मोल्सवर्थ कोश, मोल्सवर्थ आणि कँडी - भाग ४ (अखेरचा).

संपादकः या आधीचे भागः भाग १, भाग २ भाग ३

१८५५ च्या अखेरीस कॅंडी साडेतीन दशकांच्या हिंदुस्तानातील वास्तव्यानंतर प्रकृतीच्या कारणासाठी १५ महिन्यांच्या furlough वर इंग्लंडला जायची तयारी करू लागले. (ह्या आधी ते इंग्लंडला गेल्याचा उल्लेख मला सापडलेला नाही.) पूना कॉलेजची वार्षिक तपासणी आणि विद्यार्थांची परीक्षा बाहेरील त्रयस्थ परीक्षक आणवून घेण्याची जुनीच प्रथा होती आणि कॅंडींचे जे पूर्वीचे अहवाल उपलब्ध आहेत त्यांवरून अशी तपासणी बिनबोभाट पार पडत असे. १८५५-५६ मध्ये तपासणीसाठी कॅ.काउपर (तेव्हा चालू असलेल्या इनाम कमिशनच्या उत्तर विभागाचे कमिशनर, रे.पी ऍंडरसन आणि कॅ.हिल असे तीन परीक्षक आले आणि त्यांचा आणि विशेषत: काउपर ह्यांचा अहवाल कॉलेजच्या शिक्षणाचा दर्जा, विद्यार्थ्यांची तयारी आणि कॉलेजातील नैतिक वातावरण ह्यांच्यावर सडकून टीका करणारा होता. उपलब्ध पत्रव्यवहार पाहता असे जाणवते की कॅंडी ह्यांची सुरुवातीची प्रतिक्रिया अहवालाकडे उपेक्षेने पाहण्याची होती आणि आपले काम उत्तम चालू आहे अशी त्यांची धारणा होती. विक्टोरियन सरकारी कामाच्या भाषेच्या मर्यादेत राहून कॅंडी आणि काउपर ह्यांनी एकमेकावर यथेच्छ वाक्प्रहार केले पण अशा ’तू असे म्हणालास - मी असे म्हणालो’ अशा वादातून दोघांनाहि वार लागतातच. त्यातून कॉलेजातील विद्यार्थी, इतकेच नव्हे तर शिक्षकहि, नैतिकदृष्टया ढिल्या वर्तणुकीचे आहेत असाहि एक आरोप होता आणि काउपर तो आरोप सिद्ध करण्यात यशस्वी झाले. खुद्द कृष्णशास्त्री चिपळूणकर, असिस्टंट प्रोफेसर, हे चोळखण आळीतील राममंदिराच्या शेजारच्या घरातील वेश्येकडे जातात असा आरोप पुण्यातीलच दोन पंडितांनी केला आणि समोरासमोरच्या चौकशीत तो खरा निघाला. परिणामत: कृष्णशास्त्रींना ६ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले. बाळ विष्णुशास्त्री आडकर नावाच्या कारकुनाने बांधकामाच्या हिशेबात रु. ७५ ची अफरातफर केली होती आणि १८५२ साली त्या आरोपावरून कॅंडींनी त्याला नोकरीवरून काढून टाकले होते. मात्र त्याजबरोबर त्याला एक सर्टिफिकेटहि दिले होते. ही कार्यवाही त्याच्या अन्य नोकरी मिळविण्यामध्ये अडसर होऊ नये अशी ती शिफारस होती. बाळ विष्णुशास्त्री आडकर ह्यांनी जेजुरीच्या मराठी शाळेत शिक्षकाची नोकरी मिळावी असा अर्ज केला आणि कॅंडींच्या शिफारशीवर अवलंबून डेप्युटी इन्स्पेक्टर महादेवशास्त्री कोल्हटकर ह्यांनी त्याची तेथे नेमणूक केली. परिणामी गवर्नरने कॅंडी आणि महादेवशास्त्री ह्या दोघांच्याहि बाबतीत नापसंतीदर्शक टिप्पणी केली. विद्यार्थ्यांच्या अनैतिक वर्तनाबाबतहि कॅंडींना दोष लावण्यात आला:

"With regard to the students, a principal, I am directed to remark, can hardly be said to pay sufficient attention to his duties who permits the college building to become a scene of vice and immorality, such as the Governor in Council fears the Poona College too often exhibited. (signed - W. Hart, Secretary to Government, Bombay Castle, 21 January 1857)

