Skip to main content

स्वत्वाचा शोध

अस्तित्वविषयक विषाद:
अवकाश, द्रव्य, उर्जा आणि काल ही अस्तित्वाची चार एकके आहेत. यांच्याबाबत पहिला प्रश्न उद्भवतो तो हा की या चारही गोष्टी खरोखरीच अस्तित्वात आहेत की हे केवळ विश्वाचे वर्णन सोपे करण्याकरिता केलेले सोपे नामकरण आहे. अवकाश नावाची काही गोष्ट आहे की काहीच नसण्याच्या संकल्पनेलाच अवकाश म्हणतात? अवकाश नावाची जर काही बाब असेल तर मी माझ्या हाताच्या प्रत्येक फटकार्‍यानिशी अखिल ब्रह्मांड, अगदी अनंत अंतरावरील बिंदूवरदेखिल, थोडे ना थोडे, ढवळून निघेल इतके असंतुलन स्वतःच निर्माण करू शकतो. माझी स्वत्व निदर्शक प्रत्येक चाचपड अवकाशात एक लाट निर्माण करेल आणि ती माझ्यानंतर अनंत काळ, मंदावत का होईना, आपले अस्तित्व टिकवून राहील. माझा प्रत्येक श्वास उच्छवास संपूर्ण जगाचे, थोडे फार, अनुक्रमे आकुंचन प्रसरण करेल. इतके शक्तिमान असल्याची कल्पना देखिल दडपण आणणारी आहे. बहुतेक ही केवळ कल्पनाच असावी. उर्जा आणि द्रव्य खरोखरीच अस्तित्वात आहेत का हा प्रश्न वैचारिक भौतिकशास्त्रासाठी चांगला आहे. म्हणजे इथल्या चर्चेसाठी चांगला नाही. पण काळ आहे की नाही हा प्रश्न गहन आणि महत्त्वाचा आहे. अस्तित्व तिथे काळ कि गती तिथे काळ? अचल अस्तित्व (अनंत काळ) त्यामधे गतीचे स्फुल्लिंग पडण्यापूर्वी एका ठिकाणी राहिले असले तरी हा सर्व काळ 'अस्तित्व काळ' शून्य? आणि गती तिथे काळ मानले तरी गतीचे एकसातत्य ब्रह्मांडाबाहेरचे घड्याळ मिळाल्याशिवाय छातीठोकपणे सांगता येणार. काल आहे कि नाही, त्याचा संदर्भ कोणता नि त्याचे मानक काय हा स्वत्वाच्या शोधामधला कायमचा अनुत्तरित प्रश्न राहणार आहे. मी कोण, कसा, कुठे , इ उत्तरे समाधानकारकरित्या माहीत आहेत असे गृहित धरले तरी कालिक पटलावर आपण नक्की कसे प्रवर्तलो आहोत हे गुह्य राहूनच जाते. आपले अस्तित्व क्षणभंगुर असल्याचा खात्रीलायक विषाद चालून जाईल, पण तेही माहित नसणे अस्वीकार्यच वाटते.

यांच्याबाबत दुसरा प्रश्न उद्भवतो तो हा कि हे वर्गीकरण अचूक आहे का? आपण द्रव्य आणि उर्जेने बनलेलो असतो. आपण काळाने बनलेलो नसतो आणि एका अर्थाने आपण अवकाशानेही बनलेलो नसतो. द्रव्य हे 'संपूर्णतः एकजात' अशा मोजक्याच कणांनी बनले आहे. उर्जा देखिल गुरुत्व, चुंबकीय, विद्युत्, गतीय/उष्मा अशा चारच प्रकारांची आहे. आपल्याला बनायला लागणारा मूलभूत खुराक हा इतका सोपा, सुटसुटीत आणि कमी आहे हा प्रकार माझ्या अहंला नावडताच वाटतो. शिवाय इतर जग, मग त्यात सर्व आणि सगळे आले, आणि आपण यांच्यात 'खराखूरा' असा काहीच फरक नाही, केवळ permutations and combinations चा फरक आहे हा विचारही अस्वस्थ करून सोडणारा आहे. माळेचे बाह्यरुप बदलते, पण सगळे एका माळेचे मणी!

