अरे थिएटर थिएटर

कार्यालयीन कामाची काही पूर्तता आणि तत्संबंधीचे गुप्तता अहवाल देण्यासाठी कलेक्टर ऑफिसकडे चाललो होतो. कोल्हापुरातील रस्त्यांची दुर्दशा या विषयावर एका प्रबंधाइतपत लिखाण होऊ शकेल याची खात्री असल्याने ऑफिसची गाडी न घेता स्वतःच्याच होंडा पॅशनवरून त्या गर्दीच्या रस्त्याने अगदी स्नेल स्पीड म्हणावे अशारितीने जात होतो. मागे बसलेल्या सहकार्‍याकडे अहवाल-दप्तर होते. संभाजी पूल ओलांडल्यावर पुढे एस.टी.स्टॅण्डच्या दिशेने जाणारी के.एम.टी.ची बस होती. तिच्यामागूनच पॅशन चालली होती. वाटेत पुढचा बस स्टॉप होत. तिथे केएमटीच्या चालकाने गती कमी केल्याने व बसच्या डाव्या बाजूने मोकळी जागा असल्याने मी गाडी घेतली आणि त्यामुळे कंडक्टर विंडोजवळ आलो व त्याचा नित्याचा स्टॉपचा पुकारा कानी पडला, "उषा टॉकीज उतरा झटझट...". मी पुढे गेलो आणि डाव्या हाताला असलेल्या महावीर गार्डन रस्त्यावर पॅशन घेऊन दोन-तीन मिनिटात कलेक्टर कचेरीच्या प्रांगणात प्रवेशही केला. सहकारी दप्तर घेऊन मुख्य इमारतीत गेले तर मी गाडी पार्क करून हव्या त्या विभागाकडे गेलो. तिथे रेसिडेन्ट कलेक्टर मीटिंगमध्ये असल्याचे समजले व अजून ३०-३५ मिनिटे मीटिंग चालणार असे तिथल्या अटेन्डन्टने सांगितलही. अर्थात तसल्या कार्यालयात हा प्रकार काही नवीन नसतो त्यामुळे थांबणे, वाट पाहणे हे आलेच. सहकार्‍याला तिथेच थांबायला सांगून तिथून पाय मोकळे करावे म्हणून समोरच्या महावीर गार्डनकडे आलो.

तेथील बगीच्याचा गारवा सुखावणारा असतोच. बाकावर बसताबसता कसा कोण जाणे त्या कंडक्टरचा तो 'उषा टॉकीज उतरा...' हा पुकारा कानी गुंजी घालू लागला आणि अचानक सत्य परिस्थिती सामने आली की 'अरेच्या त्या ठिकाणी तर आता उषा टॉकिज अस्तित्वातच नाही." मलाही एक प्रकारची मौज वाटली, ती अशासाठी की एखाद्या वास्तूची महती इतकी मनी दृढ वस्ती करते की ती वास्तू आता जरी जमिनदोस्त झाली असली तरी तिच्यासंदर्भातील हळुवार आठवणी मनी सदैव रुंजी घालत असतात. के.एम.टी. नेदेखील जरी इतिहासजमा झाली असली तरी अशा नावाने त्यांच्या रेकॉर्डवर असलेल्या बस स्टॉपची नावे बदललेली नाहीत. 'विनायक बंगला' हा त्यापैकी एक. राजारामपुरी ते विद्यापीठ मार्गावर असलेला हा स्टॉप 'मास्टर विनायक' या जुन्या काळातील थोर दिग्दर्शकाच्या स्मृतीनिमित्य अस्तित्वात आला होता. याच रस्त्यावर मा.विनायक यांचा छोटासा टुमदार बंगला होता. पुढे वस्ती दाट होत गेली तसा तो रस्ताही रुंद होत गेला आणि मग तो बंगलाही गेला. पण आजही 'विनायक बंगला' बस स्टॉप जसाच्या तसा आहे. 'उषा टॉकिज' बसस्टॉपही राहीलच.