ह्या सर्व चौकश्या चालू असतांना कॅंडी काही काळ हिंदुस्तानात आणि नंतर इंग्लंडात विश्रांतीच्या सुटीवर होते. आपला बचाव करण्याचा तेथूनहि त्यांनी प्रयत्न केला पण इकडे सरकारने असा निर्णय घेतला की कॅंडी ह्यांच्यावर एकाच वेळी अनेक जबाबदार्‍या टाकल्या गेल्याने त्यांना कॉलेजकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. ह्यास्तव कॉलेजच्या जबाबदारीतून कॅंडींना मुक्त करावे आणि मराठी भाषांतरकार आणि पुस्तक समितीचा अध्यक्ष ही कामे त्यांच्याकडे ठेवून द्यावीत असा निर्णय सरकारने घेतला. ही आपली पदावनति आहे, नवीन जागेचा पगार पुरेसा नाही अशा अनेक तक्रारी कॅंडींनी केल्या पण सरकार आपल्या निर्णयाला पक्के राहिले. केवळ कॅंडींचा पगार सुपरिंटेंडंट म्हणून होता तितकाच चालू ठेवण्यात आला. अशा रीतीने कॉलेजशी असलेला त्यांचा संबंध काहीशा कटु पद्धतीने संपुष्टात आला. ह्यानंतर भाषांतरकार आणि पुस्तक समितीचा अध्यक्ष ह्या जबाबदार्‍या त्यांच्याकडे उरल्या. ही कामे त्यांनी कशी पार पाडली ह्याची चर्चा पूर्वीच्या भाग ३ मध्ये येऊन गेली आहे. ह्याच काळात कॅंडींनी आपल्या १८४७ च्या इंग्रजी-मराठी कोशाची सुधारित आवृत्तीहि काढली.

कॅंडींनी लिहिलेल्या पुस्तकांची नावे अशी: १) A Dictionary of Murrat,hi and English, Molesworth and Candy Brothers, 1831, २) A Dictionary of Marathi and English, Molesworth and Candy Brothers, 1857, बॉंबे एज्युकेशन सोसायटी छापखाना ३) A Dictionary of English and Marathi, 1847, अमेरिकन मिशन छापखाना, ४) A Dictionary of English and Marathi, 1873, 2nd Ed, गणपत कृष्णाजी छापखाना, ५) नीतिज्ञानाची परिभाषा (The Principles of Morality, D.A.Isdale ह्याचे भाषांतर), १८४८, पूना कॉलेजचा शिळाप्रेस, ६) कर्तव्यकर्माचा विचार (The Principles of Morality, D.A.Isdale ह्याचे भाषांतर), १८५१, पूना कॉलेजचा शिळाप्रेस, ७) वाचनपाठमाला (इंग्रजी गोष्टींचे भाषांतर), १८५०, पूना कॉलेजचा शिळाप्रेस, ८) हिंदुस्तानचे वर्णन (भूगोल, इतिहास, व्यापार इ.) १८६०, गणपत कृष्णाजीचा छापखाना, ९) भूगोलाचे वर्णन, भा. १, १८६३ आणि १८६५, इंदुप्रकाश छापखाना, १०) भाव कोणावर ठेवावा याचा विचार, १८७५, बॉंबे ट्रॅक्ट ऍंड बुक सोसायटी

कॅंडींना कॉलेजपासून विलग करण्यात आले ह्यामुळे काउपर ह्यांना पूर्ण समाधान वाटलेच नसावे. कृष्णशास्त्रींची सहा महिन्यांची निलंबनाची शिक्षा कमी करून चार महिन्यांनंतर त्यांना परत कामावर घेण्यात आले. तेव्हा काउपर ह्यांनी सरकारकडे निवेदन पाठवून कृष्णशास्त्रींच्या वरिष्ठांना काहीच शिक्षा झालेली नसल्यामुळे चार महिने निलंबन ही ’कृष्णशास्त्रींच्या बाबतीतील कारवाई अन्यायाची आहे, सबब त्या चार महिन्यांचा पगार सरकारने त्यांना द्यावा’ अशी मागणी केली. ह्या मागणीच्या समर्थनार्थ त्यांनी लिहिलेला पुढील मजकूर तत्कालीन परिस्थितीचा द्योतक आहे म्हणून येथे उद्धृत करीत आहे:

"But I must now go much further than this, and touch on the ground which I would willingly have avoided. The late professor, and for a time Acting Principal, Mr. Green, while at Poona, always kept a native woman. He did so merely as thousands of others have done, but the fact was well known to all the Poona College, and with this knowledge what is it possible that they can think of the proceedings of such extraordinary severity which have been instituted against the comparatively irresponsible native."

