रे माझ्या गळणार्या केसा.... ;)
आम्ही विशी गाठेस्तोवरच केस गळतीनं आम्हाला गाठलं. नक्की काय करायला हवं ते ठरवे पर्यंत काही महिनेच गेले असतील पण आम्ही पार चाळिशील भिडलेलं, बर्यापैकी टक्कल पडायला सुरुवात झालेलं शीर टोपीखाली ठेवून मिरवायला लागलो. केस गळू लागले म्हणजे अगदि पार धडाधड,लगोलग वगैरे पडतात, तसे पडू लागले.
केस गळणे म्हणजे एक एक करुन तुमचे डोक्यावरचे केस खाली (किंवा कुठंही,नको तिथं) पडणे.
झाडाची पानं जशी निष्प्राण होउन खाली पडतात, अगदि तस्सच.
किंवा, खराब बाइंडिंग असेल तर एखाद्या पुस्तकाची पानं कशी सटासट पडातात, अगदि त्याच ष्टायलित भरभर डोक्यावरील केस जात राहणे.
.
तर सांगायचं म्हणजे (होमिपथी,आयुर्वेदिक )उपचार ,उपास तापास,भूत बाधा ,मानसोपचार केश-रंगकाम, जिरेटोप चढवणं(weaving/bonding) असे सर्व उपचार करून, जाणार्या हरेक केसासोबत आम्ही त्याच्या दहापट पैसे घालवून बसलो.
तर अशी ही आमच्या विविध मार्गानं केलेल्या प्रयत्नांची दिशा आणी दशा:-
१.महाविद्यालयाच्या तिसर्या वर्षाच्या मध्याला कुणा हितचिंतकानं हळू हळू केस गळती लागल्याचं निदर्शनास आणलं.
२.काही दिवसातच डॉ सतीश वैष्णव ह्यांची केश समस्येवर "शर्तिया इलाज" सारखी वाटणारी,होमिपथी वाली पेपरतील जाहिरात बघून तिकडं डेरेदाखल.
३.तिथला फायदा दिसायला वेळ लागतोय म्हणल्यावर त्याच्यासोबतच सर्व धार्मिक,दैविक,मांत्रिक असले paranatural उपाय सुरू.
४.दोन्-अडीच वर्षानंतरही सर्व पथ्ये पाळत असून सुद्धा उपयोग होत नाही म्हटल्यावर,उपचार करणार दैवत आम्ही बदललं. पुण्यामध्ये "डॉ बात्रा" (हे ही होमिपथिकच)ह्यांचं शिष्यत्व पत्करलं.
६.सुमारे तीन वर्षे सलग उपचार घेऊन काय उपयोग होत नाय म्हटल्यावर शहाणा माणूस थांबला असता.
आता आम्ही अतिशहाणे असल्यानं आयुर्वेदिक च्या मागं पडलो.
वर्षभर झाले,उपयोग फारसा नाही. आता अनुपम खेर, अमरिश पुरी,राकेश रोशन ह्यांच्या लायनीत लागलोय.(पैशाच्या हिशोबानं असतो तर बरं झालं असतं तिच्यायला.)
७.शेवटी weaving करून घेतलं.कुणा दुसर्याचेच केस दत्तक घेऊन ते आपलेच आहेत असं मानलं.
पण हे सोंग काही दिवसाच्या वर(ख्रं तर काही तासांच्यावर) वठवता आलं नाही.
८.आता hair transplant करण्याचा विचार आहे.(तेव्हढा एकच प्रकार राहिलाय, म्हटलं; सगळ्यांना वाटत सुटलो आहोत तर,cosmetic surgeon ला तरी का उपाशी ठेवावं.)
मिळालेला बोध-
केस गळणं हे क्रियापद "गाळणीतून चहा गळणं" ह्यासारखं घ्यावं.गाळणीत चहा घेऊन कुणाला फिरता येतं का? नाय ना, बस्स मग.
लागलेली गळती (typical mail baldness pattern)सहसा थांबत नाही.
"खल्वाटो निर्धनम् क्वचित्" ह्या उक्तीच्या आशेवर जिवंत राहावं> आज नाय तर उद्या अंबानीच्या पप्पापेक्षाही अधिक पैका आपल्याला मिळेल,ह्यावर विश्वास ठेवावा. नसेल तर.
डोक्याच्या शेतात केस गळू लागले,की चिंतांचं पीक येतं. निदान ते कमी ठेवावं.
काही जणांना नको तिथं केस असतात, काढायचे श्रम पैसे फार जातात,त्यापेक्षा आपल्याला केस नाहीत ह्यातच समाधान मानावं.
शेवटी काहीही झालं तरी केस जाणं ही एक सिरिअस केस आहे.