नियमांचा तुरुंग
निसर्ग अतिशय मूर्ख आहे आणि क्रूर आहे. निसर्गाचे नियम 'एका सुनिश्चित संदर्भात' कायम असतात, म्हणून मूर्ख. स्थल, काळ आणि ज्यांच्यावर नियम लावायचा आहे ते कोण आहेत, काय आहेत याचा त्याला काही विधिनिषेध नसतो, म्हणून क्रूर. समजा अवकाश, द्रव्य, उर्जा आणि काल या व्यतिरिक्त निसर्गात अजून एक तत्त्व आहे. समजा उर्जेचे, द्रव्यांचे अजून काही प्रकार आहेत. समजा अजून काहीबाही आहे. त्याने काय फरक पडतो? विश्व हे निसर्गाच्या नियमांनी चाललेले आहे. माझे असणे, वागणे देखिल या नियमांना बांधिल आहे. ज्या स्वातंत्र्याचा, सार्वभौमत्वाचा, मुक्त इच्छेचा, व्यक्तिस्वातंत्र्याचा जगात इतका दिंडोरा पिटला जातो ते सगळे बालाचाच भात आणि बोलाचीच कढी आहे. ज्या मूर्खपणाने मूलाच्या जन्माचे सर्व (जीवशास्त्रीय कार्यप्रणालीचे या अर्थाने सर्व) श्रेय कोणी 'महान' पिता आपल्याकडे घेतो त्याप्रमाणे मी ऑटोपायलट मोडवर असलेल्या जगाच्या छोट्याश्या हिस्स्याला 'मी' म्हणून काही गोष्टींमधे स्वतःची पाठ थोपटून घेतो. वास्तविक सर्व काही नियमबद्ध असेल तर व्यक्तिस्वातंत्र्य, इच्छाशक्ती या अर्थहीन संकल्पना आहेत. निसर्गाच्या नियमांच्या क्रूर तुरुंगात मी आहे. मानवनिर्मित कारागृहामधे शारीरिक हालचालीला वाव असतो, विचार करायला निर्बंध नसतो, पण निसर्गाचे कारागृह कडवट आणि जालिम आहे. Absolutely zero tolerance for freedom! अनंत जागेचा धनी असणार्‍या निसर्गाकडे माझ्यासाठी गणितातल्या लिमिट्स मधे वापरलेल्या tending to zero इतकीही जागा द्यायचे औदार्य नाही.

क्षितिजाचा शोध
अशात कोण चूक आणि कोण बरोबर? विशिष्ट कालात, विशिष्ट पार्श्वभूमीवर, विशिष्ट संदर्भात निसर्ग कोणाकडून काय वागवून घेतो (कोण कसा वागतो असे म्हणणे चूक आहे) याचे खापर कोणाच्या माथी फोडणार? सगळे नशीबाचे धनी! करता करविता निसर्ग! इतरांच्या नीचकर्मांबद्दल माणसे जेव्हा त्वेषाने बोलू लागतात, अन्यायाने पेटून उठतात, कोणत्याही उच्च वा नीच वा सामान्य मानवी मूल्यांचे डोळ्यात ठसावे असे प्रदर्शन करतात तेव्हा, निसर्गाला, निसर्गाबाहेरचे माणसासारखे व्यक्तित्व असते तर तो
उपहासाने गडगडून हसत सुटला असता. आणि स्वत्वाचा शोध घेणारांना क्षितिजाचा शोध घेणारांत, पढतमूर्खांत, गिनले असते. असा कोणी हसणारा नसला तरी होत मात्र असेच आहे.

धाग्याचा प्रकार निवडा:

अजो१२३ Mon, 09/09/2013 - 22:31

In reply to by प्रकाश घाटपांडे

विश्वाच्या फाफटपसार्‍यातल्या थोड्याश्या हिस्स्याला माणूस मी म्हणून जो अभिनिवेश जीवनभर करतो त्याला स्वत्वाची मूल्यमापन करणारी विश्वबाह्य शक्ती प्रचंड उपहासाने हसली असती अश्या अर्थाचे लेखात एक वाक्य आहे. या वाक्यात बोल्ड केलेल्या भागात विश्वाच्या आत राहून स्वत्वाचा शोध जसा दिसतो त्याचे वर्णन आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 09/09/2013 - 23:41

अवकाश नावाची काही गोष्ट आहे की काहीच नसण्याच्या संकल्पनेलाच अवकाश म्हणतात?