ह्या बाबतीत मात्र सरकारने काउपर ह्यांना फटकारले आणि आपला संबंध नाही अशा बाबीत त्यांनी लक्ष घालू नये असे त्यांना कळविण्यात आले. कॅंडींच्या बाबतीत त्यांना कॉलेजापासून विलग करण्याचा निर्णय घेतल्यावर सरकारने ती जागा ऑक्सफर्ड विद्यापीठातील एडविन अर्नोल्ड ह्यांना देऊ केली आणि पुढीला काही वर्षे अर्नोल्ड हे कॉलेजचे सुपरिंटेंडंट राहिले. भारतीय विचार आणि तत्त्वज्ञानाचा त्यांचा अभ्यास येथून सुरू झाला आणि त्यातून पुढे बुद्धाच्या जीवनावरची Light of Asia ही त्यांची सुप्रसिद्ध दीर्घकृति निर्माण झाली.

१८७६ च्या अखेरीस अधू दृष्टीच्या कारणावरून कॅंडींनी भाषान्तरकर्ता आणि पुस्तक समितीचा अध्यक्ष ह्या आपल्या जागांचा राजीनामा दिला. तत्पूर्वी काही दिवस त्यांच्या आयुष्यभरच्या कार्याची दखल घेऊन सरकारने त्यांना Star of India आणि आपल्या नावामागे CSI ही अक्षरे जोडण्याची पात्रता बहाल केली होती. तदनंतर लवकरच कॅंडी महाबळेश्वर येथे २६ फेब्रुवारी १८७७ ह्या दिवशी निधन पावले. माझ्या समजुतीनुसार १८५५-५६ मधील १५ महिने वगळता हिंदुस्तानात तरुण वयात आल्यानंतर मृत्यूपावेतो सुमारे ५८ वर्षे त्यांनी मराठी भागातच काढली.

थॉमस कॅंडी ह्यांचे चित्र मराठी विश्वकोशात मला मिळाले ते बाजूस चिकटवत आहे. थॉमस आणि जॉर्ज कॅंडी ह्यांच्याबद्दल वैयक्तिक स्वरूपाची थोडीफार माहिती मला जालावर सापडली ती खाली देत आहे.

अ) वडील आणि आई - रॉबर्ट कॅंडी (१७४९-१८१३) आणि ऍन हार्डिंज (१७६६-१८४६)
ब) भाऊ - १) रे. कॅ. फ्रॅन्सिस कॅंडी (१७९८-१८३१ स्लोन येथे), २) रे. चार्ल्स कॅंडी (१८००-१८९०) ३) रे. जॉर्ज कॅंडी ईस्ट नॉयल, विल्टशर १८०४ - ३१ जानेवारी १८६९ बाथ, (पत्नी - मेरी हार्डिंज, ९ मुले), ४) थॉमस कॅंडी (स्वत:), क्र. ३ जुळा भाऊ, ईस्ट नॉयल, विल्टशर १८०४ - २६ फेब्रुवारी १८७७ महाबळेश्वर (पहिली पत्नी - हॅना मरिया जॅकसन १८१० सुमारे - १८३४ मुंबई, मूल नाही, दुसरी पत्नी - कॅरोलिन बॉइस विवाह ११ जानेवारी १८३८ मुंबई, ४ मुलगे आणि ३ मुली) ५) लेफ्ट. हेन्री कॅंडी १८०६ - १८२६ भरतपूरच्या लढाईत मृत्यु.
क) मुलगे-मुली १) कॅ. जॉर्ज हेन्री कॅंडी १८३९ - १८८३ २) मेरी ऍन बॉइस कॅंडी १८४०-१९१० ३) सर एडवर्ड टाउनसेंड कॅंडी ICS १८४५-१९१३ ४) हेन्रिएटा लुइसा कॅंडी १८४८ पुणे - १९२६ ५) चार्ल्स हॅरिसन कॅंडी १८५१ - १९२५ कोल्हापूर ६) जेम्स मोल्सवर्थ कॅंडी १८५२-१९३१
(मुलांबाबतची अन्य माहिती दाखवीत नाही कारण प्रस्तुत लेखाशी ती असंबद्ध आहे. इतकेच लिहितो की क्र. ३ एडवर्ड हे न्यायमूर्ति रानडे ह्यांच्याबरोबरच मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश होते. क्र.६ जेम्स ह्यांना जे.टी. मोल्सवर्थ ह्यांच्यावरूनच मधले नाव ’मोल्सवर्थ’ असे दिले असावे.)

