Skip to main content

शिप अॉफ थिसिअस - भारतीय तत्त्वचिंतनाला दृकश्राव्य भाषेची जोड

भारतात तत्त्वचिंतन पुष्कळ होतं असं मानलं जातं. भारतीयांना अध्यात्माद्वारे अस्तित्वविषयक प्रश्नांची उकल करायला आवडते असंही अनेकदा दिसतं. पण भारतीय सिनेमात तत्त्वचिंतन फार क्वचित होताना दिसतं. सिनेमा हे प्रामुख्यानं करमणुकीचं साधन मानलं गेल्यामुळे कदाचित असं होत असेल, किंवा प्रेक्षकांचा गोष्टीतला रस कायम ठेवत तत्त्वचिंतन साधणं ही कठीण गोष्ट आहे म्हणूनदेखील असं होत असेल. आनंद गांधी नावाच्या नवख्या दिग्दर्शकाला मात्र पदार्पणातच ही कसरत साधली आहे. 'शिप अॉफ थिसिअस' हा त्याचा चित्रपट येत्या काही दिवसांत भारतात प्रदर्शित होईल. त्याचा थोडक्यात परिचय इथे दिला आहे. लेखात कथानक गरजेपुरतंच सांगितलेलं आहे. त्यामुळे लेख वाचल्यामुळे रहस्यभेद वगैरे होणार नाही, किंवा चित्रपट पाहताना रसभंग होणार नाही ह्याची काळजी घेतलेली आहे.

'स्वत्व' म्हणजे नक्की काय? माणसाच्या 'स्व'विषयीच्या संकल्पनेत कसा बदल होऊ शकतो? आणि तो झाला तर आधीचा 'स्व' आणि नंतरचा 'स्व' एकच मानावा की वेगवेगळे मानावे लागतील? अशा प्रकारचे प्रश्न हा चित्रपट विचारतो. चित्रपटाच्या शीर्षकाला ग्रीक तत्त्वज्ञानातला संदर्भ आहे. प्लुटार्कनं विचारलेला हा प्रश्न 'थिसिअसचा पॅराडॉक्स' म्हणून ओळखला जातो -

एखादं जहाज ज्या घटक भागांपासून बनलेलं असतं ते सगळे एक एक करत काढून टाकले आणि त्यांच्या जागी जर दुसरे पण तसेच घटक बसवले तर ते जहाज मूळ होतं तेच राहील, की एक वेगळंच जहाज बनेल?

ह्या प्रश्नामागच्या अस्तित्वविषयक तत्त्वचिंतनाकडे आपल्याला घेऊन जाण्यासाठी दिग्दर्शक तीन गोष्टी सांगतो. त्यांच्यात काही समान सूत्र आहे, तर प्रश्नाचे वेगवेगळे पैलू लक्षात यावेत म्हणून अनेक फरकही आहेत.

पहिली गोष्ट एका आंधळ्या स्त्रीची आहे. ही स्त्री इराणी आहे आणि ती भारतात वास्तव्य करते आहे. आंधळी असूनही ती छायाचित्रकार आहे. आपल्या पंगुत्वासह वास्तवाकडे पाहण्याची तिची दृष्टी ही खास तिची आहे. तिची दृष्टी नेत्रदानावाटे पूर्ववत होण्याची शक्यता तिला तिच्या अनोख्या कार्यपद्धतीविषयी आणि त्यात होऊ घातलेल्या बदलांविषयी गंभीर विचार करायला भाग पाडते. मुंबईच्या रस्त्यांवरून फिरत असताना ती कसे फोटो घेते आणि नंतर संगणकावर ते कसे एडिट करते हे स्वत:ला छायाचित्रकार समजणाऱ्या कुणाहीसाठी एक वस्तुपाठ आहे.

दुसरी गोष्ट एका जैन (किंवा तत्सम) भिख्खूची आहे. पराकोटीची अहिंसा पाळणारा हा भिख्खू प्राण्यांवर औषधांच्या किंवा प्रसाधनांच्या चाचण्या घेण्याविरोधात आणि एकंदर प्रयोगशाळांमध्ये प्राण्यांना मिळणाऱ्या क्रूर वागणुकीविरोधात न्यायालयीन लढा लढतो आहे. अचानक उद्भवलेल्या आजारपणात त्याची अहिंसक तत्त्वनिष्ठा पणाला लागते.

तिसरी गोष्ट एका स्टॉकब्रोकरची आहे. पैसा कमावण्यापलीकडे कशातही त्याला रस नाही. त्याची आजी डाव्या चळवळीत कार्यरत आहे त्यामुळे अर्थात तिचे आपल्या नातवाच्या जीवनमूल्यांशी मतभेद आहेत. आपल्या शरीरात बसवलेली किडनी कदाचित एखाद्या गरीबाला फसवून त्याच्या नकळत काढून घेतलेली असेल ह्या कल्पनेनं ह्या स्टॉकब्रोकरचं आयुष्य ढवळून निघतं.

