जन्मठेप

हजार पायांच्या गोमीसारखी लपलपत चाललेली ही लोकल आणि तिच्या अंगावरच्या असंख्य सूक्ष्म चिकट तंतूंसारखी तिला चिकटलेली लोचट आणि घामट माणसं. पायाखाली टचकन फुटणार्‍या शेंबड्या गोगलगायीसारखं आपलं लिबलिबीत आयुष्य गोंजारत निघालेली. त्या गिळगिळीत गोगलगायीने गळ्यापर्यंत गिळलेला एक रिटायरमेंटला आलेला म्हातारा गर्दीत उभा राहून शिवलीलामृत वाचतो आणि त्या गोगलगायीचं उरलेलं गिळणं सुखद व्हावं म्हणून गदगदत प्रार्थना करतो. तिच्या काळ्या कुळकुळीत मिठीत घुसमटलेला एक नवखा खिडकीच्या जाळीला कंबर लावून वाचण्यात गुंग झालेला असतो; हाऊ टू पुस्तकं, ज्यांच्यात सगळं तपशीलवार दिलेलं असतं, गोगलगायीचं कोडकौतुक, तिचा खुराक, तिचं खाणं, तिचं पोसणं रोजच्या हेलपाट्यांमध्ये आटवलेल्या रक्तावर, इतकंच काय, लिहीलेलं असतं डिट्टेलवार नवीन गोगलगाय काढायची पद्धत, इवली इवली, मोठ्ठया डोळ्यांची गोंडस गोगलगाय. पुस्तक वाचताना मध्येच हसतो तो. स्वप्न पाहतो, चमकदार होण्याचं. अनेक गोगलगायी खाऊन त्यांच्यातून पिळलेल्या स्त्रावात लडबडून चमकदार झालेल्या मोठ्या गोगलगायींचं. आदरानं नाव घेतो तो त्यांचं. गिळणं संपलं असेल तर कै. नाहीतर सर, श्री, महात्मा वगैरे.

बाकीचे काही झोपतात चक्क गिळण्याकडे दुर्लक्ष करून किंवा काही पत्ते खेळतात. रोजच्या रोज कणाकणानं गिळलं जाणं साजरं करतात. अंगावर, तोंडावर चिकटलेला, टपकणारा पांढराधोप स्त्राव एकमेकांना दाखवून कौतुकाने हसतात, पाकीटात आपापल्या छोट्या गोगलगायींचे आणि जिच्या समाजमान्य योनीमार्गातून त्या आल्या त्या गोगलगायीचेही फोटो ठेवतात.

तोही उभा असतो त्यांच्या त्या लगद्यात. निरर्थकपणे तयार झालेल्या आपल्या आयुष्याला दुसर्‍याच कोणीतरी लावलेल्या अर्थाच्या रसशोषक जळवा पाहात. घुसमटतो त्या गर्दीत. एका पायावरून दुसर्‍या पायावर वजन टाकत उभा राहतो. दाराच्या दिसणार्‍या कोपर्‍यातून बाहेर पाहतो. फोडासारख्या तरारलेल्या इमारतींच्या पार्श्वभूमीवर केसांसारखा दिसणारा विजेच्या तारांचा गुंता, त्यात अडकलेले निर्जीव झालेले निरागस दुर्दैवी समाधानाचे पतंग, वखवखलेल्या या शहराने ज्याची दृष्टी आपल्या अखंड आणि प्रचंड गोंगाटाखाली चिरडली असं एखादं जळालेलं वाघूळ, असंख्य माणसांच्या अमर्याद गरजांसाठीचे भोगसामान वाहण्यासाठी निर्माण झालेल्या प्लॅस्टीकच्या पिशव्या, आपल्या खुराड्याच्या जाळीच्या छिद्राला खिडकी समजून तिच्यात वाळत घातलेल्या आणि पिऊन ओकणार्‍या गाड्यांच्या धुराने वर ढकललेल्या केविलवाण्या हवेने उडून पडलेल्या शर्टांपासून ब्रा पर्यंत काहीही.

दोन स्टेशनांच्या मध्ये त्याला वास येतो घाण, कारखान्यांच्या किंवा माणसांच्या विष्ठेचा. त्यातच त्याला दिसतात काही होर्डिंग्ज. चकाकणार्‍या मेटॅलिक कलरच्या टंच गाड्यांची किंवा स्लीवलेस ब्लाऊजवर चार बोटं रुंदीचा पदर घेऊन मिक्सरपासून दागिन्यांपर्यंत काहीही मिरवणार्‍या टंच मॉडेल गृहिणींची किंवा माजाने सुजलेल्या चेहर्‍यामुळे बारीक झालेल्या डोळ्यांतून टंच सत्तासुंदरीचा हव्यास गळणार्‍या राजकारण्यांची. अजस्त्र कारखान्यांच्या अनावर प्रसवशक्तीतून पैदा झालेल्या वस्तूंची तुम्हाला किती गरज आहे ते सांगणारी होर्डिंग्ज, राक्षसी भोगातच सुख आहे याची जाहिरात करणारी होर्डिंग्ज, आपल्या अमानवी प्रचारशक्तीनं माणसाचा हवा तसा चौकोनी ठोकळा बनवणारी होर्डिंग्ज, गिळगिळीत आणि गुळगुळीत जगण्याशिवाय गत्यंतर नाही हे सांगणारी होर्डिंग्ज, जगण्यापेक्षा जिवंत राहण्यालाच आयुष्य म्हणणारी होर्डिंग्ज.

नकळत त्याचं मन भूतकाळाच्या काळ्या गटारीत उतरतं. अडाणी बापाच्या दारुड्या तोंडाचा वास त्याला येतो. दोन वेळच्या जेवणाच्या बंदोबस्ताशिवाय इतर कशाचीही चिंता करणे न परवडणार्‍या आणि लोकांच्या घरी धुणीभांडी करण्यात आयुष्य गेलेल्या आईच्या अंगाला येणारा राखेचा वास त्याला येतो. प्रयत्नपूर्वक शिकताना, शरीर कमावताना झालेल्या अपमानांचा राग त्याला नव्याने येतो, स्वतः व्यक्तिश: बुद्धिमान असूनही आयुष्याच्या काठ नसलेल्या विहीरीच्या खोलीचा अंदाज येण्यापुर्वीच पदरी पडलेल्या, दात पुढं आलेल्या, कुरुप मंद बायकोचा ओशट चेहरा त्याला दिसतो, सापासारखी फुसफुसत सरपटणार्‍या त्याच लोकलच्या लेडीज डब्ब्यात बसलेल्या बायकोच्या मांडीवर झोपलेल्या आपल्या पोराचे मंगोल डोळे त्याच्या पाणीदार डोळ्यांसमोर येतात, पोरासाठी डॉक्टरच्या नरड्यात निम्मा पगार ठुसतानाची तगमग अजून विरलेली नसतानाच दुणावते. प्रत्येक वळणावर विरुद्ध दिशेला घेऊन जाणार्‍या, फुटेस्तवर खाल्लेल्यांना हाताने भरवणार्‍या, जिवंतपणाचं अवास्तव स्तोम माजवून कोट्यवधी लोकांचं जगणं हराम करणार्‍या सगळ्या या नरभक्षक व्यवस्थेचा त्याला तिटकारा येतो. घशात बोटं घालून सगळे नियम, सगळे संकेत, सगळी जगरहाटी मळमळणार्‍या पोटातून तिथेच ओकून टाकावी किंवा पुलावरून लोकल जाताना कचर्‍याची भरलेली पिशवी फेकतात तसं स्वतःला खालच्या गाळात फेकून द्यावं असं त्याला वाटतं. पण आठही बाजूंनी गर्दीत दाबला गेलेला असताना बोट हलवण्याचंही स्वातंत्र्य आत्ता नाही या विचाराने, पिसाळलेल्या कुत्र्याच्या मागच्या पायांवरून गाडी जावी तशी त्याची क्षुब्धता लुळीपांगळी होते. डोळ्यात तरळलेलं पाणी पापण्यांनीच टिपायला तो डोळे मिटतो आणि...

डोक्यावर घणाचा घाव घातल्यासारखा आवाज करत तो स्फोट होतो. त्याचे डोळे आणि तोंड खाडकन उघडतात. कानाच्या पडद्यावर आदळून सर्वभक्षक त्सुनामीसारख्या त्या आवाजाच्या लाटा त्याच्या यूस्टेशियन नळ्यांतून रोरावत तोंडात येतात आणि जीभ, घसा, टाळू, मेंदू सगळं सुन्न होऊन जातं. लोकांनी गच्च भरलेली ती लोकल झिडपिडत रुळांवरून घसरून थांबते. अंगाचा अवयवही हलवायला जागा नसलेल्या त्या एकसंध चरबीच्या गोळ्यासारख्या गर्दीत माणसं धडपडत नाहीत, फक्त एकमेकांवर रेलून दाबली जातात. डब्ब्याच्या भिंतीपाशी उभे काही किरकोळ जीव गुदमरून जगण्याचं नाटक संपवतात. बाकीचे लवकरात लवकर पायांवर सरळ उभं राहून बाहेर पडण्यासाठी वळवळू लागतात. उघड्या दारातून धडाधड उड्या मारायला लागतात. "बाँब बॉम्ब," असा जप केल्यासारखा आवाज चारीबाजूनी घुमतो. जखमेतून रक्त वाहावं तशी बाहेर वाहणार्‍या गर्दीबरोबर तोही बाहेर वाहत येतो. स्फोटाच्या आवाजाने त्याच्या कानात अजूनही चुंई वाजत असतं. बाहेर पडल्यावर त्याला दिसतात माणसांचे अवयव, फाटलेली शरीरं, रक्ताची डबकी, जखमी लोकांचे चित्कार आणि बघ्यांचा कोलाहल. रक्ताच्या दर्शनाने काही भोवळ येऊन पडतात, काही लोक त्या प्रेतांमध्ये आपणही आहोत की काय अशी शंका असल्यासारखी उभी असतात तर काही स्वतःच्या जिवंतपणावर मनोमन खूश होत तुटक्या फाटक्या शरीरांना मरणापेक्षाही भयंकर असं जीवन द्यायच्या खटपटीला लागतात. एका कडेला उभा राहून तो बायकोच्या साडीचा रंग आठवायला लागतो, पोराच्या झबल्याचा रंग आठवायला लागतो. त्याला नक्की आठवत नाही पण दोघांचेही कपडे लालच असावेत असा विचार त्याच्या मनाला चाटून जातो. फुटलेल्या त्या दोन डब्यांच्या समोरून काही अंतरावरून तो सावकाश चालत फेरी मारतो. दुरूनच काही दिसतंय का पाहतो, चादरीत उचलून नेल्या जाणार्‍या जखमींकडे डोकावून बघतो. त्याला बायको सापडत नाही. दोन्ही डब्यांभोवती दोन-तीन फेर्‍या मारल्यावर तो कंटाळतो. मावळलेल्या सूर्याच्या पश्चात साचणारा अंधार आता समोरचं उध्वस्त दृष्य गिळू पाहतो, पण शहरातले दिवे पेटून त्याला रोखतात. त्या काळवंडणार्‍या दृष्यावर आपल्या तुटपुंज्या प्रकाशाचे डाग पाडून आणखी भयाण छटा आणायचा कसोशीने प्रयत्न करतात.

तो रूळांच्या बाजूला असलेल्या टेकाडावर झुडपाशेजारी बसतो. तिथं दिव्यांचा प्रकाश पोचत नाही. खिशातून सिगारेट काढून शिलगावतो. त्या शहराच्या अविनाशी दुर्गंधीपुढे त्या धुराचा वास त्याला हवाहवासा वाटतो. रिकाम्यापोटी दोन कडक झुरके मारल्यावर त्याला गरगरतं आणि चहूबाजूंनी दाटलेल्या अंधारात गजबजलेल्या जगात आता आपण अगदी एकटे आहोत अशी भावना त्याच्या आवळलेल्या पोटातून कारंज्यासारखी थुईथुई उडू लागते. एकटा. स्वतंत्र. आतापर्यंत खुरडत खुरडत इथवर ओढत आणलेलं हे आयुष्याचं ओझं फेकून द्यायला किंवा दूर डोंगराच्या कुशीत किंवा समुद्राच्या कडेवर निरीच्छ जगायला किंवा ज्या व्यवस्थेने जगणं अवघड करून ठेवलं तिच्यातल्या पळवाटा शोधायला, उन्मुक्तपणे शरीराचे चोचले पुरवायला, मनाच्या इच्छा ओरबाडून का होईना पूर्ण करायला. तो स्वतंत्र झालेला असतो. त्याला आनंद वाटत नाही पण मोकळं वाटतं. कॉलेजच्या दिवसात असायचा तसा बिनधास्तपणा त्याच्या झुरक्यात येतो. वर बघून आकाशाच्या तोंडावर धूर सोडताना त्याला शांत शांत वाटतं. तो आता कोणालाही काहीही देणं लागत नसतो. ज्यांनी हा निरर्थक जन्म दिला ते, ज्यांच्याशी इच्छा नसताना आणि प्रयत्न करूनही तुटत नाहीत असे मनाचे नाजूक तंतू जोडले गेले ते सगळे नाहीसे झालेले असतात. आता फक्त तो असतो आणि ही समोरची गर्दी. त्या गर्दीतल्या जंतूंशी मनसोक्त खेळ करायला, वापरून घ्यायला, सूड घ्यायला आणि नंतर मन भरलं की त्या बजबजपुरीतून निघून जायला तो मोकळा असतो.
तो सिगारेट विझवतो आणि उभा राहून खिशात हात घालून चालू लागतो. गर्दी अजून वाढलेली असते. आता पोलीस आणि फायरब्रिगेडच्या गाड्या आलेल्या असतात. जखमींना आणि मेलेल्यांना कोणत्या हॉस्पिटलमध्ये नेलं जातंय ते ओरडून सांगितलं जात असतं. बायकोला आणि पोराला हॉस्पिटलात नेलं असेल असं त्याला वाटतं. तो खिशातून हात काढतो. सैलावलेला त्याचा चेहरा सुकलेल्या चिकूसारखा आक्रसतो, रुंदावलेले खांदे हळूहळू नकळत गोलाई धारण करतात आणि त्याचं शरीर पुन्हा तसं दिसू लागतं; खांद्याला पट्टा लावून मागे काहीतरी जड ओढत चालल्यासारखं. हॉस्पिटलमध्ये तो येतो.

बाहेर पोर्चमध्ये अ‍ॅम्बुलन्स ठणाणा करत येजा करत असतात, माणसं आकांत करत किंवा मेल्या डोळ्यांनी बघत उभी असतात. तो आत जातो. रांगेने ठेवलेल्या मृतदेहांसमोरून चालत जातो. करपलेले, तुटलेले ते मृतदेह पाहून त्याला किळस येत नाही. वाईटही वाटत नाही. या शहराने त्याची नजर केव्हाच मारलेली असते. तिथेही त्याला बायकोपोरासदृष काही दिसत नाही. आजूबाजूला रडणार्‍या, भांबावलेल्या लोकांमधून वाट काढत तो आणखी आत जाऊ पाहतो. एक पोलीस हवालदार त्याला अडवतो, पण तितक्यात दुसर्‍या घुसणार्‍या माणसाला अडवायला हवालदाराला दुसरीकडे पाहावं लागतं. तो अलगद आत जातो. जिवंतपणाचे रक्षक डॉक्टर आणि नर्स पांढर्‍या कपड्यांमध्ये धावपळ करत असतात. जखमी लोकांना तातडीने मलमपट्टी केली जात असते. इथेही जखमी लोकांना रांगेत ठेवलेलं असतं. सगळे एकजात सारखे दिसत असतात, बाहेरच्या रांगेतल्या सारखेच. आत-बाहेर करणारी हवा एवढाच काय तो फरक. तो वॉर्डभर संथपणे नजर फिरवतो. एका कोपर्‍यातून पुढे जाऊन त्याची नजर थांबते आणि पुन्हा वळते. एका स्ट्रेचरवर एक बाई पडलेली दिसते. उजवा पाय तुटलेली. तिच्या पलीकडे तिच्या पोटातून वर आल्यासारखं दिसणारं एक छोटंसं डोकं. त्याचं हृदय एक ठोका आवळून धरतं. घसा कोरडा होऊन आत ओढला जातो. नकळत तो स्वतःला तिकडे ढकलतो. पाय घासत जवळ पोचतानाच त्याला पोराचे मंगोल डोळे दिसतात. फतकल मारून ते मंदपणे स्वतःच्याच हाताशी खेळत असतं. त्याला काहीही जखम झालेली दिसत नसते. त्याचा मतिमंदपणा त्याचं आयुष्य मरणप्राय करण्यासाठी नियतीला पुरेसा वाटला असल्यासारखं. त्याची नजर बायकोच्या भाजलेल्या हातांवरून फिरते. जखमांनी आणखी विद्रूप झालेल्या चेहर्‍यावरून जाते आणि छातीवर स्थिरावते. तिची छाती वरखाली होतेय की नाही ते त्याला ठरवता येत नाही. एकटक निरखून पाहताना त्याला काहीतरी कळत जातं आणि त्याची नजर पाण्यात विरघळू लागते. त्याच्या पायातली शक्ती निघून गेल्यासारखा तो मटकन खाली बसतो आणि स्वतःचे केस मुठीत गच्च धरून ओठ आवळत गदगदून रडू लागतो.

field_vote: 
3.833335
Your rating: None Average: 3.8 (6 votes)

प्रतिक्रिया

कथा आवडली. सविस्तर प्रतिसाद सावकाश देतो.

सर्वप्रथम, या कथेला इतके कमी प्रतिसाद पाहून आश्चर्य वाटलं. लेखकाने निश्चितच काही कष्ट घेऊन विशिष्ट विचार करून एक शैली अंगिकारून कथा लिहिलेली आहे. एका चारोळीमध्ये मावणाऱ्या तरल कवितेला यापेक्षा जास्त प्रतिसाद मिळतो. कदाचित ती वेगळी शैली पचायला जड गेली असेल.

आधी म्हटल्याप्रमाणे कथा आवडली. सुरूवातीचा बीभत्स रसाचा धबधबा थोडा अंगावर आला, तरी ती प्रयत्नपूर्वक केलेली रचना आहे हे जाणवतं. म्हणजे तो धबधबा निर्माण करण्यात लेखक यशस्वी झाला आहे, मला स्वतःला हलका शॉवर आवडला असता.

कथेच्या शेवटात उत्तर न देताही उत्तर देण्याचं तंत्र आवडलं.

मात्र हिच्याकडे मी एका कथेपेक्षा कथाबीजाच्या स्वरूपात बघतो. त्या छोट्याशा प्रवासात आपल्याला त्याच्या आयुष्याविषयीचा वीट फक्त सांगोवांगी कळतो. प्रवास चालू असतानाच स्फोटाकडे चाललेल्या ट्रेनप्रमाणे भकासपणाकडे चाललेलं त्याचं आयुष्य दिसलं असतं तर त्याच्या तात्पुरत्या स्वातंत्र्याच्या जाणीवेशी वाचकाला अधिक एकात्म होता आलं असतं. ओंगळपणा, आयुष्याविषयीची किळस हीदेखील पहिल्या परिच्छेदात फक्त न येता एखाद्या गिळगिळीत अळीप्रमाणे अंगावर हळुहळू चढवता येईल. तेव्हा ही किमान कथा मोठी करून फुलवण्याचं मनावर घ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण आता देतो. पहिल्या दोन तीन ओळींतील वर्णनाने मला पुढे वाचवले गेले नाही. मी बीभत्स वाचत नाही/वाचू शकत नाही असे नाही, तरीही..

आता आलेल्या प्रतिसादांकडे पाहून पुन्हा प्रयत्न करावा असे वाटते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मला ननिंच्या धाग्याला ५ चांदण्या द्यायच्या आहेत. माझे कर्ममूल्य १ आहे. मग मला देता का येत नाही? काल परवापर्यंत मी सर्व धाग्यांना चांदण्या देऊ शकत होते.

अर्थात नंतर नंतर मी स्वतःच्या धाग्यांना ५/५ वाटत सुटले त्यामुळे श्रेणीहक्क काढला गेला की काय? :ऑ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कथा चालू वर्तमानकाळात वर्णन करण्याऐवजी भूतकाळात लिहिली तर जास्त प्रभावी होईल असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त कथा. वाचायला सुरुआत केल्यावर लगेच मी ही लोकलच्या गर्दीत गुदमरल्या सारखे वाटले. राजेश यांच्याशी सहमत - बीभत्स रस जपूनही पहिला भाग जरा लाइट चालला असता. पण लोकलमधल्या माणसांच्या गर्दी चे वर्णन करणार्‍या शब्दांची दाटी ही एकूण शैली आवडली. गोगलगायची प्रतिमा आवडली, आणि तिसर्‍या वाक्यातला अनुप्रास ही. पण त्यानंतर ती पुन्हा पुन्हा आल्यावर कंटाळवाणी वाटली.

शीर्षक, आणि पहिले दोन-तीन परिच्छेद वाचून कथा एका ठराविक रुळावर जाणार असे वाटत होते, आणि तिने घेतलेला ट्विस्ट (मला तरी) अपेक्षित नव्हता. त्यामुळे तो छान जमला आहे असे वाटले. शेवट तसा अपेक्षित होता, म्हणा, पण मला वाटते ही किमान कथा आहे म्हणूनच शेवट अपेक्षित असूनही दमदार आहे.

त्याच्या बायकोचा काय विचार चालू असेल कोणास ठाऊक? तिला ही मतिमंद मुलाचा तितकाच तिटकारा असेल का? प्रथम स्फोट झाल्यावर, आणि स्फोटात नवरा न दिसल्यावर नव्या कोर्‍या पानाला तिनेही क्षणभर पाहिले असावे का?

"बघ्यांचा कोलाहल"; "माजाने सुजलेल्या चेहर्‍यामुळे बारीक झालेले डोळे"; "डब्ब्याच्या भिंतीपाशी उभे काही किरकोळ जीव गुदमरून जगण्याचं नाटक संपवतात." हे सगळे खास!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0