टाळक्यावरून गेलेले केस बघताना अगदी आपल्या हातची केस दुसर्याच वकिलाकडे गेल्याच्या दु:खापेक्षा हे दु:ख नक्किच मोठं आहे.
मेसचं खाऊन केस जातात हे ऐकून आता तोंडाला फेस आलाय.
"गळणारे केस"ह्या समस्येला कसे करावे face ह्या चिंतेत आम्ही अजूनही आहोत.
ह्या चितेनं अजून केस जाताहेत.
एकदा टक्कल पडलं की मग त्यावर काही उगवण्यापेक्षा घरच्या सपाट फरशीवर भरघोस धान्य उगवणं सोप्प आहे.
केसाला लागलेली गळती, खिशापर्यंत पोहोचू नये म्हणून (दिवसेंदिवस उजाड दिसत जाणारं)थोडं डोकं वापरावं.
.
काही फायदे तोटे(आधीच्या वाक्यात फायदे, लगतच्या वाक्यात तोटे ह्या क्रमाने)
१.अर्थात आपला टाळक्यावरील अर्धचंद्र पाहून काही लोक उगाचच आपल्याला तत्वज्ञ /बुद्धीमान समजतात पण इथेच तर लोच्या आहे.
नेमके मग काही देखणे चेहरेही (आदरानं का असेना) जर्राशे जपुनच,दुरूनच बोलतात.
.
२.शिवाय डोक्यात पावसाचे पाणी मुरत नाही हा फायदा असला
तरीही तेच पाणी धो-धो करुन झोडापतं ना तुळतुळित डोक्याला :( तेले,शांपू,कटिंग यांचे वायफळ खर्च टळतात पण उपचाराचे खर्च वाढतात :(
.
३.केस नाहित म्हटल्यावर उवा कोंडा वगैरे पासून समूळ मुक्तता तरी मिळावी ना? पण छ्या. तेही नाही.
कोंड्यातुन अजुन सुटका मिळाली नाही ब्वा.केस नाहित पण कोंडा आहे! (जरासं भारत सरकार सारखं आहे हो, रस्ते नाहित पण खड्डे आहेत.)
.
४.आरसा नसला तरी फारसे नडत नाही.शिवाय तयार व्हायला वेळ लागत नाही.तुम्ही झोपेतुन उठुन आलात तरी कुणाला पत्ता लागत नाही.
हो; पण देखणे चेहरे आसपास असले तर पुन्हा पुन्हा केस सावरत इम्प्रेशन मारता येत नाही ना.
.
अधिक सविस्तर (जमलं तर उपचार, उपचार प्रकार, लागणारा खर्च आणी त्याचा उपयोग ह्याबद्दल)लिहीनच wig वगैरे फिट करून आल्यावर.
इतरत्र पूर्वप्रकाशित>>
*मुळात लिहायला घेतलं तेव्हा मला मिळालेल्या माहितीवरून एक लेख, लेखमाला असं काहीतरी टाकायचा विचार होता. होमिपथिक, आधुनिक वैद्यक, आयुर्वेदवाले ह्या सर्वांनी केसांची निगा कशी राखावी ,किंवा काय उपाय आहेत ह्यावर बरीच माहिती दिली. विविंग्,बॉन्डिंग,ट्रान्सप्लांट, डायरेक्ट हेअर इम्प्लांट ह्याबद्दल उपचार उपलब्ध असूनही धड माहिती कुठेच दिसत नाही. विशेषतः एका परिस्थितीत जी गोष्ट योग्य ठरु शकते, त्याबद्दल इतर लोक ब्र सुद्ध काढत नाहित असं लक्षात आलं. आपल्याकडे असलेली माहिती निदान पब्लिश करावी असा हेतू होता. निदान "अमुक अमुक उपचार उपलब्ध आहेत" हे ओरडून जाहिर करावसं वाटत होतं.(काही नीच उपचार करणारे, उपचाराच्य नावानं लुबाडणारे ह्यावर आमच्याशिवाय "काहीच" उपाय नाही असे बडबडतात. त्यावर विश्वास ठेवल्याने नंतर आपण मूर्ख बनवले गेल्याचे जाणवत राहिले. ) आज मी जसा आहे तसा मूळ चेहराच घेउन फिरतोय; पण गरज लागल्यास ह्य पृथ्वीतलावर नैसर्गिक म्हणता यावेत असे, पुन्हा उगवत राहणारे केसही डोक्यावर येउ शकतात हे ठाउक आहे. भलेही मी उपाय करीन किंवा नाही; पण "इतर पॅथींमध्ये उपचार नाहितच; आम्हालाच शरण ये. गेले ते गेलेच. आता कधीही पूर्वीच्या धर्तीवर चेहरा दिसूच शकणार नाही वगैरे " असे दबावतंत्र सरळ सरळ वापरले जाते ही हरामखोरी आहे. असे ऐकून विशेष मजबूत मनोवस्था नसेल तर अल्पकाळ का होइना नैराश्य/डिप्रेशन येतेच.सामान्य आयुष्यावर परिणाम होतोच.
*
टकले लोकही हँडसम दिसू शकतात
टकले लोकही हँडसम दिसू शकतात (पण हे मानण्याची आपल्याकडे फार मानसिकता नाही; जसं काळ्या वर्णाच्या मुलीही फार सुंदर असू शकतात). एकेकाळी मुलांनी मिशा उडवल्यावर त्यांना घरचे त्रास देत असणार. आता काही लोकांना केसांच्या बाबतीत होतो.
चेहेर्यावरून मनुष्याची बुद्धी दिसत असेल तर वर्ण, केस यांना फार महत्त्व द्यावं असं मलातरी वाटत नाही. ज्यांना बुद्धीबद्दल फार प्रेम नाही त्यांची मतं मी फार विचारात घेत नाही.
माझ्या भावाने, केस विरळ व्हायला झाले म्हणून, टक्कल केलं. तो आता विरळ केसांपेक्षा अधिक हँडसम दिसतो असं माझं आणि त्याच्या बायकोचंही मत आहे. टक्कल करण्याची कल्पना मूळ तिचीच. त्याच्या अनुभवाप्रमाणे तुळतुळीत टक्कल, जे हँडसम दिसतं, ते हाय-मेंटेनन्स असतं.
तुला काय हवं ते कर रे तू! बिनधास्तपणा असेल तर काय वाट्टेल ते मिरवता येतं.
टेस्टोस्टेरॉन..
जरा जास्तच असलेत तर टक्कल पडते असे म्हणतात ;)
मिनॉक्क्षिडिल इ. औषधे ट्राय करू नका. लिबिडो कमी होते म्हणे. त्यापेक्षा टक्कल परवडले.
(चु.ची.दु. : (typical mail baldness pattern)सहसा थांबत नाही. : typical MALE baldness pattern हवं.)
अवांतर : एक किस्सा. डॉक्टरांनी स्वतः सांगितलेला. (हे मलाही २० वर्षे तरी सिनियर आहेत.)
तर या प्रथितयश डॉक्टरांनी (त्यांच्या तरूणपणी) मारे सिंगापूरहून अगदी रिअल दिसणारा विग आणला. परदेशवारी करून परत येऊन साहेबांनी प्र्याक्टिस परत सुरू केली. दवाखान्यात बसल्यावर पहिले २-४ पेशंट पाहून झाले की मग दिवसभर सक्तीचा आराम करावा लागत असे. पेशंटच फिरकेनात दवाखान्यात. असे ३-४ दिवस झाल्यावर साहेबांना काळजी वाटू लागली, की अरेच्या, आपली प्र्याक्टीस अशी अचानक कमी का झाली आहे?
चौकशीअंती निष्पन्न झाले, की पहिले पेशंट बाहेर गेल्यावर 'भाउ, आत दुसराच कुणी बाबा बसला आहे. आपले डाक्टर नाहीत.' अशी बातमी पसरवत होते, अन मग जमा झालेली गर्दी गायब होत होती.
साहेबांनी तो विग माळ्यावर टाकला तो आजतागायत.
हौ....
मिनॉक्क्षिडिल इ. औषधे ट्राय करू नका
वो पताय अपनेको. दीनानाथ मंगेशकर वाल्या डागतरानच सांगितलं आणि कोंडा सावरायला म्हणून सौम्य p h असलेल्म सॅलिसिलिक अॅसिड दिलं.
"केस वाढणार नाहित, पण शिल्लक आहेत ते टिकायला मदत होइल ह्यामुळंंइदान कोंडा कमी राहिल." असं स्पष्ट सांगितलं.
ह्या प्रमाणिकपणावर आपण फिदा आहोत.
काही थोतरिचे भलभलते फोटो दखवत लुबाडत होते. म्हणे ढिमका ढिमका औषधी आहे, निस्ती चोळा हवी तिथे नि घ्या दोन साखरेच्या गोळ्यासोबत, वाटेल तिथे केस उगवतील.
वरून infra red laser beans वापरून लुटायचे धंदे सुरु होतेच.
इतकं टेन्शन घेण्याची काय गरज
इतकं टेन्शन घेण्याची काय गरज ? उगाच अर्धचंद्र वगैरे ठेवण्यापेक्षा रुबाबदार टक्कल काय वाईट. ट्रान्सपोर्टर मधला हँडसम टकलू हिरो पाहा किंवा गेला बाजार भरत दाभोळकर पहा.