Skip to main content

ग्रंथालय कथा आणि व्यथा

"अहो,अहो, तुम्ही पुस्तकांना हात लावताय की!"
"बघतोय मी."
"बघतोय काय? मला सांगा कि कुठल पुस्तक हवयं?"
"मला कुठल पुस्तक हवय तेच तर मी बघतोय.तेवढाच तुमचा त्रास कमी होईल."
"नाही नाही.तुम्ही हात लावायचा नाही.जे हवं असेल ते मला सांगा."
मुंबईतल्या एका ग्रंथालयातील एका सेविकेबरोबर झालेले हे संभाषण.
"ठीक आहे ते डावीकडून तिसरे पुस्तक द्या."

ते पुस्तक पाहिल्यावर ते फारसे उपयुक्त नसल्याचे जाणवले. मी ते परत केले. कार्डेक्स बघून दुसर पुस्तक मागवलं. ते चाळल्यानंतर तेही महत्वाचे वाटलं नाही. तेही परत केले. आता ती बाई त्रासिक नजरेने माझ्याकडे बघू लागली. तिला वाटलं असेल कि मी मुद्दाम त्रास देण्यासाठी असं करतोय. तिसरं पुस्तक मागवलं. बघितल्यावर मला ते आवडलं. मी ते घेतलं.'बरं झालं कटकट गेली.' अशा नजरेने तिनं माझ्याकडे बघितलं. मला हव्या असलेल्या ज्योतिषशास्त्र या विषयावरील पुस्तकांची रॅक व कार्डेक्स हे जवळ जवळ होते. मग कार्डेक्समध्ये शोधत बसण्याऐवजी आपण रॅकमध्ये शोधू अशा विचारांनी मी सहजगत्या पुस्तक चाळत होतो. पण ते ग्रंथालयाच्या वाचकनीतीमध्ये बसतं नव्हतं.
मी इतरत्र बघितलं. एका टेबलवर रंगीबेरंगी मुखपृष्ठ असलेल्या कथा कादंब-या अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या.वाचक त्यातली पुस्तके निवडून घेत होती. बहुतेक पुस्तके नवी होती.वाचक मंडळी 'उदार' होउन दिलेल्या मर्यादित स्वातंत्र्यावर खूष होती. सर्व मराठी ग्रंथालयांमध्ये थोड्या फ़ार फ़रकाने हीच परिस्थीती असते.
विषयवार सूची -संदर्भाची रजिस्टर असतात त्यांना पोथ्यांचे स्वरूप आलेले असते.कोपरे फ़ाटलेले असतात, अक्षरं पुसट झालेली असतात. ड्‍रॉवर्स कॆटलॊग असतील तर ते बहुधा न उघड्ण्यासाठीच असतात.अधिक जोर लावला तर ओढणार्‍याचा निषेध म्हणून त्याच्या अंगावर येतात.
पुण्यातल्या एका नामवंत मराठी ग्रंथालयात नवीन म्हणून गेलो.फक्त ऒथर इंडेक्स होता.आतमध्ये कार्डस खचाखच भरलेली होती.प्लास्टिक कोटेड नव्हती.त्यांना ओवणारी सळई नव्हती.त्यामुळे त्याची स्थिती खेळून खेळून झालेल्या पत्त्याच्या कॆट सारखी झाली होती.बोटांची कसरत करुनही दोन कार्डस मध्ये वाचण्याइतपत सुयोग्य अंतर ठेवणे जड जात होते.शेवटी मी हव असलेले कार्ड वाचण्यासाठी ते बाहेर काढले, क्रम बदलला जाउ नये म्हणून खुणेसाठी कागद ठेवला. आणि कार्ड घेउन बाईंच्या कडे गेलो.
"बाई हे पुस्तक बघायचय."
"अहो. तुम्ही कार्ड कशाल बाहेर काढ्लतं? कार्डस अजिबात बाहेर काढायची नाहीत."बाईंनी खेकसून वाचक आचारसंहितेमधला एक नियम सांगितला.
"मी परत योग्य जागी ठेवतो. तुम्ही काळजी करु नका."