"उषा टॉकीज" ~ जन्मापासून या आणि व्हीनस, लिबर्टी, शाहू, रॉयल, प्रभात, पद्मा, अयोध्या, उमा आदी जादूमय वाटणार्‍या या सिनेमा थिएटरच्या परिसरात बालपण गेले. लक्ष्मीपुरीपासून दूर जावून आता ३० वर्षे झाली पण आजही आयुष्यातील सर्वाधिक आनंदाचे, हुरहूरीचे, उत्सुकतेचे दिवस कुठल्या भागात गेले असे जर विचारले तर लक्ष्मीपुरीच्या या बाजार, नॉन-व्हेज हॉटेल्स, बॅन्का, जत्रा, अनेकविध दुकाने, कारखाने, जुगाराचे अड्डे, मटक्याची खोकी, पोलिस कॉलनी, सरकारी दवाखाने, केएमटी वर्कशॉप, मुख्य पोस्ट ऑफिस यानी गजबजलेल्या व सर्वात महत्वाचे म्हणजे तब्बल ९ सिनेमा थिएटर्सनी वेढलेल्या या भागातच असे सांगेन. कार्पोरेशनने राबविलेल्या मोहिमेअंतर्गत 'उषा टॉकीज' चे गेट झाकले गेले तर प्रेक्षकांनी पाठ फिरविली असल्याने बसंत-बहार ही जुळी आणि गावाबाहेरील संगम अशी थिएटर्स कायमची बंद झाली. पण यातील 'उषा' टॉकिजशी जे भावनिक नाते स्थापित झाले होते त्याचा विसर कधीही पडू शकणार नाही.

"शोले" उषाला लागल्याचा आनंद शोलेसाठी होता की त्या टॉकिजमध्येच डोअरकीपरच्या ओळखीमुळे जास्त वाटत होता याचे उत्तर देता येणे कठीण आहे. भगवान मोरे हा तिथला डोअरकीपर आमच्याच गल्लीत राहायचा आणि आम्ही त्यावेळची हायस्कूलची पोरे त्याच्याकडे फार हेव्याने का बघत होतो तर त्याला 'शोले' फुकट बघायला मिळत असे. त्यानेही आमच्यावर फार उपकार करीत असल्याप्रमाणे एकदाची शोलेची चार [अर्थातच थर्डाची] तिकीट 'आतून' आणून दिली होती. त्यावेळेचा आनंद काय वर्णावा ! या जगात सर्वात थोर माणूस कोण याचे उतर 'भगवान मोरे' अशी माझ्या इसाक जमादार या मित्राने घोषणाच करून टाकली होती. उषा टॉकिजमधील विरू बसंतीचा धिंगाणा, जयचे संयत वागणे आणि गब्बरसिंगच्या त्या आरोळ्या, ठाकूर बलदेवचे ते धीरगंभीर वागणे, सूनबाईचे दुर्भाग्य पाहाणे त्यांच्या नशिबी...तरीही खंबीरपणे उभा राहणे....असराणीचा हिटलर, जगदीपचा सुरमा भोपाली....हे सारेसारे आता नजरेसमोर येऊ लागले. शम्मी कपूरचा 'ब्रह्मचारी', शशी कपूर, संजीवकुमार' राखीचा 'तृष्णा', जीतेन्द्, तनुजाचा 'जीने की राह', जॉय मुखर्जी आशा पारेखचा 'लव्ह इन टोकियो', दिलीप कुमार वैजयंतीमाला यांचा 'संघर्ष' अशी काही मोजकी नावे. थर्ड क्लासमधील त्या एकाच सुराच्या खुर्च्यात बसून पाहिल्याच्या आठवणी नजरेसमोर येऊ लागल्या.

