Skip to main content

काही मुद्दे / प्रत्युत्तर

मी वाचलेला भयंकर एक ब्लॉग या चर्चेतलं तेंडुलकरांच्या नाटकांसंदर्भातलं रोचक अवांतर वेगळं काढलं आहे.

(वस्तुतः, 'I don't owe the world an explanation' हे वैयक्तिक ब्रीद असल्याकारणाने, या स्पष्टीकरणवजा विवेचनात्मक नि लांबलचक प्रतिक्रियेच्या टंकनश्रमाचे काहीच कारण नव्हते - तसेही, त्या प्रतिसादावरून जो चाहेल तो ग्रह करून घेण्याचे प्रत्येक वाचकाचे स्वातंत्र्य अबाधित आहेच - पण तरीही, त्यातून काही रोचक नि (स्वतःसच) मनोरंजक शक्यता दिसल्याकारणाने त्या मार्गाने जाण्याचे मनावर घेतलेच आहे, So Help Me God!)

अदितीचं पहिलं वाक्य (तुम्हीही ते क्वोट केलं आहे) एकदम माझ्या मनातलं होतं. मांसभक्षण स्वीकारलं की गाय बैल म्हैस वासरु मेंढी डुक्कर कोंबडी मासे या सर्वात असा वेगवेगळा, विशेषतः तिरस्कार बेस्ड फरक का करावा. (चव आवडते / आवडत नाही / काटे असतात / वातड इत्यादिंवर मतभेद ठीक.)

सर्वप्रथम, माझ्या उपरोल्लेखित प्रतिसादाचा आणि गोमांसभक्षणाच्या (किंवा मांसभक्षणाच्या किंवा फॉर द्याट म्याटर कसल्याही भक्षणाच्या) समर्थनाचा अथवा विरोधाचा काहीही संबंध नाही, हे स्पष्ट करू इच्छितो. ३_१४तैंच्या प्रतिसादातील 'व्यवस्थित शिजवलेलं खात आहेत तोपर्यंत ठीक आहे, कच्चं मांस, अंडी यांच्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता वाढते.' या एकाच (फिकट करड्या रंगातील) वाक्याभोवती तो संपूर्ण प्रतिसाद घुटमळत आहे, हे वस्तुतः कोणाही साक्षर वाचकास पुरेसे स्पष्ट व्हावे. पण तरीही, त्या प्रतिसादात चुकून जर कशाचे समर्थन असलेच, तर फार फार तर ते केवळ कच्चे अथवा अर्धवट शिजवलेले (उदा. मीडियम रेअर ष्टेक, किंवा 'सुशी' अर्थात कच्चे मासे) खाण्याचे असू शकेल. किंबहुना हे त्याचे समर्थनही नव्हे, तर केवळ 'असे खाणारेही (आमच्यासारखे) जगात असू शकतात, किंबहुना असे खाणारी आख्खी संस्कृतीही असू शकते, आणि आमचे (किंवा त्यांचे - बोले तो, असे खाणार्‍या संस्कृतीचा भाग असणार्‍यांचे) त्याने आजतागायत काही नुकसान झाले असल्याचे (निदान आमच्या - किंवा असे खाणार्‍या संस्कृतीचा भाग असणार्‍यांच्या - दृष्टिकोनातून) दृष्टिपथास येत नाही, सबब आपल्या विधानाचा फेरविचार व्हावा' एवढाच त्या संपूर्ण प्रतिसादाचा मतलब आहे. आणि त्या अनुषंगाने, 'कच्चे किंवा अर्धेकच्चे म्हणजे किती कच्चे किंवा अर्धेकच्चे' याचा दृष्टान्त (शब्द चुकला काय?) म्हणून, आपण उल्लेखिलेली उदाहरणे ही ओघानेच आलेली आहेत, नि ती तशी येणे हे माझ्या लेखी - माझा मुद्दा पुरेसा स्पष्ट करण्याच्या हेत्वर्थ - अपरिहार्य आहे.

(माझ्या प्रतिसादाचा नेमका मुद्दा हा ३_१४तैंच्या (हे स्पष्टीकरण दिल्याविनासुद्धा) लक्षात आला असावा, असा माझा वैयक्तिक अंदाज आहे. नि त्या परिस्थितीत, माझ्या प्रतिसादाच्या ईप्सित गंतव्यस्थानी इष्ट तो अर्थबोध झाला, अशा अर्थी, माझ्या प्रतिसादाचे उद्दिष्ट सफल झाले असावे, असे समाधान मानावयास मी मोकळा आहे. इतरांस यातून निराळा काही अर्थबोध झाला असल्यास, 'माझे प्रतिसाद हे हायकूसारखे असतात, ज्यासत्यास आपापल्या दृष्टिकोनाप्रमाणे वेगवेगळी अनुभूती मिळते' या नव्या माहितीतून मला परमसंतोष होतो.)

ही वर्णने कोणांस किळसवाणी वाटू शकतात, याची मला पूर्ण कल्पना आहे. किंबहुना कोणास काय किळसवाणे वाटावे, हे व्यक्तिसापेक्ष आहे, हे मी समजतो, आणि आपणास काय किळसवाणे वाटावे, हे ठरवण्याच्या प्रत्येकाच्या स्वातंत्र्याचाही मला आदर आहे. आणि म्हणूनच, प्रस्तुत वर्णने ही शक्य तितक्या अंशी फिकट करड्या रंगात ठेवण्याचाही प्रयत्न केला होता. आता, फिकट करड्या रंगातील लेखन हे अधिक उत्साहाने वाचले जाते, हा दैवदुर्विलास आहे.

(किंबहुना, प्रस्तुत वर्णने ही अदृश्य ठशात ठेवण्याचा विचार एकदा मनात आला होता. परंतु मग ती वर्णने हमखास वाचली जातील, नि न जाणो, कोणाच्या भावना दुखावतील, म्हणून तो विचार डावलला. कदाचित ही वर्णने सामान्य काळ्या ठशातच ठेवली असती, तर बरे झाले असते, असे आता पश्चाद्दृष्टीतून वाटते.)

