पथ्य

(सूचना: हा लेख यू.स. लेटर अाकाराची नऊदहा पानं भरतील इतका मोठा अाहे.)

डग न्यूफरच्या 'Never Again' या कादंबरीची सुरुवात अशी होते:

When the racetrack closed forever I had to get a job. Want ads made wonderlands, founding systems barely imagined. Adventure’s imperative ruled nothing could repeat. Redirections dictated rigorously, freely. Go anywhere new: telephone boiler-rooms, midnight grocery shooting galleries, prosthetic limb assembly plants, hazardous waste-removal sites; flower delivery, flour milling, million-dollar bunko schemes. Do anything once; then, best of all, never again.

यावरून अर्थबोध होतो की कादंबरीचा नायक रेसट्रॅकवर काम करत असे, पण आता तो बंद पडल्यामुळे त्याला नवीन नोकरी शोधावी लागणार आहे. त्याने स्वत:वर असा निर्बंध घालून घेतलेला आहे की कसलंही काम चालेल, पण जे एकदा केलं ते पुन्हा करायचं नाही.

पुढे कादंबरीच्या आठव्या पानावर असा मजकूर येतो:

Feast-scale repast strews obliviously underneath capletters spelling offense:
FOOD/DRINK/SMOKE PROHIBITED
Compu-copiers interdict room-shared snacking, superinvoking pristine environeeds. Liberties main office’s papermates indulge’re denied tempstaff, foreman comprehends. Delight pollutes guilt. Deficient wage’s squandering ennobles unselfishness.

Solidarity enhances morale, reinstigates saltmine spelunkering. “Harrumph!” toe-tapped designating.

Evidence condemns ex-post-facto: styrofoam beads, powdery fingerdust, fleshly smeared formica, breathable sweetened atmospherous particulata. Airblown contaminators doubtlessly windvade mechanisensors, altering delicate chemistries.
She’s correct. Wienerking’s hotdogging endangers operational sensitivities.

“Sorry.”

“Xerox specifically warned, contami–”

“Mea culpa.”

Abject groveling unsettles wrath.

यातून मला थोडंफार जे समजलं ते असं: नायक एका अॉफिसात टेंपररी काम करतो आहे. तिथल्या झेरॉक्स मशीनवर 'इथे काही खाऊपिऊ नये किंवा धूम्रपान करू नये' अशा अर्थाची सूचना आहे, पण तरीही तो आणि त्याचे मित्र जवळ उभे राहून पिठीसाखरेत घोळवलेले डोनट्स किंवा अशासारखं काहीतरी खातात. अॉफिसात कायम झालेल्या लोकांनी असं केलं तर काणाडोळा होतो, पण टेंपररी लोकांना तशी सूट नाही. हवेतल्या गोड वासामुळे आणि फर्निचरवरच्या डागांमुळे हा प्रकार उघडकीला येतो, आणि अॉफिसातली सेक्रेटरी त्यांच्यावर खेकसते. खाण्याच्या पदार्थांचे बारीक कण मशीनमध्ये जाऊन ते बिघडू शकतं, तेव्हा तिचं म्हणणं बरोबर आहे. पण नायक एकदम चूक कबूलच करून टाकतो, आणि तो असा सपशेल शरण आल्यामुळे तिला आपल्या रागाचं काय करावं ते कळत नाही.

हा अर्थ शोधून काढणं इतकं त्रासाचं का आहे याचं उत्तर कादंबरीच्या शीर्षकात, आणि वर उद्धृत केलेल्या पहिल्या उताऱ्यात मिळतं: Adventure’s imperative ruled nothing could repeat. . . . Do anything once; then, best of all, never again. कादंबरी लिहिताना लेखकाने स्वत:वर असा निर्बंध घालून घेतलेला आहे की एकदा वापरलेला शब्द पुन्हा वापरायचा नाही. उदाहरणार्थ, 'job' हा शब्द एकदा येऊन गेल्यानंतर तसाच्या तसा पुन्हा कुठेही येऊ शकत नाही. (पण 'jobhunt, jobcaster, job-to-job, handjobber' अशा वेगळ्या स्वरूपांत तो वापरायला लेखकाने स्वत:ला मुभा दिलेली अाहे. अर्थात हाच निर्बंध सरसकट त्यांनाही लागू होतो; म्हणजे 'jobcaster' हा शब्द पान १९ वर एकदा येतो अाणि नंतर नाही.)

लेखकाने संपूर्ण कादंबरी नायकाच्या तोंडी घातलेली आहे. तिच्या पहिल्याच वाक्यात 'I' हा शब्द वापरून संपवल्याची त्याने जबरी किंमत मोजलेली आहे. 'मी अमुक केलं, किंवा करतो आहे, किंवा करेन, किंवा करू शकेन' असं यापुढे म्हणता येणार नसल्यामुळे 'आधी असं घडतं, मग तसं घडतं' अशी वाक्यरचना सरसकट करावी लागलेली आहे. मध्येमध्ये इंग्रजीव्यतिरिक्त इतर भाषेत ''I' ला समानार्थी असलेला शब्द आणलेला आहे. उदाहरणार्थ, आत्तापर्यंतच्या आपल्या आयुष्याबद्दल इतरांना काय सांगायचं याचा विचार करताना पान ११ वर नायक म्हणतो:

Ego cogitates autobio summation …,

किंवा पान २५ वर, फसवणूक झालेला एकजण संतापून म्हणतो:

Ich bin gefiched.

पण ही क्लृप्ती फार वेळा लढवता येण्यासारखी नाही.

असं लिखाण दुर्बोध होणं साहजिक अाहे. पान १५४ वर हा मजकूर येतो:

Terrified steward headmasters retaliate, backfiring rubberbanded presidents trustworthily minted, impeccably engraved. Trivial airloft diffractions subtract sum divisive multiples; horde-bound hornswoggled proletariat swipes bankdrafts contemptuously. High-handed cowering tossers enrage grabbers. Touchable fluff, denominatored numerically, computes worth’s expirability.

कागदी चलनाच्या संबंधाने काहीतरी सार्वत्रिक घोटाळा झाला, इतपत यातून कळतं (कारण 'rubberbanded presidents' म्हणजे अमेरिकन डॉलर्सच्या नोटांच्या थप्प्या), पण यापेक्षा नेमका अर्थ लावणं निदान मला तरी शक्य झालं नाही. कादंबरी लिहिताना न्यूफरला खूप मजा आली असणार, पण वाचणाऱ्याचा अनुभव तसा नसू शकतो.

एक विशिष्ट भाषिक निर्बंध हेतुपुरस्सर स्वीकारून लिहिणं, याला 'constrained writing' असं म्हणतात; मराठीत याला 'बद्धलेखन' म्हणता येईल. अशा प्रकारचं लिखाण अनेक भाषांत खूप पूर्वीपासून आहे. काही उदाहरणं नमूद करतो.

काही राजपुत्र आणि काही अमात्यपुत्र, असे एकूण दहाजण लहानपणापासून जंगलात एकत्र वाढलेले होते. तारुण्यात आल्यानंतर ते दिग्विजय करण्याकरिता एकत्र बाहेर पडले, पण त्यांची एकमेकांपासून ताटातूट झाली. कालांतराने ते पुन्हा भेटल्यानंतर, त्यांतल्या प्रत्येकाने, आपल्या वाट्याला कोणते प्रसंग आले आणि आपण कोणती साहसं केली याचा वृत्तान्त इतरांना सांगितला. या सर्व कथा मिळून दण्डीची 'दशकुमारचरितम्' ही संस्कृत कादंबरी होते. यांपैकी मंत्रगुप्त ह्या कुमाराने आदली रात्र आपल्या प्रेयसीबरोबर रतिक्रीडेत घालवलेली होती, तिने उत्साहाच्या भरात त्याच्या अोठांचे चावे घेतल्यामुळे ते भप्प सुजलेले होते, आणि एकमेकांवर टेकवले तर दुखत असत. त्यामुळे नाईलाज होऊन, मंत्रगुप्ताने आपला संपूर्ण वृत्तान्त निरोष्ठ्य भाषणातून, म्हणजेच प-फ-ब-भ-म हे अोष्ठ्य वर्ण न वापरता, सांगितलेला आहे.