कथेविषयी याहून अधिक तपशील देण्याची गरज नाही. प्रत्येक कथेतल्या प्रमुख पात्राला काही जीवनसंघर्षाला सामोरं जावं लागतं. दुसऱ्याच्या अवयवाचं आपल्या शरीरात रोपण होण्याच्या शक्यतेतून हा संघर्ष उद्भवतो. ह्या संघर्षात त्या पात्राच्या जीवनदृष्टीविषयी आणि त्याच्या अस्तित्वाविषयी मूलभूत प्रश्न उपस्थित होतात. पहिल्या गोष्टीतल्या स्त्रीचं छायाचित्रकार असणं हे तिच्या अंध असण्याशी इतकं निगडित असतं की दृष्टी प्राप्त झाली तर आपण कलाकार म्हणून काय शिल्लक राहू असा तिचा प्रश्न आहे. आतापर्यंत स्वार्थापलीकडे विचारच न केलेल्या ब्रोकरला 'परमार्थ करावा का?', 'किती परमार्थ पुरेसा?' आणि 'नक्की कसा परमार्थ केला म्हणजे तो योग्य?' ह्याबद्दल विचार करणं भाग पडतं. भिख्खूसाठी तर औषधं घेणं, शस्त्रक्रिया करून घेणं म्हणजे आपण ज्या तत्त्वांवर विश्वास ठेवतो त्यांच्याशी प्रतारणा करणं आहे. त्यामुळे त्याच्यासाठी तो जीवनमरणाचाच प्रश्न होतो.

त्या प्रश्नांची तड कशी लागते ते चित्रपट पाहून समजेलच. पण दृकश्राव्य भाषेतून आशय व्यक्त करण्यात चित्रपट कसा आणि किती यशस्वी ठरतो ते पाहू.

आंधळ्या फोटोग्राफरच्या गोष्टीत दृकश्राव्य माध्यमाचा कस लागला आहे. ऐकून असाध्य वाटणारी ही गोष्ट एकीकडे साध्य करायची आणि त्याच वेळी तिला तत्त्वचिंतनात्मक डूब द्यायची हे सोपं नाही. इथे ध्वनिलेखन चांगल्या प्रकारे वापरलं आहे. आंधळ्या मुलीला काय ऐकू येतं आणि त्यावरून ती फोटो घेण्यासाठी थांबते ह्यात त्याची मदत होते. आपण रस्त्यानं जातो तेव्हा तिथे ध्वनींचं एक मोठं जग असतं. त्या संवेदनेतून ही आंधळी मुलगी फोटो घेत जाते आणि नंतर ती संगणकावर ते मॅनिप्युलेट करते. ह्या तपशीलांतून दिग्दर्शक तिची प्रतिभा काय जातकुळीची आहे आणि तिच्या कलेमागचा तिचा विचार काय आहे हे दाखवून देतो. तिचे तिच्या मित्राबरोबरचे संवाद, बांधकाम चालू असलेल्या ठिकाणच्या कामगाराबरोबरचे तिचे संवाद अशा छोट्यामोठ्या गोष्टींतून ही कथा वळणं घेते आणि तत्त्वाचा तिढा मांडते.

भिख्खूची गोष्ट ही चर्चानाट्य होण्याचा सर्वात मोठा धोका होता, कारण भिख्खूनं आपल्या पंथाचं आणि इतरांचंही तत्त्वज्ञान कोळून प्यायलेलं असतं. ज्यानं आपलं मूळचं नाव बदलून चार्वाक असं नाव घेतलेलं असतं असा त्याचा वकील नावाप्रमाणे विवेकवादी असतो आणि त्यांचे वाद झडतातही. पण त्यांना विनोदाची झालर आहे. शिवाय पहिल्या कथेप्रमाणेच इथेही दृश्यभाषा आशय अधोरेखित करण्याची मोठी कामगिरी बजावते.

भिख्खू आणि तो राहतो ते आजचं मुंबई ह्यांना सतत एकमेकांशेजारी दाखवून दिग्दर्शक भिख्खूचा तिढा स्पष्ट करत जातो आणि तो पाहणाऱ्याला अंतर्मुख करतो. त्यात भिंतीवरची पोस्टर्स आणि ग्राफिटी येतात; पाऊस आणि गर्दी येते; पाण्याचे पाईप्स येतात. ह्या सर्वांतून मार्ग काढत ताडताड चालत जाणारा भिख्खू अतिशय समर्थ वाटतो. आणि तरीही अजस्र पवनचक्क्या आणि त्यांच्या सावल्यांखाली छोटा भासणाऱ्या भिख्खूच्या मर्यादाही हळूहळू जाणवू लागतात. विज्ञान-तंत्रज्ञानाकडे पाठ फिरवून तो जणू आयुष्यापासून दूर पळतो आहे असं भासू लागतं. सुरवंट, सूक्ष्मदर्शकाखाली दिसणारे आदिजीव अशा घटकांचाही वापर पटकथेत प्रभावीपणे करून घेतला आहे.

स्टॉकब्रोकरची कथा ही काहीशी विनोदी अंगानं जाते. नुकतीच मूत्रपिंडरोपणाची शस्त्रक्रिया झालेला ब्रोकर हॉस्पिटलमध्ये बसल्याबसल्या पैसे कमावण्याच्या मागे लागलेला दिसणं, त्याच्या गंमतीशीर, जाड्या, मठ्ठ पण गोड मित्राचं व्यवहारी जगाचा दृष्टिकोन सतत आपल्या वर्तनातून दाखवत राहणं, किंवा त्याची समाजवादी आजी तो बरा झाल्याप्रीत्यर्थ 'पार्टी' म्हणून एका सूफी गायकाचा कार्यक्रम ठेवते तो प्रसंग असे अनेक घटक हलक्याफुलक्या वळणानं कथेला हळूहळू गंभीर आशयाकडे नेतात. अत्यंत विचारपूर्वक लिहिलेली अशी पटकथा क्वचितच आजकालच्या भारतीय सिनेमाला लाभते.