त्याउपर जाऊन कुत्रा शिजवण्याचं रीतसर वर्णन.. कुत्र्याचे वृषण भाजून खाताना ते फुटून त्यातून किंचित द्रव बाहेर आला पाहिजे पण अधिक शिजले की ते कडक आणि कडवट होतात.. अशा स्वरुपाच्या तपशिलांनी काही खास मुद्दा सिद्ध होईल असं मला वाटत नाही. पण जो अजून तितपत "लिबरल" झालेला नाही त्याला येणारी शिसारी मात्र बरीच असेल.

आपला मुद्दा पूर्णपणे समजतो. परंतु काही गोष्टींची एक वेगळी बाजू तरीही मांडावीशी वाटते.

एक म्हणजे, अशा प्रकारच्या तपशिलांनी काही खास मुद्दा सिद्ध होतो किंवा नाही, याचा निवाडा करताना, ते तपशील मांडण्यामागे काय वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका असू शकतात, याबाबतच्या सर्व शक्यता विचारात घेणे एखाद्या सुजाण न्यायाधीशास इष्ट ठरावे. अन्यथा, 'आणखी एक स्वैर मत' यापलीकडे त्या निवाड्यास फारसा अर्थ राहत नाही. (अर्थात, प्रत्येकाचा मताधिकार मान्य आहेच. माझा स्वैर मताधिकार जसा मला मान्य आहे नि मला प्यारा वाटतो, त्याचप्रमाणे इतरांच्या स्वैर मताधिकाराचे मला वावडे असण्याचे काहीच कारण मला दिसत नाही.)

आपणच इतरत्र म्हटल्याप्रमाणे, अशा प्रकारचे तपशील (मीच असे नव्हे, तर कोणीही) मांडण्यामागे, एका प्रकारची प्रतिमाभंजक वृत्ती ही एक शक्यता असू शकते. अशी शक्यता किंवा अशा शक्यतेचा विचार हा डिस्काउंटेबल आहे, कचर्‍याच्या पेटीत टाकण्यायोग्य आहे, असा माझा मु़ळीच दावा नाही. ती एक पूर्णपणे वैध शक्यता आहे. ('माझ्या लेखी जी प्रतिमाच मुळात अस्तित्वात नाही, आणि/किंवा माझ्या लेखी जी प्रतिमा अगोदरच भंगलेली आहे, तिचा भंग - आणि/किंवा पुनर्भंग - करणे कसे शक्य आहे?' असा प्रतिदावा मी अर्थातच करू शकतो, परंतु करू इच्छीत नाही.) मात्र, तेवढी एकच शक्यता नसून, इतरही काही शक्यता, स्वतंत्रपणे अथवा या शक्यतेबरोबरच, कार्यरत असू शकतात, एवढेच प्रस्तुत न्यायालयासमोर मांडण्यास मी परवानगी मागू इच्छितो.

'व्यवस्थित शिजवलेलं खात आहेत तोपर्यंत ठीक आहे, कच्चं मांस, अंडी यांच्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता वाढते.' या दाव्याचा प्रतिवाद 'मी स्वतः बर्‍यापैकी कच्चे अथवा अर्धेकच्चे मांस खाल्लेले आहे, अनेकजण खातात, तसे नियमितपणे खाणार्‍या संस्कृतीही आहेत नि त्यांत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरल्याचे निदर्शनास आलेले नाही' अशा प्रकारच्या प्रतिदाव्याने करताना, दाव्याच्या पुष्ट्यर्थ 'अर्धेकच्चे मांस म्हणजे किती प्रमाणात अर्धेकच्चे मांस', तर 'शिजवल्यानंतरही ज्यातून स्वल्प प्रमाणात अजूनही रक्तस्राव होऊ शकतो इतके अर्धेकच्चे मांस' हा तपशील माझ्या मते मुद्द्याच्या सिद्धतेच्या अनुरोधाने मुळीच अवांतर नाही; किंबहुना आवश्यक आहे. आणि त्याप्रमाणे मी तो मांडलेला आहे. त्यात मला अनावश्यक, अवांतर अथवा गैर असे काहीच दिसत नाही. (जाहीरपणे मांडल्या गेलेल्या आणि मला न पटलेल्या मुद्द्याचा जाहीर प्रतिवाद मी करू नये, असा काही दावा असल्यास गोष्ट वेगळी. तसा दावा असल्यास मला तो अजिबात मान्य नाही, आणि मी तो ग्राह्य अथवा माझ्यावर बंधनकारक धरत नाही, हेही या निमित्ताने स्पष्ट करू इच्छितो.) त्यापुढील विस्तृत वर्णने ही माझ्या मते माझा मुद्दा खुलवण्यास मदत करतात असे मला वाटते, नि तो माझ्या शैलीचा अविभाज्य भाग आहे - दुर्दैवाने मजजवळ एकच शैली आहे, नि माझ्या या शैलीदारिद्र्याची मला अजिबात लाज वाटत नाही हे मी प्रांजळपणे कबूल करतो - मात्र, ही पुढील विस्तृत वर्णने ही पूर्णपणे आवश्यक आहेत असा माझाही दावा नाही. मात्र, काहीशी अवांतर असली, तरी आनुषंगिक असल्याने - आणि त्यातही माझ्या एकमेव शैलीचा ती अविभाज्य भाग असल्याकारणाने - ती न मांडण्याचेही काहीच कारण मला दिसत नाही. अर्थात, त्यामुळे काहीजणांना किळस वाटते याची दखल घेऊन, अशा मंडळींना त्याची तोशीस पडू नये याकरिता मी ती वर्णने सहज वाचता न येण्यासारख्या फिक्या करड्या रंगात टंकण्याची दक्षता घेतलेली आहे, हे लक्षात घेऊन अशा मंडळींनी ही सहज वाचता न येण्यासारखी वर्णने - विशेषतः फिकट करड्या ठशात नसलेल्या त्यापूर्वीच्या शेवटच्या विधानातून पुढे काय वाढून ठेवलेले आहे याची पूर्ण कल्पना येण्यासारखी असताना - न वाचण्याचे सौजन्य दाखवून सहकार्य केल्यास उभयपक्षी फायद्याचे ठरेल, एवढेच नम्रपणे सुचवू इच्छितो.

