सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग ३)

सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग १)
सुभद्रा: महाभारताची 'हेलन ऑफ ट्रॉय' (भाग २)
-------------------------------------------------

४. अभीराणी उवाच :
अभीरमन्युशी माझं लग्न झाल्यावर त्यानं माझं आधीचं 'शतगोणी' हे नाव बदलून 'अभीराणी ' ठेवलं. पण त्याखेरीजही माझं पूर्ण जीवनच लग्नानंतर बदलून गेलं…
लग्नापूर्वी घनदाट वनातल्या आमच्या लहानश्या वस्तीत बरोबरीच्या मुला-मुलींबरोबर खेळण्यात, नाच-गाणी करण्यात आणि रात्री पणजोबा- खापर पणजोबांकडून भुतांच्या, राक्षसांच्या, आणि त्यांना नष्ट करून आमचं रक्षण करणार्‍या गुहेतल्या बापाच्या -बाप्पाच्या गोष्टी ऐकण्यात आम्ही दंग असायचो. खूप खूप पूर्वी आमच्या एका पुर्वजानं त्या गुहेतल्या एका राक्षसाचा वध केला, आणि सर्वांचं रक्षण केलं, तेंव्हापासून तो पूर्वज आमचा बाप्पा बनला.

(चित्रकार अज्ञात)

आमच्यातले पुरुष अधून मधून गोफ़णी, धनुष्य-बाण घेऊन शिकारीला जायचे, आणि दोन-तीन दिवसांनी मोठ्टी शिकार घेऊन यायचे. सश्यापासून काळवीट, गवा असे मोठमोठे पुष्कळ प्राणी मोठमोठ्या बांबूंवर घालून आणत. पावे, नगारे, पिपाण्यांच्या आवाजात आधी सगळी वरात बाप्पाच्या गुहेकडे जायची. तिथले म्हातारे बाबाजी प्रत्येक प्राण्याचे थोडे थोडे मांस काढून बाप्पाला चढवत, मग सगळी शिकार एकत्र करून कातडी सोलणे, मोठ्या आगीवर मांस खरपूस भाजणे, नको असलेली आतडी, हाडे वगैरे दूर टाकून येणे वगैरे नंतर मोठी मेजवानी व्हायची आणि मग रात्रभर नाच-गाणी चालायची.
गावात छोटी मुलं तर खूपच असायची. दिवसभर गलका चाललेला असे. आम्हा लहान मुलींना एकत्र करून नाचाम्मा काकी नाच शिकवायची, तेंव्हा गावातले म्हातारे कौतुकानं बघत म्हणायचे, "आपल्याला पुष्कळ वर्षे मिठाची ददात नाही" ते असं का म्हणायचे, हे मात्र मला कधीच कळायचं नाही.

शिकारीतील उरलेलं मांस खारवून वाळवायला, कातडी स्वच्छ करून जपून ठेवायला आम्हाला खूप मीठ लागायचं. गावातील मीठ संपत आलं, की मिठाम्मा आजी घरा-घरात फ़िरायची, आम्हा लहान मुलांना मात्र त्यावेळी घरात येऊ देत नसत. मग मिठाम्माने निवडलेल्या, आमच्यापेक्षा मोठ्या मुलींना न्हाऊ-माखू घालून, हाता-पायांना मेंदी आणि ओठांना लाल रंग लावून, फुलांच्या माळांनी सजवून एका मोठ्या बैलगाडीतून घेऊन जात. आणखी तीन-चार बैलगाड्यातून बर्‍याचश्या रिकाम्या कातडी गोण्या घेऊन दहा-बारा पुरुष जात. त्या मुलींचे आई-वडील तेंव्हा खूप रडायचे. मग थोड्या दिवसांनी बैलगाड्या भरभरून मिठाच्या गोण्या यायच्या. त्या मुली मात्र बरोबर नसायच्या, आणि त्यानंतर गावात कधीच दिसायच्या नाहीत. मी एकदा आईला विचारले, की त्या मुली कुठे गेल्या? तेंव्हा आई म्हणाली, की त्या गुहेतल्या बाप्पाकडे रहायला गेल्यात, आणि त्याने आपल्याला मीठ पाठवले आहे.
मी खूप सुंदर दिसते, असे सर्वजण म्हणायचे, आणि पारावर बसलेले म्हातारे माझ्याकडे कौतुकानं बघत "ही आपल्या नावाप्रमाणे शंभर गोण्या मीठ नक्कीच आणील" असे म्हणत. मला काहीच कळायचे नाही.

