Skip to main content

मूल्य आणि किंमत

कॉस्ट, प्राइस, व्हॅल्यू या तीनही शब्दांसाठी मराठीत बहुतेक वेळा 'किंमत' हा एकच शब्द वापरला जातो. परंतु प्रत्यक्षात हे तीन शब्द वेगवेगळे अर्थ ध्वनित करतात.

त्यापैकी 'प्राईस' या शब्दाने मुख्यत्वे विक्रीची किंमत दर्शवली जाते किंवा दोन व्यक्तींमध्ये जो खरेदी-विक्रीचा व्यवहार होतो त्याची किंमत दर्शवली जाते.

'कॉस्ट' या शब्दाने जी किंमत दर्शवली जाते त्यात खरेदीची किंमत दर्शवली जाते. किंवा उत्पादकाने वस्तू बनवली असेल तर उत्पादकाचा उत्पादनाचा खर्च दर्शवलेला असतो. उत्पादनाच्या खर्चात कच्च्या मालाची खरेदीची किंमत, त्या कच्च्या मालाचे तयार वस्तूत रूपांतर करण्यासाठी लागलेली मजुरी, ऊर्जा, इतर साहित्य यांचा खर्च तसेच प्रशासकीय आणि वाहतूक खर्च, कर्मचाऱ्याचे वेतन व इतर खर्च यांचा समावेश असतो. या किंमतीला अर्थशास्त्रात अंगभूत मूल्य (Intrinsic Value) असेही संबोधले जाते.

खरेदीची किंमत आणि विक्रीची किंमत या दोन्ही वास्तव किमती असतात. म्हणजे त्या प्रत्यक्ष घ्याव्या-द्याव्या लागतात.

याखेरीज तिसऱ्या प्रकारची किंमत अस्तित्वात असते तिला इंग्रजीत 'व्हॅल्यू' या शब्दाने आणि मराठीत 'मूल्य' या शब्दाने ओळखले जाते. मूल्य किंवा व्हॅल्यू ही काहीशी अमूर्त संकल्पना आहे. कधी कधी आपण मराठीत "त्याला माणसांची किंमत नाही" असा वाक्यप्रयोग करतो त्यात हीच मूल्याची अमूर्त संकल्पना अध्याहृत आहे.

अर्थशास्त्रानुसार एखाद्या वस्तूला मूल्य असण्यासाठी एक तर ती वस्तू ग्राहकासाठी उपयुक्त असायला हवी आणि दुसरे म्हणजे ती मर्यादित प्रमाणात उपलब्ध असायला हवी. मुबलक प्रमाणात (एकूण गरजेपेक्षा जास्त प्रमाणात उपलब्ध असलेल्या वस्तूंना किंमत नसते किंवा जिचा कुणाला उपयोग नाही त्या वस्तूला किंमत नसते).

बाजारव्यवस्थेत ही मूल्याची संकल्पना फार महत्त्वाची असते. मूल्य म्हणजे ग्राहकाला वस्तूची जी योग्य किंमत वाटते ती किंमत. ही किंमत ग्राहकाच्या मनात असते आणि ती स्थिर नसते. ती अनेकविध घटकांच्या एकत्रित परिणामांतून ग्राहकाच्या मनात साकार होते. अर्थशास्त्रानुसार एखाद्या वस्तूला मूल्य असण्यासाठी एक तर ती वस्तू ग्राहकासाठी उपयुक्त असायला हवी आणि दुसरे म्हणजे ती मर्यादित प्रमाणात उपलब्ध असायला हवी. मुबलक प्रमाणात (एकूण गरजेपेक्षा जास्त प्रमाणात उपलब्ध असलेल्या वस्तूंना किंमत नसते किंवा जिचा कुणाला उपयोग नाही त्या वस्तूला किंमत नसते).

वस्तूच्या उत्पादकाच्या दृष्टीने पाहिले तर जोवर ग्राहक द्यायला तयार असलेली किंमत खरेदीच्या किंवा उत्पादनाच्या खर्चापेक्षा जास्त असते तोवर उत्पादक ती विकायला तयार असेल. डील विल बी मेड.

ग्राहकाच्या मनातले मूल्य जोवर विक्रीच्या किंमतीपेक्षा जास्त आहे तोवर ग्राहक ती वस्तू खरेदी करायला तयार असेल. डील विल बी मेड.

ग्राहकाच्या मनातले मूल्य जाणणे ही मार्केटिंग क्षेत्रातली एक कठीण गोष्ट आहे. ग्राहक जेव्हा एखाद्या वस्तूचे किंवा सेवेचे मूल्य ठरवतो तेव्हा तो वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करत असतो. आणि प्रत्येक ग्राहकाच्या मनातले अग्रक्रम (Priorities) वेगवेगळे असल्याने तो कोणत्या गोष्टीवर मूल्य ठरवेल हे सांगता येत नाही.
उदाहरणादाखल आपण गाण्याच्या सीडीचे उदाहरण घेऊ. बाजारात दोन गायकांनी सीडी प्रकाशित केली. त्यापैकी एक भीमसेनजींची आहे आणि दुसरी अन्य गायकाची आहे. सीडीचा उत्पादन खर्च दोन्ही बाबतीत जवळजवळ सारखाच असेल. तरीही भीमसेनजींच्या सीडीसाठी ग्राहक ५०० रुपये द्यायला तयार असेल तर अन्य गायकाच्या सीडीसाठी १५० ते २००च रुपये द्यायला तयार असेल. म्हणजेच ग्राहकाच्या मनातले भीमसेनजींच्या सीडीचे मूल्य जास्त आहे. त्याचबरोबर असेही लोक असतील ज्यांना शास्त्रीय संगीत आवडत नसेल. त्या लोकांना भीमसेनजींचे गाणे काय आणि दुसऱ्याचे काय; सारखेच वाटेल. पहिल्या उदाहरणातल्या ग्राहकाच्या मनातले भीमसेनजींच्या सीडीचे मूल्य ५०० रुपये असेल (कदाचित ती सीडी तो अमूल्यही समजेल. म्हणजे त्याच सीडीसाठी १०००/२००० रुपये जरी मागितले तरी तो ते द्यायला तयार होईल).

आणखी एक उदाहरण घेऊ. आपण हे जाणतोच की आपल्या घराजवळच्या कोपऱ्यावरचा भाजीवाला भाजी महाग देतो आणि मोठ्या मंडईत गेलो तर भाजी स्वस्त मिळू शकते. पण आपण कोपर्‍यावरच्या भाजीवाल्याला अधिक किंमत द्यायला तयार असतो. याचे कारण आपल्या मनातले घराजवळ भाजी मिळण्याचे मूल्य अधिक असते. मंडईत जायला लागणारा वेळ, त्रास आणि खर्च याचे गणित करून त्याची तुलना आपण कोपऱ्यावरचा भाजीवाला जितकी अधिक किंमत मागतो त्याच्याशी करतो आणि कोपऱ्यावरून भाजी आणण्याचे (वाढीव) मूल्य भाजीवाला मागत असलेल्या अतिरिक्त किंमतीपेक्षा अधिक आहे असा निष्कर्ष काढतो. या तुलनेत विचारात घेतलेले वेळ, त्रास हे घटक पूर्णपणे व्यक्तिनिष्ठ (subjective) असतात. त्यामुळे प्रत्येक माणसाचे तुलनात्मक गणित वेगवेगळे होते आणि कुणी कोपऱ्यावरून भाजी घेतात तर कुणी मात्र मंडईतून भाजी आणतात.

मूल्यवर्धन (Value Addition):
एखाद्या वस्तूचे ग्राहकाच्या मनातले मूल्य वाढवणे म्हणजे मूल्यवर्धन.

एखाद्या वस्तूवर काही प्रक्रिया करून ती अधिक उपयुक्त/वापरण्यास सुलभ करणे हा मूल्यवर्धनाचा एक प्रकार आहे. भाजी निवडून, चिरून उपलब्ध केल्याने मूळ भाजीच्या मूल्यात वृद्धी होत असते. हे वास्तव मूल्यवर्धन होय. आता हे मूल्यवर्धन करण्यासाठी अर्थातच विक्रेत्याला काही अधिक खर्च येतो किंवा काही श्रम करावे लागतात. परंतु विक्रेत्याला त्यासाठी आलेल्या खर्चाची रक्कम किती यावर त्या वस्तूचे वाढलेले मूल्य मुळीच अवलंबून नसते. ते वाढलेले मूल्य ग्राहक त्याचे किती मूल्य ठरवतो त्यावर अवलंबून असते. सहसा ग्राहक यासाठी बरीच जास्त किंमत द्यायला तयार होतो. म्हणजेच ग्राहकाच्या मनातले मूल्य बरेच वाढते.

कधीकधी ग्राहकाच्या मनातले वाढीव मूल्य हे अमूर्त असते. वर सीडीचे उदाहरण दिले आहे. त्यात जे अतिरिक्त मूल्य ग्राहक ठरवतो त्यातले काही प्रमाणात वास्तव असते तर काही अमूर्त असते. जे वास्तव मूल्यवर्धन असते ते भीमसेनजींच्या गाण्याने जो आनंद मिळतो त्यामुळे असते तर काही प्रमाणात ते आभासी असते. असे आभासी मूल्यवर्धन वेगवेगळ्या मार्गांनी केले जाते.

ब्रॅण्डिंग आणि जाहिरात हे असे आभासी मूल्यवर्धन करण्याचे मुख्य मार्ग असतात. ब्रॅण्डिंग म्हणजे एखाद्या वस्तूला किंवा वस्तूंच्या समूहाला विशेष गुणवत्ता आहे असा समज ग्राहकांच्या मनात निर्माण करणे. यात एक वस्तू बाजारात बर्‍याच काळापासून उपलब्ध असते. आणि ती चांगल्या गुणवत्तेची आहे असे बाजारात सिद्ध झालेले असते. अशा वस्तूचे उत्पादक दुसरी वस्तू त्याच वस्तूच्या नावाने बाजारात आणतात. अशा वेळी ही नवी वस्तू त्याच गुणवत्तेची आहे असे ग्राहक (नव्या वस्तूची चाचणी न करताच) ठरवतो/मान्य करतो/गृहीत धरतो आणि त्याआधारे त्या वस्तूची अधिक किंमत द्यायला तो तयार होतो.

वरच्या भीमसेनजींच्या सीडीच्या उदाहरणात भीमसेनजींच्या गाण्याविषयी एक गृहीतक (ब्रँड व्हॅल्यू) ग्राहकाच्या मनात असते. भीमसेनजींची सीडी म्हणजे चांगलीच असणार असे समजून त्याची वाढीव किंमत द्यायला ग्राहक तयार असतो.

काही वेळा हे ब्रॅण्डिंग सामाजिक/पारंपरिकरित्या झालेले असते. याचे एक उदाहरण म्हणजे आपट्याची पाने. ही पाने दसर्‍याला एकमेकांना द्यायची असतात असे परंपरेने ठरवलेले असते. त्यामुळे एरवी काहीही मूल्य नसलेल्या आपट्याच्या पानांना काहीतरी मूल्य प्राप्त होते. त्यांचे मूल्य शून्य वरून शून्यापेक्षा काही अधिक असे वाढते. असेच उदाहरण अक्षयतृतीयेला सोने घ्यायचे असते किंवा व्हॅलेन्टाइन डेला (लांब देठाचे) गुलाबाचे फ़ूल आपल्या मैत्रिणीला द्यायचे असते या परंपरांचे आहे. अक्षयतृतीयेला सोने घ्यायचेच या कल्पनेमुळे ग्राहक त्यादिवशी काहीशा अधिक किंमतीला सोने घ्यायला तयार होतो.

ग्राहकांच्या मनातल्या फॅण्टसीजना साद घालून वस्तूचे मूल्य वाढवले जाते. गोरेपणा (किंवा गोरे असल्यास व्यक्तिमत्व उठावदार होऊन यशस्वी होता येईल) ही अशी एक फॅण्टसी आहे. तर काही वेळा पारंपरिक प्रतीकांचा वापर मूल्यवर्धनासाठी केला जातो. उदाहरणार्थ ट्रकच्या जाहिरातीत गेंडा, रेडा वगैरेसारखी प्रतीके वापरली जातात तर सौंदर्यप्रसाधनांच्या जाहिरातीत मखमल, फ़ुले यांसारखी.

मूल्यवर्धनाचा उद्देश नेहमी विक्रीची किंमत वाढवणे हाच नसतो. येथे व्हॅल्यू फॉर मनी असा शब्दप्रयोग केला जातो. तितक्याच किंमतीत आपल्याला काहीतरी अधिक मिळत आहे असा ग्राहकाचा समज होणे हा मूल्यवर्धनाचा उद्देश असतो.

मूल्याचा आणखी एक प्रकार पाहून आपण हा लेख संपवू. हे मूल्य म्हणजे प्रतिष्ठामूल्य. एखादी वस्तू आपल्याकडे असणे याला एक अतिरिक्त मूल्य असते. आपल्याकडे बूट असण्याला जेवढे मूल्य असते त्यापेक्षा नाइकेचे किंवा रीबॉकचे बूट असणे याला अधिक मूल्य असते. याचे कारण नाइकेचे किंवा रीबॉकचे बूट घातल्याने प्रतिष्ठा वाढते असा ग्राहकाचा समज झालेला असतो. यात नाइकेच्या बुटाचा दर्जा इतर बुटांपेक्षा "थोडासाच" चांगला असला तरी त्यापेक्षाही प्रतिष्ठेचे मूल्य यात वरचढ असते.

समारोप

  • मूल्य ही किंमतीपेक्षा वेगळी कल्पना आहे.
  • मूल्य हे ग्राहकाच्या मनात असते आणि ते मूल्य ठरण्यात खूप घटकांचा परिणाम होतो.
  • वस्तू बनवण्यासाठी येणार्‍या खर्चाचा मूल्याशी काही संबंध नसतो.
  • वस्तूच्या विक्रीची किंमत मूल्यापेक्षा कमी असेल तरच ग्राहक ती खरेदी करतो.

अधिक चर्चा प्रतिसादांमधून करू.

विशेषांक प्रकार