असो. हा मुद्दा - पक्षी: अशा लिखाणातून काही साध्य होते का? - हा ('हो, होते' अशा प्रकारे) ठाम प्रतिवाद करता येण्यासारखा असला, तरी माझ्या मते त्या मानाने गौण आहे. त्याहून महत्त्वाचा मुद्दा काही जणांना त्यातून येणार्‍या शिसारीचा आहे.

या निमित्ताने एक किस्सा कदाचित या संदर्भात उद्बोधक ठरू शकेल, या कारणाने येथे नमूद करण्याची परवानगी मागतो. थोडा लांबलचक असू शकेल, सबब धीर धरण्याची विनंती करतो. (तसेही, मी लिहिलेले काही कधी लांबलचक नव्हते? पण ते असो.)

महाविद्यालयाच्या निमित्ताने मी काही वर्षे महाराष्ट्राबाहेर, वसतिगृहावर होतो. आजूबाजूस मराठी ऐकावयास मिळण्याची शक्यता कमी (महाराष्ट्रातून आलेले जे काही मूठभर सहाध्यायी असतील, तितपतच.), आणि मराठी वाचावयास मिळण्याची शक्यता त्याहूनही कमी - जवळजवळ नगण्य. अर्थात, त्याने फार मोठे असे काही बिघडत होते अशातला भाग नव्हता, पण कधीकधी उबळ अनावर होई. (अशी उबळ त्यापूर्वी पुण्यात असताना कधी अनावर झाल्याचे तर सोडा, पण आल्याचेही आठवत नाही. पण हे काहीसे अवांतर झाले.)

तर या उबळीचे शमन म्हणून, महाविद्यालयाच्या पहिल्या दोन वर्षांत (पुढे उबळ काहीशी ओसरली. असो.), महाविद्यालयाच्या ग्रंथालयाच्या अत्यल्प मराठी पुस्तकसंग्रहातून जे जे म्हणून काही हातास लागले, ते ते सर्व (फारसे नव्हतेच, तरीही) अधाशासारखे वाचून काढले. अगदी ना.सी. फडक्यांपासून ते विजय तेंडुलकरांपर्यंत काय वाटेल ते वाचले. आता त्यातील बहुतांश तपशील (माझ्या सुदैवाने) विस्मरणात गेलेले आहेत, परंतु त्या संवेदनक्षम वयात त्या लेखनाबद्दल आणि लेखकांबद्दल झालेली इंप्रेशने चांगलीच लक्षात आहेत.

तर त्या पुस्तकांपैकी विजय तेंडुलकरांचे 'गिधाडे' हे असेच एक नाटक. आता तपशील आठवत नाहीत, पण जे काही धूसर आठवते, आणि अर्थातच त्यातूनही त्या वयात (साधारणतः वर्षे अठरा ते एकोणीस) मला जे काही समजले, त्याप्रमाणे, एका अतिश्रीमंत परंतु नैतिक अधोगतीस चाललेल्या मोठ्या संयुक्त (नक्की आठवत नाही, परंतु बहुधा औद्योगिक) कुटुंबातील अत्यंत विकोपाला आणि पराकोटीच्या विकृत थराला गेलेल्या गृहकलहांचे चित्रण त्यात आहे. बाकीचे जाऊ द्या, परंतु त्यातील एक प्रसंग अजूनही मनात घर करून आहे, तो म्हणजे (पात्रांची नावे वगैरे किरकोळ तपशील आता लक्षात नाहीत, पण) अशाच एका गृहकलहाच्या प्रसंगी नणंद आपल्या भावजयीच्या गरोदर पोटावर सणसणीत लाथ मारते, तो. (बाकीचे अर्वाच्य तपशील आता नीटसे लक्षात नाहीत, तेव्हा ते सोडून देऊ.)

हा प्रसंग मला तेव्हाही शिसारी आणणारा वाटला, आजही वाटतो. किंबहुना, नाटक - आणि खास करून त्यातील तो प्रसंग - वाचल्यावर (हो - नाटक नुसते वाचलेलेच आहे. तेही लायब्रीतून पुस्तक फुकटात आणून. असली नाटके थेटरात जाऊन पाहण्याचे धारिष्ट्यही नाही आणि त्यावर कष्टाचे पैसे बरबाद करण्याची इच्छाही नाही. आणि असली पुस्तके विकत घेऊन दिवंगत श्री. तेंडुलकरांच्या इष्टेटीत भर घालण्याची काही गरजही वाटत नाही. पण ते एक माझे स्वैर मत म्हणून तूर्तास सोडून देऊ.) माझ्या मनात आपल्यासारखेच काही प्रश्न निर्माण झाले. की बाबा (१) हे असले प्रसंग - तेही एखाद्या काल्पनिक कथानकात - घालून नेमके काय साध्य होते? (२) मुळात हे असले नाटक तरी कशाकरिता लिहिले? म्हणजे, काल्पनिकच नाटक आहे, कल्पनाच करायच्या तर असल्या घाणेरड्या कल्पना कशासाठी करायच्या? हे असले नाटक कल्पून प्रसवणार्‍याची विचारसरणी किती विकृत असेल? (३) हे असले नाटक थेटरात पहायला कोण जात असेल? आपण होऊन, कोणीही सक्ती न करता, पैसे देऊन या असल्या कशाचातरी आस्वाद घ्यायला जाणार्‍यांची मानसिकता ती नेमकी काय असेल? (किंबहुना, त्या काळी अलूरकरांचा धंदा जोरात असल्याकारणाने, कानाशी सतत वाजणार्‍या - घरून नेलेली क्यासेट! - पु.लं.च्या 'रावसाहेबां'चाही प्रभाव मनावर खूपच होता, त्यामुळे 'हे असले घाण नाटक लिहिणार्‍या फुल्याफुल्याफुल्याला उलटे टांगून फुल्याफुल्याफुल्या' छापाचाही विचार त्या क्षणी मनास चाटून गेला, हे कबूल करावयास लाज वाटत नाही. आज, का कोण जाणे, तसे वाटत नाही, पण ते एक असो.)