"नाही, पण कार्डस बाहेर काढायची नाहीत. "बाईंनी निक्षून सांगितले.
बाकी ग्रंथालयं वाचकांच्या वैचारिक पातळीबरोबर अशा नियमावल्या ठेउन त्यांची नैतिकता देखिल वाढ्वतात. या ग्रंथालयात मी दिवाळी अंक योजनेत सामील व्हायला गेलो.
"किती उशीर झालाय. आता जेमतेम दीड महिना राहिलाय. कशाला होताय मेंबर?" बाईंनी व्यावहारिक सल्ला दिला.
"वैयक्तिक अडचणीमुळे नाही येउ शकलो. हरकत नाही,दिड महिना राहिला तरी." अस म्हणून मी मेंबर झालो. मला एक दिवाळी अंक हवा होता. एखाद्या चांगल्या आर्टिकल साठी संपूर्ण अंक खरेदी करण मला परवडणारं नव्हतं. दोन आठवड्यात तो अंक मिळू न शकल्याने मी तो अंक राखून ठेवण्याची विनंती केली. पण दिड महिन्यात तो अंक मिळू शकला नाही.
मी बाईंना म्हटलं ,"अंकाच्या सात आठ कॊपी असताना दिड महिन्यात एकही कॊपी माझ्या वाट्याला का येउ नये?"
"आमचं दुसरं युनिट कोथरुडला असतं. तिकडे काही अंक असतात. आता योजना संपल्याने आम्ही सर्व अंक एकत्र करीत आहोत. तुम्हाला तो अंक सर्वसाधारण सदस्यत्वाखाली आम्ही देउ."बाईंनी स्थितप्रदन्याच्या भूमिकेतून सांगितले. बाईंनी सांगितलेले कारण खरे असेलही, पण माझ्या मनात मात्र असे अंक ग्रंथालयाच्या हितसंबंधी लोकांकडे अडकून पडले असावेत अशी शंका चाटून गेली. दिवाळी अंकाची व माझी लपाछपी शेवटी दिवाळी अंकाला खेळ्ण्याचा कंटाळा आल्याने संपली.
लहानपणी गावाला असताना ग्रामपंचायतीने चावडीत ग्रंथालय चालू केले होतं. 'दत्तू बामन' या नावाने परिचित असलेली व्यक्ती ग्रंथपाल झाली. काळसरं, गव्हाळ रंगाची, मजबूत बांध्याची ही व्यक्ती निळा सदरा त्याला मोठा खिसा.पेनसाठी त्यातच स्वतंत्र छोटा नळकांडीसारखा खिसा मात्र त्यात टेस्टर. पांढरा लेंगा, चपचपून तेल लावून कोंबडा पाड्लेले केस, तांबारलेले डोळे, पायात कर्र कर्र करणार्‍या वहाणा अशी होती.
कपाटे उघडून खुर्चीवर बसल्यावर प्रथम तंबाखू चोळून बार भरण्याचा कार्यक्रम होई आणि मग आता कामाला सुरुवात करायला हरकत नाही, अशा थाटात देवाणघेवाणीचे रजिस्टर उघडून लाल बॊलपेनने उभ्या आडव्या रेषा मारत बसे.त्या रेषा दुरेघी,जवळजवळ व समांतर असतील याकडे विशेष वेळ खर्च करी. तोपर्यंत आपल्याल वाचायला पुस्तक मिळेल या आशेपोटी आलेले वाचक व चिल्लीपिल्ली मंडळी घुटमळत राहतं. तेवढ्यात त्याला आपल्या रेडिओची आठवण येई. त्याच्याकडे एक चौकोनी डबडा रेडिओ होता. तो उघडून तो बसे.