ही कसरत किती अवघड आहे याचा संस्कृत येत नसल्यामुळे मला पक्का अंदाज नाही. (स्वत:चं नाव उच्चारता न येणं ही काही मोठी अडचण नाही.) मात्र असा एक विनोद मी ऐकलेला अाहे की, प्रत्येक संस्कृत शब्दाचे पाच अर्थ होतात: नेहमीचा सरळ अर्थ, त्याच्या विरुद्ध अर्थ, कुठल्यातरी देवतेचं नाव, एका संभोगासनाचं नाव अाणि हत्ती. यात जर तथ्य असेल तर अोष्ठ्य वर्ण वापरायला मज्जाव असूनही जे म्हणायचं आहे ते म्हणणं फारसं अवघड होऊ नये.

ठराविक अक्षरं किंवा अक्षरसमूह लिखाणातून वगळणं अशाप्रकारचा निर्बंध बद्धलेखनात पुष्कळदा वापरला जातो. अशा लेखनाला 'लिपोग्रॅम' म्हणतात (प्राचीन ग्रीकमध्ये λειπω = वगळणे, आणि γραμμα = अक्षर). मराठीत याला विनोबी लेखन म्हणता येईल, कारण विनोबा भाव्यांना नेहमीच्या जेवणातले अनेक पदार्थ चालत नसत. अशा प्रकारचं आणखी एक उदाहरण पाहा:

Gadsby and Lucy had much curiosity in watching what such crashing music would do to various animals. At first a spirit akin to worry had baboons, gorillas, and such, staring about, as still as so many posts; until, finding that no harm was coming from such sounds, soon took to climbing and swinging again. Stags, yaks and llamas did a bit of high-kicking at first; Gadsby figuring that drums, and not actual music, did it. But a lilting waltzing aria did not worry any part of this big zoo family; in fact, a fox, wolf and jackal, in a quandary at first actually lay down, as though music truly “hath charms to calm a wild bosom.”

At Gadsby’s big aquarium, visitors found not only fun, but opportunity for studying many a kind of fish not ordinarily found in frying pans; and, though in many lands, snails form a popular food, Lucy, Sarah and Virginia put on furious scowls at a group of boys who thought “Snails might go good, with a nut-pick handy.” (But boys always will say things to horrify girls, you know.) And upon coming to that big glass building, with its boa constrictors, alligators, lizards and so on, a boy grinningly “got a girl’s goat” by wanting to kiss a fifty-foot anaconda; causing Lucy to say, haughtily, that “No boy, wanting to kiss such horrid, wriggly things can kiss us Branton Hills girls.” (Good for you, Lucy! I’d pass up a sixty-foot anaconda, any day, for you.)

रोमन लिपीतल्या सव्वीस अक्षरांपैकी 'e' हे अक्षर इंग्रजीमध्ये सर्वांत जास्त वेळा वापरलं जातं. (हे प्रमाण अंदाजे १०-१२% आहे, याचा अर्थ सरासरी नऊ अक्षरांमागे एकदा 'e' येतो.) अर्नेस्ट राईट या लेखकाने एकदाही 'e' न वापरता लिहिलेल्या 'Gadsby' या कादंबरीतून हा उतारा घेतलेला आहे. मागचा संदर्भ असा की, ब्रँटन हिलस् (Branton Hills) नावाच्या एका लहान गावामध्ये तिथला महापौर जॉन गॅड्सबी आपल्या पुढाकाराने एक प्राणीसंग्रहालय सुरू करतो. त्याच्या उद्घाटनाच्या वेळी गावच्या बँडने मोठमोठ्याने गाणी वाजवून गोंगाट करताच प्राण्यांची प्रतिक्रिया काय होते हे या उताऱ्यात सांगितलेलं आहे.

एकूण परिस्थिती पाहता या प्राणीसंग्रहालयात काही त्रुटी राहून जाणार हे उघड आहे, कारण तिथे tiger, chimpanzee, elephant हे प्राणी कधीच आणता येणार नाहीत. पण याची भरपाई अन्यत्र झालेली आहे. एकतर तिथे ticket booth नसल्यामुळे प्रवेश विनामूल्य असणार. दुसरं असं की, अनाकोंडा या सापाची लांबी सर्वसाधारणपणे पंधरावीस फुटांपेक्षा जास्त नसते हे जरी खरं असलं, तरी या कादंबरीतल्या अनाकोंडाची लांबी मात्र seven ते twenty-nine या दरम्यान कुठेच असू शकणार नाही; तेंव्हा लेखकाने असा विचार केला असावा की कमीतकमी तीस फूट जर हवी, तर ताणून पन्नासच करायला काय हरकत आहे?

जर लेखकाने 'e' ऐवजी 'x' किंवा 'z' अशासारखं अक्षर वगळायचं ठरवलं असतं, तर ते इतकं आव्हानात्मक ठरलं नसतं. बद्धलेखन करणं हे कुत्र्याला फिरायला घेऊन जाण्यासारखं असतं. पॉमेरेनियनला हवं तिथे नेता येतं, पण अल्सेशियन तुम्हालाच घेऊन जातो.

हा वगळलेला अक्षरसमूह बराच मोठा असू शकतो. क्रिस्तियन ब्योक या लेखकाच्या Eunoia या पुस्तकात, इंग्रजी लिखाणामधल्या A,E,I,O,U या पाच स्वरांना अनुसरून पाच भाग (chapters) आहेत, आणि 'Chapter §' मध्ये फक्त § हा एकच स्वर वापरलेला आहे. उदाहरणार्थ, Chapter I ची सुरुवात अशी होते:

Writing is inhibiting. Sighting, I sit, scribbling in ink this pidgin script. I sing with nihilistic witticism, disciplining signs with trifling gimmicks – impish hijinks which highlight stick sigils. Isn't it glib? Isn't it chic? I fit childish insights within rigid limits, writing shtick which might instill priggish misgivings in critics blind with hindsight.

हे बद्धलेखन या विषयावरचं बद्धलेखन आहे.

दण्डी, राईट किंवा ब्योकने स्वीकारलेले निर्बंध अक्षरांच्या पातळीवर आहेत, तर न्यूफरचा निर्बंध शब्दांच्या पातळीवर आहे. निर्बंध कशा प्रकारचा असावा याबद्दल काही निश्चित नियम नाहीत. 'मी शार्दूलविक्रीडितात सुभाषित रचीन', किंवा 'मी तळकोंकणाच्या पार्श्वभूमीवर कादंबरी लिहीन', किंवा 'मी हॅम्लेट मराठीत आणीन', अशासारखे निर्बंध अतिपरिचयामुळे उठून दिसत नसतील, पण तरीही ते अस्तित्वात असतातच. बद्ध नाही असं लेखन नाही.

केवळ वारा

स्थळ: सह्याद्रीच्या कुशीतलं धुळसर खेडं. मुक्काम पोस्ट अगावे, तालुका नांदोली.

वेळ: दिवेलागणीची.

पात्रपरिचय: शिवारातले काबाडकष्ट उरकून गावदेवीच्या मंडपात विसावलेले पाचपंधरा घामट फाटके कुणबी. झगझगीत पांढऱ्या खळणी कपड्यांत फताड्या अनवाणी पावलांनी अवतीभोवती येरझाऱ्या घालणारे कुर्रेबाज कुलकर्णी गुरुजी.

अबोल वातावरण. मजूर काळजीपूर्वक तंबाखू चघळताहेत. मास्तरांच्या खाकरण्याने शांततेला तडा जातो. चालू भादवा सरताच पुढला महिना अश्विन; तेंव्हा नवरात्राची कायकाय तयारी करायची, खर्च केवढा येईल, दरडोई किती वर्गणी काढायची यावर सांगोपांग चर्चा घडवण्याची त्यांना खुमखुमी चढलेली दिसते. हा संभाषणविषय निघताच कष्टकरी वर्ग दचकतो. सर्वत्र अस्वस्थता पसरते.

"पैसेच नाहीत गाठीला," सुभान्या पुटपुटला. बाकीच्यांनी विशेष चिकित्सेत पडण्याऐवजी घुमेपणाने रुकार भरला.

"गाडग्यामडक्यांत साठवलेला खुर्दा बाहेर अाणा!" शालाध्यापकांचा साळसूद सल्ला.

"छ्या! कसला चंदा?! इथं छापाकाट्याला ढब्बू सापडायची पंचाईत," बारकू उत्तरला.

"बचत शिल्लक टाकली तर चोरीची भीती वाटते. कमावलेलं उडवलं की जोखीम मिटली!" धनूने खुलासा मांडला.

"हात्तिच्या अायला!" सर गडगडले. "उधळे लेकाचे! सणासुदीसाठी चार चव्वल बाजूला ठेवायचं शहाणपण कुठून सुचणार तुम्हाला?! सतत कानीकपाळी बजावूनही पालथ्या घड्यावर पाणी! "

"होय! सगळं कबूल. पण अामचा नाईलाजच राहतो," लहानू म्हणाला. "ज्या माणसाला तुटपुंजं मिळतं तो समोरचं घशात कोंबणारच." साऱ्यांनी संमतीदर्शक गोलगोल माना डोलावल्या.

"इतकं हावरटपणाने वागून कसं चालेल?" ग्रामशिक्षक उसळून बोलले. "शेतकरड्यांचं पूर्वीपासून व्यवच्छेदक लक्षणच अगदी! दूरदृष्टीच्या नावाने सरसकट बोंब! सरकारनं श्वेतपेशांकडून कर उकळायचा. बळीराजबड्यात कर्जं ढोसायची. वर्षभरात साल्यांच्या काखा वर! रांडीचे केक खाणारही, राखणारही!"

अवघडलेली सामसूम इतस्तत: दरवळली. "यंदा अाषाढात पाऊसच कमी बरसला –" धीर धरून बजाबा उद्गारला.

"हॅ! शर्विलकाच्या उलट्या कंठाळ्या! सदानकदा अवर्षणाचा बहाणा! सोद्यांच्या सवयींच भिकारड्या! सुगी बाजारात पाठवल्यावर अाठवडाभर पुख्खे झोडायचे! दारू प्यायची! नोटा मोडून नाणी घ्यायची! हळूहळू कडकी! फडताळांत ठणठणाट! मडक्यांत खडखडाट! पोटाला फाके! भांडी खरवडून जठर जपायचं! पातेलं वीक, डाग गहाण सोड असले विझोटे धंदे! शेवटी बुडत्याचा पाय खोलात! "

"खरी गोष्ट," जनाबाई किरकिरली. "अाधी पीठ संपतं, नंतर मीठ. मग तांदूळ खलास. फक्त तेलमसाले बक्कळ उरून कोणता उपयोग? स्वयंपाकाचं पेकाटच कचकतं."

मंदिराच्या अावारातल्या तोतऱ्या नळाची टपटप धार सूचकपणे अडखळून थांबली.

"रांधण अर्धंमुर्धंच साधतं. डोळ्यांना खुपतं, चवीला विचित्र भासतं," विठूताईने व्यथा वर्णिली.

"अनैसर्गिक रचना," येश्वदाकाकीने तात्विक पुस्ती जोडली.

"रसना," गंगव्वाने सूक्ष्म दुरुस्ती सरकवली.

"तोंडची वाफच पळते जणू!" चिंधीने वाक्चातुर्य दाखवलं.

"निव्वळ फोडणी प्राशून जेवण असंभाव्य," शिवाने री अोढली. "निरुपाय उद्भवतो. भागवाभागवी अटळ ठरते. अमक्याऐवजी तमकं वापरणं क्रमप्राप्त. रव्याऐवजी खवा, पोफळीऐवजी जायफळ, उदकाऐवजी मादक. शेंगदाण्याअभावी काजूच्या चटणीबरोबर अश्रूंत भिजवून भाकरतुकडा गिळायचा."

"फ्रान्सच्या राणीचा उपदेश मानायचा. पावाऐवजी क्रीमरोल भक्षून उदरभरण उजवायचं," द्रुपदा स्थितप्रज्ञ वृत्तीने वदली.

"चिरगुटांच्या टंचाईपोटी जरतारी शालू नेसायचा!" अावडाक्काच्या मुखातून नवी उत्प्रेक्षा प्रगटली.

उपस्थित स्रीपुरुष पाव घटका श्वास रोखून नि:शब्द स्थिरावले. निरांजनातल्या तुपाची पातळी खालावताच देव्हाऱ्यातली ज्योत विझून सांकेतिक काळोख माजला. डोकं खाजवल्याचे आणि तांबूलसेवनाच्या अपेक्षेने रिकामी चंची चाचपडल्याचे अावाज. दोन हरहुन्नरी इसम परस्परांशी खाणाखुणांनी संवादताना अाढळले.

पंतोजींची प्रश्नचिन्हांकित करारी नजर वर्तुळाकार फिरली. "अाता तोडगा? दुर्गेच्या सेवेला नगदनारायण पाहिजेच!"

सभास्थानी चिंतितभावसंपृक्त सन्नाटा फैलावला.

"वचने च द्रव्ये इव दरिद्रता खलु!" किशीमावशी कुजबुजली.

"मोठी संस्कृत पाजळतेय! मराठीचं दिवाळं वाजलं?!" नामूची कुत्सित विचारणा.

"जवळजवळ!" तुक्याचा खवचट शेरा.

"अख्ख्या वस्तीला इंग्रजी शिकवा टीचर! ममईत नोकरी गावेल, जिभेचीही चणचण निवेल," किस्नाचा भाबडा प्रस्ताव.

"व्हॉट यूज? अाफ्टर समटाईम एनीवे फिनिश, नो?" डगडूचा निराशावादी निर्वाळा.

प्रस्तुत मुद्द्यातील तथ्य जाणवून समग्र जनसमुदाय हताशला.

"अस्तु. भविष्यात धोरणीपणा राबवा," पिंगट बुबुळं चक्राकार हलली. "मी सांगितलेला सुविचार पक्का लक्षात बसवा. अंथरूण पाहून–?!"

समस्त हजर मंडळी गप्प ठाकली. "जखमेवर डाग चोळता?" श्रीपतीची मार्मिक पृच्छा.

धुवट धोतरातला अरेरावी ब्राह्मण वरमला. "ऐका – उद्या तिन्हीसांजेला वडाच्या पारावर भेटू. काटकसरीची संथा पढवतो. कागदपेन्सिलीनं रोजगारीच्या अावकजावकीचा तक्ता व्यवस्थित अाखून दर्शवतो. कीर्दखतावणी –"

यच्चयावत पब्लिकसमूह वैतागला. "चूप खर्डेघाशा! तुझी बाष्कळ चर्पटपंजरी पुन्हा नको," गणूच्या नरड्यातून प्राणांतिक घायकुतीने शब्द फुटले, "एकदाच बास!"

'एकदा वापरलेला शब्द पुन्हा वापरायचा नाही' हा निर्बंध स्वीकारून वरचा उतारा लिहून पाहण्याअाधी मी असं ठरवलं होतं की, 'वापरलेला शब्द' याचा व्यापक अर्थ घ्यायचा. उदाहरणार्थ, 'करूया' आला, तर 'केल्यासारखं, करणे, करशील' इत्यादि शब्द त्यानंतर वर्ज्य मानायचे; किंवा 'मी' येऊन गेल्यानंतर 'मला, माझ्याविषयी, म्या' इत्यादि वर्ज्य मानायचे. अर्थात व्यापक म्हणजे किती व्यापक हे शास्त्रकाट्याची कसोटी लावून ठरवता येईल असा भाषेचा स्वभाव नसतो. 'दस्तुरखुद्द' नंतर 'हातोटी' चालेल की नाही? 'रेगेन्सबर्गची लज्जतदार लिंग्वीनी राजोपाध्ये मॅडमनी जिभल्या चाटत खाल्ली' असं लिहिलं तर चालेल की नाही?

❊ ❊

संदर्भ

• 'Never Again', by Doug Nufer, Black Square Editions, New York, 2004.
(हे पुस्तक या वेबसाईटवर उपलब्ध आहे.)

• 'The Dasakumaracarita of Dandin', (with Various Readings, A Literal English Translation, Explanatory and Critical Notes, and an Exhaustive Introduction), by M.R. Kale, 4th edition, Motilal Banarsidass, Delhi, 1966.

• 'Gadsby' by Ernest Vincent Wright, 1939.
(इथे उपलब्ध.)