पुढे 'सखाराम बाइंडर' वाचले. ते नाटक आता अजिबात आठवत नाही, परंतु त्यातून 'गिधाडे' वाचल्यानंतरचे इंप्रेशन कायम होण्यापलीकडे विशेष काही घडले नाही, एवढे चांगलेच लक्षात आहे. पुढे 'शांतता' वाचले. वाचून किळस वगैरे आली नाही, नाटक म्हणून तितके वाईटही वाटले असे म्हणू शकणार नाही, परंतु तरीही 'का?????' या प्रश्नाने पिच्छा सोडला नाही. बोले तो, हा मनुष्य - and I employ the term loosely - का लिहितो? याच्या डोक्यात या असल्याच कल्पना का येतात? दुसरा काही विचार - काही 'नॉर्मल' माणसांचा वगैरे - हा इसम करूच शकत नाही का? हे असे लिहून यास नेमके काय साध्य होते? (नाही म्हणायला, 'अशी पाखरे येती' आणि काही अंशी - पण काही अंशीच - 'घाशीराम कोतवाल' ही त्या काळात मला - फुकटात! - वाचायला मिळालेल्या तेंडुलकरांच्या नाटकांपैकी त्यातल्या त्यात बरी वाटली, नाही असे नाही. पण तेवढे दोनच अपवाद. आणि एकंदरीत श्री. विजय तेंडुलकर या व्यक्तीबद्दल झालेले तेव्हापासूनचे वाईट इंप्रेशन कायम आहे.)

पण माझे - आणि कदाचित माझ्यासारख्या अनेकांचे, कदाचित वेगवेगळ्या कारणांसाठी - इंप्रेशन वाईट होते, म्हणून - फार कशाला, मला किंवा माझ्यासारख्या अनेकांना किळस वाटते, म्हणून - श्री. तेंडुलकर हे आपले काहीबाही लिहायचे थांबले काय? त्यांनी पर्वा केली काय? करावयास पाहिजे होती काय?

त्यानंतर मध्यंतरी एवढ्याएवढ्यातच कधीतरी या मराठी आंतरजालावर तेंडुलकरांची, त्यांच्या नाटकांची प्रशंसा करणार्‍या चर्चा, समीक्षा पहावयास मिळाल्या. अधूनमधून अगदी 'गिधाडे' नि 'सखाराम बाइंडर'बद्दलही बरे बोलणारे प्रतिसाद दिसतात. अचंबा होतो. वाटते, 'ज़माना बदल गया है, हं!' की कदाचित मीच वेगळा आहे, कोण जाणे!

असो. तेंडुलकरांची, त्यांच्या नाटकांची प्रशंसा करणार्‍यांशी माझे काही वाकडे नाही. माझ्याप्रमाणेच त्यांनाही स्वैर मताधिकार आहे, आणि तो मला मान्य नसण्याचे काहीच कारण नाही. किंवा, in the ultimate analysis, तेंडुलकरांशीही माझे काही वाकडे असण्याचे कारण नाही. शेवटी त्यांची नाटके खपली, हे महत्त्वाचे, आणि असे नाटक खपते म्हटल्यावर त्याप्रमाणे त्यांनी तसे लिहिले, यातही मला गैर असे काही दिसत नाही. शिवाय तत्कालीन किंवा भविष्यातील समस्त वॉनाबी समीक्षकांची त्यातून कायमची सोय झाली, हाही फायदा दुर्लक्षिण्यासारखा नाही. तेव्हा, तेंडुलकरांबद्दलही काहीही म्हणणे नाही, आणि येथे तो मुद्दाही नाही.

सांगण्याचा मतलब एवढाच, की 'गिधाडे'मधील उपरोल्लेखित प्रसंग काय, किंवा तेंडुलकरांच्या लिखाणात इतरही अनेक ठिकाणी जे काही आहे, ते काय, त्या मानाने मी येथे जे काही लिहिलेले आहे, ते खूपच मिळमिळीत आहे. शिवाय, तेंडुलकरांनी उपरोल्लेखित टिकाणीं जे काही लिहिलेले आहे, ते केवळ बीभत्सच नव्हे, तर कपोलकल्पित बीभत्स आहे, आणि त्यातही, अर्थार्जनार्थ लिहिलेले बीभत्स आहे. माझे तसे नाही. मी प्रसंगी खरोखरी जे खातो, त्याचे (आणि त्याबरोबर येणार्‍या माझ्या येथील - किंवा माझ्यावरील - कौटुंबिक प्रसंगाचे), त्या खाण्याप्रतीच्या (आणि माझ्या कुटुंबाप्रतीच्याही) पूर्ण जिव्हाळ्यातून लिहिलेले यथार्थ वर्णन आहे. त्यातून मला कसलीही अपेक्षा नाही - अर्थार्जनाची तर नाहीच नाही. किंबहुना, इतरांनी ते वाचावेच, असाही माझा आग्रह नाही. केवळ माझ्या मनोरंजनाकरिता मी माझ्या मनाला येईल ते लिहितो, लिहिलेले आहे, नि लिहीत आलेलो आहे.

पण तेंडुलकरांनी, दळवींनी भयंकर असे काही लिहिले, स्टेजवर गरोदर स्त्रीच्या पोटावर सणसणीत लाथ मारवली किंवा ऑफस्टेज बलात्कार घडवला, तर लोक पैसे टाकून ती नाटके बघायला जातील, एवढेच नव्हे, प्रशंसात्मक समीक्षा लिहितील, चर्चा, प्रतिसाद पाडतील. ('अहाहा! तेंडुलकर म्हणजे काय लेखक होता! वाहवा!' असो बापडा!) पण हम जो थोड़ी सी पी के जरा झूमे?

असो. लोकांचे असेच असते. चालायचेच. (किंवा, पु.लं.नी म्हटल्याप्रमाणे, 'कारण शेवटी आम्ही भटेंच. त्याला काय करणार?')

यावर तुम्ही विचार करता की डिफेन्समधे जाता यावरुनही तुमची अधिक ओळख होईल..

माझी ओळख आपणांस कशी असावी, यावर मी भाष्य ते काय - नि काय म्हणून - करावे? ते स्वातंत्र्य आपणांस आहेच.

अशा वेळी कशा प्रकारची चर्चा किंवा विधानं जास्त योग्य ठरावीत हे पाहू:

योग्य विधानप्रकारः

आधी नमूद केल्याप्रमाणे, दुर्दैवाने माझ्याजवळ एकच शैली आहे, त्यामुळे जे लिहिले त्यापेक्षा वेगळे असे काही लिहिणे हे मला शक्य नाही.