पण 'उषा' ने कधीही 'हॉलीवूड' ला आपल्या पडद्यावर स्थान दिले नाही. तो मान आणि हक्क 'उमा चित्रमंदिर' चा. शहरातील १२ गृहापैकी हे एकमेव असे की इथे फक्त आणि फक्त इंग्रजी चित्रपटच प्रदर्शित होत (आजही होतात, पण आता जोडीला हिंदीही, नाईलाजाने, प्रदर्शित करावे लागतात). 'उमा'ची आठवण तर नसानसात इतकी भिनली आहे की रात्रीअपरात्री उठवून जरी तिथे पाहिलेल्या चित्रपटांची यादी मागितली तरी ती टंकण्यासाठी कीबोर्डजवळ जाईन. हिचकॉकच्या 'नॉर्थ बाय नॉर्थवेस्ट' पासून त्याच्या शेवटच्या काळातील 'टॉर्न कर्टन' 'फ्रेन्झी' पर्यंतचा सारा आनंद उमाच्या पडद्यावरच. चार्ल्स लॉटन, क्लार्क गेबल, हम्फ्रे बोगार्ट, पॉल मुनी, स्पेन्सर ट्रेसी, गॅरी कूपर, जेम्स स्टीवर्ट, रे मिलॅण्ड, लॉरेन्स ऑलिव्हर, अलेक गिनेस हे बडे नायक आणि नॉर्मा शीअरर, हेलेन हेज, कॅथरिन हेपबर्न, व्हिव्हिएन ली, इंग्रीड बर्गमन आदी जितक्या सुंदर तितक्याच अभिनय क्षमतेने भारलेल्या नायिका यांचा सुवर्णकाळ आम्हाला त्या काळात पडद्यावर थेट पाहता आला नाही. यातील काही अभिनेत्याना 'री-रन' चे मार्केट होते आणि असे 'जादा'चे चित्रपट सकाळी ११ वाजता सवलतीच्या दरात उमा मध्ये प्रदर्शित होत असत. पण चार्लटन हेस्टन, यूल ब्रायनर, कॅरी ग्रॅन्ट, ग्रेगरी पेक, फ्रॅन्क सिनात्रा, डीन मार्टीन रॉक हडसन, क्लिन्ट इस्टवूड, बर्ट लॅन्केस्टर, कर्क डग्लस ली मार्विन, शॉन कॉनेरी, जॉन वेन, टोनी कर्टीस, जॅक निकोल्सन, एलिझाबेथ टेलर, सोफिया लॉरेन, ऑड्री हेपबर्न, ज्युलिया अ‍ॅन्ड्रुज, ज्युली ख्रिस्ती, नटाली वूड, जेन फोंडा या सर्वाना भरभरून पाहिले ते 'उमा' च्या पडद्यावर. आमची त्यावेळेची [बाल] बुद्धी ही फक्त नट आणि नटी यांच्या भोवतालीच घुटमळत असल्याने थेट हॉलिवूडमध्ये फ्रॅन्क काप्रा, जॉन फोर्ड, व्हिक्टर फ्लेमिंग, विल्यम वायलर, जॉर्ज स्टीव्हन्स, एलिया कझान, ऑर्सन वेलेस, माईक निकोल्स, डेव्हिड लीन अशी प्रतिभेने ओथंबलेली दिग्दर्शकाची नावे पाहून तिथे प्रेक्षक सिनेमाची तिकीट घेण्यासाठी तिष्ठत उभा असतो याचे ज्ञान नंतर अशावेळी झाले ज्यावेळी स्टीव्हन स्पीएलबर्गचे 'ड्यूअल' आणि त्या पाठोपाठ 'शुगरलॅण्ड एक्स्प्रेस' उमाच्या पडद्यावर झळकले त्यावेळी. ऑलिव्हर स्टोनचा 'प्लटून' पाहिला आणि आपण आता बर्‍यापैकी मॅच्युअर्ड झालो की काय असे वाटले कारण त्या चित्रपटात कलाकार नसून केवळ दिग्दर्शक ऑलिव्हर स्टोनच होता. तिच गोष्ट वूडी अ‍ॅलन, मिलोस फोर्मन, बर्नार्डो बर्टोलुची, केव्हीन कोस्टनर आदी प्रतिभावंतांची. हा सारा आनंद अगदी स्वस्तातल्या स्वस्त दरात 'उमा' ने आम्हाला उपलब्ध करून दिला होता. चित्रपटाची वेळही रात्री ९.४५ ते ११.३० अशी असल्याने चित्रपट संपल्यानंतर मोकळा रस्त्यावरून गॅरेजकडे येत असू. (होय, त्यावेळी एका मोटार गॅरेजमध्येच आम्ही पाच मित्र अभ्यासासाठी राहत असू. गॅरेज मालकाचा मुलगा हा आमच्याच साटप्यातील असल्याने त्याबद्दल कुणाला काही विचारायची गरजही नव्हती. लाईट आणि पाणी मोफत असल्याने अभ्यासाचीही काळजी वाटत नसायची. मग तिथे परतल्यावर बाजल्यावर पडून वर आकाशातल्या चांदण्यांकडे पाहातपाहात, 'तुला आत्ता पाहिलेला डिअर हंटर किती समजला आणि मला किती समजला' यावर परत हमरीतुमरीवर येऊन तासभर चर्चा.)

