ध्यान.. एक अनुभव.

काही दिवसांपूर्वी ‘ध्यान’ या विषयावर काही चर्चा वाचायला मिळाली. साधारण तीन वर्षापूर्वी मी एक वैद्यकीय सहाय्य म्हणून प्रथमच ध्यानाची प्रॅक्टिस सुरू केली. त्याचे मला अनपेक्षित आणि अत्यंत परिणामकारक रिझल्ट्स मिळाले. या अनुभवातून या विषयाचा काही अभ्यास केला तेव्हा ही माहिती मिळाली.
अध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टीने ध्यान हे एक श्रेष्ठ साधन मानले जाते. याची आणखी एक बाजू म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनेसुद्धा ध्यान अतिशय उपयुक्त सिद्ध झाले आहे. विशेषत: मनोकायिक (Psychosomatic) म्हणजे टेन्शनमुळे उद्भवणाऱ्या दुखण्यासाठी ध्यान हा एक परिणामकारक उपाय असल्याचे आढळले आहे.
नियमित ध्यानाने निरामय आरोग्य व मानसिक स्वास्थ्य लाभते, याला विदेशी अभ्यासकांनीही मान्यता दिली आहे. डोकेदुखी, पाठदुखी, अंगदुखी, शरीराच्या कोणत्याही अकारण भागात होणाऱ्या वेदना अशा किरकोळ दुखण्यांपासून पासून ते उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह अशा गंभीर विकारांवरसुद्धा नियमित ध्यान करणे लाभकारक ठरते. काही दिवसापूर्वी ‘New American Scietists journal’ मधील लेखाचा काही भाग वाचनात आला. त्यावरून एका प्रयोगाची माहिती मिळाली. आपल्या शरीरात DHEA नावाचे संप्रेरक तयार होत असते, जे शरीराची झीज रोखणे किंवा तारुण्य राखण्याचे काम करत असते. या प्रयोगात साठ लोकांचे DHEA तपासले. नंतर यापैकी तीस लोकांकडून तीन महिनेपर्यंत रोज दोन वेळा अर्धा अर्धा तास ध्यान करवून घेतले. यानंतर पुन्हा DHEA तपासणी केली असता असे आढळले की ध्यान न करणाऱ्या लोकांची DHEA लेव्हल तीच राहिली परंतु ध्यान करणाऱ्यांच्या DHEA पातळीत २२ ते २७ टक्के वाढ झाली आहे अन हे लोक पूर्वीपेक्षा जास्त आनंदी, उत्साही झाले आहेत.
शरीरातील सर्व व्यापाराचे नियमन आपले अंतर्मन करीत असते. याचे उदाहरण म्हणजे संमोहित केलेल्या व्यक्ती आश्चर्यकारक कृत्ये करू शकतात. मी पाहिलेल्या एका संमोहन प्रयोगात एक कृश तरुण संमोहित केल्यानंतर त्याच्या दुप्पट वजनाच्या व्यक्तीचा भार आपल्या ताठ केलेल्या शरीरावर सहज पेलू शकला. हे सध्या होण्याचे कारण म्हणजे अंतर्मनाचे शरीर-व्यापारांवरील नियंत्रण.
ध्यान म्हणजे अंतर्मनाच्या शक्तीना खुले करणे, शरीरात वाव देणे. शरीरव्यापार नियंत्रित करणे, हेही अंतर्मनाचे एक कार्य असल्याने ध्यानाचा आरोग्यास फायदा न झाला तरच नवल. अलीकडे संमोहन उपचार पद्धतीला मान्यता मिळाली आहे अन त्याचे विलक्षण परिणामही दृग्गोचर होत आहेत. अर्थात यातही विश्वासार्हता हा विषय आहेच. ध्यान आणि संमोहन यात पुष्कळच फरक आहे. मुख्य फरक म्हणजे संमोहनात अंतर्मनाला सूचना दिल्या जातात, ध्यानात अंतर्मनाला फक्त मुक्त केले जाते..
सर्वसाधारणपणे चांगली झोप झाली की आपण उत्साही व ताजेतवाने होतो. शरीरातील बारीक सारीक वेदना, चांगली व पुरेशी झोप झाल्यावर नाहीशा होतात. शरीर एखाद्या बॅटरीप्रमाणे चार्ज होते. असे समजले जाते की २०-२५ मिनिटाचे ध्यान हे आठ तासांच्या झोपेइतके पूरक आहे.