विज्ञानाततरी काहीच नसण्याला अवकाश असं म्हणत नाहीत. अवकाशात अन्य काही असेल किंवा निर्वात पोकळीही असेल, पण त्याचा अवकाशाच्या अस्तित्त्वाशी काही संबंध नाही.

निसर्ग अतिशय मूर्ख आहे आणि क्रूर आहे.

यालाही फार अर्थ नाही. निसर्ग मूर्ख असण्यासाठी त्याला काही बुद्धी असावी/नसावी लागेल. पण निसर्गाचं असं काही अस्तित्त्व नाही.

बाकी शोध-बिध मी कधीच सोडून दिला आहे.

अजो१२३ Tue, 10/09/2013 - 17:09

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पण निसर्गाचं असं काही अस्तित्त्व नाही.

विज्ञानात 'नैसर्गिक' असा शब्द वापरला जातो. त्याचा अर्थ काय? उदा. नैसर्गिक किरणोत्सार, लॉगरिथमचा नैसर्गिक बेस

राजेश घासकडवी Tue, 10/09/2013 - 17:23

In reply to by अजो१२३

पण निसर्गाचं असं काही अस्तित्त्व नाही.

मला वाटतं निसर्गाचं काही 'स्वत्व' नाही, किंवा त्यावर व्यक्तिमत्वाचं आरोपण करणं बरोबर नाही असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. निसर्गाला दयाळू, प्रेमळ म्हणणं जितकं चुकीचं तितकंच तो मूर्ख किंवा क्रूर आहे म्हणणं चुकीचं. काव्यात्मभाव सोडला तर निसर्ग केवळ असतो. आपल्या मनाविरुद्ध नैसर्गिक घटना घडतात तेव्हा कोणीतरी निसर्ग नावाची क्रूर व्यक्ती आहे आणि काही बुद्धिमत्तेची लक्षणं दिसत नाहीत तेव्हा त्याच कल्पित व्यक्तीला मूर्ख म्हणायचं इतकंच. 'नैसर्गिक' या शब्दाला जी वेगवेगळी वलयं प्राप्त होतात ती याच प्रकारच्या दृष्टिकोनातून. उदा. 'हे औषध नैसर्गिक जडीबुटींपासून बनवलेलं आहे' म्हटल्यावर ते निर्धोक असावं अशी बहुतेकांच्या मनात कल्पना येते.

राजेश घासकडवी Tue, 10/09/2013 - 16:39

वास्तविक सर्व काही नियमबद्ध असेल तर व्यक्तिस्वातंत्र्य, इच्छाशक्ती या अर्थहीन संकल्पना आहेत.

हा खरोखरच गहन विषय आहे. भौतिकतेच्या पलिकडे काही नाही हे एकदा मान्य केलं की व्यक्ती म्हणजे निसर्गनियम पाळणारी यंत्रणा हे मान्य करावं लागतं.

मात्र व्यक्तिस्वातंत्र्य, इच्छाशक्ती किंवा सेन्स ऑफ सेल्फ या संकल्पना टाकाऊ नाहीत. अमुक एक व्यक्ती कसं वागेल, काय करेल याचं भाकित करण्यासाठी 'त्या व्यक्तीची इच्छा काय आहे' यापासून सुरूवात करणं खूपच सोपं असतं. मी या बुधवारी सकाळी कुठे असणार आहे हे माझ्या मेंदूतल्या प्रत्येक इलेक्ट्रॉन प्रोटॉनचा अभ्यास करून तत्वतः हे कदाचित सांगताही येईल. पण त्यापेक्षा मलाच जर विचारलंत तर मी माझं कॅलेंडर पाहून सांगू शकेन. आणि ते उत्तर बरंच खात्रीलायक असेल.