… असा बराच काळ गेला. आता मी मोठी झाले होते. एक दिवस मीठ आणायला गेलेल्या लोकांबरोबर पाच-सहा तरूण गावात आले. त्यातला एक तरूण तर खूप सुदृढ, सुंदर होता. तोच त्यांचा मुख्य असावा. आमच्या गावातल्या मुख्य मुख्य पुरुषांशी त्याचे काही बोलणे झाल्यावर माझ्या आजोबांनी गावातल्या सर्वांना एकत्र केले, आणि म्हणाले: "हे बाहेरून आलेले तरूण आपलेच अभीर बंधु आहेत. मात्र शिकारीखेरीज त्यांना पुष्कळ प्रकारचे अन्न जमिनीतून काढता येते. त्यांचे धनुष्य-बाण आपल्यापेक्षा चांगले आहेत, आणि ते कातड्यांचे कपडे न घालता 'कापूस' नावाच्या पदार्थापासून कपडे तयार करतात. आपल्या गुहेतल्या बाप्पाची त्यांनी एक मूर्ती बनवून आणली आहे, तिचे नाव 'अभीर -भैरव' असे आहे. ही मूर्ती आता आपण बाप्पाच्या गुहेत ठेवणार आहोत. आता हा अभीरमन्यु आपल्याला आणखी माहिती सांगेल"
… मग तो तरूण सांगू लागला:

"माझ्या भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या या ठिकाणाहूनच फार पूर्वी माझे पूर्वज पश्चिमेकडे शिकारीच्या शोधात पुढे पुढे गेले होते. शेवटी ते समुद्रापर्यंत पाहुचले, मग त्यांनी तिथेच राहून समुद्रातून मीठ काढायला सुरुवात केली. ते मीठ सगळीकडे पसरलेल्या आपल्या अभीर लोकांना दिले जायचे. पण मग पुष्कळ पिढ्यांनंतर अचानक तिथे यादव आले, आपल्या लोकांना त्यांनी तिथून पिटाळून लावून सगळी मिठागारे ताब्यात घेतली, आणि द्वारका नागरी वसवली. आता आपल्याला मिठासाठी आपल्या तरूण मुली त्यांना द्याव्या लागतात, हे आपले दुर्दैव"
... बोलता बोलता त्याचे लक्ष माझ्याकडे गेले, आणि त्याने मला जवळ बोलावून माझे नाव विचारले. "शतगोणी". मी सांगितले.

"आता ही तरुणी बघा, किती सुदृढ, सुंदर आहे, हिचे नाव तुम्ही 'शतगोणी' ठेवले आहे, याचा अर्थ तुम्ही मानूनच चालले आहात, की हिला शंभर गोण्या मिठाच्या बदल्यात यादवांना द्यायचे. किती दु:खाची गोष्ट आहे ही ? यादवांकडे फक्त एक दासी म्हणून हिचे आयुष्य जाईल. किती अत्याचार होतील तिच्यावर ? हिला होणारी संतती सुद्धा दास-दासीच राहणार. असे किती दिवस चालणार ? हे आता आपण बदलायलाच हवे, आणि त्यासाठी आपण सर्व अभीरांनी एक होऊन त्या दुष्ट यादवांचा नायनाट करायला हवा, आणि आपली सगळी मिठागारे पुन्हा परत मिळवायला हवीत".