आपल्या मेंदूमधून सतत एक विशिष्ठ प्रकारच्या लहरी उत्सर्जित होत असतात. त्यावरून आपल्या दैनंदिन स्थितींचे चार प्रकार पडतात. अल्फा, बीटा, थिटा व डेल्टा.
आपण आरामात विश्रांती घेत असताना किंवा निवांत असताना मेंदूलहरींची कम्प्रता ९ ते १४ हर्ट्झ असते. या काळात शरीर स्थिर असले तरी मन कार्यरत असते. तुरळक विचार सुरु असतात. ही अल्फा अवस्था.
दैनंदिन कामे करत असताना मन अन शरीर दोन्ही कार्यरत असतात. या अवस्थेत मेंदूलहरींची फ्रिक्वेन्सी १५ ते ४० हर्ट्झ असते. ही बीटा अवस्था. या अवस्थेत आपले शरीर व मन पूर्ण कार्यक्षम असतात.
आठ तासांच्या झोपेमध्ये प्रत्यक्ष गाढ झोपेचा काळ काही मिनिटांचाच असतो. या काळात मेंदूमधून निघणाऱ्या लहरींची कम्प्रता (फ्रिक्वेन्सी) १ ते ४ हर्ट्झ असते. या अवस्थेला डेल्टा अवस्था म्हणतात. ही गहन विश्रांती अवस्था. आठ तासांच्या झोपेमध्ये आपण पाउण ते एक तासाच्या आवर्तनांनंतर २ ते ४ मिनिटे डेल्टा अवस्थेत जात असतो.
झोपेच्या इतर वेळात मेंदूच्या लहरींची फ्रिक्वेन्सी ५ ते ८ हर्ट्झ असते. ही थिटा अवस्था असते. या अवस्थेत स्वप्ने पडतात. पण शरीर पूर्णता: शिथिल नसते. संमोहित केलेली व्यक्ती थिटा अवस्थेत असते.
ध्यानाची खोल अवस्था (Deep Meditation State ) ही डेल्टा अवस्था असते. म्हणजेच शरीर व मन पूर्ण विश्रांती अवस्थेत असते. चयापचय क्रिया जवळजवळ शून्य असते. म्हणून जितका वेळ ही अवस्था टिकून राहील तितका वेळ शरीराला अन मनाला गहन विश्रांती मिळते.
पूर्ण विश्रांती देणारी झोप ही किमयागार आहे. अशा झोपेमध्ये शरीराची झीज भरून काढली जाते. सर्व पेशींना रिसेट केले जाते. शरीरातील सर्व अनियमितता जसे की हृदयाचे स्पंदन, रक्ताभिसरण, जखमा भरून येणे, वेदना शमन हे नियमित व नियंत्रित केले जाते. म्हणून कोणत्याही दुखण्यामध्ये झोपेचे औषध दिले जाते.
शास्त्रशुद्ध ध्यान केल्यावर (व ते व्यवस्थित जमल्यावर ) २५ मिनिटांच्या ध्यानामध्ये सुमारे १० ते १५ मिनिटे शरीर पूर्ण शिथिल अवस्थेत राहते. त्यामुळे एक संपूर्ण झोप झाल्याचे फायदे मिळतात. दिवसातून दोनदा ध्यान केल्यास झोपेची गरजसुद्धा कमी होते. यामुळेच योगी केवळ २-३ तास किंवा त्यापेक्षाही कमी झोप घेऊनही कार्यक्षम राहू शकतात.
अष्टांगयोगामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान अन समाधी या योगाच्या आठ अंगांचे विश्लेषण केले आहे. ध्यान हे त्यापकी एक अंग म्हणजे भाग आहे. सर्वच आठ भाग आचरणे सामान्य व्यवहारी जीवनात अशक्य आहे. तथापि योगासने, प्राणायाम अन ध्यान या तीनच अगांच्या आचरणाने सुद्धा आरोग्याचे अपरिमित लाभ झालेले दृष्टीपत्थात आले आहे.
(क्रमश: )
धन्यवाद ऋषिकेश. माझ्या मते
धन्यवाद ऋषिकेश.
माझ्या मते ८-१० तास झोप झाल्यानंतरसुद्धा ध्यान केल्यास विश्रांतीव्यतिरिक्त इतर फायदे मिळू शकतात.
जसे की DHEA मध्ये वाढ, आरोग्याची अनियमितता दूर होणे इ.
सामान्यतः ८-१० तास झोप घेणार्या व्यक्तींही हृदयविकार, अनियमित रक्तदाब यांचा विरोध करू शकत नाहीत असे दिसते. या अनियमितता ध्यानाने नियमित होतात, असा अनुभव आहे.
ध्यान
लेख आवडला. ध्यानामुळे शारीरिक फायदे कदाचित सर्वांनाच जाणवत नसतील पण मानसिक फायदे जाणवलेले अनेक लोक आजुबाजूला दिसतात.
ध्यान धरणे/करणे म्हणजे केवळ श्वासोच्छवासावर लक्ष एकाग्र करणे की त्याची काही शास्त्रोक्त विधी आहे? शास्त्रोक्त विधी असल्यास ती कोठे शिकायला मिळेल? आपण स्वतःच कुठेतरी वाचून घरीच ध्यानाचा प्रयत्न केला आणि ती विधी चूक असल्यास त्याचा काही विपरीत परिणाम होतो का?
काही शंका
मला अंतर्मनाबाबत काही शंका आहेत.
१. कृश तरूणाने आठ तास स्वतःच्या वजनाच्या दुप्पट वजन उचललं. मानवी शरीरातल्या स्नायूंमधे मुळात एवढी शक्ती असते का? आठ तासांनंतर त्याच्या स्नायूंवर काय परिणाम झाला होता?
२. "आपल्या मेंदूमधून सतत एक विशिष्ठ प्रकारच्या लहरी उत्सर्जित होत असतात." या लहरींचं स्वरूप काय असतं? विद्युतचुंबकीय, ध्वनी लहरी ही काही उदाहरणं झाली. या मेंदूजन्य लहरी माध्यमांशिवाय पसरतात का नाही? या लहरी कशा मोजतात?
३. मधुमेहाबद्दल ही बातमी वाचनात आली. ध्यान शारीरिक 'श्रमां'मधे मोजायचं का मानसिक?
अदिति, १. कृश तरूणाने आठ तास
अदिति,
१. कृश तरूणाने आठ तास स्वतःच्या वजनाच्या दुप्पट वजन उचललं
मी माझ्या लेखात 'आठ तास' असं लिहिलं नाही कारण मी पाहिलेल्या प्रयोगात त्याने वजन सुमारे पाच मिनिटे उचलले होते. यामध्ये स्नायूंच्या मर्यादा विचारात घेतल्या जाव्यात. कोणत्याही भौतिक वस्तूला मर्यादा असतेच.
२. मेंदू-लहरी या विद्युत चुंबकीय आहेत. मेंदू-लहरींबद्दल मी साधारण दोन वर्षापूर्वी अभ्यास केला होता. तो लेख माझ्या मेल-बॉक्स मध्ये कुठेतरी असेल. तो मिळाल्यावर तुला पोच करेन. तोपर्यंत याविषयी या दोन लिंक्स देते आहे.
http://www.doctorhugo.org/brainwaves/brainwaves.html
http://www.web-us.com/brainwavesfunction.htm
'आठ तास' ही माझी वाचनातली
'आठ तास' ही माझी वाचनातली चूक.
पण त्यानंतर स्नायूंवर किती ताण आलेला होता, पुढे स्नायूंना किती त्रास झाला, मुळात तो कृश दिसणारा तरूण रोज किती व्यायाम करत असे वगैरे गोष्टी विचारात घेतल्या जाव्यात. यातलं काही माहित नसेल आणि/किंवा जाहीर करत नसतील तर हातचलाखी यापलिकडे या प्रयोगांना किती किंमत द्यायची?
लिंका वाचते आहे, धन्यवाद.
धन्यवाद अदिती.
मी जोपर्यंत हा प्रयोग Mass Hypnotism मध्ये पाहिला होता तोपर्यंत माझाही असाच समज होता की ही नजरबंदी किंवा चलाखी आहे. पण लेखात वर्णन केलेला प्रयोग हा काहीसा खाजगी म्हणजे २० लोकांच्या बॅचपुरता मर्यादित होता, जे लोक स्वेच्छेने फी भरून चार दिवसांच्या कोर्सकरीता आले होते. हे सर्व माझ्यासारखेच व्यावसायिक होते.
सदर कृश तरुण प्रोफेसर होता व त्याने जाताना आपला पत्ता व फोन नंबर मला दिला आहे. त्यानेही हा अनुभव अविश्वसनीय असल्याचे सांगितले. मी हा प्रयोग फक्त दोन फुटांवरून पाहिला.
संमोहन हे संशोधनावर आधारित नसून अनुभव व परिणामांनी विकसित झालेले शास्त्र/शस्त्र आहे. मी स्वत:ही सामोहानाचा अनुभव घेतला आहे. आधी मीही पूर्ण रिलक्टंट होते. पण एकदा अनुभव घेतल्यावर मी त्याचे परिणाम नाकारू शकले नाही.
ध्यान आणि योगविद्येतील
ध्यान आणि योगविद्येतील 'प्राणायाम आणि शवासन' हे सारखेच आहेत का?
मी काही वर्षांपूर्वी योग शिकले (छोटा कोर्स केला) त्यात, शवासन म्हणजे 'कॉन्शियस रेलॅक्सेशन' आणि प्राणायाम म्हणजे 'कॉन्शियस ब्रीदिंग' असे सांगितले होते. आपण सर्वसाधारणपणे श्वसन करतो तेव्हा ते आपल्या मनस्थिती प्रमाणे नियंत्रित होते. त्यामुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा कधी कधी होत नाही आणि डोकेदूखी किंवा तत्सम विकार जडतात. लक्षपूर्वक श्वसन केल्यास ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होतो आणि आपल्याला ताजेतवाने वाटते. शवासनात शरिराच्या प्रत्येक भागाला जाणीव पूर्वक शिथिल केले जाते.त्याने रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायूंना आराम मिळतो आणि आपल्याला ताजेतवाने वाटते.
ध्यान म्हणजे हेच किंवा असेच काही असे सुचवायचे असल्यास संमोहनाच्या उदाहरणामुळे गोंधळ होतो आहे. "शरीरातील सर्व व्यापाराचे नियमन आपले अंतर्मन करीत असते." या वाक्याला पुष्टी देणारे आणखीन चांगले उदाहरण आहे का?
लेख चांगला आहे पण थोडी आणखीन शिस्तबद्ध मांडणी हवी होती. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...
ऋता,
प्राणायाम अन शवासन हे पूर्णत: वेगळे आहेत. प्राणायामात श्वासाची गती कमी अथवा जास्त केली जाते, म्हणजेच नियंत्रित केली जाते. तर शवासनात ती संथ अन नियमित होते, मुद्दाम नियंत्रित करायची नसते.
पुन्हा ध्यान अन शवासन यातही फरक आहे. शवासनात टू म्हणतेस तसे शरीराचे शिथिलीकरण केले जाते. ध्यानामध्ये प्रथम शरीराचे शिथिलीकरण अन नंतर मन एकाग्र केले जाते. मनाला महत्व जास्त आहे. श्वासांच्या सहय्याने प्राण अन प्राणांच्या सहाय्याने मन नियंत्रित केले जाते.
अंतर्मनाच्या शरीर-व्यापारांवरील नियंत्रणाची अनेक उदाहरणे देता येतील.
आपण झोपलो अथवा बेशुद्ध झालो तरी रक्ताभिसरण, हृदयस्पंदन, अन्नपचन या क्रिया थांबत नाहीत. कारण त्या अंतर्मनाच्या कार्यक्षेत्रात आहेत. आपण बाह्यमनाने त्यांच्या हस्तक्षेप करू शकत नाही. तथापि काही योगी ते करू शकतात, अशी उदाहरणे आहेत. अर्थात प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय हे विधान करणे धाडसाचे ठरेल. पण ते शक्य आहे असे माझे मत आहे. मी अनुभवलेल्या प्रयोगात माझ्या हृदयाच्या ठोक्यांची गती मी कमी-जास्त करू शकले होते..कोणत्याही शारीरिक हालचालीशिवाय !
आणखी एक उदाहरण म्हणजे आपल्यापैकी पुष्कळांना अनुभव आला असेल की रात्री झोपताना आपण मनाला सूचना दिल्या की पहाटे अमुक वाजता उठायचे आहे, तर आश्चर्यकारकरित्या आपल्याला बरोबर त्या वेळी जाग येते. काही वेळा एखाद्या असाध्य दुखण्यातून केवळ मानसिक बळावर पूर्ण बरे झालेल्या लोकांचीही उदाहरणे आहेत.
अधिक माहिती पुढच्या भागात देत आहे.
रक्ताभिसरण, हृदयस्पंदन,
रक्ताभिसरण, हृदयस्पंदन, अन्नपचन या क्रिया थांबत नाहीत. कारण त्या अंतर्मनाच्या कार्यक्षेत्रात आहेत.
हे अंतर्मनाचे कार्यक्षेत्र ?
ध्यान म्हणजे मन स्थिर करणे अथवा केंद्रीत करणे. मग समजा संगीत ऐकत असताना, अथवा वाचन करत असताना मला तोच अनुभव येत असेल तरी देखील वेगळे 'ध्यान' करण्याची आवश्यकता आहे का?
जाणिवपूर्वक श्वासोच्छवास करण्याचे काही फायदे जरूर आहेत, पण एखादा आजार बरा करण्यासाठी याचा कसा उपयोग होऊ शकतो, हे कळले नाही. कारण फक्त ध्यान केल्याने मनोधैर्य वाढत असेल असे वाटत नाही.
एखाद्या असाध्य दुखण्यातून केवळ मानसिक बळावर पूर्ण बरे झालेल्या लोकांचीही उदाहरणे आहेत.
या वाक्यातील 'केवळ मानसिक बळावर' हे अजिबात पटले नाही.
मनीषा,
अंतर्मनाचे कार्यक्षेत्र अफाट आहे. वरील गोष्टी या त्यापकी काही थोड्याच आहेत.
संगीत ऐकताना अगर वाचन करताना एकाग्रता येते ही गोष्ट खरी. तिला आपण ‘धारणा’ म्हणू शकू. पण ती शून्यावस्था नसल्याने तिला ध्यान म्हणणे धाडसाचे ठरेल.
तसेच जाणीवपूर्वक श्वासोच्छ्वास म्हणजे ध्यान नव्हे...ती तर शून्यावस्थेकडे जाण्याची एक पायरी आहे. तर श्वासाच्या जाणीवेवर लक्ष केंद्रित करून आस्तेआस्ते नेणीवेमध्ये स्थित होणे हे ध्यान.
ध्यानाने मनोधैर्य वाढते असा अनुभव नाही. मात्र निर्णयशक्ती, सहनशक्ती, धारणेची दृढता वाढते तसेच जाणिवेची व्याप्ती वाढते असा अनुभव आहे.
केवळ मनोबलावर दुखणे बरे होते असा मी दावा करत नाही. तथापि, माझ्या पाहण्यात काही उदाहरणे अशी आहेत की डॉक्टरी उपायांनी हार मानल्यानंतर एकाएकी पेशंटच्या मनानेच उचल खाल्ली अन ते बरे झाले. हे अंतर्मनाचे कार्य . याची अनुभवाशिवाय जाणीव देणे कठीण आहे. मी मला आलेल्या अनुभवांवर आधारित लिहिले आहे अन त्यामागच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न/अभ्यास यांचा परिपाक.
सुंदर लेख
स्नेहांकिता,
ध्यान, योग, प्राणायाम याचे शरीराचे विज्ञान समजून घेण्यासाठी बर्याच जणांना जड जाते.
विज्ञानवाद्यांना अध्यात्म सहसा पटत नाही. पण येथे अध्यात्म हा नंतरचा मुददा आहे.
पण ध्यानाची वैज्ञानिक बैठक काय हे तुझ्या लेखामुळे अगदी छानपैकी कळून येत आहे.
या विषयावर अजून लेखन कर ही आग्रहाची विनंती.
अनुभवाच्या कसोटीवर घासून सिद्ध झालेली कोणतीही गोष्ट मला पटते. त्यामुळे तुझ्या या खास लेखाचे महत्त्व माझ्यासाठीही खासच आहे :)
चर्चेचा रोख
ध्यानाचा फायदा आहे ह्यावर दूमत नसले तरी त्यासंबंधी केलेल्या दाव्यांमुळे/विधानांमूळे त्याच्या खरेपणाबद्दल शंका उत्पन्न होत आहे, ध्यानावर (transcendental meditation) अनेक संस्था अभ्यास करीत आहेत, प्राथमिक चाचणीत ध्यानाचे फायदे लक्षात येत आहेत, त्याबद्दल तुम्ही तुमच्या लेखात थोडे सांगितले आहेच.
काही वेळा एखाद्या असाध्य दुखण्यातून केवळ मानसिक बळावर पूर्ण बरे झालेल्या लोकांचीही उदाहरणे आहेत.
तुम्ही शक्यतो तांत्रिक माहिती व अनुभवाबद्दल अधिक सांगितल्यास चर्चेचा रोख वेगळ्याच शंकांकडॅ वळणार नाही.
लेख आवडला. व्यवस्थित (८ ते १०
लेख आवडला.
व्यवस्थित (८ ते १० तास) झोप मिळत/घेत असल्यास ध्यान करण्याची गरज नसते असा (माझा) समज आहे. हे कितपत योग्य आहे?