तरीही, आपला सल्ला मोलाचा आहे. किंबहुना, या बाबतीतील आपली (माझ्याहून खचितच उजवी) गती लक्षात घेता, इतःपर या संकेतस्थळावरील माझे सर्व प्रतिसाद हे कृपया आपणच घोस्टराइट करू शकाल काय?

फिर, आइंदा हम कुछ नहीं लिखेगा|


तळटीपा:

(किंवा कदाचित, लोकांनी आपण लिहिलेले आवर्जून वाचावे या उद्देशातून आपण लिहिलेल्या जाड ठशातील अधोरेखिताकडे लोक ढुंकूनही पाहत नाहीत, या पूर्वानुभवातून शहाणपणा घेऊन, प्रस्तुत वर्णने ही जाड ठशात अधोरेखित करणे हे अधिक इष्ट ठरले असते काय?)

याचा अर्थ माझ्यावरील प्रतिमाभंजक वृत्तीचा आरोप मी मान्य करतो, असा नव्हे. तो आरोप मी मान्यही करत नाही, आणि अमान्यही करीत नाही. त्या आरोपाकरिता माझा nolo contendereचा अर्ज (pleaचे दुबळे शब्दांतर) मी न्यायालयासमोर दाखल करू इच्छितो. केवळ, अशी शक्यता अथवा अशा शक्यतेचा विचार हा अजिबात अवैध नाही, या आणि एवढ्याच दाव्यास मी सहमती दर्शविलेली आहे.

(त्या वयात 'ब्राह्मणद्वेष' वगैरे प्रकार समजण्याची अक्कल नव्हती. आणि आजही, बाकी काहीही असो, परंतु 'ब्राह्मणद्वेष' हा तेंडुलकरांच्या लेखनामागील इंपेटस असावा, असे वाटत नाही, 'घाशीराम कोतवाल' नॉटविथ्ष्ट्यांडिंग.)

पुढील काही प्रेडिक्टेबल आरोपांना तोंड द्यावे लागण्याआधी एक गोष्ट स्पष्ट करणे येथे प्राप्त आहे. हे विधान करताना स्वतःची विजय तेंडुलकरांशी तुलना करण्याचा माझा कोणताही मानस नाही. काय आहे, की माझी स्वतःची पातळी (फारशी ग्रेट नसली, तरी) काय आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे, नि त्या माझ्या पातळीबद्दल (मराठीतः लेव्हल) मला आदर आहे. तेंडुलकरांशी स्वतःची तुलना करून माझ्या स्वतःबद्दलच्या आदरास धक्का लावण्याचे काडीमात्र कारण मला दिसत नाही. असो.

कितीही 'वॉनाबी' वगैरे म्हटले, तरी शेवटी समीक्षकांशीही माझे काही वैर नाही. शेवटी माझ्याप्रमाणेच त्यांनाही स्वैर मताधिकार आहेच. त्यामुळे, I may not agree with them, but I shall defend to death their right to be wannabes.

कोणा प्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्तीचे असेच कायसेसे वाक्य आहे. कोण बरे ती व्यक्ती? निश्चित आठवत नाही. स्थानिक इतिहासअभ्यासकांनी कृपया (जमल्यास) खुलासा करावा.

तेंडुलकरच कशाला? मध्यंतरी काही वर्षांपूर्वी येथे अटलांटात जयवंत दळवींच्या कोणत्याशा नाटकाची - नाटक नेमके कोणते, ते आता आठवत नाही - हिंदी आवृत्ती पहावयास मिळाली. नाटकाच्या पहिल्याच अंकाच्या शेवटी ऑफस्टेज बलात्कार! आणि खलनायकाच्या भूमिकेत - दुसरे कोण? - नाना पाटेकर! पुढचे पाहण्याची इच्छाही नव्हती आणि ताकदही नव्हती, सबब नाटक तसेच सोडून सपत्नीक घरी परतलो. ही असली नाटके का लिहितात लोक, कोण जाणे? कदाचित स्वतःच्याच अपुर्‍या राहिलेल्या कामना त्यातून जगण्याचा प्रयत्न करत असावेत की काय, नकळे.

तेंडुलकरांचा पोटापाण्याकरिता इतर काही व्यवसाय असल्यास मला कल्पना नाही. परंतु या नाटकांच्या प्रयोगातून त्यांना काही अर्थप्राप्ती झाली नाही, असे त्यांच्या चाहत्यांनी शपथेवार लिहून द्यावे - आपले च्यालेंज आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 08/09/2012 - 02:31

तेंडूलकरांची नाटके वाचण्यास आपण मला उद्युक्त केलेत असा एक फायदा या धाग्यामुळे झाला. थोडक्यात अनिता पाटील यांचा दुर्लक्ष करण्याची लायकी असणारा ब्लॉग भयंकर आहे हे सांगण्याचा फायदाही होऊ शकतो. चारच दिवसांपूर्वी कानावर आलेलं सुवचन इतक्या चटकन वापरता येईल असं वाटलं नव्हतं. "सुंठ घासायला खापर येते कामी, जगात निकामी, वस्तू नाही."

अतिशहाणा Sat, 08/09/2012 - 07:38

तेंडुलकरांचा पोटापाण्याकरिता इतर काही व्यवसाय असल्यास मला कल्पना नाही

तेंडुलकर बहुधा लोकसत्तेसाठी पत्रकारिता कम इतर स्तंभलेखन करत असत असे वाटते. अशा स्तंभलेखनाचे त्यांचे एक पुस्तकही प्रकाशित झाले आहेत. त्यात अत्र्यांविषयीचा एक (प्रचंड की महान अशा नावाचा) लेख आहे असे पुसटसे आठवते.

निव्वळ मराठी लेखनावर पोटापाण्यापुरते पैसे मिळत असावेत असे वाटत नाही. बहुतेक सर्व लेखक-नाटककार हे प्रा. (प्रा.डॉ.), किंवा पत्रकार आहेत.

'न'वी बाजू Sat, 08/09/2012 - 07:49

In reply to by अतिशहाणा

रोचक माहितीकरिता आभारी आहे.

निव्वळ मराठी लेखनावर पोटापाण्यापुरते पैसे मिळत असावेत असे वाटत नाही.

नसतीलही. किंवा किमानपक्षी स्थिर स्वरूपात (यानी कि फिक्स्ड इनकम) नसतीलही. परंतु प्रकाशन पूर्णपणे रॉयल्टी-फ्री आणि नाट्यप्रयोग पूर्णपणे धर्मार्थ तर खचितच होत नसावेत?

(अर्थात, 'धंदा म्हटला, की कधी चढणे आले, नि कधी बुडणेही आले' हे अध्याहृत आगाऊ मान्य आहे. परंतु धंद्याची सुरुवात तर दिवाळ्याचा अर्ज मागवण्याच्याच हेत्वर्थ खचितच नसावी? लेखक मराठी आहे हे मान्य करूनसुद्धा?)

गवि Sat, 08/09/2012 - 07:40

न्यायालय? अरे बाप रे. अहो मीही माझं मतच मांडलं होतं. तुमच्यासारख्या मुद्देसूद आणि मस्त प्रतिसादकर्त्याचा मी एरवी फॅनच आहे. पंगा घेण्यासाठी लिहीलेलं नाही हो शेट.

आपली अधिक ओळख होईल याचा अर्थ एकतर्फ़ी होता हे स्पष्ट का झालं नसावं?
मला काय वाटेल यानुसार तुम्ही लिहावं असं अर्थातच नसून "तुम्ही काय म्हणता यावर मला समजेल, अधिक खात्री होईल.."

हा एकतर्फ़ी मार्गच असतो.

तुमच्या इतक्या सविस्तर संयमित प्रतिसादानंतर घोस्टरायटिंगचा उल्लेख हा रोखून धरलेला कडवटपणा नसून विनोद आहे असं मानायला आवडेल.

पुन्हा एकदा धन्यवाद.

तुमचं भाष्य फ़क्त आणि फ़क्त कच्च्या मांसभक्षणावर होतं. ते करडं होतं. हे तुम्ही स्पष्ट केलंत. माझ्या म्हणण्यावर विचार करुन बराच संयमित प्रतिसाद देण्याइतकं महत्व दिलंत त्याबद्दल आभार
आपण सारे स्वतंत्र असं मूळ प्रतिसादात म्हटलं आहेच.
धन्यवाद.

'न'वी बाजू Sat, 08/09/2012 - 07:53

In reply to by गवि

तुमच्या इतक्या सविस्तर संयमित प्रतिसादानंतर घोस्टरायटिंगचा उल्लेख हा रोखून धरलेला कडवटपणा नसून विनोद आहे असं मानायला आवडेल.

तो कसाही मानण्याचे स्वातंत्र्य आपणांस अर्थातच आहे, परंतु तो विनोद म्हणून मानण्यास निदान मला तरी काही प्रत्यवाय नाही.

असो.

भडकमकर मास्तर Sat, 08/09/2012 - 09:20

लेख आवडला.
सर्व मतांशी अजिबात सहमत नसलो तरी मुद्देसूद प्रतिसाद पद्धत उत्तम आहेच...

परंतु या नाटकांच्या प्रयोगातून त्यांना काही अर्थप्राप्ती झाली नाही, असे त्यांच्या चाहत्यांनी शपथेवार लिहून द्यावे - आपले च्यालेंज आहे.
नाटककाराच्या अर्थार्जनाबद्दल माझी वैयक्तिक मते आणि तेंडुलकर काय म्हणाले ते लिहायला आलो होतो.. पण वरचे तुमचे मत ( रॉयल्टी फ्री तर नव्हते ना?) वाचले त्यामुळे त्याबद्दल काही लिहीत नाही. लिहिण्याची आवश्यकता नाही. ( तुमच्या लेखनाचा मला समजलेला अर्थ इतकाच असावा की असले नाटककार पैसे घेऊन बीभत्स लिहितात आणि तुम्ही पैसे न घेता ; त्यामुळे तुमचे संदर्भपूर्ण बीभत्स उल्लेख अधिक योग्य का मानू नयेत? ) त्यामुळे अर्थार्जन किती हा प्रश्न इथे गौण असावा..

पुढचे पाहण्याची इच्छाही नव्हती आणि ताकदही नव्हती, सबब नाटक तसेच सोडून सपत्नीक घरी परतलो

नाटकाचे नाव "पुरुष".. हिन्दी प्रयोग म्हणजे आयेषा जुल्का नामक नटीने काम केले होते ते आठवले. तुम्ही नाटकाचा शेवट पहायला थांबला नाहीत हे उत्तम केलेत. नाहीतर "हे नाटककार ऑफस्टेज काय काय घडवतात" या तुमच्या लिस्टमध्ये अजून एका क्रियेची भर पडली असती.

बाकी पुढील वाक्ये विशेष रोचक वाटली. ( तेंडुलकरभक्तांसाठी पुरेसा दारूगोळा आहे)
तेंडुलकरांशी स्वतःची तुलना करून माझ्या स्वतःबद्दलच्या आदरास धक्का लावण्याचे काडीमात्र कारण मला दिसत नाही. असो.

ही असली नाटके का लिहितात लोक, कोण जाणे? कदाचित स्वतःच्याच अपुर्‍या राहिलेल्या कामना त्यातून जगण्याचा प्रयत्न करत असावेत की काय, नकळे.

खिक् ...

श्रावण मोडक Sat, 08/09/2012 - 10:59

हुश्श... केवळ पाहूनच दमलो. पाहू, केव्हा सवड मिळते आणि हे वाचून समजून घेता येतं ते.
बाकी, लेखन उत्तम आहेच. ;-)

ॲमी Sat, 08/09/2012 - 11:02

मी नवीन आहे इथे. मला 'न'वी बाजु यांचे प्रतिसाद आवडतात/पटतात. कधी कधी भाषा बोचरी वाटते आणि बर्याचदा त्यांच्या प्रतिसादास विनोदी श्रेणी असते. पण मला ते reality bites/satire/black comedy असं वाटतं.
मी काही तेंडुलकरांची भक्त नाही, त्याचं कुठलही नाटक मी पाहीले/वाचले नाही. पण या लेखात, तेँडुलकरांच्याबाबतीत, नेहमी 'न'वी बाजु मांडणारे जुनी बाजु मांडतायत असं वाटलं.

चिंतातुर जंतू Mon, 10/09/2012 - 13:59

सर्वप्रथम काही मुद्दे स्पष्ट करतो : मूळचा प्रतिसाद मला तरी बीभत्स वाटला नाही. मीडिअम रेअर स्टेक मी अनेकदा आवडीनं खाल्लं आहे म्हणूनही असेल. प्रस्तुत धागालेखक आपलं समर्थन उत्कृष्ट रीतीनं करतो असं मला नेहमी वाटत आलं आहे. त्यामुळे त्याच्या मतांशी सहमत असूनही मी या प्रकरणात गप्प राहिलो होतो. मात्र 'तेंडुलकरांशी माझी तुलना मला करायची नाही' असं म्हणता म्हणता जी अनेक विधानं प्रस्तुत धागालेखकानं केली आहेत ती पाहता काही टिप्पणी आवश्यक वाटली. त्यामुळे हा प्रतिसाद मूळ धाग्याशी अवांतर वाटू शकेल. फक्त अवांतरात प्रस्तुत धागालेखकाची सक्षमता सर्वमान्य आहे; त्यामुळे मीही हे धाडस करतो आहे.

'आपल्याजवळ एक शैली आहे; त्यानुसार आपला मुद्दा खुलवण्यासाठी आपण अशी वर्णनं केली. ती इतरांना बीभत्स वाटली असतील तर त्याला आपला नाईलाज आहे' असा एकंदर सूर मला या निवेदनातून सूचित झाला. ह्या सर्व गोष्टींशी मी सहमत आहे. त्या शैलीच्या समर्थनार्थ तेंडुलकरांना पाचारण केल्यामुळे थोडे गोंधळ होऊ लागले असं मात्र वाटलं. हे गोंधळ कोणते?

'तेंडुलकर अर्थार्जनार्थ लिखाण करत होते; मी मात्र अशा अपेक्षेशिवाय करतो. तेंडुलकरांना महान म्हणता; मग मलाही सहन करा.' असा एक सूर यात जाणवला. तो बालिश वाटला. म्हणजे 'बाई तो खोड्या काढतो, पण त्याचा पहिला नंबर आला म्हणून तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता; पण मी अभ्यासात मद्द आहे म्हणून माझ्या खोड्यांसाठी मला शिक्षा करता' असा काहीसा तो सूर वाटतो. त्याची प्रस्तुत धागालेखकाला गरज वाटणं ही एक रोचक गोष्ट वाटते, पण त्यामुळे धागालेखकाच्या दाव्याला फारसा अधिक जोर येताना दिसत नाही. अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य हे सर्वांसाठी समान असावं; त्यासाठी अशी इतरांची उदाहरणं देण्याची गरज प्रस्तुत लेखकाला भासू नये असं त्याचं आतापावेतो वाचलेलं लिखाण वाचून वाटत असे त्याला या तुलनेनं छेद गेला.

>>हा मनुष्य - and I employ the term loosely - का लिहितो? याच्या डोक्यात या असल्याच कल्पना का येतात? दुसरा काही विचार - काही 'नॉर्मल' माणसांचा वगैरे - हा इसम करूच शकत नाही का? हे असे लिहून यास नेमके काय साध्य होते?

>>एकंदरीत श्री. विजय तेंडुलकर या व्यक्तीबद्दल झालेले तेव्हापासूनचे वाईट इंप्रेशन कायम आहे.)

तेंडुलकरांविषयीचं कुणाचं इंप्रेशन काय असावं हा ज्याचा त्याचा प्रश्न म्हणून सोडून द्यावा असं मला वाटत असूनही याविषयी किंचित सांगावंसं वाटलं. तेंडुलकरांचं बरंचसं लिखाण मी वाचलं आहे. माणसाच्या मनोव्यापारांविषयी आणि विशेषतः त्यातल्या हिंसेविषयी त्यांना एकंदर खूप कुतुहल होतं हे अगदी सहज दिसतं. त्याचा त्यांच्या निर्मितीक्षम आणि संवेदनाक्षम मनानं घेतलेला वेध असं त्यांच्या बर्‍याचशा व्यक्तिरेखांविषयी म्हणता येतं. पण हिंसेचा भाग सोडून दिला तरीही मुळात माणसाच्या मनातल्या अनाकलनीय गोष्टी हा ज्याचा आस्थाविषय होता (उदा : 'हे सर्व कोठून येते'मधली व्यक्तिचित्रं) अशा माणसाच्या लिखाणाविषयी हे वाचून मला गंमत वाटली. त्यांनी ज्या गोष्टींविषयी लिहिलं त्यांना वेधणारं लिखाण मराठीत फारसं आढळत नाही. श्री.ना.पेंडसे यांची 'ऑक्टोपस'सारखी कादंबरी किंवा एलकुंचवारांची 'गार्बो', 'होळी'सारखी नाटकं असे थोडे अपवाद दिसतात, पण ते अपवादानं नियम सिध्द होईल इतपतच. आता ही मराठी साहित्याची आणि पर्यायानं समाजाची मर्यादा समजावी, की तेंदुलकरांचा अवगुण हा निर्णय मी ज्याच्यात्याच्यावर सोडून देईन.

तिसरा मुद्दा हा 'नाटक' या विधेशी संबंधित आहे. कादंबरी/ललित लिखाण वगैरे साहित्य आणि नाटक यातला एक मोठा फरक म्हणजे नाटक ही प्रयोगक्षम कलाकृती असते. अनेकदा माझंही असं झालेलं आहे की वाचताना नाटक फारसं भिडलं नाही, पण चांगला प्रयोग पाहताना खोल परिणाम करून गेलं. तेंडुलकरांच्या नाटकांच्या बाबतीत हे खूप होत असावं असा माझा अंदाज आहे. सुलभा देशपांडे यांची बेणारे, मोहन आगाशे यांचे नाना फडणवीस, निळू फुले यांचा सखाराम बाईंडर अशी अनेक उदाहरणं देता येतात. माझा असा अंदाज आहे की तेंडुलकरांच्या लिखाणाची परिणामकारकता प्रयोगातून अधिक गहिरी होत असे. ललित लेख, कथा, कादंबरी असे अनेक प्रकार हाताळूनदेखील तेंडुलकर मुख्यतः नाटकं आणि एकांकिका यांच्यासाठी ख्यातनाम झाले हे दिसतं. त्यामुळे काही बाबतीत निव्वळ लेखी संहिता वाचून बनणार्‍या मताच्या अंगभूत मर्यादेला ओळखून असावं अशी माझी धारणा आहे.

असो. यातून कुणाचं मतपरिवर्तन व्हावं असा हेतू नाही. सुरक्षित मध्यमवर्गीय वास्तवात जगणार्‍या माझ्यासारख्याच्या डोळ्यांत कधीतरी तेंडुलकरांमुळे अंजन पडलं होतं. म्हणून आणि प्रस्तुत धागालेखक म्हणतो त्यानुसार 'असाही विचार करता येतो' हे जाणवून देण्यासाठीच फक्त हा प्रतिसाद. बाकी लेखकाच्या मूळ मताशी सहमती आहेच.

राजेश घासकडवी Wed, 01/01/2014 - 08:54

सालेहो, तुम्हा माणसांमधले कोणीतरी लोक हिंसेविषयी लिहितात.
त्यांना पैशे आणि किर्ती मिळते.
म्हणून काय आमचं मांस खायला परवानगी मिळते होय?
रक्तमांस चवीने खाणार त्याला कसाई देणार.
सगळे साले कसाई.

मी आपला अंधारातच बरा.

'न'वी बाजू Wed, 01/01/2014 - 19:02

In reply to by अतिशहाणा

त्यांना काळा मठ्ठ बैल अंधारातला चावला म्हणताहेत.

फक्त, त्याचा परिणाम या धाग्यावर का, ते कळले नाही.

अतिशहाणा Wed, 01/01/2014 - 19:10

In reply to by 'न'वी बाजू

प्रतिसादाची वेळ लक्षात घेता फारशी कारणमीसांसा करावीशी वाटत नाही. Tue, 31/12/2013 - 23:24 |

;)

अतिशहाणा Wed, 01/01/2014 - 19:22

In reply to by 'न'वी बाजू

यूजर प्रेफरन्सेलमध्ये सेंट्रल टाईमझोन सेट केला असल्यास ती वेळ दिसेल. बहुदा मूळ प्रतिसादक इएसटी मिडवेष्टात असल्याने मध्यरात्रीच्या सुमारासच प्रतिसाद दिला असावा.किंवा तासभर आधीच तीर्थप्रसाद-आचमने संपूर्ण फळास आली असावीत.

राजेश घासकडवी Wed, 01/01/2014 - 21:35

In reply to by 'न'वी बाजू

त्यांना काळा मठ्ठ बैल अंधारातला चावला म्हणताहेत.

बरोबर.

फक्त, त्याचा परिणाम या धाग्यावर का, ते कळले नाही.

अचानक कुठल्यातरी धाग्यावर प्रतिसाद देण्याची पद्धत हीदेखील त्या बैलाच्या ष्टाइलचा भाग आहे.

बाकी इतकं दर्जेदार विडंबन/नक्कल केल्यावरही लोकांनी प्रतिसादाच्या वेळेवर लक्ष ठेवून भलभलते अर्थ काढावे अं? काय करणार, तेंडुलकरांच्या नाटकांचेही लोकांनी भलभलते अर्थ काढले होतेच. त्यामुळे मीही सर्वांना माफ करतो आणि नववर्षाच्या शुभेच्छा देतो. ;)

'न'वी बाजू Wed, 01/01/2014 - 22:22

In reply to by राजेश घासकडवी

तेंडुलकरांच्या नाटकांचेही लोकांनी भलभलते अर्थ काढले होतेच.

तेंडुलकरांच्या नाटकांतून कोणी अर्थ काढले, हेच पुष्कळ झाले नाही काय?

'न'वी बाजू Wed, 01/01/2014 - 22:34

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

'बैल चावला'मध्ये जी मजा आहे (अधिक जो सुप्त अर्थ दडलेला आहे), ती मजा (अधिक तो सुप्त अर्थ) 'बैलाने शिंग मारले'मध्ये नाही.

'(पिसाळलेला) कुत्रा चावल्यावर मनुष्य जेणेंकरून (पिसाळलेल्या) कुत्र्यागत वागू लागतो (असे म्हणतात; अनुभव नाही, चूभूद्याघ्या), तद्वत श्री. घासकडवी हे बैल (काळा मठ्ठ अंधारातला) चावल्यागत वागत आहेत', असे यातून सुचवायचे आहे.

(पिसाळलेल्या, काळ्या, मठ्ठ, अंधारातल्या, ऑर अदरवाइज़) बैलाने शिंग मारल्यावर मनुष्य बैलाप्रमाणे वागू लागत असल्याचे निदान ऐकिवात तरी नाही; चूभूद्याघ्या.

सबब, 'बैल चावला' हेच या ठिकाणी योग्य आहे.

(अवांतर: 'जुही चावला' हे मात्र (व्याकरणदृष्ट्या) धडधडीत चूक आहे. ते 'जुही चावली' असे पाहिजे, असे या निमित्ताने अतिविनम्रपणे सुचवू इच्छितो. परप्रांतीयांचे मराठीविषयक अज्ञान अधिक निष्काळजीपणा, त्याला काय करणार?)

विवेक पटाईत Wed, 01/01/2014 - 19:44

संसार हा खोटा नाही, खरा आणि प्रत्यक्ष आहे. सगळ्यांच्या जीवनाचा सम्मान करून, चांगल्या रीतीने जगणे हाच इथे जगण्याचा उद्देश्य. साहित्य, संगीत कला किंवा सिनेमा, लेख इत्यादी लोकांच्या जीवनात जगण्यासाठी सकारात्मक चैतन्य निर्माण करण्यास समर्थ असेल तर ते श्रेष्ठ. याच दृष्टीकोनातून मी नेहमीच समोर ठेवतो.

उदाहरण सिनेमाचे म्हणायचं झाले तर गेल्या 'दो आंखे बारह हाथ' हा सिनेमा श्रेष्ठ ठरेल. याच सिनेमा पासून प्रेरणा घेऊन - देशात 'खुल्या जेल' निर्मित झाल्या. हजारों अपराध्यांचे पुनर्वसन झाले.