काळ बदलला....शिक्षण संपले....नोकरीही लागलीच लागली....समानव्यसनी मित्रांनाही पोटापाण्याच्या धांदलीने या गावातून दुसर्‍या गावात ढकलले. लक्ष्मीपुरीही सुटली आणि त्याबरोबर मागे धुक्यात गेली ती उमा, पद्मा, पार्वती, राजाराम, प्रभात, लिबर्टी ही मनाला उभारी आणू शकणारी नावे. नवे घरही झाले ते या 'बगीच्या' पासून दूरच्या अंतरावर... कालौघात थिएटरची जागा आता मल्टीप्लेक्सनी घेतली पण तेथील वातावरण, ए.सी.असूनही, भावत नाही. गेल्या दहा वर्षात थिएटरमध्ये जाऊन पाहिलेला एकमेव चित्रपट म्हणजे 'टायटॅनिक'. इंटरनेट आणि डिव्हीडीनी घर व्यापून टाकले असल्याने अगदी अर्ध्या तासाला हवे ते चित्रपट पाहू शकतोय. ज्या क्लार्क गेबलचा 'र्‍हेट बटलर' आणि रूपगर्विता व्हिव्हिअन ली ची 'स्कार्लेट ओ'हारा' उमाच्या पडद्यावर बघू शकलो नाही, त्याना आता चोविस तास टीसीएम वर पाहू शकतो. अगदी एकटादेखील. एक नाही तर डझनभर चॅनेल्सवरून इंग्रजीच काय पण अनेक परकीय भाषांतील चित्रपट घरात येऊन रतीब घालत आहेत. टोरेन्टने तर अजून जग जवळ केले आहे....पण थिएटर्सकडे जाण्याचा रस्ताच बंद करून टाकला. कालाय तस्मे नमः !

....आणि आता 'उषा' अस्तंगत झाली, उरल्या त्या आठवणी.

अशोक पाटील

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (8 votes)

प्रतिक्रिया

सुमारे ४० वर्षांपूर्वीच्या किर्लोस्कर / स्त्री च्या दिवाळी अंकांतून हे असे 'थिएटर' चे लेख असायचे. कुणा नटाची, कुण्या स्टुडीओची कथा वगैरे. त्यातल्या सगळ्याच गोष्टी अचाट वाटत. चंदेरी दुनियाच ती. त्याच काळात घर सोडून मुंबईला येऊन पिच्चर मधे काम मिळविण्याचा प्रयत्न करणारे ही असायचे. आजकाल 'पिक्चर'साठी तसं कुणी करतं का? ऐकीवात तरी नाही.

हे सगळं गेलं हेच खरं. आता रिअ‍ॅलिटी शो ची हायब्रीड कमअस्सल बेगडी दुनियाच जास्त डिमांड मधे आहे ब्वा.
||कालाय तस्मै नमः||

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आह्ह... स्मृतिरंजनात काही क्षण हरवून गेलो. उषा, उमा वगैरे नावं ओळखीची. १९८७ ते १९९० ही तीन वर्षं आठवली. उगाचच. तुम्ही लिहिलेला काळ आधीचा आहे तरीही. म्हणजेच, लेखनाशी नातं बांधलं गेलं. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चित्रपटगृहांच्या आठवणी आवडल्या. प्रत्येक शहरात इंग्रजी चित्रपटात स्पेशलाइज करणारे एखादे थिएटर असते असे दिसते. नाशिकचे सर्कलही उमा चित्रमंदिरासारखेच इंग्रजी सिनेमे दाखवत असे. शाळेत असतांना आम्ही मित्र तेथे नग्न दृष्यांच्या अपेक्षेने जात असू.

