ’बनाम हॉल लेन’ असे झाले.
गूगल मॅप्सला ही गल्ली दिसत नाही पण बर्याच जागांच्या पत्त्यांमध्ये हिचा उल्लेख सापडतो म्हणजे पोस्टमनांना ती निश्चित माहिती आहे. गिरगावातील डी.डी. साठे मार्गाच्या आसपास ती असावी असे वाटते.
१३) बझार गेट स्ट्रीट, गनबो स्ट्रीट, अग्यारी लेन, बोरा बझार स्ट्रीट - १८६२ साली किल्ल्याची भिंत पाडण्याच्या वेळी जमीनदोस्त झालेल्या दरवाज्याच्या नावावरून बझार गेट स्ट्रीट हे नाव पडले आहे. किल्ल्याच्या उत्तर सीमेपलीकडे नेटिवांची वस्ती, म्हणजेच ’बझार’ (Black Town) आणि भिंतीमध्ये बझार गेट नावाचे दार - खरे तर तीन दारे, एक मोठे व दोन लहान, नेटिव त्याला ’तीन दरवाजा’ म्हणत असत - होते.
गनबो स्ट्रीटबाबत दोन गोष्टी उपलब्ध आहेत. एकीनुसार जगन्नाथ शंकरशेट ह्यांचे एक पूर्वज गणबा ह्यांच्या मालकीची जमीन ह्या भागात होती आणि त्याचे नाव ह्या रस्त्यास मिळाले आहे. दुसरीनुसार गनबावा नावाच्या मुस्लिम फकिराच्या नावाची विहीर ह्या परिसरात होती. गनबावाच्या नावावरून रस्त्याला हे नाव मिळाले आहे. गनबावाची विहीर नंतर केव्हातरी बुजविण्यात आली पण आपण ती पाहिली असल्याचे दिनशा वाच्छा ह्यांनी आपल्या मुंबईच्या आठवणींमध्ये नोंदवले आहे.
अग्यारी लेन हे नाव माणकजी नौरोजी सेठ ह्यांनी १७३३ साली तेथे बांधलेल्या अग्यारीवरून आलेले आहे. मुंबईच्या पूर्व किनार्याकडील ’नौरोजी हिल’ ह्या नावाने ओळखली जाणारी आणि ’डोंगरी’ अशा मूळच्या नावाची उंचवटयाची जागा ह्यांच्याच मालकीची होती. अग्यारीची पुनर्बांधणी १८९१ मध्ये करण्यात आली.
बोरा बझार स्ट्रीट हे नाव मुळात बोहरा बझार स्ट्रीट असे आहे आणि त्या भागात मोठया प्रमाणात राहणार्या बोहरा जमातीवरून ते नाव पडलेले आहे.
१४) बोरी बंदर - जी.आय.पी रेल्वे रस्त्याचे काम सुरू झाले तेव्हा ह्या भागातील समुद्रातील खडक आणि वाळूचे उथळ भाग काढून टाकून रेल्वेच्या कामासाठी इंग्लंडहून येणारे जड लोखंडी सामान उतरवून घेण्यासाठी एक बंदर १८५२ साली तयार करण्यात आले आणि ह्या जागी मूळच्या असलेल्या रानवट बोरीच्या जंगलावरून त्याला बोरीबंदर असे नाव पडले. नंतर ह्याच जागी रेल्वे गाडया सुटण्याचे जे स्टेशन तयार झाला त्यालाहि तेच नाव चालू राहिले. नंतर येथेच एक नवी भव्य इमारत उभारून १८८७ साली ती वापरात आणण्यात आली आणि विक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाच्या ५०व्या वर्षाच्या प्रसंगाने तिला विक्टोरिया टर्मिनस - VT - हे प्रसिद्ध नाव मिळाले. तत्पूर्वी वापरात असलेल्या मूळच्या बोरीबंदर स्टेशनाचे चित्र येथे दर्शवीत आहे.
१५) बॉंबे - मुंबई - ह्या शब्दाच्या उगमाबाबत आता फारसा वाद उरलेला नाही असे वाटते. मुंबईचे मूळचे रहिवासी कोळी ह्यांची देवी मुंबा अथवा मुंबाई हिच्या नावावरून १६व्या शतकापासून उपलब्ध युरोपीय भाषांमधील उल्लेखांमध्ये ह्या गावाचे नाव Bombaim अथवा त्याचीच रूपान्तरे Mombayn (1525), Bombay (1538), Bombain (1552), Bombaym (1552), Monbaym (1554), Mombaim (1563), Mombaym (1644), Bambaye (1666), Bombaiim (1666), Bombeye (1676), Boon Bay (1690) असे उल्लेखिलेले सापडते. (संदर्भ विकिपीडिया http://en.wikipedia.org/wiki/Mumbai)
ह्या Bombaim शब्दाच्या उगमाबाबत दोन परस्परविरोधी मते आढळतात. पहिले मत म्हणजे हा शब्द ’मुंबाई’ ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे. दुसरे मत म्हणजे ब्रिटिशांपूर्वी ह्या बेटांवर अधिकार असलेले पोर्तुगीज ह्या जागेस Bom Bahia (Bombahia) (Good Bay) असे म्हणत असत आणि त्याचे अपभ्रष्ट रूप म्हणजे ’मुंबई’. १९व्या शतकातील एक अधिकारी अभ्यासक डॉ. जे. गर्सन दा कुन्हा ह्यांनी ह्या दोन मतांची विस्तृत चर्चा आपल्या Words and Places in and about Bombay (Indian Antiquary, Vol III, 1874, p. 248) ह्या लेखामध्ये केली आहे आणि शब्दाचा उगम ’मुंबाई’कडे लावला आहे. Bombahia विरुद्ध त्यांचा प्रमुख आक्षेप असा आहे की Bom हे विशेषण पुल्लिंगी असून Bahia हे नाम स्त्रीलिंगी आहे आणि त्यामुळे Bombahia हे व्याकरणात बसणारे रूप नाही. ते Boabahia असे असावयास हवे होते पण तसा उपयोग कोठेच आढळत नाही.

१६) ब्रीच कॅंडी, हॉर्नबी वेलार्ड आणि लव ग्रोव - १७७१ ते १७८४ ह्या काळात मुंबईचे गवर्नर असलेल्या विल्यम हॉर्नबी ह्यांनी लव ग्रोव ते महालक्ष्मी ह्या भागातून आत घुसणारे समुद्राचे पाणी थांबविण्यासाठी बांधलेल्या बांधास हॉर्नबी वेलार्ड असे नाव होते. बांध अशा अर्थाच्या vallado ह्या पोर्तुगीज शब्दाचे हे इंग्रजी रूप आहे. सध्या ह्याचे नाव लाला लजपतराय मार्ग असे आहे. हा बांध घालण्याच्या पूर्वी भरतीचे पाणी आत शिरून पूर्वेकडील उमरखाडीपर्यंत खारी दलदल निर्माण करीत असे. तिच्या जागी पक्की जमीन करण्याच्या विचाराने हॉर्नबी ह्यांना हा बांध घालावयाचा होता पण लंडनमधील कंपनीचे डिरेक्टर बोर्ड त्या खर्चाला तयार नव्हते. आपल्या मुदतीच्या अखेरच्या दिवसात हॉर्नबी ह्यांनी हे काम सुरू केले आणि बोर्डाकडून त्याला मिळालेली नामंजुरी मुंबईत पोहोचण्यापूर्वीच ते पूर्णहि केले.
ह्याच्या उत्तरेला असलेला लव ग्रोव भाग तेव्हा मुंबईपासून दूर आणि एकान्ताचा असल्याने प्रेमी जोडप्यांना तेथे जाऊन निवान्तपणे प्रेमालाप करता येत असत ह्यावरून त्या भागास लव ग्रोव हे नाव पडले. नंतर सांडपाण्याच्या शुद्धीकरणासाठी तीच जागा योग्य म्हणून निवडली गेल्याने तिच्या जुन्या रोमॅंटिक संदर्भाला काही अर्थ उरलेला नाही.
ब्रीच कॅंडी ह्या नावाच्या उगमाविषयी निश्चित असे काही सांगता येत नाही पण महालक्ष्मीच्या देवळाबाहेरील समुद्र खडकाळ असल्याने त्या भागात समुद्रकिनारा तुटल्यासारखा होता म्हणून त्यास ’ब्रीच’ म्हणू लागले अशी उपपत्ति बहुतेक ठिकाणी दिलेली आढळते. ’कॅंडी’चा संबंध ’खिंड’ ह्या मराठी शब्दाशी जोडला जातो.