खरे तर, तो रेडिओ त्याच्या प्रकृतीच्या मानाने चांगला चालतं होता. पण तो अधिक चांगला चालण्यासाठी तो टेस्टर घालून फ़िरवता येण्यासारखे सर्व पार्ट फ़िरवत असे. हे करताना तो जीभ नाकाच्या दिशेला बाहेर काढी.उजवा डोळा बारीक मिटून डावा डोळा शून्यात लावी. त्याला रेडिओतील कुठ्लही ज्ञान नव्हतं, तरी काड्या करण्याच्या उपजत प्रवृत्तीमुळे चांगले चालणारे स्टेशनही तो घालवून बसे. तो पर्यंत ग्रंथालयाची वेळ संपत आलेली असे. मग एखाद्या पोरावर तो ओरडे,"तुला कशाला पाहिजे रे पुस्तक? तुझ्या म्हतार्‍याने तरी वाचलं होतं का? पळ इथून." आलेल्या मंडळींना आपल्याला हातात येईल ती पुस्तके गळ्यात मारून वाटेला लावी.
'समानशीले व्यसनेषु सख्यम' या नात्याने त्याच्याजवळ असलेली मित्रमंडळी आपल्याला हवी ती पुस्तके कपाटातून काढून घेउन"द्त्त्या भ.... 'बाबा कदम'वाली दोन नेली बरं का?" असे म्हणून घेउन जात. ग्रंथालयातील सुट्ट्याही त्याच्या सोयीवर अवलंबून असतं. पण तरीही ग्रंथालय गावात वाचनाची अभिरुची निर्माण करण्यास कारणीभूत ठरलं.
डॊ.जयंत नारळीकरांनी आपली वाचक या नात्याने मांडलेली भूमिका अतिशय सुस्पष्ट व रास्त आहे. ते म्हणतात,"आधुनिकीकरणाचे फ़ायदे एवढे मोठे आहेत, कि प्रसंगी माहिती संकलित करण्यापासून येणा-या सर्व अडचणी पुढे किरकोळ ठरतात. आधुनिकीकरणामध्ये येणा-या सर्व अडचणी दूर करून ते वाचकांना सुलभ वाटावे अशा प्रकारे वापरले गेले पाहिजे.ग्रंथांबद्दल माहिती असणारे तज्न्य कर्मचारी व वाचक यांच्यात याद्वारे देवाणघेवाण वाढेल आणि वाचकांना माहिती अधिक सुलभपणे मिळू शकेल."(संदर्भ दै.सकाळ ११ नोव्हे १९९०)
एकदा " भांडारकर इन्स्टीट्यूट" मध्ये गेलो. तेथील प्रमुख ग्रंथपाल डॊ. वा.ल.मंजूळ यांची ओळख करुन घेतली. ज्योतिषावरील संदर्भ शोधताना कॆट्लॊग उघडला.पुन्हा त्याच अडचणी आल्या. शेवटी मंजूळांनी मुक्त स्वातंत्र्य दिलं. गरज वाटेल तेव्हा कधीही या, असे सांगून ग्रंथालय व वाचक यातील दरी कमी केली.
ग्रंथालयातील कर्मचार्‍यांना ग्रंथांविषयी माहिती असणे आवश्यक आहे. एकाने म्हणे प्र.के. अत्र्यांचा 'झेंडूची फ़ुले' हा कविता संग्रह वनस्पतीशास्त्र विभागात टाकला होता.
मुंबईत नायगावातल्या एका प्रसिद्ध मराठी ग्रंथालयात जायचो.त्यावेळी ग्रंथालयातील त्या बाईच्या कपाळावर न लपवता येण्यासारखी आठी पडायची. मी एक पुस्तक वारंवार मागायचो, त्या बाई मागणीचा कागद घेउन रॆकच्या आड अदृष्य व्हायच्या आणि परत येउन 'नाही 'असं सांगायच्या. असं दोन तीन वेळा घडले. एकदा त्या बाई नव्ह्त्या, दुस-या बाईंच्या कडे पुस्तक मागितले.नसणारच असे गृहित धरले होते. पण बाईंनी लगेच काढून दिले. मीही ते लगेच स्वीकारले, उघडून बघण्याची पण गरज नव्हती. वाचून झालेवर परत करण्याचा चिकटवलेला कागद मी बघितला, तेव्हा त्यावर गेल्या दहा वर्षांचे ग्रंथालय मोजणीचे फ़क्त शिक्के होते.
(पुर्व प्रसिद्धी 'रुची' मे १९९७)

Node read time
5 minutes
5 minutes

ऋषिकेश Tue, 16/10/2012 - 09:26

सध्या एकूणच ग्रंथालयांची संख्या आणि शहरांचा वाढलेला आकार बघता अशी गैरसोयीचीही चालतील पण प्रत्येक विभागात एक ग्रंथालय हवे असे म्हणायची वेळ आली आहे :(

बाकी लेख खूप आवल्डा!

बॅटमॅन Tue, 16/10/2012 - 11:02

ही अनास्था आपला काळ ठरतेय. मूर्ख ग्रंथपालांमुळे जिज्ञासू वाचकांचे नुकसान झाल्याची उदाहरणे पाहिली आहेत.

मेघना भुस्कुटे Tue, 16/10/2012 - 12:25

ठाण्यातल्या मराठी ग्रंथ संग्रहालयाचा मला चांगला अनुभव आहे.
अर्थात - 'अमुक पुस्तक नाहीच. गहाळ आहे. पाचव्या मजल्यावर आहे. लिफ्ट बंद आहे. महाग आहे, डिपॉझिट भरा...' अशा अनेक बयादी सांगणारे कर्मचारी मधून मधून भेटतातच. पण आपण नेटाने जात राहिलो, तर मुद्दामहून आपल्याला हवे ते पुस्तक राखून ठेवणारे, ग्रंथ खरेदीसाठी आवर्जून सुचवण्या विचारणारे, आपल्याला आवडतीलशी नवीन पुस्तकं सुचवणारे कर्मचारीही भेटतात.
ही ग्रंथालयं काहीशी पिवळी पडलेली जीर्ण पुस्तकं देणारी असली, तिथे सेवा वाचकांना पुरेशी हेटाळणारी असली - तरी अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आणि वरचेवर ग्रंथखरेदीही केली जाते, ही आनंदाची गोष्ट. शिवाय ग्रंथालय जितकं जुनं, तितका त्यांचा ग्रंथसंग्रह समृद्ध - वैविध्यपूर्ण असतो हेही आहे.
त्या मानाने प्लास्टीकच्या चकचकीत कव्हरातली बेष्टसेलर्स घरपोच पुरवणारी ग्रंथालये अगदीच लोकानुनयी आणि सवंग वाटतात.
बाकी धागा मोठा नामी. आठवेल तशी, सुचेल तशी अजून भर घालीन. :)

बॅटमॅन Tue, 16/10/2012 - 12:27

In reply to by मेघना भुस्कुटे

त्या मानाने प्लास्टीकच्या चकचकीत कव्हरातली बेष्टसेलर्स घरपोच पुरवणारी ग्रंथालये अगदीच लोकानुनयी आणि सवंग वाटतात.

त्या ग्रंथालयांतील ग्रंथसंग्रह ही एक वेगळी गोष्ट आहे, पण लोकानुनयी असण्यात गैर ते काय? की हेटाळणीची सवय झाल्यामुळे चांगली सेवादेखील सवंग वाटते?? हे मला तरी अनाकलनीय आहे.

मेघना भुस्कुटे Tue, 16/10/2012 - 14:28

In reply to by बॅटमॅन

की हेटाळणीची सवय झाल्यामुळे चांगली सेवादेखील सवंग वाटते??

हाहाहा! नाही, तसं नाही. पण ग्रंथसंग्रहातला फरक लक्षणीय असतो. संख्या आणि दर्जा दोन्ही बाजूंनी. शिवाय महिन्यात अमुक इतकेच वेळा घरी येऊ, इतकीच पुस्तकं मिळतील... वगैरे तर असतंच.
मला सेवा थोडी कमीजास्त चालते, मुरडून-वाकवून घेता येते. पुस्तकाची पानंही फार कोरी-करकरीत नसली तरी चालतात, म्हणून मला त्या प्रकारातली ग्रंथालयं आवडत नाहीत, इतकंच!
तुम्हांला चांगला अनुभव आहे का? ग्रंथालयाचं नाव तरी सांगा, मी वापरून पाहीन. :)

बॅटमॅन Tue, 16/10/2012 - 14:35

In reply to by मेघना भुस्कुटे

मला तादृश चांगला/वाईट अनुभव नाहीये, पण ते वाक्य खटकले म्हणून लिहिले. बाकी सहमत आहेच :)

स्नेहांकिता Tue, 16/10/2012 - 15:29

कोणत्याही गावात ग्रंथालयात येणारे अनुभव एकसारखेच कसे याचा विचार करते आहे.
चकचकीत अन आधुनिक पद्धतीची सुरेख छपाई असणारी हिंदी इंग्रजी पुस्तके नाममात्र दरात उपलब्ध असताना मराठी पुस्तकांच्या किंमती इतक्या चढ्या का हेही न सुटणारे कोडे. नवल नाही, ग्रन्थालयवाले पुस्तकांना अनमोल ठेवीप्रमाणे जपतात!

क्रेमर Tue, 16/10/2012 - 21:44

माझाही सार्वजनिक ग्रंथालयांचा अनुभव असाच काहीसा आहे. महाविद्यालये किंवा विद्यापीठांशी संलग्न ग्रंथालयांतील अनुभव तुलनेने खूपच सुखद असतो.

पुस्तकांना जाड पुठ्ठे लाऊन बाइंड करणे ही सार्वजनिक ग्रंथालयांची वाईट सवय आहे. बर्‍याच पुस्तकांत (खासकरून इंग्रजी पेपरबॅक पुस्तके) त्यामुळे ओळीच्या सुरूवातीचे किंवा शेवटचे शब्द हूकतात. जवळजवळ सर्वच मराठी ग्रंथालयांत भाजी निवडल्यासारखे पुस्तके निवडण्याचे टेबल असते ज्यावर पुल, वपु, सुशि, बाबा कदम, व बां बोधे, सुमति क्षेत्रमाडे, मीना प्रभू वगैरे वगैरे लेखकांच्या पुस्तकांच्या जुड्या मांडून ठेवलेल्या असतात तेही फारच कंटाळवाणे वाटते.

... Tue, 16/10/2012 - 22:21

माझ्या घराजवळचा ग्रंथालयाचा अनुभव चांगला आहे. पहिली गोष्ट म्हणजे वाचकांना स्वत पुस्तकाचा अ‍ॅक्सेस मिळतो. दुसरी म्हणजे एखाद पुस्तक नसेल तर तशी नोंद करुन घेऊन आणण्याचा प्रयत्न करतात. सर्व नोंदीच डिजिटालयाझेशन्ही वेळेवर करतात.
मुख्य म्हणजे खेकसणे, जीवावर आल्यासारखे ऊत्तर देणे हे प्रकार मी आजपर्यत तरी पाहिल नाहीत. वेळाही सोयीच्या ठरतील अशाच आहेत.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 17/10/2012 - 02:41

आमच्या ठाण्याच्या सुप्रसिद्ध शाळेतला ग्रंथालयाचा अनुभवही इतर अनुभवांप्रमाणेच होता; ग्रंथालयाविषयी नावड निर्माण करणारा. कॉलेजातले मुख्य ग्रंथपाल कुठूनतरी ओळख निघाल्यावर निदान माझ्याशीतरी माणसाने माणसाशी वागावे तसेच वागायला लागले.

अन्यत्र अनेक ठिकाणी चांगला अनुभव आला. पुण्यात दाराशी येणार्‍या ग्रंथालयाच्या गाडीत चॉईस फारच मर्यादित होता, पण निदान ती माणसंमात्र प्रेमळ होती. उच्चशिक्षणाच्या संस्थांमधली ग्रंथालयं अतिशय संगणक हाताळता येत असल्यामुळे अतिशय यूजर-फ्रेंडली होती, ग्रंथालयात असणारा मर्यादित स्टाफ मदत करणारा होता. अलिकडच्या काळात खासगी मालकीची ग्रंथालयंही उपयोगी पडतात.

आतिवास Thu, 18/10/2012 - 00:22

लेख आवडला.
काही वाचनालयं आणि काही ग्रंथालयं आठवली.
एका विद्यापीठाच्या ग्रंथालयात चांगला संग्रह, अनेकविध विषयांवरचा. अगदी दुर्मिळ समजली जाणारी पुस्तकंही उपलब्ध. शुल्क नाममात्र. ग्रंथपाल (मी जितका काळ जात होते तितकी वर्ष) योगायोगाने स्त्रिया होत्या. पुस्तक कार्डावरुन शोधता यायचं - पण पुस्तकांच्या रॅकपाशी जाऊन, पुस्तकं चाळून हवं ते पुस्तक निवडण्याची मुभा होती. विषय इतिहास, संस्कृत, समाजशास्त्र असे असल्याने वाचकांची संख्या नेहमी तशी मर्यादित असायची. निवांत पुस्तकं पाहता यायची, एक बाजूला ठेवून दुसरं घेता यायचं.

मग तिथं इमारतीच्या सुधारणेचं काम सुरु झालं. ग्रंथालयही सुधारलं प्रशासकांच्या मते. पण त्या सुधारित ग्रंथालयात अनेक अडचणी यायला लागल्या आम्हाला. एक तर पूर्ण कपाटांना मिळून एकच सरकता दरवाजा. त्यामुळे एका वेळी एकच विभाग उघडता यायचा. त्यात दोन कपाटांच्या मधे एकच व्यक्ती मावेल इतकी जागा. त्यामुळे एकजण आत पुस्तकं पहात असताना त्याचं/तिचं कधी संपतंय म्हणून वाट पहात दोन तीन व्यक्ती बाहेर चुळबुळत असायच्याच. त्याचा पुस्तक पाहताना दबाब येऊन मग 'ठीक आहे, हे बरंच दिसतंय पुस्तक - आता कशाला आणखी शोधायचं' असं म्हणत मी पाच-सात मिनिटांत पुस्तकं घेऊन बाहेर पडायला लागले. पंधरा वीस मिनिटं कुणालातरी वाट पाहायला लावायची - हे जरा अती वाटायचं.

ज्यांनी ही सुधारणा केली त्या प्रशासकांनी आणि त्यांच्या 'हो'त 'हो' मिसळणा-या त्यांच्या सहका-यांनी कधीही ग्रंथालय वापरलं नसणार - असा मला संशय आहे.

इनिगोय Tue, 23/10/2012 - 15:28

ऑनलाईन लायब्ररीचा एक पर्याय मुंबई, पुणे आणि बंगलोर या शहरांसाठी उपलब्ध आहे. इथे सुमारे ३०००० (फार नाहीत तरी बराच आहे हाही आकडा) पुस्तकं आहेत. इंग्रजी, मराठी, हिंदी आणि गुजराथी पुस्तकं आहेत. पुस्तकं घरपोच आणून दिली जातात. ओळखीच्या काही जणांचा याबाबतचा अनुभव अगदी चांगला आहे.
इथे त्या साईटचे नाव जाहीर करणे धोरणात बसते का याची कल्पना नाही, व्यनितून देऊ शकेन..
हा अनुभव ९७ सालच्या अनुभवाहून नक्कीच वेगळा, सुखद असावा..

ऋषिकेश Tue, 23/10/2012 - 15:49

In reply to by इनिगोय

माहितीच्या आदानप्रदानासाठी ऐसीअक्षरेच्या धोरणाशी सुसंगत अश्या जालीय पानाचा/स्थळाचा दुवा देण्यात काहीच हरकत नाही. तेव्हा इथे तसा दुवा दिलात तरी चालेल. अनेक सदस्यांना उपयोग होऊ शकेल

इनिगोय Tue, 23/10/2012 - 16:48

In reply to by इनिगोय

आंजावरील ग्रंथालय इथे आहे.
सध्या तरी यांची सेवा मुंबई, पुणे आणि बंगलोर इथे उपलब्ध आहे. सभासदत्वासाठी असलेले पर्यायही चांगले आहेत.