लेखनाविषयी: उमा चित्रमंदिराच्या परिच्छेदात कलाकारांची आणि चित्रपटांची निव्वळ यादी वाचत राहील्यासारखे वाटले. शेवटही अगदीच भावनिक वाटला. इंग्रजी चित्रपटांवर विस्ताराने लिहिलेले वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> मग तिथे परतल्यावर बाजल्यावर पडून वर आकाशातल्या चांदण्यांकडे पाहातपाहात, 'तुला आत्ता पाहिलेला डिअर हंटर किती समजला आणि मला किती समजला' यावर परत हमरीतुमरीवर येऊन तासभर चर्चा.>>
सुरेख स्मृतीरंजन!!!! किती छान होता तो काळ - ही आपली भावना आमच्यापर्यंत त्या वरील वाक्यातील चांदण्यांनी १००% पोहोचवली Smile

>> अशी प्रतिभेने ओथंबलेली दिग्दर्शकाची नावे पाहून तिथे प्रेक्षक सिनेमाची तिकीट घेण्यासाठी तिष्ठत उभा असतो याचे ज्ञान नंतर अशावेळी झाले >>
सुरेख!!

लेख फार फार आवडला. ऑस्सम!!! Smile

>> आणि आता 'उषा' अस्तंगत झाली, उरल्या त्या आठवणी. >>
ही पंच लाईन तर क्या केहेने!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मॉल्स, मल्टिप्लेक्स मध्ये हरवुन दबुन गेलेल्या आठवणी डोळ्यासमोर तरळल्या.

पूर्वी ठाणे पूर्व विभागामध्ये मिठबंदर रोड म्हणजे खरोखर मिठागरं आणि ठाणे बंदर होतं. ब्रिटिशांनी बांघलेलं कस्टमच ऑफिस, डुगुडुगु मिठ वाहुन घेउन जाण्यासाठी बांघलेली रेल्वे लाइन्,त्यासाठी असलेले छोटे प्लॅट्फॉर्म्स ...आता सांगुनही खरं वाट्णार नाही.
कालाय तस्मै नमः दुसरं काय.

--मयुरा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गेलेल्या काळाकडे सहज नजर टाकणारा, त्याविषयी गळा न काढता, नुसत्या आठवणी काढणरा लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्मृतीरंजन करतानाच नव्याबद्दल मनात अढी न ठेवण्याचा भाव आवडला. "टीसीएम म्हणजे जुनाट इंग्लिश चित्रपटांचा चॅनल" असं काहीसं माझं मत आहे. तुम्ही त्याबद्दलही अधिक लिहीलंत "आता थोडे जुने पिक्चर्सही बघावेत" असंही मत होईल. तेव्हा जरूर लिहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वा! नॉस्टॅल्जिया ही माणसाची सर्वात आवडती भावना असावी
नॉस्टॅल्जियाला अलगद कुरवाळणारा तरीही त्यात न गुंतलेलं लेखन आवडलं.

बाकी अनेक थेटरे ही त्या त्या शहराची - विभागाची ओळख झाली आहेत. मुंबईत मेट्रो, इरॉस वगैरे तद्दन 'इलायती' थेट्रांपासून ते मराठा मंदीर वगैरे देशी थेट्रांना आपापला इतिहास आहे/होता. अश्या थेटरांच्या आठवणींवर तुम्ही (किंवा संबंधित सदस्यांनी मिळून) एखादी मालिका काढलीत तर वाचायला आवडेलच - मालिकेसाठी 'अरे थिएटर थिएटर' हे नावही छान शोभतंय.

पुलेशु

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उत्तम लिखाण.
पुण्यातले आर्यन, मिनर्व्हा, डेक्कनवरचे नटराज ही सर्व आता विस्मृतीत गेलेली सिनेमागृहे परत आठवणींच्या पटलावर आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

एलिआ कझान, वूडी अ‍ॅलन आणि मिलॉस फॉर्मनसारख्यांचे चित्रपट प्रदर्शित झाल्याझाल्या मोठ्या पडद्यावर पाहता येणं मस्तच.

>>आपण आता बर्‍यापैकी मॅच्युअर्ड झालो की काय असे वाटले<<

किंवा

>>'तुला आत्ता पाहिलेला डिअर हंटर किती समजला आणि मला किती समजला' यावर परत हमरीतुमरीवर येऊन तासभर चर्चा<<

याविषयी, म्हणजे व्यक्तिगत आवडीनिवडी किंवा क्षणिक रंजनापेक्षा अधिक खोलवर जाऊन चित्रपट समजून घेण्याच्या प्रक्रियेसाठी या विविध शैलीतल्या चित्रपटांचा आणि त्यांवरच्या अशा चर्चांचा कसा परिणाम झाला याविषयी अधिक तपशीलात वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

१. ऋषिकेश आणि २. चिंतातुर जंतू

~ दोघांचे प्रतिसाद आणि त्यात व्यक्त झालेली भावना/अपेक्षा मनी नोंदवून ठेवल्या आहेत. नोकरीतील भटकंतीमुळे सलग एके ठिकाणी अशा लिखाणासाठी हळवा वेळ मिळणे जिकिरीचे होत असते आणि त्यातून समोर येणारी अन्य व्यवधानेही सांभाळावी लागतात. पण तुम्ही म्हणता त्याला योग्य ते शब्दरूप देण्याचा निश्चित प्रयत्न करीन.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुण्यातले एम्पायर थेटरही काळाच्या पडद्याआड गेले. फार वाईट वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह् ~ एम्पायर सिनेमाबद्दलची ही माहिती दु:ख देऊन गेली. पुण्यात कॅम्प-एरियामध्ये कामानिमित्य येणे व्हायचे आणि कामे संपल्यानंतर, तीन ठिकाणी भेट ही ठरलेली ~ १. कयानी बेकरी [केकसाठी], २. वेस्टएण्ड सिनेमा आणि ३. एम्पायर सिनेमा : इंग्रजी चित्रपटांचे माहेरघर म्हणजे ही दोन थिएटर्स होती इतके आजही स्मरते. दोन्हीपैकी एकाकडे चित्रपटासाठी भेट ठरलेलीच. गावात लकडी पुलालगत असलेले 'अलका' तरी आहे का ? इथेही प्रामुख्याने इंग्लिश चित्रपटच पाहिल्याची आठवण आजही ताजी आहे.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एम्पायर मध्ये उत्तम इंगजी चित्रपट लागायचे पण नंतर नंतर त्याची अवस्था खालावत जाउन तिथे 'झ' दर्जाचे चित्रपट लागू लागले, शेवटी तेही बंद पडून एक शॉपिंग कॉंम्प्लेक्स उभे राहिले. हीच गत बुधवारातील अल्पनेची. तिथेही आधी चांगले सिनेमे लागायचे, नंतर त्याचीही गत एम्पायर सारखीच होवून तेही नुकतेच बंद पडले आहे.
सुदैवाने अलका अजूनही चालू आहे आणि बरेच चांगले इंग्रजी चित्रपटही तिथे लागत आहेत. विजय पण अलकासारखेच चालू आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

एम्पायर चे ऐकून मलाही वाईट वाटले. वानवडी/ शिंदे छत्री भागात रहात असल्यामुळे, कॅम्पात जाणे नित्य होत असे. एम्पायर अथवा वेस्टेंडचा सिनेमा, कयानीची श्रूजबेरी बिस्कीटे, आणि एक हॉटेल होते जेथे मटन समोसे मिळत (नाव आठवात नाही) हे नेहेमीचे थांबे होते. नेहमी म्हणजे ६ महीन्यातून एकदा. पण कॅम्प्मधला "क्राऊड" खूप आवडत असे - किरीस्ताव, पारशी, सिंधी, पंजाबी कॉस्मोपॉलिटन. आम्ही मुलामुलांनी "हनी आय श्रन्क द किडस" वेस्टेंडलाच पाहीला :).......
कॅम्प्मधील मराठी ग्रंथालयाची मी किती तरी वर्षे सदस्य होते...... नेताजी नगरवरून सायकलवर जात असे.
ह्रिषिकेष म्हणतात तसे - स्मृतीरंजन ही माणसाची सर्वात आवडती भावना आहे. हे त्रिवार सत्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि एक हॉटेल होते जेथे मटन समोसे मिळत (नाव आठवात नाही)

ते नैक्का? अश्या टीपिकल इराणी खुर्च्या अन संगमरवरी टॉप वाली षट्कोनी टबलं वालं? ते प्लास्टीकच्या लाल्/पिवळ्या प्लेटीत 'बॉम्बे' सामोसे अन सॉस यायचे अन मग जितके नग खाता आले तितकं बिल वालं? त्या कॉर्नरचं? वेस्टेण्ड समोरचं? वेस्टेण्ड तर मी पुण्यात असतांनाच गेलेलं. तिथे मोठी बिल्डींग झाली. वेस्टेण्ड च्या बॉक्स मधे लव्हसीट्स होत्या म्हणे?

त्याचं नांव कॅफे नाझ. ६० पैशात व्हेज अन १ रुपयात खिमा भरलेला सामोसा मिळायचा =P~

२ तुकडे झाले होते त्याचे मी लास्ट पाहिलं तेव्हा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

लेख आवडला

भूतकाळाचे उसासे न टाकता
सहज एखादी आठवण सांगावी ईतक्या तरलतेने लिहिलेला लेख आवडला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

चित्रपटगृहांच्या आठवणी आवडल्या. फार वर्षांपूर्वी गावातील चित्रपटगृहे ही लँडमार्क असत. अनेकदा पत्ते सांगताना त्यांचा वापर केला जाई.

लोकप्रभामध्ये गेले अनेक महिने मुंबई टॉकिज म्हणून मुंबईतील थिएटर्सवर लेखमाला येत असे. त्याची प्रकर्षाने आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण तेथील वातावरण, ए.सी.असूनही, भावत नाही.

हे मात्र पटत नाही. मला स्वतःला मल्टीप्लेक्सचे प्रेझेंटेशन खरोखर आवडते आणी आठवणीही बनू लागल्या आहेत. उदा. केवळ ८० रूपयात सकाळच्या शोला पाहीलेला अवतार (३डि) हा चित्रपट, तीच गोश्ट इन्सेपशनची सकाळी केवळ ६० रूपयात पाहीला, कीतीतरी ३डि अ‍ॅनीमेटेड चित्रपट असेच मस्त रेंगाळत स्वस्तात (अर्थातच सकाळचा शो) पाहीले आहेत. मल्टीप्लेक्सचे दर सोडले तर चित्रपट बघणे म्हणजे एक खरोखर आनंददायी अनूभव असतो.... मल्टीप्लेक्स मोफत झाली पाहीजेत Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाप रे!
अहो,
१ रु. ५ पैसे तिकिटात शोले पहिल्या शोला पडद्यासमोर स्टेजवर झोपून हिकडची मान तिकडं करून पाहिलेली एक्ष्पायरी डेटची लोकं आम्ही. तुमचं फक्त ८० रुपये वगैरे काही जमत नै ब्वा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

पठडीतला स्मरणरंजनात्मक लेख असूनही चांगला वाटला आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा वाटला. सुरुवात थोडी निबंधासारखी झाली असली तरी नंतरच्या थिएटरच्या आठवणींचा भाग रंजक वाटला. चित्रपट कलाकारांच्या नावांची यादी थोडी लांब वाटली.
एकंदरीत लेख वाचनीय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तम लेख. नॉस्टॅलॅजिक झालो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0