१७) भायखळा - ह्या नावाचे दोन अर्थ सुचविण्यात आले आहेत. अन्य लेखकांच्या आधारे गर्सन दा कुन्हा ह्या नावाचा उगम बहावा - बावा (कुणबी भाषेत) - भाया (कोळी अपभ्रंश) आणि खळे (जागा) असा दाखवतात. बहावा म्हणजे अमलतास, Cassia fistula. येथे असलेल्या बहाव्याच्या झाडांवरून भायखळे हे नाव पडले असावे. रा.ब.जोशी हा अर्थ अमान्य करीत नाहीत पण ’भाया नावाच्या व्यक्तीच्या मालकीची जागा’ असा अन्य अर्थ सुचवितात. ह्या झाडाचे चित्र खाली दर्शवीत आहेत.
मुंबईची वाढ होऊ लागल्यानंतर तेथील प्रतिष्ठित उच्चपदस्थांची घरे भायखळ्यात उभी राहू लागली. भायखळ्याला एक प्रशस्त स्टेशनहि बांधण्यात आले खाली चित्र येथे दाखविले आहे. Byculla Club हा इंग्रजांसाठी राखीव क्लब १९१६ साली बंद पडेपर्यंत येथेच होता.
१८) भेंडी बझार - ह्या भागात एकेकाळी मोठया संख्येने असलेल्या भेंडीच्या झाडांवरून ह्या भागाला भेंडी बझार हे नाव निर्माण झाले आहे. भेंडीच्या झाडाचे वनस्पतिशास्त्रीय नाव Thespesia populnea असे आहे. ते समुद्र जवळ असलेल्या जागी चांगले वाढते आणि एक शोभेचे झाड मानले जाते. त्याला मोठी पिवळी फुले येतात. Indian Tulip, Portia, पारस पिंपळ ही त्याची अन्य काही नावे. (खायची भेंडी ही नव्हे.) पुढे भेंडी बझार रस्त्याचे एक जुने चित्र आणि भेंडीच्या झाडाचे एक चित्र अशी दोन चित्रे दर्शविली आहेत.
![]() |
![]() |
(चित्रश्रेय - येथील रंगीत चित्रे विकिपीडियावरून घेण्यात आली आहेत आणि नकाशे गूगल मॅप्सवरून. उर्वरित चित्रे प्रताधिकारमुक्त जुन्या पुस्तकांमधून मिळवलेली आहेत.)
+
सहमत आहे. Behind the Bazaar हे त्या भागाला तसेही लागू पडत नाही. म्हणजे कुठल्याश्या बाजाराची मागची बाजू म्हणता येत नाही. ते वर्णन कदाचित गिरगावास ;) लागू पडेल. (फोर्टाच्या बाजूने विचार केल्यास नळबाजार, जव्हेरी बाजार, चिराबाजार, भुलेश्वर यांच्या मागची बाजू).
मुंबईत/महाराष्ट्रात साहेबाच्या नावाने गावांची नावे मात्र पडलेली दिसत नाहीत. अमूकाबाद किंवा तमुकगंज सारखी.
(समांतर अवांतर)
समुद्रसपाटीपासून उंचीच्या दृष्टीने मुंबई ही पुण्यापासून खालच्या पातळीवर असूनसुद्धा, पुण्याहून मुंबईला जाणारी डेक्कन क्वीन (किंवा, मध्य रेल्वेची कोणतीही झुकझुकगाडी) ही 'अप' (आणि पर्यायाने मुंबईहून पुण्याला येणारी 'डाऊन') कशी होऊ शकते, हे बरेच दिवस मला कोडे होते. मग बर्याच उशिराने उलगडा झाला.
कदाचित 'फ्रेम ऑफ रेफरन्स'चा संबंध असावा काय?१
==========================================================================
१ वरील वाक्याचेच घ्या. मी पुण्याहून मुंबईला 'जाणारी' आणि मुंबईहून पुण्याला 'येणारी' असे शब्दप्रयोग केले आहेत. एखादा मुंबई़कर याच्या बरोबर उलट शब्दप्रयोग करेल.
इंग्रजी प्रभाव?
हा इंग्रजी प्रभाव असावा. इंग्लंडमध्ये एनीटाऊन पासून लंडनला जाणारी ट्रेन ही 'अप', आणि लंडनहून एनीटाऊनला जाणारी 'डाऊन' अशी जुनी परिभाषा आहे. (काही अपवाद आहेत, पण ते जाऊद्यात.) इथे एनीटाऊन लंडनच्या उत्तरेला आहे की दक्षिणेला, समुद्रसपाटीच्या हिशेबात वर की खाली याने फरक पडत नाही.
असेच काहीसे
इंग्लंडमध्ये एनीटाऊन पासून लंडनला जाणारी ट्रेन ही 'अप', आणि लंडनहून एनीटाऊनला जाणारी 'डाऊन' अशी जुनी परिभाषा आहे.
असेच काहीसे. (म्हणजे, तत्त्व तेच.)
म्हणजे, व्हीटी१ हे जर म.रे.चे मुख्यालय, तर मग गाडी जर म.रे.ची असेल, तर व्हीटीच्या दिशेने जाणारी गाडी ही 'अप', व्हीटीपासून दूर जाणारी गाडी ती 'डाऊन', असे.
याची आणखी एक गंमत अशी, की पुण्याहून नवी दिल्लीमार्गे जम्मूतवीला जाणारी झेलम एक्स्प्रेस ही गाडी उ.रे.ची; उ.रे.चे मुख्यालय नवी दिल्ली येथे. म्हणजे, पुण्याहून जम्मूतवीला जाणारी झेलम ही नव्या दिल्लीपर्यंत 'अप', नि तेथून पुढे जम्मूतवीपर्यंत 'डाऊन'. जम्मूतवीपासून पुण्याला परत येताना नव्या दिल्लीपर्यंत 'अप', त्यापुढे पुण्याला जाताना 'डाऊन'.
(दोन वेगवेगळ्या रेल्वेंची मुख्यालये एकाच गाडीच्या मार्गावर येत असल्यास, 'अप'-'डाऊन'चे गणित हे बहुधा त्या गाडीचे व्यवस्थापन पैकी ज्या कोणत्या रेल्वेचे, त्या रेल्वेच्या मुख्यालयाच्या संदर्भाने ठरत असावे. चूभूद्याघ्या.)
रेल्वे मुख्यालयाचे स्टेशन जर गाडीच्या मार्गावर नसेल, तर मात्र 'अप'-'डाऊन'चे गणित नेमके कसे, खात्री नाही. बहुधा गाडी मुख्यालयास जात नसली, तरी ज्या दिशेचा मार्ग पुढे मुख्यालयाकडे जातो, ती दिशा 'अप' दिशा, नि विरुद्ध दिशा (पक्षी: मुख्यालयापासून दूर जाणारी दिशा) ती 'डाऊन' दिशा, असे असावे. (चूभूद्याघ्या.)
पण मग काही शंका उद्भवतातः
- मुंबईहून पुणेमार्गे मिरज/कोल्हापूरला जाणारी कोयना एक्सप्रेस नेमकी कोणत्या रेल्वेची? (आठवणीप्रमाणे बहुधा द.म.रे. असे वाटते. चूभूद्याघ्या.)
- पण मग द.म.रे.च्या मुख्यालयाकडे (हे नेमके कोठे, ते आठवत नाही, परंतु बहुधा बंगळूरु किंवा सिकंदराबाद यांपैकी एक असावे; चूभूद्याघ्या.) जाणारी कोयना ही जर 'अप' म्हणायची, तर मग कोयनाचे 'अप'/'डाऊन'चे गणित मुंबई-पुणे मार्गावर धावणार्या बहुतांश इतर (म.रे.च्या) गाड्यांच्या उलट असावयास हवे. (कारण, बंगळूरु/सिकंदराबादच्या दिशेने जाणारी गाडी म्हणजे व्हीटीपासून दूर जाणारी गाडी.) परंतु निदान पुण्या-मुंबईच्या दरम्यान तरी तसे होत असल्याचे आठवत नाही. (चूभूद्याघ्या.)
- किंवा मग कोयना ही पुण्यापर्यंत म.रे.ची म्हणून, नि त्यापुढे द.म.रे.ची म्हणून जात असावी काय?२
- पण मग त्याही परिस्थितीत, पुण्याहून मिरजेपर्यंतचा मार्ग हा द.म.रे.च्या मुख्यालयाच्या दिशेने, नि त्यापुढे मिरजेपासून कोल्हापुरापर्यंतचा मार्ग हा द.म.रे.च्या मुख्यालयापासून दूर जाणारा ठरावा. म्हणजे मग कोयना (किंवा मुंबईहून मिरजेमार्गे कोल्हापुरास जाणारी द.म.रे.ची कोणतीही गाडी, जसे, सह्याद्री) ही (झेलमप्रमाणे) मिरजेस पोहोचल्यावर अचानक 'अप'ची 'डाऊन' (किंवा 'डाऊन'ची 'अप') होत असावी काय?
जाणकारांनी खुलासा करावा.
==================================================================================================
१ आम्ही 'व्हीटी'च म्हणतो, नि म्हणणार. शिवसेना ऑर नो शिवसेना.
२ म्हणजेच, थोडक्यात, पुण्यास गाडीचे व्यवस्थापन (म.रे.कडून द.म.रे.कडे) बदलत असावे काय? (बहुधा बदलते, असे वाटते. चूभूद्याघ्या.३)
३ पण मग त्या परिस्थितीत, पुण्यापासून पुढे मिरजेच्या दिशेने जाताना (तोपर्यंत 'डाऊन' असलेली) गाडी 'अप' होत असावी, किंवा कसे, याबद्दल खात्री नाही. माझ्या अंदाजाप्रमाणे व्हावयास हवी (अदरवाइज़ द होल थिंग डझण्ट मेक सेन्स), परंतु छातीठोकपणे सांगू शकत नाही. माहीतगारांनी प्रकाश पाडावा.
शिवाय नव्या माहितीनुसार-
शिवाय नव्या माहितीनुसार कोल्हापुर मिरज हे आता दमरेत येत नाहीत असे कळते.
http://www.scr.indianrailways.gov.in/cris//uploads/files/1373023072033-…
साहेबाच्या नावाची गावे
साहेबाच्या नावाची गावे सर्वात अधिक संख्येने अंदमान-निकोबार बेटांवर आहेत. अन्य राज्यातहि काही आहेत पण खूपच थोडया प्रमाणात.
India-British-Raj ह्या Rootsweb गटातील List मध्ये ह्या विषयावर काही माहिती देणारा एक लेख मी काही वर्षांपूर्वी लिहिला होता. सवड मिळाली आणि तो सापडला म्हणजे त्याचे भाषान्तर येथे देईन.
शब्द एकेरी वापरला आहे की नाही
शब्द एकेरी वापरला आहे की नाही हा प्रश्नच नाही. प्रश्न आहे त्या शब्दाला अपरिहार्यपणे चिकटलेल्या जुन्या लाचारीचा. आपल्या आजोबा-पणजोबा-खापरपणजोबांच्या पिढ्यांनी इंग्रजांना 'साहेब' म्हटले म्हणून आपणही तेच करत राहायचे का? अमेरिकेत काही दशकांपूर्वीपर्यंत काळ्या वंशाच्या लोकांना सर्रास निग्रो म्हटले जायचे व त्यात कोणाला काही गैर जाणवायचे नाही. पण आज तिथे तो शब्द चालतो का? नाही, त्यांना ब्लॅक म्हणावे लागते. जे एकेकाळी खुपत नव्हते ते कालांतराने खुपू लागते, त्यातील सुप्त सूचकता, श्रेष्ठ-कनिष्ठतेचा छुपा अर्थ बोचू लागतो. इथे तर अर्थ छुपाही नाही, इन युअर फेस आहे.
संबंधित वाक्य "साहेबाच्या नावाची गावे.."ऐवजी 'इंग्रजांच्या नावांची गावे ..' असे सहज व अर्थहानी न होता करता येते.
ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भ
वरच्या लेखनात मी 'साहेब' आणि 'नेटिव' असे दोन शब्द मुद्दामहूनच वापरले आहेत. त्यांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भ लक्षात ठेवून वाचले तर त्यामध्ये कसलीहि 'लाचारी' तुम्हास दिसणार नाही.
आजकाल बरेचदा काळ्या लोकांच्या वापरात 'निगर' हा शब्दाचा मुद्दाम वापर केलेला आढळतो, किंवा पुण्याच्या एस.पी. कॉलेजला सरसहा 'भटजी कॉलेज' म्हणतात, तसेच हेहि.
साहेबाच्या नावाची गावे...
...पाकिस्तानात (त्यातही खास करून पाकिस्तान-पंजाबात आणि थोड्याफार प्रमाणात वायव्य सरहद्द प्रांत उर्फ खैबर-पख्तूनख्वात) बऱ्यापैकी सापडतात.
जसे: लायालपूर (आताचे फैसलाबाद - पंजाब), कॅंपबेलपूर (पूर्वीचे आणि आताचे अटक - तेच ते मराठ्यांची घोडी फेम - पंजाब), मॉंटगोमेरी (आता सहिवाल - पंजाब), अॅबटाबाद (खैबर-पख्तूनख्वा), जाकोबाबाद (सिंध), फोर्ट सॅंडेमन (आता झोब - बलुचिस्तान).
रोचक
माहितीपूर्ण लेख आवडला. पुढील भागांची वाट पाहत आहे. नकाशे व छायाचित्रे जरा मोठ्या आकाराची टाकल्यास नीट पाहता येतील. ते शक्य नसल्यास व ती मोठ्या आकारात जालावर इतरत्र उपलब्ध असल्यास त्यांचे दुवे द्यावे.
रस्ते/जागा अकारविल्हे घेण्याऐवजी एक एक परिसर घेऊन तिथल्या महत्त्वाच्या रस्त्यांचा व जागांचा परिचय अशी मांडणी केली असती तर त्या त्या परिसराचा तत्कालीन विहंगम परिचय झाला असता.
फोरास रोड
प्रत्यक्ष मुंबईला पाय लागण्याच्या कित्येक वर्षे आधीपासून मला 'फोरास रोड' हा प्रकार वाचनातून ठाऊक होता. (नंतर मग मुंबईत अनेक वर्षे राहूनही तिथे पर्यटनासाठी जायचा धीर कधी झाला नाही.) हा 'फोरास' कोणी इंग्रज होता का? तसं असेल, आणि हे नाव अजून बदललं गेलं नसेल तर शिवसेनेने देशप्रेमाखातर ते बदलून कुठल्यातरी प्रसिद्ध मराठमोळ्या वेश्येचं वगैरे नाव द्यायला हरकत नाही.
पुणे
परवा पुण्यातील शहाजी परठा ह्या माझ्या आवडत्या फुड जॉइण्टवर जाताना रस्ता चुकून पुण्यातल्या काही कुप्रसिद्ध गल्लीत शिरलो.
तिथे ऐन डेंजर झोनमध्ये एका चौकात होनाजी बाळा चौक असे नाव दिसले.
पूर्वी ह्या उद्योगाचा व नाचगाण्याचा बराच संबंध असावा किंवा पब्लिकच्या डोक्यात तसे गणित असावे असे दिसते.
.
मराठी नाव तर पटकन डोक्यात येत नाही; पण परदेशी शिक्का पुसून अस्सल भारतीय , उज्ज्वल परंपरा असलेलं अडीच हजार वर्षापूर्वीचं आम्रपाली ह्या बुद्धकालीन गणीकेचं नाव देता येउ शकेल.
तिथलेच
>>ऐन डेंजर झोनमध्ये एका चौकात होनाजी बाळा चौक असे नाव दिसले.
शाहीर होनाजी बाळा हे तिकडलेच होते असे वाचले आहे. त्यांना दुसर्या बाजीरावाच्या पत्नीने कानपिचक्या दिल्याने त्यांनी कीर्तन वगैरे सुरू केले.
(एकदा तमाशाची लावणी सुरू असताना सौ बाजीराव तिथे आल्या असता होनाजीयांनी ताबडतोब कीर्तन सुरू केले असा काहीतरी प्रसंग अमर भूपाळी चित्रपटात आहेसे वाटते).
होनाजी बाळा
पुण्यात रहायचे हे खरेच. बाकी पिच्चरमधला शीन असा की अगोदर शनवारवाड्यावर दूध घालायला येताना त्याच्या भूपाळीवर खूष होऊन बाजीरावपत्नी त्याला जमीन बक्षीस देते, व पुढे होळकरी दंग्यानंतर त्याला शिव्या घालते की तुझ्यामुळे लोक तमाशाच्या नादी लागून हतवीर्य वगैरे झाले, तूच नुकसान केलंस, इ.इ.इ.
औपचारीकतेत प्रकरण अडकले
खरे तर होनाजी बाळा यांच्या सौं नी दुसर्या बाजीरावाला सांगायला हवे होते व मिसेस पेशवे यांनी होनाजी रावांना हीच "पूर्वंपार प्रुव्हन मेथड"१ आहे.
पण नेमके पेशव्यांना सांगायची पॉवर नव्हती ना.. ते पेशवे नसते तर नक्की जमले असते.
१थोडक्यात काय नवरे / बायका आपापल्या स्पाउसला अजिबात जुमानत नाहीत, दुसर्याच्या स्पाउजने सांगीतले की कसे लगेच ऐकतात...
होनाजी बाळा या नावानं
होनाजी बाळा या नावानं वावरणारी व्यक्ती एक नव्हती. होनाजी शिलारखाने व बाळा कारंजकर हे दोघं मिळून होनाजी बाळा होते. होनाजी शिलारखान्यांच्या आजोबांचा दुग्धव्यवसाय होता. पुढे पेशव्यांकडेही हे कुटुंब दुग्धपुरवठा करत असे. बुधवारातच त्यांचं वास्तव्य होतं. पुढे या कुटुंबाला होनाजीमुळे ’कवि’ हे आडनाव मिळालं. होनाजीचे वंशच आता कवि हे आडनाव लावतात. पुण्यातले प्रसिद्ध कवि बासुंदीवाले ते हेच. बासुंदी-विक्रीचा हा व्यवसाय साधारण तीनशे वर्षं जुना आहे. आजही सुरू असलेला पुण्यातला खाण्याशी संबंधित असा हा सर्वांत जुना व्यवसाय आहे.
बुधवारात अनेक मंदिरं होती. पुण्यातला वेश्याव्यवसाय मंदिरांभोवती बहरला आणि बाजारपेठेपासूनही तो फटकून राहिला नाही. आज ढमढेरे बोळ, म्हणजे श्रीकृष्ण चित्रपटगृहाचा बोळ, या व्यवसायामुळे बदनाम आहे. पण एकेकाळी ढमढेरे वाड्यात थोरामोठ्यांची उठबस असे. या वाड्यासमोरच विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा सहभाग असलेलं पुण्यातलं पहिलं भोजनगृह सुरू झालं. साळवेकरांचं अन्नपूर्णागृहही या ढमढेरे वाड्यात होतं. शि. म. परांजपे, इतिहासाचार्य राजवाडे, न. चिं. केळकर इथे जेवायला येत.
चर्नी रोड
मागे मुंबईत नामांतराची लाट आली होती तेव्हा काही जाज्वल्यांनी चर्नी रोडचे नाव बदलण्याचा घाट घातला होता, त्याची आठवण आली!
कोणती/कितवी लाट?
बाकी, त्यापेक्षा, चर्नी रोड स्टेशनवरील पाटीवरील इंग्रजी स्पेलिंग सुधारले१ (Charni Road केले), तद्वत, पाटीवरील मराठी लेखनही सुधारले असते ('चरणी रोड' किंवा 'चरणी रस्ता' केले असते), तर काम झाले नसते काय?
(बाकी, Behind the Bazaar हे रेट्रोफिटिंग असण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही.)
======================================================================================================
१ रेल्वेदरबारी चर्नी रोडचे संक्षिप्त रूप CYR असे आहे. (गरजूंनी संदर्भाकरिता चर्नी रोड स्टेशनावर जाऊन एखादे तिकीट विकत घ्यावे. तिकिटाचे पैसे प्रस्तुत प्रतिसादकास मागू नयेत; मिळणार नाहीत!) हा अर्थातच ब्रिटिशकालीन स्पेलिंगाचा संक्षेप असावा. मूळ ब्रिटिशकालीन स्पेलिंग बहुधा Churney Road असे असावे२ (चूभूद्याघ्या.), आणि म्हणूनच बहुधा 'Churney नावाचा कोणी साहेब असावा, नि त्यावरून स्टेशनचे नाव पडले असावे' असा गैरसमज रुजला असावा.
२ 'चौकी'चे ज्याप्रमाणे 'Chokey' होते, तद्वत 'चरणी'चे 'Churney' होणे संभव आहे.
दोन वेगळ्या गोष्टी
ठेसनकोड (तिकिटावर छापायचे) वायले, आन् इण्डिकेटर कोड (फलाटावरल्या इण्डिकेटरवर, फलाटावर येणारी पुढील गाडी कोठपर्यंत जाते हे दाखवण्याकरिता लावायचे) वायले. तुमच्यासारख्या झण्टलमन लोकान्ला एवढी शिम्पल गोष्ट कळू नाही???
असो. 'एन' आणि 'एस' ही कसारा नि कर्जतकरिता इण्डिकेटर कोडे जाहली. प्रत्यक्षात यांची स्टेशनकोडे वेगळी असावीत.
(वेष्टर्नवर अनुक्रमे वांद्रे, अंधेरी, गोरेगाव, मालाड, बोरिवली, विरार, चर्चगेट नि दादर यांकरिता लोकलच्या फलाटांवरील इण्डिकेटरकोडे ही अनुक्रमे B, A, G, M, Bo, V, C आणि D अशी आहेत. या ठेसनांची स्टेशनकोडे अनुक्रमे BA, ADH, GMN१, MDD२, BVI, VR, CCG आणि DDR३ अशी आहेत.४, ५)
===============================================================================================================================================
१ GMNमधला M कोठून यावा, हे कळत नाही. कदाचित 'गोरेगाम'वाल्यांच्या भावना दुखवू नयेत म्हणून M, नि 'गोरेगांव'वाल्यांच्या दुखवू नयेत म्हणून N, अशी काही तडजोड असावी काय? (पण मग खुद्द गोरेगावात 'गोरेगाम'वाले कितीसे राहात असावेत, शंका आहे. अर्थात, वेष्टची फारशी कल्पना नाही म्हणा!)
२ MDDमधला जास्तीचा D कोठून यावा, हेही असेच एक कोडे आहे.२अ
२अ अनेकदा मी मालाडची ठेसनाची पाटी (उगाचच) 'माला-डी' अशी वाचत असे, त्याची यानिमित्ताने (पुन्हा, उगाचच) आठवण आली.
३ वेष्टर्नचे दादर वायले, नि शेण्ट्रलचे वायले. वेष्टर्नच्या दादरचे ठेसनकोड DDR, शेण्ट्रलचे DR.
४ याव्यतिरिक्त, वेष्टर्नच्या तुरळक गाड्या क्वचित काही उत्तरेस भायंदरला आणि एखाददुसरी दक्षिणेस महालक्ष्मीला, अशाही सुरू होतात / संपतात. भायंदर आणि महालक्ष्मीची स्टेशनकोडे अनुक्रमे BYR आणि MX अशी आहेत. माझा मुंबईशी संबंध असण्याच्या काळात तरी यांची इण्डिकेटरकोडे मी इण्डिकेटरावर कधी पाहिल्याचे स्मरत नाही. त्या गाड्यांचे इण्डिकेटरावर कसे करीत, हे पश्चिम रेल्वेच जाणे.
५ चारदोन 'मार्मिक' (किंवा गेला बाजार 'माहितीपूर्ण') श्रेण्या गोळा करण्याच्या हेत्वर्थ ही सर्व यूसलेस माहिती येथे (इतर उद्योग तत्त्वतः असले, तरीही वेळ जात नाही म्हणून आणि खाज म्हणून, उगाचच) मांडली आहे.
अन्य दाखला
'चर्नी रोडची काही जुनी स्पेलिंगे Churney Road आणि Charney Road अशीही होती,' असे विकी डाकुन्हासाहेबाच्या पुस्तकाच्या दाखल्याने म्हणतो.
डाकुन्हासाहेबाच्या गूगलबुकात शोध घेणे काहीसे किचकट आहे; सबब, Churney Road नावाच्या ठेसनाबद्दल काही स्वतंत्र माहिती सहजगत्या तरी सापडली नाही. मात्र, Churney आणि Charney एवढ्याच शब्दांवर शोध घेतले असता, दोन्हींकरिता हिट्स मिळतात, नि पैकी Churneyवरील हिट तरी चर्नी रोडजवळच्या कोण्या अग्यारीसंदर्भात आढळते, सबब आपल्या कामाची असावी. (Charneyवरील हिट माझगाव भागातील कशाच्यातरी संबंधीची - horta म्हणजे बाग असावी काय? - असल्याने, आपल्या चर्नी रोडशी संबंधित नसावी, असे वाटते; चूभूद्याघ्या.)
(कदाचित त्या काळात या स्पेलिंगांबद्दल काही ष्ट्याण्डर्डायझेशन नसावे, नि वेगवेगळ्या वेळी नि वेगवेगळ्या स्रोतांत - किंवा क्वचित्प्रसंगी वेगवेगळ्या वेळी त्याच स्रोताकडून - वेगवेगळी स्पेलिंगे वापरली जात असण्याची शक्यता असावी काय? किंवा ष्ट्याण्डर्डे बदलत गेली असावीत काय?)
Charney का Charni?
गर्सन दा कुन्हा ह्यांच्या पुस्तकात ह्या एकाच जागेसाठी Charney हे स्पेलिंग ६ वेळा आणि Charni २ वेळा वापरलेले दिसते. Churney एकदाहि नाही.
दा कुन्हासाहेबाच्या गूगलबुकात शोध घेणे काहीसे किचकट आहे हे खरे आहे. माझा असा अनुभव आहे की काही archive.org वरील pdf पुस्तकात काही searchable असतात तर काही नसतात. ह्याचे कारण शोधणे माझ्या संगणकज्ञानापलीकडचे आहे. पण तेथे अशा पुस्तकांच्या text files हि असतात. त्या ओसीआर असल्याने पूर्ण शुद्ध नसतात पण शब्द शोधण्याला पुरेश्या उपयुक्त वाटतात. तेथे शब्द शोधून पानांच्या नंबरांच्या संदर्भाने तोच शब्द आणि सभोवतालचा मजकूर pdf पुस्तकात शोधून काढता येतो.
Horta म्हणजे Oart, बाग किंवा (नारळाची) वाडी. हे दोन्ही शब्द आलटून पालटून भेटतात. Horta हा शब्द पोर्तुगीज असून Oart हे त्याचे इंग्रजीकरण दिसते.
Churney सापडते!
गर्सन दा कुन्हा ह्यांच्या पुस्तकात ह्या एकाच जागेसाठी Charney हे स्पेलिंग ६ वेळा आणि Charni २ वेळा वापरलेले दिसते. Churney एकदाहि नाही.
Churney सापडते!!! (एकदा का होईना, पण सापडते. तेही, चर्नी रोडच्याच संदर्भात.)
- या दुव्यावरून डाकुन्हासाहेबाच्या गूगलबुकाकडे जावे.
- 'Search Inside' नावाच्या बटनाशेजारी शोधखोका असेल, त्यात Churney असे टंकावे, नि बटन दाबावे. (फक्त Churney असे टंकावे; Churney Road असे नव्हे.)
- शोधफलित ३७५ क्रमांकाच्या पानाकडे घेऊन जाते. हे अंत्यसूचीचे (Index) पान आहे. या पानावर "Cowasji B. Banaji's Fire Temple in the Churney Road" अशा एंट्रीतील "Churney" हा शब्द हायलाइट होतो. ही एंट्री २९७ क्रमांकाच्या पृष्ठाकडे निर्देश करते.
- "Churney" या शब्दावरील हायलाइटवर क्लिक केले असता, त्यी एंट्रीच्या २९७ क्रमांकाच्या पृष्ठनिर्देशाची हॉटलिंक बनते.
- २९७ क्रमांकाच्या पृष्ठनिर्देशकाच्या उपरोल्लेखित हॉटलिंकवर क्लिक केले असता ती २९७ क्रमांकाच्या पृष्ठाकडे घेऊन जाते. या पृष्ठावरील दुसर्या परिच्छेदाचे पहिले वाक्य पुढीलप्रमाणे आहे: "The Cowasji B. Banaji or Goga's Temple, situated in the Charney Road facing the Queen's Road..." वगैरे वगैरे. येथे मात्र "Charney" असे स्पेलिंग अवलंबिले आहे.
- थोडक्यात, अंत्यसूचीत "Churney" असे, तर मूळ लेखात "Charney" असे स्पेलिंग अवलंबिले आहे.
जयदेव
पूर्वी मोठमोठे धनिक, दगडूशेठ हलवाई वगैरे मंदिरे उघडत, ट्रस्ट चालवित असत पुण्यात. मुंबैमध्ये जगन्नथ शंकरशेठ वगैरे श्रेष्ठी लोक शिष्यवृत्ती देत.
तद्वतच एकदा जयदेव पानसरे ह्यांनी भरपूर फंन्डिग दिल्याने चर्नी रोडजवळील लोकांस उद्यानाचा लाभ जाहला.
त्यामुळेच उद्यान जयदेव पानसरे नी (भेट) दिलेले उद्यान ज.पा.नी दिलेले उद्यान म्हणून "जपानी उद्यान" असे प्रसिद्धीस आले असावे असे एका गाळीव गॅझेटात दिहिल्ले आहे.
.
.
किंवा:-
ललचंदानी,सुखवानी, मूलचंदानी ,नाथानी,रुपानी अशासारखेच "जपानी" आडनाव असणार्या एका सिंधी विस्थापित व्यापार्याने फन्डिन्ग दिलेले उद्यान म्हणजे "जपानी उद्यान" असे
अजून एका गाळीव गॅझेटात दिले आहे.
.
.
.
(बादवे... फाऊल)
ललचंदानी,सुखवानी, मूलचंदानी ,नाथानी,रुपानी अशासारखेच "जपानी" आडनाव असणार्या एका सिंधी विस्थापित व्यापार्याने फन्डिन्ग दिलेले उद्यान म्हणजे "जपानी उद्यान" असे
अजून एका गाळीव गॅझेटात दिले आहे.
'जपानी बाग' हे नाव सिंधी लोक 'विस्थापित' क्याटेगरीत मोडू लागण्याच्या खूप अगोदरचे असावे. सबब, ती थियरी बाद.
बाकी, खरे उत्तर इतरत्र (थ्यांक्स टू शैलेन) मिळालेले असल्याकारणाने, ती दुसरी (किंवा क्रमवारीने पहिली) थियरीसुद्धा आता मोडीत काढावयास हरकत नसावी. (तुम्हाला मोडीत काढायची नसेल, तर खुशाल देवनागरीत काढा. आपले काहीही म्हणणे नाही.)
स. का. पाटिल उद्यान
ह्याला जपानी बाग म्हणायचे कारण - तिथे पूर्वी जपानी पद्धतीचे पॅगोडा आणि पूल वगैरे असलेली वाटीका होती. आणि तुम्ही ह्या उद्यानाचा वर्तमानकालीन उल्लेख केला आहे. हे उद्यान आता इतिहासजमा झाले आहे, कारण बाजूला उभ्या राहणार्या एका टॉवरचा पार्किन्ग लॉट आणि भूमिगत पाणी-पुरवठ्याची सोय तिथे करण्यात आली आहे. उद्यानाच्या नाशाबद्दल कोणी काही बोलल्याचेही ऐकिवात नाही!
धन्यवाद
ह्याला जपानी बाग म्हणायचे कारण - तिथे पूर्वी जपानी पद्धतीचे पॅगोडा आणि पूल वगैरे असलेली वाटीका होती.
माहितीबद्दल धन्यवाद.
(पूर्वी म्हणजे नेमके कधी? कारण लहानपणी - बोले तो १९७०च्या दशकात - जपानी बागेत जेव्हाजेव्हा म्हणून गेलेलो आहे, तेव्हा असले कधी काही पाहिल्याचे स्मरत नाही.)
आणि तुम्ही ह्या उद्यानाचा वर्तमानकालीन उल्लेख केला आहे. हे उद्यान आता इतिहासजमा झाले आहे, कारण बाजूला उभ्या राहणार्या एका टॉवरचा पार्किन्ग लॉट आणि भूमिगत पाणी-पुरवठ्याची सोय तिथे करण्यात आली आहे.
अरेरे! (पण हे व्हायचेच.)
बाकी, वर्तमानकालीन उल्लेखाबद्दल बोलायचे, तर गिरगावाशी माझा संबंध साधारणतः १९८६-८७ सालच्या सुमारास कायमचा संपला. त्यानंतर त्या बाजूस फिरकणे झालेले नाही. त्यामुळे काहीच कल्पना असण्याचे कारण नाही.
आणि तसेही, डोळ्यांसमोर गिरगावाचे त्या काळातले आणि पुण्याचे/उर्वरित मुंबईचे/भारताचे साधारणतः १९९२च्या सुमारापर्यंतचे जे एक चित्र मनश्चक्षूंपुढे कायमचे उमटलेले आहे, ते काही केल्या तेथून हटत नाही. भारत त्यानंतर पूर्णपणे बदललेला आहे, याची कल्पना असूनही. आणि पुण्यात ज्या भागांत वाढलो, त्या भागांत दोनएक वर्षांपूर्वीच्या भारतभेटीत फॉर ओल्ड टाइम्स सेक म्हणून हिंडलो असता, (१) रस्ते काही केल्या लक्षात येत नाहीत, आणि (२) हजारांतला एखादा ल्याण्डमार्क चुकून ओळखता येतो, आणि आपण नेमके कोठे आहोत याबद्दल गोंधळायला होते, हा अनुभव गाठीशी असूनही.
'कालाय तस्मै नमः', अजून काय?
उद्यानाच्या नाशाबद्दल कोणी काही बोलल्याचेही ऐकिवात नाही!
चालायचेच! 'जपानी बाग' नावाचा काही प्रकार अस्तित्वात होता, हे आम्हांस लहानपणी तेथे अनेकदा नेण्यात आले, म्हणून आम्हांस ठाऊक, नि म्हणून आम्हांस कुतूहल. इतरांस त्याचे कौतुक कसले?
सत्तरच्या दशकात...
... (बोले तो, १९७०-७९) जपानी बाग अस्तित्वात होती निश्चित. मला स्वतःला त्या काळात (चाळीतील इतर समवयस्क पोरांबरोबर) असंख्य वेळा तेथे नेले गेले आहे. प्रश्न तो नाही.
म्हणणे एवढेच आहे, की तेथे जर त्या काळातही ते जपानी पद्धतीचे पॅगोडा वगैरे असतील, तर निदान आम्हाला तरी ते दाखवण्यात आले नाहीत. आणि याचे खरे तर आश्चर्य वाटते.
जपानी बागेबद्दल...
जपानी बागेबद्दल आताच काही माहिती वाचनात आली. ती चिकटवत आहे:
चर्नीरोड ते मरीनलाईन्स ह्या रस्त्यावर कोणे एकेकाळी गोरे साहेब आणि त्यांच्या मड्डमा संध्याकाळी फिरायला यायच्या. समुद्र तिथपर्यंत होता.सोनापूरात हिंदू स्मशानभूमी होती. पुढे तिचं नाव झालं चंदनवाडी. संध्याकाळी फिरायला जायचं आणि पेटलेल्या चिता वा अंत्यसंस्कार बघायचे ह्याची किळस आली गोर्यांना. त्यांनी बूट काढला की ही स्मशानभूमीच हलवावी इथून. त्यावेळी नाना शंकरशेटांनी दगडी भिंत बांधून दिली स्वतःच्या खर्चाने आणि तो प्रश्न निकालात काढला.
हिंदू दहनभूमीला लागून पुढे मुसलमानांचं कबरस्थान होतं. त्याच्यापुढे सीरियन्/आर्मेनिअन्/जॉर्जिअन अशा कुठल्यातरी लोकांसाठी राखून ठेवलेली दफन भूमी होती. दुसर्या महायुद्धाच्या काळात काही सैनिकांचे/लोकांचे दफन इथे झाले होते म्हणतात. या लोकांचे मुंबईत अस्तित्व न उरल्यामुळे या दफनभूमीचा उपयोग उरला नाही. ही विनावापर पडून असलेली जागा मुंबई महापालिकेकडून मिळवून तिथे बाग करायचा बूट निघाला. तो गिरगावकरांनी उचलून धरला. त्यातल्या कायदेशीर अडचणी वगैरे म्हणे स. का. पाटलांनी मार्गी लावल्या. आणि तिथे जपानी बाग उभी राह्यली.
त्या बागेमध्ये केवळ झोपाळे, सीसॉ नव्हते तर खेळण्यासाठी इतरही अनेक गंमती होत्या. लंडनच्या टेम्स नदीवरील पुलाची प्रतिकृती, त्यातल्या लोखंडी दांड्याना लटकत वा त्यावरून चालत जाणं, मनोर्यावर चढत जाऊन गुळगुळीत पाइपावरून घसरत खाली येणं. अवघ्या मुंबईत अशी बाग नव्हती साठच्या दशकात.
तिथे एक तळंही होतं. त्यात मासे होते. ते गप्पी मासे पकडायला आम्ही तिथे प्लॅस्टिकच्या पिशव्या धागा लावून टाकायचो. वेगवेगळ्या पातळीवरच्या मोकळ्या जागा. दगडांच्या छोट्यामोठ्या भिंती, हिरवळ, बगीचे. एक अॅम्फी थिएटरही होतं. तिथे सिनेमे दाखवले जायचे. हिरवळीवर बसून, दाणे खात सिनेमा पाह्यचा. तिथे बाबा आमटेंचं भाषण झाल्याचंही मला आठवतं.
त्या थिएटरच्या खाली बायकांनी चालवलेलं रेस्टॉरंट होतं. मला वाटतं ही कल्पना प्रमोद नवलकरांची. ते जपानी बागेच्या बाजूलाच राह्यचे. जपानी बागेत गोट्या वा बैदूल वा कंचे खेळण्याची सोय नव्हती. मी दुसरीत वगैरे असेन, नवलकरांची ओळख झाली तेव्हा मी त्यांच्याकडे ही तक्रार केली. तेव्हा ते म्हणाले गोट्या खेळायला आमच्या वाडीत ये. त्यांनी घरी नेऊन वीस-पंचवीस गोट्या दिल्याचंही आठवतं.
हे उद्यान गिरगावकरांचं लाडकं उद्यान होतं. समोरच मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची शाखा होती. तिथे अभ्यासिका सुरू करण्यात आली होती. पण प्रवेश मर्यादीत विद्यार्थ्यांनाच मिळायचा. मग गिरगावातली मुलं जपानी बागेत अभ्यास करत बसायची. जपानी बागेतला काही भाग अभ्यासिकाच बनून गेला होता. मुली बालभवनाच्या उद्यानात अभ्यास करायच्या. चर्नीरोड स्टेशनच्या अलीकडे आणि पलीकडे दोन अभ्यासिका होत्या ज्यामध्ये सर्वांना मुक्त प्रवेश होता.
बर्याच दिवसांनी आज जपानी बागेच्या बाजूने बसने गेलो. तिथे आता बाग नाही. पण स. का. पाटील ह्यांचा पुतळा आहे म्हणून स. का. पाटील उद्यानाची पाटी आहे. बागेत जलशुद्धीकरण का सांडपाण्याचा प्रोजेक्ट आहे. एकेकाळच्या वैभवशाली बागेचे काही अवशेष दिसतात.
उद्या कदाचित जपानी बागेवर आणखी कोणतंतरी बांधकाम उभं राहील.
हजार वर्षांनी तिथे उत्खनन केलं तर जलशुद्धीकरण वा सांडपाण्याचा प्रकल्प, त्याखाली बाग, त्याखाली कबरस्थान, त्याच्याही खाली कोळ्यांचं खळं असे सिव्हीलायझेशनचे थर सापडतील.
एकंदरीत इथले लोक खूप प्रगत नागरी जीवन जगत होते असा निष्कर्ष निघेल.
(http://moklik.blogspot.ca/2015/06/blog-post_8.html येथून.)
उत्तम
लेख अतिशय आवडला. पुढील भागांच्या प्रतीक्षेत.
१. मणीभवन लॅबर्नम रोडवर असल्याने या नावाच्या देशीकरणाच्या (!) प्रयत्नांमागे तेही एक कारण पुढे केलं जात होतं, असं कुठंतरी वाचल्याचं आठवतं. (खात्री नाही. चूभूदेघे.)
२. फोर्टमधल्या टॅमरिंड लेनचे 'मुदण्णा शेट्टी लेन' असे नवीन बारसे काही वर्षांपूर्वीच झाले.
३. कणेकर (किंवा द्वारकानाथ संझगिरींच्या) एका लेखात 'ओक लेन'चा उल्लेख वाचल्याचा आठवतो. दक्षिण मुंबईत रस्त्याला मराठी नाव पाहून वाटलेलं आनंदमिश्रित आश्चर्य आणि नंतर ते आडनाव एका इंग्रजाचं आहे, हे समजल्यावर झालेली किंचित निराशा असा साधारण संदर्भ होता. कदाचित ही सांगोवांगीची गोष्टही असेल. मात्र रस्त्याचे हे नाव इंग्रज आडनावावरून आले असावे, ही शक्यताही रास्त वाटते.
सोबो
दक्षिण मुंबईत रस्त्याला मराठी नाव पाहून वाटलेलं आनंदमिश्रित आश्चर्य ...
देणारे काय वाट्टेल ती नावे देतील. पण ती "शोभायला" नकोत?
आता पेडर रोडचेच बघा. त्याचे नामांतर काय केले तर गोपाळराव देशमुख मार्ग! अरे, देशमुखाचे नाव द्यायला ते काय लालबाग आहे का परळ?
जवळचाच वार्डन रोड बघा. आठवतो वार्डन रोड. नाही ना? आता त्याचे भुलाभाई देसाई (BD) मार्ग असे "चपखल" नामांतर केल्यावर वार्डन कोणाला लक्षात राहील?
पेडरचे नशीबच भाग्यवान! बिच्चारा वार्डन!
अवांतर - वास्तविक भुलाबाई देसाईचे BD होते तर गोपाळराव देशमुखाचे GD व्हायला हरकत नव्हती. पण सोबो संस्कृतीत बहुधा तेदेखिल बसत नसावे ;)
वॉर्डन रोड
जवळचाच वार्डन रोड बघा. आठवतो वार्डन रोड. नाही ना? आता त्याचे भुलाभाई देसाई (BD) मार्ग असे "चपखल" नामांतर केल्यावर वार्डन कोणाला लक्षात राहील?
निदान वीस वर्षांपूर्वीपर्यंत तरी त्या रस्त्याचा उल्लेख 'वॉर्डन रोड' असा (बहुधा जुन्या खोंडांकडून) केला जात असल्याचे स्मरणात आहे. (तसेच, 'व्ही. एस.' उपाख्य 'वीर सावरकर' मार्गासही 'क्याडेल रोड' या नावाने(च) संबोधणारी जनता (निदान) तेव्हापर्यंत (तरी) अस्तित्वात होती. शिवाय, 'तुलसी पाइप रोड' म्हणजेच 'सेनापती बापट मार्ग', हे ट्याक्षीवाल्या भैयासही समजत असे.)
सुटसुटीत
इंग्रजांनी त्यांच्या अमदानीत त्यांच्या देशबांधवांची नावे रस्त्या-चौकाला दिली, हे स्वाभाविकच. खरे तर, त्यातील बरीच मंडळी उमराव (Lord) होती तर कित्येकांना "सर"की प्राप्त झाली होती. पण एकदा का नाव देऊन त्यांना रस्त्यावर आणले की त्यांच्या पदव्या-बिदव्या खालसा होत!
आम्हाला हा सुटसुटीतपणा मान्य नाही. "गायनाचार्य पंडित विष्णु दिगंबर पलुस्कर चौक" साक्षीला आहे! वास्तविक ऑपेरा हाउससमोरील चौकाला पलुस्करांचे नाव देण्यामागे औचित्यदेखिल आहे. पण सुटसुटीतपणाच्या अभावे ते नाव कोणी वापरीतही नाही.
अवांतर - गावदेवीच्या स्टॉपला बसमध्ये चढून कंडक्टरला गायनाचार्य पंडित विष्णु दिगंबर पलुस्कर चौकाचे तिकिट द्यायला सांगा. तुम्हाला बोलताना धाप लागेल. कंडक्टला ऐकताना धाप लागेल. आणि ह्या धापा-धापीत ऑपेरा हाऊसचा स्टॉप निघूनदेखिल जाईल! ;)
त्यापेक्षा...
अवांतर - गावदेवीच्या स्टॉपला बसमध्ये चढून कंडक्टरला गायनाचार्य पंडित विष्णु दिगंबर पलुस्कर चौकाचे तिकिट द्यायला सांगा. तुम्हाला बोलताना धाप लागेल. कंडक्टला ऐकताना धाप लागेल. आणि ह्या धापा-धापीत ऑपेरा हाऊसचा स्टॉप निघूनदेखिल जाईल! ;)
त्यापेक्षा, 'गायनाचार्य पंडित विष्णु दिगंबर पलुस्कर चौक' म्हटल्यावर, (तो टर्मिनसचा ष्टॉप असल्याखेरीज) कंडक्टरला त्यातून काही अर्थबोध होईल किंवा कसे, हा कळीचा मुद्दा आहे.
तेच म्हणतो...
मलाहि हे अनेकदा जाणवले आहे.
रस्त्याला वा स्थानाला एखाद्या व्यक्तीचे नाव देतांना त्याच्या पूर्ण बिरुदावलीसकट ते नाव द्यायची आपली पद्धत आहे. त्यातून छत्रपति शिवाजी टर्मिनस, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, महर्षि कर्वे मार्ग अशी नावे दिली जातात आणि ही तोंडभरची नावे वापरणे गैरसोयीचे असल्याने वापरणारे लवकरच त्यांचे सीएसटी, एसवीपीमार्ग, एमके मार्ग असे सुटसुटीत रूपान्तर करतात.
रस्त्याला वा स्थानाला एखाद्या व्यक्तीचे नाव देतांना त्यामागे उद्देश असा असतो की त्या व्यक्तीचे नाव तोंडावर राहून व्यक्तीच्या कार्याची स्मृति जागी राहावी, त्या त्या व्यक्ति माहीत नसलेला कोणी परस्थ आला आणि त्याला विचारणा करावीशी वाटली तर त्या परस्थालाहि माहिती देता यावी. लांबलचक नावे देण्यामुळे ह्या मूळ हेतूलाच इजा पोहोचते. पण हे कोणीच ध्यानात घेत नाही आणि फर्लांगभर कांबीची नावे प्रत्यही दिली जातात.
अशी लांबलचक नावे देण्यामागे नाव देणार्याचा असाहि हेतु असावा की Lèse-majesté च्या आरोपाच्या धोक्यापासून दूर राहावे. आपल्या आदरस्थानांना अपमान पोहोचण्याची आपली भावना आत फार नाजूक झाली आहे. ऐतिहासिक पुरुषांचा एकेरी उल्लेख ही भाषावापराची एक शैली आहे पण आताच्या तीव्र आणि सहज दुखावल्या जाणार्या भावनांच्या दिवसात शिवाजीला नुसते शिवाजी म्हटले तर थोरल्या छत्रपतींचा अपमान केला असा आरोप येऊन त्याचे परिणाम भोगायला लागायचे! त्यापेक्षा छत्रपति शिवाजी म्हटलेले बरे. जसे नामदार शरच्चंद्ररावजी पवारसाहेब असे म्हटल्याखेरीज शरद पवारांबद्द्लचा आपला आदर पूर्णपणे प्रकट होत नाही तसेच.
सहमत. बाकी पदव्या लावल्याने
सहमत. बाकी पदव्या लावल्याने इन्फिञ्जमेण्ट होत नसावी भौतेक.
अवांतरः पुण्यातला शिवाजी रोड हा 'छत्रपती शिवाजी रोड' च आहे कागदोपत्री. तीच गोष्ट 'थोरले बाजीराव पेशवे' किंवा 'लोकमान्य टिळक' वा 'महर्षि कर्वे' रस्त्याची. सर्वप्रसिद्ध महात्मा गांधी रोडसुद्धा पदवीसहितच असतो. त्यामुळे फक्त पदव्या लावल्याने तो हेतू गंडतो असे नसून कदाचित पदव्यांची मोठी माळका लावल्याने होत असेल. बर्याचदा नावे सुटसुटीत असली तरी बदलली जातात, विशेषतः एखादा प्रसिद्ध लँडमार्क जवळ असेल तर- उदा. 'हस्तीमल फिरोदिया पूल' कुणालाच माहिती नाही, परंतु 'संचेती पूल' सर्वांनाच माहिती आहे. (र्यागिङ्गमध्ये हा प्रश्न पापुलर होता) ती गोष्ट 'स.गो.बर्वे' चौकाची. तो मॉडर्न क्याफेचा चौक म्हणूनच प्रसिद्ध आहे.
त्यामुळे दिलेली नावे टिकायची असतील तर जवळ एखादा पूर्वीच प्रसिद्ध लँडमार्क नसावा आणि फार अगडबंब नावही नसावे असे वाटते.
नाव कसे निवडाल?
कोठेतरी वाचले होते की आपल्या मुलाला टोपण नाव द्यायचे असेल तर ते असे निवडा की ज्याची मोडतोड होऊ शकत नाही. ह्या दृष्टीने 'तात्या' हे नाव उत्तम कारण कोणाच्याहि तोंडात ते 'तात्या'च राहते. बाबाचे बाब्या, भाऊचे भावडया, चिमणचे चिमण्या असे काहीहि होऊ शकते पण तात्या मात्र तात्याच राहतो.
त्याप्रमाणेच नुसते गांधी रस्ता असे नाव दिले की ते कायम तसेच राहणार, त्याचा शॉर्टफॉर्म शक्य नाही. महात्मा गांधी रस्ता असे नाव दिले की त्याचा एमजी रस्ता होण्यास वेळ लागत नाही.
मुळातील अन्वर्थक नावांचे सुद्धा शॉर्टफॉर्म्स होतात. जसे श्रीशिवाजी प्रेपरेटरी मिलिटरी स्कूलचे SSPMS. ह्यावरून बोध असा घ्यायचा की नावे मुळातच आखूड ठेवावीत!
सहमत
एकुणात सहमत आहे. नावे मुळातच जरा आखूड असतील तरच बरे. सौथ इंडियन नावांचे शॉर्टफॉर्म्स चिरपरिचित आहेतच. आणि नावे जितकी 'वेगळी' तितकी मोडतोड जास्त, उदा. इंग्रजी नावांची पेशवाईत कशी मस्त मोडतोड झाली होती याचे रियासत खंड ५ मध्ये उत्तम कंपायलेशन आहे. एल्फिन्स्टनला अल्पिष्टण, मॅकफर्सनला मेघफास, सार्टोरियसला सरताऊस, रॉस लँबर्टला रासलंपट केलेले पाहिले की हहपुवा झाल्याशिवाय राहत नाही. ब्रिटिशांनीही cawnpore, muttra, cossipore, sevagee, इ.इ. असंख्य मोडतोडी करून ठेवल्या आणि त्यांपैकी काही अजूनही चालू आहेत. त्यापेक्षा जुनी उदाहरणे पहायची तर ग्रीकांनी चंद्रगुप्ताचे सान्द्रोकत्तस केलेय, द्वारकेचे बाराखा केले. मात्र मदुरैचे मेथोरा तर उज्जयिनीचे ओझेन केले-कारण शिंपल नावे. इन टर्न आपणही तशी मोडतोड केलेली आहेच. आयोनियनचे यवन हे तसे एक उदाहरण द्यायला हरकत नाही.
अवांतरः माझ्या एका भाचीचे नाव याच कारणास्तव सृष्टी असे ठेवण्यात आले होते. हे माझ्या आतेभावास सांगितल्यावर त्याने "सृष्टी- खाते उष्टी" असे प्रत्युत्पन्नमतित्व दाखवून मला रोफलावयास लावले होते तो किस्सा आठवला.
बनाम हॉल लेन
>> बनाम हॉल लेन
गूगल मॅप्सला ही गल्ली दिसत नाही पण बर्याच जागांच्या पत्त्यांमध्ये हिचा उल्लेख सापडतो म्हणजे पोस्टमनांना ती निश्चित माहिती आहे. गिरगावातील डी.डी. साठे मार्गाच्या आसपास ती असावी असे वाटते.
अहो, ऑपेरा हाउसकडून पोर्तुगिजचर्चच्या दिशेने चालत आलात की अवंतिकाबाई गोखले रोड ओलांडून, भाटवडेकरवाडी (हो दाजींची..) ओलांडायची की लग्गेच बनामहाल लेन. ब्राह्मणसभेची मागची बाजू म्हणजे सूतिकागृहाचे प्रवेशद्वार बनामहाललेनमधूनच आहे.
अतिशय सुंदर लेख, मधुसूदन फाटक यांच गिरगावत्ल्या गल्ल्या गल्ल्यांची ओळख करुन देणार एक पुस्तक वाचलं होतं काही वर्षांपूर्वी, त्याची आठवण झाली.
वाचनखूण साठवलेय! पुढी लेखाच्या प्रतिक्षेत..
आणि बराच हळवा करुन गेला लेख गिरगावच्या तसेच दक्षिण मुंबईच्या आठवणींनी..
- (पकका गिरगावकर) उपास
एक दुरुस्ती.
धाग्यामध्ये क्र.११ वर 'बलराम रोड'बद्दल माहिती लिहितांना ते नाव रा.ब.येल्लप्पा बलराम ह्यांच्यावरून पडले असल्याचा उल्लेख आहे. त्यात थोडी चूक आहे.
हे नाव मी फक्त इंग्रजी आधारांमध्येच पाहिले होते. न.चिं.केळकरकृत टिळक चरित्र खंड १ पान ४३२ येथे हेच नाव देवनागरीमध्ये 'यल्लप्पा बाळाराम' असे दिले आहे.
नवा व्यापार
नवा व्यापार* नामक जुन्या खेळातून मुंबईतील अनेक भागांच्या नावांची ओळख झाली होती. नंतर मोठेपणी त्या भागांत प्रत्यक्ष जाणे झाल्यावर तो नवा व्यापारचा खेळ आठवे.
*बरीच मराठी मुले हा खेळ खेळत असत पण त्यातून व्यापार कसा करावा याचे ज्ञान मराठी मुलांना मिळवता आले नाही. :)
नव्या व्यापाराबद्दल सहमत!!!!
नव्या व्यापाराबद्दल सहमत!!!! मुंबैतील ठिकाणांची नावे तिथूनच कळाली. नपेक्षा लहानपणी काय किंवा आत्तातरी काय, मुंबैस जाणे क्वचितच घडले आहे. ४-५ तास गुंगवून ठेवण्याचे सामर्थ्य होते त्या खेळात.
बाकी तो खेळून व्यापार न समजणे हे मूळप्रकृतीला साजेसेच, नै का ;)
आम्ही व्यापार खेलत असू
आम्ही व्यापार खेळत असू तेव्हा आमचे मित्र संचेती, बेदमुथा, ओझा,भाटी हे सगळे गल्ल्यावर बसत असत.
ते नंतर खर्याखुर्या व्यापारात उतरले.
मी कारकुनी कामे करु लागलो.
.
खरेतर तेव्हा मी इंग्लिश मधील व्यापार खेळत असे.तुम्ही उल्लेख केलेला व्यापर हिंदी भाषेत्/लिपीत होता.
इंग्लिश व्यापर जास्त आवडे. महाग होताच, पण त्यात कागदी फाटण्यासारख्या पात्तळ नोटांपेक्षा आकर्षक असे चकाचकित नाणी असत प्लास्टिकची.
बोर्डसुद्धा मस्त; एकूणच फिनिशिंग हिंदी व्यापार पेक्षा खूपच दर्जेदार.
त्यात देशभरातील शहरे असत. उदा:- दिल्ली, मुंबै,हैद्राबाद अशी शहरे.
त्यतही सर्वात जास्त कॉस्ट्-बेनेफिट रेशो हा इंदोर का सिमल्याला होता.
विकत घेण्यास अत्यंत स्वस्त; आणि भरपूर हॉटेल बांधण्याची व उत्पन्न मिलवायची सोय त्यात होती.
मुंबै वगैरे मेट्रोसिटिजलाही लाजवेल असा त्याचा पर्फॉर्मन्स असे.
विकीपिडीयासाठी: (कोणाला अधिक
विकीपिडीयासाठी: (कोणाला अधिक भर घालायची असल्यास सांगा. सदर माहिती उद्या विकीपिडीयावर प्रकाशित होईल
अल्टामाऊंट रोड किंवा अल्टामाँट रोड हा दक्षिण मुंबईतील [[खंबाला हिल]]वरील उच्चभ्रु वस्ती असलेला, [[पेडर रोड]]ला समांतर, रस्ता आहे. हा रस्ता पेडररोडला जिथे मिळतो तो नाका '[[केम्प्स् कॉर्नर]]' म्हणून प्रसिद्ध आहे. सदर मार्गाचे नामकरण '''एस्.के.बरोडावाला मार्ग''' असे करण्यात आले होते. मात्र तेथील स्थानिक, टॅक्सीवाले वगैरे सामान्य जनता या मार्गास अल्टामाँट/अल्टामाऊंट मार्ग म्हणूनच ओळखते.
==नावाची व्युत्पत्ती ==
ह्या रस्त्याचे नाव त्यावर एकेकाळी असलेल्या ’अल्टामाँट’ नावाच्या बंगल्यावरून पडलेले आहे. हा बंगला कोणी बांधला, तेथे कोण राहत असे, बंगल्याचे पुढे काय झाले अशी काही माहिती उपलब्ध होऊ नाही पण १८६५ पर्यंत तो जागेवर होता. हा बंगला १८६५ साली रु.१००० भाडयाने दिला गेल्याचा उल्लेख आहे.(जेम्स डग्लसलिखित Glimpses of Old Bombay ह्या पुस्तकात पान ४७)
==रस्त्यावरील महत्त्वाची ठिकाणे==
या रस्त्यावर [[इंडोनेशिया]] व [[दक्षिण आफ्रिका]] या देशांच्या वकिलाती आहेत. याच्याशी संलग्न अशा कार्मिशेल मार्गावर [[बेल्जियम]], [[चीन]] आणि [[जपान]] या देशांच्याही वकिलाती आहेत.
याच रस्त्यावर उभ्या राहिलेल्या '[[अॅन्टिलिया]]' या उयोगपती [[मुकेश अंबानी]] यांच्या २७ मजली घरामुळे हा रस्ता प्रसिद्ध आहे.
या रस्त्यावर [[बॉम्बे पोर्ट ट्रस्ट]]च्या चेअरमनचा अधिकृत निवास आहे.
अल्टामाँट मार्ग हे विकीपान
अल्टामाँट मार्ग हे विकीपान तयार आहे. अधिकची माहिती थेट याच पानावर चढवा.
मस्जिद/मशीद बंदर
या भागास जे नाव मिळाले ते कोठल्याही मशिदीवरून नसून सॅम्युएल एझिकिएल (मराठीत: सामाजी हसाजी) दिवेकर नावाच्या एका यहुदी गृहस्थांनी १७९६ साली बांधलेल्या सिनेगॉगवरून मिळाले म्हणे. (या सिनेगॉगासही स्थानिकांत 'जुनी मशीद' म्हणून संबोधले जाते म्हणे.)
(आम्हाला काय, सिनेगॉग काय नि मशीद काय, सारखेच!)
आहेत ना...
आहेत ना...
ती नावं आता स्टेशनांना देणार आहेत.
हडपसर स्टेशनच्या बाहेर जे गाव आहे (पुण्याकडे पाठ केल्यास डावीकडे) त्याचे नाव मुंढवा आहे. उजवीकडच्या गावाचं नाव माहिती नाही. तर स्टेशनचं नाव मुंढवा करण्यासारखं आहे.
अर्थात हे नामबदल फक्त ज्या स्टेशनांची नावं इंग्रजी आहेत त्याच स्टेशनांच्याबाबतीत होणार. शिवाजीनगरचे नाव भांबुर्डा होणार नाही. कारण शिवाजीनगर हे इंग्रजी नाव नाही. ;)
...
'तेजोमहालय'चा (कोण्या मुघलास वाटले म्हणून) जर 'ताजमहाल' होऊ शकतो, तर 'बन महाल'चा (कोण्या ब्रिटिशरास वाटले म्हणून) 'बनाम हॉल' होणे अशक्यप्राय नसावे...
याची, Behind the Bazaarचा देशी अपभ्रष्ट उच्चार अशीही एक व्युत्पत्ती ऐकण्यात आलेली आहे. (चूभूद्याघ्या.)