• 'Eunoia', by Christian Bök, Coach House Books, 2001.
(इथे उपलब्ध.)

• 'Le Ton Beau de Marot', by Douglas Hofstadter, Basic Books, 1997.
(या पुस्तकाच्या Chapter 5 मध्ये बद्धलेखनावर फार सुरस चर्चा आहे.)

❊ ❊ ❊
field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

___/\___

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असे अजून काही लेख वाचायला मिळाले तर "वाचायचं कसं", किंवा आपण जे वाचतो त्यातलम काय वाचायचं आहे, हे शिकायला मिळेल.
चिपलकट्टींना नियमबद्ध करावे नि दर दोन दिवसाला एक ह्या गतीने अजून काही लेख तगादा लावून त्यांच्याकडून व्यवस्थापनानं लिहून घ्यावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

तुमचे लेख नेहमीच खूप रोचक असतात पण वाचून मला नेहेमी एक प्रश्न पडतो तो म्ह्णजे "भाषेकडे कसे पहायचे?" माझ्या दृष्टीने भाषा हे आशयाचे माध्यम आहे त्यामुळे त्याच्याकडे गणिती दृष्टीकोनातून पाहिले की त्यातून निर्माण होणारे रंजक लालित्य माझ्या नजरेतून हमखास हुकते. अर्थात हे सगळे दृष्टीकोन मेंदूच्या उजव्या आणि डाव्या भागाच्या प्रभावांप्रमाणे बदलतात असे मान्य केले तर या दोन्हीचा समतोल असणारी दृष्टी भाषेकडे पहाताना कशी असावी? असाही विचार नेहेमी येऊन जातो. अशा प्रकारचे लेखन या संस्थळावरच नव्हे तर एकूणच मराठीतच फार कमी झाले असावे. आम्ही कायम "उजव्या मेंदूचे"च रहाणार आहोत हे खरे असले तरी त्याची जाणीव तुमचे लेख वाचून होते त्याबद्द्ल तुमचे अभिनंदन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख वाचून प्रतिक्रिया खरडायला घेता घेता ही प्रतिक्रिया दिसली आणि प्रतिसाद खरडण्याची गरज संपली. केवळ मम म्हणून हे बूच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सध्या केवळ पोच. अनेक थीम्स आहेत या लेखात, सबब प्रतिसादही तसाच लिहीन म्हंतो. मराठी भाषेबद्दल असे लिखाण यावे ही लै दिसांपासूनची इच्छा. ती अंशतः पूर्ण करणार्‍या तुम्हाला लै धन्यवाद!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पोच दिल्यावर गायबलात आपण?
पुड्।म लिहिणार होतात ना काही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

u thr?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

प्रत्येक संस्कृत शब्दाचे पाच अर्थ होतात: नेहमीचा सरळ अर्थ, त्याच्या विरुद्ध अर्थ, कुठल्यातरी देवतेचं नाव, एका संभोगासनाचं नाव अाणि हत्ती.

हा हा हा...

लेख आवडला. तूर्तास इतकंच. उरलेलं सावकाश लिहितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असा प्रयोग सुचला + त्यावर अंमलबजावणी करायचे ठरवले + व ती यशस्वीपणे केली म्हणून खास अभिनंदन!

एक ललित लेखन म्हणून मात्र तितपतच आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेखकाचे एकेक लेख वाचताना त्याला भाषेत लपलेल्या गणिताची ओढ आहे असे दिसते.
हा नवाच प्रयोग पाहून मजा आली. मराठी भाषेत एकूण किती शब्द आहेत याबाबत लेखकाचा काही अंदाज/ माहिती आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

walking talking the author fell mathematics' professor in the end.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रत्येक संस्कृत शब्दाचे पाच अर्थ होतात: नेहमीचा सरळ अर्थ, त्याच्या विरुद्ध अर्थ, कुठल्यातरी देवतेचं नाव, एका संभोगासनाचं नाव अाणि हत्ती. यात जर तथ्य असेल तर अोष्ठ्य वर्ण वापरायला मज्जाव असूनही जे म्हणायचं आहे ते म्हणणं फारसं अवघड होऊ नये.

संदर्भ मिळेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0