" यादव फार माजले आहेत हे खरे, पण मी लहानपणी द्वारकेत राहिलेलो असल्यामुळे त्यांच्या काही चांगल्या गोष्टीपण मला शिकायला मिळाल्या. त्यांना आपल्याएवढे मीठ लागत नाही, कारण ते शिकारीवर अवलंबून नसून जमिनीतून अन्न-धान्य पिकवून खातात. पाळलेल्या प्राण्यांचे मांस ताजे ताजे खातात, कापसाचे कपडे घालतात. त्यामुळे कातडी कमवायला, मांस खारवायला त्यांना मीठ लागत नाही. हे आपल्याला शिकले पाहिजे, म्हणजे आपोआपच आपल्या मुली आपल्याकडे रहतील. त्यांची शस्त्रे उत्तम असतात. त्यांना लिहिता-वाचता येते, हिशेब करता येतो. समुद्रात मोठमोठ्या नौकांमधून दूरदेशी सामान नेऊन ते विकतात, त्यातून ते खूप श्रीमंत झाले आहेत. या सर्व गोष्टी तुम्हाला शिकवण्यासाठी तुमच्या या गावात आता आमचा एक तरूण राहील. तसेच आपल्या अभीरांच्या सैन्यात भर्ती होण्यासाठी या गावातून वीस तरुणांनी आमच्याबरोबर यावे".

सभा संपली. मी अगदी घाबरून गेले होते. मला मिठासाठी यादवांना विकणार ??? मला तर रडूच कोसळले. हे बघून अभीरमन्यु म्हणाला, घाबरू नकोस. मी तुझ्याशी लग्न करून तुला इथून घेऊन जाईन. आता कोणत्याच मुलीवर यादवांची दासी बनण्याची पाळी मी येऊ देणार नाही …

मग लवकरच मी आणि अभीरमन्यु एका 'घोटुल' मध्ये राहू लागलो. रात्रंदिवस एकमेकांच्या सहवासात, एकमेकांना समजून घेत, मनाने, शरीराने एकरूप झालो. मी गर्भवती होताच गुहेतल्या बाबाजींनी आमचे लग्न लावून दिले, आणि मग आम्ही दोघे अभीरमन्युच्या गावी आलो.

…. पुढे पुष्कळ वर्षे गेली. अभीरमन्यु सतत अभिरांच्या एकीकरणासाठी फिरत असायचा. मला दहा मुले झाली. ती मोठी झाल्यावर आम्ही सर्वजण त्याला त्याच्या कामात मदत करू लागलो. शेवटी तो दिवस उजाडला.
...यादवांच्या सर्वनाशाचा दिवस.… आमच्या मुक्तीचा दिवस.
----------------------------------------------

५. अभीरमन्यु उवाच:
यादवांवर सरळ चाल करून त्यांना युद्धात हरवणे आम्हाला शक्य नव्हते, त्यामुळे मी आखलेल्या योजनेत, पूर्वीपासूनच द्वारकेत राहणार्‍या, यादवांच्या जुलुमाने गांजलेल्या सगळ्या अभीरांना आमच्या योजनेत सामील करून घेतले, आणि त्यांच्या द्वारे हळूहळू सुंदर गणिका आणि दासींवरून, दुसर्‍यांकडून जिवाला धोका असल्याचे सांगून, यादवांची आपापसात भांडणे लावून देणे सुरु केले. मातबर, श्रीमंत यादवांच्या विलासी जीवनाबद्दल गरीबांमधे असूया, घृणा आणि द्वेष निर्माण करून, आम्ही यादव समाज आतून पोखरायला सुरुवात केली.
... याशिवाय द्वारकेतील जे काही मुख्य मुख्य दहा-वीस अतिधनाढ्य, मिठाचा व्यापार करणारे पुंड होते, त्यांच्या विरुद्ध त्यांच्याच गरीब अर्धपोटी श्रमिकांना चिथावून दिले. त्यामुळे ते श्रमिक मिठागारांवर नीट काम करीनासे झाले, त्यामुळे मिठाचा व्यापार धोक्यात आला.
काही काळातच आमच्या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसू लागले. लहान सहान कारणांवरून रस्त्यात मारामार्‍या, चकमकी होऊ लागल्या. श्रीमंतांच्या प्रासादांवर रात्री दगडफेक होणे, आगी लावण्याचे प्रयत्न, असे सुरु झाले. जेवणातून विषप्रयोग, खोटे आरोप लावून फाशीची शिक्षा देणे, वगैरेंमुळे लोकांमधली सुरक्षिततेची भावना कमी होऊ लागलॆ. लवकरच परिस्थिती इतकी स्फोटक झाली, की ठिणगी पडायचाच काय तो अवकाश होता.
एक दिवस यादवांचा कुठलातरी सण होता. बरेचसे यादव समुद्रतीरी जाऊन यथेष्ठ सुरापान करू लागले. आम्ही मुद्दामच आमच्या काही सुंदर तरुणींचे नृत्यपथक तिथे पाठवले. त्या तरुणींची लवलवती नृत्यमग्न शरीरे बघून मद्यधुंद यादव चेकाळले.त्या तरुणींवरून ते आपापसात भांडू-लढू लागले. एकच हल्लकल्लोळ उडाला. समुद्रतीरी चेंगराचेंगरी, मारामारी, हत्या यांना एकच उधाण आले.
तिकडे आम्ही मिठागाराच्या गरीब मजुरांना "हीच वेळ आहे, त्या जुलुमी मालकांना ठार करा, आणि मिठागारे ताब्यात घेऊन तुम्हीच त्यांचे मालक बना" असे भडकावले. त्यांच्या झुंडीच्या झुंडी मिठागारांच्या रक्षकांशी लढू लागल्या. द्वारकेतील सर्व अभीर पुरुषांनी मद्यधुंद यादवांवर हल्ला करून त्यांना कंठस्नान घालण्याचा सपाटा लावला.
हे सर्व माझ्या योजनेप्रमाणेच घडून येत होते. मी तातडीने माझ्या दोन विश्वासू हस्तकांना हस्तिनापुरास जाऊन, खुद्द श्रीकृष्णाने अर्जुनाला ताबडतोब मदतीला बोलावले आहे, असे सांगून घेऊन त्याला घेऊन येण्यासाठी पाठवले.
------------------------------------------------------

६. अर्जुन उवाच :
द्वारकेच्या समुद्रतीरी झालेला यादवांचा विनाश बघून मी भयचकित झालो. हे असे कसे घडले? यादव आपसात लढले तरी कशामुळे ? आणि त्यात सर्व यादव कसे मृत्युमुखी पडले? काहीच कळत नव्हते….
दूरवर काही झोपड्यात थोडी हालचाल दिसली, म्हणून तिकडे गेलो. तिथे काही अगदी वृद्ध उदासवाणे बसलेले होते. मला त्यांच्यापैकी एकाने ओळखले. "अर्जुना, आलास ? इथे सर्वनाश झालाय रे, सगळे कर्ते यादव पुरुष मारले गेले"
"पण कृष्ण-बलराम कुठे गेले? त्यांनी कसे समजावले नाही यादवांना?"
"आम्हाला ते काहीच ठाऊक नाही, परंतु यादवांचा संहार होत आहे हे बघून बलराम समुद्रात शिरला, तर कृष्ण रैवतक पर्वताकडे निघून गेला, असे ऐकले आहे.… आता इथे आम्ही म्हातारे, लहान मुले आणि हजारो स्त्रियाच राहिलो आहोत. आता आमचे कसे होणार ?? तूच आमचा त्राता आहेस रे बाबा आता " - दुसरा वृध्द म्हणाला.
" होय होय, अगदी खरे. हजारो स्त्रिया आहेत खर्‍या, सगळ्या यादवांच्या विधवा, कृष्णाने नरकासुराचा वध केल्यावर त्याच्या अंत:पुरातून आणलेल्या सोळा हजार एकशे आठ स्त्रिया आणि त्यांच्या मुली, शिवाय कितीतरी अभीर दासी, बटकी… सर्वांचा आता तूच वाली. कृष्णाने रानात जाताना आम्हाला सांगितले, की अर्जुन येईल, आणि तुम्हा सर्वांना हस्तिनापुरास घेऊन जाईल… "
… हे सर्व ऐकून मी अगदी खचूनच गेलो. कुठून इथे आलो, असे झाले. युधिष्ठिराचे ऐकले असते, तर बरे झाले असते… पण सुभद्रेला वचन देऊन आलो आहे, तर काहीतरी केलेच पाहिजे आता…
"घाबरू नका, मी घेऊन जाईन तुम्हा सर्वांना हस्तिनापुरात…"
… असे मी म्हणालो खरा, पण लगेचच विचार आला, एवढे वृद्ध आणि हजारो स्त्रिया यांची तिथे कशी सोय करणार? आमचीच जिथे मारामार, त्यात आणखी यांना कोण पोसणार? आणि अगदी या स्त्रियांनी दासी, बटकी, गणिका वगैरेंचे काम करून पोट भरायचे म्हटले, तरी त्यांच्याकडून सेवा घ्यायला तेवढे पुरुष तर हवेत ना? युद्धाचे वेळी लहान असलेली मुले आता चाळीशीत आहेत. ती, आणि युद्धात पडलेल्यांच्या हजारो विधवा, ही आमची प्रजा. त्यात ही आणखी भर, म्हणजे अन्नान्न दशाच होणार.… खरंच, युधिष्ठिराने हा सर्व विचार करूनच तर मला इथे यायला नको म्हटले नसेल? पण मी भावनेच्या भरात वेड्यासारखा इथे आलो, आणि भलत्याच संकटात सापडलो . . .

आणि कृष्णाचे काय जाते सांगायला? म्हणे अर्जुन हस्तिनापुरास घेऊन जाईल…
त्यालाच शोधले पाहिजे आधी.… तूच निस्तर म्हणावे आता हे सर्व. पण आहे तरी कुठे तो ? बसला असेल यमुनेच्या डोहात डुंबत, किंवा गोपिकांची वस्त्रे पळवून झाडावर चढून … पण आता या वयात? आणि गोपिका तरी कुठे आहेत इथे ? त्या तिकडे गोकुळात आता म्हातार्‍या झालेल्या असतील … छे… छे … मला काय झाले आहे? विचारांनी डोके अगदी फिरून गेले आहे…


(गोपिका वस्त्र-हरणः कांगडा शैली)

संपादकः width="" किंवा height="" ही अवतरणे टाळावीत किंवा अवतरणांच्या आत योग्य ती संख्या (रोमन लिपीत) द्यावी. अन्यथा काही न्याहाळकांवर चित्रे दिसत नाहीत.
..............क्रमशः

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (4 votes)

प्रतिक्रिया

आपल्या लेखनात मोठमोठया पौराणिक व्यक्तिंवरील सामान्यत्वचा आरोप सुंदरपणे पेलला गेला आहे. वाचायला मजा आली.

मला अजूनही भाग २ व ३ मधली चित्रे दिसत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

असेच म्हणतो. कल्पनाविलास हळूहळू मस्त मॅच्युअर होत चालला आहे, मजा येतेय वाचायला!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मजा येतेय वाचायला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक आहे. वाचतेय.
कल्पना तुमची आहे की महाभारत मधे खरंच आहे असा भाग?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उचललेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या भागात विशेषतः पहिल्या दोन कथनांमधला कल्पनाविलास जास्त आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्यावेळेस विचारायची राहून गेलेली शंका हीच की हे अभीर कौरवांचा नि:पात विष टाकून करणार होते जलसाठ्यात.
पण हेच करायचं असेल तर इतरेजनही हे करु शकतातच की! म्हणजे विष कालवायची विद्या अभीरांनाच काय ती ठाउक आहे असे नाही.
ते तर पांडावसाइअडचे कुणीही करु शकले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars