राजकीय पक्ष आणि संरचना
काल भाजपामधील नव्या अध्यक्षांनी आपली नवी 'टीम' घोषित केली. या निमित्ताने प्रत्येक पक्षातील अंतर्गत संरचना कशी असेल असे कुतूहल होते. थोडी शोधाशोध केल्यावर भाजपा, काँग्रेस आणि डाव्यांमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची रचना जशी माझ्या लक्षात आली तशी येथे देत आहे.
या धाग्यामुळे विविध बातम्यांत वेळोवेळी उल्लेख होणार्या पदांविषयी अधिक डोळस समज निर्माण होईल अशी अपेक्षा आहे.
========================
भाजपा या पक्षामध्ये 'अध्यक्ष' हा पक्षाचा प्रमुख असतो. याचा कार्यकाळ ३ वर्षांचा असतो. नुकत्याच झालेल्या दुरुस्तीनुसार या तीन वर्षांनंतर, अधिकची तीन वर्षे म्हणजे सलग ६ वर्षे अध्यक्षपदी राहता येऊ शकते. अध्यक्षाची निवडणूक झाल्यावर तो उपाध्यक्ष, जनरल-सेक्रेटरी, कोशाध्यक्ष आणि सेक्रेटरीजची निवड करतो. या पदांवर किती व्यक्तींची निवड करावी यावर कोणतेही बंधन नाही. या पदांव्यतिरिक्त अधिकृत प्रवक्ते वगैरे पदेही हल्लीच्या काळात अधिकाधिक महत्त्वाची होत आहेत. (सध्याच्या ऑफिस बेअरर्समध्ये १३ उपाध्यक्ष, १० जनरल-सेक्रेटरीज्, १ कोशाध्यक्ष (श्री पीयुष गोयल), १५ सेक्रेटरीज् आणि ७ अधिकृत प्रवक्ते आहेत.)
भाजपामध्ये "नॅशनल एक्झिक्युटिव्हस" अर्थात राष्ट्रीय कार्यकारिणी किंवा पार्लमेंटरी बोर्ड नावाच्या एका गटाला कोणत्याही प्रश्नावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या गटाने घेतलेला निर्णय हा अंतिम आणि सर्वोच्च मानला जातो. भाजपाचा राष्ट्रीय अध्यक्ष या गटाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. या गटातही किती व्यक्ती असाव्यात यावर संख्येचे बंधन नाही. सध्या या गटाचे १२ सदस्य आहेत. ज्यात श्री. राजनाथ सिंह हे चेअरमन, श्री. अनंत कुमार हे सेक्रेटरी आहेत. याव्यतिरिक्त सर्वश्री अटल बिहारी वाजपेयी, लाल कृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, नरेंद्र मोदी, मुरली मनोहर जोशी, वेंकय्या नायडू, नितीन गडकरी, थँवरचंद गेहलोत आणि रामलाल यांचा समावेश आहे.
या व्यतिरिक्त 'सेंट्रल इलेक्शन कमिशन' नावाच्या गटाकडे विविध प्रांतातील निवडणुकांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असते. या गटातही किती व कोणते सदस्य असावेत यावर संख्येचे बंधन नाही. तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य या गटाचेही सदस्य असतातच. त्यांच्या व्यतिरिक्त सध्या या गटामध्ये सर्वश्री गोपीनाथ मुंडे, जुरल ओरम, शाहनवाज हुसेन, विनय कटियार, जे.पी.नड्डा, डॉ. हर्षवर्धन, सरोज पांडे यांचा समावेश आहे.
पक्षांतर्गत तक्रारींच्या निवारणासाठी आणि पक्षाच्या सदस्यांवर तसेच ऑफिस बेअरर्सवर कारवाई करण्याचा अधिकार असणारी 'डिसिप्लनरी कमिटी' हा ५ सदस्यांचा अजून एक स्वायत्त गट पक्षात आहे. सध्या या गटाचे अध्यक्ष श्री राधा मोहन सिंग करत आहेत. तर श्री जगदीश मुखी हे सेक्रेटरी आहेत.
याचबरोबर विविध प्रश्नांवर विशेषत्वाने लक्ष देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ५० विभाग बनवले गेले आहेत त्यांना 'नॅशनल सेल्स' म्हटले जाते. यात पाणी प्रश्न, अंत्योदय योजनेपासून, मजदूर महासंघ, प्राकृतिक चिकित्सेपर्यंत अनेक विषयांना वाहिलेले विभाग आहेत.
या पक्षातही अध्यक्ष हा पक्षाचा प्रमुख असतो. आवश्यकता वाटल्यास उपाध्यक्ष पदाची नेमणूक अध्यक्ष करू शकतो. अध्यक्षपदाची निवडणूक दरवर्षी होणे गरजेचे आहे. मात्र एकाच व्यक्तीने सलग किती वेळा अध्यक्ष व्हावे यावर बंधन नाही. (नेहरूंच्या काळात ते फार क्वचित अध्यक्ष होते मात्र श्रीमती इंदिरा गांधींनी ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीने भूषावयाची प्रथा सुरू केली जी पी.व्ही.नरसिंह राव यांच्यापर्यंत चालत आली. त्यानंतर श्रीमती गांधी यांनी पंतप्रधानपद दुसर्या व्यक्तीकडे सोपवून पुन्हा सत्ताकेंद्रांची विभागणी केली.)
केवळ काँग्रेस असा एकच पक्ष आहे ज्यात "केंद्रीय निवडणूक विभाग" नावाचा स्वायत्त विभाग आहे. सदर विभाग पक्षांतर्गत निवडणुका झाल्यास त्या निष्पक्ष होतील याची खबरदारी घेतो.
अध्यक्षाची निवडणूक झाल्यावर तो उपाध्यक्ष, जनरल-सेक्रेटरीज्, कोशाध्यक्ष, प्रभारी आणि सेक्रेटरीजची निवड करतो. या पदांवर किती व्यक्तींची निवड करावी यावर कोणतेही बंधन नाही. (सध्या १ उपाध्यक्ष (श्री. राहुल गांधी), १ कोशाध्यक्ष (श्री.मोतीलाल व्होरा), १ पॉलिटिकल सेक्रेटरी (श्री. अहमद पटेल), ९ जनरल सेक्रेटरीज्, ८ स्वतंत्र प्रभारी, आणि ३५ सेक्रेटरीज् आहेत)
काँग्रेस पक्षामध्ये "काँग्रेस वर्किंग कमिटी" (ज्याला 'हाय कमांड' म्हटले जाते) अश्या नावाचा एक अधिकारी गट आहे. या एका गटाला कोणत्याही प्रश्नावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. या गटाने घेतलेला निर्णय हा अंतिम आणि सर्वोच्च मानला जातो. पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष व उपाध्यक्ष या गटाचे पदसिद्ध अध्यक्ष व उपाध्यक्ष असतात. या गटातही किती व्यक्ती असाव्यात यावर संख्येचे बंधन नसले तरी अध्यक्ष व उपाध्यक्ष सोडून साधारणतः १५ ते २० व्यक्ती या गटात असतात. सध्या या गटाचे १९ सदस्य आहेत. ज्यात श्रीमती सोनिया गांधी अध्यक्षा आणि श्री राहुल गांधी हे उपाध्यक्ष आहेत, तर याव्यतिरिक्त सर्वश्री डॉ. मनमोहन सिंग, ए.के.अँटनी, मोतीलाल व्होरा, गुलाम नबी आझाद, दिग्विजय सिंग, जनार्दन द्विवेदी, ऑस्कर फर्नांडिस, मुकुल वासनिक, बी.के.प्रसाद, बिरेंदर सिंग, डॉ.कर्नल डी.आर.शांडिल, मधुसूदन मिस्त्री, अहमद पटेल, अंबिका सोनी, हेमो प्रोवा सैकिया, सिशीला तिरीया आणि विलास मुत्तेमवार यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त १८ व्यक्ती पर्मनंट इन्व्हायटीज आणि ६ स्पेशल इन्व्हायटीज आहेत.
याचबरोबर ६ अधिकृत पक्षप्रवक्ते आहेत. शिवाय विविध विषयांवरच्या अनेक समित्या आहेत (ज्यात चार सदस्यांची डिसिप्लनरी समितीही आहे)
राज्यस्तरावर प्रदेश काँग्रेस कमिटी (PCC) नावाची स्थानिक समिती असते जिचे स्वरूप केंद्रीय समितीप्रमाणेच, फक्त राज्यस्तरावर, असते. अध्यक्षपदाच्या निवडणूकीत राष्ट्रीय ऑफिस बेअरर्स तसेच प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सदस्यांना मताधिकार असतो.
या पक्षात "अध्यक्ष" नावाचे पद नाही. या पक्षातील अधिकारी हे आधी बघितलेल्या पक्षांपेक्षा वेगळ्या पद्धतीने निवडले जातात. पक्षाची सर्वसाधारण रचना पुढील घटकांनी बनलेली आहे:
- पॉलिट ब्युरो
- केंद्रीय समिती
- राज्य समिती
- जिल्हा समिती
- विभाग समिती
- शाखा समिती
यापैकी राष्ट्रीय समितीमध्ये एकूण ९५ सदस्य असतात. ज्यांची निवड मतदानाद्वारे होते. प्रत्येक पक्ष सदस्याला मताधिकार असतो. (२००४ नुसार ८ लाखाहून अधिक अधिकृत पक्षसदस्य होते ज्यापैकी ३ लाखाहून अधिक केरळमधील होते, तर २.७१लाख प.बंगालमधील होते.) हे ९५ सदस्य १५ सदस्यांचे "पॉलिट ब्युरो" निवडते.
पॉलिट ब्युरो या गटाने घेतलेला निर्णय हा अंतिम आणि सर्वोच्च मानला जातो. पॉलिट ब्युरो आपल्यातील एका व्यक्तीची 'जनरल सेक्रेटरी' या पदावर निवड करतो. सध्या श्री प्रकाश करात या पक्षाचे जनरल सेक्रेटरी आहेत. सध्या या गटाचे १५ सदस्य आहेत. ज्यात श्री प्रकाश करात यांच्याव्यतिरिक्त सर्वश्री सीताराम येचुरी, एस्.रामचंद्रम पिल्लई, बुद्धदेब भट्टाचार्य, माणिक सरकार, एम्.के.पान्डे, बिमान बोस, पिनराई विजयन, के. वरदराजन, बी.व्हॉ. राघवुलु, ब्रिंदा करात, निरुपम सेन, कोडियेरी बालकृष्णन, सुरजकांत मिश्रा आणि एम.ए.बेबी यांचा समावेश आहे.
=========================
माझ्या माहितीत काही चुका असतील तर जरूर निदर्शनास आणाव्यात. याव्यतिरिक्त अधिकची माहिती, पुरवणी तसेच या तीन पक्षांव्यतिरिक्त इतर पक्षांच्या संरचनेबद्दल काही माहिती असेल तर इथे जरूर द्यावी.
काँग्रेस आणि भाजपाच्या
काँग्रेस आणि भाजपाच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत मतदार कोण असतात?
काँग्रेसमध्ये AICC आणि PCC (प्रदेश काँग्रेस कमिटी) च्या सदस्यांना मतदान करता येते. भाजपाबद्दल शोधून सांगतो.
कम्युनिस्ट पार्टीची रचना अन्य देशांमधल्या रचनेवर आधारित आहे का?
कल्पना नाही, साम्यस्थ़ळे असतील असा अंदाज. बघतो काही माहिती मिळाते का ते.
पण कम्युनिस्टांनी 'एक अध्यक्ष' न ठेवणे हे त्या विचारसरणीशी मिळतेजुळते वाटते एवढे मात्र खरे.
भाजपा
भाजपाचे विकीपान या माहितीने अद्ययावत केले आहे.
@अदिती: तु विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर (भाजपा अध्यक्षाच्या निवडणुकीत कोण मतदान करते) तेही त्यात समाविष्ट केले आहे.
या व्यतिरिक्त भाजपाची घटना या दुव्यावर वाचता येईल
लेखाचा उद्देश समजला. आपण
लेखाचा उद्देश समजला. आपण मेहनतीने तो लिहीला आहे. राजकीय कार्य करणार्याला उमेदवारीच्या वेळी उपयोगी यावा.
(किती राजकीय व्यक्तींना त्यांच्या स्व:ताच्या पक्षाची रचना माहीत असेल?)