ह्यातला अवकाशाचा वापरही रोचक आहे. हॉस्पिटल, चिंचोळ्या झोपडपट्ट्या अशा बंदिस्त अवकाशांत संकुचित पटकथा हळूहळू विस्तीर्ण अवकाशाकडे जाते. तो सगळा प्रवास पुन्हा एकदा दृश्यमाध्यमावरची दिग्दर्शकाची पकड दाखवून देतो.

'शिप अॉफ थिसिअस' ह्यापूर्वी अनेक महोत्सवांमध्ये दाखवला गेला आहे. त्याला काही पारितोषिकंसुद्धा मिळाली आहेत. १९ जुलैला तो भारतात प्रदर्शित होईल. चित्रपटाची प्रकृती पाहता बॉक्स अॉफिसवर त्याला फारसं यश मिळेलसं वाटत नाही. त्यामुळे आठवड्याभरात तो येऊन नाहीसा झाला तर त्यात नवल वाटण्यासारखं काही नसेल. पटकथा, संवाद, अभिनय यांबरोबरच ध्वनिलेखन, छायालेखन, चित्रचौकटीतला अवकाश अशा घटकांद्वारे तत्त्वचिंतनासारखा गंभीर आशय प्रभावीपणे मांडण्यात आणि त्या आशयाला काव्यात्म करण्यात यशस्वी ठरणारे चित्रपट भारतात निर्माण होण्याची परंपरा नाही. त्यामुळे मोठ्या पडद्यावरच पाहावा असा हा अनुभव आहे. ज्यांना तत्त्वचिंतनात्मक चित्रपट पाहायला आवडेल, आणि ज्यांना भारतीय चित्रपटानं घेतलेलं हे एक वेगळं आणि धाडसी वळण पाहायला आवडेल अशांना ह्या लेखाद्वारे पूर्वसूचना दिली आहे. लोक त्याचा फायदा घेतील अशी आशा आहे.

चित्रपटाचा ट्रेलर -

समीक्षेचा विषय निवडा

मिहिर Mon, 08/07/2013 - 23:39

चित्रपटाची ओळख आवडली. पाहायला आवडेल. हा बोटीचा दृष्टान्त भारतीय तत्त्वज्ञानात देखील आहे असे वाचले आहे. बौद्ध तत्त्वज्ञानातील बोटीचा हाच दृष्टान्त सांगून धनंजय यांनी उपक्रमावर एका प्रतिसादात संस्कृती आणि भाषाबदलाबद्दलचे विवेचन केले होते. असे असताना भारतीय तत्त्वचिंतन म्हणत 'शिप ऑफ थिसिअस' असे नाव का दिले आहे? की भारतीय तत्त्वचिंतन वगैरे मांडणी लेखकाची आहे? अर्थात हरकत काहीच नाही.

नंदन Tue, 09/07/2013 - 00:10

परिचय. संधी मिळताच हा चित्रपट नक्कीच पाहीन.
'पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते' हे कदाचित वैश्विक पातळीवर खरं असलं तरी रोजच्या जीवनात त्याच्या जवळजवळ पूर्ण उलट अशा 'शिप ऑफ थिसिअस'चाच पडताळा येत असतो. बाकी 'एकत्रीकरणाचे' प्रतीक असणार्‍या थिसिअसच्या नावानेच हा पॅरॉडॉक्स ओळखला जावा, हे पॅरॉडॉक्सिकल आहे :) [Theseus was the Athenian founding hero, considered by them as their own great reformer: his name comes from the same root as θεσμός ("thesmos"), Greek for "institution". He was responsible for the synoikismos ("dwelling together")—the political unification of Attica under Athens. (स्रोत)]

राजेश घासकडवी Tue, 09/07/2013 - 06:53

ओळख आवडली. ट्रेलर पाहून खरोखरच 'व्हिज्युअली स्टनिंग' हे जाणवलं. त्यात अशा गहन प्रश्नाचा विचार करण्यासाठी अशी वेगळी पात्रं आणि त्यांची विश्वं निर्माण केलेली पाहून थक्क झालो. चित्रपट प्रत्यक्ष कधी बघायला मिळेल कोणजाणे...

रुची Tue, 09/07/2013 - 07:13

अतिशय सुरेख परिचय. चित्रपटाचा विषय आणि मांडणी यातलं नाविन्य यामुळे 'पहायलाच हवा'च्या यादीत घातला आहे. परिचय वाचून जाणवले की अशा दर्जाचे वेगळे चित्रपट भारतात बनताहेत हे जितकं आनंददायी आहे तितकंच त्याबद्दल इतकं नेमकेपणाने, अभ्यासपूर्ण लिहिणारा माणूस मराठीसंस्थळावर भेटणेही आनंददायी आहे.

चिंतातुर जंतू Tue, 09/07/2013 - 12:02

>> हा सिनेमा आमच्या शहरात येइल कि नाही शन्काच आहे .

सध्या हा चित्रपट मुंबई, पुणे, कोलकाता, बेंगळुरू आणि दिल्ली इथे प्रदर्शित होईल. त्याशिवाय एखाद्या शहरात तो प्रदर्शित व्हावा अशी इच्छा असली तर इथे आपलं मत देऊ शकता.

विसुनाना Tue, 09/07/2013 - 12:13

एकमेकींना अर्थान्वये छेद देणार्‍या तीन कथांमधून (ट्रँग्यूलेशन करून?) मानवी अस्तित्व आणि जीवनाचा अर्थ याविषयी मूलभूत प्रश्नाचे ठोस उत्तर शोधणार्‍या या चित्रपटाची ओळख आवडली. चित्रपट पहायला आवडेल.

जीए म्हणतात तसा - आपल्या आयुष्यावर चरचरीत डाग उमटवणारा - प्रसंग घडून गेल्यावर माणूस पूर्वीचाच राहतो का?

तसा प्रसंग घडला नाही तरी, (लहानसान घाव बसत राहून तुकडे उडत राहिले तरी) म्हटले तर काळाबरोबर शरीराची कंटिन्युईटी वरकरणी दिसते म्हणून बाह्यात्कारी माणूस दिसायला साधारण तोच, अधिक बारकाईने पाहिले तर कालौघात शरीराच्या भौतिक जडणघडणीसह (अणूरेणूही) सर्व विचार, मते, व्यक्तीमत्त्वही बदलून गेलेले आहे. मग तो माणूस 'मुळातला' कसा?, मुळात मुळातली अशी एकच एक व्यक्ती आयुष्यभर असते का? असे प्रश्न या ओळखीच्या निमित्ताने उभे झाले.

एक अवांतर प्रश्न, हा चित्रपट घरातल्या टीव्हीवर (डीव्हीडी वापरून) पाहिला तर चित्रपटगृहात पाहण्याइतकाच प्रभावी वाटेल का?

ऋषिकेश Tue, 09/07/2013 - 14:59

उत्तम ओळख, असे चित्रपट फारसे पाहिले नसल्याने आवडणार नाहित (किंवा आवडतील) म्हणायला काहीच आधार नसल्याने "हे एकदा बघावे म्हणतो" च्या उत्सुकतेमुळे बघायची इच्छा आहे.

पुण्यात कुठे प्रदर्शित होत आहे?

विषारी वडापाव Tue, 09/07/2013 - 16:34

जबराट चित्रपट असणार. इच्छुकानी तुनलिवर याच ट्रेलर आवर्जून पाहा. अजुन एक उल्लेखनीय बाब म्हणजे किरण राव ने मनावर घेतल नसत तर कदाचित हा महान चित्रपट भारतीय प्रेक्षकाना पाहायला पण मिळायला नसता. मी नक्की पाहणार : )

चिंतातुर जंतू Wed, 10/07/2013 - 19:05

>>हा बोटीचा दृष्टान्त भारतीय तत्त्वज्ञानात देखील आहे असे वाचले आहे. बौद्ध तत्त्वज्ञानातील बोटीचा हाच दृष्टान्त सांगून धनंजय यांनी उपक्रमावर एका प्रतिसादात संस्कृती आणि भाषाबदलाबद्दलचे विवेचन केले होते. असे असताना भारतीय तत्त्वचिंतन म्हणत 'शिप ऑफ थिसिअस' असे नाव का दिले आहे? की भारतीय तत्त्वचिंतन वगैरे मांडणी लेखकाची आहे? अर्थात हरकत काहीच नाही.

मला बौद्ध तत्त्वज्ञानातल्या दृष्टांताबद्दल कल्पना नाही, पण थिसिअस पॅराडॉक्सशी चित्रपटाचा संबंध लागतो हे नक्की, कारण प्रत्येक गोष्टीत अवयवरोपणाआधीची व्यक्ती आणि नंतरची व्यक्ती यांतला फरक, किंवा अवयवरोपणाच्या निव्वळ शक्यतेमुळेच 'आपण कोण?' असा प्रश्न पात्राला पडून तिढा निर्माण होतो. आणि तरीही चित्रपटातलं तत्त्वचिंतन भारतीय वाटतं खरं. ह्याचं मुख्य कारण म्हणजे भिख्खू आणि चार्वाक यांच्यामधले संवाद. जैन किंवा बौद्ध विचारांत देवाची गरज नाही. तसाच हा भिख्खू आहे. इतर गोष्टींमध्येदेखील भारतीयपण जाणवतं. उदाहरणार्थ, फोटोग्राफरला दृष्टीचा अभाव असताना दिव्यदृष्टी लाभलेली असते हा विरोधाभास तर 'गरिबीत माणूस सुखी असतो'सारखा वाटतो. स्टॉकब्रोकर हा वरवर पाहता स्वकेंद्री आणि स्वार्थी वाटला तरी एक प्रकारे दुसऱ्या गोष्टीतल्या चार्वाकात आणि त्याच्यात साम्य आहे.

>> राशोमोनच्या जातकुळीतला
>> एकमेकींना अर्थान्वये छेद देणार्‍या तीन कथांमधून (ट्रँग्यूलेशन करून?) मानवी अस्तित्व आणि जीवनाचा अर्थ याविषयी मूलभूत प्रश्नाचे ठोस उत्तर शोधणार्‍या या चित्रपटाची
राशोमॉनशी तुलना कदाचित अस्थानी होईल. कारण -
१.भारतीय सिनेमाची एकूण पातळी पाहता तो चांगला असला तरीही तो राशोमॉनच्या उंचीचा (किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा क्लासिक) आहे असं म्हणता येणार नाही.
२. सिनेमात काय घडतं आहे हे तसं नि:संदिग्ध आहे. त्यामुळे एका घटिताचं वेगळ्या कोनांतून दर्शन त्यात नाही.
३. राशोमॉनचा शेवटाकडचा मानवतावाद आणि माणसाच्या चांगुलपणाबद्दलचा आशावाद ह्यात नाही. म्हणजे सिनेमा निराशावादी नाही, पण काय बरोबर आणि काय चुकीचं ह्या विषयीचा निवाडा तो करत नाही.
हां, त्यात ठोस उत्तरं दिलेली नाहीत हे कदाचित दोन्ही चित्रपटांमधलं साम्य म्हणता येईल.

>>कालौघात शरीराच्या भौतिक जडणघडणीसह (अणूरेणूही) सर्व विचार, मते, व्यक्तीमत्त्वही बदलून गेलेले आहे. मग तो माणूस 'मुळातला' कसा?, मुळात मुळातली अशी एकच एक व्यक्ती आयुष्यभर असते का? असे प्रश्न या ओळखीच्या निमित्ताने उभे झाले.
हे प्रश्न सिनेमातही येतात. किंबहुना ट्रेलरमध्ये खळाळत्या पाण्यापाशी बसलेली पहिल्या गोष्टीतली स्त्री दाखवणारी जी चौकट दिसते तीतून तसंच काहीसं म्हणायचं असावं.

>>हा चित्रपट घरातल्या टीव्हीवर (डीव्हीडी वापरून) पाहिला तर चित्रपटगृहात पाहण्याइतकाच प्रभावी वाटेल का?
वर राजेशनं उद्धृत केलेल्या, ट्रेलरमध्ये शेवटी दिसणाऱ्या कोणत्यातरी परीक्षणातलं जे विशेषण आहे त्यात खरं तर प्रश्नाचं उत्तर आहे. -
>>ट्रेलर पाहून खरोखरच 'व्हिज्युअली स्टनिंग' हे जाणवलं.

पण त्या निमित्तानं 'व्हिज्युअली स्टनिंग'बद्दलही काही सांगायला हवं. ते नंतर कधी तरी.

>>पुण्यात कुठे प्रदर्शित होत आहे?
नक्की कल्पना नाही, पण चित्रपटाची जातकुळी पाहता पिटातल्या प्रेक्षकापेक्षा मल्टिप्लेक्समधल्या शहरी मध्यमवर्गीय प्रेक्षकापर्यंत पोहोचण्याची वितरकाची आकांक्षा असली तर नवल वाटू नये. त्यामुळे पुण्यातल्या प्रमुख मल्टिप्लेक्समध्ये प्रत्येकी किमान एक तरी खेळ (किमान पहिल्या आठवड्यात तरी) लागावा.

विसुनाना Thu, 11/07/2013 - 12:12

In reply to by चिंतातुर जंतू

स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद... चिं.जं., हा चित्रपट आपण पाहिला आहे असे प्रतीत होते. कुठे ? कसा?

चिंतातुर जंतू Thu, 11/07/2013 - 13:15

In reply to by विसुनाना

>> हा चित्रपट आपण पाहिला आहे असे प्रतीत होते. कुठे ? कसा?

गेल्या वर्षभरात हा चित्रपट अनेक महोत्सवांमध्ये दाखवला गेला आणि गाजला. त्यामुळे अनेकांकडून नाव ऐकून होतो. मात्र आपल्याकडे तो प्रदर्शित होईल असं वाटलं नव्हतं. फिल्म आर्काइव्हमध्ये त्याचा एक विशेष खेळ आयोजित झाला आहे असं एक दिवस कळलं. तेव्हा तिथे जाऊन बघितला.

ऋषिकेश Thu, 11/07/2013 - 16:44

In reply to by चिंतातुर जंतू

या निमित्ताने फिल्म आर्काइव्हची मेंबरशीप मिळवण्याचे (खरंतर मेंबरशीपसाठी फॉर्म देणार्‍या तैंनी आपल्या फोनला "नंतर फोन करा, बिझी आहे" या व्यतिरिक्त दुसरे उत्तर मिळवण्याचे)व्यर्थ प्रयत्न केल्याचे आठवले :(

चिंतातुर जंतू Thu, 11/07/2013 - 17:21

In reply to by ऋषिकेश

>> या निमित्ताने फिल्म आर्काइव्हची मेंबरशीप मिळवण्याचे (खरंतर मेंबरशीपसाठी फॉर्म देणार्‍या तैंनी आपल्या फोनला "नंतर फोन करा, बिझी आहे" या व्यतिरिक्त दुसरे उत्तर मिळवण्याचे)व्यर्थ प्रयत्न केल्याचे आठवले

खरं तर फॉर्म आंतरजालावर उपलब्ध आहे. तो भरून त्यात दिलेल्या सूचनांनुसार कागदपत्रं बरोबर नेली तर कार्यालयीन वेळात कधीही जाऊन देता येतो.

ऋषिकेश Thu, 18/07/2013 - 09:01

फेसबुक पानानुसार पुण्यात पुढिल थेटरात हा चित्रपट लागणार आहे:
INOX-Amonara Mall: 4:05 PM & 10:00 PM
PVR Market City Mall: 3:30 PM & 8:00 PM

ऋषिकेश Mon, 22/07/2013 - 09:38

काल चित्रपट पाहिला.
अतिशय ताकदवान चित्रपट आहे. कुठल्यातरी खोलवरच्या तारा छेडतो! डोक्यातून जात जात नाहीये.
हे परीक्षणही समर्थ आहे.

तीनही कथा आपापल्या मर्माला धरून आहेत. कथेसाठी घेतलेल्या लहान उदाहरणांतूनच नव्हे तर लहान सहान संवादरहित प्रसंगांतूनही बरेच काही संगून जाणारा चित्रपट आहे. नक्की पहा आणि मोठ्या पडद्यावरच पहायचा प्रयत्न करा.

तिरशिंगराव Mon, 22/07/2013 - 10:27

एका वेगळ्या चित्रपटाचा परिचय करुन दिल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच बघण्यात येईल.

विसुनाना Mon, 22/07/2013 - 23:34

आताच पाहून आलो. सग्गळं छान पण शेवटी विल स्मिथवाला सेव्हन पाउंड्स आठवला हे सांगताना खेद होतो.

चिंतातुर जंतू Tue, 23/07/2013 - 11:52

>> पण शेवटी विल स्मिथवाला सेव्हन पाउंड्स आठवला हे सांगताना खेद होतो.

हे गंमतीशीर वाटलं. ज्या व्यक्तीला आपले अवयव द्यायचे ती लायक आहे की नाही ते पारखून वगैरे मगच त्यांची निवड करणारा, आपल्या पापाचं प्रायश्चित्त घेणारा सेव्हन पाउंड्सचा नायक हा खास अमेरिकन धार्मिक नैतिकतेचा प्रतिनिधी वाटतो. ह्या पद्धतीची नैतिक मांडणी अंमळ ढोबळ वाटते. न्यू यॉर्क टाइम्सच्या ए. ओ. स्कॉटच्या मते हा चित्रपट -

"endlessly sentimental fable about sacrifice and redemption that aims only at the heart at the expense of the head."

ह्या उलट 'शिप ऑफ थिसिअस' मेंदूला चालना देण्याचा किमान प्रयत्न तरी करतो आणि त्यातली जी काही आहे ती नैतिकता अधिक गुंतागुंतीची आहे असं वाटतं.

विसुनाना Tue, 23/07/2013 - 12:08

In reply to by चिंतातुर जंतू

माझे म्हणणे अगदी तुमच्यासारखे आहे. इतका उत्तम चित्रपट - अनेक शक्यतांनी शेवटाकडे जाऊ शकला असता. तेवढा शेवट वेगळा झाला असता तर फार-फार बरे वाटले असते. उलट ही सर्व पात्रे 'तिथे' एकत्र येतात ते पाहून सेव्हन पाऊंड्स आठवला आणि उगीचच मनाला रुखरूख लागून राहिली. (मला तरी फसल्यासारखे वाटले.. गुलजार यांच्या अनेक काव्यात्म चित्रपटांचा शेवटही असाच फसलेला वाटत असे.)

ऋषिकेश Tue, 23/07/2013 - 12:17

In reply to by विसुनाना

संभाव्य रहस्यभेद सुरू
पात्रे एकत्र येतात हे किंचित कृत्रिम वाटते / कुठेतरी अपेक्षित किंवा सर्वसाधारण असते हे कबूल, पण ते तितकेच, चित्रपटाचे नाव सार्थ ठरवण्यापुरते / चित्रपटाच्या नावातील तत्त्वाला अधिक ठळक करण्यापुरते ठरते. त्याला तितपतच महत्त्व द्यावे असे वाटले.
संभाव्य रहस्यभेद समाप्त

बाकी चित्रपटात ओळख, मृत्यू आणि नैतिकता या तीन तत्त्वांबद्दलचा गुंता, किंवा भारतीय पार्श्वभूमीवर 'दाखवलेले' द्वंद्व लाजवाब आहे आणि तेच या चित्रपटाचे मर्म आहे असे मला वाटले.

चिंतातुर जंतू Tue, 23/07/2013 - 15:01

In reply to by विसुनाना

ज्यांनी किस्लोव्स्कीची 'थ्री कलर्स' ही त्रिधारा पाहिली आहे त्यांना हे लक्षात येईल की आनंद गांधी त्याचं अनुकरण करतो. तरीही त्या शेवटाला काहीएक संदर्भ आहे असं वाटतं. प्रत्येक कथेत निसर्ग माणसाला अंतर्मुख करताना दाखवला आहे. संकुचित अवकाश आणि विस्तारत जाणारा अवकाश ह्याचा मी वर उल्लेख केलेलाच आहे. आपला नैतिक तिढा समजून घेताना प्रत्येक पात्र निसर्गसन्मुख होताना दाखवलं आहे. तिथे एक प्रकारे 'आपुलाचि वाद आपणाशी' होऊन ते ते पात्र काहीएक निर्णयाप्रत पोहोचतं, किंवा त्याला स्वतःविषयी काहीतरी आकळतं असं दिग्दर्शक सुचवतो. मनाला व्यापकता येण्यासाठी हा निसर्गाशी मूक संवाद महत्त्वाचा आहे असं दिग्दर्शक प्रत्येक गोष्टीत सुचवू पाहतो. ह्याच निसर्गाशी जवळीक साधण्याचा संबंध शेवटाशी लागतो.
रहस्यभेद सुरू
गुंफांचा शोध घेणारा दाता आणि त्याच्या मरणोत्तर दातृत्वाचा लाभ घेतलेल्यांनी निसर्गात घेतलेला स्वतःचा शोध ह्यात काही दुवा आहे. दातादेखील आपल्या आयुष्यातल्या तिढ्यांना सामोरं जाण्यासाठी कदाचित निसर्गाच्या सान्निध्यात जात असावा अशी शक्यता सुचवलेली आहे. जिथे माणूस आपल्या भूतकाळाला सामोरा जाऊन स्वतःविषयी किंवा मानवजातीविषयी काही शोध घेऊ इच्छितो अशा ठिकाणी, म्हणजे म्यूझिअममध्ये शेवटचा प्रसंग घडणं हेदेखील सूचक वाटतं. शिवाय, वेगवेगळी माणसं एकमेकांशी कळत-नकळत कशी जोडलेली असतात आणि अनेकदा त्यांना ते माहीतही नसतं हे अंतर्मुख करणारं आहे. म्हणजे काही प्रमाणात चित्रपट हा निव्वळ आपल्याला दिसलेल्या कथांमधल्या पात्रांपुरता मर्यादित नाही, तर अखिल मानवतेला कवेत घेऊ इच्छितो हे सुचवलेलं असावं असं म्हणता येईल.
रहस्यभेद समाप्त

जाताजाता - शेवटी काय होतं ह्याविषयीची चर्चा रहस्यभेद करणारी वाटते. ज्यांना चित्रपट पाहायचा आहे त्यांचा त्यामुळे रसभंग होऊ शकेल. त्यामुळे धाग्यात त्या विषयी बोलताना तशी पूर्वसूचना वाचकाला देणं गरजेचं आहे असं वाटतं.

विसुनाना Tue, 23/07/2013 - 15:36

In reply to by चिंतातुर जंतू

हा रहस्यभेद आवडला.

पण तीन मधली पहिली सोडली तर इतर दोन कथांमध्ये निसर्गाशी जवळीक साधणे - निसर्गसन्मुख होणे असे काही दिसले नाही. दुसर्‍या कथेत जो काही अंतर्गत वाद आहे तो बाहेर दिसत नाही आणि तिसर्‍या कथेत तर बाह्य निसर्गाशी काही संबंध नाही. (अवयव ही निसर्गाची देणगी आहे या अर्थाने तर अंतर्गत 'निसर्गाचा' संबंध आहे. पण तिसरी कथा एक्स्ट्रोव्हर्ट आहे म्हणून अंतर्गत निसर्गाचा संबंध लागत नाही. )

अर्थातच, एखाद्या अ‍ॅब्स्ट्रॅक्ट पेंटिंगचे वेगवेगळे अर्थ लावता येतातच. म्हणूनच, 'वेगवेगळी माणसं एकमेकांशी कळत-नकळत कशी जोडलेली असतात आणि अनेकदा त्यांना ते माहीतही नसतं' यावरून शेवटचा प्रसंग सेव्हन पाऊंडसची आठवण करून देणारा वाटला.

चिंतातुर जंतू Tue, 23/07/2013 - 15:45

In reply to by विसुनाना

>> तीन मधली पहिली सोडली तर इतर दोन कथांमध्ये निसर्गाशी जवळीक साधणे - निसर्गसन्मुख होणे असे काही दिसले नाही. दुसर्‍या कथेत जो काही अंतर्गत वाद आहे तो बाहेर दिसत नाही आणि तिसर्‍या कथेत तर बाह्य निसर्गाशी काही संबंध नाही.

दोन्ही कथांत परिसर कसा बदलत जातो ते आठवा -
दुसरी कथा - मुंबई शहर, हाय कोर्ट, जनावरांवर चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळा, श्रीमंत भक्तांचा गोतावळा -> एकाकी परिसर, नदीचा किनारा, सळसळणारं जंगल, आकाशाच्या पार्श्वभूमीवर एकाकी भिख्खू.

तिसरी कथा - हॉस्पिटल, घर, झोपडपट्टी, पोलीस स्टेशन, हॉटेल -> निसर्गरम्य मोकळा अवकाश असलेलं स्वीडन, समुद्राकाठी खडकांसोबत एकटा बसलेला नायक.

ऋषिकेश Tue, 23/07/2013 - 15:45

In reply to by विसुनाना

पण तीन मधली पहिली सोडली तर इतर दोन कथांमध्ये निसर्गाशी जवळीक साधणे - निसर्गसन्मुख होणे असे काही दिसले नाही. दुसर्‍या कथेत जो काही अंतर्गत वाद आहे तो बाहेर दिसत नाही आणि तिसर्‍या कथेत तर बाह्य निसर्गाशी काही संबंध नाही. (अवयव ही निसर्गाची देणगी आहे या अर्थाने तर अंतर्गत 'निसर्गाचा' संबंध आहे. पण तिसरी कथा एक्स्ट्रोव्हर्ट आहे म्हणून अंतर्गत निसर्गाचा संबंध लागत नाही. )

+१
संभाव्य रहस्यभेद टाळण्यासाठी अशाच अर्थाची खरड चिंजंना टाकली होती

रुची Wed, 24/07/2013 - 19:45

In reply to by चिंतातुर जंतू

थ्री कलर्सचा उल्लेख रोचक वाटला. अनुकरण असो वा नसो पण केश्लोव्स्कीचा प्रभाव असलेला भारतीय चित्रपट पहाण्याची उत्सुकता फारच वाढली आहे. अर्थात हा चित्रपट आम्हाला पहायला बरीच वाट पहावी लागणार असे दिसतेय.

ऋषिकेश Tue, 23/07/2013 - 13:30

सदर चित्रपट भारतातर्फे ऑस्करसाठी पाठवला जावा असे तुम्हाला वाटते का?या प्रश्नावर CNN-IBN वर लिहिलेला हा लेख वाचनीय आहे.
या वर ऐसीअक्षरेच्या सभासदांचीही मते वाचायला आवडतील,.

माझे मत: मला हा चित्रपट पाठवल्यास आनंद होईलच पण तो यंदा पाठवायला एलिजिबल आहे ते माहित नाही.

ऋषिकेश Wed, 24/07/2013 - 13:20

CNN-IBNवर आज दुपारी चार वाजता स्वतः आनंद गांधी वाचकांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत.
त्यांना प्रश्न येथे पाठवता येतील.

आपल्या वरील चर्चेच्या अनुशंगाने चित्रपटाच्या शेवटाशी संबंधीत एक प्रश्न मी आधीच पाठवला आहे.

चिंतातुर जंतू Wed, 24/07/2013 - 20:05

>> अनुकरण असो वा नसो पण केश्लोव्स्कीचा प्रभाव असलेला भारतीय चित्रपट पहाण्याची उत्सुकता फारच वाढली आहे.

मला विचाराल, तर किस्लोव्स्कीचा फारसा प्रभाव ह्या चित्रपटावर नाही, पण काही घटक त्याची मर्यादित प्रमाणात आठवण मात्र करून देतात. तशीच कदाचित थोड्या प्रमाणात इन्यारितुच्या २१ ग्रॅम्सची आठवण होऊ शकेल - तीन कथा, अवयवरोपण, वगैरे. आणि तरीही शैलीत खूप फरक आहे. एकंदरीत म्हणायचं, तर अनेक पूर्वसुरींचा कमीअधिक प्रमाणात प्रभाव आहे, पण तरीही काहीतरी वेगळं आहे असं मी म्हणेन.

चिंतातुर जंतू Fri, 26/07/2013 - 11:23

पुण्यातल्या खेळांची संख्या वाढली आहे -
INOX-Amonara: 1:50 PM 7:30 PM
PVR Market City: 4:25 PM 10:45 PM
E-Square: 6:15 PM
स्रोत (इतर शहरातल्या खेळांविषयी तपशील ह्याच पानावर इतरत्र मिळतील.)

चिंतातुर जंतू Wed, 31/07/2013 - 15:30

चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद बघून तो २ ऑगस्टपासून आणखी १७ शहरांत प्रदर्शित केला जाणार आहे. त्यात नागपूर आणि गोव्याचा समावेश आहे. अधिक माहिती इथे मिळेल.

Nile Mon, 03/02/2014 - 20:49

नुकताच चित्रपट सिनू (?) या स्थळावर पाहिला (अमेरिकेत राहणार्‍यांकरता: गेल्या दोन दिवसांत सिनेमा उपलब्ध आहे आणि नाही असे एक-दोनदा झाले आहे. पण आत्ता उपलब्ध दिसतो आहे.) सिनेमा फार आवडला. चिंतातुर जंतूंनी ओळख करून दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार.

(या निमित्ताने धागा वर येऊन इतरांनाही पहायला मिळावा या हेतूने इथे प्रतिसाद.)

दुसर्‍या कथेत मैत्रेय जे गातो त्याबद्दल कोणी अधिक माहिती देऊ शकेल का?

काही रहस्यभेद असू शकतात.
तिसर्‍या कथेत जेव्हा शंकरचा शोध घेण्याकरता ते दोघे मुंबईतील झोपडपट्टी पालथी घालतात तेव्हा, मूत्रपिंड किती सहजगत्या चोरी जाते (रोजचीच बाब, असा एक संवादही त्या दोघांत घडतो) मात्र शंकरचा शोध किती दुरापास्त हा परिस्थितीचा दुर्दैवी उपहास फार प्रभावी वाटला.

गुंफांचा शोध घेणारा दाता आणि त्याच्या मरणोत्तर दातृत्वाचा लाभ घेतलेल्यांनी निसर्गात घेतलेला स्वतःचा शोध ह्यात काही दुवा आहे. दातादेखील आपल्या आयुष्यातल्या तिढ्यांना सामोरं जाण्यासाठी कदाचित निसर्गाच्या सान्निध्यात जात असावा अशी शक्यता सुचवलेली आहे. जिथे माणूस आपल्या भूतकाळाला सामोरा जाऊन स्वतःविषयी किंवा मानवजातीविषयी काही शोध घेऊ इच्छितो अशा ठिकाणी, म्हणजे म्यूझिअममध्ये शेवटचा प्रसंग घडणं हेदेखील सूचक वाटतं. शिवाय, वेगवेगळी माणसं एकमेकांशी कळत-नकळत कशी जोडलेली असतात आणि अनेकदा त्यांना ते माहीतही नसतं हे अंतर्मुख करणारं आहे. म्हणजे काही प्रमाणात चित्रपट हा निव्वळ आपल्याला दिसलेल्या कथांमधल्या पात्रांपुरता मर्यादित नाही, तर अखिल मानवतेला कवेत घेऊ इच्छितो हे सुचवलेलं असावं असं म्हणता येईल.

मला लागलेला अजून एक अर्थ म्हणजे; गुंफा शोधणारा हा जगातल्या लपलेल्या जागा एकप्रकारे जगापुढे मांडतो आहे, जगाला दाखवतो आहे, आणि त्याचे अवयव मिळण्याचा आणि त्या-त्या व्यक्तीमधील एक दुसरी बाजू आता जगापुढे आलेली आहे.

अक्षय पूर्णपात्रे Tue, 04/02/2014 - 05:25

In reply to by Nile

धन्यवाद. मुख्य म्हणजे हा सिनियु/सिनु प्रकार कायदेशीर दिसतो.