अजो१२३ Tue, 10/09/2013 - 18:02

In reply to by राजेश घासकडवी

भौतिकतेच्या पलिकडे काही नाही हे एकदा मान्य केलं की व्यक्ती म्हणजे निसर्गनियम पाळणारी यंत्रणा हे मान्य करावं लागतं

भौतिकतेच्या पलिकडे काही नाहीच. ते मान्य वा अमान्य करण्याचा प्रश्न येत नाही.
आणि 'पाळणारी यंत्रणा' यामधे जो कर्तरी प्रयोग वापरला गेला आहे तो तत्त्वतः अयोग्य असावा.

मात्र व्यक्तिस्वातंत्र्य, इच्छाशक्ती किंवा सेन्स ऑफ सेल्फ या संकल्पना टाकाऊ नाहीत. अमुक एक व्यक्ती कसं वागेल, काय करेल याचं भाकित करण्यासाठी 'त्या व्यक्तीची इच्छा काय आहे' यापासून सुरूवात करणं खूपच सोपं असतं.

व्यक्तिचं निसर्गापेक्षा भिन्न, त्याच्यापासून स्वतंत्र (ब्रिटिशांपासून स्वतंत्र, तसे)असं अस्तित्व नाही, आत्मप्रेरणा नाही. म्हणून इच्छाशक्ती वैगेरे जोपर्यंत निसर्गाच्या नियमांना छेद देत नाहीत तोपर्यंतच त्या असू शकतात. त्यापुढे त्या नसतातच. कारण एक अनैसर्गिक गोष्ट संपूर्ण जगाचं मॉडेल मोडीत काढते, ढासळवू शकते. अनैसर्गिक असं काही असूच शकत नाही. म्हणून निसर्गाच्या नियमांच्या एका उपसंचाला आपण स्वातंत्र्य म्हणतो. खरं तर absolute अर्थाने अश्या संकल्पना वास्तविक नाहीत, टाकावू नसण्याचा प्रश्नच येत नाही. एका उच्च प्रतलावरून पाहिलं तर आपण एका विशिष्ट प्रकारे निर्जीव आहोत.

मनुष्यामधे कोणत्याही प्रकारची शून्यामधून सृजनाची शक्ती आहे असे मानणे एक अति-अवैज्ञानिक समज आहे, मग हे सृजन केवळ एका साध्या इच्छेचे किंवा विचाराचे का असेना.

मी या बुधवारी सकाळी कुठे असणार आहे हे माझ्या मेंदूतल्या प्रत्येक इलेक्ट्रॉन प्रोटॉनचा अभ्यास करून तत्वतः हे कदाचित सांगताही येईल.

या प्रश्नाच्या उत्तरासाठी, तत्त्वतः, निसर्गाबाहेर जाऊन, विश्वातल्या सगळ्या अणू रेणूंचा, अस्तित्वांचा अभ्यास करायला लागेल. कॅलेंडर पाहून सांगीतलेल्या उत्तराला 'निसर्गाने आपल्याकडून प्रकटवलेल्या जाणिवा, ध्वनी, इ इ पेक्षा जास्त महत्त्व नाही. आणि त्यातून झालेली खात्री देखिल अशीच कोणती जाणिव असेल.

अजो१२३ Tue, 10/09/2013 - 18:49

In reply to by अजो१२३

कारण एक अनैसर्गिक गोष्ट संपूर्ण जगाचं मॉडेल मोडीत काढते, ढासळवू शकते.

या वाक्याची चाल सांगीतल्याशिवाय अर्थ संक्रमित करणे अवघड आहे.

म्हणून सांगतो-

एक मच्छर इन्सान को ...

अजो१२३ Tue, 10/09/2013 - 17:59

In reply to by राजेश घासकडवी

राजेशजी,
माझ्या मांडणीत आणि भाषेत (म्हणजे माझ्यात, तिच्यात नव्हे) इतके दोष असताना आपणांस माझे लिहिलेले बुल्झाय कळते कसे? :D> :D>

राजेश घासकडवी Tue, 10/09/2013 - 19:01

In reply to by अजो१२३

म्हणजे, तुम्हाला काय म्हणायचं आहे? मला विचारशक्ती वगैरे आहे? आणि ती वापरून मी काहीतरी अर्थपूर्ण वगैरे लिहितो? अहो, ही सारी कॉंप्युटरच्या स्क्रीनवर उमटणारी काळी टिंबं आहेत! (हलक्यानेच घ्या)

थोडं सीरियसली. तुमच्या प्रतिसादावरून असं दिसतं की आपण फारसं वेगळं म्हणत नाही आहोत. फक्त स्वचं अस्तित्व हे भौतिक रचनांतून येऊ शकतं. उत्क्रांतीतून अशा रचना निर्माण झाल्या. ज्यांनी तशाच इतर रचनांना 'स्व'कार दिला, त्यांच्या कृतींची भाकितं ('तो प्राणी असं असं करेल, त्यावर मी असं करायला हवं') यशस्वीपणे केली त्या रचना टिकल्या. आणि तसंही जीव म्हणून तगून रहायला स्वची जाणीव असण्याची गरज नाही. ही तशी नवीन डेव्हलपमेंट आहे. निम्म्याहून अधिक बायोमास स्व च्या जाणिवेशिवाय जगतो, टिकून रहातो.

बेडूक थंड रक्ताचा प्राणी आहे. त्यामुळे थंडीच्या काळात उन्हात बसणं, आणि उन्हाळ्यात चिखलात बसणं हे त्याचं शरीर टिकून रहाण्यासाठी आवश्यक आहे. आता 'जर चटका लागला तर आहे तिथून थोडंसं हलायचं' या अल्गोरिथमसाठी स्व च्या संकल्पनेची आवश्यकता नसते. तो अल्गोरिथम प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून वापरता येतो. त्वचेच्या उष्माग्राहकतेचे संदेश डायरेक्टली पायांच्या स्नायूंना जोडलेले असले की झालं. कदाचित पहिल्या बेडकांमध्ये असेच साधे अल्गोरिथम असतील. मात्र थंड जागा शोधण्यासाठी जेव्हा अधिकाधिक क्लिष्ट आणि सोफिस्टिकेटेड अल्गोरिथम वापरले जातात तेव्हा त्याची वागणूक कर्मणि सोडून कर्तरी व्हायला लागते.

ज्या प्राण्यांमध्ये ही डोळा, कान, मेंदू इत्यादी विशेष इंद्रियं आहेत त्यांना इतर दिसतात त्याप्रमाणे आपले हातपायही दिसतात. या माहितीचा वापर करण्याचाही फायदा होतोच. प्रतिक्षिप्त क्रियांऐवजी पुरेसा विचार करणारे अल्गोरिथम आले की नंतर या विचारप्रवाहांची जाणीव असलेलाही अल्गोरिथम येतो. ही माहितीही उपयुक्त असते. 'अरेच्च्या मी थंड जागा शोधण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तिथे वर घार फिरते आहे. तेव्हा मला नुसतीच थंड जागा नाही, तर तिथे जाण्याचा सुरक्षित मार्गही शोधला पाहिजे.' असे विचार येतात. हे विचारांच्या उतरंडीच्या वरचे विचार असतात. मेटाथिंकिंग. अशा पुरेशा पायऱ्या झाल्या की मग स्व येतोच येतो.

मी Tue, 10/09/2013 - 18:15

शोध आवडला.

शिवाय इतर जग, मग त्यात सर्व आणि सगळे आले, आणि आपण यांच्यात 'खराखूरा' असा काहीच फरक नाही, केवळ permutations and combinations चा फरक आहे हा विचारही अस्वस्थ करून सोडणारा आहे. माळेचे बाह्यरुप बदलते, पण सगळे एका माळेचे मणी!

फरक नाही हे तात्त्विक पातळीवर ठिक आहे, पण हा अनुभव घेण्याच्या ज्ञानाचा शोध गरजेचा नाही काय?

प्रकाश घाटपांडे Wed, 11/09/2013 - 08:37

निजदेहभान या अर्थाने स्वत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न मानसशास्त्रात केला आहे. proprioception अशा अर्थाने तो घेतला आहे. मेंदुतला माणुस या आनंद जोशी व सुबोध जावडेकर लिखित पुस्तकात त्यावर एक प्रकरण आहे

मन Thu, 17/10/2013 - 12:42

अशा गोष्टी फार विचार न करत सोडून द्यायचे सध्या माझे धोरण आहे.