अन्य काही टीपा. जॉर्ज कॅंडी, थॉमस ह्यांचा जुळा भाऊ हेहि मोल्सवर्थबरोबर कोशाच्या कामात होते आणि कोशाच्या मलपृष्ठावर त्यांचे नाव थॉमसबरोबरच दिलेले आहे. नंतर त्यांना मिशनरी कार्यात अधिक रुचि उत्पन्न झाल्याने त्यांनी सैन्यातील नोकरी सोडून मिशनरी मार्ग धरला. ते अनेक वर्षे मुंबईत माझगाव भागात राहिले. देवळालीमध्ये असलेल्या बार्न्स हायस्कूल ह्या मिशनने चालविलेल्या निवासी शाळेच्या प्रारंभाशी त्यांचे कार्य जोडलेले आहे आणि शाळेच्या इमारतींपैकी एका इमारतीस त्यांचे नाव दिले आहे.

गिरगावातील इमॅन्युएल चर्चमध्ये खालील स्मृतिशिला बसविलेली आहे:

'Rev. George Candy Died at Bath 31st January 1869 Major Thomas Candy C.S.I., Died at Mahableshwar 27th Feb 1877, Both were Earnest Supporters of the C.M.S, The former Secretary from 1850 to 1857, The latter as a member of the corresponding committee Mumbai and Friends of the above as taken of love and esteem.' (C.M.S. म्हणजे चर्च मिशनरी सोसायटी.)

इंग्लंडमध्ये लंडनपासून सुमारे १०० मैल पश्चिमेकडील चेल्टनहॅम ह्या गावाशी थॉमस कॅंडी ह्यांचा काही निवासी संबंध असावा. त्यांचे दोन मुलगे तेथील शाळेचे Day Scholars असल्याचा उल्लेख सापडतो, तसेच थॉमस कॅंडी १८५५-५६ च्या इंग्लंडमधील मुक्कामात तेथेच राहिले होते असे दिसते.

आधार: पूना कॉलेजसंबंधीच्या भागाला आणि त्यातील घटनाक्रमाला प्रमुख आधार पत्रव्यवहाराच्या ह्या
पुस्तकात
मिळतो. येथील पृ. १७९ पासून पुढे पहा. पूना कॉलेजमधील विद्यार्थ्यांची नावे, तेथील अभ्यासक्रम, खर्चवेच असे बरेच तपशील येथे आहेत. Oriental Herald and Journal of General Literature, Allen's Indian Mail and Register of Intelligence for British and Foreign India अशासारखी बरीच प्रकाशने त्या काळात छापली जात. दूरदूर पसरलेल्या ब्रिटिश लोकांना इतर ब्रिटिशांच्या बाबतीत जन्म, मृत्यु, बदल्या, नेमणुका, विवाह, इंग्लंडमधून जाणेयेणे अशा प्रकारच्या समजाव्या हा अशा प्रकाशनांचा हेतु असे. त्यांच्या डिजिटल आवृत्त्य शोधल्याने असे तपशील समजू शकतात. त्या मार्गाने जन्ममृत्यूंची माहिती गोळा केली आहे पण त्याच्या अधिक तपशिलात जात नाही. पुढील पुस्तकांचाहि आधार घेतला आहे:

१) मोल्सवर्थ मराठी-इंग्लिश कोश १८३१ - प्रस्तावना.
२) मोल्सवर्थ मराठी-इंग्लिश कोश १८५७ - प्रस्तावना.
३) मोल्सवर्थ कोश, बाबा पदमनजीकृत संक्षेप १८६३ प्रस्तावना.
४) मराठी शब्दरत्नाकर - वासुदेव गोविंद आपटे प्रस्तावना.
५) अर्वाचीन मराठी वाङ्मयसेवक, खंड १ लेखक गं.दे.खानोलकर ह्यातील ’मेजर कॅंडी’ हे प्रकरण.
६) मोल्सवर्थ कोशाची आवृत्ति, १९७५, ना.गो.कालेलकर ह्यांचे प्रास्ताविक आणि शरद गोगटे ह्यांचे चरित्रविषयक टिपण ह्यासहित.
७) The Men Whom India Has Known - by J.J.Higginbotham.
(वरील सर्व पुस्तके मला जालावर DLI, OUDL, books.google.com, archive.org येथून उतरवून घेता आली. ह्याशिवाय जालावरील पुढील पुस्तकांतील उतारे लेखांमध्ये दिले आहेत.)
८) A Memoir of Mrs. Margaret Wilson of the Scottish Mission, Bombay - by John Wilson, 3rd Ed 1840.
९) Introduction, The Hindee-Roman orthoepigraphical ultimatum - by John Borthwick Gilchrist.
१०) Memoirs of a Long Life - by David Davidson.
११) In Western India - by Rev. J. Murray Mitchell.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

उत्तम लेखन. अख्खी लेखमाला संग्राह्य आहे.
या शेवटच्या भागातील संदर्भसुचीबद्दल विशेष आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उत्तम रिसर्च आर्टिकलच्या सर्व लक्षणांनी युक्त असे लेखन!!! अतिशय संग्राह्य लेखमाला. आणि त्या संदर्भसूचीबद्दल विशेष आभार Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी मोल्सवर्थ आणि थॉमस कॅँडी यांच्यावर विकिपीडियावर आर्टिकल्स तयार केलेली आहेत; ती इथे पाहता येतील.

http://en.wikipedia.org/wiki/James_Thomas_Molesworth

आणि

http://en.wikipedia.org/wiki/Thomas_Candy

ज्या वाचकांना (विचका न करता) विकिपीडिया एडिट करण्याचा थोडाफार अनुभव आहे, त्यांना यांत जर काही भर घालता आली तर त्यांनी ती जरूर घालावी, ही विनंती. उदाहरणार्थ,

१. मोल्सवर्थच्या डिक्शनरीची इलेक्ट्रॉनिक लिंक टाकता येईल.
२. थॉमस कॅँडी अनेक वर्षे भारतात राहिला, अाणि माल्कमपेठ, महाबळेश्वर इथे निवर्तला. त्याच्या थडग्याचा किंवा बंगल्याचा वगैरे फोटो मिळाला तर तो टाकता येईल. त्याचप्रमाणे कॅँडीचं एक रेखाचित्र मराठी विश्वकोशाच्या तिसऱ्या खंडाच्या पान ४६५ वर आहे, ते स्कॅन करून टाकता येईल. (मला अशा गोष्टींत दुर्देवाने फारशी गती नाही.) चित्र खूप जुनं असल्यामुळे बहुतेक पब्लिक डोमेनमध्ये असावं, त्यामुळे कॉपीराइटची अडचण येऊ नये.

या दोघांनी मराठीसाठी खूप केलं असल्यामुळे आपण आता त्यांच्यासाठी थोडं करायला हरकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

मोल्स्वर्थ डिक्शनरीची लिंक टाकली आहे.

कँडीच्या चित्रासाठी इन्फोबॉक्स बनवलाय, पण अकौंट अजून कन्फर्म झाले नसल्याने चित्र अपलोड होत नाहीये. ते कन्फर्म झाले की अ‍ॅड करतो.

अपडेटः चित्र अपलोडवले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅटमन ह्यांनी दिलेली लिंक शिकागो विद्यापीठाच्या Digital Dictionaries of South Asia संग्रहातील कोशाकडे नेते. हा कोश म्हणजे पदमनजीकृत संक्षिप्त आवृत्ति आहे.

१८५७ सालची पूर्ण आवृत्ति बुक्स.गूगलवर books.google.ca/books?id=u-JGAAAAcAAJ येथे उपलब्ध आहे. ते विनामूल्य ई-बुक असून कोणासहि उतरवून घेता येईल असे आहे. वापरण्यासहि ते Digital Dictionaries of South Asia संग्रहातील कोशाहून अधिक सुकर आहे.

ही लिंक टाकावी असे सुचवितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पूर्ण आवृत्तीच्या लिंकबद्दल बहुत धन्यवाद! पण ती पीडीएफ सर्चेबल नाहीये, सबब जुन्या पद्धतीने पाने पालटत बसावे लागेल. हरकत नाही, तीही लिंक टाकतो. त्या निमित्ताने तशी आवृत्ती नेटवर आहे हे तरी लोकांना कळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं